Tuesday, November 29, 2016

दहा रुपयांची गोष्ट


गुरुवारची गोष्ट. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानासामोरून जाऊन पुढे पेगासस क्लब समोरील तिठ्या जवळ घडलेली. सूर्य अस्ताला गेला होता बहुतेक. या भागात सूर्योदय आणि सूर्यास्त हा कॅलेंडर मधील वेळेनुसार होतो असे म्हणायचे कारण सिमेंटच्या जंगलातून तो प्रत्यक्ष होताना दिसतच नाही. तर अशीच संध्याकाळची वेळ, अगदी संधीप्रकाश पसरतो तेंव्हाची. ताथवडे उद्यानाकडून एक किरमिजी रंगाची ‘वॅगन आर’ आली आणि कोपऱ्यावरच्या मनीषा भेळेच्या दुकानं समोर रस्त्याच्या कडेला थांबली. तिच्या नंबर प्लेट वरील सिरीज बघून ही गाडी दसरा  किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रस्त्यावर अवतीर्ण झालीय हे जाणकार पुणेकराच्या लगेच लक्षात येऊ शकेल इतकी नवीन. त्याहीपेक्षा ती गाडी ज्या प्रकारे उभी राहिली त्यावरून चालक अगदी नवखा असणार हे कोणत्याही चिकित्सक आणि काहींच्या मते “खत्रूड” पुणेकराने सांगितले असते. गाडीत एक त्रिकोणी कुटुंब, वडील गाडीचे चालक, मोबाईल फोनवर बोलण्यात व्यग्र असलेले. आई घरगुती समान घेण्यासाठी अगोदरच या दुकानांमध्ये पोचलेली बहुतेक.मागच्या सीटवर ५-६ वर्षाचा एक गोंडस मुलगा.

समोरच्या पदपथाला लागून एक गॅस चे फुगे फुगवणारा विक्रेता आणि त्याच्या बरोबर त्याचा ७-८ वर्षाचा मुलगा, आपली लांडी विजार लपविण्याच्या उद्देशाने असेल कदाचित पण एक पाय दुसर्या पायावर दुमडून उभा राहिलेला.

 पेगासस क्लबच्या बाजूला असलेला रिक्षा थांबा आणि गिर्हाईकांची वाट बघणारे रिक्षाचालक. पलीकडे एका होर्डिंगवर मास्टर कार्डची जाहिरात त्यातील ठळक पंच लाईन सकट - “देअर आर समथिंग्स मनी कॅन बाय ........”.  सायंकाळ असली तरी गुरुवार असल्यामुळे कमी प्रमाणात चालू असलेली वर्दळ असा हा परिसर.

थांबलेल्या गाडीत बसलेला छोटा मुलगा त्या फुगेवाल्याच्या लगेच लक्षात आला. त्यानं आपल्या मुलाला फुग्यांचा गुच्छ घेऊन तिकडे पिटाळला. गाडीच्या मालकीणबाई तेव्हढ्यात हातात सामानाच्या पिशव्या आणि तिघांसाठी दाबेली घेऊन गाडीत परतल्या.  गाडीच्या मागच्या खिडकीतून तो छोटा मुलगाही त्या फुग्यांकडे बघत होता. दोघाची नजरा-नजर झाली. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी हेवा दाटलेला. कारण त्या क्षणी त्या दोन्ही मुलांना जे हवं होत ते समोरच्याच्या हातात होत. वया परत्वे दोघांनाही त्या मागचे अर्थकारण समाजात नव्हते. फुगे विकणार्याला मात्र थोडा हिशोब वडिलांनी शिकवला असावा. आपल्या हातातील विक्रीसाठी असलेला फुगा आणि समोर मिळणारी दाबेली एकाच किमतीची आहे हे त्याला अनुभवाने माहित होते पण त्याला “बाजारमूल्य” वगैरे जड शब्द असतात हे त्याला माहित असणे शक्य नव्हते. एक फुगा विकला तर कदाचित वडील आपल्यालाही  दाबेली घेऊन देतील आणि जास्त फुगे विकले गेले तर आज घरी जेवायला मिळेल, इतकेच काय ती त्याची आशा.

गॅसचा फुगा किंवा दाबेली दोन्ही वस्तूंनी भागणारी भूक काही तासांची, नव्हे क्षणभंगुरच कदाचित! पण त्या दोघांची त्याक्षणी  तीच भावनिक गरज होती. गाडीतल्या गोंडस बाळाने फुग्याची मागणी आईकडे केली. आईने नकार दिला. बाळ हिरमुसला. फुगे विक्रेत्याचा अपेक्षाभंग झाला खरा पण त्याला हा अनुभव नवीन नव्हता. त्याची दाबेली खाण्याची इच्छा त्याने पुढे ढकलली.

गाडी निघून गेली, एक प्रश्न माझ्या मनात सोडून .........खिशात ऊब देणाऱ्या दहा रुपयांच्या नोटेची नेमकी आणि खरी किंमत किती?  

-सत्यजित चितळे,

#नोटाबंदी

Friday, November 25, 2016

रेकॉर्ड- डेटा आणि अर्काईव्ह


रेकॉर्ड- डेटा आणि अर्काईव्ह

पहाटेचे चार वाजले तरी अनुजला  झोप लागली नव्हती. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून तो एका केसमधला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेच शोधून काढलेल्या काही रामबाण पद्धतींचा वापर करून सुद्धा त्याला अपेक्षित निष्कर्ष मिळत नव्हता. आणि या उलघालीत असतानाच आज एक विलक्षण आनंदाची घटनासुद्धा घडली होती.

आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास फोन वाजला तेंव्हा डॉक्टर अनुज मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसून एका क्लिष्ट स्लाईडच निरिक्षण करण्यात गुंतला होता. त्याने थोड वैतागूनच फोनचा रिसिव्हर उचलला. पलीकडून सरांची पी. ए.  अंजली बोलत होती. “ तुम्हाला डायरेक्टर सरांनी बोलावलंय लगेच” तिन तिच्या मंजुळ आवाजात निरोप दिला. “ एका कॉम्प्लीकेटेड केसची स्लाईड बघतोय, अर्ध्या तासाने आलो तर चालेल का विचार त्यांना”. एरव्ही कोणी दुसरा असता तर असे उलट उत्तर दिल्यावर त्याची काही खैर नव्हती. पण डॉक्टर अनुज ची गोष्ट  वेगळी होती. अतिशय मनस्वी संशोधक अशी त्याची हॉस्पिटल मध्ये ख्याती होती आणि म्हणूनच त्याला त्याच्या वेळेनुसार काम करण्याची मुभा रिसर्च डायरेक्टर सरांनी दिलेली होती. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे “ होय तुमच्या वेळेनुसार या” असे उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवून त्याने पुन्हा मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसले. पण त्याची तंद्री पुन्हा भंग पावली. पुढच्या वेळेस फोन वर थेट डायरेक्टर सर बोलत होते “ अनुज, लगेच माझ्या केबिन मध्ये ये. तुझ्यासाठी स्वीडनहून फोन होता. परत ५ मिनिटात फोन येणार आहे.” त्यांनी अतिशय हर्षोल्हासित स्वरात अनुजला निरोप दिला. हातातलं काम अनुज कधी अर्धवट सोडत नसे, पण या वेळेस तो लगेच उठला. डोळ्यावर चष्मा चढवून तो तडक त्याच्या लॅब च्या बाहेर पडला.मुंबईतल्या या प्रसिद्ध रुग्णालयाचा पसारा बराच मोठा होता. विविध प्रकारच्या उपचारांसाठी त्याचा पसारा चार वेगवेगळ्या इमारतींमध्ये विभागला होता. अनुज जिथे काम करत असे ती लॅब आणि सरांचे ऑफिस हे एकाच इमारतीत पण वेगवेगळ्या मजल्यावर होते. अनुज बाहेर  पडला आणि लिफ्टची वाट न पाहता त्याने थेट जवळचा जिना चढायला सुरुवात केली. दोन दोन पायऱ्या एका दमात चढत त्याने वरचा मजला गाठला.  तिथून पुढच्या लांबच लांब कॉरीडॉर मध्ये पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होती. हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर्स त्यांच्या कामासाठी त्या गर्दीतूनच वाट काढत इकडे तिकडे जात होते. नवीन पांढरा एप्रन घातलेले इंटर्नस उगाचच इकडे तिकडे लुडबुड करत होते.  अनुजला हा प्रकार नवीन नव्हता, पण आज त्याला घाई झाली होती. फोन कोणाचा असेल याची त्याला पुसटशी कल्पना आली होती पण कशाबद्दल असेल याची उत्सुकता त्याला अस्वस्थ करीत होती. ६-७   महिन्याभरापूर्वीच त्याने त्याच्या शोधनिबंधाचे बाड ‘द रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस’ ला पाठवले होते. जीवशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या यादीतील तो एक संभाव्य विजेता असणार होता आणि ही गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त फक्त त्याच्या सरांना माहित होती. कॉरीडॉर मधून झपझप चालत जाताना आपल्या हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि हाताच्या तळव्यान्ना नेहमीपेक्षा जास्त घाम आलाय हे त्याला जाणवले. त्याच्याकडे बघून त्याला “हॅलो” करणाऱ्या त्याच्या सहकारी आणि जुनिअर डॉक्टर लोकांकडे आज त्याचे लक्ष नव्हते. विचारांच्या तंद्रीत तो वेगाने सरांच्या केबिनपाशी पोचला. त्यांच्या सेक्रेटरीकडे न पाहताच त्याने दार ढकलून केबिनमध्ये प्रवेश केला. “ ये अनुज, अभिनंदन” अतिशय आनंदात असलेल्या सरांनी त्याचे स्वागत केलं. धापा टाकत आलेल्या अनुज समोर त्यांनी पाण्याचा ग्लास सरकवला “ शांत हो, तुला पुढे अर्धा तास अतिशय शांतपणे फोन वर बोलायचे आहे.” स्वत:ची उत्सुकता झाकण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले. अनुजने काही म्हणायच्या अगोदरच त्यांच्या टेबलवरील फोन वाजला. त्यांनी अनुजला रिसिव्हर उचलण्याची खूण केली. थरथरत्या हाताने अनुजने रिसिव्हर उचलला. “ इज धिस डॉक्टर अनुज जोशी?” पलीकडून एक परदेशी प्रौढ व्यक्तीचा आवाज आला. “ येस धिस इज डॉक्टर अनुज, मे आय नो हू इज ऑन द लाईन प्लीज? “ अनुज ने प्रतिप्रश्न केला. त्याच्या प्रश्नाचे सरळ उत्तर लगेच आले नाही. तो डॉक्टर अनुजच आहे याची खातरजमा करण्यासाठी एका मागून एक प्रश्न त्याला विचारले गेले. त्याच्या सरांनी त्याला याची अगोदरच कल्पना दिलेली होती त्यामुळे तो सलग न अडखळता उत्तरे देत गेला. त्याची ही मुलाखत अर्धा एक तास चालू होती. “ अभिनंदन डॉक्टर अनुज, या वर्षीच्या जीवशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी तुमची निवड करण्यात येत आहे.” हे शेवटी आलेले वाक्य मात्र अनुजच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे ठरले. बोलणारी व्यक्ती निवड समितीची अध्यक्ष असणारी ज्येष्ठ संशोधक होती. अनुजचा त्याच्या कानांवर विश्वास होता. त्याला खात्री होती की त्याने केलेले संशोधन हे त्याच तोडीचे आहे. त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून त्याच्या हॉस्पिटलच्या रिसर्च विभागाच्या डायरेक्टर सरांनी आनंदाने टाळी वाजवली. आणि ते डोअर बेल मारणार इतक्यात अनुजने त्यांना खुणेनेच थांबवले. शिष्टाचाराप्रमाणे पी.टी.आय. कडे याचा टेलेक्स आल्याशिवाय आणि त्यांच्याकडून कळल्याशिवाय याची प्रसिद्धी करू नये अशी सूचना त्याला फोन संपताना करण्यात आली होती. आणि त्याने हे लगेच सरांना सांगितले.

अर्थात हा सोपस्कार पूर्ण व्हायला केवळ १५ मिनिटांचाच कालावधी गेला आणि लगेचच ही बातमी पी.टी.आय.  कडून प्रसारित करण्यात आली. हॉस्पिटलचे संचालक मंडळ, अनुज चे सहकारी, कनिष्ठ सेवक व कर्मचारी सर्वांच्या शुभेच्छांच्या गर्दीत डॉक्टर अनुज हरवून गेला. तासाभरातच वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा त्याला गराडा पडला. त्यांचे तेच तेच प्रश्न आणि त्याला तीच उत्तरे देऊन तो वैतागून गेला. या घटनेची बातमी होताच अनुजचा फोन खणखणू लागला. शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करता करता संध्याकाळ केंव्हा झाली ते त्याला कळलेच नाही. हॉस्पिटल तर्फे दुसर्या दिवशी फॉर्मल  प्रेस कॉनफरन्स घेण्याचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले.

अनुजने लावलेला शोध हा जनुकीय रचना आणि त्यामुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आणि त्यावरील उपचार या विषयी असल्याने त्याचे बौद्धिक स्वामित्व हक्क मिळणार नाहीत याची माहिती त्याच्या सरांना होती पण या शोधाचे श्रेय हॉस्पिटलला मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती आणि अनुजची त्याला काहीच हरकत नव्हती. कौतुक सोहळा संपल्यावर सरांनी अनुजला बोलावलं आणि दुसर्या दिवशीच्या प्रेस कॉनफरन्स मध्ये देण्यासाठी निवेदन तयार करण्याविषयी सूचना केली. कॉनफरन्सच्या आधी अर्धा तास भेटून त्यावर शेवटचा हात फिरवू असे म्हणून त्याचा निरोप घेतला.

मुंबईत लहानाचा मोठा झालेला अनुज लहानपणापासूनच हुशार श्रेणीत गणला गेलेला विद्यार्थी. जीवशास्त्रातील आवड त्याला मेडिकलला घेऊन गेली. मेडिकलच्या सर्व वर्षात प्राविण्य मिळवीत त्याने पॅथोलोजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. परंतु वैद्यकीय शिक्षण घेतांनाच जनुकीय संशोधनात त्याला  गोडी निर्माण झाली. या विषयातील संशोधनातून दुर्धर आजारांची चिकित्सा आणि उपाय अधिक परिणामकारकपणे करता येईल असा विश्वास वाटून त्याने यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. आणि अधिक पैसे मिळवून देणाऱ्या संधी नाकारून मुंबईच्या या प्रख्यात रुग्णालयात रिसर्च विभागात काम करणे स्वीकारले. नेमके हेच रुग्णालय स्वीकारण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे इथे आजवर लाखो रुग्णांनी उपचार घेतले होते आणि त्यांच्या आजार, व उपचारांची संपूर्ण माहिती किंवा रेकॉर्ड या रुग्णालयाने व्यवस्थित जपून ठेवलेली होती. त्यामुळे इथे अधिक परिणामकारक पणे संशोधन करता येईल याची डॉक्टर अनुजला खात्री होती.

एकीकडे पॅथोलोजी मध्ये नेहमीचे काम करत डॉक्टर अनुजने त्याचे संशोधन चालू ठेवले. २-३ वर्षातच त्याने सदर केलेल्या शोध निबंधाने त्यांच्या रिसर्च डायरेक्टर सरांचे लक्ष वेधून घेतले. त्याने नोंदवलेली निरिक्षणे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष याचा अभ्यास केल्यावर, हा मुलगा काही तरी भव्य दिव्य संशोधन करेल यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी त्याला मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देऊन टाकली. अनुजचे संशोधन चालूच होते. पाहता पाहता दोन तपांचा काळ उलटला. मधून मधून होणार्या वैद्यकीय कॉनफरन्स  मधून त्याचे अतिशय अभ्यासपूर्ण शोध निबंध प्रकाशित होत त्यामुळे त्याच्या विषयात काम करणाऱ्या डॉक्टर्स मध्ये त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होती.  अनुजमध्ये एक प्रकारचा नेमस्तपणा होता. पेशंट आणि त्यांची रेकॉर्ड्स  केलेल्या निरिक्षणाची तो त्याच्या खिशातल्या छोट्याश्या डायरी मध्ये नोंद करून ठेवत असे. नंतर त्या नोंदी पुन: वाचून त्यांची वहीत नोंद करून ठेवत असे. कॉलेज पासून असलेल्या त्याच्या या नेमस्त पणाची कधी कधी दोस्त मंडळीत थट्टा सुद्धा होत असे. पण कधी काही मागचे संदर्भ मागायची पाळी आली कि लोक त्यांच्या मागे लागत असतं.

हॉस्पिटलमध्ये त्याच्या विषयात काम करताना त्याला अर्काईव्हज च्या विभागातून जुनी रेकॉर्डस शोधून काढावी लागत. अर्काईव्ह विभागाच्या अधिक्षकांनी ही सर्व रेकॉर्ड अगदी काळजीपूर्वक जपून ठेवली होती. केवळ तसे त्यांना वाटत असे म्हणून. त्यांची शिस्त बिघडेल म्हणून ते त्याला सहज कोणाला हात लावू देत नसत. डॉक्टर अनुज आणि त्यांचे त्यामुळे सुरुवातीला खटके उडाले होते. पण पुढे पुढे अनुजच्या नेमस्तपणाबद्दल त्यांची खात्री पटली आणि त्याला अर्काईव्हज च्या विभागातही मुक्त प्रवेश मिळाला. तिथे अनेक रुग्णांच्या आजाराविषयीचे रेकॉर्डस  होते. त्या त्या वेळेस उपलब्ध डॉक्टरने केलेल्या तपासण्यांचे निष्कर्ष लिहिलेले होते. अनुज ज्या दिशेने काम करत होता त्याला आवश्यक किंवा पोषक संदर्भ अधून मधून त्याला मिळत.  पण बर्याच वेळेस तपासणी करणाऱ्या डॉक्टरची दिशा आणि अनुज ची अभ्यासाची दिशा जुळत नसे. या रेकॉर्ड्स मधून अनुजला अनेक माणसे भेटली. त्यांच्या आजारांविषयी,  सवयींविषयी वाचायला मिळाले. त्याची त्यांच्या आजाराशी सांगड घालता आली. आज त्यातली किती माणसे ह्यात आहेत त्याचा अंदाज नव्हता पण त्यांचा इतिहास “रेकॉर्ड” म्हणून त्याच्या हॉस्पिटल मध्ये जपून ठेवला गेला होता.

तल्लख बुद्धीच्या अनुज ने ही रेकॉर्ड्स इतक्या वेळेस तपासली होती कि त्याला ती बरीचशी पाठ झाली होती. त्यामुळे रुग्णांच्या रेकॉर्ड्स चा चालता बोलता अर्काईव्ह अशी त्याची रुग्णालयात ख्याती होती, आणि खासगीत तोही हे नम्रपणे मान्य करत असे.  

अनुजचे स्वत: चे निरिक्षण आणि त्याने केलेल्या नोंदी, अर्काईव्हज मधून घेतलेले संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून त्याने त्याचा शोध निबंध सिद्ध केला होता. कॅन्सर सारख्या दुर्धर अजारांच्यामागे असलेले जनुकीय संरचनाचे कोडे त्याने पूर्ण सोडवले होते. त्याने सिद्ध केलेल्या पद्धतीमुळे दुर्धर आजारांचे पूर्व निदान तर होणार होतेच पण त्यावरची उपाय योजना करून त्यांचे निर्मुलन करता येणार होते. या शोधाप्रमाणे क्लिनिकल ट्रायल्स करण्याची रीतसर परवानगी त्याच्या हॉस्पिटल ने मिळवली होती आणि सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्याची उपयुक्तताही सिद्ध करण्यात आलेली होती. माणसाच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी शोध ठरलेला होता. विश्व निर्माण करणाऱ्या ब्रह्माच्या सूत्राचीच उकल केल्यासारखा.

अनुजच्या विनयशील स्वभावाच्या विरोधात असलं तरी त्याला थोडी “ग”ची बाधा यामुळे झाली होती आणि ते स्वाभाविक होत.  याच उन्मादात त्याने झोपण्याच्या अगोदर प्रेस कॉनफरन्स साठी द्यायचे निवेदन लिहून पूर्ण केले होते. या जगातून सर्व प्रकारचे दुर्धर आजार निर्मुलन करण्याचा दावा त्याने त्यात केला होता.

संध्याकाळी हॉस्पिटल मधून आनंदात बाहेर पडल्यावर तो प्रथम आई वडिलांना भेटायला गेला. आपल्या मुलाच्या कौतुकाने त्यांना भरून आले असेल तर त्यात काय विशेष. आशीर्वाद घेण्यासाठी तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला तेंव्हा त्याचे वडील वीर सावरकरांची कविता त्याला उद्देशून म्हणाले “ कितीक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे| परी जे गजेंद्र शून्डेने उचलिले, श्रीहरी साठी नेले, कमलफुल ते अमर जाहले ||” ही पंक्ती तेंव्हापासून त्याच्या कानात घुमत होती.

संध्याकाळी तो घरी पोचला तेंव्हा त्याच्या सोसायटीचा परिसर देखील गर्दीने फुलून गेला होता. त्यामध्ये त्याचे आप्त होते तसेच त्याचे शाळेतले, कॉलेजमधले मित्र आणि काही शिक्षकही आवर्जून उपस्थित होते. अनुज ने सवयीने प्रथामिकतेने त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याला ८वी टे १० वी गणित शिकवणारे किंकर सर त्याचे अतिशय लाडके होते आणि ते त्याला भेटायला मुद्दामहून आले होते. अनुज ला गणित हा विषय फारसा आवडत नसे पण किंकर सरांचे शिकवणे आणि विषय समजावून सांगणे त्याला अतिशय आवडत असे. “त्यांच्यामुळे मी दहावी पास झालो आणि म्हणून डॉक्टर होऊ शकलो नाही तर दहावी नापास असा शिक्का बसला असता” असा विनोद करून त्याने एकदा शाळेच्या री-युनियन मध्ये त्यांची अप्रत्यक्ष स्तुती केली होती. त्यांना नमस्कार करायला तो पुढे झाला तेंव्हा किंकर सरांनी देखील “तुझे गणितातले रेकॉर्ड अगदी न दाखवण्याच्या लायकीचे होते रे “ असा सहज शेरा मारल्यामुळे  उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली होती. अर्थात जनुकीय रचनांमध्ये जसं अनुज गुंतत गेला तसे त्याला सृष्टीच्या या मूळ कोड्यात काही गणितीय सूत्रे आहेत हे जाणवू लागले होते आणि किंकर सरांनी शिकवलेले आणि घोटून पक्के करून घेतलेले गणितातले मूळ सिद्धांत त्यामुळे त्याला वारंवार आठवत असत.

गेले दोन आठवडे अनुज एका क्लिष्ट केस्माध्ली गुंतागुंत सोडवण्याच्या प्रयत्नात होता. सहा महिन्यांपूर्वी हा रुग्ण तपासणीसाठी तिथे पहिल्यांदा दाखल झाला होता. अनुजने शोधून काढलेल्या पद्धती प्रमाणे त्याची तपासणी झाली होती अन् खुद्द डॉक्टर अनुजने त्याच्या स्लाईड बघून ‘या रुग्णाला कॅन्सर होणार नाही असा निर्वाळा दिला होता. परंतु दोनच आठवड्यापूर्वी तो रुग्ण परत दाखल झाला होता आणि त्याला अतिशय दुर्धर अश्या प्रकारचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ईश्वरदत्त आजाराबदाल त्या रुग्णाची जरी काही तक्रार नव्हती तरी त्याच्या केसने अनुजला मात्र पूर्णपणे हलवून टाकले होते. त्याचे जुने रिपोर्ट आणि रेकॉर्ड त्याने पुन:पुन्हा तपासली होती. पण त्याने शोधून काढलेल्या पद्धती मध्ये त्याला कुठलेच वैगुण्य सापडत नव्हते. आज त्याचा या केसचा अभ्यास अर्धवट राहिला होता आणि गेले ७-८ तास तो त्यापासून अतिशय अलिप्त वातावरणात डुंबून गेला होता.

गादीवर पडल्या पडल्या जसा त्या क्लिष्ट केसने त्याच्या अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तसाच त्याने केलेला दावा आणि वीर सावरकरांच्या काव्यपंक्तीनी. न सुटणारी केस त्याला समोर दिसत होती आणि तरी देखील केलेला हा सर्वद्न्यपणाचा दावा. काहीतरी चुकतंय असा त्याला सतत वाटत होत. मधूनच किंकर सरांनी मारलेला शेराही त्याला अस्वस्थ करत होता.

 मी, मी केलेल्या नोंदी, मी तपासलेली रेकॉर्ड्स, त्याच्यावर केली भाष्ये उद्या प्रसिद्ध होणार. लोक मला डोक्यावर घेणार, पण मीच का? इथे तर अनेक संशोधक आहेत या विषयावर प्रकाश टाकणारे? आणि ते रुग्ण... जे केवळ रेकॉर्ड बनून राहिले इतके वर्ष आमच्या अर्काईव्हज मध्ये? ते कोण ? इतक सगळ करूनही ही न सुटणारी केस. देवान अजून सगळी गुपितं खुली केली नाहीत माझ्यासाठी! मी कोण? कुठेतरी बनून राहिलो असे असे एक रेकॉर्ड, डेटा का मानवाच्या इतिहासाच्या अर्काईव्ह मधले एक पान? अनुज याचे उत्तर शोधत होता. सत्कार- शुभेच्छांमुळे अधांतरी झालेले त्याचे पाय त्याला चकवलेल्या केसमुळे पुन्हा जमिनीवर टेकले होते.

अनुज उठला, दिवाणखान्यात आला. तिथे त्याचं देवघर होत. देवासामोरच्या  मंद एल. ई. डी. च्या प्रकाशात देवांच्या मूर्ती अधिकच तेजस्वी दिसत होत्या. त्यान समोर आसन मांडल आणि डोळे मिटून घेतले. मी, माझा अभ्यास, आजवर रेकॉर्ड बनलेले असंख्य जीव, त्याच्यात जीव ओतून मी त्याचा डेटाबेस केला. त्यातून गवसलेली सत्य, उलगडलेली कोडी आणि आता मिळणारी प्रसिद्धी, पण हे सगळ अपूर्ण आहे. अनुजने डोळे उघडले.  कॉम्प्युटर सुरु केला त्याने लिहून पूर्ण केलेल्या निवेदनातील शेवटची ओळ त्याने बदलली “ या संधोधनामुळे जगातील सर्व दुर्धर आजर कायमचे नष्ट होतील” हे वाक्य खोडून “ या संशोधनामुळे दुर्धर आजारांवरील उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल होतील.” बस इतकेच लिहून तो थांबला. त्याला त्याचे उत्तर सापडले होते.

सत्यजित चितळे

२३ नोव्हेंबर २०१६, पुणे


Wednesday, November 2, 2016

त्रयस्थ


दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळी सहज वसंतरावांच्या घरी डोकावलो. वसंतराव माझ्या जिगरी दोस्ताचे म्हणजेच राहुलचे वडील.

वसंतरावांनी हसून माझं स्वागत केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळल्याचा भाव नव्हता. पहाटे पहाटे अभ्यंग स्नान केल्यामुळे त्यांच्या मुळच्या उजळ चेहेऱ्यावर मात्र वेगळच तेज दिसत होत. काळ्या बारीक काड्यांच्या आयताकृती काचांच्या लेटेस्ट चष्म्यामुळे त्यांच्या गोलाकार चेहेर्यावरची करारी मुद्रा अधिकच उठून दिसत होती.

राहुलची इंजिनियरिंग कॉलेज मध्ये पहिल्यांदा ओळख झाली तेंव्हा आम्ही त्यांना काका म्हणत असू. कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात असतांना राहुलला ट्रीपला जायला परवानगी नाकारणारे ‘कडक’ वसंतकाका आम्ही पदवीधर- द्विपदवीधर झाल्यावर आमच्याबरोबर संवाद आणि कधी वाद-विवाद करण्या एवढे बदलले. पुढे जाता त्यांची वेगळी ओळख वाढत गेली आणि हळू हळू त्यांना थेट वसंतराव म्हणण्यापर्यंत आमचा घरोबा वाढला. कधी मधी मी असाच त्यांच्या घरी डोकावत असे आणि “मी आज वसंतरावांना भेटायला आलोय, तुझ्याकडे काही काम नाहीये” असे राहुलला स्पष्ट सांगत असे इतकं आमच मेतकूट छान जमल होत.

वसंतराव वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. अगदी गाव पातळीवर कामाच्या जबाबदार्यांपासून सुरुवात करून निवृत्त होताना मुंबईत मंत्रालयातील काही महत्वाच्या विषयापर्यंत जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली होती. निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले ते त्यांच्या मुलाच्या म्हणजे राहुलच्या आग्रहाखातर. मित्र जमविण्याच्या आवडीमुळे त्यांना बस्तान बसविणे फारसे अवघड गेले नाही. लवकरच त्यांचा असा ठराविक दिनक्रम त्यांनी आखून घेतला. सल्लागार म्हणून त्यांचे कडे वेळोवेळी सरकारी आणि इतर कामे येतच असत. नेहमीच चांगल्या उमेदवाराचा शोधात असलेले सोसायटीचे सेक्रेटरीचे पदही त्यांचेकडे चालून आले. हातात घेतलेल्या अश्या अनेक सामाजिक प्रकल्प आणि कामांमध्ये त्यांच्या हृदयातील वसंत फुलताना दिसत होता, पण त्याच्यातील “वसंत” या सर्व संस्थांपासून अलिप्त राहिला. वसंतराव अजात शत्रू नव्हते. पण त्यांचे शत्रू बनू पाहणाऱ्या लोकांना ते त्यांची बाजू समजावून देण्यात यशस्वी होत असत. त्यामुळे ‘मतभेद’ या पलीकडे त्यांचे शत्रुत्व वाढत नसे.

राहुलच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा ते सरकारी घरात राहत असत. तेंव्हाच त्यांच्या घराच्या दिवाणखान्यातील एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या घरी खिडकीच्या जवळ वसंतकाकांच्या तरुणपणचा एक फोटो लावलेला होता. आणि त्या खिडकीत एक रिकामी फ्रेम ठेवलेली होती. दर वेळी त्याच्या घरी गेलं की ती फ्रेम माझे लक्ष वेधून घेत असे. अर्थात सुरुवातीला घरोबा फार नसताना कुतूहल शमवणे शक्य नव्हते. पुढे नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या बदल्या होत गेल्या पण प्रत्येक घरी वसंतरावांची ती फ्रेम खिडकीतून प्रवास करत गेली. नुकतेच काही वर्षांपूर्वी राहुलला या फ्रेम चे रहस्य विचारले तेंव्हा खांदे उडवून ‘ते तू त्यानाच विचार’ असे त्याने उत्तर दिले होते.

आज त्यांच्या घरी गेलो होतो ते त्यांना हा प्रश्न विचारण्यासाठीच. दिवाणखान्यात ऐसपैस बसल्यावर वसंतरावांनी फराळाची ऑर्डर आत दिली आणि ‘ बोला काय काम काढलत माझ्याकडे? ‘ असा प्रश्न केला. ‘ तुमच्या घरातील या दोन फ्रेम्स मी बर्याच वर्षापासून पाहतोय, पहिल्यांदा मला वाटल की ती रिकामी फ्रेम चुकून राहिली असेल खिडकीत. पण ती तुमच्या सर्व बदलीच्या घरात अशीच खिडकीतून आणि तुमच्या तरुण पणच्या फोटो शेजारी बघून मला अस वाटलं की त्यामागे काही कारण आहे. ते विचारव असा मनात आहे.’ मी स्पष्टपणे माझं येण्याच प्रयोजन सांगितलं. वसंतरावांना तसही स्पष्टपणे बोलणच आवडत असे हे मला ठाऊक होत.

‘ती फ्रेम होय, ती माझ्यासाठीच आहे!’ वसंतराव मिश्कील हसत म्हणाले. राहुल माझ्या शेजारीच बसला होता, तो अस्वस्थ झाला. ‘अरे म्हणजे मी मधून मधून त्या फ्रेम मध्ये जाऊन बसतो’ . वसंतरावांनी अजून एक कोडे टाकले. मी आणि राहुलने एकमेकाकडे पहिले, त्यांना काय म्हणायचे आहे त्याचा आम्हाला बोध होत नव्हता. आमच्या बावचळलेल्या चेहर्यांकडे बघून वसंतराव बोलते झाले. ‘ इतक्या वर्षात मला हा प्रश्न कोणीच विचारला नव्हता. बर झालं तू विचारलास. त्याच असा आहे सत्यजित- आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत अनेक विषय हाताळतो, उत्तरांचे पर्याय धुंडाळतो आणि निर्णय घेतो. जेंव्हा आपण एखादा निर्णय घेतो तेंव्हा तो त्यावेळी चूक किंवा बरोबर हे ठरवण हे फार सापेक्ष असतं. आणि आपण निर्णय घेतल्यावर तो बरोबरच आहे असं आपलच कोणत्याही परिस्थितीत म्हणण असण स्वाभाविक असतं. पण इतर लोक त्याचा काय विचार करतात यावर बहुतेक वेळा त्या निर्णयाच यशापयश अवलंबून असतं. ही फ्रेम ही अश्यावेळेस एकूण परिस्थितीतून बाजूला होऊन आपणच आल्या वागण्याकडे, इतरांच्या वागण्याकडे बघण्याची माझी जागा आहे. आणि म्हणून मी बर्याच वेळा इथे जाऊन माझ्याच कडे बघत राहतो. माझं वागण चुकलाय असं लक्षात आलं की ते बदलायचा प्रयत्न करतो. माझ्या निर्णयाचा वेगळा अर्थ घेतला जातोय असा वाटलं तर माझी भूमिका समजवून सांगायचा प्रयत्न करतो.

बदल हे होतंच राहतात. आपल्या सभोवार परिस्थिती बदलते. पण आपण या बदलामधील कॉन्स्टट आहोत असं आपल्याला वाटत असतं. परिस्थिती तशी नसते. आपल्यालाही बदलायला हवं, नाहीतर आपण आउटडेट होऊ, पण बदल करायचा केंव्हा आणि कसा हे समजायलाही या फ्रेममध्ये जाण्याचा उपयोग होतो.’

वसंतरावांच्या बोलण्यातील अर्थ हळू हळू आमच्या ध्यानात येत होता. ‘ पण काका ही फ्रेम खिडकीत का?’ मला पडलेला दुसरा प्रश्न मी पुढे केला. ‘आपलं ठेवायचं झाकून, अन दुसऱ्याच पहायचं वाकून’ हा माणसाचा स्वभाव आहे. साहजिकच उघड्या खिडकीतून दुसर्याच्या घरात डोकावून बघण्यात आणि दुसऱ्याच सगळ ठीक ठक आहे किंबहुन ठीक ठाक नाहीये हे बघण्यात प्रत्येकालाच आनंद असतो. मग आमच्या घरात तिऱ्हाईताने डोकावून पाहिलं तर त्याला सगळ ठीक ठाक दिसायला हवं म्हणून मी या फ्रेम मध्ये जाताना उघड्या खिडकीत जाऊन बसतो, इतक हे सोप्पं आहे. आणि हो तू आता शेवटचा प्रश्न विचारशील कि माझ्या तरुणपणातला फोटो तिथं काय करतोय. माणस जेंव्हा परलोकी जातात ना तेंव्हा त्यांचे त्या आधीचे फोटो  आठवणीदाखल लावतात. पूर्वायुष्यातील आठवणी पुसट होतात आणि नजीकच्या आठवणी ताज्या राहतात म्हणून असं असेल असे मला वाटते. म्हातारपण येईपर्यंत जगणं ही एक अचीव्हमेंट गणली जाते म्हणूनही कदाचित गेलेल्याचे व्यक्तीचे अगदी शेवटचे फोटो लावत असतील, माहित नाही. मी माझ्या आयुष्यात जो सुवर्ण काळ जगलो तो माझ्या तिशीत. भरपूर काम केलं, कष्ट सोसले. त्याच फलित म्हणून पुढे मान-मरातब मिळाला, पैसा मिळाला, नोकर चाकर आले. पण मला अजूनही आकर्षण आहे माझ्या त्याच क्षमतेच आणि त्या रूपाच. म्हणून मी तो फोटो कायम समोर ठेवला आहे. मी गेल्यावर या रिकाम्या फ्रेममध्ये कुठला फोटो लावायचा हा राहुलचा प्रश्न आहे.’ राहुलकडे  नजर टाकत वसंतरावानी अगदी समाधानकारक उत्तर दिल.

 सगळ्यात असूनही आपल्याच असण्याचा त्रयस्थ म्हणून विचार करणारे वसंतराव मला आज भेटले. भोवताली बदलणाऱ्या परिस्थितीनुसार त्यांच्यात झालेल्या बदलामागची प्रेरणा त्यांच्या या “त्रयस्थ” राहण्याच्या वृत्तीत होती हा एक वस्तुपाठ मला मिळाला. त्याच बरोबर एका गोष्टीचे वैषम्यही वाटलं. वसंतराव बदलले, पण त्याचं स्वत:बद्दलच मत बदललं नाही याचं. पैसा, ऐश्वर्य, यांचा मोह जरी त्यांना नव्हता, तरी ते  सांगत होते तितके ते ‘त्रयस्थ’ बनू शकले नाहीत हे त्यांच्याच शेवटच्या वाक्यातून स्पष्ट होत होत. ‘स्व’-पूजेतून सुटका ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाहीच मुळी !

-सत्यजित चितळे , १ नोव्हेंबर २०१६

Saturday, July 23, 2016

मुंजाबा द ग्रेट मॉन्स्टर


आमच्या आजोळी राजगुरुनगरला ब्राह्मण आळीतून नदीकडे जाणार्या वाटेवर चिंचेची भरपूर झाडं होती. त्याच्याच मध्ये एक पिम्पळाचं झाड होत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही लहान मुलं नदीवर डुंबायला जायचो. डुंबून झालं कि पिंपळाच्या पारावर कपडे वळवायचे, जवळच मैदानात लंगडीचे डाव रंगात यायचे. पिंपळाच्या पानांची सळसळ त्या पारावर पाय पसरून बसल कि कानात घुमायची. कधी एखादी कोकिळा त्या झाडाच्या उंच शेंड्यावर बसून तीचं ग्रीष्म गान ऐकवायची.
संध्याकाळी मात्र आम्ही तिकडे फिरकत नसू. पिम्पळाचं ते झाड आणि आसपासची चिंचेची झाडं हे गावातल्या मुन्जाबाच जीपीएस लोकेशन होत. मुन्जाबान पछाडलेल्यांच्या अनेक सुरस व रम्य कथा आमच्या मोठ्या मामा लोकांनी आम्हाला सांगितल्या होत्या. मुंजाबा हा देव मानतात पण काही ठिकाणी त्याच्या सुरस कथांमध्ये त्याला मॉन्स्टर चा दर्जा सुद्धा दिला आहे. या मुंजाबाच्या कारामतींवर उपाय म्हणून तिथेच एकदा भगवान हनुमान ‘अवतरले’ आणि कोणी तरी त्याची शेंदूर लावलेली एक दगडी पाषाण मूर्ती घुमटीत विराजमान केली होती.
बालपणीच्या या भाकड कथा आणि अंधश्रद्धांना मोठे झाल्यावर धकाधकीच्या जीवनात विस्मृतींच्या कप्प्यात ठेवून दिलं गेलं. आमच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मोठ्ठ चिंचेच झाड दिसून सुद्धा या आठवणी जाग्या झाल्या नाहीत.
परवा सोसायटीच्या दाराजवळ, चिंचेच्या झाडाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचा घोळका दिसला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आणि नजर त्यावर खिळलेली. सहज चौकशी केली. आमच्यासारख्या आउटडेटेड ‘काकां’ना त्यातल्या एका चुणचुणीत मुलाने ‘पोकेमॉन गो’ या खेळाविषयी माहिती दिली. “ तुमच्या कडे स्मार्ट फोन असेल तरच तुम्हाला हे कळेल” असा एक सणसणीत टोलासुद्धा त्यानं लगावला. आणि त्यावरून मुन्जाबाची परत आठवण झाली. खर जग, आभासी जग असे जड शब्द त्या मुलाने सहजपणे उच्चारले, त्यातला अर्थ विशेष न कळतासुद्धा! ‘पोकेमॉन अवतरतो म्हणजे त्या पिंपळाजवळ हनुमंत अवतरले तसेच का?’ हा प्रश्न ओठापर्यंत आला होता पण त्याची नजर पाहून शब्द गिळून टाकले.
आमच्या काळातल्या आभासी जगात मुंजाबा हा मॉन्स्टर होता आणि हनुमान हा हिरो. आम्ही मॉन्स्टर पासून बचाव करण्यासाठी तिथून पळून जायचो, ही पिढी त्या मॉन्स्टर कडे धावतेय, त्यालाच पकडायला!
या गावोगावच्या मुंजाबाने पिंपळाच्या आणि चिंचेच्या झाडाचं रक्षण केलं. काही मांत्रिकांचं पोटही त्याच्या करणीवर चाललं . पोकेमॉन गो ची मांत्रिक कंपनी निन्टेन्डो या खेळातून गब्बर झालीय अशी बातमी वाचली. काळ बदलला, समजुती बदलल्या, माणूस अजून बदलला नाही, बदलणाराही नाही हे पुन्हा अधोरेखित झालं.
काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर या षडरिपुंपासून मुक्ती मिळवण्यासाठी करावी लागते ती भक्ती आणि ठेवावी लागते ती श्रद्धा. आणि या षडरिपुंना व्यवहारात निमंत्रण देते ती अंधश्रद्धा ही सोपी व्याख्या जर बरोबर असेल तर एकूण अर्थबोध होतो.
आंतर्जालाच्या मोह्जालापासून मुक्ती मिळवणे आताच्या जगात खरंच कठीण आहे हे मात्र अगदी खरंय!

सत्यजित सुरेश चितळे, २३ जुलै २०१६

Wednesday, June 29, 2016

रघु- रघुनाथ महाराज

उन्हानं तापलेल्या डांबरी रस्त्यावरून एक छकडा चालत जायचा. त्याच्या दोन्ही चाकांना जरूरीपेक्षा जास्त वंगण घातलेलं असल तरी ती त्यांचे बेअरिंग घळघळीत झाल्यामुळे एकाच पातळीत फिरत नसत. स्वाभाविकपणे “खड् खड्” असा आवाज करत तो छकडा डोलत पुढे जात असे. छकडा ओढणाऱ्या बैलाची मान जणू त्या तालावरच डावी उजवीकडे झुलत असे. छकडा चालवणारा त्या बैलाशी अखंड बोलत असे आणि आपले बोलणे ऐकूनच हा बैल त्याला मान डोलवतोय असे त्याचा गोड गैरसमज झालेला असे.  एकूण सांगाडा जुना झालेला, वेळो वेळी रंग दिल्यामुळे त्याचे एकावर एक थर बसलेले आणि त्याचे पोपडे उडालेले असे त्याचे रूप होते. या डोलण्या बरोबरच त्या सांगाड्यातून “कच कच” आवाज होई आणि त्या सांगाड्याचे कठडे कधी तुटून पडतील असे वाटे. सिंहगड रस्त्यावर पंचवीस- तीस वर्षापूर्वी हा रघूचा छकडा अनेकांनी पहिलेला असेल. सिंहगड रस्त्यावर इंडियन ह्यूम पाईप च्या समोर कॅनाल वरच्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्याला एक सुरेख वळण होत आणि तो रस्ता चढाचा होता. सुरेख अश्यासाठी कि त्या आधीच्या टप्प्यात रस्त्यावर सावली धरणारी अनेक डेरेदार झाडे होती आणि त्यातील एका झाडाखाली नीरा विक्रीची एक छोटीशी टपरी होती. ७ वी ते १० वी च्या काळात एप्रिलच्या महिन्यात शाळा संपली कि सकाळी थोडं उशिराने उठून आम्ही सायकलवरून धायरीला जायचो त्या वेळी कधी कधी रघूचा हा छकडा रस्त्यावर या भागात जाताना दिसे. धायरी परिसरतील उद्योग हे त्या वेळेस पुण्याच्या 'खूप' दूर वर असल्यासारखे होते. पुण्याच्या मध्य वस्तीत, रविवार पेठेतून मटेरीअलची खरेदी करून त्यावर प्रक्रिया अनेक उद्योग करत असतं. माल विकणारा आणि घेणारा असे दोन्ही उद्योजक तुलनेन लहान होते त्या वेळची ही गोष्ट.
रघु रविवार पेठेतून त्याच्या छकड्यातून माल लादून आमच्या आणि इतर जवळपासच्या कंपन्यांना पोचवत असे. डोक्यावर मळलेल्या गांधी टोपीखाली झाकलेले बारीक कापलेले केस, मूळचा गव्हाळ वर्ण पण कष्ट केल्याने रापलेला चेहरा, कपाळावर चंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ,  अंगात मळलेली दणकट बंडी आणि त्यावर जाड कापडाचे अनेक खिसे असलेले आणि पुढची बटणे तुटलेले, ग्रीस आणि ओईल चे हात लागून ओशट झालेले अर्धे जॅकेट. उजव्या खांद्यावर चाबूक, त्याचा दांडा कंबरेपर्यंत आलेला. कंबरेला मळलेली गुढग्यापर्यंत आलेली अर्धी विजार आणि पायात करकरणारे अनेक खिळे ठोकलेल्या पुणेरी वहाणा अशी त्याची स्वारी छकड्यात एका बाजूला बसलेली असे. छकड्याच्या एका अंगाला रंगी बेरंगी कापडान शिवलेली बर्यापैकी स्वच्छ असलेली पण जिचे बंद हाताळून काळे कुळकुळीत झालेत अशी त्याची डब्याची पिशवी लटकवलेली असे. त्या पिशवीत त्याचा जेवणाचा डबा तर असेच पण वेळ मिळाला कि वाचण्यासाठी भागवताची प्रत किंवा तुकारामाची गाथा असे. छकड्याच्या एका किंवा दोन्ही बाजूला गोणपाटात लपेटलेले आणि काथ्याने बांधलेले मटेरीअल चे बार, पट्टे आणि त्यावरच बैलासाठी थोडं वैरण पेंढी असे आणि छकड्याच्या खालच्या बाजूला एक घमेलं, लटकवलेल, बैलाला पाणी पाजण्यासाठी.
रघूचा बैल उमदा खिल्लारी होता. शुभ्र पांढऱ्या रंगामुळेच बहुतेक त्यान त्याला “भुर्या” हे नाव दिलेलं होत. उंच, पुष्ट वशिंड असलेलं हे उमदं जनावर प्रेमळ स्वभावाचं होत. बैलपोळ्या च्या दिवशी रंगवलेली शिंग आणि पाठीवर काढलेली नक्षी अनेक दिवस त्याच्या अंगावर मिरवायची. रघु चाबूक घेऊन यायचा पण त्याचा व्रण कधी भुर्याच्या पाठीवर दिसला नाही. “माझी भाषा त्याला समजते” असाच त्याचा दावा होता आणि तो खोटा ठरवायला कोणी जात नसे.
सकाळी १०-११ वाजता रविवार पेठेतून निघाला कि १ ते  १.३० च्या दरम्यान मजल दर मजल करीत ही रघु आणि भुर्याची जोडी आमच्या वर्कशॉप मध्ये पोचत असे. पहाडी आवाजात “ सामान आणलाय हो” अशी हाळी घालत उडी मारून तो छकड्यातून पायउतार होत असे. भुर्या सवयीप्रमाणे छकडा वळवून उलट घेत वर्कशॉपच्या दारात लावे पर्यंत रघूची स्वारी टेबलपर्यंत पोचत असे. त्या वेळी छोट्या कंपनीत एखादेच टेबल असे तेच मॅनेजरचे, सुपरवायझरचे, तेच जेवायला वापरायचे.
रघु हमाल होता पण त्याचा स्वत:चा छकडा होता.त्यामुळे तो जरा “वरचा” समजला जाई, अर्थात ते इतरांच्या मनात. त्याने आणलेल्या मटेरीअलच्या चलनावर दोन प्रकारे त्याची बिदागी लिहिलेली असायची- वाहतूक आणि हमाली. चलन टेबलवर ठेवून तो स्वत:च मटेरीअल उतरवायला घ्यायचा. सगळे सामान उतरले की दाखवायचा, मोजून द्यायचा. आमच्या वर्कशॉप समोर त्या वेळेस एक लिंबाचे झाड होत आणि मोकळी जागा होती. तिथे छकडा लावून आणि भूर्याच्या मानेवरच जू काढून त्याला मोकळा करायचा. मागचं घमेलं काढून त्यातून पाणी आणून भुर्यासमोर ठेवायचा आणि मायेन त्याच्या मानेवरून हात फिरवत त्याला गोंजारून वैरणीची पेंढी त्याच्या समोर टाकायचा. मगच स्वत: हात धुवून त्याची बिदागी घ्यायला यायचा. पैसे कमी करण्यावरून मग शब्द व्हायचा तेंव्हा तो स्वत:ची हमाली कमी करायचा पण वाहतुकीची रक्कम कधी कमी करत नसे.” मुकं जनावर आहे  त्याच्या पोटावर पाय नका देऊ” असे म्हणून तुकोबाचे, ज्ञानदेवाचे कोणतेतरी अभंगाचे दृष्टांत देऊन ते पटवायचा प्रयत्न करायचा. रघुला अक्षर ओळख होती, तो पुस्तके नव्हे तर ग्रंथ आणि पोथ्या वाचायचा, पण फार लहानपणीच शाळा सुटल्याने हाताला लिखाणाचे वळण नव्हते, त्यामुळे पैसे घेतले की मग घट्टे पडलेल्या हाताचा अंगठा उठवणे पसंत करायचा. अंगठा उठवून उठवून त्याच्या डाव्या हाताचा अंगठा कायमचा निळा झालेला होता. पण तो कोणाला अंगठा दाखवणारा नव्हता आणि त्यामुळे रविवार पेठेतील शेठ लोकांचा आणि त्यांच्या गिऱ्हाईकांचा आवडता होता. हा सर्व कार्यक्रम चालू असताना त्याची अखंड बडबड, ओव्या म्हणणं आणि त्याचा अर्थ सांगत फिरणं हे चालूच असायचं. काही लोक त्याला वेडासुद्धा समजत असतं कारण तो बर्याच वेळेस त्याच्याच घमशनात असे. दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला आणि वर्कशॉपमधील सर्वांना पेढे द्यायला गेलो तेंव्हा नेमकाच तो तिथे आला होता. पेढा घेऊन त्यान मोकळेपणान दिलेला आशीर्वाद मला आजही आठवतो.
पुढे एक दोन वर्षानं देवानं रघु आणि भुर्याची जोडी फोडली. पोटाच्या आजाराच निमित्त होऊन भुर्या गेला. रघु आमच्याकडे येण बंद झालं. तोपर्यंत रिक्षा टेम्पो वाढले आणि वाहतूक करणारे हमाली करणार्यांच्या एक नव्हे तर दहा पायऱ्या वर गेले.
इंजिनियरिंगला गेल्यावर आमच्या बुडाखाली वाहन आलं. सुट्टीच्या दिवशी ते फिरवायला मिळावं या उद्देशान रविवार पेठेतील काम ओढवून अंगावर घेणं सुरु झालं. असा एकदा दुकानात गेलो असताना रघु भेटला. एकदम अबोल, कामापुरतंच बोलला, तेही कष्टावल्या सुरात. मला वाईट वाटलं हेही मला आठवतंय. दुकानाच्या पुढच्या एका भेटीत तो दिसला नाही तेंव्हा चौकशी केली. त्याचा एक सहकारी होता दशरथ, तो सांगता झाला- ‘ भुर्यावर त्याचा फार जीव. तो गेला तेंव्हा ढसा ढसा रडला. आणि नंतर त्याची वाणी एकदम बंद झाली. छकडा चालवण्यासाठी दुसरा बैल घे असे आम्ही सुचवले पण त्याची तयारी नव्हती. त्याने तो छाकडाही विकला. हमाल चौकात जाणं बंद केलं आणि नुकताच गावी निघून गेला असं कळाल. घरचं कोणी नव्हतं त्याला. भुर्याच्या मायेन त्याला बांधून ठेवला होता. ते पाश गेले, आता त्याचं काय होत सांगता येत नाही.’ दशरथन फारच विदारक चित्र समोर मांडल. हळहळ व्यक्त करण्यापलीकडे त्यावर कोणी प्रतिक्रिया दिली नाही.
रघूची आठवण परत निघण्याचं कारण गेल्या महिन्यात घडलं. नेहमीप्रमाणेच परत शेठच्या दुकानात गेलो असताना त्यांनी एक पत्रक हातात दिल. सांगरुण गावातल्या कीर्तन महोत्सवाचं. हे मला कशाला असे भाव माझ्या चेहऱ्यावर बघून शेठन खुलासा केला ‘तुम्ही रघुची चौकशी करायचात ना? तो कीर्तनकार झाला, त्याच कीर्तन आहे, तुम्हाला मुद्दामहून सांगितलं’. मी पत्रक पुन्हा वाचलं, कीर्तनकार रघुनाथ महाराज भिंताडे हे नाव मला अपरिचित होत पण व्यक्ती? मला माहित नव्हतं.
त्या दिवशी ठरवून मी सांगरुणला पोचलो. मंदिरात जाऊन बसलो. शहरी पेहरावातला आणि तशाच धाटणीचा मी एकटाच होतो तिथे त्यामुळे सगळे जण माझ्याकडे रोखून बघत होते. हरीचा जयघोष झाला, पायघोळ अंगरखा, जरीकाठी धोतर आणि डोईवर फेटा घातलेले प्रसन्नचित्त रघुनाथ महाराज आले. गळ्यात तुळशीची माळ आणि फुलांचा हार घालून त्यांनी आख्यान मांडल. सार्या सृष्टीत एकच परमेश्वर व्यापून राहिला आहे हा विषय मांडताना त्यांनी ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदविला त्याच आख्यान रंगवून सांगितल. मी पाणी भरल्या डोळ्यांनी संपूर्ण आख्यान ऐकलं. रघु-रघुनाथराव....मी अजूनपर्यंत ‘त्या’ची ओळख पटवू शकत नव्हतो. मग आरती झाली. भक्त लोक महाराजांच्या पायावर डोक ठेवून जायला निघाले, महाराज शांतपणे तुकोबाच्या गाथेतील एक एक श्लोक म्हणत होते. तोच खडा पण आता गंभीर वाटणारा आवाज, तीच लय आज मी पुन्हा २५-२८ वर्षानी ऐकत होतो. “तुका म्हणे काही न मागे आणिक | तुझे पायी सर्व सुख आहे ||” मी महाराजांजवळ पोचलो तेंव्हा ही ओळ म्हणताना त्यांचा चेहरा विठ्ठलासंमुख होता. मी त्यांच्या नजरेत पाहिलं आणि एकदम भूर्याला पाणी देतानाचे रघु चे डोळे आठवले. तेच पाणीदार डोळे, तीच समर्पित वृत्ती, तीच सेवेची आस! मला रघु- रघुनाथरावांची एकदम खरी ओळख पटली.
माया तेचि ब्रह्म, ब्रह्म तेचि माया | अंग आणि छाया तया परी ||
तोडिता न तुटे सारिता निराळी | लोटांगणातळी हारपते ||


हे तत्वज्ञान कोळून प्यायलेल्या रघुनाथरावाला, आम्ही भुर्याच्या मायेत अडकवू पाहत होतो. तो त्याच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाची निस्सीम भक्ती करत होता, त्याची माया त्याचे ठायी लीन झालेली होती. 

Thursday, June 23, 2016

K2S


पुण्याच्या दक्षिणेस बघितले कि दोन मदारींच्या उंटाची पाठ दिसते तशी दोन टेकाडे असलेला कात्रजचा डोंगर दिसतो. पुण्याची ही दक्षिण सीमा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सरदार शाहिस्ताखानवर  जो निर्णायक विजय मिळवला त्या घटनेतून हुलकावणी देणे यासाठी मराठी वांग्मयात “कात्रज करणे” या अर्थाने या डोंगराने स्थान मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विजयी मोहिमेत पुण्याजवळचे दोन ऐतिहासिक पुरुष स्थान मिळवून आहेत, एक कात्रजचा घाट आणि डोंगर आणि दुसरा सिंहगड. भूगोलाचे यथार्थ ज्ञान शत्रुवरच्या निर्णायक विजयात किती महत्वाचे ठरते हे शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेच्या अभ्यासात दिसून येते.

तर अश्या या कात्रज-सिंहगड डोंगररांगेवरून एक भटकंतीची वाट जाते. सामान्यपणे हा ट्रेक चांदण्या रात्री केला जातो. या मार्गावरून न गेलेल्याने पुण्यात ट्रेकवरच्या गप्पांच्या फडात बोलूच नये. हातात हुकुमाचे पान नसताना ३०४ च्या डावात बोली लावणार्यावर इतर खेळाडू जसे तुटून पडतात तशी त्याची गत होईल.

आज पुन्हा हा ट्रेक करण्याचा योग आला. पाहटे ५.३० वाजता आम्ही दोघेच कात्रजच्या बोगद्यापलीकडे दाखल झालो. बहिणीने तिथे सोडण्याचे कष्ट घेतल्याने चांगलीच सोय झाली. चढाईला सुरुवात केल्यावर कात्रजच्या डोंगराचा विस्तार लक्षात येतो. साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही दोघे कात्रजच्या डोंगराच्या शिखरावर पोचलो. पूर्वेला तांबडे फुटू लागले होते. सिंहगड ढगात हरवला होता. सूर्याजवळ फारसे ढग नव्हते, त्यामुळे पावसाची शक्यता नाही आता सॅक मधून टोपी बाहेर काढावी लागणार असा विचार येऊन गेला. उजवीकडे पुणे आजून झोपेतून जागे होतंय असा भास होत होता. मधूनच येणारा मौसमी वार्याचा जोरदार झोत अंगावर झेलत आम्ही डोंगर माथ्यावरून पुढे सरकत होतो. बरोबर डोंगर माथ्यावर नुकतेच जल-संधारणाचे काम पूर्ण झालेले दिसत होते. त्यामुळे वाट चुकण्याची भीती नव्हती. वाटेवर आधीच्या भटक्यांनी पुरेश्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लुकोज ची रिकामी पाकिटे, शीतपेयांचे कॅन टाकलेले असल्याने ‘हीच वाट आहे’ हे अगदी साफ कळत होते. कात्रजचा डोंगर माथा अगदीच उघडा बोडका, झाडी कुठे तरी तुरळक, मुरमाड रस्ता. तसा दिड तासाच्या चाली नंतर उजव्याबाजूला गेलेल्या डोंगररांगेवर धायरीतील खंडोबाचे मंदिर दिसू लागले.

हळू हळू डोंगराची ठेवण बदलली. मुरमाड वाटेवर ठीक ठिकाणी मातीची वाट सुरु झाली. आमच्या सुदैवाने पाऊस पडत नव्हता. येणाऱ्या प्रत्येक “बाराव्या” टेकडीचा तीव्र आणि निसरडा उतार, त्यामुळे चिखलाची रंगपंचमी न होता आम्ही सहज उतरू शकलो. त्याचप्रमाणे पुढच्या प्रत्येक “तेराव्या” टेकडीचा चढ सहज अंगावर घेता आला. सिंहगड जवळ येता येता डोंगर उतार हिरवा झालेला दिसू लागला. मुंग्या आणि वाळवीच्या मुंग्यांची उन्हाळी कामे संपवण्याची लगबग चालू होती. लाल पैस्यांची जोडी कुठे कुठे फिरताना दिसत होती. गेल्या आठवड्या- दोन आठवड्यात झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने थोडी हिरवाळ तरारलेली होती आणि कुठे कुठे खोड फुलांचे नाजूक कोंब फुटलेले दिसत होते. झाडांना फुटलेल्या नाजूक पालवीचे रंग तर एखाद्या अनुभवी चित्रकाराला सुद्धा कळवता येणार नाहीत इतके सुंदर होते.

आज या संपूर्ण पत्यावर आम्ही दोघेच प्रवासी होतो. शेवटच्या टप्प्यात एक घार “ची ची” आवाज करत आमच्यावर हवाई लक्ष ठेवून होती. कोण्ढणपूरच्या दरीतून येणारा मोराचा केकारव आणि डोणजे कडच्या दरीतून येणारा “पेरते व्हा” चा अखंड निनाद ऐकत आम्ही सलग ४ तास चालत ट्रेक पूर्ण केला. ढगांनी पूर्ण वेळ सावली धरल्याने फारसा शिणवटा जाणवला नाही. ले. कर्नल जनार्दन ने सर्व आघाड्यांवर उभा केलेला विरोध मोडून काढत हा ट्रेक घडवला त्याबद्दल त्याचा मी हार्दिक आभारी आहे! आजचा अनुभव नक्कीच पदरात पडला.




Thursday, June 2, 2016

आप मेला जग बुडाले


भोजपूर च्या भोजेश्वर मंदिरात दुसर्यांदा गेलो तेंव्हा त्याच्या भव्यतेबद्दल नाविन्य नव्हत. त्यामुळे त्यातील बारकावे अधिक समजून घेता आले. या मदिराजवळ भोजपूर हे गाव आहे, सुमारे १००० वर्षांपूर्वी भोज राजाच इथे वास्तव्य होत, त्याच्या खुणा बेत्रावती नदीच्या जवळ भग्न अश्या जोत्यांच्या स्वरूपात बघता येतात. भारतीय इतिहासात मानाचं स्थान आपल्या कर्तुत्वान मिळवलेला भोज राजा इथे नेमका कुठे रहात होता हे आता अंदाजानच सांगता येत. एकट्या भोज राजाच्या पदरी ही अनास्था आहे अस नव्हे. ठीक ठिकाणी पुराणकालीन मंदिर आहेत आणि ती नेमकी कुणी बांधवली याची इतिहासात नोंदसुद्धा आहे. पण ती मंदिरे बांधणाऱ्या किंवा बांधवून घेणाऱ्या कर्तुत्ववान पुरुषांची राहती घर आज शिल्लक नाहीत. रायगडावर जगदीश्वर मंदिर जून पूर्ण स्वरूपात शिल्लक आहे पण शिवरायांच्या पदस्पर्शान पावन झालेला त्यांचा राहता वाडा कसा होता हे केवळ कल्पनेनच सांगता येत ही वस्तुस्थिती आहे.

माणूस आपल्या श्रद्धा आणि श्रद्धास्थान जपतो म्हणून ती टिकतात कि त्यांच्या विषयी असलेली श्रद्धा हि टोकाची अंधश्रद्धा बनत जाते म्हणून ती स्थान टिकतात? ऐतिहासिक पुरुषांच्या आठवणी असलेली ठिकाण नष्ट करण हे पराभूतांच्या अस्मिता संपविण्यासाठी करतात असेही काही कारण या मागे असाव बहुतेक. हा विचार मनात घोळत होता आणि भोपाळ हून परतेच्या प्रवासात शिर्डी ला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी थांबण्याचा योग जुळून आला.

मी शिर्डीला पहिल्यांदाच गेलो. तसे काही कारण नव्हते आधी कधी जायला. उन्हाळ्यातील सुट्यांच्या दिवसातील रविवार, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुललेले होते. कोणतेही इतर निमित्त नसतानासुद्धा केवळ दर्शनासाठी आलेले इतके लोक बघून मी अचंबित झालो. दर्शनबारी च्या बाहेर प्रसाद आणि प्रतिमा विकणारी दुकाने, त्यांच्यात ग्राहक आपल्याकडे येण्यासाठी चाललेली  चढाओढ हि इतर कुठल्याही देवस्थानाला शोभणारी होती. एका दुकानात पादत्राणे ठेवून आम्ही उन्हान तापलेल्या रस्त्याने पळत दर्शन्बारीमध्ये शिरलो. सज्जनाना उगाचच धाक वाटेल अश्या सुरक्षाव्यवस्थेच दार ओलांडून आम्ही बारी मध्ये उभे राहिलो. रांग पुढे पुढे सरकत होती. माझ्याबरोबरचा सह-प्रवासी इथे नेहमी येणारा होता. आपल्याला एक-दीड तास लेगेल असे गर्दीकडे बघून तो म्हणाला. मला मंदिरात जाण्याची उत्सुकता होतीत त्यामुळे थांबण्याची माझी तयारी होती. दर्शनासाठी आलेले भाविक हे बहुभाषिक- बहुप्रांतीय होते. आपल्याला लवकर दर्शन मिळावे यासाठी त्यातील काही लोकांची पैसे मोजण्याची सुद्धा तयारी होती. त्यांची तशी व्यवस्था करण्याची तयारी तिथल्या काही स्वयंसेवकानी दाखवली आणि त्यांची सोय झाली सुद्धा! मंदिराच्या प्रमुख गाभार्यात शिरण्यापूर्वी रांग एका मोठ्या सभागृहातून नागमोडी गेली होती. या सभागृहातेल भितींवर साई बाबांच्या जीवनातील प्रसंग म्युरल्स करून लावलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी केलेया चमत्कारांच्या कथा जास्त आहेत. मी कुतूहल म्हणून ते वाचत वाचत पुढे सरकत होतो. “इथे फर्स्ट टाईम आला का?” माझ्या मागे असलेल्या गृहस्थाने प्रश्न केला. “ होय”, अनोळखी माणसाला जितके सौजन्य दाखवावे तेव्हढ्याच सौजन्य दाखवत मी उत्तर दिले. चांगली उंची लाभलेले, आणि पोट सुटलेले लालाजीभाई यांची त्यांच्या सभेकारी स्वभावामुळे अशी ओळख झाली. रेशमी सदरा आणि लेंगा घातलेल्या लालाजीभाई यांच्या डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चाश्ना होता. हातात धरलेल्या प्रसाद आणि फुलांच्या पिशवीच्या बंदातून बोटातील बटबटीत अंगठ्या डोकावत होत्या. पडेल खांदे आणि सुरकुतलेला पण उजळ वर्ण असलेला चेहरा त्यांचे वय साठीच्या आसपास असावे हे दर्शवित होता. त्यांचे डोळे मात्र विशेष वेधक होते आणि चेहऱ्यावर अपलेसे करणारे हसू. कुठून आलात? काय करता? असे ठराविक संभाषणसुलभ प्रश्न विचारून झाले. लालाजीभाई मुंबईचे. तिथे त्यांचा कापडाचा व्यापार आहे. वर्षातून तीन चार वेळा आवर्जून कुटुंबाबरोबर शिर्डीला दर्शनासाठी येतात असे त्यांच्याकडून कळले.

“तुमी आधी कसे नाही आलात?” त्यांनी प्रश्न केला. “ तस खास काही कारण नाही घडल इथे यावस वाटण्यासाठी” मी अगदी सरळ उत्तर दिल. लालाजीभाई हसले. ‘आता साईपुराण ऐकावे लागणार’  माझ्या मनात विचार चमकून गेला. पण लालाजीभाई तसे नव्हते. “ मग दुसर्या कुठल्या देवाला जाता का नाही?” पुढचा प्रश्न. “मी या बाबतीत फारसा आग्रही नाही” मी पुन्हा माझी देवभोळेपणा बद्दल असलेली नापसंती दर्शविली तसं लालाजीभाईनी अध्यात्म निरुपण सुरु केलं.  ‘आमच्या धंद्यात आम्ही तिघे भागीदार, माझा भाऊ, मी आणि तिरुपतीचा बालाजी. काय आहे न मित्रा, आपण कितीही सांभाळून सावरून बिजिनेस केला ना तरी काही गोष्टी आपल्या जवळ नसतात मग ते देवावर सोडायचं. तो आपला भागीदार असला म्हणजे काही काळजी नाय.’ त्यानी त्यांची ‘फिलोसोफी’ सांगितली. मी नुसताच हसलो. ‘ज्याची त्याची श्रद्धा’ मी म्हणालो. एव्हाना मी अगदीच टाकाऊ नास्तिक आहे अशी त्यांची खात्री पटली असावी. ‘तुला तुझ्या जीवाची काळजी वाटली नाय कधी?’ त्यानी प्रश्न केला. मी चमकलो, ‘ होय अनेकदा वाचलोय मी जीवघेण्या प्रसंगातून. धाडस करायचं तर असे प्रसंग येणारच. देवाची इच्छा असेल तर आपली दोरी बळकट राहणारच.’ मी उत्तरलो. ‘पण म्हणून येता जाता देवाला साष्टांग नमस्कार घालण आणि कर्मकांड करत बसण मला पसंद नाही. इतकंच काय देवाला आपल्या छोट्याश्या व्यवसायात भागीदार करून आपण नामानिराळे होण मला नाही जमणार.’ मी त्यांच्या ‘फिलोसोफी’ शी थेट वैर पुकारल. लालाजीभाई पुन्हा सूचक हसले. ‘ खरय तू म्हणतोय ते. आपण न केलेल्या चुकीपायी आपणच उभ केलेलं साम्राज्य आपल्याच डोळ्यासमोर उध्वस्त होईल आणि ते आपल्याला बघाव लागेल अशी भीती नाही वाटली तुला कधी?’ लालाजीभाईनी अतिशय सूचक प्रश्न टाकला. असेही क्षण येतात हे मात्र खरंय. स्वत:च्या कल्पेनेपलीकडील अनाहूत अश्या काही गोष्टींमुळे जेंव्हा अशी वेळ येते तेंव्हा मग पंचेंद्रिय शक्ती पलीकडे काही असेल असा विश्वास निर्माण होतो. “त्याला देव म्हणतात!” आणि तो प्रसन्न रहावा म्हणून मग त्याची कल्पित कर्मकांडी आराधना सुरु होते.

माणूस अनेक गोष्टींना घाबरतो आणि देवाला शरण जातो. त्यातील ही महत्वाची गोष्ट असे मला वाटून गेलं. भीती हा श्रद्धेचा पाया असावा हे मात्र मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. निरपेक्ष भक्ती किती अवघड आहे हे मला कळून चुकले.

लालाजीभाईच्या देहात मला सदाशिवराव भाऊ पेशवे दिसू लागले. “ आप मेला जग बुडाले, आबरू जातो वाचतो कोण?” असे शेवटचे वाक्य उच्चारून ते पानिपतात गेले असे बखरीत लिहिलंय, दहावीत असताना वाचलेल्या या धड्याची मला आठवण येऊन गेली.

Sunday, May 1, 2016

याचक

याचक:
गुरुवार दत्ताचा, शनिवार मारुतीचा, रविवार........राहिलेली झोप पूर्ण करण्याचा. अशी वारांची विभागणी. सामाजिक काम करताना नक्कीच ध्यानात ठेवावी अशी. सध्या अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय, अगदी पुण्यात सुद्धा पाण्याचे रेशनिंग सुरु झालंय. दुष्काळ कां पडतोय, उपाय काय, आत्तापर्यंत झालेले सफल, असफल उपाय यांवर वर्तमानपत्रातील पाने खर्च होताहेत. अनेक संस्था, संघटना, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून कार्यरत झाल्यात. सध्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती सारख्या संघटना चारा छावण्या चालवणे , पाणी साठवण करण्यासाठी टाक्या पुरवणे यासारख्या उपाय योजना करत आहेत. अर्थातच अशा कामांसाठी आर्थिक मदत हि लागतेच. मग अभियान करावं लागतं, जनता जनार्दनाला साकडं घालाव लागतं. अश्या एका अभियाना अंतर्गत आम्ही काही तरुण आणि प्रौढ स्वयंसेवक कमला नेहरू उद्यान जवळील दत्त मंदिराच्या दारात गुरुवारी जमलो. जनकल्याण समिती चा बॅनर लावला आणि टेबल टाकून बसलो. येणाऱ्या भाविकांना पत्रक देऊन निधीसाठी आवाहन करीत होतो.
याचक म्हणून उभे राहिल्यावर फार मजा येते. जो संभाव्य दाता आहे, त्याला मागणाऱ्याचा पूर्वेतिहास माहित नसतो, त्यातून प्रथम येते ती अविश्वासाची भावना.”सगळं आभाळच फाटलंय, मी कुठे कुठे ठिगळ लावणार?” असा आव काही जण आणतात. तर काही जणांची  ‘अशी आपत्ती येते ती मानव निर्मितच आहे, आणि जे लोक जबाबदार आहेत त्यांना विचारा’  अशी भावना असते. आम्ही आधीच मदत दिलीय असे काही लोक स्पष्टपणे सांगतात, तिथे त्यांच्याशी तपशिलाची चर्चा करणे श्रेयस्कर नसते. बोलून दाखवले नाही तरी चेहऱ्यावरून या भावना स्पष्ट दिसतात, अगदी सहज वाचता येतात. लोकांचे असे चेहरे वाचताना एक वेगळीच मजा येते. काही लोक आस्थेने विचारपूस करतात, माहिती घेतात आणि मदत करतात तेंव्हा आनंद होतो. सूचना देणारे पण कोणताही सहभाग न घेणारे काही महाभाग असतात. त्याच्या कडे दुर्लक्ष करावे, त्यासाठी काही वेळेस कमालीचा संयम असावा लागतो तोही अशा उपक्रमातून अंगी येतो.
असाच वेळ पुढे सरकत होता. कणा कणानी निधीचा आकडा वाढत होता. साधारण एक तास झाला असेल, मंदिरात आरती संपली होती. उद्यानाच्या दिशेने एक वारकरी चालत मंदिराच्या  दिशेनं आला. गुडघ्याच्या खालपर्यंत आलेलं जाडंभरडं मळकं धोतर. भगव्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सदरा. खांद्यावर अडकवलेली दोन तीन गाठोडी. पायात जाड वहाणा, डोक्यावर गुलाबी लाल रंगाचं मुंडासं आणि खांद्या वर भागवत धर्माची पताका. मंदिराच्या दारात तो थांबला. देवाच्या दिशेनं तोंड करून त्याने वाकून नमस्कार केला. काही भाविक हातात पत्रावळीतून प्रसाद घेऊन बाहेर पडत होते त्याकडे त्याच लक्ष गेलं. कोरड्या पडलेल्या ओठांवरून त्यान एक वार जीभ फिरवली. मंदिरात जाऊन प्रसाद घ्यावा का न घ्यावा असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला. हा परिसर तसा उच्चभ्रू, चांगल्या वस्तीचा. तिथे हा मळकट कपड्यातला माणूस वेगळा दिसत होता. वास्तविक त्याला कोणी अडवलं नसतं, पण त्याने एक वार मंदिरात जाणार्या लोकांकडे पाहिलं. स्वातंत्र्य, समता अश्या आपल्या हक्कांची त्याला माहिती असावी पण लोक व्यवहारांच भान आणि आत्मसन्मानाची जाणीव त्याहून प्रबळ असावी त्यामुळे त्याने पुढे पाय टाकला नाही. हातात पत्रके घेऊन मी त्याला आपादमस्तक न्याहाळत होतो. तो साक्षर असणार नकीच कारण मंदिरात न जाण्याचा विचार पक्का झाल्यावर त्याने वाट धरण्याआधी एकदा सगळीकडे बघितलं आणि आम्ही लावलेल्या बॅनर कडे त्याचं लक्ष गेलं. त्याने ते पूर्णपणे वाचलं. आम्ही मदत मागतोय हे त्याच्या लक्षात आलं असाव, पण खात्री करून घेण्यासाठी आणि कदाचित आपल्याला काही मिळू शकेल काय या उद्देशाने तो टेबल जवळ आला. त्याच्याशी झालेल्या संभाषणातून समजले कि तो एक शेतकरी होता. इंदापूर परिसरात  ६ एकर कोरडवाहू शेती असलेला. दोन वर्षापूर्वी कमी पावसामुळे पेरलेले पीक हातातून गेलं आणि गेल्या वर्षी पेरणीच होऊ शकली नाही अशी स्थिती प्रत्यक्ष अनुभवलेला. त्याच्या खुरटलेल्या दाढी तील पांढरे झालेले केस आणि रापलेला चेहरा त्याचे वय नव्हे तर त्याने “न” पाहिलेले पावसाळे स्पष्ट दाखवत होते. संभाषणाचा विषय  अर्थातच दुष्काळासंबंधी होता. “हा दुष्काळ संपणार नाही, वाढतच जाणार आहे.” पिवळ्या लाल कडा झालेले त्याचे डोळे रोखत त्याने उद्गार काढले. त्याचे ते शब्द काळीज चिरत गेले. गेल्या आठवड्यात वर्तमान पत्रात जेव्हा  “ पुण्याच्या पाण्याचा एक थेंबही दौंड इंदापूरला देणार नाही “ - अशी लोकप्रतिनिधींची आरोळी वाचली तेंव्हा जशी हृदयाला घरं पडली तसंच वाटलं.
अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध आहे, पण अवर्षण म्हणजे दुष्काळ नव्हे. ओलावा धरून ठेवण्याची जमिनीचे क्षमता असते. पावसाचे पडलेले आणि झिरपलेले पाणी भूगर्भात साठवून ठेवण्याची क्षमता असते. पाण्याचा उपसा आणि सततचे अवर्षण यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि मग येतो दुष्काळ.
अर्थात “ हा दुष्काळ संपणार नाही, वाढतच जाणार आहे” हे त्याचे विधान या भौतिक दुष्काळाबद्दल नव्हतं असा मला वाटलं. पाण्याची मालकी सर्वांची, ते पुण्याचं, इंदापूरचं, बारामतीचं असं असू शकत नाही. पंच-महाभूतांची अशी क्षुल्लक वाटणी होऊ शकत नाही. किमान त्या विषयी तरी आपण एक कुटुंब आहोत असा समजलच पाहिजे.
माणसाच्या मनाची आणि मातीची तुलना नेहमीच साहित्यात केली जाते. समृद्धिचे मळे फुलवण्याची क्षमता मातीत असते तसेच सृजनाचे मळे फुलवण्याची क्षमता माणसाच्या मनात. मनात अपुलकीचा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यातूनच बंधुभाव निर्माण होतो आणि समतेचे तत्व प्रत्यक्ष व्यवहारात येते. माणसांच्या मनातला आपुलकीचा ओलावा आटला कि मग पाण्याचीही वाटणी करायला आणि त्यावरून रणकंदन करायला तो मागे पुढे पाहणार नाही. आम्हाला भेटलेला तो याचक याच आटलेल्या माणुसकीच्या झर्याविषयी बोलला असावा असे मला वाटले.
भगवंताच्या दारात झालेला दोन याचकामधला हा संवाद. दोघेही भिन्न परिस्थितीतले, आमच स्वत: च पोट भरलेलं होत आणि पाण्याची तहानही भागलेली होती. तो वर्षांपासून उपाशी आणि तहानलेला. आम्ही दोघेही भगवंताकडे काही मागायला आलो नव्हतो. दान मागत होतो त्याच्या भक्तांकडे. आणि त्यात आम्ही ज्याच्या साठी दान मागत होतो तो भगवंत प्रतिनिधी स्वरूपात आमच्यासमोरच उभा होता. भौतिक गरजेच्या पुढे मांडून ठेवलेली अवघड समस्या आमच्यासमोर उलगडून दाखवत. ‘माणसाच्या मनातील ओलावा कसा परत आणाल?’ हा यक्ष प्रश्न समोर ठेवत त्याने आमच्या भिक्षापात्रात त्याच्या जवळचे ५ रुपये टाकले आणि हरिनामाचा घोष करत आमचा निरोप घेतला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे मी बर्याच वेळ बघत राहिलो.

 सत्यजित चितळे 

Monday, April 11, 2016

अज्ञानात सुख असतं?


डोंगरी किल्ल्याला सामान्यपणे एकापेक्षा अधिक वाटा असतात. सिंहगडाला  अश्या काही ज्ञात वाटा आहेत. त्यातलीच एक वाट वार्याच्या बुरुजाकडून चढणारी चोरवाट . शेवटच्या टप्प्यात डोंगराला सरळ अंगावर घेऊन चढणारी वाट. गडकरी ग्रुप तर्फे गेली काही वर्षे होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवताना या वाटेने चढाई होते. संध्याकाळी पायथ्याशी आतकरवाडीत जमायचं, आणि नेहमीच्या वाटेन सुरुवात करायची. मेटावर पोचून सार्वजण एकत्र झाले की गडाला वेढा घालत निघायचं. वार्याच्या बुरुजाच्या खालच्या मेटापर्यंत पोचेपर्यंत क्षितिजावर तेजस्वी पूर्णगोलाकार चंद्राच आगमन होत. इथे मेटावर वस्तीला असणारे लोक होळीची पूजा बांधून होळी पेटवतात. डोंगराच्या धारेवर पेटलेली हि होळी वार्याबरोबर ‘फुर फुर’ आवाज करत वेगानं हविर्भाग गिळते, तिला नमस्कार करून सरळ डोंगर धारेवरची वाट धरायची. आता चंद्र गडाच्या मागे गेलेला असतो. उजवीकडच्या दरीत गडाची सावली पडल्याने मिट्ट काळोख पसरलेला असतो. घामाघूम होत आणि धापा टाकत चढत असताना या दरीतील मेटावरची होळी पेटलेली दिसते. कागदावर रंगवता येणार नाही अश्या काळ्या रंगावर त्या होळीच्या तेजस्वी पिवळ्या, लालसर ज्वाळा उठून दिसतात. त्याकडे बघत थोडा दम खावा आणि मग मनोमन डोंगर कडा चढण्याची तयारी करावी. या पुढची वाट दरीत सरळ उतरणाऱ्या प्रस्तरावरून जाते. कुठे कुठे जेमतेम पाउल मावेल एवढीच पायवाट . पावसाळ्यात वाढलेला आणि आता वाळून काटक्या झालेल्या झुडूपांमुळे आणि अंधारामुळे दरीची खोली जाणवत नाही. मग येतो सरळसोट उभा कडा. त्याच्या खोबणीतून चारी पाय रोवत वर चढलं की थेट गडाचा माथा. डावीकडे वार्याचा किंवा कलावंतीणीचा बुरुज आणि उजवीकडे डोणागीरीचा रौद्रभीषण कडा. पौर्णिमेचा चंद्र आता चांगलाच वर आलेला असतो आणि त्याच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघताना आपण मोठ्ठी कामगिरी पार पडल्याचा आनंद मनाला सुखावून जातो. ‘माहित नव्हत हे असल काहीतरी आहे म्हणून, आधी सांगितल असत तर आलोच नसतो’- पहिल्यांदाच हा अनुभव घेणार्यांचे हे बोल ठरलेलेच. अश्या लोकांना आधी कल्पना देण्याच पापकर्म नेहमीचा गडकरी कधीच करत नाही. कारण अज्ञानातल सुख त्याने अनुभवावं असा त्याला वाटत असत.

जगावेगळा आनंद मिळवण्यासाठी अनेक वाटा असतात. त्यामध्ये अनेक आव्हानं सृष्टीन मांडून ठेवली आहेत. त्यातील सगळ्याचीच माहिती करून घेऊन मग पाउल टाकायचं ठरवलं तर पाउल पुढे पडणारच नाही. आव्हानं स्वीकारण्याची आवड असलेल्यांना असा गृहपाठ करत बसण जमतच नाही. आपण केलेल्या धाडसाचा परिणाम जो काही होईल तो स्वीकारायची त्याची तयारी असते. आणि परिणाम जेव्हा अपेक्षेइतका किंवा सरस होतो तेंव्हा नकळत वाटून जात कि अज्ञानात सुख असतं.

प्रवास केलाच नाही असा माणूस विरळा. ज्या वाहनान प्रवास करतो त्याची देखभाल निट केली आहे की नाही हे तपासलंय का? असा प्रश्न त्या वाहनात बसणार्याला विचारु नये. त्याचा प्रवासातला वेळ काहीही नसताना उगाचच अधिरतेत जायचा, कधी पोचणार म्हणून ! तीथेही अज्ञानात सुख असतच!

एकदा एका परिसंवादात एका प्रथितयश उद्योजकाची मुलाखत ऐकली. मुलाखत कर्त्यान प्रश्न विचारला “ उद्योगासंबंधी सर्व कायद्यांची माहिती तुम्ही कशी मिळवलीत?” उद्योजकान मिश्कील उत्तर दिल, तो म्हणाला “ मी कुठलीच माहिती आधी मिळवत बसलो नाही. गरज पडली तशी माहिती होत गेली. माझ्या सुदैवाने मी कशात अडकलो नाही. मी जर सर्व कायदे आधी वाचत बसलो असतो तर नोकरीच केली असती! अज्ञानात सुख असतं असा माझं म्हणण आहे!”

कॉलेज मध्ये असतना माझ्या एका मित्राच्या आजोबांना घशाचा कर्करोग असल्याच निदान झालं. “मला फार काही सांगू नका मी उगाच घाबरून जाईन. अज्ञानातच सुख आहे असे ते वर वर म्हणायचे. अॅलोपॅथीचे उपचार घेण्याच त्यानी नाकारलं. मग स्वत: चा अभ्यास करून त्यानी त्यांचा दिनक्रम बदलला, काही पथ्य  ठरवली आणि औषधही. त्या आजारातून ते पूर्णपणे बरे झाले. कायम अज्ञानी राहण्याचं त्यानी नाकारलं आणि ज्याविषयी अज्ञान, त्याच पूर्ण ज्ञान घेऊनच ते जास्त सुखी झाले.

माझ्या एका मित्राने वार्याच्या वाटेन सिंहगड चढण्याचा कार्यक्रम जेंव्हा पहिल्यांदाच केला तेंव्हा तो मनोमन सुखावला. त्याचा केवळ त्याच्या क्षमतेवर विश्वास वाढला इतकाच नाही तर देवावरच्या श्रद्धाही बळकट झाल्या. पण इतक करून तो थांबला नाही. एकदा दिवसा पूर्ण उजेडात तो त्या वाटेन जाऊन आला. अज्ञानी असताना जो पराक्रम त्यान केला त्या भवतालाच त्यान आकलन करून घेतलं आणि तो आणखीन सुखावला. अज्ञानात सुख असतं हे काही प्रमाणात खरय पण म्हणून नेहमीच अज्ञानी राहायचं का? या प्रश्नच उत्तर त्यान त्याच्या कृतीतून दिल.



अज्ञानातलं सुख अनुभवणारे पण कायम अज्ञानी न राहण्यासाठी धडपड करणारे माझे असे अनेक गुरु आहेत. आपल्याला एखाद्या विषयातल काही कळत नाही असा लक्षात आल्यावर त्यांची उमेद वाढते. मिळेल तिथून ते त्या विषयाची माहिती गोळा करायला लागतात. आपल्या क्षमतेइतका माहितीचा साठा त्यांच्या जवळ गोळा होतो आणि मग त्या विषयावर भाष्य करताना त्यांच्यातील वेगळेपण जाणवायला लागत. अज्ञानात सुख असतं या वाक्प्रचाराचा वेगळाच अर्थ त्यांच्या कृतीतून ध्वनित होताना दिसतो.

Thursday, March 31, 2016

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे :
जोराच्या वाऱ्याबरोबर सावरीच्या बोन्डातल्या म्हातार्या उडाल्या. बीजाच्या संकल्पापासून पासून एकत्र वाढून आता आपणच बीजाचे रूप धारण केलेल्या त्या म्हातार्या. आजवर त्या बोंडात सुखरूप वाढलेल्या. आता नव-निर्मितीचा वसा घेऊन पुढे निघाल्या. वार्याच्या लाटेवर तरंगत तरंगत आपल्या पालक झाडापासून दुरावल्या. त्यांच आयुष्य कुठे स्थिरावणार होत? हि सुरवात होती का शेवट? त्यांना माहित नव्हतं. सृष्टीचा नियम त्या मोडू शकत नव्हत्या. जे आखून दिलय तसं घडवायला निघाल्या होत्या. वार्याच्या लाटेवर विहरत जाताना त्यांना स्वच्छंद जगणं म्हणजे काय याची थोडीशीच कल्पना आली होती . निसर्गाने निर्माण केलेली विविध रूपं त्या जवळून बघत होत्या. त्यांतल्या काहींना वाटलं असाच आस्वाद घेत फिरावं या निसर्गाच्या रूपाच आकंठ सेवन करावं, सोडून द्याव ते नव-निर्मितीच व्रत.
वारं पडलं तसं त्यातल्या काही योगायोगानं भुसभुशीत काळ्या मातीवर विसावल्या. सर्वच म्हातार्यांच्या बाबतीत असा शुभ योग येत नाही, काही अडकतात झाडा झुडपात तर काही चक्क नाठाळ कातळात. त्यांच्या जीवनाची इतिश्री तिथेच. पण काही ठरतात भाग्यवान, ज्यांना मिळते उपजाऊ, समृद्ध काळी जमीन. तिथ विसावताच त्यांचा पिसारलेला केशसंभार गळून पडला. त्यांच्या आगमनाच स्वागत झालं ते  खाद्याच्या शोधात सैरावैरा फिरणाऱ्या मुंग्या, वाळवीचे कीटक यांच्याकडून, ती बीजं त्याच भक्ष्य होत्या. पण निसर्गान त्यांना काही सुरक्षा कवचं दिलेली होती त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी. त्यांचा आता संघर्ष सुरु झाला होता. कशासाठी? काहींना त्यांच्यातली निर्मिती क्षमता खुणावत होती तर काहींना स्वछंद जीवन जगण्याची ओढ.   ग्रीष्माच्या  सुरुवातीच्या वळीवाची आता आर्जवं सुरु झाली. कधी वावटळ उठे आणि उडणारी धूळ त्यांच्यावर पांघरूण घालून जात असे. त्यांच्या दृष्टीने ते  चांगलच होतं. त्यांची आर्जवं वरूण देवानं ऐकली आणि मेघांच्या गडगाडासहित  वळीवाचा पाऊस  हजर झाला.  निर्मितीला आवश्यक असे जलतत्त्व त्यांना मिळालं, त्यानी ते आकंठ पिऊन घेतलं. वळीवाच्या पावसानं जमिनीचा वरवरचा थर ओलाचिंब केला. वातावरण गार झालं पण जमिनीतली ऊब पोषक होती, मग त्यातल्या एखाद्या बीजातून अंकुर फुटला. त्यान वाळलेल्या चिखलातून डोकं वर काढलं आणि मोकळा श्वास घेतला. त्या बीजाच कवच आता गळून पडलं होतं आणि त्याचं एक इवलस रोप झालं होत. काहींनी या प्रक्रियेत सहभागी होण्याच नाकारलं. त्यांनी त्यांची कवच कुंडल सांभाळून ठेवली, ऋतुचक्राचा अनुभव घेत राहण्यासाठी, एकलकोंडेपणाने जगण्यासाठी. त्यांच्या मते तेच तर त्यांच्या जीवनाचे सार होतं.
अंकुरलेल्या रोपाला वर्षा ऋतूतील पाण्यानं संजीवनी दिली, वालेल्या पानांनी बाल दिलं. त्याचं चांगलं रोपटं झालं. शिशिरात त्याची पानं गळाली आणि ते रोपट भकास खुरटं दिसू लागलं. त्याच्या शेजारीच जमिनीत पडलेल्या दुसर्या भाकड बीजानं ते पाहिलं आणि ‘हेच का ते नव-निर्मितीच स्वप्न?’ असा म्हणून त्याची कुचेष्टाही केली. पण रोपटं खट्टू झालं नाही. मग वसंत आला, नवी संजीवनी घेऊन, रोपट वाढत होतं. पुन्हा ग्रीष्म, मग पाऊस असं चक्र पुढे सरकत गेलं. जमिनीत त्याच्या बरोबरच पडलेल्या दुसर्या बीजाने निसर्गाचे हे चक्र आणि त्यातला चढ उतार अनुभवला खरा पण आता त्याला काही तरी राहून गेलं अशी बोच लागू लागली. जोमानं वाढलेलं आणि आता वृक्ष स्वरूप धारण केलेला त्याचा भाऊ बघितला कि त्याचा मत्सर जागृत होत असे. रुतुचाक्राच्या अशा आवर्तनात  एकदा अशीच वसंत ऋतूची चाहूल लागली आणि निष्पर्ण झालेल्या त्या सावरीचा नव-वृक्षाला धुमारे फुटले. एका सप्ताहातच त्याची फांदी अन फांदी नाजूक पण मोठ्या लाल फुलांनी बहरून गेली. त्यान पान्थस्थांचं लक्ष आकर्षित केल तसाच तांबट , बुलबुल अश्या विहन्गांचही. आता मात्र अजूनही बीज रुपात अस्तित्व टिकवलेल्या त्याच्या भावाच्या भावनांचा बंध फुटला. जीवनाचं सार त्याला कळून चुकलं. पण त्याच्या दृष्टिनं आता फार उशीर झाला होता. त्याची निर्मितिक्षमता आता लयाला गेली होती.

कार्ल्याच्या लेण्या बघून परत येतांना पवनेच्या काठावरल्या त्या सावरीच्या वृक्षानं मला एकदा मोहित केल होत, त्याच्या बहारदार फुललेल्या अवस्थेकडे अनिमिष नेत्रांनी बघत बसलेलो असताना त्यांनच सांगितलेली त्याची हि कहाणी. मला माणसांच्या जीवनासारखीच वाटली. कोण कुठे जातो, कुठे वसतो त्याला सुरुवातीला काहीच कल्पना नसते. अंकुरण्याच सामर्थ्य सर्वांनाच सारखच दिलाय देवानं, पण एखादा ते  स्वीकारतो, रुजतो आणि त्याचा कल्पवृक्ष होतो काही मात्र मिरवत राहतात स्वतःच वेगळ अस्तित्व, वांझोट्या बियाण्यासारखं !

Sunday, March 13, 2016

बालपण देगा देवा:

बालपण देगा देवा:
होळी पौर्णिमेला आमच्या सोसायटीत नारळाच्या झावळ्यांची होळी धडाकून पेटायची आणि उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागायची. परिक्षेसाठी अभ्यास संपत आलेला असायचा. दहावी आणि बारावीच्या परिक्षा चालू असल्याने शाळा ही कधी एक तास, कधी दोन तास तर कधी जास्तीत जास्त तीन तास असायची. उरलेला वेळ घरी अभ्यास करता करता उन्हाळ्याच्या सुट्टीचे बेत करण्यात जायचे.
थंडीच्या दिवसात मला सूर्योदय बघायला मिळायचा,  तो सूर्यदेव हळू हळू मार्च महिन्यापासून मी उठायच्या आधीच हजेरी लावायला लागायचा. नेहमी उठायच्या वेळेस बाबा खोलीतील पडदा सरकवायचा,  आणि मग कोवळी उन्ह अंगावर पडल्यावर जाग यायची. आता उठून शाळेत जायचं या कल्पनेनं मला फार वाईट वाटायचं. माग आई सुट्टीचं आमिष दाखवायची आणि ते गाजर समोर असल्याने आमची स्वारी हलायची. ‘हा अगदी बाबावर गेलाय’ अशी कॉमेंट मग कानावर यायची. बाबासुद्धा लहानपणी उशीराच उठत असे बहुतेक, पण आता तो मान्य करायचा नाही!
एप्रिलच्या १०-१२ तारखेला परिक्षेचा शेवटचा पेपर असायचा. त्याआधी महिना दोन महिने मजेच्या सर्व साधनांवर आणि खाण्यावर बंदी असायची. केबल टीव्ही च्या सेट टॉप बॉक्स ला पासवर्ड घालून अटकाव केला जायचा. बाबा शाळेत असताना आबांनी टीव्ही घेतलाच नव्हता त्यामुळे अशी आणीबाणी जाहीर करावी लागत नसे. ती आणीबाणी त्यादिवशी उठायची. आई बाबांबरोबर जाऊन हॉटेलमध्ये तुडुंब जेवण आणि मनसोक्त आईस्क्रीम खाण्याचा तो दिवस. रात्री उशिरापर्यंत कार्टून बघण्यास त्या दिवशी मुभा असायची. बर्याच वेळेस कोणती कार्टून बघायची आहेत त्याच्या सीडी आम्ही आधीच गोळा करून ठेवलेल्या असत. बाबा सांगत असे कि तो लहान असताना तो अशी कॉमिक्स ची पुस्तके गोळा करून ठेवायचा आणि सुट्टीच्या पहिल्या रात्री उशिरापर्यंत वाचायचा. त्याच्या भावविश्वात मॅंड्रेक, लोथार सारखे फुसके आणि सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा बटमॅन सारखे सदाहरित हिरो आणि चाचा चौधरी सारख्या भाकड गोष्टी असत. आम्ही मात्र  छोटा भीम, माईटी राजू, कृष्णा यासारख्यांवर जास्त विश्वास ठेवायचो. हनुमानाच्या कथा अॅनिमेशन फिल्म्स बघून बघून पाठ झाल्या होत्या. बाबा म्हणायचा की अॅनिमेशन फिल्म्स मध्ये दाखवतात त्या कथा खर्या नसतात, मूळ कथेमध्ये थोडा जास्त मसाला भरून त्या प्रदर्शित केल्या जातात असा त्याचा दावा असे. त्यानं कधीतरी पुराणात वाचलेल्या हनुमानाच्या कथा याच खर्या आहेत असे तो ठामपणे आम्हाला सांगायचा. आम्ही बघायचो त्या अॅनिमेशन फिल्म्स मधलं खरं की बाबाने त्याच्या बालपणी वाचलेलं खरं याचा निवाडा आजीसुद्धा करू शकत नसे! पण आम्ही दोघही आमच्या आमच्या भावविश्वात रममाण होत असू.
दुसर्या दिवशी अभ्यास नसूनही सूर्योदयाच्या आधीच जाग यायची. मग मित्र गोळा व्हायचे आणि आम्ही आमच्या सोसायटीत खेळायला पळायचो. या दिवसात सगळीकडे ‘प्रो कबड्डी’ आणि मग नंतर ‘आय.पी.एल’ नावाची साथ पसरायची. सकाळी उठल्यापासून नाश्त्याची वेळ होईपर्यंत ज्याची साथ पसरलीय तो खेळ चालायचा. आम्ही कबड्डीसुद्द्धा बूट आणि ‘नि कॅप’ घालून खेळायचो त्यामुळे शक्यतो कुठे खरचटायचे नाही. मग आमच्या नाजूक पणाची बाबा चेष्टा करायचा. त्याचा कधीतरी कबड्डी खेळताना हात मोडला आणि त्याची सुट्टी बुडाली अशी आठवण सांगायचा. कोणतेही सुरक्षा साधन न घालता खेळून इजा झाल्यावर आपलीच सुट्टीची मजा कमी करण्यात काय अर्थ आहे? या प्रश्नाला मात्र त्याच्या जवळ उत्तर नसायचे.
घरी येऊन नाष्ट करून झाला की मग आम्ही क्लब हाउसमध्ये जमायचो. टेबल टेनिस, कॅरम सारखे खेळ रंगात यायचे. घरून येताना सगळेच जण पाण्याची बाटली घेऊन यायचे. घामाघूम झाल्यावर हळूच क्लब हाउसमधल्या फिल्टर आणि कुलरचे पाणी प्यायचो. ‘भलते सलते पाणी पिऊ नका’ अस आई रागवायची तरी सुद्धा! ती तिच्या लहानपणी कुणी तरी दिलेलं माठातलं गार पाणी पीत असे आणि त्याला येणाऱ्या मातीच्या क्वचित वाळ्याच्या वासाचं कौतुक सांगत असे, तसा वास या कूलरच्या पाण्याला येत नसे पण जीवापलीकडे दमछाक झाल्यावर लागणारी तहान मात्र भागत असे.
अक्षय्यतृतीयेला पहिला आंबा घरी येत असे. आणि मग तोंडं रंगवत आणि कोपरापर्यंत ओघळणारा त्याचा रस जिभेने चाटत आम्ही त्या अमृत फळाचा आस्वाद घेत असू. आबा आणि बाबा सांगात असे त्याप्रमाणे रायवळ आंब्याचा ढीग करून ते चोखून आम्ही कधी खाल्ला नाही. महाग असे म्हणून डझनात न येता एककात येणारा हापूस आंबा मात्र जिभेचे तेव्हढेच लाड पुरवत असे.
दुपारचा वेळ बहुतेक वेळा घरातच जाई. माग पुन्हा मित्र जमत, क्रिकेट अटक्स, टेबल क्रिकेट, रिमोटवर चालणार्या गाड्या, हेलीकॉप्टर सारखे खेळ रंगात येत. आईन बालपणी खेळलेले सागरगोटे, पत्ते किंवा तसेच इतर खेळ आम्हाला शिकवून पहिले पण आम्हाला ते काही विशेष आवडले नव्हते.
आबांच्या बालपणी वीज कधी तरी यायची, बाबाच्या बालपणी वीज ठराविक दिवशी जायची आणि आमच्या बालपणी वीज कधी तरीच थोडा वेळ जायची. असं असलं तरी आमच्या घरी इनव्हर्टर होता. वीज जायची तेंव्हा एसी बंद पडायचा पण घूं घूं आवाज करत पंखा हळू हळू फिरत राही. खेळताना आमचं त्याकडे लक्ष नसायचे, पण आजी जागी व्हायची. मग पूर्वी वाळ्याचे पडदे लावून घर कसं गार करीत असत ते ती आम्हाला सांगायची. तिच्या मते एसी चा गारवा कृत्रिम आणि म्हणूनच अपायकारक होता. मला मात्र तिचे हे म्हणणे अजिबात पटत नसे.
सुट्टीच्या दिवसात संध्याकाळ दुपारी ३ वाजताच सुरु होत असे. आपापल्या बालपणाच्या काळातील या मुद्यावर मात्र माझे आणि बाबाचे एकमत होते. उन्हे उतरली नसतानाच आम्ही सायकल घेऊन सोसायटीत घुमवू लागायचो. रस्त्यावर दुपार असूनही रहदारी असायची त्यामुळे बाहेर जायची बंदी होतीच आणि भीतीही वाटायची. सायकल यायला लागल्यावर आईचा डोळा चुकवून मी सोसायटीच्या एका दारातून बाहेर पडलो आणि दुसर्या दारातून आत आलो हा केव्हढा मोठ्ठा पराक्रम केला असे मला एकदा वाटले होते असे आठवते. तास दोन तास सायकल चालवून चांगलीच दमछाक व्हायची.माझी सायकल गीयरची होती, आई बाबांच्या बाल पणी असायची तशी साधी नव्हती म्हणून त्यात काही फरक पडत नसे. उन्हात खेळल्यामुळे कातडी काळवंडून जात असे. त्याचा रंग आम्ही घरच्या संगणकातील २५६ रंगाच्या पट्टीतून शोधून ठेवायचो. बाबा सांगायचा तसा त्याच्या लहानपणच्या १२ रंगाच्या खडूच्या बॉक्स पेक्षा आमच्या कडे संगणकावरचा अजून मोठ्ठा रंगाचा बॉक्स होता.
संध्याकाळी बाबा घरी आला कि त्याचा फोन पळवणे आणि त्यावरचे व्हिडियो किंवा यू-ट्यूब वर जाऊन व्हिडियो बघणे यासाठी माझी आणि बहिणीची स्पर्धा लागायची. उंचावरून सोडलेले पीस आणि जड चेंडू, कोणताही अवरोध नसेल तर जमिनीवर एकाच वेळी पोचतात हा गलिलिओ ने मांडलेला सिद्धांत त्या व्हीडियोतून आम्हाला बालपणीच समजला होता. मला स्पष्ट आठवतंय की बाबानं जेंव्हा त्याविषयी सांगितलं तेंव्हा तो म्हणाला होता की यावर विश्वास बसण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्याची ४० वर्ष वाट बघावी लागली होती!
उन्हाची काहिली, मधूनच उठणारी वावटळ, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दुपारनंतर एकदम वारं सुटून येणारा वळवाचा पाऊस आणि त्यामध्ये चिंब भिजणं, एखाद्या दुसर्या वर्षीच पडलेल्या आणि वेचून खालेल्या गारा या सर्व आठवणी माझ्या बालपणात आहेत. असं काही अनुभवताना मला माझ्या आईने किंवा बाबाने आडकाठी केली नाही कि त्यांच्या बालपणच्या गोष्टी सांगत बसले नाहीत.
आनंद मिळवण्याची वृत्ती असावी लागते आणि ती मला माझ्या सभोवताली सर्वांकडून मिळाली. त्याचा साधनांशी संबंध नाही. आबांना विटी दांडू खेळून जेव्हढा आनंद मिळत असे तेव्हढाच आम्ही क्रिकेटमध्ये मिळवला. चिंचा बोर खाउन आईचे दात आंबट झाले होते तसेच आमचे कँडी खाऊन झाले. पॉटच्या आईस्क्रीम इतकेच समाधान आम्हाला ट्रिपल संडे नं दिलं. या सर्वांतून समृद्ध अनुभव घेताना पिढी दर पिढीत साधनांमध्ये बदल झाला म्हणून काही राहून गेले असे वाटले नाही. निसर्गाची आल्हाददायक आणि रौद्र रूपं अनुभवण याचा तर साधनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. माणसाच्या सीमित स्मृती काळात ती रूप सारखीच.   
बाबान काढलेल्या फोटोत आणि व्हिडियो क्लिप्स मह्ये माझ्या आणि ताईच्या बालपणाच्या अनेक आठवणी साठवून ठेवल्यात. घरच्या त्रिमित होम सिस्टीमवर मी त्या अगदी चारही मितीत बघू शकतो आणि त्यात पुन्हा रममाण होऊ शकतो. माझ्या जवळ बाबाचे बालपणाचे फोटो आहेत, आबांनी त्यावेळी नुकताच घेलेल्या रंगीत कॅमेर्यातून घेतलेले. त्याचा रंग आता फिक्कट झालाय आणि ती केवळ चित्र आहेत त्यात कोणाचे आवाज नाहीत, संवाद नाहीत. आबांच्या आठवणींचे दुर्मिळ फोटो तर कृष्णधवल रंगात आहेत. तंत्रज्ञानाचा एवढा प्रवास पण तरीही आपापल्या आठवणीत आम्ही आजही रमून जातो, ते बालपण पुन्हा अनुभवतो.
या व्हीडीयोमधील एक क्लिप मी विशेष जपून ठेवलीय. मी मेकॅनोतून काही तरी विचित्र काल्पनिक वस्तू बनवून त्याच्याशी खेळताना बाबानं काढलेली. त्यामाध्यी बाबा मला विचारतो ‘ तू काय करतो आहेस?’ ‘ खेळतोय!’ माझे उत्तर ‘ कशासाठी?’ त्याचा पुढचा प्रश्न ‘ त्यात काय. मन रमवण्यासाठी......तू ऑफिसमध्ये जाऊन काय करतोस?’ माझा प्रश्न...’मी पण माझ मन रमवतो खेळ खेळून, फक्त त्याला काम म्हणतात’ बाबाच्या वाक्यानंतर ती क्लिप संपते. सर्वच अबालवृद्ध जागेपणी काही न काही तरी कृती करत असतात. सामाजिक व्यवहाराच्या साखळीत जेंव्हा माणसाच्या कृतीला महत्व प्राप्त होते, तेंव्हा त्याच्या काल्पनिक कृतीना वास्तविक अर्थ येतो. बालपणीच्या केवळ कल्पनांना मग अर्थ उरत नाही. प्रत्यक्षात येणाऱ्या कल्पना त्याला साकारायच्या असतात. त्याला मग पैसा, अधिकार, प्रतिष्ठा असे विविध आयाम येऊन चिकटतात. आणि मग आपण जे काही करतोय ते आपल्या आवडीने स्वीकारलंय का आपल्यावर लादलं गेलंय हे न पाहता तो त्याच्या मागे धावतो, त्याला त्याचा ताण जाणवू लागतो.
अवघड आहे, पण मी प्रयत्नपूर्वक थोडावेळ या षड्रिपूंचा पोलादी पडदा दूर करून आपल्या दैनंदिन व्यवहाराकडे बघितलं. माझ्या अस लक्षात आलं की माझं दैनंदिन आयुष्य आजही तितकंच सुंदर आहे जितकं बालपणी होतं. त्यामध्ये कल्पना करायचं तितकच सामर्थ्य आजही आहे जितक तेंव्हा होत आणि आनंद घेण्याचसुद्धा !

-          (ईशान) सत्यजित चितळे,  २ मे २०४६