बालपण देगा देवा:
होळी पौर्णिमेला
आमच्या सोसायटीत नारळाच्या झावळ्यांची होळी धडाकून पेटायची आणि उन्हाळ्याच्या
सुट्टीची चाहूल लागायची. परिक्षेसाठी अभ्यास संपत आलेला असायचा. दहावी आणि
बारावीच्या परिक्षा चालू असल्याने शाळा ही कधी एक तास, कधी दोन तास तर कधी जास्तीत
जास्त तीन तास असायची. उरलेला वेळ घरी अभ्यास करता करता उन्हाळ्याच्या सुट्टीचे
बेत करण्यात जायचे.
थंडीच्या दिवसात मला
सूर्योदय बघायला मिळायचा, तो सूर्यदेव हळू
हळू मार्च महिन्यापासून मी उठायच्या आधीच हजेरी लावायला लागायचा. नेहमी उठायच्या
वेळेस बाबा खोलीतील पडदा सरकवायचा, आणि मग
कोवळी उन्ह अंगावर पडल्यावर जाग यायची. आता उठून शाळेत जायचं या कल्पनेनं मला फार
वाईट वाटायचं. माग आई सुट्टीचं आमिष दाखवायची आणि ते गाजर समोर असल्याने आमची
स्वारी हलायची. ‘हा अगदी बाबावर गेलाय’ अशी कॉमेंट मग कानावर यायची. बाबासुद्धा लहानपणी
उशीराच उठत असे बहुतेक, पण आता तो मान्य करायचा नाही!
एप्रिलच्या १०-१२
तारखेला परिक्षेचा शेवटचा पेपर असायचा. त्याआधी महिना दोन महिने मजेच्या सर्व
साधनांवर आणि खाण्यावर बंदी असायची. केबल टीव्ही च्या सेट टॉप बॉक्स ला पासवर्ड
घालून अटकाव केला जायचा. बाबा शाळेत असताना आबांनी टीव्ही घेतलाच नव्हता त्यामुळे
अशी आणीबाणी जाहीर करावी लागत नसे. ती आणीबाणी त्यादिवशी उठायची. आई बाबांबरोबर
जाऊन हॉटेलमध्ये तुडुंब जेवण आणि मनसोक्त आईस्क्रीम खाण्याचा तो दिवस. रात्री
उशिरापर्यंत कार्टून बघण्यास त्या दिवशी मुभा असायची. बर्याच वेळेस कोणती कार्टून
बघायची आहेत त्याच्या सीडी आम्ही आधीच गोळा करून ठेवलेल्या असत. बाबा सांगत असे कि
तो लहान असताना तो अशी कॉमिक्स ची पुस्तके गोळा करून ठेवायचा आणि सुट्टीच्या
पहिल्या रात्री उशिरापर्यंत वाचायचा. त्याच्या भावविश्वात मॅंड्रेक, लोथार सारखे
फुसके आणि सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा बटमॅन सारखे सदाहरित हिरो आणि चाचा चौधरी सारख्या
भाकड गोष्टी असत. आम्ही मात्र छोटा भीम,
माईटी राजू, कृष्णा यासारख्यांवर जास्त विश्वास ठेवायचो. हनुमानाच्या कथा अॅनिमेशन
फिल्म्स बघून बघून पाठ झाल्या होत्या. बाबा म्हणायचा की अॅनिमेशन फिल्म्स मध्ये
दाखवतात त्या कथा खर्या नसतात, मूळ कथेमध्ये थोडा जास्त मसाला भरून त्या प्रदर्शित
केल्या जातात असा त्याचा दावा असे. त्यानं कधीतरी पुराणात वाचलेल्या हनुमानाच्या
कथा याच खर्या आहेत असे तो ठामपणे आम्हाला सांगायचा. आम्ही बघायचो त्या अॅनिमेशन
फिल्म्स मधलं खरं की बाबाने त्याच्या बालपणी वाचलेलं खरं याचा निवाडा आजीसुद्धा
करू शकत नसे! पण आम्ही दोघही आमच्या आमच्या भावविश्वात रममाण होत असू.
दुसर्या दिवशी अभ्यास
नसूनही सूर्योदयाच्या आधीच जाग यायची. मग मित्र गोळा व्हायचे आणि आम्ही आमच्या
सोसायटीत खेळायला पळायचो. या दिवसात सगळीकडे ‘प्रो कबड्डी’ आणि मग नंतर ‘आय.पी.एल’
नावाची साथ पसरायची. सकाळी उठल्यापासून नाश्त्याची वेळ होईपर्यंत ज्याची साथ
पसरलीय तो खेळ चालायचा. आम्ही कबड्डीसुद्द्धा बूट आणि ‘नि कॅप’ घालून खेळायचो
त्यामुळे शक्यतो कुठे खरचटायचे नाही. मग आमच्या नाजूक पणाची बाबा चेष्टा करायचा.
त्याचा कधीतरी कबड्डी खेळताना हात मोडला आणि त्याची सुट्टी बुडाली अशी आठवण
सांगायचा. कोणतेही सुरक्षा साधन न घालता खेळून इजा झाल्यावर आपलीच सुट्टीची मजा
कमी करण्यात काय अर्थ आहे? या प्रश्नाला मात्र त्याच्या जवळ उत्तर नसायचे.
घरी येऊन नाष्ट करून
झाला की मग आम्ही क्लब हाउसमध्ये जमायचो. टेबल टेनिस, कॅरम सारखे खेळ रंगात यायचे.
घरून येताना सगळेच जण पाण्याची बाटली घेऊन यायचे. घामाघूम झाल्यावर हळूच क्लब हाउसमधल्या
फिल्टर आणि कुलरचे पाणी प्यायचो. ‘भलते सलते पाणी पिऊ नका’ अस आई रागवायची तरी
सुद्धा! ती तिच्या लहानपणी कुणी तरी दिलेलं माठातलं गार पाणी पीत असे आणि त्याला
येणाऱ्या मातीच्या क्वचित वाळ्याच्या वासाचं कौतुक सांगत असे, तसा वास या कूलरच्या
पाण्याला येत नसे पण जीवापलीकडे दमछाक झाल्यावर लागणारी तहान मात्र भागत असे.
अक्षय्यतृतीयेला पहिला
आंबा घरी येत असे. आणि मग तोंडं रंगवत आणि कोपरापर्यंत ओघळणारा त्याचा रस जिभेने
चाटत आम्ही त्या अमृत फळाचा आस्वाद घेत असू. आबा आणि बाबा सांगात असे त्याप्रमाणे
रायवळ आंब्याचा ढीग करून ते चोखून आम्ही कधी खाल्ला नाही. महाग असे म्हणून डझनात न
येता एककात येणारा हापूस आंबा मात्र जिभेचे तेव्हढेच लाड पुरवत असे.
दुपारचा वेळ बहुतेक
वेळा घरातच जाई. माग पुन्हा मित्र जमत, क्रिकेट अटक्स, टेबल क्रिकेट, रिमोटवर
चालणार्या गाड्या, हेलीकॉप्टर सारखे खेळ रंगात येत. आईन बालपणी खेळलेले सागरगोटे,
पत्ते किंवा तसेच इतर खेळ आम्हाला शिकवून पहिले पण आम्हाला ते काही विशेष आवडले
नव्हते.
आबांच्या बालपणी वीज
कधी तरी यायची, बाबाच्या बालपणी वीज ठराविक दिवशी जायची आणि आमच्या बालपणी वीज कधी
तरीच थोडा वेळ जायची. असं असलं तरी आमच्या घरी इनव्हर्टर होता. वीज जायची तेंव्हा
एसी बंद पडायचा पण घूं घूं आवाज करत पंखा हळू हळू फिरत राही. खेळताना आमचं त्याकडे
लक्ष नसायचे, पण आजी जागी व्हायची. मग पूर्वी वाळ्याचे पडदे लावून घर कसं गार करीत
असत ते ती आम्हाला सांगायची. तिच्या मते एसी चा गारवा कृत्रिम आणि म्हणूनच
अपायकारक होता. मला मात्र तिचे हे म्हणणे अजिबात पटत नसे.
सुट्टीच्या दिवसात
संध्याकाळ दुपारी ३ वाजताच सुरु होत असे. आपापल्या बालपणाच्या काळातील या मुद्यावर
मात्र माझे आणि बाबाचे एकमत होते. उन्हे उतरली नसतानाच आम्ही सायकल घेऊन सोसायटीत
घुमवू लागायचो. रस्त्यावर दुपार असूनही रहदारी असायची त्यामुळे बाहेर जायची बंदी
होतीच आणि भीतीही वाटायची. सायकल यायला लागल्यावर आईचा डोळा चुकवून मी सोसायटीच्या
एका दारातून बाहेर पडलो आणि दुसर्या दारातून आत आलो हा केव्हढा मोठ्ठा पराक्रम
केला असे मला एकदा वाटले होते असे आठवते. तास दोन तास सायकल चालवून चांगलीच दमछाक
व्हायची.माझी सायकल गीयरची होती, आई बाबांच्या बाल पणी असायची तशी साधी नव्हती
म्हणून त्यात काही फरक पडत नसे. उन्हात खेळल्यामुळे कातडी काळवंडून जात असे.
त्याचा रंग आम्ही घरच्या संगणकातील २५६ रंगाच्या पट्टीतून शोधून ठेवायचो. बाबा
सांगायचा तसा त्याच्या लहानपणच्या १२ रंगाच्या खडूच्या बॉक्स पेक्षा आमच्या कडे संगणकावरचा
अजून मोठ्ठा रंगाचा बॉक्स होता.
संध्याकाळी बाबा घरी
आला कि त्याचा फोन पळवणे आणि त्यावरचे व्हिडियो किंवा यू-ट्यूब वर जाऊन व्हिडियो
बघणे यासाठी माझी आणि बहिणीची स्पर्धा लागायची. उंचावरून सोडलेले पीस आणि जड
चेंडू, कोणताही अवरोध नसेल तर जमिनीवर एकाच वेळी पोचतात हा गलिलिओ ने मांडलेला
सिद्धांत त्या व्हीडियोतून आम्हाला बालपणीच समजला होता. मला स्पष्ट आठवतंय की बाबानं
जेंव्हा त्याविषयी सांगितलं तेंव्हा तो म्हणाला होता की यावर विश्वास बसण्यासाठी
त्याला त्याच्या आयुष्याची ४० वर्ष वाट बघावी लागली होती!
उन्हाची काहिली,
मधूनच उठणारी वावटळ, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दुपारनंतर एकदम वारं सुटून
येणारा वळवाचा पाऊस आणि त्यामध्ये चिंब भिजणं, एखाद्या दुसर्या वर्षीच पडलेल्या
आणि वेचून खालेल्या गारा या सर्व आठवणी माझ्या बालपणात आहेत. असं काही अनुभवताना
मला माझ्या आईने किंवा बाबाने आडकाठी केली नाही कि त्यांच्या बालपणच्या गोष्टी
सांगत बसले नाहीत.
आनंद मिळवण्याची
वृत्ती असावी लागते आणि ती मला माझ्या सभोवताली सर्वांकडून मिळाली. त्याचा
साधनांशी संबंध नाही. आबांना विटी दांडू खेळून जेव्हढा आनंद मिळत असे तेव्हढाच
आम्ही क्रिकेटमध्ये मिळवला. चिंचा बोर खाउन आईचे दात आंबट झाले होते तसेच आमचे कँडी
खाऊन झाले. पॉटच्या आईस्क्रीम इतकेच समाधान आम्हाला ट्रिपल संडे नं दिलं. या
सर्वांतून समृद्ध अनुभव घेताना पिढी दर पिढीत साधनांमध्ये बदल झाला म्हणून काही
राहून गेले असे वाटले नाही. निसर्गाची आल्हाददायक आणि रौद्र रूपं अनुभवण याचा तर
साधनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. माणसाच्या सीमित स्मृती काळात ती रूप सारखीच.
बाबान काढलेल्या
फोटोत आणि व्हिडियो क्लिप्स मह्ये माझ्या आणि ताईच्या बालपणाच्या अनेक आठवणी
साठवून ठेवल्यात. घरच्या त्रिमित होम सिस्टीमवर मी त्या अगदी चारही मितीत बघू शकतो
आणि त्यात पुन्हा रममाण होऊ शकतो. माझ्या जवळ बाबाचे बालपणाचे फोटो आहेत, आबांनी त्यावेळी
नुकताच घेलेल्या रंगीत कॅमेर्यातून घेतलेले. त्याचा रंग आता फिक्कट झालाय आणि ती
केवळ चित्र आहेत त्यात कोणाचे आवाज नाहीत, संवाद नाहीत. आबांच्या आठवणींचे दुर्मिळ
फोटो तर कृष्णधवल रंगात आहेत. तंत्रज्ञानाचा एवढा प्रवास पण तरीही आपापल्या आठवणीत
आम्ही आजही रमून जातो, ते बालपण पुन्हा अनुभवतो.
या व्हीडीयोमधील एक
क्लिप मी विशेष जपून ठेवलीय. मी मेकॅनोतून काही तरी विचित्र काल्पनिक वस्तू बनवून
त्याच्याशी खेळताना बाबानं काढलेली. त्यामाध्यी बाबा मला विचारतो ‘ तू काय करतो
आहेस?’ ‘ खेळतोय!’ माझे उत्तर ‘ कशासाठी?’ त्याचा पुढचा प्रश्न ‘ त्यात काय. मन
रमवण्यासाठी......तू ऑफिसमध्ये जाऊन काय करतोस?’ माझा प्रश्न...’मी पण माझ मन रमवतो
खेळ खेळून, फक्त त्याला काम म्हणतात’ बाबाच्या वाक्यानंतर ती क्लिप संपते. सर्वच अबालवृद्ध
जागेपणी काही न काही तरी कृती करत असतात. सामाजिक व्यवहाराच्या साखळीत जेंव्हा
माणसाच्या कृतीला महत्व प्राप्त होते, तेंव्हा त्याच्या काल्पनिक कृतीना वास्तविक
अर्थ येतो. बालपणीच्या केवळ कल्पनांना मग अर्थ उरत नाही. प्रत्यक्षात येणाऱ्या
कल्पना त्याला साकारायच्या असतात. त्याला मग पैसा, अधिकार, प्रतिष्ठा असे विविध
आयाम येऊन चिकटतात. आणि मग आपण जे काही करतोय ते आपल्या आवडीने स्वीकारलंय का आपल्यावर
लादलं गेलंय हे न पाहता तो त्याच्या मागे धावतो, त्याला त्याचा ताण जाणवू लागतो.
अवघड आहे, पण मी
प्रयत्नपूर्वक थोडावेळ या षड्रिपूंचा पोलादी पडदा दूर करून आपल्या दैनंदिन
व्यवहाराकडे बघितलं. माझ्या अस लक्षात आलं की माझं दैनंदिन आयुष्य आजही तितकंच
सुंदर आहे जितकं बालपणी होतं. त्यामध्ये कल्पना करायचं तितकच सामर्थ्य आजही आहे
जितक तेंव्हा होत आणि आनंद घेण्याचसुद्धा !
-
(ईशान) सत्यजित चितळे, २ मे २०४६
No comments:
Post a Comment