भोजपूर च्या भोजेश्वर मंदिरात दुसर्यांदा गेलो
तेंव्हा त्याच्या भव्यतेबद्दल नाविन्य नव्हत. त्यामुळे त्यातील बारकावे अधिक समजून
घेता आले. या मदिराजवळ भोजपूर हे गाव आहे, सुमारे १००० वर्षांपूर्वी भोज राजाच इथे
वास्तव्य होत, त्याच्या खुणा बेत्रावती नदीच्या जवळ भग्न अश्या जोत्यांच्या
स्वरूपात बघता येतात. भारतीय इतिहासात मानाचं स्थान आपल्या कर्तुत्वान मिळवलेला
भोज राजा इथे नेमका कुठे रहात होता हे आता अंदाजानच सांगता येत. एकट्या भोज राजाच्या
पदरी ही अनास्था आहे अस नव्हे. ठीक ठिकाणी पुराणकालीन मंदिर आहेत आणि ती नेमकी
कुणी बांधवली याची इतिहासात नोंदसुद्धा आहे. पण ती मंदिरे बांधणाऱ्या किंवा
बांधवून घेणाऱ्या कर्तुत्ववान पुरुषांची राहती घर आज शिल्लक नाहीत. रायगडावर
जगदीश्वर मंदिर जून पूर्ण स्वरूपात शिल्लक आहे पण शिवरायांच्या पदस्पर्शान पावन
झालेला त्यांचा राहता वाडा कसा होता हे केवळ कल्पनेनच सांगता येत ही वस्तुस्थिती
आहे.
माणूस आपल्या श्रद्धा आणि श्रद्धास्थान जपतो म्हणून
ती टिकतात कि त्यांच्या विषयी असलेली श्रद्धा हि टोकाची अंधश्रद्धा बनत जाते
म्हणून ती स्थान टिकतात? ऐतिहासिक पुरुषांच्या आठवणी असलेली ठिकाण नष्ट करण हे पराभूतांच्या
अस्मिता संपविण्यासाठी करतात असेही काही कारण या मागे असाव बहुतेक. हा विचार मनात
घोळत होता आणि भोपाळ हून परतेच्या प्रवासात शिर्डी ला श्री साईबाबांच्या
दर्शनासाठी थांबण्याचा योग जुळून आला.
मी शिर्डीला पहिल्यांदाच गेलो. तसे काही कारण
नव्हते आधी कधी जायला. उन्हाळ्यातील सुट्यांच्या दिवसातील रविवार, त्यामुळे प्रचंड
गर्दी होती. मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुललेले होते. कोणतेही इतर निमित्त
नसतानासुद्धा केवळ दर्शनासाठी आलेले इतके लोक बघून मी अचंबित झालो. दर्शनबारी च्या
बाहेर प्रसाद आणि प्रतिमा विकणारी दुकाने, त्यांच्यात ग्राहक आपल्याकडे येण्यासाठी
चाललेली चढाओढ हि इतर कुठल्याही
देवस्थानाला शोभणारी होती. एका दुकानात पादत्राणे ठेवून आम्ही उन्हान तापलेल्या
रस्त्याने पळत दर्शन्बारीमध्ये शिरलो. सज्जनाना उगाचच धाक वाटेल अश्या सुरक्षाव्यवस्थेच
दार ओलांडून आम्ही बारी मध्ये उभे राहिलो. रांग पुढे पुढे सरकत होती.
माझ्याबरोबरचा सह-प्रवासी इथे नेहमी येणारा होता. आपल्याला एक-दीड तास लेगेल असे
गर्दीकडे बघून तो म्हणाला. मला मंदिरात जाण्याची उत्सुकता होतीत त्यामुळे
थांबण्याची माझी तयारी होती. दर्शनासाठी आलेले भाविक हे बहुभाषिक- बहुप्रांतीय
होते. आपल्याला लवकर दर्शन मिळावे यासाठी त्यातील काही लोकांची पैसे मोजण्याची
सुद्धा तयारी होती. त्यांची तशी व्यवस्था करण्याची तयारी तिथल्या काही स्वयंसेवकानी
दाखवली आणि त्यांची सोय झाली सुद्धा! मंदिराच्या प्रमुख गाभार्यात शिरण्यापूर्वी
रांग एका मोठ्या सभागृहातून नागमोडी गेली होती. या सभागृहातेल भितींवर साई
बाबांच्या जीवनातील प्रसंग म्युरल्स करून लावलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी केलेया
चमत्कारांच्या कथा जास्त आहेत. मी कुतूहल म्हणून ते वाचत वाचत पुढे सरकत होतो.
“इथे फर्स्ट टाईम आला का?” माझ्या मागे असलेल्या गृहस्थाने प्रश्न केला. “ होय”,
अनोळखी माणसाला जितके सौजन्य दाखवावे तेव्हढ्याच सौजन्य दाखवत मी उत्तर दिले.
चांगली उंची लाभलेले, आणि पोट सुटलेले लालाजीभाई यांची त्यांच्या सभेकारी
स्वभावामुळे अशी ओळख झाली. रेशमी सदरा आणि लेंगा घातलेल्या लालाजीभाई यांच्या
डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चाश्ना होता. हातात धरलेल्या प्रसाद आणि फुलांच्या
पिशवीच्या बंदातून बोटातील बटबटीत अंगठ्या डोकावत होत्या. पडेल खांदे आणि
सुरकुतलेला पण उजळ वर्ण असलेला चेहरा त्यांचे वय साठीच्या आसपास असावे हे दर्शवित
होता. त्यांचे डोळे मात्र विशेष वेधक होते आणि चेहऱ्यावर अपलेसे करणारे हसू. कुठून
आलात? काय करता? असे ठराविक संभाषणसुलभ प्रश्न विचारून झाले. लालाजीभाई मुंबईचे.
तिथे त्यांचा कापडाचा व्यापार आहे. वर्षातून तीन चार वेळा आवर्जून कुटुंबाबरोबर
शिर्डीला दर्शनासाठी येतात असे त्यांच्याकडून कळले.
“तुमी आधी कसे नाही आलात?” त्यांनी प्रश्न केला.
“ तस खास काही कारण नाही घडल इथे यावस वाटण्यासाठी” मी अगदी सरळ उत्तर दिल.
लालाजीभाई हसले. ‘आता साईपुराण ऐकावे लागणार’
माझ्या मनात विचार चमकून गेला. पण लालाजीभाई तसे नव्हते. “ मग दुसर्या
कुठल्या देवाला जाता का नाही?” पुढचा प्रश्न. “मी या बाबतीत फारसा आग्रही नाही” मी
पुन्हा माझी देवभोळेपणा बद्दल असलेली नापसंती दर्शविली तसं लालाजीभाईनी अध्यात्म
निरुपण सुरु केलं. ‘आमच्या धंद्यात आम्ही
तिघे भागीदार, माझा भाऊ, मी आणि तिरुपतीचा बालाजी. काय आहे न मित्रा, आपण कितीही
सांभाळून सावरून बिजिनेस केला ना तरी काही गोष्टी आपल्या जवळ नसतात मग ते देवावर
सोडायचं. तो आपला भागीदार असला म्हणजे काही काळजी नाय.’ त्यानी त्यांची ‘फिलोसोफी’
सांगितली. मी नुसताच हसलो. ‘ज्याची त्याची श्रद्धा’ मी म्हणालो. एव्हाना मी अगदीच
टाकाऊ नास्तिक आहे अशी त्यांची खात्री पटली असावी. ‘तुला तुझ्या जीवाची काळजी
वाटली नाय कधी?’ त्यानी प्रश्न केला. मी चमकलो, ‘ होय अनेकदा वाचलोय मी जीवघेण्या
प्रसंगातून. धाडस करायचं तर असे प्रसंग येणारच. देवाची इच्छा असेल तर आपली दोरी
बळकट राहणारच.’ मी उत्तरलो. ‘पण म्हणून येता जाता देवाला साष्टांग नमस्कार घालण
आणि कर्मकांड करत बसण मला पसंद नाही. इतकंच काय देवाला आपल्या छोट्याश्या
व्यवसायात भागीदार करून आपण नामानिराळे होण मला नाही जमणार.’ मी त्यांच्या ‘फिलोसोफी’
शी थेट वैर पुकारल. लालाजीभाई पुन्हा सूचक हसले. ‘ खरय तू म्हणतोय ते. आपण न केलेल्या
चुकीपायी आपणच उभ केलेलं साम्राज्य आपल्याच डोळ्यासमोर उध्वस्त होईल आणि ते
आपल्याला बघाव लागेल अशी भीती नाही वाटली तुला कधी?’ लालाजीभाईनी अतिशय सूचक
प्रश्न टाकला. असेही क्षण येतात हे मात्र खरंय. स्वत:च्या कल्पेनेपलीकडील अनाहूत
अश्या काही गोष्टींमुळे जेंव्हा अशी वेळ येते तेंव्हा मग पंचेंद्रिय शक्ती पलीकडे
काही असेल असा विश्वास निर्माण होतो. “त्याला देव म्हणतात!” आणि तो प्रसन्न रहावा म्हणून
मग त्याची कल्पित कर्मकांडी आराधना सुरु होते.
माणूस अनेक गोष्टींना घाबरतो आणि देवाला शरण
जातो. त्यातील ही महत्वाची गोष्ट असे मला वाटून गेलं. भीती हा श्रद्धेचा पाया
असावा हे मात्र मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. निरपेक्ष भक्ती किती अवघड आहे हे मला
कळून चुकले.
लालाजीभाईच्या देहात मला सदाशिवराव भाऊ पेशवे
दिसू लागले. “ आप मेला जग बुडाले, आबरू जातो वाचतो कोण?” असे शेवटचे वाक्य
उच्चारून ते पानिपतात गेले असे बखरीत लिहिलंय, दहावीत असताना वाचलेल्या या धड्याची
मला आठवण येऊन गेली.
No comments:
Post a Comment