Thursday, June 23, 2016

K2S


पुण्याच्या दक्षिणेस बघितले कि दोन मदारींच्या उंटाची पाठ दिसते तशी दोन टेकाडे असलेला कात्रजचा डोंगर दिसतो. पुण्याची ही दक्षिण सीमा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सरदार शाहिस्ताखानवर  जो निर्णायक विजय मिळवला त्या घटनेतून हुलकावणी देणे यासाठी मराठी वांग्मयात “कात्रज करणे” या अर्थाने या डोंगराने स्थान मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विजयी मोहिमेत पुण्याजवळचे दोन ऐतिहासिक पुरुष स्थान मिळवून आहेत, एक कात्रजचा घाट आणि डोंगर आणि दुसरा सिंहगड. भूगोलाचे यथार्थ ज्ञान शत्रुवरच्या निर्णायक विजयात किती महत्वाचे ठरते हे शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेच्या अभ्यासात दिसून येते.

तर अश्या या कात्रज-सिंहगड डोंगररांगेवरून एक भटकंतीची वाट जाते. सामान्यपणे हा ट्रेक चांदण्या रात्री केला जातो. या मार्गावरून न गेलेल्याने पुण्यात ट्रेकवरच्या गप्पांच्या फडात बोलूच नये. हातात हुकुमाचे पान नसताना ३०४ च्या डावात बोली लावणार्यावर इतर खेळाडू जसे तुटून पडतात तशी त्याची गत होईल.

आज पुन्हा हा ट्रेक करण्याचा योग आला. पाहटे ५.३० वाजता आम्ही दोघेच कात्रजच्या बोगद्यापलीकडे दाखल झालो. बहिणीने तिथे सोडण्याचे कष्ट घेतल्याने चांगलीच सोय झाली. चढाईला सुरुवात केल्यावर कात्रजच्या डोंगराचा विस्तार लक्षात येतो. साधारणपणे अर्ध्या तासात आम्ही दोघे कात्रजच्या डोंगराच्या शिखरावर पोचलो. पूर्वेला तांबडे फुटू लागले होते. सिंहगड ढगात हरवला होता. सूर्याजवळ फारसे ढग नव्हते, त्यामुळे पावसाची शक्यता नाही आता सॅक मधून टोपी बाहेर काढावी लागणार असा विचार येऊन गेला. उजवीकडे पुणे आजून झोपेतून जागे होतंय असा भास होत होता. मधूनच येणारा मौसमी वार्याचा जोरदार झोत अंगावर झेलत आम्ही डोंगर माथ्यावरून पुढे सरकत होतो. बरोबर डोंगर माथ्यावर नुकतेच जल-संधारणाचे काम पूर्ण झालेले दिसत होते. त्यामुळे वाट चुकण्याची भीती नव्हती. वाटेवर आधीच्या भटक्यांनी पुरेश्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लुकोज ची रिकामी पाकिटे, शीतपेयांचे कॅन टाकलेले असल्याने ‘हीच वाट आहे’ हे अगदी साफ कळत होते. कात्रजचा डोंगर माथा अगदीच उघडा बोडका, झाडी कुठे तरी तुरळक, मुरमाड रस्ता. तसा दिड तासाच्या चाली नंतर उजव्याबाजूला गेलेल्या डोंगररांगेवर धायरीतील खंडोबाचे मंदिर दिसू लागले.

हळू हळू डोंगराची ठेवण बदलली. मुरमाड वाटेवर ठीक ठिकाणी मातीची वाट सुरु झाली. आमच्या सुदैवाने पाऊस पडत नव्हता. येणाऱ्या प्रत्येक “बाराव्या” टेकडीचा तीव्र आणि निसरडा उतार, त्यामुळे चिखलाची रंगपंचमी न होता आम्ही सहज उतरू शकलो. त्याचप्रमाणे पुढच्या प्रत्येक “तेराव्या” टेकडीचा चढ सहज अंगावर घेता आला. सिंहगड जवळ येता येता डोंगर उतार हिरवा झालेला दिसू लागला. मुंग्या आणि वाळवीच्या मुंग्यांची उन्हाळी कामे संपवण्याची लगबग चालू होती. लाल पैस्यांची जोडी कुठे कुठे फिरताना दिसत होती. गेल्या आठवड्या- दोन आठवड्यात झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने थोडी हिरवाळ तरारलेली होती आणि कुठे कुठे खोड फुलांचे नाजूक कोंब फुटलेले दिसत होते. झाडांना फुटलेल्या नाजूक पालवीचे रंग तर एखाद्या अनुभवी चित्रकाराला सुद्धा कळवता येणार नाहीत इतके सुंदर होते.

आज या संपूर्ण पत्यावर आम्ही दोघेच प्रवासी होतो. शेवटच्या टप्प्यात एक घार “ची ची” आवाज करत आमच्यावर हवाई लक्ष ठेवून होती. कोण्ढणपूरच्या दरीतून येणारा मोराचा केकारव आणि डोणजे कडच्या दरीतून येणारा “पेरते व्हा” चा अखंड निनाद ऐकत आम्ही सलग ४ तास चालत ट्रेक पूर्ण केला. ढगांनी पूर्ण वेळ सावली धरल्याने फारसा शिणवटा जाणवला नाही. ले. कर्नल जनार्दन ने सर्व आघाड्यांवर उभा केलेला विरोध मोडून काढत हा ट्रेक घडवला त्याबद्दल त्याचा मी हार्दिक आभारी आहे! आजचा अनुभव नक्कीच पदरात पडला.




No comments:

Post a Comment