Saturday, July 23, 2016

मुंजाबा द ग्रेट मॉन्स्टर


आमच्या आजोळी राजगुरुनगरला ब्राह्मण आळीतून नदीकडे जाणार्या वाटेवर चिंचेची भरपूर झाडं होती. त्याच्याच मध्ये एक पिम्पळाचं झाड होत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही लहान मुलं नदीवर डुंबायला जायचो. डुंबून झालं कि पिंपळाच्या पारावर कपडे वळवायचे, जवळच मैदानात लंगडीचे डाव रंगात यायचे. पिंपळाच्या पानांची सळसळ त्या पारावर पाय पसरून बसल कि कानात घुमायची. कधी एखादी कोकिळा त्या झाडाच्या उंच शेंड्यावर बसून तीचं ग्रीष्म गान ऐकवायची.
संध्याकाळी मात्र आम्ही तिकडे फिरकत नसू. पिम्पळाचं ते झाड आणि आसपासची चिंचेची झाडं हे गावातल्या मुन्जाबाच जीपीएस लोकेशन होत. मुन्जाबान पछाडलेल्यांच्या अनेक सुरस व रम्य कथा आमच्या मोठ्या मामा लोकांनी आम्हाला सांगितल्या होत्या. मुंजाबा हा देव मानतात पण काही ठिकाणी त्याच्या सुरस कथांमध्ये त्याला मॉन्स्टर चा दर्जा सुद्धा दिला आहे. या मुंजाबाच्या कारामतींवर उपाय म्हणून तिथेच एकदा भगवान हनुमान ‘अवतरले’ आणि कोणी तरी त्याची शेंदूर लावलेली एक दगडी पाषाण मूर्ती घुमटीत विराजमान केली होती.
बालपणीच्या या भाकड कथा आणि अंधश्रद्धांना मोठे झाल्यावर धकाधकीच्या जीवनात विस्मृतींच्या कप्प्यात ठेवून दिलं गेलं. आमच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मोठ्ठ चिंचेच झाड दिसून सुद्धा या आठवणी जाग्या झाल्या नाहीत.
परवा सोसायटीच्या दाराजवळ, चिंचेच्या झाडाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचा घोळका दिसला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आणि नजर त्यावर खिळलेली. सहज चौकशी केली. आमच्यासारख्या आउटडेटेड ‘काकां’ना त्यातल्या एका चुणचुणीत मुलाने ‘पोकेमॉन गो’ या खेळाविषयी माहिती दिली. “ तुमच्या कडे स्मार्ट फोन असेल तरच तुम्हाला हे कळेल” असा एक सणसणीत टोलासुद्धा त्यानं लगावला. आणि त्यावरून मुन्जाबाची परत आठवण झाली. खर जग, आभासी जग असे जड शब्द त्या मुलाने सहजपणे उच्चारले, त्यातला अर्थ विशेष न कळतासुद्धा! ‘पोकेमॉन अवतरतो म्हणजे त्या पिंपळाजवळ हनुमंत अवतरले तसेच का?’ हा प्रश्न ओठापर्यंत आला होता पण त्याची नजर पाहून शब्द गिळून टाकले.
आमच्या काळातल्या आभासी जगात मुंजाबा हा मॉन्स्टर होता आणि हनुमान हा हिरो. आम्ही मॉन्स्टर पासून बचाव करण्यासाठी तिथून पळून जायचो, ही पिढी त्या मॉन्स्टर कडे धावतेय, त्यालाच पकडायला!
या गावोगावच्या मुंजाबाने पिंपळाच्या आणि चिंचेच्या झाडाचं रक्षण केलं. काही मांत्रिकांचं पोटही त्याच्या करणीवर चाललं . पोकेमॉन गो ची मांत्रिक कंपनी निन्टेन्डो या खेळातून गब्बर झालीय अशी बातमी वाचली. काळ बदलला, समजुती बदलल्या, माणूस अजून बदलला नाही, बदलणाराही नाही हे पुन्हा अधोरेखित झालं.
काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर या षडरिपुंपासून मुक्ती मिळवण्यासाठी करावी लागते ती भक्ती आणि ठेवावी लागते ती श्रद्धा. आणि या षडरिपुंना व्यवहारात निमंत्रण देते ती अंधश्रद्धा ही सोपी व्याख्या जर बरोबर असेल तर एकूण अर्थबोध होतो.
आंतर्जालाच्या मोह्जालापासून मुक्ती मिळवणे आताच्या जगात खरंच कठीण आहे हे मात्र अगदी खरंय!

सत्यजित सुरेश चितळे, २३ जुलै २०१६

No comments:

Post a Comment