दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळी सहज वसंतरावांच्या घरी डोकावलो.
वसंतराव माझ्या जिगरी दोस्ताचे म्हणजेच राहुलचे वडील.
वसंतरावांनी हसून माझं स्वागत केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी
पहाटे उठून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळल्याचा भाव नव्हता. पहाटे पहाटे
अभ्यंग स्नान केल्यामुळे त्यांच्या मुळच्या उजळ चेहेऱ्यावर मात्र वेगळच तेज दिसत
होत. काळ्या बारीक काड्यांच्या आयताकृती काचांच्या लेटेस्ट चष्म्यामुळे त्यांच्या गोलाकार
चेहेर्यावरची करारी मुद्रा अधिकच उठून दिसत होती.
राहुलची इंजिनियरिंग कॉलेज मध्ये पहिल्यांदा ओळख झाली
तेंव्हा आम्ही त्यांना काका म्हणत असू. कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात असतांना
राहुलला ट्रीपला जायला परवानगी नाकारणारे ‘कडक’ वसंतकाका आम्ही पदवीधर- द्विपदवीधर
झाल्यावर आमच्याबरोबर संवाद आणि कधी वाद-विवाद करण्या एवढे बदलले. पुढे जाता
त्यांची वेगळी ओळख वाढत गेली आणि हळू हळू त्यांना थेट वसंतराव म्हणण्यापर्यंत आमचा
घरोबा वाढला. कधी मधी मी असाच त्यांच्या घरी डोकावत असे आणि “मी आज वसंतरावांना
भेटायला आलोय, तुझ्याकडे काही काम नाहीये” असे राहुलला स्पष्ट सांगत असे इतकं आमच
मेतकूट छान जमल होत.
वसंतराव वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.
अगदी गाव पातळीवर कामाच्या जबाबदार्यांपासून सुरुवात करून निवृत्त होताना मुंबईत
मंत्रालयातील काही महत्वाच्या विषयापर्यंत जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली होती.
निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले ते त्यांच्या मुलाच्या म्हणजे राहुलच्या
आग्रहाखातर. मित्र जमविण्याच्या आवडीमुळे त्यांना बस्तान बसविणे फारसे अवघड गेले
नाही. लवकरच त्यांचा असा ठराविक दिनक्रम त्यांनी आखून घेतला. सल्लागार म्हणून
त्यांचे कडे वेळोवेळी सरकारी आणि इतर कामे येतच असत. नेहमीच चांगल्या उमेदवाराचा
शोधात असलेले सोसायटीचे सेक्रेटरीचे पदही त्यांचेकडे चालून आले. हातात घेतलेल्या
अश्या अनेक सामाजिक प्रकल्प आणि कामांमध्ये त्यांच्या हृदयातील वसंत फुलताना दिसत
होता, पण त्याच्यातील “वसंत” या सर्व संस्थांपासून अलिप्त राहिला. वसंतराव अजात
शत्रू नव्हते. पण त्यांचे शत्रू बनू पाहणाऱ्या लोकांना ते त्यांची बाजू समजावून
देण्यात यशस्वी होत असत. त्यामुळे ‘मतभेद’ या पलीकडे त्यांचे शत्रुत्व वाढत नसे.
राहुलच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा ते सरकारी घरात राहत
असत. तेंव्हाच त्यांच्या घराच्या दिवाणखान्यातील एका गोष्टीने माझे लक्ष वेधून
घेतले होते. त्याच्या घरी खिडकीच्या जवळ वसंतकाकांच्या तरुणपणचा एक फोटो लावलेला
होता. आणि त्या खिडकीत एक रिकामी फ्रेम ठेवलेली होती. दर वेळी त्याच्या घरी गेलं
की ती फ्रेम माझे लक्ष वेधून घेत असे. अर्थात सुरुवातीला घरोबा फार नसताना कुतूहल
शमवणे शक्य नव्हते. पुढे नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या बदल्या होत गेल्या पण
प्रत्येक घरी वसंतरावांची ती फ्रेम खिडकीतून प्रवास करत गेली. नुकतेच काही
वर्षांपूर्वी राहुलला या फ्रेम चे रहस्य विचारले तेंव्हा खांदे उडवून ‘ते तू त्यानाच
विचार’ असे त्याने उत्तर दिले होते.
आज त्यांच्या घरी गेलो होतो ते त्यांना हा प्रश्न विचारण्यासाठीच.
दिवाणखान्यात ऐसपैस बसल्यावर वसंतरावांनी फराळाची ऑर्डर आत दिली आणि ‘ बोला काय
काम काढलत माझ्याकडे? ‘ असा प्रश्न केला. ‘ तुमच्या घरातील या दोन फ्रेम्स मी
बर्याच वर्षापासून पाहतोय, पहिल्यांदा मला वाटल की ती रिकामी फ्रेम चुकून राहिली
असेल खिडकीत. पण ती तुमच्या सर्व बदलीच्या घरात अशीच खिडकीतून आणि तुमच्या तरुण पणच्या
फोटो शेजारी बघून मला अस वाटलं की त्यामागे काही कारण आहे. ते विचारव असा मनात
आहे.’ मी स्पष्टपणे माझं येण्याच प्रयोजन सांगितलं. वसंतरावांना तसही स्पष्टपणे
बोलणच आवडत असे हे मला ठाऊक होत.
‘ती फ्रेम होय, ती माझ्यासाठीच आहे!’ वसंतराव मिश्कील हसत
म्हणाले. राहुल माझ्या शेजारीच बसला होता, तो अस्वस्थ झाला. ‘अरे म्हणजे मी मधून
मधून त्या फ्रेम मध्ये जाऊन बसतो’ . वसंतरावांनी अजून एक कोडे टाकले. मी आणि राहुलने
एकमेकाकडे पहिले, त्यांना काय म्हणायचे आहे त्याचा आम्हाला बोध होत नव्हता. आमच्या
बावचळलेल्या चेहर्यांकडे बघून वसंतराव बोलते झाले. ‘ इतक्या वर्षात मला हा प्रश्न
कोणीच विचारला नव्हता. बर झालं तू विचारलास. त्याच असा आहे सत्यजित- आपण सकाळी
उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत अनेक विषय हाताळतो, उत्तरांचे पर्याय धुंडाळतो आणि
निर्णय घेतो. जेंव्हा आपण एखादा निर्णय घेतो तेंव्हा तो त्यावेळी चूक किंवा बरोबर
हे ठरवण हे फार सापेक्ष असतं. आणि आपण निर्णय घेतल्यावर तो बरोबरच आहे असं आपलच
कोणत्याही परिस्थितीत म्हणण असण स्वाभाविक असतं. पण इतर लोक त्याचा काय विचार
करतात यावर बहुतेक वेळा त्या निर्णयाच यशापयश अवलंबून असतं. ही फ्रेम ही
अश्यावेळेस एकूण परिस्थितीतून बाजूला होऊन आपणच आल्या वागण्याकडे, इतरांच्या
वागण्याकडे बघण्याची माझी जागा आहे. आणि म्हणून मी बर्याच वेळा इथे जाऊन माझ्याच
कडे बघत राहतो. माझं वागण चुकलाय असं लक्षात आलं की ते बदलायचा प्रयत्न करतो.
माझ्या निर्णयाचा वेगळा अर्थ घेतला जातोय असा वाटलं तर माझी भूमिका समजवून
सांगायचा प्रयत्न करतो.
बदल हे होतंच राहतात. आपल्या सभोवार परिस्थिती बदलते. पण
आपण या बदलामधील कॉन्स्टट आहोत असं आपल्याला वाटत असतं. परिस्थिती तशी नसते.
आपल्यालाही बदलायला हवं, नाहीतर आपण आउटडेट होऊ, पण बदल करायचा केंव्हा आणि कसा हे
समजायलाही या फ्रेममध्ये जाण्याचा उपयोग होतो.’
वसंतरावांच्या बोलण्यातील अर्थ हळू हळू आमच्या ध्यानात येत
होता. ‘ पण काका ही फ्रेम खिडकीत का?’ मला पडलेला दुसरा प्रश्न मी पुढे केला.
‘आपलं ठेवायचं झाकून, अन दुसऱ्याच पहायचं वाकून’ हा माणसाचा स्वभाव आहे. साहजिकच
उघड्या खिडकीतून दुसर्याच्या घरात डोकावून बघण्यात आणि दुसऱ्याच सगळ ठीक ठक आहे किंबहुन
ठीक ठाक नाहीये हे बघण्यात प्रत्येकालाच आनंद असतो. मग आमच्या घरात तिऱ्हाईताने
डोकावून पाहिलं तर त्याला सगळ ठीक ठाक दिसायला हवं म्हणून मी या फ्रेम मध्ये
जाताना उघड्या खिडकीत जाऊन बसतो, इतक हे सोप्पं आहे. आणि हो तू आता शेवटचा प्रश्न
विचारशील कि माझ्या तरुणपणातला फोटो तिथं काय करतोय. माणस जेंव्हा परलोकी जातात ना
तेंव्हा त्यांचे त्या आधीचे फोटो आठवणीदाखल लावतात. पूर्वायुष्यातील आठवणी पुसट
होतात आणि नजीकच्या आठवणी ताज्या राहतात म्हणून असं असेल असे मला वाटते. म्हातारपण
येईपर्यंत जगणं ही एक अचीव्हमेंट गणली जाते म्हणूनही कदाचित गेलेल्याचे व्यक्तीचे
अगदी शेवटचे फोटो लावत असतील, माहित नाही. मी माझ्या आयुष्यात जो सुवर्ण काळ जगलो
तो माझ्या तिशीत. भरपूर काम केलं, कष्ट सोसले. त्याच फलित म्हणून पुढे मान-मरातब
मिळाला, पैसा मिळाला, नोकर चाकर आले. पण मला अजूनही आकर्षण आहे माझ्या त्याच क्षमतेच
आणि त्या रूपाच. म्हणून मी तो फोटो कायम समोर ठेवला आहे. मी गेल्यावर या रिकाम्या
फ्रेममध्ये कुठला फोटो लावायचा हा राहुलचा प्रश्न आहे.’ राहुलकडे नजर टाकत वसंतरावानी अगदी समाधानकारक उत्तर
दिल.
सगळ्यात असूनही आपल्याच
असण्याचा त्रयस्थ म्हणून विचार करणारे वसंतराव मला आज भेटले. भोवताली बदलणाऱ्या परिस्थितीनुसार
त्यांच्यात झालेल्या बदलामागची प्रेरणा त्यांच्या या “त्रयस्थ” राहण्याच्या
वृत्तीत होती हा एक वस्तुपाठ मला मिळाला. त्याच बरोबर एका गोष्टीचे वैषम्यही
वाटलं. वसंतराव बदलले, पण त्याचं स्वत:बद्दलच मत बदललं नाही याचं. पैसा, ऐश्वर्य,
यांचा मोह जरी त्यांना नव्हता, तरी ते
सांगत होते तितके ते ‘त्रयस्थ’ बनू शकले नाहीत हे त्यांच्याच शेवटच्या
वाक्यातून स्पष्ट होत होत. ‘स्व’-पूजेतून सुटका ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाहीच
मुळी !
-सत्यजित चितळे , १ नोव्हेंबर २०१६
No comments:
Post a Comment