गुरुवारची गोष्ट. शहीद
मेजर प्रदीप ताथवडे उद्यानासामोरून जाऊन पुढे पेगासस क्लब समोरील तिठ्या जवळ
घडलेली. सूर्य अस्ताला गेला होता बहुतेक. या भागात सूर्योदय आणि सूर्यास्त हा कॅलेंडर
मधील वेळेनुसार होतो असे म्हणायचे कारण सिमेंटच्या जंगलातून तो प्रत्यक्ष होताना
दिसतच नाही. तर अशीच संध्याकाळची वेळ, अगदी संधीप्रकाश पसरतो तेंव्हाची. ताथवडे उद्यानाकडून
एक किरमिजी रंगाची ‘वॅगन आर’ आली आणि कोपऱ्यावरच्या मनीषा भेळेच्या दुकानं समोर
रस्त्याच्या कडेला थांबली. तिच्या नंबर प्लेट वरील सिरीज बघून ही गाडी दसरा किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रस्त्यावर
अवतीर्ण झालीय हे जाणकार पुणेकराच्या लगेच लक्षात येऊ शकेल इतकी नवीन.
त्याहीपेक्षा ती गाडी ज्या प्रकारे उभी राहिली त्यावरून चालक अगदी नवखा असणार हे
कोणत्याही चिकित्सक आणि काहींच्या मते “खत्रूड” पुणेकराने सांगितले असते. गाडीत एक
त्रिकोणी कुटुंब, वडील गाडीचे चालक, मोबाईल फोनवर बोलण्यात व्यग्र असलेले. आई घरगुती
समान घेण्यासाठी अगोदरच या दुकानांमध्ये पोचलेली बहुतेक.मागच्या सीटवर ५-६ वर्षाचा
एक गोंडस मुलगा.
समोरच्या पदपथाला लागून एक
गॅस चे फुगे फुगवणारा विक्रेता आणि त्याच्या बरोबर त्याचा ७-८ वर्षाचा मुलगा, आपली
लांडी विजार लपविण्याच्या उद्देशाने असेल कदाचित पण एक पाय दुसर्या पायावर दुमडून
उभा राहिलेला.
पेगासस क्लबच्या बाजूला असलेला रिक्षा थांबा आणि
गिर्हाईकांची वाट बघणारे रिक्षाचालक. पलीकडे एका होर्डिंगवर मास्टर कार्डची
जाहिरात त्यातील ठळक पंच लाईन सकट - “देअर आर समथिंग्स मनी कॅन बाय ........”. सायंकाळ असली तरी गुरुवार असल्यामुळे कमी
प्रमाणात चालू असलेली वर्दळ असा हा परिसर.
थांबलेल्या गाडीत बसलेला
छोटा मुलगा त्या फुगेवाल्याच्या लगेच लक्षात आला. त्यानं आपल्या मुलाला फुग्यांचा गुच्छ
घेऊन तिकडे पिटाळला. गाडीच्या मालकीणबाई तेव्हढ्यात हातात सामानाच्या पिशव्या आणि तिघांसाठी
दाबेली घेऊन गाडीत परतल्या. गाडीच्या
मागच्या खिडकीतून तो छोटा मुलगाही त्या फुग्यांकडे बघत होता. दोघाची नजरा-नजर
झाली. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी हेवा दाटलेला. कारण त्या क्षणी त्या दोन्ही
मुलांना जे हवं होत ते समोरच्याच्या हातात होत. वया परत्वे दोघांनाही त्या मागचे
अर्थकारण समाजात नव्हते. फुगे विकणार्याला मात्र थोडा हिशोब वडिलांनी शिकवला
असावा. आपल्या हातातील विक्रीसाठी असलेला फुगा आणि समोर मिळणारी दाबेली एकाच किमतीची
आहे हे त्याला अनुभवाने माहित होते पण त्याला “बाजारमूल्य” वगैरे जड शब्द असतात हे
त्याला माहित असणे शक्य नव्हते. एक फुगा विकला तर कदाचित वडील आपल्यालाही दाबेली घेऊन देतील आणि जास्त फुगे विकले गेले तर
आज घरी जेवायला मिळेल, इतकेच काय ती त्याची आशा.
गॅसचा फुगा किंवा दाबेली
दोन्ही वस्तूंनी भागणारी भूक काही तासांची, नव्हे क्षणभंगुरच कदाचित! पण त्या
दोघांची त्याक्षणी तीच भावनिक गरज होती.
गाडीतल्या गोंडस बाळाने फुग्याची मागणी आईकडे केली. आईने नकार दिला. बाळ हिरमुसला.
फुगे विक्रेत्याचा अपेक्षाभंग झाला खरा पण त्याला हा अनुभव नवीन नव्हता. त्याची
दाबेली खाण्याची इच्छा त्याने पुढे ढकलली.
गाडी निघून गेली, एक
प्रश्न माझ्या मनात सोडून .........खिशात ऊब देणाऱ्या दहा रुपयांच्या नोटेची नेमकी
आणि खरी किंमत किती?
-सत्यजित चितळे,
#नोटाबंदी
No comments:
Post a Comment