“गिरीकंदरात वास्तव्य करणाऱ्या विष्णुस्वरूप महादेवाला दंडवत”- मंचरच्या
वेशीला स्पर्श करून भीमाशंकराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मन्चरची भाजी मंडई आहे, ती संपताच डावीकडे दिसणारा हा बोर्ड, शेजारच्या बंगलीच्या सीमाभिंतीच्या कामामुळे आता थोडासा
कललेला.
१ सप्टेंबर च्या सकाळी तिथून जाताना आम्हाला कल्पनाही नव्हती कि याच
विष्णुस्वरूप शिवाची आज भेट होणार आहे. निमित्त होते बोरघर इथे सुरु होणाऱ्या
प्रौढ साक्षरता वर्गाच्या उद्घाटन समारंभाचे. घोडेगाव स्थित आदिम संस्कृती व मानव
विकास अभ्यास संशोधन संस्था या संस्थेच्या प्रयत्नातून दर वर्षी कातकरी, आदिवासी वस्तींमध्ये साक्षरता वर्ग चालवले जातात. आमचा
रोटरी क्लब पुणे कोथरूड गेली ९ वर्षे यातील काही वर्ग प्रायोजित करतो. यंदाच्या
वर्षी बोरघर गावाच्या तीन वस्तींमध्ये चालवले जाणारे वर्ग आम्ही प्रायोजित
करण्याचे ठरविले आणि रोटरी इंटरनॅशनल ने ठरविलेल्या मूलभूत शिक्षण आणि साक्षरता
महिन्याच्या पहिल्याच दिवशी, अर्थात १ सप्टेंबर ला हा योग जुळून आला. या
कार्यक्रमासाठी क्लबमधील रो. उज्वल तावडे, सौ. उज्वलाताई तावडे रो. वसंतराव कुलकर्णी, रो. हेमचंद्र दाते, रो. प्रशांत
सिद्ध, आमचे या वर्षीचे अध्यक्ष
रो. मनीष दिडमिशे, सौ. मनीषा दिडमिशे, रो.
उर्मिलाताई हळदणकर आणि मी असे ९ जण दोन वाहनातून सकाळी लवकर निघालो.
नाशिक रस्त्यावरचा गर्दीचा थरार अनुभवत आणि नेहमीच्या आवडत्या उपहारगृहात
गर्दीमुळे हुकलेल्या प्रवेशाच्या संधीमुळे हळहळत आम्ही सुमारे ११ वाजता घोडेगाव
गाठले. आदिम संस्थेचा समीर गाडे हा कार्यकर्ता आमच्या बरोबर काही इतर जणांना घेऊन
येणार होता. त्याने डिंभे गावापर्यंत यायला सांगितले. घोड नदी काठाने जाणारा हा
वळणाचा रस्ता तसा परिचित. सालाबाद प्रमाणे होणारा खांडस-भीमाशंकर ट्रेक या वर्षी
हुकल्यामुळे या वर्षी माझी इथली वारी झाली नव्हती, ती या योगाने जुळून आली. डिंभे
खुर्द पाशी समीर ची भेट झाली आणि त्याने त्यांच्या गाडीच्या मागे यायला सांगितले.
डिंभे पासून पाउण एक तास लागेल असे त्याने सांगितले आणि हा आपल्याला आता कुठे नेतो
याची चर्चा करीत आम्ही त्याच्या मागे निघालो.
डिंभे गावानंतर लगेच उजवीकडे धरण आणि लघु जलविद्युत प्रकल्पाकडे जाणारा रस्ता
आम्ही पकडला. समोर डिंभे धरणाची विशाल उंच भिंत दिसत होती. तब्बल २२ वर्षे बांधकाम
झालेल्या आणि १३.५० दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणाच्या बंद दरवाज्यांच्या
फटीतून गळणाऱ्या पाण्याच्या धारा लाटांसारख्या भिंतीच्या उतारावरून पालवत नदीच्या
पात्रात विसर्जित होत होत्या. त्यावरून या विशालकाय भिंतीमागे किती पाणी आता अडले
असेल याची कल्पना येत होती. रस्त्याने भिंतीसमोरचा पूल ओलांडला आणि नदीच्या डाव्या
किनार्यावर चढाचा मार्ग पकडला. थोडीच वळणे मागे टाकत आम्ही धरण भिंतीच्या उंची
पर्यंत चढून आलो आणि मागे विस्तीर्ण हुतात्मा बाबू गेनू जलाशय दिसू लागला. बोरघर
११ किमी अशी पाटी दिसली आणि या जलाशयाला तीन चतुर्थांश वळसा घालणारा आमचा मार्ग
जलाशयाच्या काठाने जाताना दिसू लागला. रस्ता दुहेरी आणि चांगला होता, गर्दी तुरळक, हवा निर्मळ आणि वातावरण अतिशय आल्हाददायक अशी
जोड मिळाली कि प्रवास कसा आनंददायक होतो. त्यातून पावसाने चिंब भिजलेला आणि गात्रे
तृप्त झालेला निसर्ग सभोवती असला म्हणजे
अगदी पर्वणीच. उजवीकडेच्या डोंगर उतारावर सागाची विपुल झाडी, त्यांची मोठाली पाने आणि श्रावणाच्या शेवटी काहीसा अवेळीच
आलेला त्याचा फुलोरा, वास्तविक भाद्रपद संपताना येणारा. रस्त्याने बाजूला फुललेली
गुलाबी तेरड्याची रोपे तीही थोडी अगोदरच फुललेली परंतु सुंदर आणि मोहक.
थोड्याच वेळात बोरघर गाव आले. कालकथीत झालेल्या एका हनुमान मंदिराची पडकी भिंत
डावीकडे लागली आणि लगेच जिल्हा परिषद न्यू इंग्लीश स्कूल बोरघर ची बैठी इमारत
दिसली. बोरघर कडे डावीकडे जाणाऱ्या रस्त्याला तसेच सोडून आमच्या गाड्या पुढे
चढाच्या रस्त्याला लागल्या. इथून वर उंचावर दिसणाऱ्या एका मंदिराकडे बोट दावित कार्यक्रम
तिथे आहे असे समीर म्हणाला. फार नाही फक्त ६ किमी घाट चढून गेल्यावर येणारी तीच ती
उंबर वाडी.
वळणा वळणाचा तीव्र चढाचा रस्ता, बिगर
कठड्याचा. मुळात कधी तरी रोहयो मध्ये बांधलेला असावा. कुठे उखडलेला, कुठे मुरूम पांघरलेला. त्यावरून कधी गाडीची चाके नुसतीच
गोल गोल फिरली, या रस्त्यावरून जायला असलेला विरोध दर्शवित!
वाटेत बोरघर चा धबधबा लागला. गेले चार पाच दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे
पाण्याची धार रोडावलेली, परंतु
त्याच्या समोरून जाताना त्याच्या विशाल कातळ भिंतीवरून खाली झेपावणारे पाणी किती
सुंदर दिसत असेल याची कल्पना आली. गुगल ला हे ठिकाण माहित आहे हे मॅप वरून दिसून
आले!
सुमारे १५ मिनिटात आम्ही अदमासे ४५० मीटर्स उंची चढून आलो. “वरच्या वरसुबाई”
चे मंदिर आणखीन उजवीकडे उंचीवर ठेवत डोंगराच्या खांद्यावरून प्रदक्षिणा करणाऱ्या
मार्गाने आम्ही उंबर वाडीकडे निघालो. वाटेत आवळे वाडी लागली, एक साक्षरता केंद्र इथे सुरु होणार आहे. तिथून फार नाही पण
दोन एक किलोमीटर्स वर उंबर वाडी, ईन मीन दहा पंधरा घरांची वाडी. उंचावरून खाली नजर
टाकल्यावर दिसणारी भाताची पायऱ्या-पायर्यांची शेते. दूरवर दोन डोंगर सोन्डीतून
दिसणारा पावसामुळे फुगलेला हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा नितकोर तुकडा, डोंगराच्या
उतारावरून वाहणारे छोटे छोटे शुभ्र खळखळणारे ओढे अन तिथे आमची वाट पाहत थांबेलेले
ग्रामस्थ. आमची वाहने तिथे पोचली, नमस्कार झाले आणि शुद्ध हवा फुफुसात भरून घेत
आम्ही थोडे खाली उताराने उतरून नवीनच रंगकाम केलेल्या मंदिराकडे निघालो. आधी लागली
ती तिथली प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी. डोंगराच्या कुशीत, उताराला लागूनच्या वस्तीत बांधलेली, माफक पण स्वच्छ अंगण, बैठी इमारत सहा सात वर्ग खोल्यांची. समोरच क्रांती ज्योती
सावित्रीबाई यांचे मोठे तैलचित्र, दोन वर्गांच्या मध्ये भिंतीवर असलेले माहिती फलक
ज्यावर पुणे जिल्ह्याचा नकाशा, ऋतुचक्राचे
सप्तरंगी चक्र, आपली ग्रहमाला अशी
व्यवस्थित माहिती रंगवलेले. विशेष म्हणजे इथल्या ग्रहमालेत गुरु ला सुद्धा कडी
दाखवलेली दिसली अगदी आता आता लागलेल्या शोधाची माहिती इथेही पोचली आहे तर! शाळेचे
छत पत्र्याचे त्यावर लावलेली सोलर ची तावदाने बघून छान वाटले. एकात्मिक
बालविकास सेवा योजना - अंगणवाडीच्या बाहेर
एक बोर्ड होता. अंगणवाडी या “शॉर्ट फॉर्म” चे पूर्ण निवेदन करणारा. तो असा अं
: अंगावरच्या दुधाचे महत्व पटवून देणारी; ग: ग म भ न च्या अगोदरची
पूर्वतयारी ; ण: बाण मारून लसीचा, बालकांच्या शत्रूचा नायनाट करणारी
; वा: वाल्या कोळ्याचा वाल्मिकी घडवणारी ; डी: डीवचणारी
कुपोषण व बालमृत्यूला आळा घालणारी. या एकाच फलकाने इथल्या वस्तीतल्या मूलभूत समस्यांची
माहिती आपोआपच झाली.
मग पावले मंदिराकडे वळली. नुकताच ओईल पेंट ने रंगवलेला कळस असलेले मंदिर
त्यापुढे सभामंडप. शंभर एक माणसे बसू शकतील इतका मोठा. तिथे आवळे वाडी, उंबर वाडी आणि पुढची कोळ वाडी इथले ग्रामस्थ जमलेले.
आमच्यासाठी मांडून ठेवलेले बाक आणि समोरच्या स्वच्छ सतरंजी वर बसलेले बरेचसे वृद्ध
पुरुष आणि आजच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या महिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिम संस्थेचे कार्यकर्ते राजू घोडे यांनी
प्रास्ताविक केले. गेली काही वर्षे राजू यांच्या संपर्क आहे. द्वि-पदवीधर असलेला
राजू याचं गावाचा. कष्टातून शिकून नुकताच बोरघर ची निवडणूक जिंकून उप-सरपंच झालाय.
त्याने साक्षरता वर्गाचे महत्व, शासन योजना लाभार्थींच्या दारी पोचण्यासाठी त्याची
असलेली कळकळ आणि धडपड चांगली विशद केली. आमच्या क्लबचे अध्यक्ष मनीष याने रोटरी
विषयी माहिती सांगून या उपक्रमाविषयी असलेली बांधिलकी समजावून सांगितली. रो.
उर्मिलाताईंचे बोलणे सर्वांनाच आणि विशेष म्हणजे महिला वर्गाला आवडून गेले. “ आता
मी सही करणार, बँकेत पैसे भरायला
गेल्यावर माझी मीच स्लीप भरणार” या त्यांच्या ठसक्यात सांगितलेल्या वाक्यावर
समोरच्या महिला वर्गाच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे हसू फुलले. या
साक्षरता वर्गात शिक्षित झाल्यामुळे आपल्या नातवंडाना सुद्धा आपला आजा किंवा आजी
सुद्धा या वयात काही करून दाखवू शकते असा विश्वास वाटेल आणि चांगले संस्कार
घरापर्यंत पोचतील असा विषय रो. प्रशांत ने मांडला. तुमचे नाव आणि वय काय असा
प्रश्न रो. उज्ज्वल ने ज्यांना विचारले त्या रोहिदास यांना आपले वय सांगता आले
नाही. किंबहुना त्याची काय गरज आहे असाच प्रश्न त्यांना पडलेला दिसला. आधार कार्ड
दाखवतो त्यावरून तुम्हीच माझ्या वयाचे गणित करून सांगा असे म्हणत त्यांचा हात बंडीच्या
खिशाकडे गेला. आकडेमोड करण्याचे शिक्षण नसलेल्या या लोकांची व्यवहार चतुरता मोडीत
निघालेली असणार.
अक्षर- अंक ओळखीपासून अज्ञ असणारा हा वर्ग आदिम संस्थेचे कार्यकर्ते आणि या
वर्गांचे संयोजक समीर, स्नेहल, वैशाली, राजू यांच्या
सारख्यांच्या पाठपुराव्यामुळे इथवर काही अपेक्षेने आला होता आणि आम्ही त्यांना
प्रोत्साहित करू शकलो हे आमचे भाग्यच.
इथून जरा उत्तरेकडे डोंगर ओलांडून गेलो कि कुकडी चे खोरे आणि नाणेघाट परिसर.
सुमारे दोन सहस्त्र वर्षांपूर्वीचा समृद्ध प्रदेश. वायव्येकडे दर्या घाट ही ढाकोबा
दुर्गाकडे उतरणारी वाट. शतकानुशतके इथे वास्तव्य करून राहिलेला हा मुळात क्षत्रिय
समाज, मुलत: महादेव कोळी वंशाचा
( असावा ... किमान इंटर नेट तशी माहिती पुरविते) आम्ही तिथे असताना याची चौकशी
कटाक्षाने टाळली कारण आधुनिक समाजाच्या दिशेने जाताना जी गोष्टी पुसणे आवश्यक
वाटते ती आपल्या तोंडाने दुसर्याला पुसायची कशाला!
उद्योग व्यवसाय आणि त्यामुळे येणारी स्थिरता व संपन्नता या गोष्टी खाली
खोर्याच्या सखल जागी गेल्यावर हळू हळू इथल्या पुढच्या पिढ्या इथून खाली घोडेगाव, मंचर भागात स्थिरावल्या आहेत. उंबर वाडीच्या ज्या प्राथमिक
शाळेत शिकून राजू घोडे पुढे जात द्वी-पदवीधर झाला तिथे एके काळी ५०-५२ मुले असत,
आता ती संख्या १०-१२ वर आली आहे. तरी पण हे लोक इथेच राहिले आहेत, त्यांचे देव इथेच आहेत, वर्षातून एकवार पीक देणारी चतकोर शेती इथेच आहे म्हणून नव्हे..... तर वर वर
शांत आणि तलम दिसणाऱ्या या सामाजिक वस्त्राची वीण एकसंध नाही म्हणून, कदाचित. या
सामाजिक व्यवस्थेच्या अस्तरा खाली विषमतेचे निखारे आहेत हे निरखून पाहणार्याला
जाणवू शकते. इथले देव पावतात का? हा प्रश्न मी विचारला नाही, ते पावतात हि श्रद्धा असणारच, कारण नवस बोलणे आणि तो फेडणे हे इथली सामाजिक रूढी आहे.
आणि हे देव कोपतात सुद्धा ही श्रद्धा बसायला या डोंगर सोंडेच्या पलीकडेच माळीण गाव
आणि तिथल्या गेल्या दशकातल्या नैसर्गिक विध्वंसाची आठवण आहे. “ आदर्श पुनर्वसित
गाव माळीण” हि इथे येताना दिसणारी पाटी यासाठी पुरेशी आहे.
डोंगर उतारावरच्या या वस्त्यांमध्ये पाण्याची काय व्यवस्था असा प्रश्न केला
तेव्हा न आटणाऱ्या विहिरी असे उत्तर मिळाले. घाट वाट चढून येताना काही नवीन
बांधलेल्या आणि काही जुन्या विहिरी दिसल्यासुद्धा. डिंभे धरणात कुबेराच्या मापाने
पाणी भरणाऱ्या या जलस्त्रोतांच्या परिसरात नजीकच्या काही काळापूर्वी उन्हाळ्यात
रखरखीत डोंगर माथ्यावरून डोक्यावर पाण्याच्या हंडे भरून जाण्यार्या महिलांचे चित्र
लगेचच डोळ्यासमोरून तरळून गेले. इथल्या विहिरींवर रहाट गाडगे दिसले नाही परंतु
त्या गर्दीत बसलेल्या हंसाबाई, गंगाबाई च्या
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी त्यांच्या जगण्याच्या रहाट गाडग्याची कुरकुर न सांगताच
ऐकवली.
इथून शिकून बाहेर पडून सगळे आयुष्य मुंबई मध्ये महाराष्ट्र बँकेत नोकरी केलेले
आणि मग पुन्हा ग्रामविकासाच्या ओढीने इथे परत आलेले श्री. गाडे यांची इथेच ओळख
झाली. आपल्या प्रगतीचा मार्ग चोखाळत शहराकडे वाटचाल करण्याचा सामान्य क्रम सोडून
मागे पुन्हा गावाकडे परतलेल्या या सर्वांच्या जिद्दीचे आणि तळमळीचे आम्हाला विशेष
कौतुक वाटले.
उंबरवाडीचा कार्यक्रम संपला. समोर गाभार्यातून आमच्याकडे पाहणाऱ्या
विठ्ठलाच्या आणि रखुमाईच्या सालंकृत पाषाणमूर्तीला नमस्कार केला. एका बाजूस
ज्ञानेश्वर माउली आणि एका बाजूला तुकोबारायाची प्रसन्न मूर्ती इथल्या मातीत
रुजलेल्या वैष्णव संत विचारांची ओळख करून देत होत्या. निघताना राजू घोडे, स्नेहल, वैशाली, समीर सर्वांची हृदय भेट आणि निरोप घेतला. इथे वसलेल्या
शिवाच्या कंठातील हलाहलाचा दाह कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात खारीचा वाटा
आपल्याला उचलता आला हे इवलेसे समाधान मनात ठेवूनच!
रो. सत्यजित चितळे
०५ सप्टेंबर २०२४
No comments:
Post a Comment