Monday, September 9, 2024

FOR EVERYTHING ELSE, THERE IS …………GOD - प्रवास अनिश्चिततेकडून सुनिश्चिततेकडे:

 


There are some things money can't buy; for everything else, there's Mastercard अशी जाहिरात मास्टर-कार्ड ने १९९७ साली सुरु केली. अगदी लक्षात राहावी अशी हि ओळ. माझे पहिले क्रेडिट कार्ड आले ते मास्टर कार्ड चे. त्याचा पहिल्या प्रथम वापर केला तेव्हा त्या दुकानात ठेवलेल्या POS मशीन वर कुंकू वाहून स्वस्तिक काढल्याचे पाहून मला हसू आले होते हे मला स्पष्ट आठवते. मास्टर कार्ड पैसे चुकवणार नाही परंतु त्या वेळेस उपलब्ध असलेली फोन यंत्रणा आणि कॉम्प्युटर सर्वर्स कधी बंद पडतील त्याचा काय भरवसा, म्हणून मग POS मशीनची सुद्धा पूजा बांधलेली मी बघितली. For Everything Else, there is GOD असे माझ्या मनात तेव्हापासून घोळत राहिले!

काठमांडू मध्ये पशुपतिनाथाच्या दर्शनाला गेलो होतो. देवाची साग्र संगीत पूजा बांधून झाल्यावर पुजार्‍याने दिलेली माला गळ्यात घालून परत येणारे काही लोक दिसले. काठमांडूहून परत निघताना परदेशात नोकरी साठी जाणारे नेपाळी तरुण गळ्यात अश्याच माळा घालून जाताना एयर पोर्ट वरच्या दरवानाने त्यांना हटकले. पासपोर्ट आणि व्हिसा आहे आमच्याजवळ, बाकी सर्व तयारी केली आहे, आणि for everything else.... अश्या आशयाने  त्याने ती माळ हाताने त्याला दाखवली!

रामेछाप च्या मंथली विमान तळावरून लुक्ला कडे जायला निघालो होतो. नेपाळ मध्ये असलेली हि छोटी विमाने, त्यांचा वर्षातून एक तरी अपघात होतोच..... असेच काही आम्ही विमानात बसायच्या आधी बोलत होतो. वैमानिकाने स्टार बोर्ड कडील, म्हणजेच उजवीकडील  प्रोपेलर सुरु केला, बोर्डिंग गेट पोर्ट साईड म्हणजे डावीकडे असल्यामुळे, सर्व प्रवासी बसल्याशिवाय तिकडचे इंजिन सुरु केले जात नाही. आम्ही आत बसलो, वैमानिकाने डावीकडचे इंजिन सुरु केले. समोर ग्राउंड स्टाफ मधील तंत्रज्ञ दोन्ही इंजिनकडे बघत होता. सर्व काही ठीक आहे अशी त्याची खात्री पटल्यावर त्याने वैमानिकाला ईशारा केला आणि तो बाजूला झाला. विमान धावपट्टीकडे निघाले. मघाशी झालेली चर्चा मनात होती आणि माझे मन भूतकाळात गेले. १९९६ साली चरखी-दादरी जवळ हवेत दोन विमानांची टक्कर होऊन मोठा अपघात झाला. बाकी सगळे ठीक आणि व्यवस्थित असताना अपघात का झाला याचे कोडे उलगडणारा एक लेख त्या वेळेस वाचनात आला होता, त्यातील एक रशियन विमान होते आणि त्याचा पायलट बहुतेक उतरणाऱ्या धावपट्टीची समुद्र सपाटीपासूनची उंची सेट करण्यास विसरला असे काहीसे अनुमान लेख लिहिणाऱ्या तज्ञाने काढले होते. रामेछाप ची उंची आणि लुक्ला ची उंची यात जवळपास ८५०० फुटांचा फरक......मी मनोमन देवाला नमस्कार केला ... for everything else .... असे म्हणत!

एका नामांकित कंपनीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये गेलो असता एका यंत्राची जागा आणि मांडणी इतर प्रोसेस फ्लो च्या नेमक्या विरुद्ध दिशेला दिसली. इथे काहीतरी चुकतंय हे अभियांत्रिकी न समजणाऱ्या माणसाला सुद्धा जाणवेल अशी ती मांडणी होती. मी या विषयी सहज चौकशी केली. कोणा वास्तू कन्सल्टंट ने ते यंत्र तसे ठेवायला सांगितले असे मला कळले. for everything else .... असेच माझ्या मनात आले!

आपल्या आयुष्यात किती चल (variables) गोष्टी असतात! त्यातल्या काही आपण मांडू शकतो, त्याचा अंदाज घेऊ शकतो आणि त्यावर नियंत्रण हि ठेवू शकतो परंतु यादी खूप मोठी होत जाते आणि सगळ्यांवर आपली सत्ता चालत नाही. मग ज्यावर चालत नाही त्याची ज्याची मालकी त्याला या गोष्टी माझ्यासाठी सांभाळून ठेव म्हणत आपली नौका पुढे रेटायची. काहीही काम करताना केवळ त्या ELSE चीच धास्ती!

अभियांत्रिकी क्षेत्रात काम करू लागलो तसे जाणवले कि ISO आणि सर्वच गुणवत्ता प्रणाली,  संभाव्य धोके आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजना यांचे लक्ष्य हे केवळ याच ELSE ची उकल करण्यात आहे. किंबहुना माणूस जे काही कर्तुत्व दाखवतो ते या ELSE शीच निगडीत आहे. जितके त्याचे महत्व कमी होईल तितकी अनिश्चिततेकडून सुनिश्चिततेकडे वाटचाल आहे.

या प्रवासाला एक अजून पदरही आहे. व्रत वैकल्ये, वास्तूशास्त्र, काही रूढी आणि काही परंपरा यांनी आपल्याला ज्ञात आणि बर्याचशा अज्ञात चल गोष्टी वश करून घेता येतात, किमानपक्षी अनुकूल करून घेता येतात असेही मानणारे अनेक आहेत. बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीला अश्या गोष्टी कधीच पटत नाहीत. त्यांच्या मागचे शास्त्र आणि कार्यकारण भाव अजून समजला नाही असेच त्यांचे प्रतिपादन असते. संख्याशास्त्रीय पुराव्यातून ठळकपणे काही मांडले तरी अश्या शास्त्रांची गणना छद्मी विज्ञान म्हणूनच केली जाते.

‘या जगात सर्वच परमेश्वराचे आहे’ असे वैराग्याचे “स्टेटमेंट” भडकपणे मिरवणारे सुद्धा अनेक जण भेटले. सर्वच गोष्टी परमेश्वराच्या मग आपण जाणीवपूर्वक काही अप्रामाणिकपणा केला तरी तो सांभाळून घेईल आणि यासाठी त्याचा “हविर्भाग” त्याला पोचविण्यासाठी यथासांग कर्मकांड करणारे असे हे लोक.

मला असेही काही जण भेटले जे त्या everything परमेश्वराची मनोमन पूजा बांधून आहेत. आपल्या कामात निर्विवाद प्राविण्य आणि स्वत:ला समाधान वाटेल इतक्या प्रामाणिकपणे काम पूर्ण करण्याची क्षमता आणि निष्ठा हे त्यांचे विशेष गुण भावणारे आहेत.  त्यांना ना कोणत्याही else साठी “त्या”ची आवश्यकता भासते ना कोणत्या कर्मकांडाची. गीतेमधील निष्काम कर्मयोग म्हणजे वेगळे काय असावे?

सत्यजित चितळे

 

 

No comments:

Post a Comment