नेपाळ – तिबेट मध्ये होणाऱ्या वस्तू व्यवहाराचे पूर्वी पासूनचे एक ठिकाण
म्हणजे नामचे बाजार. खुंबू नदीच्या खोऱ्यात दूध कोसी आणि भोटे कोसीच्या संगमाजवळ
समुद्र सपाटीपासून सुमारे ११५०० फूट उंचीवर डोंगर उतारावर वसलेले मुळातले एक छोटे
खेडे. सागरमाथा संरक्षित अभयारण्यात येणारे आणि एव्हरेस्ट च्या मोहिमांच्या
मार्गातील एक महत्वाचे ठिकाण.लुक्ला च्या विमानतळापासून इथले बहुतेक ट्रेक सुरु
होतात. तिथून नामचे बाजार हा टप्पा दोन दिवसानाचा आहे. लुक्ला ची उंची १० हजार
फुटांच्या आसपास आहे आणि तिथून नामचे बाजार च्या डोंगर चढाई चा पायथा, म्हणजे
जोर्सले घाट हे गाव साधारण तितक्याच उंची वर आहे. तिथून मात्र खाडी चढण सुरु होते.
इथल्या ट्रेक्स मध्ये, लुक्लाहून निघाल्यापासून दहा हजार फुटांची उंची ओलांडून
येणारे पहिले निवास स्थान असल्यामुळे सर्व गिर्यारोहक उंची शी जुळवून घेण्यासाठी
इथे एक दिवस जादाचा मुक्काम करतात. साधनांची उपलब्धता, ज्यामध्ये खर्ची घालण्यासाठी पैसा हाही आलाच, जस जशी वाढत जाते आहे तशी पूर्वी भ्रमणासाठी अवघड
वाटणाऱ्या ठिकाणाची दुर्गमता कमी कमी होत जाते त्याचा इथे अनुभव येतो.
स्वाभाविकच एव्हरेस्ट च्या दिशेने प्रत्येक मोसमात जाणारी पावले आता
हजारांच्या संख्येत गेली आहेत. त्यातील काही एव्हरेस्ट सर करण्याच्या ईर्षेने
जातात तर काही एव्हरेस्ट चे पायथ्यापासून दर्शन घेण्याच्या मिषाने. परंतु सगळी
पावले नामचे बाजारच्या स्वागत कमानीतून जातातच. पूर्वी मोजकी घरे असलेले हे घोड्याच्या
नाले सारख्या आकारातले गाव आता अनेक लॉज मुळे गजबजले आहे. एका दिवशी सुमारे हजार लोक
सहज राहू शकतील इतकी लॉज इथे आहेत.
नामचे हे मोठे बाजाराचे गाव. गावाच्या प्रवेश कमानीतून आत शिरल्यावर उजवीकडे बांधलेल्या विस्तृत पायऱ्या आणि त्याच्या कडेने अखंड वाहणारा झरा आहे. त्या झर्याच्या मध्ये मध्ये ठराविक टप्प्यावर पाण - चक्की चा उपयोग करून "ओम् मणीपदमे हुं" लिहिलेली आकर्षक रंगीत प्रार्थना चक्रे देवाला मंत्राभिषेक करत राहिलेली दिसतात. उतारावरून धावत येणारे पाणी पुढे कारंज्यात रूपांतरित होऊन मग खोल दूध कोशी नदीत मिळून जाण्यासाठी मार्गस्थ होते.
सागरमाथा नेक्स्ट:
नामचे बाजार वरून स्यान्गबोचे कडे चढून जाताना सागरमाथा नेक्स्ट नावाचे एक
हॉटेल वजा ठिकाण लागले.आम्ही
स्यान्गबोचे च्या वरच्या एव्हरेस्ट व्ह्यू पोइंट वरून एव्हरेस्ट- ल्होत्से वरची
सोनेरी सूर्य किरणांची अदाकारी पाहून परत येत होतो. कडाक्याची थंडी होती आणि कुठे
गरम गरम चहा मिळाला तर काय बहार येईल अशी चर्चा सुरु होती. तेव्हढ्यात एक विदेशी
गिर्यारोहक हातात चहाचा कप घेऊन निवांतपणे उष:प्रभेचा आनंद घेत बसलेला दिसला आणि
शेजारीच सागरमाथा नेक्स्ट नावाचे एक हॉटेल वजा ठिकाण लागले. दारातच जुन्या
भंगारातील वस्तूंपासून बनवलेले एक शिल्प होते. तिथे चहा मिळेल का अशी चौकशी करायला
गेलो तर माहितीचे एक दालनच आमच्यासाठी खुले झाले. सागरमाथा नेक्स्ट हे हॉटेल नसून
ती एक आर्ट गॅलरी आहे. २०१२ मध्ये तीन लोकांनी एकत्र येऊन सागरमाथा नॅशनल पार्क ची
पूर्ण स्वच्छता करणे आणि स्थानिक शेर्पा समाजाची उन्नती करणे यासाठी हा उपक्रम
सुरु केला. सागरमाथा नॅशनल पार्क मध्ये वेगवेगळ्या ट्रेक रूट वर तयार होणारा कचरा
एकत्र करून आणि त्यापासून कलात्मक वस्तू बनवून त्याच्या विक्रीतून मिळणारा नफा हा
या कामात वापरला जातो.
देनाली श्मीड्ट हा एक जर्मन गिर्यारोहक. त्याच्या वडिलांबरोबर के२ शिखर सर
करण्याचा प्रयत्न करीत असताना हिमप्रपात होऊन २०१३ साली त्याचा अंत झाला. तो
कलाकार होता. त्याच्या मृत्युनंतर त्याने केलेल्या कलाकृती कुटुंबियांना मिळाल्या, त्यातून पैसा उभा करून त्यांनी देनाली फौंडेशन ची स्थापना
केली. त्या ट्रस्ट तर्फे हि देनाली आर्ट गॅलरी उभी राहिली आहे.
सराफ फौंडेशन हा एक स्थानिक ट्रस्ट आहे ज्यांनी सागरमाथा नेक्स्ट ची उभारणी
केली आहे., जागा एका स्थानिक शेर्पा कुटुंबाने दान दिली आहे आणि टॉमी गुस्तावसन हे
तिसरे गृहस्थ आहेत ज्यांनी हि संस्था सुरु केली आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा श्री.
टॉमी गुस्तावसन यांची भेट झाली, मघाशी आरामात चहा घेत दिसले ते हेच!. या आर्ट
गॅलरी च्या शेजारी एव्हरेस्ट मोहिमांची माहिती देणारे एक सुंदर प्रदर्शन आहे आणि
तिथे Virtual Reality वापरून आपण ३ मिनिटात एव्हरेस्ट सर करून येऊ
शकतो. सर्व डीजीटल सामुग्री डेल कोर्पोरेशन ने दान दिलेली आहे.
सागरमाथा नेक्स्ट मध्ये गेल्यावर जाणवले कि या मंडळीनी स्थानिक तरुण नेपाळी
स्वयंसेवकांची एक चांगली फौज उभी केली आहे जी या कामात मदत करताना दिसते. मुळात या
परिसरात गाड्या जातील असे रस्ते नाहीयेत. किंबहुना त्यामुळे इथली दुर्गमता आणि
निसर्ग थोड्या फार प्रमाणात टिकाव धरून आहे. परंतु त्यामुळे इथे जमा होणारा कचरा
विल्हेवाट लावण्यासाठी खाली कसा आणायचा हि देखील एक समस्या आहे. बहुतेक स्थानिक
लॉक गोळा होणारा कचरा उघड्यावर जाळून टाकतात, परंतु त्यामुळे पर्यावरणाचे अधिक नुकसान होते ही गोष्ट आपण सगळेच जाणतो.
त्यावर एक उपाय या फौंडेशन ने योजला आहे.
सागरमाथा नेक्स्ट आणि किल्ह फौंडेशन तर्फे “ कॅरी मी बॅक” योजना चालवली जाते.
नामचे बाजार हून परतणाऱ्या ट्रेकर्स साठी हे ऐच्छिक काम आहे. गोळा केलेला कचरा
स्वच्छ करून आणि त्याचे वर्गीकरण करून त्याच्या १ किलोच्या भक्कम सील केलेल्या सॅक
तयार करतात.
नामचे बाजार च्या चेक पोस्ट पाशी फौंडेशन चे स्वयंसेवक एक किलो कचऱ्याची सील
केलेली हि बॅग देतात, ही बॅग लुक्ला चेक पोस्ट पाशी त्यांच्या स्वयंसेवका कडे
सुपूर्द करायची इतकेच काम. या उपक्रमाद्वारे गेल्या पाच वर्षात ८ टन कचरा योग्य
विल्हेवाट लावण्यासाठी खाली रि-सायकलिंग सेंटर पर्यंत आणण्यात आला आहे. आपणही परत
जाताना या उपक्रमात भाग घ्यायचा असे ठरवून आम्ही श्री. गुस्ताव्सन आणि त्यांच्या
तरुण सहकाऱ्यांचा निरोप घेतला.
मुळात “कचरा करू नये” हेच उत्तम पण आपण पाहतो कि बेशिस्त समाजात हे १००%
वास्तव नाही त्यावर हे उत्तर चांगले शोधले आहे आणि राबवले आहे. सह्याद्री मध्ये
फिरताना अनेक ठिकाणी पर्यटकांनी केलेला कचरा दिसून येतो. यावर हा उपाय करता येईल.
नेपाळ मध्ये मनास्लु, अन्नपूर्णा आणि सोळूखुंबू इथे ट्रेकिंग करताना असे समजले
कि गाव पातळीवर काही संस्था – NGO या तिथल्या
वनीकरणाची नोंद आणि काळजी घेतात. श्री. दम्बार हे आमचे ट्रेक ओपेरेटर तिथल्या एका
जिल्ह्याच्या ट्रेकिंग कमिटी चे सदस्य होते. त्यांनी सांगितले कि एक किंवा दोन-तीन
गावे मिळून या को-ओपारेतीव्ह सोसायट्या तयार केल्या आहेत. त्या परिसरात होणारी
वृक्ष तोड आणि नवीन वृक्ष लावणी व जोपासणी यांचेकडे त्या लक्ष देतात. त्यांच्याकडे
इतका अवेअर नेस कसा काय असा मला प्रश्न पडला आणि आश्चर्य मिश्रित कौतुकही वाटले.
नुकतेच एका सर्टीफिकेशन एजन्सी मध्ये कामानिमित्त गेलो होतो. बरोबर नेपाळ मधील
या क्षेत्रात काम करणारे एक अनुभवी गृहस्थ होते. त्यांच्या चर्चेतून असे कळले कि
नेपाळ कार्बन क्रेडिट्स विकून बरेच पैसे उभे करते. गेल्या वर्षी सामाजिक
वनीकरणाविषयी निर्माण झालेल्या कुतुहलाचे हे समाधान होते. सध्या या विषयी अधिक
माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
आपल्याही देशात असे उपक्रम सुरु करता येतील नक्कीच.
No comments:
Post a Comment