Monday, September 9, 2024

कळसुबाई ट्रेक- अनुभव

 

कळसुबाई ट्रेक- अनुभव ( माझ्यासाठी ४ था):

निरोप फिरला आणि १४ सप्टेंबर २०२३ तारीख नक्की झाली. संख्या घसरत घसरत १८ वर लॉक केली गेली. कुणा कुणाच्या कृपेने त्यात केतन ला २५% कोटा आणि पंकज मेहता यांना डायरेक्टर कोटा ची सीट मिळाली आणि १४ तारखेला पहाटे ५.३० ला विष्णूकृपा मधून गाडी निघाली. ( ता. क. गाडी ४ वाजता येणार अशी आवई होती आणि चहा ४.३० ला तयार होता....)

नाशिक रस्ता चांगला झालाय, राजगुरुनगर आणि पुढच्या गावांना बायपास होत जातो, अगदी आळेफाटाला सुद्धा फाटा मारलाय. पण हाय रे कर्मा... प्रत्येक गावाच्या एन्ट्री – एक्झिट ला पूल न बांधल्यामुळे डोंगरा इतके उंच गती रोधक आहेत. त्या वरून गाडीचे होणारे उड्डाण विशेषत: मागच्या सीट वरच्यांना जाता येता चांगलेच “ लागते”. ८ वाजता गाडी नाश्त्याला थांबेल हा आदेश होता पण इये देशी बोटा जवळ वसलेले कामत उपहारगृह आणि घारगावचे दौलत वेगाच्या अनावर ओढीत मागे पडले आणि १८ जनांचे आशीर्वाद मिळण्याचे भाग्य लक्ष्मी रेस्टॉरंट नावाचे तसे छोटेखानी रेस्टॉरंट चालविणाऱ्या “भल्या” माणसाच्या ( तो आकाराने भला होता... बाकी अनुभव नाहीत ) नशिबात होते. वरच्या दोन हॉटेल्स पेक्षा स्वच्छता आणि मेन्यू मधील विविधता जरी नाक मुरडण्यासारखी असली तरी पदार्थ चांगल्या चवीचे होते. त्यावर ताव मारून गाडीत बसताच समोर बर्फीचे ताट आले. वन फॉर द रोड असे म्हणत आणि न आलेल्यांच्या नावाने शंख करत गाडी पुढे निघाली.

पुण्याहून निघाल्यापासून पाऊस नव्हताच. रस्ताही अगदी कोरडा ठाक तो थेट बारी पर्यंत. डोंगरांवर हिरवाई चांगली नटली होती. परंतु आताच्या मोसमात दिसू लागणारी फुलांची उधळण मात्र कमी आहे असे जाणवत होते. प्रवरेचा पूल ओलांडला तरी खाली पाण्याची पातळी खूप फुगून वर आलीय असे काही वाटले नाही.

११ वाजता बारी मध्ये डेरेदाखल झालो. कळसूबाई शिखराचा चढ एकदम अंगावरचा. त्यात आज शिखराच्या माथ्यावरचे किरकोळ ढग सोडले तर एकूण मार्गावरच्या ठळक खुणा आणि सर्व शिड्या व्यवस्थित दिसत होत्या. डोक्यावर माध्यान्हीचा सूर्य घेऊन चालायला सुरुवात झाली. बारी गावाच्या पुढचा ओढा दमान वाहत होता. त्याच्या बांधावरचे खडक चक्क कोरडे होते. त्यामुळे पाण्यात उतरून ओलांडणे हि कृती करावीच लागली नाही.

सुपरमॅन तिडके एक ते आमच्यासारखे भारदस्त व्यक्तिमत्वाचे अनेक असे ट्रेकर्स असल्यामुळे पहिला गडी ते शेवटची गाडी यांच्यात अंतर पडत गेले. आठवड्यातील मधला दिवस असल्याने गर्दी म्हणावी इतकी माणसे नव्हती. तुरळक लोक आणि प्रामुख्याने अमराठी असे त्यातले बरेच जण भेटले. बहुत उंचा है पासून बहुत लंबा है अशी चढाईच्या मार्गाची लांबी रुंदी मोजण्याचा प्रयत्न करणारे, पहिल्यांदाच असा अनुभव घेणारे बरेच भेटले. काही जळगाव चे, काही नासिक चे, काही जवळपासचे असे गटा गटाने आलेले. नासिक हून एका आश्रमातले काही तरुण आले होते. हिंदीत बोलत होते. त्यांच्या जवळच्या ब्लू-टूथ स्पीकर वर मोठ्याने भजन लावल होते. त्याचे बोल होते “ ऐसी परेशानी देखी नही कही.....मैने इसलिये जाने जाना गुरुनाम ले लिया!!” चक्क दिवानगी चित्रपटातल्या गाण्याच्या चालीवर आणि करावके चा उपयोग करून तद्दन भसाड्या आवाजात रेकॉर्ड केलेले ते भजन. कान देऊन ऐकल्यावर चांगलीच करमणूक झाली.

वातावरण शांत होते, फार सोसाट्याचा वारा नव्हता, मधूनच एखादी झुळूक डोक्यावरच्या टोपीशी  खिलवाड करत जाई तिचा आवाज. आज मुंबईच्या विमानतळावरून उडणारी विमाने पश्चिम ते पूर्व अशी उडत असावीत. ठराविक दर मिनिटांनी सॉनिक बूम चा आवाज वातावरणात घुमून येत होता तेव्हढाच एक मोठा आवाज.

वरच्या टप्प्यावर पोचता पोचता ढगांनी ऊन सावल्यांचा खेळ करून दाखवला आणि मग माथ्यावर छत्र धरलं. उन्हाचा त्रास कमी झाल्यावर थोडा वेग वाढला. शेवटच्या टप्प्यातल्या हॉटेल्स वजा झोपड्यापाशी जो झरा वाहतो त्याला थोडे पाणी होते. म्हणजे ओंजळीचा पृष्ठभाग जमिनीला टेकवला तर तळव्यावर अर्धा इंच पाणी येईल इतके. तिथे पाणी पिऊन पुढे निघालो. नेहमी दिसणारे जांभळ्या फुलांचे ताटवे च्या ताटवे डोंगर उतारावर पसरले होते. जोडीला मधुनक डोकावणारी सोनकीची पिवळाई आणि त्यांना बांध घातल्यासारखी तेरड्याची रोपे. फुलावरचा मध गोळा करण्यासाठी आलेली मधमाश्यांची सेना आणि त्यांच्या उग्र गुंजारवामुळे दबकून उडणारी फुलपाखरे असे मनोहर दृश्य.

शिखर माथ्यावर पोचायला आता एक चांगली मोठी शिडी लावली आहे. पायाचा पंजा पूर्ण मावेल इतक्या मोठ्या पायऱ्या असलेली. त्यामुळे कठड्याचा आधार न घेता तिथून चढून जाता आले आणि २.१० ला माथ्यावर अवतरलो. तोवर माथ्यावर ढगांचे आगमन झाले होते. थोडा वेळ बसून आणि फोटो काढून परत फिरलो. उताराला लागल्यावर मनोज-सह प्रशांत, केतन, मुक्ता थोडा वेळ वेगळ्या मार्गाने सफर करून आले... अर्थात थोडा वेळ रस्ता चुकून परत माघारी फिरले तोवर पॅट शेवटच्या टप्प्यात पोचला होता. त्याचे अभिनंदन करून उतरायला सुरुवात केली. मागून येणारे मेम्बर्स भेटले, त्यांच्याशी बोलून उताराची वाट धरली. या शिखराचा चढ जसा दम काढणारा तसाच तोच उतार पायांची ताकद आणि एकाग्रता जोखणारा. शेवट अगदी येता येत नाही.

दमून भागून खाली पोचलो...गाडी पाशी पुरंदरे, एरंडे आणि करमरकर भेटले. खाडे यांच्या हॉटेल मध्ये सगळे जमल्यावर गरम गरम भात आणि रस्सा त्या बरोबर लिंबाचे आणि कैरीचे लोणचे असा तोंडाला पाणी सुटणारा बेत फस्त केला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

मग गाडीतला “कार्यक्रम”. तो होत असताना मला “ दारू पिताना मी कोणतीच रिस्क घेत नाही” कवितेची आठवण झाली.

धृपदात बाटल्या, त्याची बुचे, फनेल सर्व जागच्या जागी होते, या कानाचे त्या कानाला सर्वच्या सर्व कळत होते..... आणि मद्य सांडायची शक्यताच नव्हती,

पहिल्या कडव्यात बाटल्यांची बुचे हिंदकळून एकमेकांना बसेनाशी झाली, या कानाचे काही बोल त्या कानाला समजेना झाले.....पण मद्याचा एक थेंबही सांडला नाही

दुसऱ्या कडव्यात पाण्यात दारू कि दारूत पाणी अशी सरमिसळ झाली, काही जीभा त्याने वळवळल्या पान या कानाचा त्या कानाला पत्ता लागला नाही..... तरी पण मद्याचा एक थेंबही सांडला नाही

तिसऱ्या कडव्यात सोडा, पाणी आणि दारू यांचे प्रमाण चुकले, मद्याचा आणि सोड्याचा हिशोब चुकला या कानाचा त्या कानाला पत्ता लागला.....पण मद्याचा एक थेंबही सांडला नाही

चौथ्या कडव्यात फनेल, बाटलीची बुचे आणि बाटल्यांनी जागा बदलली, रस्त्यावरचे खड्डे वाढले असा समज झाला, फनेल हिंदकळले आणि...आणि....आणि .........मद्याचे काही थेंब तेव्हढे सांडलेच...तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागला नाही....

कविता मात्र इथे संपली नाही त्यासाठी आणखी काही कडवी बांधली गेली अगदी सगळ्यांचे कान तृप्त होई पर्यंत!!

तर असा सर्व उपसंहार करीत रात्री पोचलो. पुरंदरे यांचे नियोजन एकदम चोख आणि सर्वांचा विचार करून केलेलं. त्यांच्या घट्ट मित्रांची साथही तितकीच भक्कम त्यामुळे अनेक अनुभवांप्रमाणे हा एक दिवस संस्मरणीय ठरला.

वरील स्फुटातील अनुभव लेखकाचे वैयक्तिक आहेत, इतर कोणास तसेच आले असतील तर निव्वळ योगायोग समजावा. या घटनेतील “ आमच्या सहित सत्पात्र” परिचय ज्यांचा आहे त्यांच्या वाचनासाठीच .........केवळ व्यक्तिगत वितरणासाठी.

कळावे राग नसावा आणि लोभ असावा व तो वृद्धिंगत व्हावा हि प्रार्थना.

सत्यजित चितळे

१५ सप्टेंबर २०२३

 

 

No comments:

Post a Comment