आळंदी- पुणे वारी २०२४- काही निरीक्षणे काही अनुभव :
-
आय टी दिंडी: गेली काही वर्षे उत्साही एक दिवसीय वारकर्यांना
पंढरीच्या वारीचा एक दिवसाचा अनुभव मिळवून देण्याचा उपक्रम करते. आय टी क्षेत्रात
काम करणारे कार्यकर्ते आपली कामे सांभाळून हि व्यवस्था करतात. या वर्षी त्यांच्या
बरोबर जायचे ठरवले. बसेस चे मार्ग, त्याप्रमाणे वारीला येणार्यांची नोंदणी आणि
त्यांचे मार्गानुसार व्होट्स अप ग्रुप्स करण्यात आले. त्यावर आलेले व्यवस्थित संपूर्ण
निरोप अगदी शिस्तीचे.
-
पहाटे ४ वाजता किमया हॉटेल पाशी जाण्यास निघालो तो
स्वप्नशिल्प मधून अजून एक ग्रुप वारीसाठी निघालेला दिसला. किमयापाशी “पहिला अनुभव
ते दशकपूर्ती करणारे” दिंडीतील वारकरी भेटले. यावर्षी आळंदी-पुणे वारीचा रविवार
आल्यामुळे असेल बहुतेक, वारजे- आळंदी रूट साठी च २५० वारकर्यांनी नोंदणी केली
होती. ठरलेल्या वेळेस बसेस आल्या. सुदैवाने बसायला जागा मिळाली आणि आळंदी कडे
प्रवास सुरु झाला.
-
मोशी – आळंदी मार्गावरून जात बस ने आळंदीच्या जवळ आम्हाला ६
वाजता आणून सोडले. आळंदी- पुणे रस्त्यावरून पुण्याकडे वारकऱ्यांचा महापूर जाताना
दिसू लागला. आय.टी दिंडीचे या वर्षीचे घोषवाक्य “ राम मंदिरी विठू पंढरी “
लिहिलेल्या टोप्या घालून आम्ही ग्रुप ने हॉटेल राजमहल कडे निघालो.
-
अजून उजाडायचे होते. झुन्जुमुजू झालेल्या आभाळात विरळ
ढगांची चादर दिसत होती. मार्गावर ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी- असलेल्या किंवा तशी
इच्छा बाळगून असलेल्यांचे स्वागत मंडप होते, त्यातील एका पाशी उभे राहून आम्ही एका गंध सेवा देणाऱ्याकडून भाळावर
चंदन-बुक्का असलेले गंध रेखून घेतले. एरव्ही मंदिरात गेलो तर माणशी ठराविक दर
लावून हे काम होते, आज त्याने
“माणशी इतके” असा हिशोब न करता दिले ते पैसे ठेवून घेतले. तसे तो कोणालाच “दर”
सांगत नव्हता हे दिसून आले.
-
राजमहल हॉटेल च्या प्रांगणात आय.टी. दिंडी तल्या वारकर्यांची
ही गर्दी. या वर्षी गेल्या वर्षीच्या दुप्पट म्हणजे १७०० लोकांनी नोंदणी केली
असल्याचे समजले.
-
नाश्त्याला पोहे आणि उपमा.....गर्दी पाहता “आणि” ची जागा “किंवा”
ने घेतली. परंतु सर्वांचा संयम आणि कार्यकर्त्यांची धावपळ यामुळे नाश्ता झाला.
दिंडीचे एक छोटे रिंगण सुरु झाले. पण गर्दीचा आवाका बघता आम्ही तिथून काढता पाय
घेतला आणि आळंदी कडे प्रस्थान केले.
-
वारीच्या मुख्य मार्गावर काही ठिकाणी मोठ्या बूम क्रेन
उभ्या केल्या होत्या, त्याच्या
टोकाशी पुष्प कलश लावले होते.
-
वारीच्या पुण्याकडे चालणाऱ्या दिंडी ज्या मार्गाने जात
होत्या त्याच्या बाजूच्या BRT मार्गाने
सुमारे दोन-अडीच किमी चालल्यावर समोरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ येताना
दिसला. आम्ही तिथेच थबकलो. एक स्थानिक भक्त भेटला. त्याला आमच्या टोप्या पाहून
कुतूहल वाटले. आमची थोडी विचारपूस झाली. त्याचे घर अगदी पलीकडेच होते. वास्तविक
पालखी सोहळ्याचे हे दिवस म्हणजे स्थानिकांना स्वच्छता आणि गर्दी यामुळे होणारी
गैरसोयच. पण त्याची भावना तशी नव्हती हे विशेष.
-
आम्ही उभे होतो तिथल्या अलीकडच्या चौकात रथ आला तेव्हा
त्यावर क्रेन मधील पुष्प कलशातून पुष्पवृष्टि करण्यात आली. एक ड्रोन कॅमेरा त्याचे
शूटिंग करीत उडताना दिसला. उपलब्ध तंत्रज्ञान वापरून केलेला हा प्रयोग बहुतेकांच्या
टाळ्या घेऊन गेला.
-
रथ सावकाश येत होता. दर्शनासाठी भाऊ गर्दी उसळली होती.
त्यामध्ये नटून थटून आलेल्या नवविवाहित जोडप्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
पालखी रथाच्या पार्श्वभूमीवर फोटो घेण्याची त्यांची धडपड दिसत होती. एखादा वारकरी
त्याच्या मित्राबरोबर टाळ कुटीत नामघोष करण्याचे रील करतानाही दिसला!
-
रथासामोरच्या दिंडी चुकून BRT मार्गाकडे वळल्या. वास्तविक रथ आमच्या समोरून, मुख्य रस्त्याने जायचा, परंतु दिंडी इकडे वळल्यामुळे रथही चुकून इकडे वळला. आमचा
पुण्यप्रभाव चांगलाच म्हणायचा असे मनात येत होते तोवरच रथात बसलेल्या मानकर्यांच्या
हा घोळ लक्षात आला. आणि मग महत्प्रयासाने रथ वळवून मुख्य मार्गावर आणण्यात आला.
-
समोरून चालणारे वारकर्यांच्या पायांचे दर्शन घेतले.
काहींच्या पायात बूट, काही चपला
किंवा सँडल्स घातलेले, काही टायरच्या
रबराच्या शिवलेल्या चपला घातलेले तर काही जण चक्क अनवाणी परंतु सर्वच पाय
चालण्याच्या वेगाची सवय असलेले आणि पंढरीच्या भेटीच्या आवेगाने पुढे जाणारे.
-
प्रत्येक दिंडीच्या अग्रभागी दिंडीचे प्रमुख ओळखता येंतील
असे, मृदुंग वाजविणारे, विणेकरी आणि टाळ करी, एखाद्या दिंडी बरोबर चालणारे
संन्यासी महंत. सहा जण- आठजण एका ओळीत चाललेले, मुखी कवने आणि भजने किंवा नुसते नामस्मरण. पखवाजाच्या तालावर येणारा टाळांचा
नाद नुसता मधुरच नव्हे तर सलग लय निर्माण करणारा होता. त्यामध्ये दंग होऊन जाणे हा
अगदीच सहज भाव.
-
रथ समोरून जाताना पालखीचे चांगले दर्शन झाले. रथाला हात
लावण्यासाठी खेचाखेच गर्दी आणि धावपळ. त्यात भरडली जाणारी कडेवरची छोटी मुले आणि
त्यांना आवरण्यासाठी रक्षकांची चाललेली धडपड बघितली. या “स्पर्धेत” यशस्वी झालेले
काही टारगट तरुण घोळक्याने येऊन एकमेकांच्या हातावर टाळी देताना पाहून वैषम्य
वाटले.
-
मग वेगाने पुढे निघालो. वाटेत वारकरी सेवा म्हणून
खाद्यपदार्थ, पाणी, चहा बिस्किटे दान देणारे अनेक हात भेटले. आपण वारकरी नाही, तर हे आपल्यासाठी नाही म्हणून हे दान टाळताना खरे तर वाईट
वाटले, अर्थात हि मदत आवर्जून
घेणारे आणि कदाचित त्यासाठी वारी करणारे अनेक असतातच. २०:८० चा नियम कुठेही लागू
होतोच.
-
दिघी पर्यंत रस्ता चांगला मोठा आहे, पुढे संरक्षण खात्याच्या जागेतून जाताना रस्ता काही अंतर
एकदम दोनच लेन चा होतो. डावीकडून वारकऱ्यांचा प्रवाह आणि उजवीकडून दिंडीच्या
व्यवस्था करणारी वाहने, पुढे जाऊन न्याहारी- विसाव्याची व्यवस्था करण्यासाठी लगबग
करणारी. त्यांच्या कचाट्यात पायी प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून जाणे खरेच. त्यातून
उलटे येणारे महाभाग असतातच.
-
वारीच्या व्यवस्थेतले ट्रक, टेम्पो दिंडीतल्या वारकर्यांच्या सामानाने भरलेले. ट्रकच्या हौद्यात दोन
मजले केलेले. दोन्ही बाजूला दिंडीच्या नावाचे फलक, डाव्या बाजूस राहुट्यांची उभट-
आडवट बांधलेली मोळी, मागच्या फळकुटावर
वर पाण्याची टाकी. फळकूट जागेवर राहण्यासाठी दोरीच्या केलेल्या शंकर पाळ्या,
त्यातून डोकावणारे दिंडीचे व्यवस्था करणारे कार्यकर्ते आणि महिला. ट्रकमध्ये चढून
जाण्यासाठी एक भक्कम शिडी, तिथेच बांधलेली असा सर्व जामानिमा. दिंडीच्या नावांचे
फलक वाचताना आपला भूगालाचा अभ्यास किती कच्चा आहे असे वाटून गेले. इतकी गावे आणि
जिल्हे जिथून हि मंडळी वारीसाठी आलेली.
-
विश्रांत वाडी जवळ बहुतेक दिंडी विश्रांतीसाठी थांबतात.
तिथे तात्पुरते उभे केलेलं काही विश्राती कक्ष. थांबलेल्या ट्रक मधून खाली संसार
मांडून येणाऱ्या दिंडी तल्या सग्या सोयऱ्या वारकर्यांसाठी थापल्या जाणाऱ्या पराती
एव्हढ्या भाकऱ्या आणि लाटल्या जाणाऱ्या तितक्याच मोठ्या पोळ्या, दिंडीचे पाण्याचे
टॅंकर, त्यातून क्वचित गळणारे पाणी भरण्यासाठी मागून येणारे कोणी बाटली धरून उभे
असलेले. “हे पियाचेच पाणी हाय नव्ह?” अशी पृच्छा करणारी एक दुसऱ्या दिंडी मधली
महिला आणि “होय माऊली” हे त्या दिंडीच्या मदतनीसाचे हसून उत्तर, पाण्याविषयी थोडी
असलेली जागृती दाखवणारे. एका दिंडीच्या विश्रांती च्या ठिकाणी चक्क ८ बर्नर असलेली
चांगले जुगाड असलेली गॅस ची शेगडी सुद्धा बघितली.
-
दिघी गावाशी एका स्वागत कक्षाशी लावलेल्या स्पीकर वर टाळ
मृदुंगाच्या तालावर ठेका धरून नाचणारे वारकरी आणि फुगडी खेळणाऱ्या महिला, सगळेच
त्या रसात रंगलेले - दंग झालेले. थोडी वामकुक्षी झाल्यावर घोळक्याने बसून भजनच्या
तालात रंगलेले दिंडीतले वारकरी.
-
इतके श्रम झाल्यावर थोडा विसावा घेण्यासाठी घातलेले
प्लास्टिक/ कागदाचे अंथरूण आणि पद-पथाची उंची एकदम उशीच्या उंचीशी जुळवून निवांत
झोपी गेलेले वैष्णव, जाड उशीची सवय
असलेला कोणी डोक्याखाली पाण्याची बाटली घेऊन झोपलेला अतिशय समाधानी भाव चेहऱ्यावर
विलसत असलेला.
-
विश्रांत वाडीच्या पुढे चर्मकार संघातर्फे घातलेला मोठा
मंडप दिसला. आपल्या हस्त कौशल्याचा उपयोग थेट सेवा म्हणून करण्याचा आणि ती सुद्धा
विनामूल्य करण्याचा हा उपक्रम विशेष स्तुत्य वाटला.
-
अश्याच एका ट्रकवर “लाखा कोल्हाटी महाराज दिंडी” असा फलक
वाचला. डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या पुस्तकामुळे कोल्हाटी या समाजाविषयी जुजबी
माहिती असल्यामुळे कुतूहल चाळवले. चौकशी करायला वेळ नव्हता त्यामुळे पुण्यात
पोचल्यावर इंटर नेट वर शोधाशोध केली. जगन्नाथपुरी च्या संत लाखा कोल्हाटी यांच्या
चरित्राविषयी माहिती मिळाली. डोंबारी असलेल्या लाखा कोल्हाटी महाराजांविषयी
ह.भ.प.दत्तदास घाग यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकायला मिळाले आणि संत दासगणू
महाराजांनी अभंग स्वरुपात लिहिलेले त्यांचे चरित्र वाचायला मिळाले. अत्यंत गरीब
आणि हलाखीच्या परिस्थितीत असूनसुद्धा संत लाखा कोल्हाटी यांनी आपला डोंबार्याचा
व्यवसाय केवळ परमेश्वराची सेवा म्हणून केला. जगन्नाथ पुरीच्या या संतांचा कालखंड
मात्र कुठे वाचायला मिळाला नाही. तसेच इतक्या दूरच्या संतांची परंपरा
महाराष्ट्रातल्या संत परंपरेशी इतकी जवळीक ठेवून कशी हा प्रश्न माझ्या मनात अजून
अनुत्तरीत राहिला आहे. तसे पाहता परमेश्वराच्या कोणत्याही रूपाची मनापासून भक्ती
करण्यासाठी कोणत्याही व्युत्पन्न स्थितीची किंवा विशेष शास्त्र विद्या निपुणतेची
गरज नाही. विठ्ठल हा देव सुद्धा कोणत्याही विशिष्ट उपचाराने खूष होणारा नाही.
साहजिकच समाजातल्या सर्व थरात आणि वर्णात त्याचे निस्सीम भक्त शतकानुशतके निर्माण
झाले आहेत.
-
वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी डोक्यावर मडक्यांची चवड
तोलून धरत दोरीवर तोल सावरत कसरत करणारी डोम्बार्याची चिमुकली मुले खेळ करताना
दिसली. डोम्बार्याच्या ढोलक्याची जागा आता कर्ण्यावर वाजणाऱ्या ध्वनिमुद्रित
केलेल्या फिल्मी गाण्यांनी घेतली असली तरी आपल्या पोटच्या गोळ्या वर बारीक लक्ष
ठेवणारी त्याची नजर मात्र बदलू शकलेली नाही. एकीकडे मदतीसाठी ठेवलेला थाळ आणि
त्यात लोकांनी दिलेली ....भिक्षा....भिक्षाच म्हणायची. आपला तोल गेला तरी आपल्याला
आपला बाप झेलून घेईल या विश्वासाने आणि हाती असलेल्या जाडसर बांबूने तोल सावरत ती मुले
एकाग्र् होऊन कसरत करत होती. कुठे तरी वाचलेली डोम्बार्याची कथा एकदम आठवून गेली.
रोजचे धकाधकीचे जीवन जगत असलेल्या यातील अनेक किंबहुना आपल्या सहित सर्वांचीच
रोजची कथा हि कदाचित दोरावरच्या तोल सांभाळण्याच्या कसरती सारखीच. धकाधकीत तोल जाऊ
नये म्हणून असलेला नामस्मरणाचा आणि यम नियमांचा बंध आणि आपल्याला झेलून घेईल अशी
विठू माउली वरची श्रद्धा यातली कोणतीही एक गोष्ट जरी बाजूला काढली तर या म्हणजेच
आपल्या सर्वच समाजाचा तोल लगेचच जाईल हे निश्चित. केवळ बुद्धीप्रमाण्याने विचार
केला तर केवळ वेडेपणा वाटावा असा हा वारीचा नेम, त्यातील हाल अपेष्टा, गैर व्यवस्था
आणि वारी पूर्ण करण्यासाठी असलेल्या सर्व यम-नियमांचा हा सामाजिक बंध या
डोम्बार्याच्या खेशी असलेल्या साधर्म्याने सहज लक्षात आला हे या वर्षीच्या एक
दिवसीय वारीचे माझ्यासाठी असलेले फलित.
कृष्णार्पण .......
सत्यजित चितळे
पुणे
No comments:
Post a Comment