गजबजलेल्या पुण्याची तुलनेने नवीन औद्योगिक वसाहत तळेगाव- चाकण. जुन्या मुंबई
पुणे रस्त्यावरून उजवीकडे तळेगावातून चाकण कडे दुपदरी रस्ता जातो. कंपन्यांची गजबज
नव्हती आणि त्यामुळे वाहनांची लगबग नव्हती त्यावेळेस या रस्त्याने अगदी सुखाने
प्रवास करता येत असे. उण्यापुर्या २२ किमी चे तळेगाव चाकण अंतर तेव्हा संपता संपत
नसे ते इथल्या तुरळक रहदारी चा अंदाज न आल्यामुळे आणि आता ते संपत नाही वाढलेल्या
रहदारीमुळे.
तळेगाव कडून चाकण कडे निघालो कि पहिले लागते इंदुरी, पुढे डावीकडे भंडारा
डोंगर आणि नंतर येतो सुदुम्बरे गावाचा फाटा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी
यांनी पुरस्कृत केलेल्या संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत हे गाव तत्कालीन खासदार
अॅड.वंदनाताई चव्हाण यांनी दत्तक घेतल्याची माहिती नेट वर मिळते.
तसे गावात शिरणारा रस्ता चांगला आणि मोठा. रस्त्याच्या दुतर्फा नवीन चकचकीत
बैठी आणि दुमजली घरे, पंचायत समिती सदस्यांच्या घराकडे दिशा दाखवणाऱ्या पाट्या, काही भू-विकासकांची कार्यालये मागे टाकत गेले कि संत संताजी जगनाडे महाराज समाधी चा फलक
लागतो.
संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकाराम आणि छत्रपती शिवरायांचे यांचे
समकालीन संत. त्यांचे जन्म आणि वास्तव्याने पावन झालेली हि भूमी. पापनाशिनी नदी (?)किंवा ओढाच म्हणा, त्याच्या पात्राच्या पुढच्या तीरावर संत संताजी महाराज
जगनाडे यांची समाधी आहे तर अलीकडच्या तीरावर संत गवार शेठ महाराजांची. दोघेही
समकालीन संत. संत गवार शेठ महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे बरोबर टाळकरी
म्हणून गावोगावी कीर्तन करण्यास जात असत अशी माहिती मिळाली. किमान पाच सहा शतकांचा
ज्ञात इतिहास लाभलेल्या या गावाला अशी थोर संत परंपरा लाभलेली आहे. नवलाख उंबरे
गावाजवळ उगम पावणाऱ्या आणि आता जाधववाडी धरणातून प्रसवणार्या सुधा नदीचा सुदुंबरे
गावात पापनाशिनी नदीशी संगम होतो आणि मग पुढे त्या इंद्रायणी नदीस मिळतात. इंटर
नेट वर मिळणारी माहिती आणि नकाशाच्या उंच सखल पणाचा अभ्यास केल्यावर दोन्ही
नद्यांची खोरी दिसतात पण नकाशावर पापनाशिनी नावाच्या नदीचा उल्लेख गाळण्याचे महत्पाप
कोणीतरी केलेले दिसते. किमान नेट वर दिसणाऱ्या नकाशात दोन्ही नद्यांची नावे नसली
तरी वर्णने मात्र जुळणारी आहेत. तर अशी हि मावळात वसलेली पुण्यप्रद ग्रामभूमी, आता
वेशीला आधुनिक उद्योगांचे महाकाय प्रकल्प
भिडलेली.
संत गवारशेठ महाराज यांच्या समाधी मंदिराकडून उजवीकडे एक रस्ता जातो तो थेट चढ
चढून ठाकर वस्ती कडे. सुदुंबरे गावाच्या पूर्वेस वसलेल्या मुरमाड पांढरी वर हि
ठाकर वस्ती आहे. वस्तीच्या पश्चिमेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समोर विस्तीर्ण पटांगण. इथे उभे राहिल कि खाली सुदुंबरे
गावातील सुपीक शेती आणि त्यापालीकडून येणारे सिमेंट कॉंक्रीटचे आक्रमण आणि पूर्वेस
मोठ्या उद्योगांच्या शेड्स नजरेस पडतात. ठाकर वस्ती मधून जाणारा रस्ता पुढे जाऊन
औद्योगिक वसाहतीत पोचतो पण तो अजून थोडा आडबाजूचा असल्यामुळे रहदारीचा नाही.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हि ठाकर वस्ती म्हणे खाली गावाजवळच होती. नंतर कधी
तरी गावातील “हुश्शार” लोकांनी ठाकर लोकांना घरासाठी स्वत:च्या हक्काच्या जमिनीचे
स्वप्न दाखवून स्वत: काळ्या जमिनी पटकावल्या आणि ठाकरांना इथे उन्चीवरल्या मुरमाड
जमिनी गुंठा- दीड गुंठा त्यांच्या नावे करून दिल्या अशी काहीशी माहिती-कथा ऐकायला
मिळाली. वस्तीत मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता, इथल्या खंगलेल्या पुरुष मूर्ती
पहिल्या कि याची खात्री पटावी. घरांचा मुख्य आधार घर चालवणाऱ्या महिला, रोजगाराचे साधन मोठ्या प्रमाणावर शेत मजुरी, थोड्या प्रमाणात औद्योगिक मजुरी. याला जगण्याचे “साधन”
म्हणावे कि जगण्याचा “आधार”.....यावर खरोखर विचारच करावा लागेल.
दहा महिन्यांपूर्वी इथे गेलो तो प्रौढ साक्षरता वर्गाचे उद्घाटन या
निमित्ताने. आंबेगाव तालुक्यातील आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्राच्या
संयोजनातून गावोगावी प्रौढ साक्षरता वर्ग चालवले जातात. २०२३ मध्ये त्यांनी या
ठाकर वस्तीत एक वर्ग चालवायचे ठरवले. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड तर्फे दोन
साक्षरता वर्गांना मदत द्यायची ठरली आणि त्यातला एक या इथल्या ठाकर वस्तीतला आणि
दुसरा आंबेगाव तालुक्यात कोळवाडी इथला असे ठरले. १३ ऑगस्ट २०२३ च्या सकाळी ठाकर
वस्तीततल्या समाज मंदिरात या वर्गाचे उद्घाटन झाले तेव्हा इथे जमलेल्या महिलांच्या
चेहऱ्यावर थोडेसा अविश्वास आणि थोडेसे कुतूहल असे भाव होते. वस्तीत जागृतीचे काम
करणारे कॉ. गणेश दराडे आणि त्यांच्या पत्नी, आदिम संस्कृती संस्थेचे कॉ. अमोल वाघमारे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी
असलेल्या ओळख व जवळीकी मुळे या महिला किमान तिथे एकत्र तरी झालेल्या होत्या.
साक्षरता म्हणजे काय, ती कशासाठी
असे प्रश्न त्यांनी न विचारताच आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर वाचता आले होते.
वस्तीत या महिला सोडून सगळेच शिक्षित आणि गाढे विद्वानच असावेत असा इतर लोकांचा
वावर मात्र अस्वस्थ करणारा होता.
इथून मग घोडेगाव जवळच्या कोळवाडी कोटमदरा इथे दुसऱ्या वर्गाच्या कार्यक्रमास
गेलो. घोडेगाव पासून दक्षिण पश्चिमेस जाणारा रस्ता सह्याद्रीच्या मुख्य डोंगर
सोन्देमुळे जिथे संपतो तिथले एक गाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं सात आठ वाड्याचे मिळून
बनलेलं, पावसाचे दिवस असल्यामुळे भाताची लावणी शेता शेतातून सुरु झालेली. भात खाचराच्या
बांधावरून चालत जाऊन पलीकडे असलेल्या शाळेत उद्घाटनाचा छोटासा आटोपशीर कार्यक्रम
झाला. इथे कार्यक्रमास उपस्थित महिला गावातील जरा सधन कुटुंबातल्या असाव्यात परंतु
त्यांच्या चेहऱ्यावर देखील तसाच अविश्वास आणि कुतूहल वाचायला मिळाले होते. दोन्ही
ठिकाणी साक्षरता वर्ग घेणाऱ्या उत्साही तरुण विद्यार्थिनीनी कार्यक्रमाचे संयोजन
चांगले केले होते.
या दोन्ही वर्गात शिकून सवरून नाव-साक्षर झालेल्या महिलांना पदवी प्रशस्तीपत्र
देण्याचा आणि त्यांचे आणि वर्ग घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा कौतुक कार्यक्रम १६ जून
२०२४ रोजी सुदुंबरे इथे ठाकर वस्तीत झाला. मधल्या दहा महिन्यांच्या कालावधीत
इथल्या शाळेस RPG लाईफ सायन्सेस तर्फे
पाण्याची शुद्धीकरण यंत्रणा आणि मैदानावर कार्यक्रम घेण्यासाठी छत असलेले स्टेज
बांधून दिले गेलंय, त्या स्टेज वर हा कार्यक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी आयोजित
केला होता. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमास जाणे शक्य होणार नाही म्हणून एकच कार्यक्रम झाला
आणि त्यासाठी कोळवाडी इथून पदवी प्राप्त महिला इथे वाहन करून आल्या होत्या. दोन्ही
साक्षरता वर्गातून गेल्या दहा महिन्यात ३४ महिला नाव-साक्षर झाल्या. त्यांच्या
पैकी २० जणी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या होत्या. गावोगावी चालवल्या जाणाऱ्या
अश्या साक्षरता वर्गातून गेल्या काही वर्षात ६०० महिलांना साक्षर करण्यात यश आले
आहे.
शाळेच्या पटांगणात ठरल्या वेळेच्या आधी अर्धा तास पोचलो तेव्हा या वर्गाच्या
मार्गदर्शिका आणि महिलांची कार्यक्रमाची व्यवस्था करण्याची गडबड सुरु होती.
शाळेच्या एका अंगाला वस्तीतील काही तरुण मुले घोळका करून आपापले मोबाईल फोन पाहत
बसलेली होती. कॉ गणेश यांचेबरोबर संवाद झाला. इथली व्यसनाधीनता, त्याने पोखरलेला तरुण वर्ग, त्यातून असलेली निष्क्रियता या बद्दल त्यांच्या कडून विदारक माहिती कळली. “
मी इथल्या तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय गेली तीन वर्षे पण कोणी जवळ फिरकत
नाही” हि त्यांची मनापासून असलेली खंत काही दाहक वास्तव सांगून गेली.
आमच्या क्लबचे माजी अध्यक्ष रो. उज्ज्वल तावडे या पाऊणशे वर्षाच्या उत्साही
तरुणांच्या संपर्कातून हा उपक्रम साकारला होता. व्यासपीठावर उज्ज्वल सर, क्लबचे माजी अध्यक्ष रो. प्रशांत सिद्ध, रो. सुहास पटवर्धन, रो. हेमचंद्र दाते, मी स्वत: आणि
कॉ. गणेश दराडे असे सर्व जण, समोर सगळ्या
नाव-साक्षर महिला खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी. क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात
झाली.
स्वागत, सत्कार झाल्यावर काही
महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्वच महिल्या मागच्या पिढीतल्या. घरची
गरिबी, प्रथेनुसार लवकर झालेले विवाह आणि माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी असलेली
शिक्षण या विषयीची अनास्था यामुळे त्यांना अक्षर ओळख नसलेली. जग वेगाने पुढे जात
असता, एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी आलेल्या बस वरची पाटी सुद्धा न वाचता
येण्या इतकी नामुष्की. रोजचा दिवस रोजंदारीवर काम करून कसाबसा घालवणे इतकेच
वर्तमान असलेल्या या महिलांच्या दृष्टीने रोजचे वर्तमान पत्र वाचणे हा काही आवश्यक
भागच नव्हता कधी. हिशोब कळत असला तरी बँकेचे व्यवहार करता येत नाहीत कारण
सहीसुद्धा न करता आल्यामुळे त्यांना कोणी हिशेबात धरलेले नाही. स्वाभाविकच
स्वभावात तयार होणारा न्यूनगंड आणि त्यातून गमावलेला आत्मविश्वास हे उद्घाटनाच्या
दिवशी दिसलेले चित्र आज बदललेले दिसले.
अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर येऊन सांगितले.
सर्वांसमोर येऊन बोलण्याची हि पहिलीच वेळ, हे वाक्य तर प्रत्येकीचे पहिले वाक्य
होते. या साक्षरता वर्गाला सुरुवात झाली तेव्हा वीस- पंचवीस महिला होत्या, त्यातल्या काही घरच्या विरोधामुळे गळाल्या असे त्यांच्या
बोलण्यात आले. रोजचा धकाधकीचा दिनक्रम, घरची कामे, शेतीची कामे अशी सर्व करून घरच्या आणि दारच्या लोकांचे
टोमणे आणि विरोध सहन करीत थकलेल्या भागलेल्या स्थितीत रात्रीचा अर्धा-पाउण- एक तास
धुळाक्षरे गिरवणे, मग हळू हळू शब्द आणि वाक्य लिहिणे हे त्यांच्यासाठी खूप मोठे
काम होते. काम नाही केलं तर खाणार काय? हि पोटाची
व्यथा त्यातील एकीने बोलून दाखवली. तो
विरोध डावलून नेटाने ज्यांनी हा ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना आम्ही
“पदवीधर” हा सन्मान दिला.
विशेष जाणवला तो त्यांच्या आत्मविश्वासातला बदल. आपणही सुसूत्र बोलू शकतो, अनोळखी व्यक्तींशी व्यवस्थित संभाषण करू शकतो, ते आपले ऐकतील या विश्वासाची ज्योत त्यांच्या मनात
प्रज्वलित करण्याचे काम या साक्षरतेच्या अभियानाने केले हे नक्कीच. त्या त्या
ठिकाणच्या कार्यकर्ती महिलांच्या मागे लागून या महिला अधिक शिकतील हे नक्की.
या महिलांच्या मागे लागणे, अक्षरश:
त्यांच्या घरी जाऊन त्यांना गोळा करणे आणि शिकवणे. त्यातल्या काही सख्ख्या तर काही
गोतावळ्यातल्या, सग्या-सोयर्या. परंतु
त्यांच्या प्रतिक्रियेची पर्वा न करता त्यांना आग्रह करून हाताला धरून शिकवणे हे
अवघड काम करणाऱ्या कोळवाडीच्या स्वयंसेविका सुप्रिया मते आणि सुदुंबरे च्या अर्चना
जाधव आणि सोनाली मेंढाळ यांचे अनुभव
सुद्धा अचंबित करणारे होते. काना, मात्रा आणि
वेलांटी...तशी समजायला सोपीच कि. पण वयाच्या पन्नाशी- साठी नंतर ती समजावी कशी? मग वेलांटी म्हणजे डोक्यावरचा पदर, काना म्हणजे हातातली काठी अशी उपमा देऊन शुद्ध लेखन शिकवणे
आणि समजावून देणे अशी कल्पकता या तिघींनी दाखवली आणि इतक्या सगळ्या जणींना
सावित्रीच्या लेकी हा बहुमान प्राप्त करून दिला हे खरोखरंच विशेष.
सरकारी योजना आणि त्यावर होणारा खर्च, त्यातून होणारा सकारात्मक परिणाम याची
चर्चा कायमच होत असते. सरकारी प्रौढ साक्षरता अभियान सुद्धा त्यातून सुटलेले नाही.
एक खरे कि सरकारने कितीही योजना राबवल्या तरी समाजाशी नाळ जोडलेले तळमळ असलेले
समर्पित कार्यकर्ते अश्या सरकारी योजना कधीच उभे करू शकणार नाहीत. अश्या
कार्यकर्त्यांची फळी उभी करणाऱ्या आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मान विकास
केंद्राचे हे वैशिष्ट्य आहे.
इथल्या पुढच्या पिढीत किमान साक्षरता पोचली आहे हे इथल्या वातावरणातून दिसत
होते, परंतु शिकूनही ज्ञानाची
असलेली उपेक्षा मात्र अस्वस्थ करणारी आहे. हि मरगळ, अनास्था या ज्येष्ठ महिला
साक्षर झाल्यामुळे कमी होईल का? हा प्रश्न मला पडला. तसे आधी इतरत्र जिथे वर्ग
झाले तिथे काही प्रमाणात झाले असा इथल्या कार्यकर्त्यांचा अनुभव सांगतो.
कार्यक्रम संपता संपता मघाशी मोबाईल शी खेळणारे तरुणांचे टोळके उगाचच कॉमेंट
मारत आमच्याकडे पाहत टवाळी करत निघून गेले. कोणाच्या तरी घरचा बाप्या मोटर सायकल
वर बोलवायला आला. काही कार्यक्रम सुरु आहे याची पर्वा न करता “ मी जाऊ का पुढे”
असा प्रश्न करीत त्याने एका महिलेला कार्यक्रम सोडून जाण्यास भाग पडले. ती बिचारी
चालत निघाली आणि तो मात्र मोटर सायकल उडवीत गेला. हे वास्तव मात्र नजरेतून सुटले
नाही. कॉ गणेश आणि अर्चना यांचा संवाद सुरु होता. तिथे त्यांनी सुरु केलेल्या
वाचनालयाचा उपयोग स्थानिक तरुण करून घेत नाहीत हा तिचा अनुभव देखील अस्वस्थ करणारा
होता. कोणत्याही चांगल्या सामाजिक बदलाची सुरुवात काटेरी असते हेच खरे.
आज जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग
या विषयावर तासंतास चर्चा घडते, या विषयात
उत्तम काम करणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि
त्यांना भरघोस आर्थिक मदत पुरवू शकणारे मोठाले उद्योग जिथे आहेत, शिक्षणाचे माहेर घर हि पदवी ज्या शहराला दिली गेली आहे
तिथून केवळ पन्नास किलोमीटर दूर साधी अक्षर ओळख नसलेले समाजातील घटक आपला
उदरनिर्वाह करीत जगत आहेत हे वास्तव तरी किमान सर्वांनी लक्षात घ्यावे. जमिनीचा
वाढणारा औद्योगिक किंवा रहिवासी वापर आणि त्यातून नजीकच्या भविष्यात नाहीशी होऊ
घातलेली इथली शेती. शेत कामाशिवाय इतर कौशल्य विकसित न झालेले आणि शिक्षण
नसल्यामुळे वाट खुंटलेले इथले ठाकर लोक, त्यांच्या भविष्यात शिक्षणाच्या वाटेवरचे
दार किलकिले करण्याचे सामर्थ्य अश्या उपक्रमात आहे.
म्हणूनच असे वाटून गेले कि आम्ही खरेतर गेलो होतो पदवी “ दान” करायला, पण
त्यांनी त्यांच्या कष्टाने शिक्षणाची हि पहिली पायरी ओलांडून साक्षरतेची पदवी आधीच
“ग्रहण” केली होती. त्यांच्या जिद्दीला प्रणाम.
रो. सत्यजित चितळे,
१८ जून २०२४
No comments:
Post a Comment