हरिश्चंद्र गड- कोणी तरी आहे तिथे
ऐन उन्हाळ्याचे दिवस. त्यात हरिश्चंद्र गड भटकंती, समर्थ ने जेव्हा विचारणा
केली तेव्हा जरा दडपणच आले. चौकशी केली. सह्याद्री ट्रेकिंग फौंडेशन च्या गिरीश
कुलकर्णी कडून पाचनई गावच्या भास्कर बादड यांचा फोन नंबर मिळाला. “गडावर पाणी आहे
का?” या यक्ष प्रश्नाला “निवांत
या, भरपूर पाणी आहे” असे
त्याचे उत्तर आले आणि ट्रेक ठरला. ईशान, त्याचे मित्र सिद्धांत, तनय, युवान आणि युवानचे वडील समर्थ आणि मी असे सहा जण गाडीने
जाण्याचे पक्के केले.
४ मे गुरुवारच्या दुपारी कामे आवरून पुण्याहून निघालो. वर्दळीच्या आणि बेशिस्त
नाशिक रस्त्यावरून गाडी हाकत बोटा च्या अलीकडे ब्राह्मणवाडा फाटा गाठेपर्यंत हळू
हळू अंधार पडला. गुगल ने केलेल्या क्रांतीमुळे हम-रस्ता सोडण्याचे नेमके वळण कुठून
घ्यायचे हे विचारावे लागणार नव्हते. तरी त्या वळणावर असलेल्या एका “चा” च्या
दुकानाबाहेर उभ्या एका बाप्याला विचारून खात्री करून घेतली आणि गाडी कोतूळ कडे
वळली. सामान आणि माणसे ठासून भरलेल्या आमच्या गाडीत पोरांच्या गप्पा ऐकण्यात आमचा
चांगला वेळ जात होता. रस्ता जेमतेम दुपदरी आणि आम्ही त्यासाठी नवखे, डांबर कुठे
संपते आहे याची खूण रात्री पटू नये म्हणून त्यावर कडेचे पांढरे पट्टे हट्टाने
मारलेले नसले तरी खडखडाट नसल्यामुळे प्रवास बर्यापैकी सुखाने सुरु होता. रस्त्याला
असलेली वळणे आणि फुटणारे असंख्य फाटे यातून गुगल ने शिताफीने आम्हाला वाट काढून
दिली आणि फोनची रेंज जाऊनसुद्धा आम्ही व्यवस्थित भास्कर च्या घरासमोर रात्री ९
च्या सुमारास पोचलो.
समोर तिन्ही दिशांनी डोंगराची फक्त आकृती दिसत होती. चंद्र त्यामागे होता
त्यामुळे खोली चे परिमाण गायब झाले होते. द्विमित असे ते डोंगर अंगावर येत होते.
दोन दिवस आधी भास्कर ला पाठवलेल्या मेसेज वर विसंबून तो बहुधा आमची वाट पाहत होता.
घडीव फरसबंदीच्या ऐसपैस जोत्यावर बांधलेले दुमजली घर, त्याला लागून पडवी, तिथेच बाहेर ट्रक्टर ला जोडायची अवजारे, दोन मोटारसायकल, एक गाडी, समोर मोट्ठे पटांगण, पटांगणाच्या
एका अंगाला वाळलेल्या गवताच्या पेंढ्या आणि त्यातून विखुरलेले गवत. बहुदा खळ्याची
जागा असावी. त्या पटांगणात कुठेही गाडी लावा, भास्कर म्हणाला. आम्ही तंबू आणले
आहेत असे सांगताच ते त्या पसरलेल्या गवतावर लावा अशी सूचना त्याने केली.
नवख्यांचे भुंकून स्वागत करणाऱ्या काळ्या बाळ्याने आमची थेट मालकाशी असलेली
सलगी पाहून आमच्याशी सलगी करण्याचे धोरण स्वीकारले. आणि ते दोघे आमच्या आसपास भटकू
लागले.
दहा-वीस मिनिटात दोन तंबू उभे करून आम्ही भास्करच्या घराच्या पडवीकडे मोर्चा
वळवला. छान सारवलेल्या भुईवर कांबळे
अंथरलेले आणि जेवणासाठी पत्रावळी मांडलेल्या. भास्कर च्या आईने भोकराच्या कोवळ्या
पानाची पीठ पेरून केलेली चवदार भाजी, खरपूस भाकरी
आणि पिठलं असा मस्त बेत फस्त करून हात धुवायला उठलो तो त्याचा पोरगा हातात मोबाईल
चे खेळणे वागवत चुलीजवळ आला. फोनला रेंज नाही तर तू मोबाईल चे काय करतोस? असा
प्रश्न समर्थने विचारला. रेंज नसली तरी मोबाईल वर गेम खेळता येतात हे यांना माहित
नसावे असे वाटून त्याने उत्तर दिले. “आतापर्यंत तरी हे लोकं सुखी होते, आता पुढे
काय” असे मनाशी म्हणत हात धुवायला उठलो.
तंबूत जाऊन पडलो आणि आभाळाकडे नजर टाकली. उन्हाळा असल्यामुळे तंबूचे आउटर
कव्हर आणलेच नव्हते. डोक्यावरच्या जाळीतून वर पाहता ढगांच्या पिंजलेल्या कापसामागे
चंद्र लपलेला दिसला. बौद्ध पौर्णिमेच्या आदल्या रात्रीचे पिठूर चांदणे नशिबात
नव्हते. रात्रीत मध्येच पाऊस आला तर काय करायचे? भास्करला रात्रीत कसे उठवायचे? या
आमच्या वायफळ प्रश्नांना वाऱ्यानेच उत्तर दिले. डोळा लागतो न लागतो तोच पावसाचे
दोन तीन टपोरे थेंब आमच्यावर बरसते झाले. क्षणाचाही विलंब न करता तंबू उचलून आम्ही
पडवी कडे धावलो. पावसाच्या सरीने तोवर चांगलीच झोड उठवली. भास्कर बहुधा जागाच
होता. भिजणारे तंबू तसेच बाहेर ठेवून आम्ही त्याच्या घराच्या पडवी चा आसरा घेतला
आणि पथारी पसरून झोपेच्या आधीन झालो.
खुराड्यातल्या कोंबड्याचे घड्याळ बहुदा बिघडले असावे, तो बिचारा पहाटे अडीच वाजताच उठला आणि त्याने आरवायला
सुरुवात केली. पाठोपाठ काळू-बाळू चे कोणा जात भाई बरोबर बिनसल्यामुळे त्यांच्यात
कलह सुरु झाला आणि त्याची वार्ता आमच्या पर्यंत त्यांच्या जोर जोरात भुंकण्यातून
पोचली. चार भिंतीत गादीवर सुरक्षित झोपण्याची सवय असलेल्या आमच्या शहरी पोरांची
त्यामुळे चांगलीच झोपमोड झाली.
पहाटे उजाडले, रात्री
पावसाने आमची त्रेधा उडविली आणि तो लगेचच थांबला. पण त्यामुळे तंबू ओले झाले होते.
ते आवरले, गरम गरम पोहे आणि चहाचा
आस्वाद घेतला आणि गडाच्या दिशेने निघालो. आता चांगलेच उजाडल्या मुळे दिशाज्ञान
झाले होते. काल भिंतीप्रमाणे भासलेली डोंगर रांग खरोखरच कातळ भिंत बनून तीन
दिशांचे क्षितिज व्यापून उंच उभी होती. पाचनई च्या दक्षिणेला गडाकडे जाणाऱ्या
वाटेवरची खिंड दिसत होती. आणि पश्चिमेला ढगाने वेढलेले नाफ्था चे शिखर दिसत होते.
गडाची वाट सुरु होते त्याच्या आधी उजव्या बाजूस मोठी गाव-विहीर, तिथे पाण्याचे
हंडे घेऊन गावातल्या स्त्रियांची गर्दी झालेली. इथून ट्रेक करणारे बरेच असल्याने
त्यांना आम्ही आल्याबद्दल अप्रूप नव्हते. चढाई सुरु होते तिथे मोठी कमान, कॉंक्रीट
मधून झाडाच्या बुंध्याचा आकार करून बांधलेली. डावीकडे हरिश्चंद्र गड- कळसुबाई
वनक्षेत्रात वावरताना पाळावयाच्या नियमांची बहुदा कोणी न वाचतील अशी भली मोठी
यादी. पायी-रस्ता चांगला रुंद, मातीत
केलेल्या दगडांनी बांध अडवलेल्या पायऱ्यांची वाट. पहिला टप्पा छोटा, त्यावर
आल्यावर “सनराईज हॉटेल” नावाचे इथल्या परिसराशी नाव न जुळणारे एक हॉटेल, थोडेसे
पठार आणि मग झाडीतून चढणारा रस्ता. थोडा अंगावरचा, एक दोन ठिकाणी आधारासाठी भक्कम लोखंडी कठडा लावलेला.
तिथे मान वर करून पाहतो तो आधी वर निघालेले गावकरी दिसले. ‘फारशी उंची नाही
गाठायची आपल्याला’ असे म्हणत पाय रेटले. थोड्याच वेळात तो टप्पा पार करून डोंगर
कड्या लगत वळून जाणारी वाट धरली. मंगळगंगेच्या ऐन धारेमुळे तयार झालेली दोन डोंगर धारांमधील
घळच पण भली प्रशस्त. डावीकडच्या डोंगर कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याने पायाशी आदळून
तिथला मुरूम खणून वाहून नेलेला, त्यामुळे निर्माण झालेली सपाटी आणि नैसर्गिक
गुहेसारख्या जागा. रस्ता इथून एक सुरेख वळण घेत पुढे डोंगर माथ्याकडे जातो. मग एक
लोखंडी पूल, पावसाळ्यात या ओढ्याला
किती पाणी येत असेल याची कल्पना यावी म्हणून उंच बांधलेला. तो ओलांडला कि पुन्हा
झाडी आणि मग कातळात पाण्याच्या भोवर्याने खणून काढलेली काही कुंडे. त्यात साठून
राहिलेले काळपट पाणी, त्यावर तरंगणाऱ्या
पाण-निवळ्या. या कुंडात खोलीचा अंदाज न आल्यामुळे जीवित हानी झाल्याची माहिती
देणारा फलक आणि इथे नक्की जनावरे पाणी प्यायला येत असतील असे मनातले विचार... हे
सर्व मागे टाकत जरा चढून जातो तो दुरून हरिश्चंद्रेश्वराच्या कळसाचे दर्शन झाले. “आलो
कि आपण, किती सोपा रस्ता आहे हा! “ असे म्हणत पुढे निघालो. एरव्ही खिरेश्वराच्या
मार्गाने टोलार खिंडीतून इथे यायला दोन अडीच तासाची पायपीट करावी लागते.
त्यामानाने हा मार्ग फारच सोपा आणि अगदी जवळचा, सुखकरच.
तारामती शिखराच्या कंबरपट्ट्यात खोदलेल्या विहाराच्या गुहा आणि त्याच्या
थोड्या खालच्या उंचीवर एकमेकाला चिकटून असलेली हॉटेल्स ची रांग, अगदी डावीकडून
उजवीकडे पसरलेली, तिथे पोचलो. चार चांगले
खांब आणि त्यावर उतरते छप्पर, कुडाच्या भिंती, सगळीकडून हिरव्या शेतीच्या कापडाने
झाकलेल्या, फ्लेक्स क्रांती मुळे प्रत्येकाचे नाव, प्रोप्रा. चे नाव आणि फोन नंबर व्यवस्थित छापलेला, एकाच आडनावाचे आणि
वेगवेगळ्या नावाचे भाऊबंद. या हॉटेल्सच्या संख्येवरून इथे सिझन मध्ये येणाऱ्या
ट्रेकर्स च्या संख्येचा अंदाज घ्यावा. बहुतेक हॉटेल्स ची नावे अगदी मराठमोळी, एखादेच खास इंग्रजी नाव, पण त्यातून इथे घडणाऱ्या बदलांचा
अंदाज यावा.
उजवीकडे हरिश्चंद्रेश्वर, त्याच्या
डाव्या अंगाला पुष्करणी तलाव, देवतांच्या
मूर्तींसाठी असलेले १४ कोनाडे, त्यातील
सर्वात डावीकडे बहुतेक भगवान महावीरांची किंवा विष्णूची मूर्ती, मधले काही गाभारे
रिकामे आणि एकदम उजवीकडे शंकराची पिंडी. देवतांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यावर
ओघळणारे तीर्थ वाहून जाण्यासाठी पायथ्याच्या चौथर्यातून नीट कोरून काढलेला मार्ग
त्या काळातल्या नीटनेटकेपणाची साक्ष देणारा. उन्हाळ्यामुळे पुष्करणी ची पातळी खाली
गेलेली होती आणि त्यात भरपूर शेवाळे तयार झालेलं दिसले.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या पूर्वेला एक कोरीव शिवमंदिर आहे. तिथली शंकराची
पिंड लहानशी पण पाण्यात बुडालेली आहे, नितळ पाण्यात
खाली पिंड छान दिसते.
मुख्य मंदिराच्या शाबूत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ काही मूर्ती, काही
व्याघ्रमुख शिल्पे, जरी जवळ जवळ ठेवलेली असली तरी त्याची झालेली वेगवेगळी झीज
पाहता निश्चितच वेगवेगळ्या कालखंडात घडविलेली आहेत हे नवख्याच्या सुद्धा लक्षात
यावे. मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडातून केलेले आणि शिखर अजूनही शाबूत आहे.
मंदिराच्या प्रांगणात, पश्चिमेच्या
बाजूस दगडात खोदलेल्या टाक्या आहेत जिथे थंडगार पाण्याच्या मुबलक साठा आहे. इथल्या
नितळ आणि थंडगार पाण्याची चव म्हणजे निव्वळ अमृताचीच. या टाक्यांच्या बाजूलाच एक मोठी कोरीव गुहा आहे
आणि त्यात खाली खोल खणून काढलेली आणखी एक गुहा आहे. इथे चांगदेवांनी १४०० वर्षे
तपश्चर्या केली असे सांगतात. सुमारे दोन अडीच फुटाच्या कातळ भिंती पलीकडे पाण्याचे
टाके आणि हि गुहा मात्र एकदम कोरडी कशी हा प्रश्न पडतो. कातळाच्या भिंतीतून
पाण्याचे झरे नेमके कसे वाहत आहेत हे बाहेरून कळण्याचे तंत्रज्ञान किंवा एखादा झरा
एकदम बंद करण्यासाठी लागणारे सिलिंग चे तंत्रज्ञान मध्ययुगात या गुहा
खोद्णार्यांना नक्की माहित असणार.
मंदिराच्या दक्षिणेस गर्भगृहाच्या भिंतीस पाठ टेकून शेंदूर मंडीत गणेशाची
मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही हाताला शिल्प पट्ट असलेले दोन खांब आहेत. आश्चर्य
म्हणजे हि मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
गणेश मूर्ती कडे पाहत असलेली तीन छोटी मंदिरे जिथे प्रामुख्याने विष्णूची
पाषाण मूर्ती आहे. मंदिराच्या प्राकाराचे बांधकाम बर्यापैकी शाबूत आहे.
इथून मंगळगंगा उगम पावते, तिच्या मुख्य
प्रवाहाच्या दिशेने मंदिराच्या थोडे खाली पश्चिमेच्या बाजूला एक ऐसपैस चौरस कोरीव
गुहा आहे, गुहेत कायम पाणी भरलेले असते आणि त्यावर कधीच सूर्यप्रकाश पडत नाही.
गुहेच्या मध्यभागी सुमारे पाच फूट उंचीचे भव्य शिवलिंग- तो केदारेश्वर, एकाच
पाषाणातून कोरलेला, बाजूने चौरस
मंडप, चार कोरीव खांब असलेला आणि
त्यातले तीन खांब तुटून गेलेले आहेत. हे तीन खांब होऊन गेलेली तीन युगे दर्शवितात
तर एकच शाबूत असलेला खांब हा सध्याच्या कलियुगाचे प्रतीक आहे असे म्हणतात. हा खांब
मोडेल तेव्हा प्रलय होणार! केदारेश्वराच्या गुहेस मोठा दगडी उंबरठा आहे, गुहेचे छप्पर चार खांबांनी तोलून धरलेले आहे. आणि उंबरठ्या
पलीकडे दोन पायऱ्या उतरून कंबरे इतक्या खोल पाण्यातून चालत जाऊन केदारेश्वराला
स्पर्श करता येतो. आम्ही तिथे होतो तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी
सुमारे एक-दीड फूट खाली होते. मांडी पर्यंत येईल इतक्या थंड पाण्यातून समर्थ ने
जाऊन केदारेश्वराचे जवळून दर्शन घेतले आणि मग सगळेच उतरलो. इतक्या थंड पाण्यातून
केदारेश्वाराला प्रदक्षिणा घालताना फार छान वाटले. या गुहेच्या भिंतींवर काही
शिल्पे कोरलेली दिसतात जी आता अस्पष्ट आहेत.इथे घडून गेलेल्या इतिहासाची पाने
वाचून दाखविणारी हि शिल्पे आता अस्फुट वाणीने त्यांचे अस्तित्व तेवढे दाखवतात. ती
कोरणार्यांची तर ओळखच इतिहासाला नाहीये. दक्षिणेकडेच्या भिंतीत एक द्वार आणि आत एक
खोली आहे. तिथे आता वटवाघुळांची वस्ती आहे हे पोरांनी जाऊन पाहून घेतले.
गुहेच्या प्रांगणात तुटलेल्या शिल्पांचे अनेक अवशेष एकत्र करून ठेवले आहेत.
त्याची योग्य सांगड कशी घालायची हे जाणकार लोकांसमोर कोडे असावे.
सूर्यदेव आता चांगले डोक्यावर आले होते. त्यामुळे आम्ही पश्चिमेकडेची डोंगर
सोंड चढून जाऊन कोकण कड्याचा रस्ता धरला. इथून कोकण कडा सुमारे अर्धा तास. कोकण
कड्याच्या ५० मीटर अलीकडे डोंगरी लिंबाच्या झाडोऱ्या जवळ तीन चार हॉटेल आहेत, त्यातले मधले हॉटेल कोकण कडा हे भास्कर चे हॉटेल. तुम्ही
दुपारी तिथे पोहोचा, मी जेवण
बनवायला स्वत: येईन किंवा कोणाला धाडीन असे भास्कर म्हणाला होता. झाडांच्या
सुखावणार्या सावलीत आणि कड्यावऋण येणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकी अंगावर घेत मस्तपैकी
गप्पांचा फड रंगला. काल भिजलेले तंबू काढून वाळत टाकले आणि निवांत निसर्गाच्या
कुशीत पडून राहिलो.
गडावर फोनला रेंज फक्त याच परिसरात किंवा तारामतीच्या शिखरावर. ती सुद्धा वार्याने
कोकणच्या मातीचा गंध वाहून आणावा आणि क्षणात वारे पडले कि तो गायब व्हावा अशीच.
तरीसुद्धा हॉटेल कोकणकडा नावाच्या फलका वर भास्कर चे दोन फोन नंबर व्हॉट्स अप,
फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम चे
लोगो पाहून आश्चर्य वाटले. त्याला कोणी हे शिकवले असेल? असा प्रश्न पडला. परंतु हा बदल त्याने आत्मसात केला आहे हे
पाहून छान वाटले.
भास्करची भाचे सून आणि भाचा थोड्या वेळात आले. चूल पेटली आणि आमच्यासाठी मस्त
गरम गरम जेवणाचा बेत शिजवून तयार झाला. त्यावर ताव मारून बाहेर पडलो. तोपर्यंत
आकाश झाकोळले होते. कोकण कड्यावरून दिसणारा सुंदर सूर्योदय ढगांमुळे दिसणार नाही
म्हणून आम्ही खट्टू झालो, आणि क्षणातच कदाचित
आपल्या नशिबात इंद्र वज्र दिसण्याचे भाग्य आहे या आशेने आम्ही प्रफुल्लीत झालो.
कोकण कड्यावर पोचलो. कोकण कड्याला पडलेल्या भेगेमागे भक्कम रेलिंग केले आहे. त्याच्या
पलीकडे ओणवे होऊन कड्याची खोली आणि त्याचा आवर्त झालेला पोटाचा खळगा पुन्हा पाहून
रोमांचित झालो. कड्याच्या अर्ध वर्तुळाकृती भागाच्या पश्चिमेकडील टोकाकडे निघालो. अगदी
शेवटाकडे असलेल्या घळीच्या एका अंगावर एकच एक झुडूप वादळ वाऱ्याचा सामना करीत
कड्याच्या भिंतीला लागून उभे आहे तिथे पोचलो आणि पावसाने गाठले. पावसाची शक्यता
गृहीत न धरल्यामुळे आम्ही त्यापासून आणि थंड वाऱ्यापासून बचावाचे साहित्य नेलेले
नव्हते. आसपास कोणताही आडोसा नव्हता. पावसाच्या टपोऱ्या आणि गार थेंबांनी
सोसाट्याच्या वाऱ्यावर स्वार होत आम्हाला मनसोक्त झोडपले. त्यांच्या माऱ्याकडे पाठ
करून चिंब भिजत उभे राहिलो. आम्हाला चिंब भिजवून अखेर पावसाच्या सारी निवाल्या, पश्चिमेकडे नाफ्ता च्या डोंगरावरील ढगांतून सूर्य
किरणांच्या रेषा खाली डोंगर रांगेवर पसरल्या. वाऱ्याच्या झोताबरोबर बदलणाऱ्या
ढगांच्या फटीतून पसरणाऱ्या किरणांची बदलती रूपे आम्ही विस्मयचकित नजरेने पाहत
राहिलो. ते सुंदर क्षण कॅमेरा मध्ये कैद करून परत फिरलो आणि कड्याच्या
पूर्वेकडच्या बाजूचा फेर फटका मारायला गेलो. कड्याचे नाली चे टोक जिथे तुटते आणि
खाली रोहिदास शिखर दिसते अगदी त्या टोकावरून कड्याचा आकार फार सुंदर दिसतो. पलीकडे
पिंपळगाव जोगे धरणाचा जलाशय दिसू लागला. चुण्या पडलेल्या उभ्या पडद्यावर एखादा
दोरा अडकावा तसा माळशेज घाटाचा रस्ता समोरच्या उभ्या डोंगर कड्यावर दिसत होता. इथून पाहिल्यावर हा घाट रस्ता आखणाऱ्या आणि
बनविणाऱ्या तंत्रज्ञांची कमाल वाटल्याशिवाय राहत नाही.
या बाजूने तारामती शिखराकडे पहिले कि अद्भुत अशी नैसर्गिक पाषाण शिल्पे
दिसतात. ज्वालामुखीजन्य पाषाणाचे तुटलेले कडे आणि त्यातून तुटून कोसळून पडलेल्या
प्रचंड शिळा हे दृश्य सह्याद्रीच्या मुख्य कड्याजवळ नेहमीच दिसतात. परंतु इथे
दिसलेले चक्क गोलाकार असलेले प्रचंड पाषाण हे आधी कुठे बघितले नव्हते. तारामती
शिख्राकडून वाहून आलेल्या एका ओढ्यातून हे गोळे चक्क वाहून आले असावेत असे भासत
होते.
अंधार पडण्याआधी परतलो आणि इतक्यात तांबूस, गुलाबी सूर्यबिंब ढगांच्या आडून डोकावले. त्याचे मनोहर रूप डोळ्यात साठवत
आजच्या या सूर्याला निरोप दिला. पडून गेलेल्या पावसाने आणि वाहत असलेल्या
वाऱ्यामुळे हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला
होता. गरम गरम भाकरी आणि मसूर डाळीच्या उसळीचा आस्वाद घेऊन तिथेच लवकरच आडवे झालो.
रात्रभर वारा घोंघावत होता. कुडाच्या दाराच्या फटीतून आत शिरून आम्हाला गोठवून
टाकत होता. बाहेर ढग आभाळ कवेत घेण्याची अयशस्वी धडपड करत होते आणि त्यामागून मधून
मधून पौर्णिमेचा चंद्र डोकावत होता. पहाटे ४ च्या सुमारास चारही पोरांची चुळबुळ
आणि दबक्या आवाजात सुरु असलेले बोलणे ऐकून मला जाग आली. बाळू आणि हरण्या असे
नामकरण केलेले दोन श्वान रात्री वस्तीला हॉटेलच्या त्या झोपडीत शिरले होते.
त्यातील बाळू उबेसाठी पोरांच्या पायाशी जाऊन मुटकुळे करून शांत झोपला होता. त्याला
उठविण्याची धडपड कोणी करायची यावरून चौघात चर्चा सुरु होती. २७ वर्षांपूर्वी हीच
घटना इथेच चांगदेवा च्या गुहेत झोपलो
असताना आमच्या बाबतीत झाली होती! “हिस्टरी रिपीट्स” असे मनाशीच म्हणत मी त्याकडे
दुर्लक्ष करून झोपून गेलो. हिस्टरी रिपीट्स अँड रिपीट्स बाय इटसेल्फ असे म्हणतात.
कधी कधी हे अगदी असेच घडते, पण या दोन्ही
टोकांच्या मध्ये एक वर्तन पूर्ण झालंय आणि त्याच्या दोन्ही टोकात काळाचा फरक आणि
त्यामुळे परिस्थितीतला बदल झालाय हे लक्ष केंद्रित केल्यावर दिसून येते.
पहाट झाली, कोकण कड्याकडे धावलो.
कड्या पलीकडच्या खोलीत ढगांची दुलई पसरली होती. कोकणा कडून येणाऱ्या वाऱ्याला
समर्थपणे अडवून कडा अभेद्य उभा होता. त्याच्या पोटातल्या खळग्यात ढग कोंडले होते. कड्यावरच्या
जमिनीस समतल अच्छादलेला कापसाचा गालिचाच जणू. कड्याला अडलेला वारा त्याची घुसमट
दूर करण्यासाठी या ढगांना घुसमळत होता. हवा आत ओढून घ्यावी तशी हि दुलई काही क्षण
आक्रसून खाली जाई मग पुन्हा उधाण भरल्यासारखी वर उसळे. बराच वेळ ते दृश्य पाहत
कड्यावर बसून राहिलो. सूर्य तारामती शिखर मागे उगवला, त्याची किरणे माळशेज च्या बाजूने ढगांवर पडली. हवा जशी गरम
होऊ लागली तसे ढगांची दुलई विखरून वर येऊ लागली. मग आम्हीही तिथून काढता पाय
घेतला. चहा घेऊन, आवरले आणि मंदिराच्या दिशेने निघालो.
लांबून पुष्करिणीच्या काठावर वाळत घातलेले कपडे दिसले. काल रात्री इथे बरेच
लोक आले असणार हे ध्यानात आलं. मंदिरा पाशी पाणी भरताना समजले कि कोतूळ गावाहून
दिंडी आली आहे. दिंडी बरोबर आलेल्या भक्तांच्या अंघोळी पांघोळी उरकून ते पूजेच्या
विधी ची तयारी करत होते. अमृतासम पाणी भरून वरच्या हॉटेलकडे निघालो. तिथे पोह्याचा
फडशा पाडून आणि सामान तिथेच ठेवून तारामती शिखराचा रस्ता धरला. तारामती हे इथले
सर्वोच्च शिखर. शिखरावर जेमतेम जागा. इथून दक्षिणेस माळशेज घाट परिसर, नाणेघाट परिसर ते थेट भीमा शंकरची बाजू दिसते तर उत्तरेस
कळसुबाई पर्यंतचा प्रदेश दिसतो. हरिश्चंद्र गडाचा एकूण घेरा इथून छान दिसतो.
इथल्या ढालकाठी वर फडफडणाऱ्या भगव्या जवळ पाषाणात कोरलेले एक छोटेसे शिवलिंग आहे.
खाली पिंपळगाव-जोगे धरणाचा जलाशय अजून ढगांची दुलई पसरून निवांत होता तर उत्तरेकडे
कोकणकड्याची अर्ध चंद्र कोर आणि त्यामध्ये अजून अडकलेले ढगांचे पुंजके सुंदर दिसत
होते.
कोकण कड्याच्या बाजूनेच उतरायचा निर्णय घेतला. जवळ वाटणारा हा उतार चांगला तीन
मोठ्ठ्या टप्प्यांचा आहे. त्यातल्या एका टप्प्यावर लोखंडी शिडी बसवली आहे. आज
गडावर जवळच्या शाळेची ट्रीप आली होती. त्याबरोबर आलेली अरुण-तरुण मुले मुली
त्यांच्या आवडीच्या गप्पा मारत होती. बहुदा त्यांना हे निसर्ग वैभव नवीन नसावे,
टणाटण उद्या मारीत मागून येऊन त्यांनी आम्हाला गाठले. पुन्हा एकदा तो विशिष्ट
प्रस्तर भंग पाहत आम्ही कोकण कड्याकडे आलो आणि न थांबता लगेच परतीचा रस्ता धरला.
गणेश गुंफेत जाऊन भीमकाय गणपती चे दर्शन घेतले आणि सामान उचलून परतीचा रस्ता धरला.
हरिश्चंद्रेश्वर मंदिरात पूजा संपून महाप्रसादाची सुरुवात झालेली होती. वारी
ने आलेल्या वारकऱ्यांनी जेवायचा आग्रह केला. तो नुसताच वरवरचा नव्हता. देवाच्या
दारातून कोणाला विन्मुख पाठवू नये अशी कळकळ आणि ओलावा त्यातून प्रतीत होत होता.
परंतु आमची आन्हिके झालेली नव्हती म्हणून आम्ही नम्रपणे त्याचा स्वीकार नाकारला
आणि उतरायला सुरुवात केली.
कोणताही ट्रेक संपूच नये असे वाटत असत. मन कितीही मागे रेंगाळल तरी घरी परतण्याकडे
पाय भरभर चालतात. पाचनाई गाव जवळ जवळ येत असता झाडीतून शेवटचा उतार उतरत असता वाटेत एका झाडाखाली पाटी मांडून
डोंगर मेवा विकणाऱ्या एक ताई आणि त्यांची चिमुरडी मुलगी भेटली. अंगावर शाळेचा
चेक्स चा गणवेश, केसांच्या वेण्यातून
ओवलेली लाल रिबीन असा तिचा थाट. जंगलातून भटकायचं आणि रान मेवा न खाता परत फिरायचं
हा थोडा “शिष्ट” आचार ठरला असता. अर्थातच करवंद आणि जांभळ घ्यायला थांबलो. पळसाच्या
पानाचे दुमडून केलेले सुबक द्रोण, १० रुपयांचा एक वाटा. करवंद घेता घेता समर्थने
विचारपूस केली. मी देखील शिक्षक आहे असे त्याने सांगितल्यावर तिचा चेहऱ्यावरची रेष
पुसटसा आनंद आणि थोडेसे आश्चर्य दाखवून गेली. हि पोर राजूरच्या शाळेत ८ वी ला
शिकते असे तिच्या अंगकाठी वरून वाटले नव्हते. प्रामुख्याने गोड आणि मधूनच आंबट
करवंद संपल्यावर तिनेच हिशोब केला.
रान फळ चाखत आम्ही जरा सावलीला टेकलो तेव्हा दिंडी सोबत आलेला वारकर्यांचा एक
जत्था भराभर उतरत गावाच्या दिशेने निघाला. उन्हाची काहिली सहन व्हावी म्हणून एक
दोन तरण्या बाप्यांनी शर्टाची बटने उघडी ठेवली होती. त्यातून त्यांचा राकट बांधा
स्पष्ट दिसत होता. जुने जाणते बाकीचे स्वच्छ पांढऱ्या पायजमा आणि कुडता घातलेले, करवती काठी उपरण्याच्या मंदिल बांधलेले. त्यांच्या बरोबर
रंगी बेरंगी उत्सवी चुडीदार घातलेल्या त्यांच्या मुली असा तो कौटुंबिक मेळा
आम्हाला रामराम करून पुढे निघाला. दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला कोतूळ हून हि दिंडी
इथे येते असे त्यांच्याकडून समजले होते.
गोड, आंबट खारट तुरट चवीने
माखलेल्या ओठांवरून जीभ फिरवत आम्ही त्यांच्या मागून निघालो. गडावरचे देव, त्यांचे उत्सव, त्याचे
वेळापत्रक हे लोकं किती भक्ती भावे सांभाळतात... एरव्ही बहुतेक सर्व शहरी सुविधा
आता तिथे पोचल्यात. हा सर्व समाज सुशिक्षित झालाय... आम्ही जिच्या कडून करवंद
घेतली ती आणि तिचे गावातले मित्र मैत्रिणी पुढे जाऊन हे सर्व सांभाळतील का? कि ते आपल्या सरशीच्या वाटा शोधीत शहराची वाट धरतील? असे
झाले तर हा परिसर पुन्हा बे-वसाऊ होईल का? या प्रश्नाकडे समर्थ आणि माझा विषय
वळला. कारण नसता, होय कारण नसताच माथ्यावरल्या उन्हा इतकीच या प्रश्नाची झळ
आम्हाला लागली.
योगा योगाने पुण्यात परतल्यावर गोनीदांचे “रानभुली” पुस्तक वाचायला घेतले.
रानभुली मधल्या मनी सारखीच ती मुलगी भासली. गेल्या पंचवीस तीस वर्षात सह्याद्रीत
मधून भटकताना गोनीदांच्या कथा-कादंबर्यातून वर्णिलेली बुधा, धोंडी, सोपान्या, बाबुदा, येसुदी, हनमती, बबन अशी पात्र हमखास भेटली, गोनीदांनी या व्यक्तिरेखा कादंबरीतून अजरामर केल्या खऱ्या, पण या व्यक्तिरेखा अमर आहेत, आजही भटकंती करणाऱ्यांना त्या वेगवेगळ्या नावांनी भेटत राहतात. त्यांचे
राहणीमान आणि सवयी बदलल्या, हातातले कंदील
जाऊन बॅटर्या आल्या, मळखाऊ कापडाचे
उसवून-टाके घालून ल्यालेले कपडे जाऊन झकपक शहरी बाजाचे कपडे आले, भेगाळलेल्या
अनवाणी पायांच्या खाली किमान चांगल्या चपल्या आल्या, हिशोब कशाशी खातात हेही त्यांना समजू लागले. गावागावात वीज पोचली, त्यापाठोपाठ किमान बरे रस्तेही. रात्री-बेरात्री जिथे फक्त
कोल्हे कुई ऐकू येई तिथून मधूनच जीपच्या इंजिनाचा घरघराट ऐकू येऊ लागला. रात्री
बेरात्री डोंगरातून खाली खोर्यात जणू काही पाताळात पाहतोय किंवा एखादे कृष्ण विवर
असावे इतकी घट्ट काळोखाची चादर दिसे, हळू हळू तिथे
गावकूसाचे प्रकाशाचे ठिपके दिसू लागले, मधूनच येणाऱ्या आल्हाददायक वाऱ्याच्या
झुळुकी सरशी रात्री सुरु असलेल्या भजन, कीर्तनाचे
किंवा गोंधळाचे स्वर कानावर पडत. वीज वितरणातील सुधारणेमुळे आता या काळोखाच्या
चादरीवरून आभाळीच्या चांदण्या पसरून टाकाव्या अशी ती चमचमती दिसू लागली.
उन्हाळ्यात हवेच्या बदलत्या घनते मुळे दूरवरचे हे दिवे लुकलुकताना नव्हे लवलवताना
दिसतात जणू चमचमणार्या काजव्यांचा खेळ सुरु असावा असे.
इतके सगळे बदल होऊनही कोणी तरी उत्साही म्होरक्या अनेकांना एकत्र करून ती
दिंडी चालवितो आहे. तो इथला मूळ निवासी आहे का? माहित नाही. मुळात पोटाच्या खळगीसाठी भटकणारा माणूस, तो इथला काय कुठलाच मूळ-निवासी नाही. स्थित्यंतरांच्या
अधीमधी कोणी इथे वसले, कोणी निघून
गेले, दुसरे वसले अशी हि गंगा वाहतेय. इथले सण-उत्सव, परंपरा इथे वसलेल्या
सर्वांनी आत्मसात केल्या आपल्या मानल्या, त्यात कालानुरूप काही परिवर्तन केले. हे सगळे पाहत तो हरिश्चंद्रेश्वर दूर
मंगळ गंगेच्या उगमापाशी बसला आहे. तो पूर्वी ज्वालामुखीतून तयार झालेल्या एकसंध
काळ्या पाषाणात दडला होता. फार फार पूर्वी कुण्या शिल्पी ने कुणा एकाच्या
सांगण्यावरून इथे राहण्यासाठी विहार खोदून काढले तेव्हा त्या हरिश्चंद्रेश्वराला
मानवाने कल्पित असे हे लिंग रूप देऊन इथे बसवले. तेव्हापून तो पुजला जातो आहे.
घेरा हरिश्चंद्रगड मध्ये वसलेल्या लोकांचा तो कोणी तरी आहे. त्याची अंघोळ-पांघोळ
नीट व्हावी आणि त्यातून त्याची किरपा आपल्यावर असावी म्हणून इथले लोक सर्व सण वार
करत राहिले आहेत. तो त्यांचा जसा कोणी आहे तसाच तो आमचा पण आहे म्हणून आम्ही भटके
तिथे जात राहतो. तिथल्या लोकांबरोबर बोलतो, समजून घेतो, चार सुख दुक्खाच्या गोष्टी
करतो. हि सगळी सरमिसळ सगळ्यांना चांगल्या कडे घेऊन जाते आहे, एका मळलेल्या
वाटेवरून, कारण मळलेली वाट बांधल्याशिवाय नवी वाट सापडत नाही. आणि हे सर्व
शिकविण्यासाठी तो कुणीतरी तिथे दूर डोंगरात अनादी काळापासून बसला आहे......
-सत्यजित चितळे
No comments:
Post a Comment