Monday, September 9, 2024

एव्हरेस्ट बेस ट्रेक

 









एव्हरेस्ट बेस ट्रेक

15 नोव्हेंबर

सुळकीचा डोंगर
एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक ठरला आणि आमच्या सहित आठ जण पक्के झाले. त्यांच्यापैकी राजेंद्र जोशी बरोबर गेल्या वर्षीच मार्डी हिमाल चां एक ट्रेक करून झाला होता. तो कराड जवळच्या नेरले गावचासुरुवातीच्या दिवशीच नेरले गावाच्या सुळकी च्या डोंगराविषयी त्याने गोष्ट सांगितली.
माणसाच्या मनातील भव्यतेची कल्पना ही त्याच्या निवासाच्या परिसरातील मोठ्या डोंगरा शी, समुद्राशी किंवा विशाल पसरलेल्या वाळवंटाशी निगडित केली जाते आणि स्थानिक लोककथेत, वाक्प्रचारात, वाडमयात ती तशीच उतरते. तशीच गोष्ट सुळकीच्या डोंगराची. नेर्ले गावातल्या मुलांच्या बालमनात सुळकीचां डोंगर हा सर्वात मोठा, भव्यतेची तुलना केवळ त्याच्याशीच, त्यापलीकडे काही नाही हे जसं ठसवल गेलं तसच आमच्या पुण्यात पर्वती किंवा फारतर फार सिंहगडाची भूमिका. अभिजात मराठी साहित्यात ठाकर लोकांचा लिंगोबाचा डोंगर हा जसा कर्ता करविता देव गोनिदांनी वर्णिला, तीच भूमिका चोमोलुंगमा अर्थात सागर माथा ला नेपाळ च्या डोंगरातील शेर्पा लोकांनी बहाल केली. समुद्र मंथन करण्यासाठी ज्याची रवी केली तो मेरू, आणि त्याच मेरू चां आस करून त्याभोवती पृथ्वी फिरण्याची कल्पना मांडणारा मानवी समाज बहुदा असाच मेरू पर्वताच्या सभोवती राहत आणि विकसित झाला असावा.
ज्याने प्रत्यक्ष चोमोलुंगमा चे समोरून दर्शन घेतले त्याला त्याच्या भव्यतेने झपाटलेपण आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चोमोलुंगमा अर्थात एव्हरेस्ट चे दर्शन अगदी जवळून घेण्याच्या मोहिमेचा बेत ठरताना वाटेत येणारे अडथळे फार काळ तग धरू शकत नाहीत.
परंतु आकार आणि उंची ही दोनच परिमाणे एव्हरेस्ट ला अती  भव्यता प्रदान करीत नाहीत, त्याचे अजून एक परिमाण या ट्रेक मध्ये माझ्या ध्यानात आले.
क्यांगझुमा च्या लॉज मधून समोर ल्होट्से आणि उजवीकडे आमा ब्लम ही शिखरे दिसत होती. ल्होत्से शिखर 8516 मी उंचीचे, एव्हरेस्ट चां धाकटा भाऊ असल्यासारखे तर अमा दब्लम 6812 मीटर्स उंचीचे, या दोघां पेक्षा खूपच बुटके. त्या शिखरांवर पसरत जाणारा संधिप्रकाश चित्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. अमा दब्लम शिखरावर संध्याकाळ होत असता पश्चिमेकडील डोंगर रांगेची सावली पडली आणि वर सरकत जात तिने शिखर माथा गाठत शिखर अंधारात गिळंकृत केले तरी समोर ल्होत्से सोनेरी संधीप्रकाशात न्हाऊन निघत होते. त्या सोनेरी झळाळत्या रंगात हळूहळू सायं प्रकाशाचा रक्तीमा मिसळत गेला आणि पायथ्या पासून प्रकाशाची तीव्रता कमी होत अखेर शेवटच्या तांबूस किरणाने शिखर माथा चा निरोप घेतला. सूर्य क्षितिजा आड बुडाला तरी या उंच शिखरावर जवळच्या कोणत्याच शिखराची सावली पडली नाही. स्वाभाविक आहे की एव्हरेस्ट चां भूगोल आणि उंची ध्यानात घेतली तर त्याचा माथा ते सूर्याची प्रवासाची दिशा यात क्षितिजापर्यंत कोणीही मध्ये लुडबुड करू शकलेले नाही. ज्या विवक्षित रेखांशावर हा पर्वत उभा आहे तिथे पडणारा पहिला आणि शेवटचा सूर्य-किरण हा थेट त्याचे दर्शन घेतो. इतकी उंची गाठणे ज्याला शक्य आहे तो पर्वत नक्कीच खूप भव्य असला पाहिजे असे माझ्या मनाने घेतले. माणसाच्या विचारांच्या संदर्भात ज्याच्या विचारावर, व्यक्तिमत्वावर कोणाचीच सावली पडू शकली नाही असा कोण असेल असा विचार माझ्या मनात चमकून गेला आणि त्या भव्यतेच्या कल्पनेपुढे मी नतमस्तक झालो.
एव्हरेस्ट हा कदाचित म्हणूनच मझ्यासहित सर्वच गिर्यारोहण आवडणाऱ्या सर्वांसाठी "सुळकीचाडोंगर ठरला आहे.
विविध आव्हानांना तोंड देत आणि या भेटीची अर्थात ट्रेक ची तयारी पूर्ण करीत 15 नोव्हेंबर च्या पहाटे 2 वाजता दिल्लीचे विमान पकडले. पहाटे अर्धवट झोपेतच दिल्लीला उतरून विमान बदलण्याचा सोपस्कार पूर्ण करून काठमांडू चे पुढचे विमान पकडले आणि 15 तारखेला सकाळी 9.50 ला काठमांडू च्या त्रिभुवन विमनतळावर उतरलो. विमान तळ अंतर राष्ट्रीय विमान तळांच्या मानाने लहानसा. सिक्युरिटी आणि कस्टम्स हे उपचार मनाला बरे वाटावे म्हणून असल्या सारखे, सामान येण्यासाठी चारच बेल्ट त्यामुळे तिथे गर्दी त्यातून अचानक मुंबई चे चौकस मराठी ट्रेकर्स भेटल्यावर झालेल्या गप्पा, त्यातल्या तरुण लोकांच्या चेहऱ्यावर आमच्या आधीच्या ट्रेकच्या आठवणी सांगितल्यावर दिसलेले कौतुक असा दीड तास गेला. आमच्या ट्रेक ची व्यवस्था पाहणारे सिसने रोव्हर ट्रेकिंग चे श्री. दंबार आम्हाला काठमांडू च्या विमान तळावर भेटले. त्यांचे बरोबर जवळच्या हॉटेल मध्ये सामान ठेवले आणि राजेश्वर, पराग आणि मी पशुपति नाथाच्या दर्शनासाठी निघालो.
भाऊबीजे  चां दिवस असल्यामुळे काठमांडू मध्ये वर्दळ जरा कमीच होती. बस पकडून आम्ही पशुपति नाथ मंदिरा च्या दक्षिण द्वारावर उतरलो. तिथून आत पर्यंत असलेल्या प्रशस्त रस्त्याने चालत गेलो तेव्हा तिथेही फारशी गर्दी नव्हती.

सर्वच तीर्थ स्थानांवर असते तशी प्रसाद आणि फुलांची दुकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस होतीच, पण त्यातील बरीचशी बंद होती. शेवटी असलेल्या एका दुकानांतून पूजेचे ताट घेऊन आम्ही मंदिर प्रांगणात प्रवेशलो. बागमती नदीच्या किनारी वसलेले हे पशूपतिनाथाचे स्थान मृत्यू लोकातून मुक्ती मिळण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. नेमक्या विरुद्ध दिशेने चालत जाऊन आम्ही नदीच्या घाटावर पोचलो, तिथे सुरू असलेले दहन कर्मादी विधी पाहून आपला आजच इथे येण्याचा रस्ता चुकला असे समजून परत फिरलो आणि योग्य मार्गाने मुख्य मंदिरासमोर आलो. प्रवेशद्वारावर " फक्त हिंदूंना प्रवेश" या पाटी चे मात्र आश्चर्य वाटले. सर्व समावेशक हिंदू धर्मातील लोकांनी असा भेदभाव करावा हे माझ्या मनाला पटले नाही.  पँगोडा शैलीतील मुख्य मंदिर आकर्षक लाकडी कलाकुसर केलेले. मंदिराचे द्वार बंद होते आणि काही भाविक ते उघडण्याची वाट पाहत उभे होते. त्या रांगेत सामील झालो. समोरच्या एका पडवीत कोणी " ओम् नम: शिवाय " चां मंत्र जप सनई सारख्या वाद्यावर वाजवत होते आणि त्याच्या तालावर एक जटाधारी साधू डोळे मिटून डोलत होता. तो खरेच पूर्ण तल्लीन झाला होता का? याची परीक्षाच घ्यावीशी वाटली. मंदिर परिसरात माकडांचे प्राबल्य होते आणि मानवी श्रद्धा आणि पूजा व्यवहाराशी काही एक देणे घेणे नसल्यामुळे ती माकडे त्यांच्या पशुसुलभ लीला आणि कीचकीचा करण्यात मग्न होती. आश्चर्य असे की मंदिराचे कोणतेही सुरक्षा कर्मी त्यांना हटकत नव्हते. मग मंदिराचे द्वार उघडले आणि मुख्य गाभाऱ्यात प्रवेशलो. पशुपति नाथाचे मनस्वी दर्शन घेऊन बाहेर पडलो.

हॉटेल वर येऊन विश्रांती घेतली. संध्याकाळ झाली आणि आमचे इतर ५ सहकारी काठमांडू स पोचले. गाडीत समान लादून आम्ही १० जण- १) निखिल- आमचा जत्थेदार २) विनायक ३) साजिरी ४) शैलेन्द्र ५) राजेंद्र ६) पराग ७) राजेश्वर ८) मी स्वत: ९) भीम राणा – आमचा गाईड १०) विजय- आमच्या गाडीचा चालक  रामेछाप कडे निघालो. आज रात्री आम्ही रामेछाप च्या अलीकडे सुमारे २० किमी वर मुल्कोट गावी असलेल्या ताज रिसोर्ट मध्ये राहणार होतो. भारतातल्या ताज हॉटेल्स आणि या ताज चा एकमेकाशी केवळ नाम साधर्म्य इतकाच संबंध आहे हे समजून भ्रमनिरास झाला!

धुलीखेत हे काठमांडू चे एक उपनगर. वास्तविक काठमांडू पासून एक तासावर वसलेले गाव परंतु सगळीकडेच होते तसे वाढत्या शहरीकरणा मुळे आता उपनगर झालेले. तिथून रस्ता उजवीकडे वळला आणि डोंगरातून खोदून काढलेल्या वळणा- वळणाच्या रस्त्यावरून प्रवास सुरु झाला. प्रवास अंधारात झाल्यामुळे डोंगरांचे आकार समजून येत नव्हते. फक्त दूरवर लुकलुकणारे गावांचे दिवे पाहत रात्री ९.३० वाजता ताज मध्ये पोचलो.

उद्या ट्रेक सुरु होणार असल्यामुळे सामानाची त्याप्रमाणे बांधाबांध करून आणि इथेच सोडून जायचे समान वेगळे ठेऊन निद्रेच्या आधीन झालो.

16 नोव्हेंबर

गुरुवार 16 तारखेची पहाट नेहमी प्रमाणेच 3.30 वाजता झाली. हवेत माफक थंडी होती. आवरून 4 वाजताच तयार झालो. हॉटेल वर ठेवायचे सामान त्यांच्या ताब्यात देऊन 4.30 वाजता निघालो.  ताज रिसॉर्ट ते मंथली एअरपोर्ट चा रस्ता सव्वा तासाचा. डोंगरातून काढलेला थोडा प्रशस्त पण बऱ्याच ठिकाणी खराब किंबहुना मुरमाड.  एअरपोर्ट कडे गावातून जाणारा रस्ता हा कुठेकुठे जेमतेम एकच गाडी वळेल इतका लहान. एकूणच लुकला हून सर्व विमाने रामेछाप ला हलवताना बाकीच्या सुविधांची तयारी पूर्ण होण्याची एकूण काळजी घेतलेली दिसत नाही.

मंथली एअरपोर्ट वर आमच्या आधीच दोन तीन ग्रुप्स पोचले होते. तारा एयरलाईन्स, सीता एअर लाइन्स आणि समिट एअर लाइन्स या तिन्ही विमान कंपन्या तिथे चेक इन काऊंटर ठेऊन आहेत, पैकीं तारा आणि समिट या दोहोंची काऊंटर सुरू होती. आमचे विमानाचे तिकीट 6.30 वाजताच्या पहिल्या फ्लाईट चे आहे असा आमचा समाज होता पण आमचे तिकीट दुसऱ्या फ्लाईट चे आहे असे तिथे समजले. त्यातून या एअरपोर्ट वर विमानाचे हँगर नसल्यामुळे विमाने पार्किंग साठी काठमांडू मध्ये आहेत असे समजले. त्यामूळे काठमांडू हून विमान लुक्ला ला जाणार आणि तिथून उतारू घेऊन येणार त्यानंतर पहिली फ्लाईट निघणार असे कळले. अर्थात या कार्यक्रमास किमान 1.30 तास लागणार म्हणजे आमचे विमान 8 च्या आधी काही निघत नाही हे ठरलेच. विमानाच्या तिकिटावरच्या वेळेला किती महत्त्व आहे हेही लक्षात आले. विमानतळ हा शब्दच या ठिकाणी गैरलागू ठरावा इतके हे विमानतळ लहान आहे. एक धावपट्टी, कंट्रोल ची इमारत त्यातच सिक्युरिटी चेक इन च्यां खोल्या इतकेच. विमान पकडण्यासाठी आलेल्या लोकांसाठी प्रतिक्षालय वगैरे काहीच नाही. गेट समोर जी चहा आणि खाद्य पदार्थाची छोटी दुकाने आहेत तीच विश्रांती स्थाने. सामान रांगेत ठेवून आणि त्याची जबाबदारी आमचा गाईड भीम राणा यावर सोपवून आम्ही समोरच्या हॉटेल मध्ये अड्डा टाकला. तिथे इंटरनेट फुकट होते हे आमच्या साठी एक आकर्षण होते. अधून मधून विमानाची प्रगती पाहण्यासाठी चेक इन काऊंटर आणि धावपट्टी कडे जाऊन चक्कर मारणे इतकेच आम्ही करत होतो.

दुसरा चहा होतो न होतो तेवढ्यात नाटकाची नांदी व्हावी तशी धावपट्टीचे पाहणी ‌‌करणारी गाडी सायरन वाजवत धावपट्टीची चक्कर मारून आली. बहुदा अजून इथल्या भटक्या प्राण्यांना विमाने येण्याची सवय झालेली नसावी.

पुढील काही मिनिटात सीता एअर चे एक डॉर्नियर विमान उतरेकडून येत धावपट्टीवर उतरते झाले. त्या पाठोपाठ तारा एअर ची दोन टविन टर विमाने आली आणि मग समिट एअर चे किंग फिशर विमान येऊन उभे राहिले. तिन्ही विमानातून लूक्ला हून ट्रेक संपवूंन परत निघालेले लोक हसऱ्या चेहऱ्यांनी उतरले आणि आपापले समान घेऊन मार्गाला लागले.

आमच्या बॅग ची मग तपासणी होऊन आम्हाला आत प्रवेश मिळाला. धावपट्टीचे शेजारी जाणाऱ्या प्रवाशांसाठी असलेल्या प्रतिक्षालयात बसल्या बसल्या जाणाऱ्या विमानांचे निरीक्षण करीत राहिलो. विमान दक्षिणेकडे उड्डाण करीत होते आणि उड्डाणाच्या नंतर आवश्यक उंची गाठण्यासाठी त्यांना जो वेळ लागत होता त्या वेळात ते समोरच्या डोंगराच्या अगदी जवळ जाऊन वळत आहेत असे वाटत होते. बोटी जेव्या काठाला लागतात तेव्हा त्यांना बांबूने ढकलून सरळ करण्यासाठी जसे नावाडी बसलेले असतात तसेच  तिथे कोणी बांबू घेऊन विमान ढकलायला उभा असेल असे निखिल गमतीने म्हणाला.

आम्हाला घेऊन जाणारे विमान अखेरीस आले. 18 सीट असणाऱ्या विमानात डावीकडच्या सीट पकडण्यासाठी झालेली चुरशीची शर्यत राजेश्वर आणि शैलेंद्र नी जिंकली आणि एकदम पुढची डावीकडची सीट पटकावली. विमानात सर्व प्रवासी बसल्यावर लगेच विमान निघाले. उड्डाण करून प्रथम पश्चिमेकडे वळण घेत अपेक्षित उंची गाठून मग उत्तर पूर्वेकडे लूकला च्या दिशेने प्रवास सुरू झाला. डावीकडे गौरी शंकर शिखर रांग दिसू लागली. आणि मग पुढे जाता थेट एव्हरेस्ट शिखराचे स्वच्छ सुंदर दर्शन झाले. हा फ्लाईंग कॉरिडॉर काठमांडू लुकला पेक्षा वेगळा असला पाहिजे असे वाटले.

लुकला च्या  एअरपोर्ट मध्ये फार काही बदल झालेला दिसला नाही. सामान घेऊन बाहेर पडलो आणि मग नाश्ता करून 10.30 च्या सुमारास ट्रेक रूट वर चालायला सुरुवात झाली. थेट 10000 फुटांवर पोचल्यावर अपेक्षित असलेली विरळ हवामानाची जाणीव झाली. आणि त्याला अनुसरून चालायची गती ठेवत निघालो. दुतर्फा असलेल्या दुकानातून मांडलेल्या ट्रेकिंग साठी आवश्यक असलेल्या वस्तू पाहत पाहत पुढे निघालो.  लुकला चे चेक पोस्ट आता कमानीच्या पुढे नवीन बिल्डिंग मध्ये गेले आहे. तिथे एन्ट्री ची प्रक्रिया पूर्ण करून पुढे निघालो.

हवेमध्ये चांगलाच गारवा होता परंतु चालायला लागल्यावर जॅकेट काढावे वाटावे इतकाच कमी होता. उत्तम सूर्य प्रकाश आणि निरभ्र गडद निळे आकाश ही या ट्रेकिंग सिझनची देणगी आज आम्हाला मिळाली होती. लुक्ला हून दिसणारे कोंगदे आणि खुंबिला ही दोन्ही शिखरे निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर अगदी उठून दिसत होती.

लुक्ला पासून निघाल्यावर घाट गाव लागते तिथपर्यंत दगडी उताराचा रस्ता आहे. घाट गाव जवळ येताना पूर्वेकडे आभाळात घुसलेले कुसुम कांग्री हे शिखर फार सुंदर दिसते आणि या ट्रेक मध्ये पदोपदी अनुभवास येत असलेली हिमालयाच्या भव्यतेची पहिल्यांदा कल्पना देते.

ट्रेकिंग सिझन डिसेंबर महिन्यात संपतो आणि आता थंडी खूप वाढते.  इतक्या कडाक्याच्या थंडी ला सरावलेले गोरे लोक अगदी सहज वावरताना या मार्गावर दिसू लागतात. तसेही गिर्यारोहकांची एकूण संख्या पाहता त्यातील भारतीयांचे प्रमाण खूपच कमी असते हे जाणवते.  परंतु स्थानिक नेपाळी नागरिकांचे वाढलेले  प्रमाण हे याही ट्रेक रूट वर लक्षात आले.

1.30 च्या सुमारास जिथे असू तिथे जेवायला थांबायचे असे ठरले होते. परंतु प्रत्येकाच्या चालायच्या वेगातील फरकामुळे थोडे अंतर पडत गेले आणि चुकामूक होऊन मी आणि राजेश्वर 3 वाजता थेट बेंकर गावी पोचलो. वाटेत लागलेले दोन्ही धबधबे रोडवलेले असले तरी वाहणारे पाणी अगदी आरस्पानी नितळ स्फटिकासारखेच, बघत रहावे इतके स्वच्छ दिसले. बेन्कर ला फोन सुरू केला तेव्हा बाकीचे सगळे मागे फाकडींग ला जेवायला थांबले असे समजले. मग आम्ही दोघांनी पोटपूजा उरकली आणि सगळे पुढे आल्यावर बेनकर रिव्हर व्ह्यू लॉज मध्ये मुक्काम ठोकला.

सर्वच ट्रेक मध्ये होते तसेच दीपनिर्वा रात्री 8 वाजताच झाले. पुण्याच्या तुलनेत इथे थंडी चांगलीच होती त्यामुळे उबदार पांघरुणात शिरल्यावर झोपही छान लागली. पाठीमागे दूधकोशी नदीचा खळाळ आवाज सुद्धा झोपेत व्यत्यय आणू शकला नाही.

१७ नोव्हेंबर

पहाटे 5 वाजताच जाग आली. पांघरुणाची ऊब सोडविशी वाटत नव्हती पण उठून अवरले. बाहेर उत्तरेकडे जायच्या दिशेने नजर टाकता आभाळात उंच घुसलेले थमसेरकु शिखर माथ्यावर बर्फाचा मुकुट चढवून पहाटेच्या सूरकिरणांचे स्वागत करताना दिसले. त्या मुकुटाची सोनेरी किनार दुरून चित्रित केली तोवर आसपासच्या झाडीत लांब पांढरी शेपटी वाल्या पॅराडाईज फ्लाय कॅचर च्या जोडी ची हालचाल डोळ्यांनी टिपली. मग कमेऱ्याची लेन्स तिकडे वळवली.  हा फारच लाजरा पक्षी. सारखी जागा बदलत होता. कमी प्रकाशामुळे कॅमेऱ्याच्या इवल्याश्या मेंदूत तो सापडून कमेरा फोकस होई पर्यंत तो जागा बदली. त्यामुळे फोटो जेमतेमच घेता आला, आणि त्याला कमेर्यात बंदिस्त करण्याच्या नादात त्याचे सौंदर्य मनात साठवायचे राहूनच गेले!

इथला “सेट ब्रेकफास्ट” जो पुढचे 12 दिवस साथ देणार होता, तो घेऊन 7 वाजता नामचे च्या दिशेने प्रस्थान ठेवले. नामचेच्या वाटेवर वर्दळ सुरू झालेली होती. त्यामध्ये जसे गिर्यारोहक पर्यटक होते तसेच पोर्टर, गाई आणि वरच्या गावांना सामानाचा पुरवठा करणारे घोडे आणि याक चे तांडे सुद्धा होते. घोडे किंवा याक च्या रांगेमागे त्यांचा मालक शिटी वाजवत येणारा, अशी शिटी ऐकू आली की तो तांडा जाइपर्यंत की डोंगराच्या बाजूला चिकटून उभे राहायचं, उगा त्यातल्या एखाद्या प्राण्याचे डोके फिरले आणि त्याने आपल्याला खोल नदीत फेकून दिले असा घोटाळा नको म्हणून!!

जोर्सले गावापाशी पोचलो तेव्हा समोरून काही जण धावत येताना दिसले. त्यांच्या बिब वर एव्हरेस्ट ट्रेल रन 2023 असे लिहिले होते.

या रेस बद्दल पूर्वी ऐकले होते. त्या मध्ये भाग घेणारे बघितल्यावर कुतूहल अजून चाlवले गेले. आणि इंटरनेट वर माहिती बघितली. यंदाचे वर्ष हे या रेस चे 11 वे वर्ष होते. 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या 6 दिवसात 160 किमी अंतर आणि 1500 मीटर्स पासून 4100 मीटर्स पर्यंत चढून उतरून ही रेस पूर्ण होते अशी माहिती माहिती मिळाली.  या रेस मधील स्पर्धकांचे अभिनंदन करीत पुढे जात होतो.  मोंजो गावानंतर  सागरमाथा अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तिथे चेक पोस्ट आहे आणि सागरमाथा अभयारण्याचे स्केल मॉडेल ठेवलेले आहे. त्याचा थोडासा अभ्यास करून पुढे निघालो. मोंजो नंतरचां पायऱ्यांचा उतार नाणे घाटाची आठवण करून देणारा, नंतर  नदी ओलांडून उजवीकडे गेल्यावर जोरसले गाव हे नामचे चा चढ सुरु होण्या आधीच सपाटीवरचे शेवटचे गाव. त्यानंतर पुन्हा नदी ओलांडून नदीच्या वाळवंटात रस्ता उतरतो आणि मग थोड्याच वेळात सामोरं उंचावर स्वीस ब्रीज चे दर्शन होते. तिकडे जाणारा मार्ग व्यवस्थित बांधीव पायऱ्यांचा. स्वीस ब्रीज च्या मध्यातून दूध कोशी आणि भोटे कोशी चा संगम दिसतो. दोन्ही नद्यांचे पाणी हिरवे निळे एकसारखेच. नदीच्या खोऱ्यात कुठे पाऊस पडला आहे का हे पाण्याच्या रंगावरून सहज समजावं अशी इथली भुसभुशीत वालुकामय माती, सह्याद्रि सारखा कणखर कातळ जरा दुर्मिळच.

स्वीस ब्रीज पार झाला की सुरू होतो एक सलग चढ. सुचीपर्णी वृक्षांच्या जंगलातला वळणं वळणानी नामचे कडे जाणारा. सुमारे अर्धा चढ पूर्ण होताना एका उतारावर दोन बाजूंच्या उंच डोंगर उताराच्या कैचीतून समोर थेट ल्होत्से शिखर आणि त्याच्यापासून नुत्से पर्यंत जाणाऱ्या “ल्होत्से शार” या पाषाण भिंती मागे उंच माथा असलेले एव्हरेस्ट शिखर दिसते. या मार्गावरील एव्हरेस्ट शिखराचे हे प्रथम दर्शन.

आज आकाश स्वच्छ निळे होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बर्फाच्छादित एव्हरेस्ट शिखराचे दर्शन फारच अप्रतिम होते. हवा इत्काकी स्वच्छ होती कि कॅमेर्याच्या झूम लेन्स मधून एव्हरेस्ट च्या माथ्यावरचा दगडही टिपता यावा.
या नंतर रस्ता डावीकडे वळतो आणि मग अजून वर चढून जापर्यांत एव्हरेस्ट चे दर्शन होत नाही. मग येते नामचे चे चेक पोस्ट. आता चढ संपला असे वाटणे स्वाभाविक असले तरी इथे हिमालयाच्या डोंगरांची उंची आपला भ्रमनिरास करते. सुमारे 1500 फूट चढून गेलो की येणारे नामचे हा या खुमजुंग च्या डोंगर सोंडेवरचा अर्धा टप्पा आहे. त्यामुळे चेक पोस्ट च्या पुढे मन खाली घालून श्वास आणि पावले मोजत चाल सुरू ठेवायची आणि मग अर्ध्या तासाने नामचे चे प्रवेशद्वार लागते. नामचे हे मोठे बाजाराचे गाव. गावाच्या प्रवेश कमानीतून आत शिरल्यावर उजवीकडे बांधलेल्या विस्तृत पायऱ्या  आणि त्याच्या कडेने अखंड वाहणारा झरा आहे. त्या झर्याच्या मध्ये मध्ये ठराविक टप्प्यावर पाण - चक्की चा उपयोग करून "ओम् मणीपदमे हुं" लिहिलेली आकर्षक रंगीत प्रार्थना चक्रे देवाला मंत्राभिषेक करत राहिलेली दिसतात. उतारावरून धावत येणारे पाणी पुढे कारंज्यात रूपांतरित होऊन मग खोल दूध कोशी नदीत मिळून जाण्यासाठी मार्गस्थ होते.
नामचे बाजार ही पूर्वीची तिबेट - नेपाळी लोकांची वस्तू  आदान प्रदान करण्याची बाजारपेठ. एव्हरेस्ट मोहिमा सुरू झाल्यापासून या गावाला एक वेगळी ओळख लाभली. खुंबु, गोझुंपा आणि थामे मध्ये जाणाऱ्या मोहिमां चा नामचे हा एकत्रित होण्याचा बिंदू आहे. गेल्या 50 वर्षात हा गाव बदलून तिथे मोठे पर्यटक स्थान झाला आहे.

आमचे विश्रांती स्थान गावाच्या मध्यापर्यंत चढून जाऊन डावीकडच्या बोळीत आत गेल्यावर होते. हॉटेल च्या खोलीतून समोर थमसेरकु आणि मागे कुसुम कांगरी शिखरे सुंदर दिसत होती. त्यांच्या उजव्या अंगाला दूध कोशी नदीचे डोंगरांच्या पदरातून वाट काढत नागमोडी वळणे घेत जाताना दिसत होती. प्रत्येक पदरा गणिक डोंगराच्या रंगात निळाई मिसळत दूरवर नदी क्षितिजात विसर्जित होते आहे असे भासत होते.
संध्याकाळ झाली, एक चुकार ढग थमसेरकु च्या दक्षिण धारेवर विसावला, उंचीवरून वाहणारा वारा जणू त्याला बरोबर येण्यास खुणावत होता, परंतु तो मात्र त्या पर्वताच्या पदराशी खेळत राहिला. समोरून बघणाऱ्या व्यक्तीला डोंगराच्या पदराच्या खोलीचा नेमका अंदाज न आल्यामुळे, आवर्त होणाऱ्या वाऱ्याची हि खेळी मनमोहक दिसते. समोरच्या हिम शिखरांवर सायंकाळची लाली पसरली आणि शेजारच्या पर्वत रांगेची सावली आस्ते कदम वर वर सरकत तिने थोड्याच वेळात शिखराचा माथा गाठला. हळू हळू खोऱ्यात अंधार आणि थंडीचे साम्राज्य पसरले. संध्याकाळी 5 वाजता डायनिंग रूम मधील शेगडीत सरपण घालून ती मालकीणीने पेटवली, त्यानं मग डायनिंग रूम चांगली गरम झाली आणि जरा सुखद वाटू लागले. संध्याकाळच्या गप्पा मग तिथेच रंगल्या आणि जेवण करून आम्ही 8 वाजण्याच्या सुमारास निद्रिस्त झालो.

 

१८ नोव्हेंबर

पहाटे ४.३० वाजताच उठलो. आज स्यान्गबोचे कडे चढून जाऊन तिथून एव्हरेस्ट आणि खुंबू खोरे पहायचे आणि मग खाली उतरून आवरून पुढे निघायचे असा बेत होता. उंचीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार होता.

साजिरी, निखिल, राजेश्वर आणि मी असे चौघे ट्रेक मेंबर, आमचा गाईड भीम आणि धना असे सहा जण पहाटे ५ वाजता त्या दिशेने सुरुवात केली. अजून उजाडले नव्हते आणि थंडी मी म्हणत होती. हॉटेलच्या दारातच आकाशाकडे नजर टाकली. आमच्या माथ्यावरच्या स्वच्छ आकाशातून सिंह राशीचे तारे पूर्ण तेजाने चमकत होते. पूर्वेकडून गुरु चा पिवळा- नारिंगी ठिपका असीम तेजाने तळपत थमसेरकू शिखराच्या वर आलेला दिसत होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यावरच पायऱ्या पायऱ्यांचा एकदम अंगावरचा चढ सुरु झाला. दूरवर नामचे मध्ये कुत्र्यांचा भूक्ण्याचा आवाज मधूनच कानी पडत होता. अर्ध्या तासात आम्ही चांगले वर चढून आलो. उंचावर स्यान्गबोचे कडील पताकांची कमान आम्हाला खुणावत होती. तो पहिला टप्पा, त्यावरचा अजून एक. वाटेत तृणावरचे दवबिंदू गोठलेले दिसले. एक तास असते कदम चढाई करत पताकांच्या कमानीतून आत प्रवेशलो. तोपर्यंत दक्षिणेकडून ढग येऊ लागले. आजची संधी हुकणार का काय अशी शंका येऊन गेली. तरीही आम्ही चाल सुरूच ठेवली. कदाचित त्या मेघदूतांकडे पुढे द्यायला काही महत्वाचा संदेश नसावा त्यामुळे त्यांनी माघार घेतली. लुक्ला च्या दिशेने एक लाल बिंदू वर चढताना दिसला आणि मग पहाटेच्या पहिल्या हेलिकॉप्टर चा आवाज येऊ लागला. अर्थात सहा वाजून गेले होते. ध्वनी आणि प्रकाश यांच्या वेगातील फरक लक्षात यावा इतक्या दुरून हेलिकॉप्टर चा ठिपका आधी दिसला इतकी हवा त्यावेळी स्वच्छ होती.

आता चांगले उजाडले आणि पूर्वेकडील डोंगरांच्या फटीतून वाट काढत आमच्या मागे दक्षिणेकडे असलेल्या कोन्गडे री आणि तेन्गी रागी ताऊ च्या उंच शिखरांवर सोनेरी सूर्य प्रकाश पसरला. या शिखरांचा माथा सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाला. सोनेच ते, काय त्याची झळाळी! अतिशय सुंदर अशी कनक तेजाने उठून दिसणारी हिमशिखरे डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये बंदिस्त करीत आम्ही पुढे निघालो. आता अशीच आभा एव्हरेस्ट च्या धारेवर बघण्याची तीव्र इच्छा मनात घर करू लागली.

अधिक उंची गाठण्यास वेळ कमी आहे हे समजल्यावर आम्ही पूर्वेकडे जाणारी वाट पकडली आणि दरीच्या काठावरच्या हॉटेल कडे निघालो. समोर थमसेरकु दिसत होते. डावीकडे त्याच्या आडून कांग्तेगा शिख्रावरची बर्फाची दुलई आमच्याकडे डोकावून पाहत होती. थमसेरकु च्या उजव्या धारेवरच्या बर्फाच्या लादीमध्ये अगदी शिखर माथ्याजवळ एक मोठी क्रीव्हाईस तयार झालेली दिसली. शे- दोनशे फूट खोलीची ती भेग पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणामुळे चमकत होती. झूम लेन्स ने त्याचे चित्र अधिकच भयावह दिसत होते. अजून थोड्याच दिवसात इथे मोठे हिमस्खलन होऊन हि भेग नाहीशी होईल. पर्वतांच्या आकारानुसार कमी जास्त होणाऱ्या उतारावर असे होणारच. कदाचित हळू हळू साठत जात बर्फाची लादी भविष्यात पुन्हा तसाच आकार घेईल.  

 थोड्याच वेळात डावीकडचे एक वळण आले आणि अगदी समोर खुंबू नदी खोऱ्याचे सुंदर दृश्य आमच्या समोर उभे ठाकले. त्याचा स्वामी ल्होत्से हा त्याची कातळ भिंत ल्होत्से शार ने खुंबू नदीचा उगम अडवून उभा होता आणि त्या पदरामागे एव्हरेस्ट चा उंच माथा अंगावर कोवळी सूर्यकिरणे घेत पहुडला होता. उजवीकडे वीरासनात बसलेला आणि ताठ मान केलेला वीर दिसावा तसे अमा दब्लाम शिखर निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते आणि डावीकडे चित्रात काढावी तशी टोबुचे आणि टाबुचे हि जुळी शिखरे डोक्यावर हिमाची टोपी घालून उभी होती. त्याखाली खुमजुंग गावाकडेच्या टेकडीची सुचीपर्णी झाडांची टोपी आणि तिथे जाणारा पाय रस्ता सुंदर दिसत होता. खुंबू हिमनदीस आणि समोरच्या खोऱ्यास अजून जाग यायची होती. कुडकुडत्या थंडीत हातातले ग्लोवज काढून आम्ही फोटो काढले. थोडीशी पोटपूजा उरकली आणि मग आल्या वाटेने परत फिरलो.

सागरमाथा नेक्स्ट:

थोडे अंतर उतरल्यावर एक विदेशी गिर्यारोहक हातात चहाचा कप घेऊन निवांतपणे उष:प्रभेचा आनंद घेत बसलेला दिसला आणि शेजारीच सागरमाथा नेक्स्ट नावाचे एक हॉटेल वजा ठिकाण लागले. दारातच जुन्या भंगारातील वस्तूंपासून बनवलेले एक शिल्प होते. तिथे चहा मिळेल का अशी चौकशी करायला गेलो तर माहितीचे एक दालनच आमच्यासाठी खुले झाले. सागरमाथा नेक्स्ट हे हॉटेल नसून ती एक आर्ट गॅलरी आहे. २०१२ मध्ये तीन लोकांनी एकत्र येऊन सागरमाथा नॅशनल पार्क ची पूर्ण स्वच्छता करणे आणि स्थानिक शेर्पा समाजाची उन्नती करणे यासाठी हा उपक्रम सुरु केला. सागरमाथा नॅशनल पार्क मध्ये वेगवेगळ्या ट्रेक रूट वर तयार होणारा कचरा एकत्र करणे आणि त्यापासून कलात्मक वस्तू बनवून त्याच्या विक्रीतून मिळणारा नफा हा या कामात वापरला जातो.

देनाली श्मीड्ट हा एक जर्मन गिर्यारोहक. त्याच्या वडिलांबरोबर के२ शिखर सर करण्याचा प्रयत्न करीत असताना हिमप्रपात होऊन २०१३ साली त्याचा अंत झाला. तो कलाकार होता. त्याच्या मृत्युनंतर त्याने केलेल्या कलाकृती कुटुंबियांना मिळाल्या, त्यातून पैसा उभा करून त्यांनी देनाली फौंडेशन ची स्थापना केली. त्या ट्रस्ट तर्फे हि देनाली आर्ट गॅलरी उभी राहिली आहे. 

सराफ फौंडेशन हा एक स्थानिक ट्रस्ट आहे ज्यांनी सागरमाथा नेक्स्ट ची उभारणी केली आहे., जागा एका स्थानिक शेर्पा कुटुंबाने दान दिली आहे आणि टॉमी गुस्तावसन हे तिसरे गृहस्थ आहेत ज्यांनी हि संस्था सुरु केली आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा श्री. टॉमी गुस्तावसन यांची भेट झाली, मघाशी आरामात चहा घेत दिसले ते हेच!. या आर्ट गॅलरी च्या शेजारी एव्हरेस्ट मोहिमांची माहिती देणारे एक सुंदर प्रदर्शन आहे आणि तिथे Virtual Reality वापरून आपण ३ मिनिटात एव्हरेस्ट सर करून येऊ शकतो. सर्व डीजीटल सामुग्री डेल कोर्पोरेशन ने दिलेली आहे.

सागरमाथा नेक्स्ट आणि किल्ह फौंडेशन तर्फे “ कॅरी मी बॅक” योजना चालवली जाते. नामचे बाजार हून परतणाऱ्या ट्रेकर्स साठी हे ऐच्छिक काम आहे. नामचे बाजार च्या चेक पोस्ट पाशी फौंडेशन चे स्वयंसेवक एक किलो कचऱ्याची सील केलेली बॅग देतात, ही बॅग लुक्ला चेक पोस्ट पाशी त्यांच्या स्वयंसेवका कडे सुपूर्द करायची इतकेच काम. या उपक्रमाद्वारे गेल्या पाच वर्षात ८ टन कचरा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी खाली रि-सायकलिंग सेंटर पर्यंत आणण्यात आला आहे. आपणही परत जाताना या उपक्रमाट भाग घ्यायचा असे ठरवून आम्ही श्री. गुस्ताव्सन आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांचा निरोप घेतला.

मुळात “कचरा करू नये” हेच उत्तम पण आपण पाहतो कि बेशिस्त समाजात हे १००% वास्तव नाही त्यावर हे उत्तर चांगले शोधले आहे आणि राबवले आहे. सह्याद्री मध्ये फिरताना अनेक ठिकाणी पर्यटकांनी केलेला कचरा दिसून येतो. यावर हा उपाय करता येईल.

एकटा जीव? कसा काय?

माणसाची स्वप्ने आणि जगण्याच्या इच्छा किती भिन्न असतात याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. स्यान्गबोचे च्या वाटेवर खुमजुंग गावाकडे जायचा फाटा लागतो. या गावी पहिले एव्हरेस्ट वीर एडमंड हिलरी यांनी शाळा सुरु केली. शेर्पा समाजाच्या उन्नती साठी त्यांनी अपार कष्ट घेतले. हिलरी न्यूझीलंड चे. नेपाळच्या भूगोल आणि माणसांच्या प्रेमात पडलेले. आम्ही भेटलो ते गुस्ताव्सन जन्माने स्वीडिश नागरिक. तेही इथल्या निसर्गाच्या आणि माणसांच्या प्रेमात पडलेले, त्यासाठी खस्ता खाणारे. माणूस जन्माला येतो आणि मृत्यू पावतो तो एकटाच असे म्हणतात ते काही खरे नाही. कोणाला मान्य असो वा नसो, पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून या लोकांना हिमालयाचे प्रेम लाभले, जन्माबरोबर हि माणसे ते प्रेम घेऊनच आली असणार. कुणावर तरी असलेले वेड लावणारे प्रेम मग बऱ्याच वेळेस ती व्यक्ती किंवा मग निसर्ग किंवा छंद आणि उराशी बाळगलेली स्वप्ने यांची संगत असलेल्या माणसाला “एकुटा जीव” कसे म्हणावे? आणि यातले काहीच नसेल तर त्याला माणूस असे तरी कसे म्हणावे?

हाच विचार करत पावले उताराच्या दिशेने पडत होती.

आता नामचे बाजार पावेतो उन्हे पोचली होती आणि एव्हरेस्ट चे दर्शन घेऊन पुढे जाणारे गिर्यारोहक आम्हाला वर येताना भेटू लागले. त्यांच्याशी शुभेच्छा आदान-प्रदान करीत आम्ही उतरत होतो. हॉटेलमध्ये पोचलो आणि आवरून १० च्या सुमारास क्यांग्झुमा कडे जाण्यासाठी निघालो.

पुन्हा आल्या रस्त्याने थोडे चढून मग डोंगराच्या उतरंडीवरून फेरी घालून जाणाऱ्या रस्त्याने चाल सुरु झाली. नामचे बाजार आणि क्यांग्झुमायांच्या उंची मध्ये फारसा फरक नाही, जेमतेम १२५ मीटर्स पण अंतर जवळपास २ तासाचे. पायवाट चांगली रुंद आणि थोडा चढ थोडा उतार असलेली. या वाटेवरून जाताना उजवीकडे खाली खोलवरून वाहणारी दूधकोशी नदी आणि काल पार केलेला स्वीस ब्रीज दिसतो. काही ठिकाणी नदी अगदी चिंचोळ्या बेचक्यातून वाट काढीत पुढे जाताना दिसते. आणि समोर ल्होत्से -एव्हरेस्ट ची भिंत सतत दिसत राहते. उजवीकडे अमा-दब्लाम शिखर हे या पूर्ण रूट वर आपली साथ सोडतच नाही. क्यांग्झुमा जवळ येताना समोर कांग्तेगा च्या सोंडेवर वसलेले तेन्ग्बोचे गाव आणि तिथली मोनास्ट्री दुरूनही सहज नजरेत भरते. खाली फुंकी थांगा पाशी काही हॉटेल्स आणि नदीचा प्रवाह आणि तिथून तेन्ग्बोचे माडे जाणारा वळणा वळणाचा चढाचा रस्ताही छान दिसतो. फुंकी थांगा कडून नामचे कडे येणाऱ्या रस्त्याचा घाटाचा तीव्र चढा चा भाग संपला कि क्यांग्झुमा येत. त्यामुळे बोर घाटात लोणावळा जसा तसा घाट माथ्यावरचा विश्रांतीचा पहिला थांबा असे त्याचे खरे तर स्वरूप. इथे भोज आणि लाली गुरास अर्थात ऱ्होडो डेंड्रॉन ची दाट झाडी आहे. त्या मध्येच रस्त्याच्या दुतर्फा दोन लॉज आहेत. त्यातील थमसेरकु लॉज मध्ये आमचा मुक्काम पडला. बाहेर छान ऊन होते त्यामुळे पटांगणातच उन्हे अंगावर घेत आम्ही जेवण उरकले आणि मग खोलीत प्रवेश केला. खोलीच्या खिडकीतून समोर ल्होत्से आणि अमा-दब्लाम शिखर सुंदर दिसत होते.

संध्याकाळी पहिल्या मजल्यावरच्या भोजन गृहात हिंदी गाण्यांची मैफल जमली. राजेश्वर आणि पराग हे गाण्यांचे एनसायक्लोपिडिया तर विनायक हा आम्ही न ऐकलेल्या गाण्यांचा आणि त्यातील बोलांचा चाहता! त्यामुळे मैफल चांगली दीड तास रंगली. ट्रेक संपवून परत निघालेला एक अमेरिकन आणि एक रशियन पाहुणा तिथे भेटला. दोघेही सडेच आलेले. स्वत: चे समान स्वत:च उचलून घेऊन मार्ग क्रमण करत होते. दोघांच्या वयात सुमारे पस्तीस वर्षांचे अंतर, अमेरिकन पाहुणा सेवा निवृत्त जीवन जगणारा तर रशियन तरुण तिशीतला. दोघांचेही मनोरंजन आमच्या मैफिलीतून साधले.

खोलीच्या खिडकीतून समोरच्या शिखरांवर पसरत जाणारी संध्याछाया सुंदर दिसत होती. त्याचे सुंदर चित्रीकरण खोलीतूनच करण्याचा प्रयोग केला आणि बर्यापैकी जमला. अर्थात डोळ्यांनी जे दिसते ते कॅमेर्याला कधीच दिसत नाही आणि त्याचा भाव जसाचा तसा उतरत नाही हे खरे.

१९ नोव्हेंबर

नेहमीप्रमाणेच डोंगरातील सुंदर पहाट झाली. लॉज मध्ये खालच्या मजल्यावर व्यवस्थापक कुटुंबाची रोजची लगबग सुरु झाली आणि वरच्या मजल्यावर प्रवासाला निघणाऱ्यांची. आवरून ७.३० च्या सुमारास निघालो. आज प्रथम ४०० मीटर्स उतार आणि मग ६०० मीटर्स चा ( दोन्ही आकडे सुमारे!) सलग चढ असा कार्यक्रम होता. उतरणारा रस्ता भोज, गुरास आणि पाईन च्या जंगलातून जाणारा. वाटेत लौसासा नावाचे तीन चार घरांचे गाव लागले. वरंध घाटातल्या माझेरी ची आठवण करून देणारे. भरपूर गोधन असलेले. याक आणि नाक हे गो-वंशाचे डोंगरी भाऊ त्यांचाच एक चुलत भाऊ तिथे असतो त्याला स्थानिक लोक झ्योक असे म्हणतात. मला त्या तिघात फरक जाणवला नाही ; एका गाईड ने त्यातला फरक मला सांगायचा प्रयत्न केला जो मला उमगला नाही.

उतरून फुंकी थांगा च्या पुला पर्यंत आलो. उन्हामुळे थंडी विशेष जाणवत नव्हती. डोंगराच्या बेचक्यात हे गाव आहे. समोरून कांग्तेगा च्या हिमनदीतून उगम पावणारा प्रवाह उत्तरेकडून येणाऱ्या दूधकोशी नदीस इथे मिळतो. पात्राची रुंदी जेमतेम ५० मीटर्स, दोन्ही बाजूंनी हजारो फूट उंचीचे डोंगर उतार, पाईन वृक्षांनी पूर्ण आच्छादलेले आणि त्यातून वाट काढत वाहणारा गूढ हिरवा-निळा जलप्रवाह. 

चढाई सुरु होण्याआधी थोडी ऊर्जा हवी म्हणून पोटपूजा केली आणि मग पुलावरून नदी पार केली. तिथे एक चेक-पोस्ट आहे. निळ्या वेशातला तरणा बांड प्रहरी तिथे उभाच होता. त्याला हिंदी येत होते. त्याने चौकशी केली. आमच्या जवळचे परमिट- पर्ची दाखवून धूळ-मातीच्या आणि मधूनच दगडी बंध घालून पायरी केलेल्या चढाच्या रस्त्यावर पाउल ठेवले. सिंहगडाच्या चढाची आठवण करून देणारा चढ उजवीकडे चा दरी पल्याडचा डोंगर म्हणजे कान्ग्तेगा आणि थमसेरकु शिखरांची जोडगोळी. आभाळात मधूनच भली थोरली हिमालयन गिधाडे विशाल पंख पसरून तरंगत जाताना दिसत होती. आकाश स्वच्छ निळे होते आणि चांगला सूर्यप्रकाश होता. चढाचा रस्ता आणि चांगले ऊन यामुळे अंगावरचे जॅकेट काढून ठेवण्याची वेळ आली. धूळ उडवत जाणाऱ्या याक आणि घोड्यांच्या तांड्यामुळे मात्र थोडा त्रास झाला. डावीकडे उंचावर सुचीपर्णी वृक्षांतून तेन्ग्बोचे जवळचे एक चोर्टेन दिसत होते. ते लक्ष्य ठेवून आस्ते कदम चढाई सुरु होती. डोंगराच्या एका धारेवरची ही चढाई मागच्या वर्षीच्या मार्डी हिमाल च्या ट्रेकची आठवण करून देणारी होती.

१२ – १२.३० वाजता तेन्ग्बोचे च्या प्रवेश कमानीत पोचलो. रस्ता डोंगर सोंडेच्या माथ्यावर पोचला आणि पलीकडे ल्होत्से- एव्हरेस्ट अधिक जवळ दिसू लागले. ल्होत्से शार जस-जशी जवळ येऊ लागली तस तसे एव्हरेस्ट चा माथा त्यामागे अजून अजून लपून राहू लागला. ल्होत्से च्या माथ्यावर ढगांनी मुक्काम ठोकला होता.  तिथे एका हॉटेलच्या सज्जा मध्ये लेमन-जिंजर-हनी चा आस्वाद घेऊन पुढे निघालो. तेन्ग्बोचे गोम्पा हि या परिसरातील जुनी गोम्पा. तिथले विद्यार्थी तिबेटी लामा पेहराव केलेले;  परिसरात फिरताना दिसले. खोल गंभीर खर्जाच्या सुरात म्हणले जाणारे मंत्र आतून ऐकू येत होते. गोम्पा बघण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी खुली असते, आमची वेळ जुळत नव्हती त्यामुळे आम्हाला ती संधी नव्हती.

उठून पुढे डेबोचे पर्यंत उतार होता. अर्ध्या तासाच्या उतरंडी नंतर डेबोचे आले. गुरास चे चांगले घनदाट जंगल. त्यात उंच शिखर रांगेच्या मेटा सारख्या भागात वसलेले डेबोचे, ६-७ लॉज चे गाव. पहिल्याच लॉज मध्ये मुक्काम पडला. बाहेर छम ऊन होते त्यामुळे घामाने भिजलेले कपडे वाळत घालण्याचा मोह आवरता घेता आला नाही. दुपारच्या जेवणा नंतर डायनिंग हॉल मध्येच विनायक बरोबर गप्पा रंगात आल्या. त्याचे समृद्ध अनुभव खूप काही शिकवणारे खरेच. आज वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना होता. इथल्या तुटपुंज्या इंटर नेट कनेक्शन वर जितके समाधान मानता येईल तितके समाधान मानत क्रिकेटच्या मॅच चा आनंद आणि हरल्यामुळे झालेले दु:ख याचा अनुभव निखिल, पराग, राजेंद्र आणि शैलेन्द्र यांनी घेतला.

संध्याकाळी पल्स ऑक्सिमिटर वर रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचा प्रयत्न झाला. स्मार्ट वॉच मधील ऑक्सिमिटर आणि पल्स ऑक्सिमिटर या दोन्ही यंत्रणांनी वेगवेगळे रीडिंग दिले. त्यातच पल्स ऑक्सिमिटर ने दोन वेळा वेगळे रीडिंग दाखवल्यामुळे त्यावरचा विश्वास उडाला. थंडी वाजणे वगळता सर्वांची तब्येत चांगली होती, कोणाला खोकला, डोकेदुखी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डिंगबोचे पर्यंत मजल मारुया असे बोलणे झाले.

इथल्या लॉज मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेले जीने हे उंच लाकडी पायऱ्यांचे असतात. त्यावरून वर गेलो कि थोडा श्वास जड होतो आहे असे राजेश्वर म्हणाला. आम्ही १२५०० फूट उंचीवर होतो त्यामुळे थोडी धाप लागणारच असे मी त्याला समजावले. त्याला बाकी काही त्रास होत नव्हता, भूकही नेहमीप्रमाणे लागत होती. तरीही सकाळी उठल्यावर पाहूया, जर तब्येत ठीक नसेल तर श्यामोरे पर्यंत जाऊ आणि दुसऱ्या दिवशी पुढे जाऊ असे आमचे बोलणे झाले. आणि आम्ही झोपून गेलो.

२० नोव्हेम्बर:

पहाटे ४ वाजताच जाग आली. आवरून खोलीत परत आलो तेव्हा राजेश्वर अधून मधून खोकतो आहे असे लक्षात आले. २०१७ मधील शैलेश ला झालेला त्रास आठवला. पण आम्ही होतो ती उंची पाहता मी सर्व नकारात्मक शंका बाजूला सारून राजेश्वर च्या हालचाली चे निरीक्षण करत पडून राहिलो. तो ४.४५ च्या सुमारास उठला आणि प्रातर्विधीसाठी जाऊन आला. मला धाप लागते आहे असे त्याने सांगितले. खोकला हि थोडा थोडा येतच होता. त्याला शांत बसवून श्वासाची गती मोजली. १ मिनिटात १७ वेळा......जास्त होती. या उंचीवर आमची सर्वांची गती ११ ते १४ मध्ये होती.

आपण आता पुढे न जाता मागे जायला हवे हे माझे मत मी त्याला सांगितले आणि निखिल ला जाऊन त्याची कल्पना दिली. अशी वेळ फारच परीक्षा घेते. ठाम पणे नाही म्हणावे तर कदाचित हा मित्र बरा असून त्याची संधी आपण घालवतो आहोत असे वाटते आणि पुढे जायचे ठरवले तर जीवाशी खेळ होऊ शकतो. सकारात्मक विचार ठेवावा तर “उंचीला शरण जाऊ आणि सरळ खाली उतरू, उगा तब्येतीला त्रास नको” ही बाजू सकारात्मक का “काही त्रास होणार नाही असा विश्वास ठेऊन पुढे जायचे धाडस करणे” हे सकारात्मक? असा विश्वास हा अवाजवी आत्मविश्वास तर नाही ना? आपण उगाच घाबरतो आहोत का? असे ना ना प्रश्न मन भंडावून सोडतात. त्यामुळे आमची स्थिती दोलायमान झाली.

एक पोर्टर आमचे दोघांचे सामान घेऊन आमच्या बरोबर येईल आणि बाकीचे पुढे जातील असे बोलणे झाले. एका दिवसात उंचीचा सराव झाला तर पुन्हा चढून येणे हाही एक पर्याय होताच. परंतु आपण एक थांबा पुढे जाऊन प्रयत्न करून बघूया कदाचित तब्येत सुधारेल, नाही जमले तर परत जाऊ या विधानावर आमचे एकमत झाले आणि पुढे जाण्यासाठी सामानाची बांधाबांध झाली.

व्यवस्थित नाश्ता करून निघालो. उजवीकडील उंच डोंगरांनी अजून उन्हाला इथे शिरकाव करायची परवानगी दिली नव्हती. थंडी होती. सगळेच सावकाश चालत निघालो. डेबोचे ते पांगबोचे हा पहिला टप्पा, सुमारे १०० मीटर चढ आणि १ तास अंतर. अर्ध्या वाटेत पुलावरून पुन्हा दूध कोशी पार करायची होती. आता नदीचे पात्र उघडायला आणि विस्तारायला सुरुवात झाली होती. रस्ता नदीच्या काठा काठाने होता आणि दूरवर दिसत होता. पलीकडे पांगबोचे दिसू लागले. पुलापर्यंत पोचायच्या आधीच राजेश्वर ने त्याच्या जवळची छोटी सॅक मागून येणाऱ्या भीम राणा या आमच्या गाईड कडे दिली. तो थकायला लागला आहे हे बघितल्यावर पांगबोचे हून परत फिरण्याचा मी निर्णय घेतला.

पांगबोचे जवळ येताना उजवीकडे पलीकडील काठावरचे अमा दाब्लम शिखर सुंदर दिसत होते. अमा दाब्लम म्हणजे आईच्या गळ्यातील माळ. या शिखराच्या मुख्य भागावर एक गोल हिमनदी माळे सारखी वसलेली आहे म्हणून हे नाव. यातील पश्चिमेकडील धारेच्य जवळून पान नदीच्या पलीकडून रस्ता जातो. त्याला लागून असलेली हिमनदी आता पूरब वितळून गेली आहे. इथल्या करड्या मातीच्या आणि दगडांच्या रंगावर भुऱ्या रंगत एखादा ओरखडा ओढव तशी ती वितळून गेलेली हिमनदी दुरून दिसते. पांगबोचे जवळून त्या हिम नदीची खोली, उतार आणि तिने ओढून खरडून काढलेले दोन्ही बाजूचे डोंगर उतार याची व्याप्ती लक्षात येते. सागरमाथा नेक्स्ट मध्ये १९५५ मधील अमा दाब्लम चा आणि आताचा फोटो मुद्दामहून लावला आहे. त्यामध्ये हा फरक बघितला होता. तो प्रत्यक्ष बघून काळजात चर्र्र झाले. बदलत्या हवामानामुळे निसर्गाचा होणारा ह्रास त्या वितळून गेलेल्या हिमनदी सारखाच मनावर ओरखडा मारून गेला. 

सव्वा तासात पांगबोचे ला पोचलो तेव्हा छान उन्हे पडली होती. सर्व चमू पाठोपाठ पोचलो. एका हॉटेल मध्ये बाहेरच ठिय्या देऊन चहा ची आज्ञा दिली. आम्ही पुढे येत नाही इथेच राहू किंवा मागे जाऊ असे मी निखिल ला सांगितले. पोर्टर ना बोलावून सामान सोडवून घेतले आणि पुढे जाणारे समान वेगळे केले. आम्हाला दोघांना पुरतील इतके पैसेही राजेंद्र कडून घेतले.

इथून श्योमारे  दिसत होते. त्यामुळे तिथवर तरी जाऊन बघूया असे राजेश्वर चे म्हणणे होते. तसा तो व्यवस्थित चालत होता. उन्हे आल्यापासून हवाही छान होती आणि त्याला खोकलाही येत नव्हता.  त्यामुळे ठीक आहे असे म्हणत परत सामानाची बांधाबांध झाली आणि पुढे निघालो. पांगबोचे ते श्योमारे सुमारे एक – दीड तासाचे अंतर. आम्ही सावकाश एका ठराविक गतीने चालत पूर्ण केले. १२ वाजण्याच्या सुमारास शोमारे मध्ये पोचलो. तिथे पोहोचताना विनायक ची सुद्धा दमछाक होत होती. त्याचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेशन ७०% पर्यंत खाली येत होते. त्यामुळे इथून पुढे आणखी वर न चढण्याचा त्याने निर्णय घेतला. विनायक, राजेश्वर आणि मी तिथेच थांबायचा निर्णय घेऊन बाकीच्या ५ जणांनी पुढे जायचे, रात्रीच्या विश्रांती नंतर उद्या दोघांची तब्येत ठणठणीत झाली कि त्यांनी इथेच राहायचे किंवा पोर्टर घेऊन खाली जायचे आणि मी डिंगबोचे पार करून दुग्ला ला सर्वांना गाठायचे असे ठरवले. त्या नुसार जेवण उरकून पाच पांडव पुढे निघाले आणि आम्ही थोडा वेळ उन्हे अंगावर घेऊन खोलीकडे प्रस्थान केले.

राजेश्वर ने आडवे झोपू नये हा माझा आधीचा अनुभव सांगत होता, त्याने बसूनच विश्रांती घेतली. दुपारी त्याचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेशन ६०% पर्यंत घसरले. मग पुण्यात डॉ. सुहास आळेकर आणि डॉ. रघुनाथ गोडबोले यांना फोन केला. ताबडतोब खाली उतरा असा सल्ला दोघांनीही दिला. उतरताना घोड्यावरून उतरावे अन्यथा तब्येत आणखी बिघडेल असेही सांगितले. मग इंश्युरन्स एजंट सूरज ला फोन केला. त्याला परिस्थिती सांगितली आणि ईव्हॅक्युएशन कसे करता येईल ते विचारले. त्याने स्पष्ट सांगितले कि दुपारी ३ -३.३० नंतर ईव्हॅक्युएशन अवघड असते आणि होत नाही. पान काळजी करू नका उद्या सकाळी नक्की करू. तो पर्यंत मी प्रोसेस सुरु करतो. लगेचच इंश्युरन्स कंपनीच्या ऑफिस मधून फोन आला. त्यांच्याशी बोलणे झाले. पाठोपाठ त्यांच्या पॅनेल वरील डॉक्टर बोलले. त्यांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली आणि इमेल वर पासपोर्ट चे इमिग्रेशन चे फोटो आणि पल्स ऑक्सिमिटर चा रीडिंग चा फोटो पाठवायला सांगितले. इथे फोन ला रेंज होती पान इमेल जाईना.

या परिस्थितीत राजेश्वर बसल्या स्थितीत व्यवस्थित होता. आम्ही तिघांनी विनायक लिहित असलेल्या पुस्तकाचे पहिले प्रकरण ऐकले, त्यावर चर्चा आणि गप्पाही झाल्या. इकडे बाहेर उन्हे कलली होती आणि गार वारे सुटले होते. आता ताबडतोब खाली जाण्यास निघालो तरी थंडीचाच त्रास होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे रात्र इथेच काढायची असे ठरवले.

संध्याकाळी डायनिंग रूम मध्ये शेगडी पेटवल्यावर खोली उबदार झाली. मग तिघे खाली गेलो. छातीला थोडा शेक दिल्यावर राजेश्वर ची तब्येत सुधारली. लॉज च्या मालकाकडे घोडा होता. त्याच्याशी बोलणे केले आणि थेट नामचे च्या हॉस्पिटल पर्यंत मजल मारण्यासाठी २ घोडे ठरवले. एक राजेश्वर साठी आणि एक विनायक साठी. पैसे जरा जास्तच वाटले पण “सिर सलामत तो पगडी पचास” या उक्तीप्रमाणे तिथे जास्त घासाघीस टाळली. जेवण झाल्यावर खोलीत आलो. गरम पाण्याचा थर्मास भरून घेतला आणि रात्रभर तासा-तासाने राजेश्वर ला थोडे थोडे पाणी घ्यायला सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ८ वाजता डायमॉक्स आणि १२ वाजता वायसोलोन ची गोळी त्याने घेतली. बसून झोपणे चांगलेच कष्टदायक, पण उपाय नव्हता. त्याने ते कोणतेही कारण न सांगता सहन केले.

२१ नोव्हेंबर

पहाटे ५.३० वाजता पल्स ऑक्सिमिटर ने रीडिंग घेतले आणि जरा काळजीत पडलो. त्याचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेशन ४८% पर्यंत खाली आले होते. हि मोठी धोक्याची घंटा होती. “तू आता काही हालचाल करायची नाहीस, इथून उठायचे, खाली जायचे ऑर्डर दिलेला नाश्ता जमेल तितका खायचा आणि घोड्यावर बसायचे.” असे मी त्याला सांगितले. घोड्यावर बसल्यावर तोल सांभाळायला हवा, आपल्याला कसेही करून आज नामचे ला पोचायचे आहे हे मनाला बजावून सांग अशी विनंती वजा आज्ञा त्याला दिली. ७.४५ वाजता आम्ही श्योमारे सोडले. थोडे चालत उतरून मग राजेश्वर घोड्यावर स्वार झाला. रस्ता उताराचा असल्यामुळे विनायक ने पायीच चालणे पसंत केले. “तुमचा इंश्युरन्स नाहीये का?” घोडेवाला निमा शेर्पा विचारत होता. त्याला इमेल न जाण्याविषयी सांगितले. पांगबोचे ला एक हॉटेल आहे जिथे इंटरनेट आहे मी सोय करून देतो असे त्याने सांगितले आणि त्याप्रमाणे आम्ही पोचताच तशी सोय केली. कंपोज केलेली इमेल लगेच गेली. लागेश सुरज शी फोन झाला. त्याने ईमेल मिळाली असून पुढची कार्यवाही करतो तोवर तिथेच थांबा असे सांगितले, घोड्यावरून खाली उतरणे अजून धोक्याचे आहे असेही त्याने सांगितले. घरी चंदनाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिलेली होतीच. तिलाही पुढील अपडेट दिला. ११ च्या सुमारास फुर्बा शेर्पा चा फोन आला. तो हेलिकॉप्टर कंपनीतून बोलत होता. त्याने आमचे लोकेशन घेऊन पांगबोचे च्या H2 हेलीपॅड पाशी यायला सांगितले. आम्ही तिथून जवळच होतो. माझा फोन आला कि तिथे पोचा असा निरोप त्याने दिला. हेलिकॉप्टर काठमांडू- लुक्ला – पांगबोचे असा प्रवास करून येणार होते. त्यामुळे वेळ लागेल असे त्याने सांगितले.

१ वाजता हेलिकॉप्टर आले. आम्ही हेलीपॅड पाशी पोचलो होतोच. राजेश्वर ला घेऊन ते उडाले ते मागे अमा दब्लाम च्या पार्श्वभूमीवर. त्याला घेऊन हेलिकॉप्टर डिंगबोचे पर्यंत गेले आणि तिथून एकीला रेस्क्यू करून त्याने लुक्ला गाठले. तिथे काही सोपस्कार करून त्या दोघांना घेऊन थेट काठमांडू गाठले आणि मग अम्ब्युलंस मधून दोघे जण न्यू एरा हॉस्पिटल मध्ये भरती झाले.

इकडे विनायक, मी आणि सोम् राज हा आमचा पोर्टर परतीच्या वाटेला लागलो. आज फुंकी थांगा पर्यंत म्हणजे ३००० मीटर्स पर्यंत उतरुया असे आम्ही ठरवले. तेन्ग्बोचे पर्यंत घोडेवाला बरोबर घेतला. वाटेत डेबोचे ला मस्तपैकी पुरी-भाजी वर ताव मारून दुपारी ४ च्या सुमारास तेन्ग्बोचे गाठले. आणि फुंकी कडे उताराच्या रस्त्याला लागलो. आता दरीत वरच्या बाजूस ढग भरून आले होते. फुंकी जवळ येत असतानाच राजेश्वर चा फोन वाजला आणि त्याने त्याच्या खुशालीची खबर दिली. काठमांडूस पोहोचल्यावर हॉस्पिटल मध्ये भरती होताना त्याचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेशन ७६% पर्यंत सुधारले होते. अर्थात तो हळू हळू धोक्याच्या रेषे च्या बाहेर येत होता. खूप हायसे वाटले. हॉस्पिटलची व्यवस्था चांगली आहे असेही तो म्हणाला. पुण्यात फोन करून चंदनाला कल्पना दिली आणि समाधानाने फुंकी च्या लॉज वर पोचलो. मनावरचा ताण एकदम हलका झाला होता. रसिकाला फोन करून सगळी कल्पना दिली.

खोलीच्या बाहेर पडलो तो नवमीचा चंद्र समोरच्या थमसेरकु च्या माथ्यावर चमकत होता. फोटो घेण्याचा अनावर मोह झाला आणि त्याला बळी पडलो. डायनिंग हॉल मध्ये शेगडी जवळ बसून संध्याकाळच्या गप्पा सुरु होत्या. त्याच लॉज मध्ये ३२ वर्षाचा एक तरुण भेटला. तो चिलीहून आला होता, एकटाच. सेन्ट्रल एशिया, नेपाल, बांग्लादेश असा दीड दोन महिने फिरून परत जाणार होता. तो वकील होता, या ट्रीप साठी दोन वर्षे मेहनत करून पैसे साठवले आहेत असे सांगत होता. तिथेच त्याच्याच वयाचा एक अमेरिकन तरुण भेटला. तोही असा सडाच. तो ट्रेक संपवून परत निघाला होता. अमेरिकेत असताना मला अमेरिकेबाहेरचे जग किती सुंदर आहे याची कल्पनाच नव्हती असे त्याने प्रांजळ पणे कबूल करून टाकले. मी एकटाच फिरतोय, गाईड न घेता कारण मला कोणाच्या इच्छा किंवा मर्जीनुसार माझा कार्यक्रम करायचा नाहीये असे त्याचे म्हणणे होते. सेन्ट्रल एशिया सुंदर आहे पण इथे एक नियम पाळावा लागतो “ Do not believe that the price first quoted is the right price!” असा तो नियम त्याने बनवला होता. त्याची त्या पुढची कॉमेंट मजेशीर होती. “ Even after hard negotiation, the price you get, never believe that was the right price!”

या मनमौजी तरुणांबरोबर गप्पा मारायला फार मजा आली.

रात्री राजेश्वर शी फोन झाला. तो आता स्वतंत्र खोलीत शिफ्ट झाला होता आणि उपचार पूर्ण गतीने सुरु झाले होते. डॉक्टर येऊन गेले होते आणि त्याला ऑक्सिजन च्या कमतरते शिवाय इतर काही त्रास नाही हे त्यांनी नक्की केले होते. HAPE अर्थात हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडीमा मुळे त्याच्या फुफ्फुसात पाणी झाले होते. आणि त्याचे हाय अल्टीट्यूड हे कारण आता न राहिल्यामुळे त्याची तब्येत झपाट्याने सुधारत होती. २ ते ३ दिवस हॉस्पिटल चा पाहुणचार घ्यावा लागेल असे डॉक्टर त्याला सांगून गेले.

इकडे मला गादीवर पडल्यापडल्या आदल्या दिवशीच्या श्रमामुळे आणि मनावरचा ताण हलका झाल्यामुळे गाढ झोप लागली.

 २२ नोव्हेंबर

पहाटे ५ वाजता जाग आली. आता परतीच्या मार्गावर थंडी कमी वाजेल या भ्रमाचा भोपळा फुटला. आन्हिके उरकून पुन्हा पांघरुणाच्या उबेत पडून राहिलो. बाहेर चांगले उजाडल्यावर बेसिन पाशी गेलो तेव्हा नळाला पाणी येत नसून बाहेर पडणारे पाणी गोठून त्याचे बर्फ झालेले दिसले. लगबगीने त्याचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा घ्यायला खोलीकडे आलो. “पाणी गोठले आहे, तुम्हाला हवे तर गरम पाणी स्वयंपाक घरातून देते” असे लॉज ची मालकीण म्हणाली. पुढे तिने पुस्तीही जोडली “ कारण आता थंडीचा मौसम सुरु होतो आहे!” ही थंडीची सुरुवात असेल तर पुढे काय होत असेल असा विचार मनात आला. तसेही आता सिझन संपत आला आहे, डिसेंबर मध्ये या मार्गावर अगदी तुरळक गिर्यारोहक येतात आणि मग जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये कोणी फिरकत नाही अशी माहिती मालकाने पुरवली.

नाश्ता करून ८.३० वाजता क्यांग्झुमा कडे जाणारा चढ चढायला सुरुवात केली. वाटेत पुन्हा लौसासा लागले. तिबेटी बौद्ध लोकांचे वस्तीचे प्रमाण इथे जास्त असल्यामुळे वाटेत जागोजागी ब्राह्मी लिपीत “ओम मणीपद्मे हूं” कोरलेले पाषाण आणि शिलालेख ठेवलेले दिसतात. त्याच्या डावीकडून जायचे हा शिरस्ता इथले सगळेच पाळतात. का कोण जाणे हातातल्या काठीचे साधर्म्य मला त्या मंत्र लिहिलेल्या दगडाशी वाटले. शरीराचा तोल जाऊ नये म्हणून हातात काठी आणि मनाचा तोल जाऊ नये म्हणून मंत्रोच्चार असे वाटून गेले.

दोन तास चढाई केल्यावर सानसा नावाचा फाटा लागला. इथून उतरताना इथल्या बोर्ड कडे फारसे लक्ष गेले नव्हते. गोक्यो रि कडे जाणारा रस्ता इथून डावीकडे वर जातो. तिथे खुमजुंग गोम्पा बद्दल माहिती लिहिलेली आहे. “येती” या हिम-मानवाची कवटी या गोम्पा मध्ये जतन करून ठेवली आहे असे तिथे लिहिले आहे. “येती” या प्रत्यक्ष कोणी पहिल्याचा पुरावा नाही. त्यामुळे ती एक आख्यायिका असल्याचा समाज आहे. स्थानिक तिबेटी माणसे मात्र येती चे अस्तित्व मानतात.

क्यांग्झुमा ला पोचलो आणि पुन्हा एकदा थमसेरकु लॉज मध्ये थांबलो. चहा घेतला आणि जाताना इथे सोडून दिलेले सामान परत घेतले. इथून नामचे कडे जाताना नामचे च्या अलीकडे शेवटच्या वळणा वरून खुंबू च्या खोऱ्याचे, अमा दब्लम, ल्होत्से- एव्हरेस्ट अन ताबोचे-टोबुचे जोडगोळीचे मन भरून दर्शन घेतले. “ Bye Bye for life” हे विनायक ने त्यांच्या कडे बघून काढलेले उद्गार मात्र काळीज चिरत गेले. विचारांच्या तंद्रीत नामचे च्या व्हॅली व्ह्यू लॉज मध्ये पोचलो. आज या लॉज मध्ये कोणीच पाहुणे नव्हते. लॉज च्या मालक मालकिणीने आम्हाला ओळखले. त्यांना सर्व हकीकत साद्यंत सादर केली. संध्याकाळ पर्यंत चांगला पाहुणचार झोडीत अंधार पडताच झोपेच्या आधीन झालो.

२३ नोव्हेंबर:

सकाळी उठून आवरून ८.३० वाजता निघालो. आज उतारच उतार होता. नामचे च्या चेक पोस्ट वरून सागरमाथा नेक्स्ट च्या “कॅरी मी बॅक” योजनेची एक किलोची कचऱ्याची पिशवी घेतली. नामचे बाजार ची चढण बरी असा हा उतार वीत आणतो. वाटेत एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट वरून पुन्हा एकदा एव्हरेस्ट दर्शन घेतले आणि मग घरचा रस्ता धरला. आल्या रस्त्याने परत जात जोर्सले, मोन्जो, बेन्कर करीत टोकटोक गावी जेवणासाठी थांबलो. टोकटोक च्या अलीकडे डावीकडे नदीच्या पलीकडील तीरावर जंगलातून काही हालचाल दिसली. प्रथम ते याक वाटले . मग ते हिमालयन टार्ह आहेत असे लक्षात आले. टोकटोक च्या अलीकडे पायी मार्ग नदीपासून उंचावर आहे तिथे लावलेल्या रेलिंग ला टेकून लांबून त्यांचा सुंदर फोटो घेता आला. अतिशय गडद जांभळी तुकतुकीत त्वचा चेहऱ्यावर असलेला हा नीलगाय वर्गातला प्राणी थंडीसाठी फर असलेला ओव्हरकोट घालून मजेत वावरत होता. २०१६ साली गोक्यो रि हून परत येत असताना फोर्त्से ठेंगा पाशी अचानक हा समोर उभा ठाकला होता. पण त्या वेळेस कॅमेरा काढून फोटो घेई पर्यंत त्याने पोबारा केला होता.

टोक -टोक ला जेवण करून पुढे एक तासावर असलेले फाकडिंग गाठले आणि ताशी इन नावाच्या लॉज मध्ये पडाव टाकला. या लॉज चा मालक दावा शेर्पा तरुण चटपटीत आणि चांगले इंग्रजी बोलणे येत असलेला होता. लॉज प्रामुख्याने त्याची आई चालवत होती. तुला इतके चांगले इंग्रजी कसे काय येते असा प्रश्न दावा शेर्पा ला विनायक ने विचारला. “ मी इथे काम करतो आणि काठमांडूत सुद्धा काम करतो” असे तो म्हणाला. केवळ संधीच्या मागे धावून आपला पिढीजात व्यवसाय न सोडणारा तो महत्वाकांक्षी तरुण आम्हाला आवडून गेला. ताशी इन चे भोजनगृह सुद्धा व्यवस्थित मांडलेले, लाकडी बांधकामावर टिकाऊ वोर्निश काम केलेले, तुकतुकीत असे होते.

इथे बर्फ पडते का? असा प्रश्न मी दावा ला केला. त्यावर “ पूर्वी दर हिवाळ्यात थोडे बर्फ पडत असे. आता शक्यतो नाहीच पण कधी कधी पडते. आज काल तुम्हाला माहितीच आहे, सिझन.....” असे म्हणून त्याने वर त्या जगन्नियंत्या कडे बोट दाखवले.

संध्याकाळी निखिल, राजेंद्र आणि साजिरी शी फोनवर बोलणे झाले. तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत यशस्वी मजल मारली होती. स्वच्छ हवेत त्यांना सुंदर शिखर दर्शन आणि छान फोटो मिळाले होते. राजेंद्र आणि पराग खडबडीत पृष्ठभाग आणि त्यामुळे पराग ला होत असलेला त्रास याला कंटाळून ५३०० मीटर्स वरुन परत फिरले होते. सगळे जण उल्हासित मनाने लोबुचे ला परतले होते. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच.

फाकडिंग गावात आज कोणता तरी धार्मिक कार्यक्रम सुरु असावा. रात्री उशीरा पर्यंत त्याचे आवाज येत होते.

२४ नोव्हेंबर

छानसा नाश्ता करून ८.३० वाजता फाकडिंग सोडले. इथून लुक्ला पर्यंत सलग चढ, कमी जास्त तीव्रतेचा परंतु सलग हे त्याचे वैशिष्ट्य! परतीचा मार्ग म्हणून कंटाळवाणा सुद्धा !

सावकाश चढाई करत पुढे जात होतो. तिकडे काठमांडू मध्ये राजेश्वरच्या तब्येतीत आता चांगली सुधरणा होत होती. त्याच्याशी संपर्क सुरु होता. आज त्याला ऑक्सिजन सपोर्ट शिवाय राहून रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण डॉक्टर तपासणार होते. त्यावरून त्याला हॉस्पिटल मधून केव्हा डिस्चार्ज मिळणार ते ठरणार होते.

११.३० च्या सुमारास लोबुचे हून आमचे पाचही पांडव लुक्ला ला थेट हेलिकॉप्टर ने आले. पोर्टर आणि गाईड लोबुचे हून चालत निघाले होते आणि २५ च्या संध्याकाळी तिथे पोचणार होते.

लुक्ला चा शेवटचा चढ संपवून  आम्ही १२.३० वाजता प्रवेश कमानीतून आत लुक्ला मध्ये पाउल टाकले. आता ट्रेक संपत आला होता. थोड्याच वेळात आम्ही दोघे “द नेस्ट लुक्ला” लॉज च्या पडवीत पोचलो, पाठीवरची सॅक खाली टेकवली आणि ट्रेक संपला.

दुसऱ्या दिवशीची पहाटे ६.३० च्या विमानाची तिकिटे श्री. दम्बार ने काढून दिली होती. ती नक्की करण्याचे काम लॉज चा मालक ईश्वर याने चोख केले आणि सकाळी ७ चे विमान असेल असे सांगितले. आज लुक्ला ची हवा खराब झाली होती. दुपारनंतर एकही विमान तिथे आले नाही. त्यामुळे पूर्वी अनुभवलेली विमानांची घरघर तिथे या वेळेस अनुभवायला मिळाली नाही.

संध्याकाळी लॉज मध्ये मैफल चांगलीच रंगात आली. आमच्या सहित तिथे आलेले बरेचसे चमू ट्रेक पूर्ण करून घराकडे निघालेले असेच होते. त्यामुळे सगळेच भले रंगात आलेले होते.

२५ नोव्हेंबर

पहाटे लवकर उठून आवरून एयरपोर्ट कडे निघालो. आमचे सीता एयर चे विमान अजून आले नव्हते. तरीही रांगेत जाऊन उभे राहिलो. हळू हळू करीत तिथे गर्दी वाढू लागली. विमान येऊन सुटायला ९ वाजले. आज हवा फारशी स्वच्छ नव्हती.

रामेछाप कडे जाताना आजच्या आमच्या वैमानिकाने विमान क्वचित प्रसंगी डोंगराच्या इतक्या जवळून नेले कि खाली असलेल्या झुडूपाची पानेसुद्धा मोजता यावीत! विमान जमिनीपासून उंचावर उडते या सामान्य कल्पनेला छेद मिळाला! रामेछाप च्या मंथली विमान तळावर उतरलो तेव्हा पोटात भूक पेटली होती. तिथे पोटपूजा करून मुल्कोट कडे ताज रिसोर्ट कडे निघालो. येताना हा रस्ता अंधारात पार केला होता त्यामुळे परत जाताना त्याचे सौंदर्य लक्षात आले. नदीच्या एका तीरावरून बराच काल प्रवास केल्यावर एके ठिकाणी नदी ओलांडून दुसऱ्या तीरावरून उलटा प्रवास करीत आम्ही जात होतो. इतका लांबचा फेरा का घातला असावा हे कोडे आम्हाला न उलगडणारे ठरले.

ताज मध्ये पोचलो तेव्हा राजेश्वर चा फोन आला. त्याची तब्येत आता चांगली होती आणि त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला होता. काठमांडू मध्ये आम्ही जिथे राहणार होतो तिथे त्याची व्यवस्था दम्बार ने केली होतीच. मुल्कोट ते काठमांडू सहज जाता येईल अशी बस किंवा टक्सी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर काठमांडू स जाण्याचे ठरवले.

२६ तारखेला सकाळी निघून मजल-दर मजल करीत काठमांडू ला पोचलो आणि ठाणठणीत झालेल्या राजेश्वर शी भेट झाली. आता खऱ्या अर्थाने ट्रेक संपला आणि पुण्याकडे परत यायचे वेध लागले.

 

काही आठवणी काही नोंदी व काही निरीक्षणे:

१)      नेपाळ काठमांडू च्या आसपास मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली दिसली. त्यासाठी असलेले चार्जिंग स्टेशन्स सुद्धा दिसले. दुचाकी प्रामुख्याने चीनी बनावटीच्या आणि चार चाकी मध्ये BYD या चीनी कंपनीची इलेक्ट्रिक वाहने प्रामुख्याने दिसली.

२)      काठमांडू मधून परतीच्या प्रवास आधी दम्बार बरोबर जेवायला गेलो. नेपाळ मधील राजकारणा विषयी चर्चा निघाली. आपल्या सारखेच सगळ्या राजकीय पक्षांबद्दल “स्वार्थी” हे मत दम्बार यांनी व्यक्त केले. काठमांडू चा खासदार मात्र या पार्टी पोलिटिक्स पासून दूर असून त्यामुळेच त्याने काठमांडू मध्ये खूप सुधारणा घडवून आणल्या आहेत असे त्याचे मत होते. एकंदरीत नेपाळ मध्ये कायद्याचे राज्य नाही मुली असा बोलण्याचा सूर होता. शीता वरून भाताची परीक्षा असे म्हणतात. अर्थात किती शिते तपासली हे एकदम निष्कर्ष काढायच्या आधी बघितले पाहिजे. पान आम्हाला जी शिते भेटली त्यातून परिस्थिती जोखण्याचा अल्पसा प्रयत्न करून पहिला तो असा!

गाडीने काठमांडू कडे परत येत असताना एका गावात कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओवादी चे कार्यालय दिसले पण ते बंद होते.

३)      पांगबोचे ला हेलिकॉप्टर ची वाट बघत असता तिथे एक तरुणांचा घोळका आला. मग पत्ते, पैश्याचे पाकीट आणि हुक्का आला. ते तरुण धुराची वेटोळी सोडीत बराच वेळ पत्ते वापरून चक्क जुगार खेळत होते. डोंगरी भागात सखल सपाट जमीन दुरापास्त, त्यामुळे व्होलीबोल हा तरुणांचा लोकप्रिय खेळ. पांगबोचे ला नुकतीच व्हॉलीबॉल ची स्पर्धा होणार होती. रु. ५ लाख इतकी बक्षिसाची रक्कम जाहीर असलेली. ती खेळण्यासाठी हा तरुणांचा घोळका आला आहे असे आमचा घोडेवाला निमा शेर्पा म्हणाला. यांना आज काम नसल्यामुळे ते जुगार खेळत आहेत हे त्याचे स्पष्टीकरण होते. परंतु डोंगरी भागात धूम्रापानाचे प्रमाण लक्षणीय आहे. किंबहुना धूम्रपान न करणारा तरुण इथे सापडणे अतिशय दुरापास्त आहे.

४)      घोडा किंवा याक् सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरले जातात परंतु नाजूक सामान जसे कि तयार खाद्य पदार्थ आणि मोठ्या वस्तू जसे कि प्लायवूड, पत्रा इ. ची वाहतूक माणसांच्या पाठीवरून केली जाते. सामान्यपणे हे पोर्टर २० ते २५ किलो सामान उचलून नेतात. तसे गिर्यारोहकांचे समान उचलून नेणारे पोर्टर सुद्धा २०-२५ किलो समान सहज उचलून नेतात. परंतु दोघांच्या राहणी मानात थोडा फरक जाणवतो. गिर्यारोह्कांशी संबंध येणारे पोर्टर पायात बर्यापैकी बूट आणि अंगात चांगले कपडे परिधान करताना दिसतात. कदाचित त्यांनी सेवा दिल्यावर त्यांना याचा लाभ होत असावा.

५)      डोंगरी भागातील शेती अगदी लहान क्षेत्रफळ असलेली. तिथे शेतीच्या कामात कोणी प्राणी जुंपलेला दिसला नाही. सगळी मानवी श्रमाची कामे. पान काही ठिकाणी कापणीसाठी इलेक्ट्रिक वर चालणारे कटर्स वापरताना दिसले.

६)      इथली छोटी मुले नकट्या नाकाची गोबऱ्या गालांची. चेप्लुंग गावातून परत येताना दोन अडीच वर्षाच्या एका मुलाशी विनायक ने हस्तांदोलन केले. आश्चर्य म्हणजे न बुजता त्यानेही त्याचा स्वीकार केला. नंतर बराच वेळ त्या मुलाच्या चेहऱ्यावर काही तरी मिळवल्यासारखा आनंदी भाव विलसत होता.

७)      नेपाळी लोक आनंदी, गाण्या बजावण्याचा शौक असलेले लोक आहेत. जिथे जिथे टीव्ही बघायला मिळाला तिथे तिथे “सवाल-जवाब” सारखा कार्यक्रम ते पाहताना दिसले. एकंदरीत ट्रेक रूट वर स्थानिक माणसाकडे एकतर ब्लू टूथ स्पीकर वर नाही तर मोबाईल फोनच्या स्पीकर वर गाणी लावलेली असत.