असेच दिवाळीचे दिवस
होते. सकाळीच संदीपचा फोन आला. एकदिवसाचा ट्रेक मारुयात म्हणून. पुण्याच्या
परिसरातील किल्यांच्या यादीवरून नजर फिरू लागली. अखेरीस लिंगाणा सर करण्याचा बेत नक्की
झाला. दुपारी मोटरसायकलवरून निघू. रात्री पोचू हरपूडला. मुक्काम करून सकाळी
चालायला लागू, संध्याकाळी परत असा बेत ठरला. सवंगड्यांची शोधाशोध सुरु झाली.
इतक्या थोड्या वेळेत तयार होणारे दोघेच भेटले, अतुल आणि जयवर्धन. दोन मोटरसायकल आणि
चार स्वार. दुपारी ३ ला निघायचं ठरवून बरोब्बर सायंकाळी ६.३० ला निघालो. निघताना
सकाळच्या नाष्ट्यासाठे पोहे, तेल, मीठ-मोहरी घेतली. भांडयाची व्यवस्था तिथेच करू
असे ठरले. चेलाडी फाट्याला पोचेपर्यंत अंधार पडला. वेल्ह्याच्या रस्त्यावर जाताना
विन्झरच्या पुढे संदीपच्या गाडीला छोटासा अपघात झाला. पण पुरोगामी विचारांच्या
आम्हा चार तरुणांनी त्यामागे काही शकून आहे का अपशकून हा प्रश्न मनातून साफ काढून
टाकून गाड्या पुढे पिटाळल्या. वेल्ह्याला पोचेपर्यंतच रात्रीचे ८.३० झाले.
रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी भुंकून
आमचे स्वागत केलं. वेल्हे एक छोटस गाव, तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं. तिथ
प्रथम दिसलेल्या हॉटेलमध्ये जेवण घेतलं आणि हरपूडच्या रस्त्याची चौकशी केली. वेल्हे गावाच्या पुढे कादवे
गावाकडे रस्ता जातो. तोरण्याच्या बुधला माचीला वळसा घालत जाणारा हा रस्ता. वेल्हे
गावानंतर भट्टी गाव आणि नंतर या रस्त्यावर एक खिंड येते तिथून उजवीकडे गेलं की तो
रस्ता हरपूडला जातो अस त्या गावकर्यान सांगितलं. रस्ता उखडलेला आहे, मुक्कामी एस. टी.
बंद झाली आहे, “रातीच जाऊ नका” असा सल्लाही दिला. पण आमच्या जवळ वेळ मर्यादित आणि उत्साह अमर्यादित होता.
आम्ही अंधारातच हरपूड च्या दिशेने प्रस्थान ठेवले. खिंड ओलांडली आणि उजवीकडे
वळालो. मोटरसायकलच्या दिव्याच्या प्रकाशात काय दिसेल तोच रस्ता. किंबहुना जी वाट
दिसतेय त्याला रस्ता म्हणायचा. बाकी मिट्ट काळोख. या सख्या सहोदर सह्याद्रीच्या
कोणत्या धारेवरून आम्ही जातोय हे कळायला काही मार्ग नव्हता. वाटेत एखाद दोन नाले
लागले. अंधारात त्यातून गाड्या घालण धोक्याच होता पण तेही केलं, न डगमगता!
अखेरीस रात्री ११.४५
च्या सुमारास एक उतरत्या छप्परच घर सामोरं आल आणि त्यासमोरच्या पटांगणात तो
ठेचकाळलेला रस्ता संपला. आसपास कुठेही कोणतीही नावाची पाटी दिसत नव्हती. थोड्या
दूरवर घरं होती, एखाद्या वाडीची खूण असलेली, पण या वेळेस पत्ता विचारायला कोणी
जागे असणार नव्हतं. शरीर हिंदकळून बेजार झालेलं. डोळ्यावर झोप येऊ लागलेली.
त्यामुळे इथेच मुक्काम टाकू, उद्या बघू आपण कुठे आहोत ते असा विचार करून आम्ही
गाड्या उभ्या केल्या आणि त्या घराच्या दिशेने गेलो. दार लोटलेलं होत, ते ढकलून आत
गेलो, “कोणी आहे का?” संदीप ने खड्या आवाजात सवाल टाकला. विजेरीच्या उजेडात समोर पाटी दिसली “ एक शिक्षकी विद्यालय, हरपूड.” आम्हाला मुक्कामी पोचल्याचा कोण आनद झाला! “पोचलो रे” ची हाळी उमटली. हरपूड गावाचं ते कालभैरवाच मंदिर होत.
ऐसपैस सभामंडप असलेल. गावातील एक शिक्षकी शाळा तिथंच भरत असणार. कोपर्यात एक फळा
आणि भिंतींवर अ,आ,ई चे तक्ते, भारताचा आणि जगाचा नकाशा, गणिती नियमात बांधलेले
पाढ्यांचे तक्ते दिसत होते. आढ्याला महात्मा गांधीजी, स्व. लाल बहादूर शास्त्रीजी,
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोफ्रेम्स आणि त्याच्या खाली शिक्षकांचं बसायचं
टेबल व खुर्ची असा जामानिमा. बाकी सभामंडप स्वच्छ आणि फारस सामान नसल्यामुळे
रिकामा होता. विंचवा काट्यापासून सुरक्षिततेची खात्री करून आम्ही पडण्यासाठी जागा
निवडली आणि पथार्या पसरल्या. त्या निरव शांततेत डुंबून जाणार एव्हढ्यात बाहेर पावलांचे
आवाज आले. खांद्याइतक्या उंचीच्या भिंतीवर
तरटाची जाळी लावलेली होती. त्यामागे काही मानवी आकृत्या आणि त्यांच्या हातात
काठ्या दिसल्या. त्यांच्यात कुजबूज चालू होती. ”कोण आहे? काय पाहिजे?” अतुल धीर एकवटून ओरडला. “ तुमी कोन? कुठून आला? हिथं काय काम?” पलीकडून प्रतिप्रश्न आला. गावकरीच असावेत
बहुतेक असे म्हणत उठलो. सरळ दरवाजा उघडला. समोर १०-१५ गावकरी, कंदील घेऊन आणि
काठ्या घेऊन आलेले. “ आम्ही पुण्याहून आलोय, चार जण आहोत, विद्यार्थी आहोत, पुण्यात शिकतो. उद्या
लिंगाणा किल्ला करायचा बेत आहे” एका दमात सगळं सांगून टाकलं. त्या शाळेचे शिक्षक मग पुढे आले. या आड गावात
सुद्धा दरोडेखोरीसारखे प्रकार घडताहेत त्यामुळे मोटारसायकलचा आवाज ऐकून, हे सर्व
गावकरी सावध होऊन पुढे आले होते. आम्ही सभ्य असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर
ते जायला निघाले. इतकी रात्र होऊनसुद्धा आमच्या जेवणाविषयी चौकशी करायला ते विसरले
नाहीत. एव्हढ्या रात्री त्यांची झोपमोड झाल्याबद्दल आम्ही क्षमा मागितली. दार
लावून घेतलं आणि लगेचच रातकिड्यांच्या आवाजात आमचा घोरण्याचा आवाज मिसळू लागला.
पहाटे जाग आली ती
रहाटाच्या कीरकीरीमुळे. त्यापाठोपाठ पोराटोरांचा गलका ऐकू आला. पथारी आवरली,
पूर्वाभिमुख असलेल मादिरच दार उघडून बाहेर आलो. समोर सूर्यदेवाच आगमन झालेलं होत.
आपण कुठे आहोत याचा दिशाज्ञान आता होत होतं. मंदिराच्या डाव्या बाजूस विहीर होती,
तिथं बाया बापड्यांची पाणी भरण्यासाठी लगबग चालू होती. समोर १५-२० पोर, वेगवेगळ्या
वयोगटातील. आमच्या मोटारसायकलला हात लावून बघत होती, आरश्यात डोकावून बघत होती.
त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कुतूहल दिसत होत. आम्ही उठलो, विहिरीवर गेलो.
चांगली बांधलेली विहीर. पाणी फार खोल नव्ह्त. एका मायेनं आम्हाला पोहरा दिला.
त्यान पाणी शिंदून तोंड, हात पाय धुतले. मंदिराच्या पडवीत येऊन टेकतोय इतक्यात काल
भेटलेले शाळा शिक्षक भेटायला आले. आता आमची चेहऱ्याने नवीन ओळख होत होती. काल
रात्री भेटलो पण दोघांना चेहऱ्याची फक्त बाह्य रेषाच काय ती दिसली होती. शिक्षक
आल्यामुळे पोर थोडीशी बुजली. थोडीशी ओळख पाळख झाल्यावर त्यांना या मुलांच्या
कुतूहलामागचं कारण विचारलं. ते म्हणाले गावात टी .व्ही. आहे. त्यामुळे या मुलांनी
मोटारसायकलची जाहिरात बघितली आहे. पण पक्का रस्ता नसल्यानं त्यानी प्रत्यक्ष
मोटारसायकल बघितलेली नाही. आम्ही अचंबित झालो. पुण्यापासून अवघ्या ६० कि.मी
अंतरावरची ही कथा. ‘अशिक्षित ग्रामीण’ मुलाचं अज्ञान म्हणून आम्ही फार भानगडीत
पडलो नाही.
सरांशी पुढच्या
कार्यक्रमाविषयी चर्चा झाली. आणि आम्ही आवराआवर करून पुढे निघायची तयारी सुरु
केली. “वाट दावाया ह्याला घिऊन जावा की” डोईवरून पदर घेतलेली एक माय दाराआडून म्हणाली. “तो” तिचा मुलगा त्या अर्ध्या भिंती आडून टाचा उंचावून
आमच्याकडे बघत होता. “जरूर नेऊ की, काय रे नाव तुझ?” आता संदीपन त्याचा चार्ज घेतला. तो मुलगा आत आला. साधारणपणे १०-१२ वर्षाचा
असेल. स्वच्छ धुतलेला पण थोडासा चुरगळलेला शाळेचा गणवेश. डोक्यावरचे केस तेल लावून
चोपून बसवलेले. किडकिडीत पण काटक बांधा. पायात चप्पल नाहीच. गळ्यात काळ्या दोर्यात
बांधलेलं देवाचं चिन्ह. “ मी गन्या” त्यान ओळख करून दिली. त्याच पूर्ण
नाव, इयत्ता इत्यादी चौकशी झाली. “गणेश बबन भिंताडे, राहणार हरपूड.” पोरगं चुणचुणीत होत. छोट्याश्या भेटीत त्याची आमच्याशी चांगली ओळख झाली.
त्याला बरोबर न्यायचं ठरल्यावर आमचा ‘पोहे करण्यासाठी भांडे कुठले?’ हा
प्रश्नसुद्धा सुटला. त्याच्या “माय”चा निरोप घेऊन आणि त्याच्या घरून ‘जर्मल’चे भांडे घेऊन आम्ही पायपीट सुरु
केली. थोड्याच वेळात हरपूडची वस्ती मागे
दिसेनाशी झाली. पूर्वेकडे तोरण्याची बुधला माची दिसत होती आणि लवकरच समोर रायगड
दिसू लागला. या घाटमाथ्यावर छोट्या छोट्या वाड्या आहेत. फार मोठ्या वृक्षांचे जंगल
इथे टिकत नाही. तसेच लांबच लांब पसरलेली शेतही नाहीत. सह्याद्रीच्या माथ्यावरच्या
या वावरातून फक्त एक वेळ भात किंवा नागली च पीक येत. वाटेत ओलांडलेल्या खाचरातली
भाताची कापणी आणि मळणी झालेली होती. शिवारात भाताच्या रोपांचे खुंट पसरले होते. गण्या
या प्रदेशाचा माहितगार होता. गुरं चारायला तो या प्रदेशातून लांब लांब पर्यंत
हिंडलेला होता, अर्थात मित्रांसमवेत. तास दीड तास पायपीट झाल्यावर डाव्या अंगाला
एक भरगच्च झाडीचा प्रदेश दिसू लागला. प्रामुख्यान बांबूची बेटं. ‘हि आमच्या गावाची
देवराई’, गण्यानं माहिती पुरवली. “बा सांगतो की हिथ लाकड तोडायची न्हाईत, पाप लागतं” गण्या म्हणाला. पाप-पुण्याच्या कल्पनांविषयी चर्चा
करून देवराई सारख्या चांगल्या कल्पनांबद्दल त्याचं मन कलुषित करावं असं आम्हाला
वाटलं नाही.
चांगले दोन तास
चालून गेल्यावर एक धनगर वाडा लागला. तिथे डोकावलो. एका घरात एक छोटा मुलगा, तापानं
फणफणलेला, त्याची आई जवळच बसलेली. बाप कुठेतरी वेल्हे गावात औषध आणायला गेलेला.
आम्ही आमच्या जवळ असलेल्या क्रोसिनच्या गोळ्या दिल्या. ‘काहीतरी पोटात गेल्यावर घे’
असं म्हणालो त्यावर त्या गरीब धनगर स्त्रीनं कसंनुसा चेहरा केला. वाईट वाटलं. त्या
घराच्या छोट्याश्या दारातून वाकून बाहेर पडलो. कधी कधी अस वाटतं की आभाळच फाटलंय,
आपण कुठे कुठे ठीगळ लावत फिरणार?
हा परिसर येतो पुणे
जिल्ह्यात पण जवळच शहर आहे महाड. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला कावड करून
वेल्हे गावात अन मग जीपनं नसरापूर किंवा पुण्यात न्यावं लागतं. नाहीतर
सिंगापूरच्या नाळेतून उतरून छत्री-निजामपूर आणि तिथून महाड गाठावं लागतं अशी
माहिती गण्यानं पुरवली. अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय आणखीनही महत्वाच्या गरजा
जगण्यासाठी आवश्यक असतात याचं हे शिक्षण आम्हाला मिळत होत.
धनगर वाड्याच्या
खालच्या अंगाला पाणवठा होता. जवळच एक दोन झाड होती. थोडी विश्राती घ्यायच ठरलं.
संदीप आणि अतुलनं तीन दगडांची चूल मांडली. गण्या मदतीला होताच. मी आणि गण्या सरपण
आणण्यासाठी आसपास पसरलो. सरपण गोळा करता करता गण्या प्रश्न विचारत होता. त्याला
साहजिकच पुण्यातल्या जीवनाविषयी कुतूहल होत. त्यान आजपर्यंत शहर बघितलं नव्हतं.
त्याच्या लेखी नसरापूर हेच सर्वात मोठ्ठं गाव होत. विमान त्यान फक्त आकाशात बघितलं
होत. नाही म्हणायला टी. व्ही. वर त्यानं बर्याच गोष्टी बघितल्या होत्या, पण त्या
सर्व खर्या नसतात असा त्याच्या “गुर्जीं” नी सांगितल्यामुळे तो त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे “गुर्जी” कोण अस मी त्याला विचारल. शाळेत शिकवतात ते मास्तर आणि
पंधरवड्याला कीर्तनाला येतात ते गुरुजी त्यान माहिती पुरवली.
सरपण गोळा झाल.
संदीपनं चूल पेटवली. आणि जयवर्धन ला पाणी घेऊन येण्यास फर्मावलं. जयवर्धन, आम्हा
चौघात सर्वात लहान. नुकताच पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला. तो भांडे घेऊन
पाणवठ्यावर गेला.आणि भांड्यातून पाणी आणायच्या ऐवजी “हे बघ मला एक वेगळाच प्राणी दिसला असे म्हणत
हातात काहीतरी घेऊन आला. काय आहे हे आम्हाला कळण्याआधीच “आर दादा, चावंल!” अशी आरोळी ठोकत गण्यान त्याचा हात उडवला. कष्टाची सवय नसलेल्या जयवर्धनच्या मऊ
मुलायम हातावर तो प्राणी निवांत बसला होता. खाली दगडावर पडताच त्यान रौद्र रूप
घेतल, पण प्रसंगावधान राखून दगडाच्या सापटीत तो गायब झाला. पूर्ण वाढ झालेला तो एक
काळा विंचू होता. जयवर्धन विस्फारलेल्या डोळ्यानं ते नाट्य बघत राहिला. ‘सुशिक्षित
शहरी’ माणसाच्या अज्ञानाची ओळख आम्हाला झाली.
या घटनेची चर्चा आणि
गाण्यानं सांगितलेल्या साप विंचवाच्या सुरस व चमत्कृतीपूर्ण गोष्टी यात वेळ जात
पोहे तयार झाले. इथे प्रत्येकाला प्लेट वगैरे थाटमाट नव्हता. सुलेमानी पद्धतीने
त्याच भांड्यात हात घालत आम्ही ते फस्त केले. गण्याही मागे नव्हता. आत्तापर्यंत
११.३० वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता. वातावरणात काहीही गारवा उरला नव्हता.
भांडे धुवून आणि चूल शांत करून आम्ही पुढे निघालो.
आता समोर दक्षिणेला
लिंगाण्याच टोक खुणावू लागल. उजव्या हाताला रायगडाचा माथा दिसत होता. आमच्या डाव्या हाताला थोडीशी १५-२० घरांची वाडी दिसली.
ही सिंगापूर वाडी. याच्या पुढे जी खिंड दिसते ती सिंगापूरची नाळ. कोकण आणि घाटमाथा
जोडणाऱ्या अनगड वाटांपैकी एक. पण बर्यापैकी वहिवाट असलेली, त्यातल्या त्यात सोपी.
सिंगापूर हे गाव शिवकालीन किंवा कदाचित त्याही आधीचे आहे. आपल्या महाराष्ट्रात
निसर्ग सौंदर्यानं नटलेलं एक “सिंगापूर” आहे हे बर्याच लोकांना माहित नाही.
या सिंगापूरच्या
नाळेच्या उजव्या अंगाला थोड्या अंतरावर आजून एक खिंड आणि पाण्याची वाट आहे. त्याला
बोराट्याची नाळ म्हणतात. ही वाट चांगलीच अवघड श्रेणीत गणली जाते. बोराट्याच्या
नाळीतून उतरणारी वाट थेट लिंगाणा माची गावात जाते. लिंगाणा किल्याच्या माचीवरच हे
गाव. तिथून पुन्हा खाली उतरलं की माग छत्री-निजामपूर गाव. लिंगाणा हा काही लढाऊ
किल्ला नाही. उन, वारा, पावसाच्या माऱ्यान आणि निसर्गाच्या करामतीन मुख्य डोंगर
कड्यापासून विलग झालेला पण कड्यापासून अगदी थोडे, जवळ पास १०० फुटांचे अंतर राखून
असलेला तो एक सुळका आहे. या सुक्यावर चढाई करणे हे एक आव्हान आहे. गिर्यारोहणाची
साधने न घेता हे साहस करूच नये.
आम्ही गण्याच्या
मागून चालत होतो. तो उजव्या अंगाची डोंगर रांग चढू लागला. “ अरे गण्या आपल्याला खाली बोराट्याच्या नाळेत
जायचय ना?” अतुलन त्याला विचारलं. “इथून रायलिंगच्या कड्यावरून एकदा लिंगाणा बघा तर फार सुंदर दिसतो मंग उतरुयात” गण्या उत्तरला. आम्ही त्याच्या मागून चालू
लागलो. लिंगाणा जवळ येत होता तसं तसं पुढच्या दरीची खोली अधिक अधिक स्पष्ट होत
होती. दूरवर रायगडचा पायथा आणि टकमक टोकाच्या खालचं निजामपूर गाव दिसू लागलं. आणि
बघता बघता आम्ही एकदम कड्याच्या काठावर येऊन पोचलो. समोर तीन-साडेतीन हजार फूट खोल
दरी. आणि फटकून उभा असलेला तो लिंगाण्याचा सुळका. भितीनं मटकन खाली बसलो.
कड्यावरून ओणावून खाली पाहिलं. लिंगाणामाची गाव दिसत होत. लिंगाण्याचा कातळ कडा
रौद्रतेची कल्पना देत होता. त्या कड्यावरच्या गुहा स्पष्ट दिसत होत्या. या गुहांचा
उपयोग शिव काळात कैदी ठेवण्यासाठी होत असे. नंतरच्या काळात अगदी इंग्रजांनी सुधा
लिंगाणा किल्यावर कैदी ठेवल्याचा उल्लेख सापडतो. वारं पडलेलं होतं त्यामुळे
लिंगाण्याचं ते रौद्र रूप विस्फारलेल्या डोळ्यानं पाहता आल. बोराट्याच्या नाळीतून
लिंगाणा इतका सुंदर दिसत नाही म्हणून तुम्हाला इथे आणलं, चला आता नाळीत उतरूयात,
गण्या म्हणाला. भर उन्हातून ४ तास पायपीट केल्यामुळे आम्ही दमलेलो. रात्री पुण्यात
परत जाण्याच बंधन पण होतंच. त्यामुळे नाईलाजानं त्याला परत फिरण्यासाठी सुचवलं. तो
थोडासा हिरमुसला. लिंगाण्याच्या सुळक्याचं सुंदर दर्शन घडल्याबद्दल आम्ही त्याचं कौतुक
केल, आमचा चॉईस चुकला नव्हता. आमच्या प्रशंसेमुळे तो जरा सुखावला आणि परत जायला
तयार झाला.
परतीच्या वाटेवर तो
एकदा कुरकुरला, “तुमी इथपत्तूर आला आन म्या तुमाला माची धाख्वू शकलो न्हाई हे माझ्या मायला
सांगू नगा.” “ का रे?” मी विचारलं. “ आमच ध्यान, एक गोष्ट जमत न्हाई याला, आस म्हणून माय तनतनेल” गण्या
म्हणाला. “ नाही रे नाही सांगणार, झाल तर मग” आम्ही त्याला दिलासा दिला.
अचानक त्यान एक
प्रश्न विचारला “दादा, कर्म म्हंजे काय व्हो?” मी दचकलो. १० वर्षाच्या मुलाकडून असा प्रश्न अपेक्षित नव्हता. गीता समजून
घेण्याची किंवा त्यातील रहस्य उकलण्याची पात्रता अंगी नसल्यानं मी किंवा आमच्या
चौघांपैकी कोणीच त्या वाटेला गेलो नव्हतो. “कर्म म्हणजे काम, जे आपण करतो ते” आमच्या मते जेव्हढे सोपे उत्तर असू शकेल ते
आम्ही दिले. “ पण तुला हा प्रश्न का पडला?” जयवर्धनने त्याला विचारले. “न्हाई गुर्जी म्हनले, गन्या कर्म कर” , “ मग तू काय केलेस?” “ म्या म्हनलो गुर्जींना, लई कष्ट हुतात, सकाळचं उठायचं, गुरांना चारा घालायचा,
मांग दूधं काढायची. मग त्यांना चराया न्यायचं, त्यातून मास्तर बलवत्यात तवा शाळा
करायची, मांद्याळ काम करतोच की. आता काय बाकी ठीव्लाय?”, “असं मग गुरुजी काय म्हणाले?”, “ न्हाई ते म्हनत्यात की अरे गन्या जे काम करतोयस त्यात लक्ष हायका? दुध काढतोस
तवा जांभया देतोस, गुर चाराया जातोस तवा शाळेचा इचार करतोयस आणि शाळेत येतोयस तवा
गुरांचा. आर आसं कस चालेल. कामात तल्लीन व्हता आल पायजे बघ. त्यालाच कर्म म्हणतात.
तवाच देव भेटतो रे बाबा.” ; “भौऊ ह्ये तल्लीन होनं म्हंजे काय व्हो? म्हंजी भजन गाताना त्ये विणेकरी जसे
डोलतात त्येच का? म्हंजी काम कशासाठी करायचं ते ध्यानात ठेवायचं का आजून काही?” गण्यान आमची विकेट उडवली. त्याच्या प्रश्नच
समर्पक उत्तर आमच्या कडे नव्हतं. विचारांच्या तंद्रीत चालत चालत आम्ही हरपूड ला
पोचलो तेंव्हा संध्याकाळ झाली होती. गण्याच्या मायन आमच्या ग्लासभर दूध तापवून
ठेवल होत. त्यांचे आभार मानले, गण्याला बक्षिसी दिली आणि भराभरा आवरून आम्ही
पुण्याच्या दिशेने निघालो, पुन्हा त्या ठेचकाळलेल्या रस्त्यावरून. आम्हाला निरोप
द्यायला गावकीतील ती मुलं आणि गण्या हजर होते.
बरोबर अठरा
वर्षापूर्वीची ही गोष्ट. पुढे व्यवस्थापन शास्त्र शिकताना एक विचार आम्हाला शिकवला
“ प्रत्येक काम करताना त्याच्या ग्राहकाचा किंवा
अंतिम लाभार्थीचा विचार केला तर परिणाम अधिक चांगले साधले जातात.” असा. गण्याच्या गुरुजींनी सांगितलेलं तत्वज्ञान यापेक्षा थोडं वेगळे होत असा पदोपदी
जाणवायचं, सोप्या भाषेत त्यानी कर्मयोग सांगितला होता.
नुकतीच एकदा कादवे
गावाकडे चक्कर टाकली. रस्ता झालाय अस कानावर आलं म्हणून. पक्का रस्ता नावालाच,
ठिकठीकाणी डांबराची ठिगळ नुसती. मध्येच जरा बरा रस्ता. आसपास बर्याच ठिकाणी आता “रिसॉर्ट” झालीत. गावागावत विकास पोचवण्याच्या हेतूने केलेले पक्के
रस्ते. त्याचा मूळ हेतू बाजूला ठेवत कोणाचा तरी स्वार्थी “हेतू” मात्र सध्या झालेला आहे हे जाणवत होत. “या रस्ते बांधणाऱ्यान त्याचा कर्म नीट केलेलं
नाही”, माझा सहप्रवासी उद्गारला. याच परिसरात ऐकलेलं गण्याच्या तोंडच ज्ञान मला
आठवल.
कदाचित म्हणूनच आज
४२ व्या वाढदिवसाच्या दिवशी पहाटे घड्याळानं उठण्याचा आदेश देण्याच्याही आधीच
आठवणीच्या कवाडातून टाचा उंच करत गण्या डोकावला. अठरा वर्षापूर्वी डोकावला तसाच.
आज तो कुठे असेल माहित नाही. त्याच्या “गुर्जींची” आमची कधी भेट झाली नाही. त्यानी सोप्या शब्दात सांगितलेला कर्मयोग आत्ता कुठे
हळू हळू समजतोय!