Friday, December 4, 2015

निमित्तमात्र...

भाटघरच्या जलाशयातून उगवणारं सूर्यबिंब राजगडाच्या बालेकिल्यातून बघून झाल्यावर आम्ही संजीवनी माचीचा रस्ता पकडला. अळू दरवाज्यातून उतरून भूतोंडे गावाच्या दिशेने चालू लागलो. भूतोंडे- चांदवण करत कुंबळी गावाला पोचेपर्यंत रात्र झाली. वाडीवरच्या भटक्या कुत्र्यांनी आमचं स्वागत केलं. गावातील एकमेव मंदिर छोटंसं असल्यानं वस्तीला सोयीचं नव्हतं. त्यामुळे गावच्या पाटीलांनी आम्हाला त्यांच्या घराच्या पडवीतच मुक्काम करण्याविषयी सुचवलं. पडवीच्या पलीकडेच दावणीला गुर बांधलेली होती. तिथंच रात्र काढूयात, उद्या सकाळी गोप्या घाट उतरला की आलीच समोर शिवथर घळ, आमचा बेत ठरला. पाटलीणबाईनी स्टोव्ह देऊ केला. त्यावर मुगाच्या डाळीची खिचडी शिजवली आणि त्यावर ताव मारला. भांडे धुवून आवरा आवर करून पथारी पसरणार एवढ्यात पाटील जातीने चौकशीला आले. आम्ही तिघांनी आमची ओळख करून दिली. राजगडाहून शिवथरघळीपर्यंत पायी जायचा बेत आहे,  उद्या गोप्या घाटातून जाणार आहोत आमचा ट्रेकचा बेत सांगितला. पाटील पुण्याच्या तरूणाईशी परिचय असणारे होते त्यांनासुद्धा अश्या आडवाटा चोखाळणार्यांच कौतुक होतं.
त्या दिवशी त्यांच्याकडे सोयरिकीच बोलण करायला दोन पाहुणे आले होते, भूतोंडे गावाकडून. ते आतूनच आमचा बोलणं ऐकत होते. आम्ही शिवथरकडे जातोय असे ऐकल्यावर ते बाहेर आले अन म्हणाले हितून लई लोक जात्यात तुमच्यासारखे, आमची जिंदगी गेली पर आम्ही गेलो न्हाई. पाटील येकदा जाया होवं. न्हाईतर आपन राह्याचो कोरडेच”. “ चला आमच्या बरोबर, आम्हाला सोबत होईल संदीप म्हणाला. पाटील हसले. उद्याच्याला चा च्या टायमाला बोलू. निजा आता म्हणाले आणि पाहुण्यांसहित आत गेले.
दिवसभर चालून दमलेले आम्ही तिघे पडवीतच गाढ झोपी गेलो. पहाटे झुंजूमुंजू होताच कोंबडा आरवला त्यानं जाग आली. आवरून घेतल, सॅक भरून निघायची तयारी केली. पाटलीणबाईंनी चहा दिला. तो घेऊन आणि त्यांना धन्यवाद देऊन गोप्याच्या खिंडीकडे निघालो. थोडा चढ, घनदाट झाडी आणि मग गोप्या घाटाची अरुंद खिंड. खिंडीत जरा टेकलो तर मागून आवाज आला पाव्हणं दमलं व्हय? मागे बघतो तर पाटील आणि त्याचे दोन पाहुणे. म्हन्ल आजच उरकून घिऊ. किती दिस नुस्त जायाच, जायाच म्हून काडनार. पाटलांनी खुलासा केला. आम्हाला मागे टाकून ते घाट उतरून निघाले देखील. आमच्या चालीच्या मानानं त्यांची मावळी चाल खूपच वेगाची होती. घाटाखालच्या जंगलात ते दिसेनासे झाले.
आम्ही घाट उतरून सपाटीला लागलो तेंव्हा ते तिघे उलट येताना दिसले. जवळ येताच त्यांनी रामराम केला. संदीपकडे बघून म्हणाले तुमी म्हन्ला म्हनून जाल बघा.” . संदिपचं कालच पोकळ निमंत्रण निमित्तमात्र होत. पण ते एक कारण ठरल त्यांना समर्थांच्या दर्शनाचं समाधान मिळवून देण्यात. आम्ही हसलो, त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो.
अश्या अनेक गोष्टी घडतात जेव्हा आपण असतो केवळ निमित्तमात्र. किंबहुना सगळ्याच गोष्टी अश्या असतात जिथे आपण असतो केवळ निमित्तमात्रच!

मला पेपर मध्ये वाचलेली एक बोधकथा आठवते, स्वामी रामकृष्ण परमहंसांची. एकदा त्यांनी शिष्यांना उपदेश करताना अस सांगितल जाऊ का नको जाऊ असा प्रश्न पडेल तेंव्हा ‘जा’ आणि खाऊ का नको खाऊ असा प्रश्न पडेल तेव्हा ‘नको खाऊ’, या दोन उत्तरात सगळ आल.  आपल असण हेच निमित्तमात्र असणं हे याच्याशी थेट संबंधीत आहे, खरय ना? 

No comments:

Post a Comment