Sunday, November 29, 2015

भोजपूर.....

कामानिमित्त भोपाळला जवळ असलेल्या मंडीदीप औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो. शुक्रवारी काम लवकर संपले म्हणून हॉटेलमधील परिचारकाला जवळपासच्या दर्शनीय स्थानांविषयी विचारल. त्यान सुचवल आणि त्याची मोटरसायकलसुद्धा देऊ केली. आम्ही दोघे मंडीदीपहून भोपाळच्या दिशेने निघालो. बेटवा नदी ओलांडल्यावर समरधा गावातून आम्हाला उजवीकड्चा रस्ता मिळाला. या छोट्याश्या गावात सिमेंट क्रांती झाल्यामुळे आता धुळीचे रस्ते उरलेले नाहीत. गटारं उघडी असली तरी रस्ते आणि एकूण परिसर एकदम स्वच्छ होता. गाव ओलांडल्यावर भाताची शेती लागली. बर्याच खाचरातील भात कापाणी झालेली दिसत होती. आपल्याकडे मावळात भाताची कापणी हाताने होते, कापणार्याच खुरपं अगदी मुळाजवळून फिरतं. इथे ही रोपे जमिनीपासून वीतभर अंतरावर कापलेली दिसत होती. पुढच्या एका शेतात हार्वेस्टर दिसला आणि खुलासा झाला. भात शेती मध्ये हार्वेस्टर सारखे यंत्र वापरता येईल अशी शक्यता कमी क्षेत्र असलेल्या मावळात आणि कोकणात दिसत नाही.
वळणा वळणाचा रस्ता कापत आम्ही साधारणपणे अर्ध्या तासात मुख्य भोजपूर रस्त्याला लागलो. भोजपुरचे हे मंदिर, ज्याचे नाव भोजेश्वर असे नोंदले गेले आहे, ते जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे इथे जाण्यासाठी चांगला दुपदरी रस्ता आहे. साधारणपणे पाउण तासानंतर डाव्या बाजूस दूरवर लाल दगडातून बांधलेले मंदिर दिसायला लागले. जस जसे जवळ येत गेले तसे त्याची भव्यता नजरेत भरू लागली. अनपेक्षितपणे  एक सुंदर कलाकृती बघायला मिळणार याचा आनंद वाटू लागला.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ पासून ३० किलोमीटर अंतरावर भोजपूर नावाचे हे गाव. राष्ट्रकूट शाखेतील परमार वंशाचा राजा प्रथम भोजदेव (इ.स. १०१० ते १०५५) याने हे गाव वसवलं. या गावी त्यानं एक सुंदर आणि भव्य अस शिवमंदिर बांधायचा संकल्प केला. इतिहासाला अनाभिद्न्य अशा कोणत्या तरी कारणानं ते अपूर्ण राहीलं. या मंदिराचा गाभारा बांधून पूर्ण झाला आणि त्याकाळच्या प्रगत स्थापत्य शास्त्राची साक्ष देत आजही जवळपास १००० वर्षांनंतर उभा आहे.
राजा भोज, ११ व्या शतकातील एक विख्यात राजा, पुराणपुरुषच! माळवा प्रांताचा तो अधिपती होता. भोज राजाने या परिसरातील ९ नद्या व नद्यांना जोडणारे ९९ मोठे ओढे यांवर धरणे व बंधारे बांधले ज्यामुळे हा प्रदेश सुजलाम् सुफलाम् होऊन गेला. भोज राजा हा कुशल सेनानी होताच पण त्याबरोबरच तो उत्तम स्थपती आणि शिल्पकलेचा चाहता होता. त्याने अनेक ग्रंथ सिद्ध केले. समरांगण सूत्रधार या त्याच्या ग्रंथात त्याने मंदिरे, प्रासाद आणि किल्ले बांधणीविषयी मौलिक माहिती लिहून ठेवली आहे. भोज राजाच्या आधी भोजपूर गाव असल्याचा काही पुरातत्वीय उल्लेख सापडत नाही. यावरून हे गाव भोज राजाने वसवले असे म्हणता येईल.
भोजेश्वर मंदिर संपूर्ण दगडी प्रस्तर असलेल्या एका टेकडीवर सर्वात उंच जागी बांधलेलं आहे. १०६ फूट लांब, ७७ फूट रुंद आणि १७ फूट उंच अश्या प्रशस्त बांधीव चौथर्यावर या मंदिराची मुख्य बांधणी केली आहे. या चौथर्याच्या पायर्याही साधारणपणे १० इंच उंचीच्या दमछाक करणार्या आहेत. चौथर्याच्या मध्य स्तरावर सर्व बाजूने समान अंतरावर अलंकारित गवाक्षासारखी रचना दिसते.यांमध्ये पूर्वी मूर्ती असाव्यात, आता तिथे नुसतीच सुंदर महिरप काय ती उरलेली आहे. मंदिराचा मुख्य गाभारा हा चौरस असून त्याचे छत हे ४० फूट उंचीच्या चार अलंकृत खांबांवर तोललेले आहे. मंदिराचे मुख्य द्वार हे एका बाजूस गंगा तर दुसर्या बाजूस यमुना नदीच्या तसेच अनेक देवी देवतांच्या शिल्पांनी अलंकृत केले आहे. ही सर्व शिल्पे ही मुख्य द्वार स्तंभ किंवा उपस्तम्भांमध्ये कोरलेली नाहीत. प्रत्येक मूर्ती ही सुटी आहे. मूर्ती स्तंभावर चपखल बसवण्यासाठी प्रत्येक स्तंभांवर “T”  आकाराच्या खोबणी खोदलेल्या दिसतात. आपण ज्याप्रमाणे भिंतीवर चित्र अडकवतो त्याप्रमाणे या खोबणींचा वापर करून या मूर्ती स्तंभावर चक्क अडकवलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेले मुख्य स्तंभ आदमासे ३ फूट रुंदीचे असून बरोबर मध्ये उंचावर सिंहमुख आणि त्याच्या जीव्हेपासून निघणारी साधारणपणे १२ फूट लांबीची शृंखला आणि तिच्या शेवटी घंटा असे शिल्प या स्तंभात कोरलेले आहे. दोन्ही स्तंभांवरील ही शिल्पे अगदी एकसारखी आहेत. साखळीचे शिल्प तर खर्या साखळीचा आभास निर्माण करते. घंटेचे लोलक सुटे नसून मागे मुख्य प्रस्ताराशी जोडलेले आहेत त्यामुळे ते शिल्लक आहेत. समोरून बघितल्यास हा बारकावा ध्यानात येत नाही.
मंदिराला उंच असा उंबरठा आहे ज्याच्या सभोवती पुरातत्व विभागाने लाकडी जिना बसवला आहे. या उंबरठ्यावर सुंदर असे कोरीवकाम असून त्यामध्ये सिंह हा गजेन्द्रावर आरूढ होउन त्याला पराजित करतो आहे असे शिल्प आहे. मंदिराच्या प्रथम पायरीवर दोन्ही बाजूस सुंदर असे शंखशिल्प आहे.
गाभार्याच्या चाहुबाजूस दगडातून बांधलेल्या भिंती असून त्यावर काही शिल्पकृती नाहीत. परंतु मंदिराच्या दोन्ही बाजूस भिंतींच्या माधोमध अलंकृत सज्जे आहेत. या सज्ज्यामध्ये जाण्यासाठी कुठूनही जिने नाहीत, तेथे पूर्वी मूर्ती असाव्यात असे दिसते. सज्ज्यांचे कोरीवकाम सुंदर आणि प्रमाणबद्ध आहे पण सिंहमुख आणि कमळ या दोनच आकृतीचा बंध केलेला दिसतो. मंदिर पश्चिम मुखी असून उत्तर दिशेस तीर्थ वाहून जाण्यासाठी मार्गिका आहे. त्याच्या तोंडाशी मगरी सारख्या प्राण्याचे शिल्प बसवलेले आहे.
गाभार्याचे जे प्रमुख चार खांब आहेत त्यावर शंकर-पार्वती, श्रीराम-सीता, लक्ष्मी-नारायण व ब्रम्हा- सावित्री यांची शिल्पे आहेत. मंदिराचे छत हे वर्तुळाकार रचनेतून केलेले असून त्याला तीन स्तर आहेत. प्रत्येक स्तरात वरील स्तरास आधार देणारे तुळईसारखे आरे कोरलेले आहेत. यातील सर्वात मोठ्या वर्तुळाच्या परीघावर आठ शिल्पे असून ती अष्ट मातांची असावीत. मंदिराचे स्तंभ आणि त्यावरील तुळया यांना जोडणाऱ्या महिरपीवर खालच्या बाजूने चार हाती यक्षान्ची शिल्पे कोरलेली आहेत. गाभार्याच्या आतील बाजूस पूर्वेस उंचीवर एक सज्जा आहे. बाहेरील सज्जाप्रमाणेच येथेही जाण्यासाठी रस्ता नाही. त्याचे प्रयोजन कळत नाही.
मंदिराच्या आतील शिल्पे हवामानाच्या बदलांपासून आणि उंचीवर असल्यामुळे मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित राहिली आहेत त्यामुळे बर्याच अंशी सुस्थितीत आहेत.  
या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे ती येथील शिवपिंड. २२ फूट उंचीची हे शिवपिंड भारतातील सर्वात मोठी शिव पिंडी आहे. शिव पिंडी चा शाळीग्राम हा एकाच ताशीव पाषाणातून घडवलेला असून २ मीटर उंचीचा आहे. पिंडीचे खालील स्तर एकाच पाषाणातील असून त्याची घडण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मंदिराच्या सर्व परिसरात अनेक भंगलेले शिल्प पट्ट आणि अर्धे घडवलेले कोरीव स्तंभ हे या मंदिराबरोबरच इतर काही शिल्पकाम करायची योजना असावी हे दर्शवितात. मंदिराच्या उत्तरेस कातळ पठारावर अनेक ठिकाणी मंदिराच्या रचनेच्या तपशिलांचे सप्रमाण रेखाचित्र करून ठेवलेले दिसते. या ठिकाणी पुरातत्व विभागाने लोखंडी कठडे बसवून ही रेखाचित्रे खराब होणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. यातील काही रेखाचित्रे अजूनही सुस्पष्ट आहेत. समोर मंदिराकडे पहिले की त्याचे बांधकाम, अगदी शिल्पांतील नक्षीसुद्धा या रेखाचित्राप्रमाणे आहे हे दिसून येते. तसेच हे बांधकाम किती प्रमाणात अपूर्ण राहिले याचाही अंदाज येतो. प्राचीन वास्तुविशारदसुद्धा संकल्प चित्र पूर्ण केल्याशिवाय प्रत्यक्ष बांधकाम करत नसत याचा पुरावा बहुतेक भोज राजाने मुद्दाम पुढच्या पिढ्यांसाठी सोडला असावा.
मंदिराच्या मागील बाजूस पक्के बांधकाम असलेली एक उतरंड ( रॅम्प ) आहे. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे मोठे आणि काही टन वजनाचे शिलाखंड त्यावरून नेले असावेत. त्या रॅम्पचा उतार हा सुद्धा एक-सारखा असून त्याचेही गणित करूनच तो बांधला असावा असे त्याकडे नीट बघितल्यावर लक्षात येते.
गाभार्याच्या समोर दोन चौथार्यांवर छोट्या घुमट्या आसून तिथे संगम्ररवरातील शिवलिंगे आणि गणेश प्रतिमेचे पूजन केलेले दिसले. या घुमट्या व देवांच्या मूर्ती नक्कीच नंतरच्या काळातील असाव्यात. या मंदिराकडे बघताच  डोळ्यात भरते ती या शिल्पाची भव्यता. मुख्य द्वारातून समोर दिसणारी शिवाची पिंड लगेच लक्ष वेधून घेते. मादिरासमोरचा नंदी मात्र या प्रमाणात बसत नाही. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट अशी की या शिल्पकृतीत कुठेच श्री गणेशाची मूर्ती दिसत नाही.
या मंदिराबद्दल दोन आख्यायिका ऐकायला मिळाल्या. पांडव वनवासात असताना इथे राहत होते आणि त्यांनी हे मंदिर प्रथम बांधले. त्याचा जीर्णोद्धार भोज राजाने केला- ही पहिली लिखित आख्यायिका. कोणत्याही भव्य, अमानवी कलाकृतीशी भीमाशी जोडणी करायची म्हणजे सामान्य माणसाची अश्या गोष्टी करण्यातून सुटका होते, त्यातलाच हा प्रकार! दुसरी ऐकीव आख्यायिका अशी- राजा भोज काही संकटात असताना कोण पंडिताने त्याला सांगितले की त्याने एका शिव मंदिराचे बांधकाम करावे. अट अशी की हे बांधकाम एकाच दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे भोज राजाने सर्व सिद्धता करून हे मंदिर निर्माण केले. ते एका दिवसात जेवढे बांधून झाले तेव्हढेच पूर्ण झाले म्हणून आजही उरलेले काम अपूर्ण स्थितीत दिसते. लोक असेही म्हणतात की आता कोणीही हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी ते दुसर्या दिवशी पडून जाते. एक बरं आहे की या समजुतीमुळे मूळ बांधकामाला हात लावायला किंवा त्याच्या संहितेमध्ये बदल करायला कोणी गेलेला नाही. 
योगायोग असा की दुसर्याच दिवशी सकाळी बसने भोपाळकडे जात होतो. वाटेत ग्यारह मील फाटा लागतो. भोपाळ होशंगाबाद रस्त्याला भोजपूरकडे जाणारा मुख्य रस्ता इथे मिळतो. या फाट्यावर एक हनुमानाचे मंदिर आहे. नजीकच्या भूतकाळात बांधलेले असावे. गोपूर रंगवलेल्या या मंदिरावर भोजेश्वर मंदिरातील श्रुन्खलेच्या शिल्पासारखे चित्र रंगवले आहे. काल पाहिलेले शिल्प या चित्रापेक्षा सहस्त्र पटीने सरस होते. आधुनिक काळात मापनाच्या अनेक पद्धती असून सुद्धा हे चित्र इतके अव्यवस्थित कसे असप्रश्न मला पडला.
उत्कृष्टतेचा आग्रह आणि समृद्धी यांचे परस्परांशी नातं आहे का असा प्रश्न मला पूर्वीदेखील अनेक वेळा पडला. उत्कृष्टतेचा आग्रह आणि सर्वोत्तम बनवण्याचा ध्यास हे समृद्धीचे लक्षण आहे असे मला वाटत असे. समृद्धीनंतर  मग संपन्नता येते आणि एकदा संपन्नता आली की सर्वोत्कृष्ट कृती घडवणारी क्रियाशक्ती काढता पाय घेते. कला लोप पावते, उत्कृष्टतेचा आग्रह नाहीसा होतो, अस ज्ञात इतिहासावरून म्हणता येईल. इतिहासातील भोजेश्वर मंदिरातील कलाकृती असतील किंवा वेरूळ सारखी स्वर्गीय शिल्प असतील, त्या त्या वेळेस समाज अत्यंत समृद्ध होता अस वर्णन इतिहासात वाचलेलं आहे म्हणून माझा असा समज झालेला असावा.
बसमध्ये बसल्या बसल्याच विचार करत होतो. का कुणास ठाऊक, व्ही.टी. स्टेशनवरचा चकचकीत बूट पॉलिश करणारा मुलगा मला आठवला, डेक्कनच्या पर्ल हॉटेल समोरचा ग्राहकांना आकर्षित करणारा, लवून नमस्कार करणारा दरवान आठवला, प्रवाशांना विनोद सांगत हसवत प्रवासाचे ताण हलके करणारा एस. टी. तला कंडक्टर आठवला, दहाव्या मजल्यावरून खाली वाकून बघत भिंतीचे काम ओळंब्यात झालेय हे बघणारा गवंडी आठवला, आपण शिवलेल्या शर्टची शिवण भिंगातून बघून खात्री करणारा टेलर आठवला, फर्निचरचे काम पूर्ण झाल्यावर त्यावरच्या पेन्सिलच्या खुणा पुसणारा सुतार आठवला, हॉटेल मध्ये  टेबलवर चादर घालताना दुमडलेली चादर व्यवस्थित करणारा वेटर आठवला, केश कर्तनालयात केस कापून झाल्यावर बारीक कात्री घेउन हलकेच काही कट नीट करणारा न्हावी आठवला, ओवलेल्या फुलांचे दोन्ही पदर सारखे झालेले आहेत हे हार विकण्याआगोदर तपासणारा हार विक्रेता आठवला. उत्कृष्ट काम करून सुद्धा कधीच समृद्धीचे सोपान न चढलेले आणि प्रसिधीच्या झोतात आलेले हे माझ्या आठवणीतील लोक. या सर्वांच्या आठवणीने माझ्या मनातील समृद्धी आणि उत्कृष्टता यांची समसमाच असण्याची शक्यता धुळीला मिळवली. पण हेही तितकाच खरंय की आपल्या कामात सर्वेत्कृष्ट बनण्याचा ध्यास हाच समृद्धी मिळवण्याचा एकमेव सोपान असतो. हेही तितकच खरंय की उत्कृष्टतेचा आग्रह आणि त्याची कदर करायला मनाची समृद्धी सुद्धा असावीच लागते!












No comments:

Post a Comment