Tuesday, November 17, 2015

अंधारकोठडी

आणि मग त्या राक्षसाने त्या शूर राजकुमाराला अंधारकोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली. तो राजपुत्र डगमगला नाही कारण तो खूप शूर होता..... गोष्ट सांगता सांगता माझ्या मुलगा कधी झोपी गेला ते मला कळलच नव्हत. स्वप्न रंगवण हे माणसाला लहानपणापासूनच आवडत. मग त्यासाठी झोपी जाताना लहान मुलं गोष्ट ऐकायचा आग्रह धरतात. मोठ्यांच मात्र वेगळ असतं, शांत झोप लागावी म्हणून किमान झोपताना डोक्यात काही विचार नसावेत असा आपला आग्रह असतो. मी त्यासाठी झोपायच्या पूर्वी एकाग्रतेचा सराव करतो, काही जण त्याला ध्यान करणे म्हणतात.
नेहमीप्रमाणेच मी त्याही रात्री ध्यानासनात बसलो. डोळे मिटले, तर्जनी आणि  अंगठ्याच्या अग्रावर हृदयाचे ठोके जाणवू लागले. श्वासोश्वासाची गती हळू हळू शांत होऊ लागली. आणि अचानक मनात विचार आला की आपणही गोष्टीतल्या त्या शूर राजकुमाराप्रमाणे कल्पेनेतच अंधारकोठडीत जाऊन पाहूयात. डोळे उघडले तरी डोळ्यासमोर अंधारच असेल, मी हाक मारली तरी कुठूनही उत्तर येणार नाही. कान टवकारले तरी काही ऐकू येणार नाही, हातापायाची हालचाल जाणवेल पण दिसणार नाही, स्पर्श हा एकच काय तो उपाय आकाराचा बोध घेण्याचा! आपल्या स्वार्थ साधण्याच्या लालसेपायी काही अविवेक झाला आणि अशी शिक्षा भोगायची वेळ आली तर ती वेदना आपलीच, दोष कोणाला देणार. पण आपण अंगिकारलेल्या जीवनमूल्यासाठी संघर्ष करताना आपल्या वाट्याला अशी दुर्दैवी शिक्षा आली तर?
काही क्षणातच मला घुसमटल्यासारख होऊ लागल. जीव गुदमरायला लागला. सर्वांगाला दरदरून घाम फुटला. आणि मी खाडकन डोळे उघडले. आपण आपल्या घरात अत्यंत सुरक्षित बसलो आहोत हे बघून मी निश्वास सोडला.
क्रूर आणि अमानवी अश्या प्रकारच्या शिक्षा आता सुसंस्कृत समाजात दिल्या जात नाहीत, किंबहुना तो मानवतेचा संस्कार आहे असे समजतात. पण संघर्ष जेव्हा होतो तेव्हा सर्वच लोक विवेकाने वागतात असे घडतच नाही. तत्वाची लढाई ही तत्वानेच लढावी हे विधान सामाजिक दृष्ट्या सुरक्षित अश्या पुण्या मुंबईसारख्या शहरात ठीक आहे. पण सीमावर्ती भागात जिथे संघर्ष हा रक्तलांच्छित होतो तिथे हे तत्वज्ञान खोटे ठरलेले आहे. अश्या भागातील कित्येक कार्यकर्ते दुर्दैवाने अश्या अंधकारमय जीवनात ढकलले गेले, त्यांचा काहीही दोष नसताना. वैयक्तिक जीवनात पीछेहाट झाली तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसते, तत्वाशी प्रामाणिक राहिल्याचे.
अंधारकोठडीच्या त्या कल्पेनेने माझे डोळे उघडले. अंधार आणि अंधकार या दोन समानार्थी शब्दातला फरक मला जाणवला. असा संघर्ष कधी आपल्या वाट्याला आला नाही, तो तसा कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे मला वाटून गेलं, केवळ त्याच्या परिणामाची फक्त कल्पना केल्यानंतर. त्यासाठी विवेकाचा विजय व्हायला हवा अविवेकावर. आणि विवेकाचा विजय होण्याचा एकच मार्ग सज्जन शक्ती संघटीत आणि सामर्थ्यवान करणं हाच. हा काही नैमित्तिक कार्यक्रम नाही तर रोजचा उपक्रम आहे. 

No comments:

Post a Comment