Friday, December 25, 2015

समस्या- संयम आणि उपाय

डायनिंग हॉल मधील एक टेबल, चार माणसं बसू शकतील एव्हढ. त्या टेबलचे चार पाय आणि समतल जमीन यांचा एकत्रित संबंध कधी न आल्यामुळे डुगडुगणारं. दुपारची जेवणाची वेळ होती. एका टेबल वर एक व्यक्ती जेवत होता. त्याच्या समोर कोनात दुसरा येऊन बसला. दोघेही एकमेकाला अनोळखी. म्हणून अगदी समोरासमोर नाही. अशीच स्थिती दुसर्या टेबल वर होती. खळग्यांचे ताट, त्यात नेमक्या जागी नेमके पदार्थ वाढलेले. वाढप्यांची लगबग आणि त्यांच्यामागे त्यांच्या सुपरवायजरचा धोशा अस परिचित वातावरण. जो आधी जेवायला बसला होता त्याचा हविर्भाग संपला आणि तो पानावरून उठला. टेबल जरासं एका बाजूला कललं. समोर बसलेल्या व्यक्तीच्या ताटापुढील ताकाच्या ग्लासमधल टाक हिंदकळल.   टेबल साफ करणारा पोऱ्या तिथे आला. छोटासा पोर तो, गावाकडून आलेला, डायनिंग हॉलच्या युनिफॉर्म चा मळका शर्ट आणि अर्धी विजार घातलेला, खांद्यावर टेबल पुसण्यासाठी फडके. एका कानात डूल घातलेला. येथे बाल कामगार काम करत नाहीत हा बोर्ड कदाचित त्याला वाचता येत नसावा किंवा बहुतेक मजबुरी असावी.
त्यान ताट उचललं, आणि ते बाजूला ठेवून टेबल पुसू लागला. मागे दुसरं गिर्हाईक उभं त्याच दडपण होत त्याच्यावर. त्यान टेबल पुसू लागताच ते चांगलाच डुगडुगलं आणि समोर बसलेल्या व्यक्तीच्या पानासामोरील ताकाच्या ग्लासमधील ताक थोडसं सांडलं. ए गाढवा, कळत नाही का तुला? ती व्यक्ती रागात उठून म्हणाली. आता त्या सांडलेल्या ताकाचे पैसे कोण देणार, कसली लोकं भरतात या धंद्यात, लेकाच्याला एवढं कळत नाही तो जाम तडकला. ‘माझा शांतपणे जेवणाचा मूड गेला’ असे तावा तावाने म्हणत, तिथलं वातावरण गढूळ करत आणि त्या पोराला बोल लावत तडका फडकी हात धुवायला निघाला. तो पोऱ्या कावरा बावरा झाला. आता सुपरवायझर सर्वांच्या देखत ओरडणार म्हणून रडवेला झाला. आणि झालंही तसच. तो थोडावेळ बावचळला आणि मान खाली घालून टेबल पुसू लागला.
एवढ्यात एक गम्मत झाली. शेजारच्या टेबलवरची एक व्यक्ती ढेकर देत उठली. सुपारवायझरने त्या पोऱ्याला दुसरेही टेबल साफ करायला सांगितलं. आधीच्या अनुभवावरून तो पोऱ्या शहाणा झाला, त्यानं ताट उचललं पण टेबल तो पुसेना. समोरच्या जेवत बसलेल्याच्या ते लक्षात आलं, त्यान पटकन ताक भरलेला ग्लास डाव्या हातांनं उचलला आणि हसून त्या पोऱ्याकडे बघितल. तो पोरगाही गोड हसला आणि त्यान ते डुगडुगणारं टेबल स्वच्छ पुसून घेतल. त्या सहृदय माणसाच जेवण झालं, तो उठला, हात धुवून येताना तो मुलगा हातात बडीशेपची वाटी घेऊन हसत समोर उभा होता!
समस्या एकच, उपाय वेगवेगळा, आपल्याच हाती!


No comments:

Post a Comment