Monday, January 11, 2016

एका उद्योजकाचा मृत्यू

११/०१/१६ एका उद्योजकाचा मृत्यू:   
आमच्या काही समसुखी समदु:ख्खी  उद्योजक मित्रांबरोबर चहापानासाठी कंपनीतून बाहेर पडत होतो. सहज समोर एक फ्लेक्स दिसला मशिनरी विकणे आहे, शेड भाड्याने देणे आहे. माझ कुतुहल चाळवल. त्या फ्लेक्स वर एक फोन नंबर होता. त्यावर मी फोन लावला. पलीकडून एक अत्यंत पडेल आवाजात उत्तर आल. सबब शेड ही आमच्या कंपनीपासून जवळच होती. भेटायची तारीख आणि वेळ ठरली.
त्या दिवशी मी तिथे थोडा अगोदरच पोचलो. संतोष त्याच नाव. त्याला फोन केला, एका जर्जर झालेल्या मोटार सायकलवरून संतोष तिथे आला. मध्यम उंची, कृश बांधा, दाढीचे खुंट वाढलेले. चेहऱ्यावर कमालीचा ताण आणि डोळे खोल गेलेले असे त्याचे रूप बघून मला काळजात चर्र झाले. आपणच फोन केला होतात ना? त्याने माझ्याकडे बघून विचारले. मी हसून ओळख करून घेतली. तो शेडकडे वळला, खिश्यातून किल्ली काढून त्याने शटरचे कुलूप उघडले. शटर उचलण्यासाठी मी त्याला मदत करायला पुढे झालो. शटरवर बरीच धूळ होती. बहुदा गेल्या दोन आठवड्यात ते उघडलेले नसावे. शटर उघडल्यावर धूळ झटकत आत गेलो. आत कोणच्याही मशीन शोप मध्ये दिसतात ती नेहमीची मशीन्स दिसत होती. माझ्या कामाची होती. काही ठिकाणी वायरी लोंबकळत होत्या. त्या जागची मशीन्स विकले असे संतोष ने सांगितले. खिशातून एक कागद काढून उरलेल्या मशीनची यादी त्याने समोर केली. दोन महिन्यांपूर्वी पर्यंत मशीन्स चालू होती. काही बिघाड झालेली नाहीत. त्याने सांगितले. तुम्हाला हवे तर चालू करून बघू शकता. मग किमतीविषयी बोलू त्याने प्रांजळपणे सांगितले. मी मुळातच मशीन्स घेण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. हे मशीन शॉप बंद का पडतंय याचा शोध घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो.
मी शेड मध्ये फिरून सर्व मशीन्स बारकाईने बघितली. बहुधा सेकंड हँड घेतलेली असावीत, पण चांगली वापरलेली होती. ठीक आहे, कुठे चर्चा करता येईल? मी प्रश्न केला. जवळच एका अमृततुल्यमध्ये आम्ही चर्चा करायला बसलो. संतोष तसा साधा वाटला. त्यामुळे मी थेट मुद्यावर आलो, मी मशीन्स घेण्यासाठी आलो नाही, तुम्ही उद्योग बंद का केलात हे जाणून घेण्यासाठी आलोय. तसं फोनवर बोलता आलं असतं, पण भेट झाली तर आणखीन काही कळेल असं वाटलं म्हणून आलो. मी प्रांजळपणे सांगून टाकलं. उद्योग जसा चालू केला तसाच बंद केला, तुम्हाला सांगून काय उपयोग, तुम्ही काही करू शकणार नाही संतोष थोडा वैतागून म्हणाला. थोडा वेळ शांततेत गेला. त्याची काही सांगायची इच्छा नसावी किंवा तो शब्द गोळा करत असावा. मीही उद्योजक आहे. उभा राहिलेला उद्योग बंद करण्याचा विचार सुद्धा किती त्रासदायक असतो हे मी जाणतो. म्हणून विचारावसं वाटलं. मी म्हणालो. संतोष बोलता झाला.
घरची बेताची परिस्थिती. आई वडिलांनी कष्ट करून त्याचं शिक्षण पूर्ण केल. त्या दोघांना त्यानं नोकरी करताना, अपमान गिळताना पाहिलं आणि म्हणून ठरवलं की अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर नोकरी करायची नाही. स्वत: उद्योग करायचा. उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना धडपड करून, उधार उसनवारी करत भांडवल त्यानं उभं केलं. मित्रांच्या सहकार्यातून, ओळखीतून काम मिळवत उद्योग उभा केला. ७-८ वर्षात केलेली सर्व कर्ज फेडत त्यान उद्योग स्वयंपूर्ण केला. आणि त्यानंतर चांगले दिवस यायच्या ऐवजी ग्रहण लागलं. कोणच्याही उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात भिस्त ठेवता येईल असं एखादं प्रॉडक्ट, ग्राहक किंवा मार्केट लागतं. असा किती भक्कम पाठींबा मिळतो त्यावर तो नुकताच जन्मलेला उद्योग किती बाळसं धरतो ते अवलंबून असत. संतोषच्या बाबतीत नेमकं उलटं घडलं. ज्यावर भिस्त ठेऊन तो उद्योग वाढवायची स्वप्न बघत होता तिथलं व्यवस्थापन बदललं. पूर्वीच व्यवस्थापन नेटकं पण सर्वांना बरोबर घेऊन चालणारं होत. नवीन आलेले लोक हे जगाची रीत या नावाखाली दुसर्याच्या डोक्यावर पाय  देऊन पुढे जाऊ पाहणारे होते. त्यानी संतोषकडे भाव कमी करण्याविषयी तगादा लावला. लघु उद्योजक म्हणजे त्याकाडील कामगार अशिक्षित, कमी मजुरी मिळणारे असणार मग माल स्वस्तात बनलाच पाहिजे असा आग्रह धरणारी ही मंडळी होती. कामगारांचे स्वास्थ्य, त्यांची उन्नती हा विचार त्यांच्या दृष्टीने गौण होता. तीच त्यांच्या मते जगाची रीत होती. अश्याप्रकारे वागताना कामगारांचे आणि पुरवठादारांचे एक प्रकारे शोषण करून आपण सामाजिक अपराध करतोय असे संतोषचे म्हणणे होते.
व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना समान सन्मान मिळाला पाहिजे हे संतोषचे तत्व इथे विरोधात जाऊ लागले. संतोषने विरोध केला नाही, पण वेगळी वाट पकडायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला तीन, चार ठिकाणी असेच लोक भेटले. ज्याला त्याला कमीत कमी पैश्यात पण सर्वोत्तम काम करून हवे होते. कसेही करून काम मिळवण्यासाठी आणि मग ते कसेही करणार्यांची रीघ अश्या लोकांकडे लागलेली संतोषने पाहिली. आपण उराशी बाळगलेल्या मूल्याला तिलांजली देण्यापेक्षा स्वत: रक्त आटवून उभा केलेला उद्योग बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय त्यानं घेतला. त्याचं त्यात किती आर्थिक नुकसान झालं किंवा होणार होतं हे मी त्याला विचारलं नाही. पण त्याच्या सांगण्यावरून आर्थिक अडचणीमुळे त्यानं हा निर्णय घेतला नव्हता. त्याच्यातील अंतर्विरोधाचा तो दुर्दैवी बळी ठरला होता.
उद्योग उभा करताना आणि चालवताना काय काय अडचणी येतात ते उद्योजकच जाणे. उद्योग उभा होणे किंवा बंद करणे हा बर्याच वेळेस आर्थिक कारणांशी सुसंगत निर्णय असतो. उद्योग बंद होणे म्हणजेच मृत्यू पावणे ही घटना क्लेशदायक नक्कीच पण इथे एका उद्योजकाचा मृत्यू झालेला मी बघत होतो.
एखादी ग्रहमाला भोवती घेऊन फिरण्याचे सामर्थ्य असलेला सूर्य आणि आपल्या उद्योगातील सहभागी लोकांना बरोबर घेऊन फिरणारा स्वयंप्रकाशित उद्योजक यांची तुलना मी सतत करत असतो. संतोष हा एक स्वयंप्रकाशित सूर्य होता पण आता त्याचं तेज लोप पावलं होतं. तो सूर्यास्त मी समोर बघत होतो, त्याच्यातली धग मात्र स्पष्ट जाणवत होती.

तो, त्याचा उद्योग, त्याचे प्रश्न, मी फार विचार करावा असे त्यात काही नव्हते. पण त्याच्या बरोबर झालेल्या संवादातून एक प्रश्न मात्र त्याने समोर उभा केला ज्याच त्यांनाच दिलेलं उत्तर मला कायम मार्गदर्शक ठरणार आहे. लघु उद्योग ग्राहकाला काय देऊ शकतात? १) स्वस्त सेवा आणि  सुमार उत्पादन, २) स्वस्त सेवा आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन कि ३) गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि अशी सेवा ज्यामुळे ग्राहक निश्चिंतपणे त्याचा उद्योग करू शकेल. लघु उद्योगांनी आपले उत्पादन स्वस्तठेवावे कसे? आणि ठेवावे का? आपल्या उद्योगाशी संबंधित व्यक्तींचे अप्रत्यक्षपणे शोषण तर होत नाही ना ही खबरदारी प्रत्येक उद्योजकांने घेतलीच पाहिजे असे तो जाताना म्हणाला. त्याचे हे म्हणणे मला मनोमन पटले. कोणत्याही उद्योगाच एक USP  असतं. दुर्दैवाने स्वस्त उत्पादन हे USP  लघु उद्योगांनी बनवलेल्या वस्तूंना चिकटलय. त्यातून बाहेर पडायला हवं. उत्कृष्टतेची कास धरताना स्वस्त नव्हे तर सर्वोत्तम पण किफायतशीर हे विशेषण कसे धारण करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं.           

No comments:

Post a Comment