Thursday, January 21, 2016

नट सम्राट

२१ जानेवारी २०१६; नट सम्राट :
गेल्या गुरुवारी नटसम्राट पहिला. सिनेमाची तिकिटे काढताना आणि तो पाहताना खर सांगावं तर एक प्रकारचा विषाद मनात होता, आपण आपले पैसे खर्चून कोणा काल्पनिक माणसाची कुतरओढ का पाहतोय असं वाटत होत. नाना पाटेकर व इतर सर्व कलाकार यांचा अभिनय आणि एक से एक अत्युच्च पातळीवरचे संवाद यांनी मात्र खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. काही संवाद तर इतक्या उंचीवरचे आणि संवादफेक इतकी उत्तम की त्याचा अर्थ समजावून घेऊ की नानांचा अभिनय पाहू अश्या कात्रीत मी सापडलो होतो. मी काही समिक्षक नाही, ना मी मराठी वाङमयाचा अभ्यासक, आदरणीय कुसुमाग्रजांच्या मूळ संहितेचे वाचन काही मी केलेलं नाहीये. कथेचा गाभा हा करुणाप्रधान कौटुंबिक विषय आहे आणि निम्मे प्रेक्षाग्रुह ते पाहताना हुंदके देताना आणि उसासे सोडताना मी पाहिलं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेला पण अव्यवहारी, रीत-भात न सांभाळणारा अशी नटसम्राटाची व्यक्तिरेखा. चित्रपटाच्या शेवटच्या स्वगतात ते म्हणतात की हा नटसम्राट इथे संपला नाहीये, तो कणाकणानी वाढतोय प्रेक्षकन्च्य मनात माझ्या बाबतीत अगदी हे खरा झालंय. गेला एक आठवडा मी त्या व्यक्तिरेखेचा विचार करतोय आणि त्याचा एक वेगळाच पैलू मला आवडू लागलाय.
माझ्या मते नटसम्राट ही एका यशस्वी आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या माणसाची कथा आहे. वरकरणी ती शोकांतिका आहे खरी पण बिनधास्त जगाव कसं याचा तो एक वस्तुपाठ आहे. स्वत:ची संपूर्ण ओळख स्वत:ला असणारा आणि स्वत: मिळवलेल्या वैभवाचा उपभोग घेत असतानासुद्धा त्यापासून मनाने अलिप्त असणारा हा माणूस. त्याने घेतलेले अव्यवहार्य निर्णय पुढे त्याच्याच आणि त्याच्या कुटुंबाच्या अंगाशी येतात तरी त्याबद्दल कोणतीही तक्रार कोणाकडेही न करणारी असामी. ‘जग हे एक संगमंच आहे जिथे प्रत्येकाला आपली भूमिका वठवायची आहे आणि माझी भूमिका हे शोकांतिका आहे’ इतकी स्पष्ट कल्पना स्वत: बद्दल ठेवणारी हे व्यक्तीरेखा. अतिशय अभ्यासु आणि आपण साकारलेल्या भूमिकांची कागदावरली दु:ख स्वतः जगणारा आणि त्याची जाणीव ठेवणारा हा नट. किती जण अस मनस्वी आयुष्य जगू शकतात? असा प्रश्न मनात निर्माण करून गेला.
चित्रपटातील विक्रम गोखले यांनी साकारलेल राम्या हे पात्र ही त्याची आरशातील प्रतिमा किंवा दुसर मन असाव अस मला वाटून गेलं. त्यांच्यातील संवाद हे एकतर्फी वाटतात. या पात्राने दिलेला व्यवहारी सल्ला तो कधी मानत नाही आणि धुडकावतही नाही. तो चालतो त्याला वाटेल तसं आणि मग येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकारही करतो सहजपणे, कोणतीही तक्रार न करता, सहजपणे.
जागाव कस वाघासारख, कुणाचीही भीती न बाळगता......भरारी घ्यावी बिनधास्त गरुडासारखी, आभाळाला पंखात सामावून घेण्याची ताकद बाळगत....प्रवाही रहाव कस बिनधास्त पाण्यासारख, वाहत जाव आयुष्य फुलवत आणि कडेलोट होईल असे वाटल तर फेकून द्याव स्वत:ला एक प्रपात बनवत...... अशा काही कुठेतरी वाचलेल्या आणि अर्धवट लक्षात राहिलेल्या कवितांच्या ओळी मला स्मरल्या. असे आयुष्य जगणारया एका मनस्वी माणसाची ही कहाणी. वरवर अशी माणस ही रीत-भात न सांभाळणारी, फाटक्या तोंडाची खरी पण त्यांचा त्यांच्या विषयातील सखोल अभ्यास आणि मनस्वीपणा त्यांच्याबद्दल हवे हवे पणाची भावना निर्माण करून जातो. समाजात जगण्याचे काटेकोर नियम पाळताना वर वर मिळमिळीत वाटणाऱ्या नेहमीच्या आयुष्यात अशी एखादी संगत असावी असं आपल्याला वाटत असतं. कधी आपणच असं बनावं असं मन म्हणतं, पण ते अवघड आहे, असं बिनधास्त जगण्याची उर्मी येते तशीच निघून जाते नाही बुवा आपल्याला जमणार असे वाटून.

आनंद, दु:ख, राग, लोभ या भावना असतात प्रेक्षकाच्या मनातल्या, नट फक्त त्या उलगडून दाखवतो, असं हा नटसम्राट एका प्रसंगात म्हणून जातो. त्याला अनुसरून....... मला जे भावलं ते लिहीलं.  

No comments:

Post a Comment