शुक्रवारी सायंकाळी
४.३०-४.४५ च्या सुमारास प्रवीण ऑफिस मध्ये आला आणि पेटी कॅश चे व्हाउचर त्याने
माझ्या समोर ठेवले. “ गाडीला फारच स्क्रॅचेस पडले होते सर. त्यामुळे मी ते घालवण्याचे लिक्वीड घेऊन
टाकले. ७५० चा आयटम ५०० मध्ये घेतला सर” त्याने मला स्पष्टीकरण दिले. त्याने परस्पर खर्च केला
त्यामुळे माझ्या कपाळावर आठी चढली. पण कामात व्यत्यय नको म्हणून मी त्याच्या व्हाऊचरवर
सही करायला घेतली. सवयीप्रमाणे वरच्या लिस्टवर नजर टाकताना शेवटच्या ओळीत “आर. टी. ओ. – १०० रू.” असे दिसले आणि सही करता करता अर्ध्यातच थांबलो.
“ हे काय? आर. टी. ओ. ला
कुठली दक्षिणा ?” मी प्रश्न केला. प्रवीण जरा गडबडला, चाचरत म्हणाला “सर, गाडीला थोडासा अपघात झाला, गाडीचे काही
नुकसान झाले नाही पण मामाने पावती फाडली. माझी काहीच चूक नव्हती सर. मी सरळ येत
होतो पण वडगावच्या सिग्नलला रस्त्यावरचं ते प्लॅस्टीकच बॅरीकेड मध्येच ठेवलं होत.
त्याला डॅश बसला. मामानं उगाच डोक खाल्लं नंतर.” प्रवीणन सफाई दिली. मी ताडकन उठलो, सरळ खाली
गेलो, प्रवीण मागे मागे आला. गाडीला प्रदक्षिणा घातली. गाडीला धडक बसल्याचे कुठे
काही चिन्ह दिसेना. गाडीच्या स्क्रचेस पुसण्याचा आयटम स्वत:हून कसा काय त्यान आणला
याचा मात्र उलगडा झाला.
प्रवीण, आमच्या
कंपनीतला वाहन चालक. तो वाहन चालवण्यात जितका ‘प्रवीण’ होता तितकाच बोलबच्चन
करण्यातही. कंपनीतल्या उनाड कंपूचा तो त्यामुळे हिरो होता आणि साळसूद कंपू मात्र
त्याच्या वागण्यावर लक्ष ठेउन असायचा. मगाशी झाला कार्यक्रम हा शिफ्ट संपताना
झाल्यामुळे बरेचसे कर्मचारी बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यानी सर्व कार्यक्रम
बघितला. माझ्या पाठोपाठ प्रवीण, त्याच्या पाठोपाठ त्याचे समर्थक आणि त्यांचाही
पाठोपाठ त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याचे विरोधक माझ्या केबिनच्या बाहेर आले.
मी काही कारवाई करणार
आहे का नाही हे न विचारताच, “सर जाउद्या हो. विशेष काही घडलेले नाहीये” प्रवीणच्या समर्थनार्थ एकाने मला विनंती केली. “सर हा असाच जोरात गाडी चालवतो, उद्या काही मोठा
अपघात झाला म्हणजे? काही नाही सर, त्याला सरळ कामावरून काढून टाका” त्याच्या विरोधकातून एक आवाज आला. मी शांतपणे दंडाची पावती काढली.
त्यावर प्रवीणचे नाव होते, पण गाडीचा नंबर नव्हता. खाली ‘गुन्ह्याचे स्वरूप’ या
समोर दोन कलमे होती आणि पुढे त्याचे विवरण दिले होते ‘ बेदरकारपणे वाहन चालवून
अपघातास कारणीभूत होणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान”. पुढे ‘दंडाची रक्कम” छापलेली होते आणि हाताने घातलेला आकडा होता ” शंभर रुपये” खाली हवालदाराची सही, हुद्दा, पोलीस स्टेशनचे नाव
इत्यादी असलेला शिक्का.
मी प्रवीणच्या
विरोधकातील एकाला म्हणले की जरा पुन्हा एकदा गाडी नीट बघ, कुठे काही धडकल्याची खूण
दिसतेय का. तो आनंदाने गेला. बर्याच वेळाने परत आला तेंव्हा मला अपेक्षित असलेला
आनंद त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. “ सर पुढच्या बम्परवर उजव्या बाजूला ओरखडे आहेत पण ते आजच पडलेत असे वाटत
नाहीत, पूर्वी कधीतरी पडलेले असू शकतील. बाकी कुठे काही नाहीये.” त्याने पडेल आवाजात पाहणी अहवाल दिला. “सर तेच तर म्हणतोय, गाडीला काही झालेले नाही. मुळात
सर हा अपघात आपल्या कंपनीच्या गाडीला झालाच नाही, मी माझ्या मोटरसायकलच्या अपघाताबद्दल
बोलत होतो इतक्या वेळ. नाही का तुम्ही मला बँकेत पाठवलं होतं सकाळी? तेंव्हा मी
माझी मोटरसायकल घेऊन गेलो होतो. ” आता प्रवीणने सपशेल पलटी मारली. सगळेच लोक बुचकळ्यात पडले. त्याचा होरा माझ्या
लक्षात आला.
“सरकार दफ्तरी भरलेली दंडाची रक्कम खर्च म्हणून दाखवता येत नाही” मी माझं कायद्याचं जुजबी ज्ञान पाजळत म्हणालो. “ मी हा खर्च अमान्य करत आहे. बाकी ठीक आहे. जा
आता, वाहन जरा जपून चालवत जा रे!”, मी त्याची सुटका केली.
प्रवीणचे समर्थक
जोशात तर विरोधक नकारार्थी मान हलवून बाहेर पडले. थोड्या वेळाने मी गाडी घेऊन घरी
निघालो. वडगावच्या चौकात सिग्नलला गाडी थांबली आणि माझे लक्ष दुभाजकाकडे गेलं. तुटलेला
एक प्लास्टिकचा बॅरीकेड मला पडलेला दिसला. माझं कुतूहल चाळवलं. मी गाडी पुढे जाऊन
पार्क केली आणि चालत येऊन वाहतूक हवालदाराला विचारलं “ इथे या बॅरीकेडला आज दुपारी एखादी पांढर्या
रंगाची गाडी धडकली होती का हो ?” मला आपादमस्तक न्याहाळत तो हवालदार उत्तरला “होय, पण तुमचा काय संबंध?” रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझ्या
गाडीकडे बोट दाखवत मी त्याला म्हणलं “ ती गाडी होती का? माझी आहे. माझ्या ड्रायव्हरन अपघात केला
का?” हवालदारानं गाडीकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं, “साहेब ती सुमो होती, तुमची तर मारुती आहे. काळजी करू नका तुमच्या गाडीनं ती धडक दिलेली
नाही.” ........तडजोड काय झाली असेल ते माझ्या लक्षात आल. बॅरीकेड तुटला होता, गाडीवर आणि प्रवीणच्या
प्रतिमेवरही ओरखडे उठले होते.
घरी जाऊन पुन्हा ती
पावती बाहेर काढली. इंटरनेट वर त्याची कलमं टाकून माहिती वाचू लागलो. गुन्ह्याची
कलमं आणि त्याचे विवरण यात फरक होता. त्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम आणि आकारलेली
रक्कम यात कमालीचं अंतर होतं. हवालदाराने “कर्तव्यदक्ष” भूमिकेतून कारवाई केली होती पण पावती वरचा मजकूर अपूर्ण होता.
प्रवीण दुसर्या
दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्याच त्याला १० दिवसाच्या सक्तीच्या बिन-पगारी रजेवर
पाठवण्यात आलं. कंपनीच्या गाडीचे नुकसान केले म्हणून नव्हे तर ‘कंपनीची दिशाभूल
करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याबद्दल’ आणि हो,...... ही शिक्षा सुनावण्यासाठी न कुठल्या फिर्यादीची गरज पडली न कुठल्या
सुनावणीची, न कुणाच्या वकीलपत्राची!! ---- (वरील घटना व त्यातील पात्रे ही
संपूर्णपणे काल्पनिक असून सुमारे १३ वर्षांपूर्वी घडलेल्या, वरचे वर चर्चेत
आलेल्या आणि नुकत्याच चवीने चघळल्या गेलेल्या घटनेशी त्याचे साधर्म्य वाटल्यास..............................
ते तसे आहेच! ) – सत्यजित चितळे
No comments:
Post a Comment