समुत्कर्ष?
काही घटना एका पाठोपाठ अश्या घडतात की तो केवळ योगायोग आहे
की त्यामागे एखादा संकेत आहे हे कळत नाही. अगदी अशीच एक घटना गेल्या बुधवारी घडली.
आमच्या कंपनीसाठी “हायरिंग पॉलिसी” लिहिण्याचे काम चालू होते. बुधवारी संध्याकाळी कार्यालय
संपताना मनुष्यबळ विभागातील माझा सहकारी त्याचा कच्चा मसुदा माझ्याकडे देऊन घरी
गेला आणि मी त्या मसुद्याचे वाचन करीत बसलो होतो. तेव्हढ्यात एक पंचविशीतील तरुण
कार्यालयात आला. “शिकाऊ इंजिनियर” पदासाठी त्याला मुलाखत द्यायची होती. सडसडीत शरीरयष्टी,
केस व्यवस्थित कापलेले, सावळा रंग, नीट नेटके साधे कपडे घातलेला आणि आश्वासक
देहबोली असलेला असा. मी त्याचा बायो डेटा मागितला. “ अन्वर शेख, राहणार, उस्मानाबाद”, मी पहिल्याच पानावरचा पत्ता वाचला आणि माझ्या चेहऱ्यावर
एक आठी उमटली. आजवर आमच्या कंपनीत मुसलमान समाजातील कोणीही व्यक्ती कर्मचारी म्हणून
घेतलेला नाही. तसा एक अलिखित नियमच आहे आमच्याकडे. माझा मनुष्यबळ विभाग बघणारा
सहकारी नव्हता म्हणून हा उमेदवार माझ्याकडे थेट आला, अन्यथा हा बायो डाटा
माझ्यापर्यंत आला नसता. का कुणास ठावूक पण मी त्याला बसायला सांगितले आणि आमची
निवड प्रक्रिया सुरु केली. लेखी परीक्षेतील प्रश्नाची उत्तरे त्याने सुंदर अक्षरात
आणि अचूक दिली. हा विद्यार्थी हुशार आहे हे माझ्या लक्षात आलं. मग प्रत्यक्ष
मुलाखत सुरु झाली. अनुभव या सदरात त्यान ३ वर्षे लिहिली होती. त्यावरून
प्रश्नोत्तरे सुरु झाली. मी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अन्वरने अस्खलित इंग्रजीत
उत्तरे दिली. उच्चारांवरचा मराठवाडी छाप वगळता त्याच इंग्रजी भाषेवर बर्यापैकी
प्रभुत्व आहे हे जाणवल. तो मराठी माध्यमातून शिकलेला होता म्हणून आश्चर्य वाटलं.
मी खुलासा मागितला. “आमचे एक शिक्षक
उत्तम इंग्रजी बोलत असत त्यांच्याकडून शिकलो” अशी माहिती त्यान दिली. तो वीरपुत्र आहे, त्याचे वडील पोलीस खात्यात हवालदार होते,
गुन्हेगारांवरच्या एका कारवाईत त्यांना वीरमरण आलं अस त्यान सांगितलं. विचारलेल्या
प्रश्नाला उत्तर देताना त्याच्या आत्मविश्वास जाणवत होता. प्रत्येक प्रश्नागनिक
माझ कुतूहल वाढत होत. पण अजूनही गाणं समेवर याव तस माझं मन त्याच्या नावावर,
त्याच्या उपासनापद्ध्तीवर सारखं येत होतं.
आजवर मी कुणालाही त्याची जात विचारली नाही. ‘आम्ही कोणालाही
जात विचारत नाही आणि त्यान सांगू नये’ असा दंडक आहे. येणाऱ्या कोणत्याही
आगन्तुकाकडे या अर्थाने बिन-रंगाच्या चष्म्यातून पाहण्याची आमची पद्धत आहे. पण
धर्म किंवा उपासनापद्धती? आजवर हा प्रश्नच आला नव्हता.
भारतभूमीवर “आक्रमकांची
उपासनापद्धती” असा शिक्का असलेली
मुस्लीम किंवा ख्रिश्चन उपासनापद्धती मानणार्या जनतेशी जुळवून घेण्यात सरसहा फारसा
उत्साह दाखवला जात नाही असा माझा अनुभव आहे. इतिहासात मराठी तलवारी आक्रमकांच्या
विरुद्ध सतत तळपत राहिल्याने असा फटकून वागण्याचा दृष्टीकोन ठेवायला तुम्ही ‘फक्त
कट्टर हिंदुत्ववादी’च असायला हवे अशी अट महाराष्ट्रात नक्कीच दिसत नाही. तरीदेखील कित्येक
मुस्लिमविरोधी मंडळी स्वत:ला हिंदुत्ववादी असे लेबल लावून घेण्यास तयार नसतात
असेही मी पाहिले आहे.
मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. जातीभेद हा विषय संघात
अजिबात अस्तित्वात नाही, त्याचप्रमाणे संघाने दिलेली हिंदुत्वाची शिकवण आणि हिंदू
या शब्दाची व्याख्या ही मुस्लीम द्वेष शिकवत नाही. पण मग तरीही मी या मुलाकडे या
अर्थाने बिन-रंगाच्या चष्म्यातून का बघू शकत नव्हतो? मी हिंदुत्ववादी आहे पण
मुस्लिमद्वेष्टा बनलोय का? मी उत्तर शोधू लागलो. अर्थात मी माझी ही ओळख त्याला
सांगितली नाही.
एक हुशार मुलगा, छोट्या गावातला, दूर एखाद्या शहरात नोकरी
शोधायला का जाईल? मी त्याला त्याबद्दल विचारल. वडिलांचा आधार गेल्यावर कुटुंबाची
जबाबदारी त्याच्यावर आली, मग त्यानं एका छोट्या वर्कशॉप मध्ये अर्ध वेळ नोकरी करत
शिक्षण पूर्ण केलं. अल्पसंख्य म्हणून त्याला औरंगाबाद इथल्या शासकीय महाविद्यालयात
अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला त्याचा गाव
सोडणं शक्य नव्ह्त. उस्मानाबाद्सारख्या छोट्या गावात कॅम्पस मध्ये नोकरी द्यायला
कोण येणार? त्यामुळे पदवी पदरात पडल्यावर तो नोकरीच्या शोधात बाहेर पडला होता.
अनेक ठिकाणी उंबरे झिजवून झाल्यावर आमच्याकडे आला होता.
आमच्यासारख्या लहान कंपनीत जेंव्हा उमेदवार येतात तेंव्हा
त्यांचा एक उत्तर ठरलेले असते “ छोट्या कंपनीत
जास्त शिकायला मिळते” आणि हे थोडसं खरही
आहे. पण अन्वरने दिलेले उत्तर थोडे वेगळेच होतं. पुढे जाऊन स्वत: ची हॉस्पिटल ला
लागणारी सामुग्री बनवण्याची कंपनी काढायची त्याची महत्वाकांक्षा होती. आणि
त्यासाठी तो कुठून तरी सुरुवात व्हावी याची आशा बाळगून होता. थोडसं खोदून
विचारल्यावर मात्र त्यानं स्पष्ट सांगितलं की नोकरी मागताना त्याची उपासनापद्धती
त्याच्या आड येते. कोणीच तसं स्पष्ट कारण दिलं नाही तरी मुलाखत घेणार्याच्या
देहबोलीतून तसा संदेश त्यानं टिपला होता.
“ तू सरळ धर्म ( मला
उपासनापद्धत म्हणायचं होत) का बदलत नाहीस?” धर्मजागरण विभागातला प्रश्न मी थेट विचारला. त्याचं उत्तर मात्र मला हलवून
गेल, त्याचं शब्दांकन पुढीलप्रमाणे:
“ सर तुम्ही वाचलं
असेल की मी छंद या सदरात सामाजिक कामाची आवड असं लिहिलंय. मी रा. स्व. संघाचा
प्रतिज्ञित स्वयंसेवक आहे. शाखा घेणं, लहान मुलांवर संस्कार होण्यासाठी प्रयत्न
करण हे माझ्या आवडीचं काम आहे. माझे वडील पोलिस होते आणि या समाजाच्या रक्षणासाठी
त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले आहेत. माझ्या देशभक्तीविषयी तुम्हाला अजून काही
शंका आहे का? आणि हो, मला संघात जाणार्या नव्हे तर इतर अनेकांनी हा प्रश्न
विचारलाय की मी मुस्लीम असूनही शाखेत जातो, दसरा दिवाळी साजरी करतो मग मी हिंदूच
का होत नाही असा.
सर तुम्हाला सांगतो, मी तत्कालीन आणि आजच्याही सामाजिक
भाषेत झिडकारलेल्या समाजातला आहे. ७-८ पिढ्यांपूर्वी कधीतरी आमच्या पूर्वजांनी
धर्म बदलला. त्या वेळेसच्या दुष्ट
चालीरीतींपासून सुटका करून घेण्यासाठी. ती प्रलोभनं किती यशस्वी झाली हे एक त्या
इतिहासालाच माहित. पण आता पुन्हा ‘स्वगृही’ यावं तर पुन्हा रोटी-बेटी व्यवहार
होण्यासाठी आमची तीच पूर्वीची जात विचारली जाते. मी शिकलो, मोठा होण्याची स्वप्न
बघतोय, माझ्या बहिणीलाही शिकवलंय, आम्हाला नाही पुन्हा त्याच जातीत जायचं. मला
माहितेय की धर्म बदलणं हा काही सामाजिक स्तर उंचावण्यासाठी घेतलेला शॉर्ट-कट होऊ
शकत नाही. पण मी शुदधीकरण करून घेऊन थेट उच्च जातीत येऊ शकेन? मला सामावून घेतील? सर तुम्ही म्हणाल की
आता जात कोण विचारतो? तू कशाला याची काळजी करतोस, पण हे वर वरवरच झाल. नातेसंबंध
प्रस्थापित करताना भले भलेसुद्धा याचा विचार करतात, तेंव्हा मी काय करावं?”
बोलताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, तो मनापासून
बोलतोय याची साक्ष पटवण्यासाठी. या मुलाला सामाजिक कामाची आवड नसून त्यान या
प्रश्नाचा अभ्यास केलाय हे लक्षात आलं. पण प्रत्येक वेळेस हिंदू समाजालाच
आरोपीच्या पिंजर्यात उभं करण्यालाही माझा विरोध होता. हेही खरं की मी पूर्णपणे
निरुत्तर झालो होतो.
सामाजिक विषमता आणि धर्मांतरण या प्रश्नाची व्याप्ती किती मोठी
आणि खोल आहे याची मला जाणीव झाली. आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेशी आपली जात आणि
उपासनापद्धती नकळत जोडली जाते आणि त्याचा सांभाळ आपण संपूर्ण आयुष्यभर करत राहतो.
हे आपलं आपल्याशी असतं आणि ते ठीकच आहे पण त्यापायी आपण कोणा ‘दुसर्या’ला जवळ
सुद्धा करू शकत नाही हे सत्य मला अन्वरनं उलगडून दाखवलं. हेच त्याच्याही बाबतीत
खरं होतं आणि तो त्याबद्दल मात्र अनभिज्ञ होता.
काम करण्याची तयारी, अपेक्षित वेतन, आवश्यक ज्ञान व कौशल्य
या सर्व बाबतीत अन्वर पात्र उमेदवार होता. मी काय करावं? काही दशकं पाळलेला अलिखित
नियम पाळावा की एक नवीन सुरुवात करून पहावी? कारण जो बदल होईल तो केस टू केस
बेसिसवर होणारा नसावा अस माझं मत पडलं.
“तू विचारलेला प्रश्न
फार जटिल आहे. मला निर्णय घ्यायला किमान एक महिना लागेल. मी जर तुझी निवड केली तर
तू जिंकलास, या एका महिन्याचा पगारही तुला देईन. आणि नाही तर असं समज की हा प्रश्न
कधीच सुटणार नाही.” मी त्याला माझा
निर्णय सांगितला.
“तुम्ही फार शांतपणे
ऐकून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद सर. इतक्या खोलातही आजपर्यंत गेलं नाही माझ्या
बाबतीत. मी वाट पाहिन तुमच्या निर्णयाची. मला वाटत या प्रश्नाला उत्तर आहे, कदाचित
या पिढीत नाही पण पुढच्या किंवा त्याही पुढच्या पिढीजवळ असेल.” अन्वर जाण्यासाठी
उठला.
तो म्हणाला त्यात तथ्य आहे असा मला वाटलं. डोक्यातून
जातीविषयी विषमता काढून टाकता टाकता दोन पिढ्या संपल्या, आता पुढचा विषय. पण हे एका
समाजाचे काम नाही. टाळी एका हातानी वाजणार नाही हेही खरच! फक्त जितका वेळ अधिक
जाईल तितका हा प्रश्न अधिक गुंतत जाणार हेही नक्की.
Wa good one... Patra watat asel tar tyala sandhi dyayla hawi...amchya yoga group madhe 2 hote...I liked that...
ReplyDelete