Saturday, October 31, 2015

तेजोमय दाहक ते !

चासकमान धरणाच्या डाव्या काठावर एक शंकूच्या आकाराचा डोंगर आहे. परिसरातील लोक त्याला शंभूचा डोंगर म्हणून ओळखतात. त्या डोंगरावर एक महादेवाचं मंदिर आहे म्हणून त्याची तशी ओळख. मागे एकदा मामा बरोबर तिथं गेलो होतो. रस्ता धुळकटलेला, डांबराची ठिगळं लावलेला. त्यावरून पाट्याचा खळ-खळ आवाज करत एस. टी.नं आम्हाला तिथं पायथ्याशी सोडलं. साधारणपणे ७०० फुटाची चढण चढत आम्ही मंदिराशी पोचलो. फेब्रुवारी महिन्यातले दिवस, रानोमाळ वाढलेलं गवत वाळून गेलेलं होतं. काही परिसरात गवताची कापणी करून जनावरांच्या चाऱ्यासाठी त्याच्या गाठी वळलेल्या दिसत होत्या. 
एखाद्या उघड्या डोंगरावर वणव्यानं खपलीसारखा काळा डाग दिलेला दिसत होता. खरीपाची पिकं शेतातून वर डोकावत होती. डोंगरावर दंडकारण्य झालेलं, झाड झाडोरा वसंत ऋतूच्या आगमनाची वाट बघत असलेला, हिरवाई क्वचित कुठेतरी दिसत होती, प्रामुख्यानं धरणाच्या पाण्याजवळ. 
डोंगराच्या शिखरावरून चासकमान चा जलाशय सुंदर दिसतो. माझा मामा इथे नेहमीच येणारा, या परिसरातीलच रहिवासी. पण तोही हे दृश्य बघत मंदिराच्या बाहेर जरा टेकला. 
मंदिर जुन्या धाटणीचं, दगडी बांधणीचं, सभोवती उतरत्या छप्पराची पडवी असलेलं. मी दरवाज्याजवळ गेलो. बूट काढले. मंदिराच दार जुनं, भक्कम जाड अश्या लाकडातून केलेलं पण भेगाळलेलं. लोखंडी आडदांड्यान सावरलेलं. मी दार ढकलून आत गेलो. मंडप मोठा. चौरस आकाराचा, पश्चिमेच्या बाजूला छोटासा मुख्य गाभारा. तो ही चौरस आकाराचा. महादेवाची पाषाणातून कोरलेली पिंड आणि त्यावर अभिषेकाचं पात्र. सोबत तेवणारा दगडातून कोरलेला नंदादीप. बाहेर महादेवाकडे ध्यान लावून बसलेला नंदी, त्यावर बांधलेल्या अनेक घंटा. असा एखाद्या आडवळणाच्या मंदिरात असावा तसा थाट. 
या मंदिरात एक वयस्क साधूबाबा राहतात, मौन व्रत घेतलेले ते साधूबाबा या मंदिराची व्यवस्था ठेवतात असा माझ्या मामानं मला सांगितलं होत. मुख्य गाभार्यापलीकडे त्यांच मोजकं सामान दिसत होत. नीट बांधून ठेवलेली वळकटी, एक छोटीशी लोखंडी पेटी इतकंच. नंदी च्या थोड्या उजव्या अंगाला एक छोटीशी धुनी दिसली. मुळात व्यवस्थित रचलेली. छोटयाश्या चौकोनी आकाराची, रेखीव. जळलेल्या काड्यांची राख व्यवस्थित दाबून ठेवून त्याची सीमारेषा निश्चित केलेली. सर्वात खाली दोन मोठ्ठे ओंडके, त्यावर जाडसर काड्यांची चळत त्यावर काटक्या कुटक्या. रात्रीच पेटवलेली असावी, छोट्या काटक्यांची पूर्ण राख झालेली. खाली अंथरलेले मोठे ओंडकेसुद्धा जळून कोळसा झालेले आणि त्यावर काटक्यांची राख पांघरलेली. धुरांची एक रेष वातावरणातील स्तब्धता दर्शवत सरळ छताच्या दिशेने जाणारी. एखादी काटकी पेटताना नियम सोडून त्या मांडणीतून बाहेर पडलेली आणि आता राखेची रेष होउन राहिलेली. 
मी त्याकडे बघत शांत बसून होतो. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता अनुभवत होतो. इतक्यात उघड्या दरवाज्यातून शीळ घुमवत एक वार्याची झुळूक आत शिरली. धुनीतील ओंडक्यावरची राख तिनं हवेत उधळली. ओंडक्यातील निखारे फुलले आणि एक गडद तांबूस रंग येऊन त्यान त्याची दाहक शक्ती प्रदर्शित केली. संपूर्ण न जळलेली एक काडी ‘तट तट’ आवाज करून पेटली आणि त्यातून एक ज्वाला निर्माण झाली. त्या वार्याच्या झुळूकीसरशी गाभार्यातली नंदादिपाची वात हलकेच फुरफुरली. वार्याची झुळूक आली तशी हलकेच निघून गेली. मगाशी पेटलेली ती काडी जळून गेली, राखेची एक रांग सांडून आणि धुराची एक रेष सोडून. ओंडक्यातला ओबडधोबड आकारातला निखारा सुस्तावला. नंदादीप पुन्हा शांत तेवत राहिला. मग पुन्हा सगळं शांत झालं.
दरवाजा लोटून घेण्यासाठी मी उठलो तेवढ्यात मामा आत आला. त्यान महादेवाला लोटांगण घातल, नंदीला नमस्कार केला, घंटा वाजवली आणी गाभार्यात जाऊन घरून आणलेली तेलाची बुधली नंदादीपाच्या पात्रात रिती केली. बरोबर आणलेली फळे आणि काही पदार्थ त्यान देवासमोर ठेवले आणि माझ्याकडे बघून चलण्याविषयी विचारल. ती निरव शांतता, ती धुमसणारी धुनी आणि तो शांत तेवणारा नंदादीप काही मला सोडेना. मी नाईलाजाने उठलो, महादेवाला नमस्कार केला आणि निघालो. 
तो नंदादीप, धुनीतला तो निखारा, ती पेटलेली एखादी काडी, आणि मगाशी दिसलेला तो वणव्याचा डाग, सर्व अग्नीची म्हणजेच तेजाची रुप. पण प्रत्येकाची क्षमता आणि उपयुक्तता वेगळी. माणसाचही असच असावं. आपण कस बनाव हा पर्याय ज्यानं त्यांन निवडायचा, संहारक अस वणव्यासारखं, एरवी सुप्त राहून पण प्रसंगी दाहकता दर्शवणार्या निखार्यासारखं, कधीतरी सुरसुरी येऊन जळून जाण्यार्या काटकी सारखं, का देवाजवळ मंद प्रकाशात सतत तेवत राहणाऱ्या नंदादीपासारखं, खरोखरच पर्याय ज्याचा त्याचा! 
-सत्यजित

Wednesday, October 21, 2015

एक हात, एक आरसा

समुत्कर्ष?
काही घटना एका पाठोपाठ अश्या घडतात की तो केवळ योगायोग आहे की त्यामागे एखादा संकेत आहे हे कळत नाही. अगदी अशीच एक घटना गेल्या बुधवारी घडली. आमच्या कंपनीसाठी हायरिंग पॉलिसी लिहिण्याचे काम चालू होते. बुधवारी संध्याकाळी कार्यालय संपताना मनुष्यबळ विभागातील माझा सहकारी त्याचा कच्चा मसुदा माझ्याकडे देऊन घरी गेला आणि मी त्या मसुद्याचे वाचन करीत बसलो होतो. तेव्हढ्यात एक पंचविशीतील तरुण कार्यालयात आला. शिकाऊ इंजिनियर पदासाठी त्याला मुलाखत द्यायची होती. सडसडीत शरीरयष्टी, केस व्यवस्थित कापलेले, सावळा रंग, नीट नेटके साधे कपडे घातलेला आणि आश्वासक देहबोली असलेला असा. मी त्याचा बायो डेटा मागितला. अन्वर शेख, राहणार, उस्मानाबाद, मी पहिल्याच पानावरचा पत्ता वाचला आणि माझ्या चेहऱ्यावर एक आठी उमटली. आजवर आमच्या कंपनीत मुसलमान समाजातील कोणीही व्यक्ती कर्मचारी म्हणून घेतलेला नाही. तसा एक अलिखित नियमच आहे आमच्याकडे. माझा मनुष्यबळ विभाग बघणारा सहकारी नव्हता म्हणून हा उमेदवार माझ्याकडे थेट आला, अन्यथा हा बायो डाटा माझ्यापर्यंत आला नसता. का कुणास ठावूक पण मी त्याला बसायला सांगितले आणि आमची निवड प्रक्रिया सुरु केली. लेखी परीक्षेतील प्रश्नाची उत्तरे त्याने सुंदर अक्षरात आणि अचूक दिली. हा विद्यार्थी हुशार आहे हे माझ्या लक्षात आलं. मग प्रत्यक्ष मुलाखत सुरु झाली. अनुभव या सदरात त्यान ३ वर्षे लिहिली होती. त्यावरून प्रश्नोत्तरे सुरु झाली. मी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अन्वरने अस्खलित इंग्रजीत उत्तरे दिली. उच्चारांवरचा मराठवाडी छाप वगळता त्याच इंग्रजी भाषेवर बर्यापैकी प्रभुत्व आहे हे जाणवल. तो मराठी माध्यमातून शिकलेला होता म्हणून आश्चर्य वाटलं. मी खुलासा मागितला. आमचे एक शिक्षक उत्तम इंग्रजी बोलत असत त्यांच्याकडून शिकलो अशी माहिती त्यान दिली. तो वीरपुत्र आहे,  त्याचे वडील पोलीस खात्यात हवालदार होते, गुन्हेगारांवरच्या एका कारवाईत त्यांना वीरमरण आलं अस त्यान सांगितलं. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याच्या आत्मविश्वास जाणवत होता. प्रत्येक प्रश्नागनिक माझ कुतूहल वाढत होत. पण अजूनही गाणं समेवर याव तस माझं मन त्याच्या नावावर, त्याच्या उपासनापद्ध्तीवर सारखं येत होतं.
आजवर मी कुणालाही त्याची जात विचारली नाही. ‘आम्ही कोणालाही जात विचारत नाही आणि त्यान सांगू नये’ असा दंडक आहे. येणाऱ्या कोणत्याही आगन्तुकाकडे या अर्थाने बिन-रंगाच्या चष्म्यातून पाहण्याची आमची पद्धत आहे. पण धर्म किंवा उपासनापद्धती? आजवर हा प्रश्नच आला नव्हता.
भारतभूमीवर आक्रमकांची उपासनापद्धती असा शिक्का असलेली मुस्लीम किंवा ख्रिश्चन उपासनापद्धती मानणार्या जनतेशी जुळवून घेण्यात सरसहा फारसा उत्साह दाखवला जात नाही असा माझा अनुभव आहे. इतिहासात मराठी तलवारी आक्रमकांच्या विरुद्ध सतत तळपत राहिल्याने असा फटकून वागण्याचा दृष्टीकोन ठेवायला तुम्ही ‘फक्त कट्टर हिंदुत्ववादी’च असायला हवे अशी अट महाराष्ट्रात नक्कीच दिसत नाही. तरीदेखील कित्येक मुस्लिमविरोधी मंडळी स्वत:ला हिंदुत्ववादी असे लेबल लावून घेण्यास तयार नसतात असेही मी पाहिले आहे.
मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. जातीभेद हा विषय संघात अजिबात अस्तित्वात नाही, त्याचप्रमाणे संघाने दिलेली हिंदुत्वाची शिकवण आणि हिंदू या शब्दाची व्याख्या ही मुस्लीम द्वेष शिकवत नाही. पण मग तरीही मी या मुलाकडे या अर्थाने बिन-रंगाच्या चष्म्यातून का बघू शकत नव्हतो? मी हिंदुत्ववादी आहे पण मुस्लिमद्वेष्टा बनलोय का? मी उत्तर शोधू लागलो. अर्थात मी माझी ही ओळख त्याला सांगितली नाही.
एक हुशार मुलगा, छोट्या गावातला, दूर एखाद्या शहरात नोकरी शोधायला का जाईल? मी त्याला त्याबद्दल विचारल. वडिलांचा आधार गेल्यावर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली, मग त्यानं एका छोट्या वर्कशॉप मध्ये अर्ध वेळ नोकरी करत शिक्षण पूर्ण केलं. अल्पसंख्य म्हणून त्याला औरंगाबाद इथल्या शासकीय महाविद्यालयात अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याला त्याचा गाव सोडणं शक्य नव्ह्त. उस्मानाबाद्सारख्या छोट्या गावात कॅम्पस मध्ये नोकरी द्यायला कोण येणार? त्यामुळे पदवी पदरात पडल्यावर तो नोकरीच्या शोधात बाहेर पडला होता. अनेक ठिकाणी उंबरे झिजवून झाल्यावर आमच्याकडे आला होता.
आमच्यासारख्या लहान कंपनीत जेंव्हा उमेदवार येतात तेंव्हा त्यांचा एक उत्तर ठरलेले असते छोट्या कंपनीत जास्त शिकायला मिळतेआणि हे थोडसं खरही आहे. पण अन्वरने दिलेले उत्तर थोडे वेगळेच होतं. पुढे जाऊन स्वत: ची हॉस्पिटल ला लागणारी सामुग्री बनवण्याची कंपनी काढायची त्याची महत्वाकांक्षा होती. आणि त्यासाठी तो कुठून तरी सुरुवात व्हावी याची आशा बाळगून होता. थोडसं खोदून विचारल्यावर मात्र त्यानं स्पष्ट सांगितलं की नोकरी मागताना त्याची उपासनापद्धती त्याच्या आड येते. कोणीच तसं स्पष्ट कारण दिलं नाही तरी मुलाखत घेणार्याच्या देहबोलीतून तसा संदेश त्यानं टिपला होता.
तू सरळ धर्म ( मला उपासनापद्धत म्हणायचं होत) का बदलत नाहीस? धर्मजागरण विभागातला प्रश्न मी थेट विचारला. त्याचं उत्तर मात्र मला हलवून गेल, त्याचं शब्दांकन पुढीलप्रमाणे:
सर तुम्ही वाचलं असेल की मी छंद या सदरात सामाजिक कामाची आवड असं लिहिलंय. मी रा. स्व. संघाचा प्रतिज्ञित स्वयंसेवक आहे. शाखा घेणं, लहान मुलांवर संस्कार होण्यासाठी प्रयत्न करण हे माझ्या आवडीचं काम आहे. माझे वडील पोलिस होते आणि या समाजाच्या रक्षणासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले आहेत. माझ्या देशभक्तीविषयी तुम्हाला अजून काही शंका आहे का? आणि हो, मला संघात जाणार्या नव्हे तर इतर अनेकांनी हा प्रश्न विचारलाय की मी मुस्लीम असूनही शाखेत जातो, दसरा दिवाळी साजरी करतो मग मी हिंदूच का होत नाही असा.
सर तुम्हाला सांगतो, मी तत्कालीन आणि आजच्याही सामाजिक भाषेत झिडकारलेल्या समाजातला आहे. ७-८ पिढ्यांपूर्वी कधीतरी आमच्या पूर्वजांनी धर्म बदलला.  त्या वेळेसच्या दुष्ट चालीरीतींपासून सुटका करून घेण्यासाठी. ती प्रलोभनं किती यशस्वी झाली हे एक त्या इतिहासालाच माहित. पण आता पुन्हा ‘स्वगृही’ यावं तर पुन्हा रोटी-बेटी व्यवहार होण्यासाठी आमची तीच पूर्वीची जात विचारली जाते. मी शिकलो, मोठा होण्याची स्वप्न बघतोय, माझ्या बहिणीलाही शिकवलंय, आम्हाला नाही पुन्हा त्याच जातीत जायचं. मला माहितेय की धर्म बदलणं हा काही सामाजिक स्तर उंचावण्यासाठी घेतलेला शॉर्ट-कट होऊ शकत नाही. पण मी शुदधीकरण करून घेऊन थेट उच्च जातीत येऊ शकेन? मला सामावून घेतील?  सर तुम्ही म्हणाल की आता जात कोण विचारतो? तू कशाला याची काळजी करतोस, पण हे वर वरवरच झाल. नातेसंबंध प्रस्थापित करताना भले भलेसुद्धा याचा विचार करतात, तेंव्हा मी काय करावं?
बोलताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, तो मनापासून बोलतोय याची साक्ष पटवण्यासाठी. या मुलाला सामाजिक कामाची आवड नसून त्यान या प्रश्नाचा अभ्यास केलाय हे लक्षात आलं. पण प्रत्येक वेळेस हिंदू समाजालाच आरोपीच्या पिंजर्यात उभं करण्यालाही माझा विरोध होता. हेही खरं की मी पूर्णपणे निरुत्तर झालो होतो.
सामाजिक विषमता आणि धर्मांतरण या प्रश्नाची व्याप्ती किती मोठी आणि खोल आहे याची मला जाणीव झाली. आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेशी आपली जात आणि उपासनापद्धती नकळत जोडली जाते आणि त्याचा सांभाळ आपण संपूर्ण आयुष्यभर करत राहतो. हे आपलं आपल्याशी असतं आणि ते ठीकच आहे पण त्यापायी आपण कोणा ‘दुसर्या’ला जवळ सुद्धा करू शकत नाही हे सत्य मला अन्वरनं उलगडून दाखवलं. हेच त्याच्याही बाबतीत खरं होतं आणि तो त्याबद्दल मात्र अनभिज्ञ होता.
काम करण्याची तयारी, अपेक्षित वेतन, आवश्यक ज्ञान व कौशल्य या सर्व बाबतीत अन्वर पात्र उमेदवार होता. मी काय करावं? काही दशकं पाळलेला अलिखित नियम पाळावा की एक नवीन सुरुवात करून पहावी? कारण जो बदल होईल तो केस टू केस बेसिसवर होणारा नसावा अस माझं मत पडलं.
तू विचारलेला प्रश्न फार जटिल आहे. मला निर्णय घ्यायला किमान एक महिना लागेल. मी जर तुझी निवड केली तर तू जिंकलास, या एका महिन्याचा पगारही तुला देईन. आणि नाही तर असं समज की हा प्रश्न कधीच सुटणार नाही. मी त्याला माझा निर्णय सांगितला.
तुम्ही फार शांतपणे ऐकून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद सर. इतक्या खोलातही आजपर्यंत गेलं नाही माझ्या बाबतीत. मी वाट पाहिन तुमच्या निर्णयाची. मला वाटत या प्रश्नाला उत्तर आहे, कदाचित या पिढीत नाही पण पुढच्या किंवा त्याही पुढच्या पिढीजवळ असेल.  अन्वर जाण्यासाठी उठला.
तो म्हणाला त्यात तथ्य आहे असा मला वाटलं. डोक्यातून जातीविषयी विषमता काढून टाकता टाकता दोन पिढ्या संपल्या, आता पुढचा विषय. पण हे एका समाजाचे काम नाही. टाळी एका हातानी वाजणार नाही हेही खरच! फक्त जितका वेळ अधिक जाईल तितका हा प्रश्न अधिक गुंतत जाणार हेही नक्की.




Wednesday, October 14, 2015

फक्त दोनच मिनिटं !


तीन चार वर्षांपूवीची गोष्ट. मैसूरहून बंगलोरकडे बसने येत होतो. उशीर झाला होता. केम्पेगौडा बस स्थानकात पोचताच टॅक्सी करून १० वाजताचं विमान पकडायचा बेत होता. बंगलोरचा विमानतळ शहरापासून लांब आणि जाण्याच्या रस्त्यावर फ्लाय ओव्हर ची कामे चालू असल्याने प्रचंड रहदारी आणि वाहतुकीची कधीही होणारी कोंडी हा त्यावेळी तिथला वर्तमान होता. त्यामुळे वेळेचे गणित पाहता आमचा “धाडसी” बेत फसणार असे दिसू लागले होते. बस स्थानकात पोचली. टॅक्सी उभी होतीच . आम्ही घाई घाईने टॅक्सीत बसलो आणि चालकाला लगेच निघण्याची आज्ञा केली. “Difficult to get flight Saar” खास दक्षिणात्य शैलीत त्यानं नाट लावला आणि ‘आता तुमचा भवितव्य चालक म्हणून माझ्या हातात आहे’ असा संकेत दिला. इकडे आम्ही हवालदिल झालेलो! रहदारीच्या कोन्डीमधून वाट काढत आमची टॅक्सी हळू हळू पुढ सरकत होती. “वाहन उदयोगाच्या भरभराटीशी आपली भरभराट निगडीत आहे, पण त्यान निर्माण होणार्या समस्येचा आपण अनुभव घेत आहोत” माझा सहकारी म्हणाला. “आपलं पोट भरण्यासाठी उद्योग करायचा आणि त्यातून निर्माण होणार्या समस्या सोडवण्यासाठी पुनः आणखीन उद्योग करायचा असं चक्र असतं - याला जीवन ऐसे नाव !” मी प्रतिक्रिया दिली. इकडे गुगल मॅप वर मी सारखा लक्ष ठेवून होतो, काळ काम आणि वेगाची गणिते करत! आम्ही आता १० मिनिटात पोचणारच होतो आणि तेही विमानाच्या अगदी वेळेत, तेव्हढ्यात आमच्या चालकाचा फोन वाजला. त्यान गाडी आज्ञाधारकपणे बाजूला घेतली. त्यानं नियम पाळला याचं मलाच कौतुक वाटलं अगदी त्याही परिस्थितीत; “just two minutes Saar” त्यान माहितीवजा विनंती केली. काल ही एक मिती असून ती सापेक्ष आहे असं भौतिक शास्त्र सांगतं त्याचा अनुभव यायला सुरुवात झाली. आमच्या घड्याळाचा वेग आणि आमच्या चालकाच्या घड्याळाचा वेग अचानक जुळेना! त्याची २ मिनिटे आणि आमची, किंबहुना विमान कंपनीची दोन मिनिटे यात चांगला १० मिनिटांचा फरक पडला आणि आमचे विमान अखेरीस चुकलेच!
गजराच्या घड्याळात स्नूझ ची सोय करणाऱ्या तंत्रज्ञाला नक्कीच परीतोषके मिळाली असतील. पण त्यानं एक सोय झालीय, पहाटे (पहाटे म्हणतोय कारण ‘मी नेहमीच पहाटे उठतो’ असं प्रत्येकाचं मत असतंच!) गजर झाल्यावर हे लक्षात येते की आपण आत्तापर्यंत पाहतोय ती स्वप्ने आहेत आणि ती बहुतेक साकार होणारी नाहीत! मग उगाच धावपळ कशाला? त्यामुळे लगेच उठण्यापेक्षा “उठुयात दोन मिनिटात” असं म्हणून उरलेलं स्वप्न लवकर पूर्ण करण्याची घाई करता येते. कधी कधी घड्याळ थकते पण आम्ही त्याचा गजर पुढे पुढे करायला थकत नाही! अगदी कडेलोट झाल्यावर बायकोच्या तीव्र हाकेने झोपमोड होते आणि मग ठरवलेले व्यायामाचे बेत रद्द झाल्याबद्दल किंवा उशीर झाल्याबद्दलचा आपल्यावरचाच राग काढायला आपण सावज शोधू लागतो. मग आपल्याला समोर येईल ती व्यक्ती, मध्ये येणारा कोणताही प्राणी, पूर्णपणे निर्जीव असलेली कोणतीही वस्तू चालते, अगदी ज्या घड्याळानं प्रामाणिक प्रयत्न केले ते घड्याळसुद्धा!. वर राग शांत करताना “उद्या काय वाट्टेल ते झालं तरी वेळेत उठुयात” असा निग्रह करण्यास आपण मागे पुढे पहात नाही. 
कधी एखाद्या संगीताची मैफल रंगात आलेली असते, अगदी अनपेक्षितपणे. आणि आपण कोणाला तरी भेटायची वेळ देउन ठेवलेली असते, कोणत्यातरी अकल्पित दडपणाखाली. निघायची वेळ होते, पण रंगत आलेल्या कार्यक्रमातून उठून जाववत नाही. “जाउ दोन मिनिटांनी” असा म्हणत आपण थांबतो त्या कार्यक्रमात, वेळेची मर्यादा संपण्याची वाट पाहत आणि मग निरोप पाठवतो, “जमत नाही” म्हणून!
जवळच्या कोणाच्या तरी श्रद्धांजली सभेत “दोन मिनिटे शांत उभं राहण्याची विनंती” असते त्या व्यक्तीच्या आठवणी दाटून येतात, ती दोन मिनिटं अपुरी पडतात, पुढची सूचना मिळताच ‘लोकापवाद नको’ म्हणून आपण सर्वांबरोबर पुढच्या कार्यक्रमात सहभागी होतो.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात येणारी अशी अनेक “दोन मिनिटं”. कधी त्यामुळे आपल्यालाला हवं ते फळ अचानक मिळतं पण बर्याच वेळेस काहितरी घोटाळाच मांडून ठेवलेला असतो. वास्तविक दोष त्या दोन मिनिटांचा नसतो. “टू बी? ऑर नॉट टू बी?” हा प्रश्न ज्या क्षणी पडतो तो खरा घातक क्षण. या जगात बहुपर्यायी प्रश्न हे बहुतेक अस्तित्वात नसतातच. प्रश्नाचं उत्तर म्हणून असणारे पर्याय हे नेहमीच “टू बी? ऑर नॉट टू बी?” या दोन प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करणारे त्या त्या निर्णयाचे परिणाम असतात. कोणत्याही जटील प्रश्नाच्या मुळाशी माझ्या मते फक्त दोनच प्रश्न असतात “टू बी? ऑर नॉट टू बी?” ते सोडवले तर कोणताही प्रश्न किचकट ठरत नाही!
-सत्यजित चितळे

Friday, October 9, 2015

याला जीवन ऐसे नाव !

नुकतच एका मित्रान त्यानं काढलेल्या छायाचित्रणाचा संकलन फेसबुकवर शेअर केल. दवबिंदू आणि पर्जन्याबिंदुच फार सुंदर चित्रण त्यानं केलंय. त्याचे फोटो बघताना पाण्याच्या अनुभवलेल्या रुपात मी हरवून गेलो.
थंडीत धुक्याच्या रुपात दिसणारं वायुरूप पाणी, थंडीचा कडाका वाढवणारं पण उघड्या अंगाला किंचित उब देणार धुकं, ते द्रवरूप झालं कि पाना पानांवर जमा होणारे दवबिंदू- पाण्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार गोलाकार मोत्याच्या टपोऱ्या गेन्दांसारखे, पानांचा रंग आणखीनच खुलवणारे! पावसाळ्यात पडणारे पाण्याचे टपोरे थेंब, कधी भुरभूर तर कधी नखशिखांत भिजवून टाकणारे, कधी गोठून गारांच्या रूपात बरसणारे; मातीत मिसळून जीवन देणारे पाणी, त्याच मातीच्या कणांना सामावून घेऊन गढूळ रंगात वाहणारं पाणी! मानसानं धरणाच्या रूपात अडवल्यावर विस्तीर्ण जलाशयाचं रूप घेणारं, मनाला सुखावणार पाणी; पूजेच्या आधी आचमन करताना हातात घेतलं की मनात उदात्त भाव प्रसवणारं पाणी, साक्षात तेजाचा अवतार असणाऱ्या प्रकाशाचं पृथक्करण करून त्याच्या रंग छटा दाखवण्याचा सामर्थ्य असलेल पाणी! उंचावरून धबाबा कोसळणाऱ्या धबधब्यातील धारेपासून विलग होणारे पाण्याचे थेंब, धरणातून उगम पावणाऱ्या बंद नलिकेतून वाहत जाऊन आपली उर्जा टर्बाइनला मुक्तपणे बहाल करणार पाणी! तोंडात घेववत नाही पण नजर ठरत नाही अस विशाल रूपातलं लाटा पालावणार समुद्राच पाणी! जीवनाचा मुख्य आधार असलेलं हे एक महाभूत.
याचा एक महत्वाचा गुणधर्म हा की याला स्वत:चा असा रंग नाही, वेगळी अशी स्वत:ची चव किंवा वास नाही. प्रत्येकाच्या शरीरात त्याचा वास आणि एक स्त्रोत असलेला. प्रवाह हा याचा धर्म पण प्रत्येक व्यक्ती एक जलकुंभ असावा असा दुहेरी गुणधर्म असलेल हे एक महाभूत.
जीवन प्रवाही असावं कारण तो जलतत्वाचा धर्म आहे, माणसाला प्रवाहित होताना अनेक माणसं म्हणजेच जलकुंभ भेटावेत हा निसर्गनियमच. सर्वच व्यक्तीमधला जलस्त्रोत हा मुळात रंगहीन, पण संस्कारांचं अमृत किंवा वृथा अभिनिवेशाचं आणि किल्मिशाच विष यापैकी एक मिसळलेला. जीवनाच्या प्रवासात संपूर्ण अमृतकुंभ भेटणं हा एक दुर्मिळ योगायोगच. काही कुंभ नुसतेच तात्कालिक तहान भागवणारे तर काही चक्क विषाचे! घोट घेतल्याशिवाय आणि चव घेतल्याशिवाय कळत नाहीत असे. समाजात मिसळताना असा विषाचा घोट प्रसंगी घेतलाच तर तीन उपाय उरतात. त्याचा दाह सहन न झाल्यामुळे ते सांडत फिरावं आणि आणखीन पसरावावं हा पहिला मार्ग, ते विष उरी बाळगून दूर एकांतात निघून जाणं हा दुसरा तर आपल्यातील अमृत्तत्वानं ते विष पचवून टाकून त्या विषाचं अमृतात परिवर्तन करणं हा तिसरा.
हा तिसरा मार्ग महाकठीण, ती एक साधनाच आहे. पण आपल्यातील साध्या जाल्स्त्रोताचा अमृतघट बनवण्याची ईश्वरदत्त प्रेरणा हि तिथेच प्रकट होते!

-सत्यजित चितळे 

Wednesday, October 7, 2015

डॉक्टर तुम्हीसुद्धा?


परवा शाळेतल्या मित्रांच स्नेहसंमेलन ठरला होत. एका डॉक्टर मित्राचा निरोप आला “ सर्दी पडशाने बेजार झाल्यामुळे येत नाही”. निरोप वाचताना मला कसा आसुरी आनद झाला! डॉक्टरनं आजारी पडू नये, प्लम्बरच्या घरातील नळ गळू नयेत, इलेक्ट्रिशियन च्या घरी दिवे जाऊ नयेत, केटररच्या घरी कायम पंचपक्वान्नाचे जेवण तयार असावे, इंजिनियर ची गाडी कधी बंद पडू नये, सोफ्टवेअर इंजिनियरचा कॉम्प्युटर कधी क्रश होऊ नये अस आपल्याला कायम वाटतं. त्यामुळे यातलं काही झाल की “ अरेच्चा असं कसं?” असा कुत्सित प्रश्न पडतोच. तसाच तो मलाही पडला आणि मी तो ग्रुपवर फिरवला, वर पुस्तीही जोडली “ आम्हाला शिकवतोस ते न पाळता रात्री बेरात्री भटकून काहीतरी गार खाल्ल किंवा प्यायलं असशील!” . माझा मित्र पुण्यातच लहानाचा मोठ्ठा झालेला असल्याने त्यानं सवाई जवाब दिला “ इंजिनियर असूनही ऐन पावसात छत्री न उघडल्याने भिजलास आणि सर्दी झाली तेम्वा मीच आठवलो होतो नाही का? “
गेल्या वर्षी स्वाईन फ्लू वरचा उपचार घेऊन बरा झालेल्या एका मित्राने डॉक्टरांविषयी गार्हाण मांडल “ तोंडावर मास्क घातलेल्या त्या डॉक्टरनं हात न लावताच तपासलं, मास्कमुळे तो नेमक काय बोलतोय हेसुद्धा समाजत नव्हतं .......” मी जेव्हा त्याला सबुरीचा सल्ला द्यायला गेलो तेव्हा म्हणाला “एकच तर जीव आहे, नीट बरा नको का व्हायला? केवढी रिस्क? “ त्याचं म्हणण वाद घालण्यासारखं नव्हतं पण हेच डॉक्टरांच्या बाजूने पण खरय नाही का? त्यांचाही एकच तर जीव असतो नाही का?
प्रत्येक व्यवसायात कमी जास्त धोका असतोच. ड्रायव्हरला अपघाताची, फायरमनला आगीची, पोलिसाला अतिरेक्याची, सैनिकाला शत्रूची भीती असतेच. या व्यावसायिक अनिश्चितता या जीवघेण्या असतात तशाच रुग्णाचा आजार डॉक्टरांनाच होण्याची शक्यता कशी नाकारता येईल? कितीही काळजी घेतली तरी हा धोका पत्करणं ही रुग्णाला बरं करण्यातली पहिली पायरी आहे हे रुग्णानसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे.
आपल्या “सापेक्ष” ज्ञानाचा आणि कौशल्याचा, प्रसंगी “अवाजवी” लाभ उठवण्याला सध्याच्या परिभाषेत “व्यावहारिक चातुर्य” असं म्हणतात. ही वृत्ती जिथे सर्वच व्यवसायात पसरली आहे तेव्हा फक्त वैद्यकीय व्यवसायच या पासून अलिप्त राहील ही अपेक्षा ठेवणंच मुळात चूक आहे. मग अशा व्यावहार चतुर डॉक्टरकडे उपचार घेण टाळाव हेच योग्य.
माणसाचा जन्म आणि मृत्यू हे अटळ सत्य वैज्ञानिक अंगानं शिकलेल्या डॉक्टरला हे काय माहित नसतं की समोरचा रुग्ण हा कधी न कधी मरणार आहे? अनंताच्या प्रवासाकडे वाहणारा माणसाचा जीवनप्रवाह कधी व्याधीमुळे अडखळतो, प्रदूषित होतो तो पुन: पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणं हे डॉक्टरांचं काम. त्यातून जेव्हा या प्रवासाचा शेवटचा टप्पा असतो आणि हे फक्त त्या डॉक्टरला आणि त्यालाच कळत असतं तेव्हा अथक प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांना माणूस म्हणून सलाम करावासा वाटतो.
रुग्णाकडे सब्जेक्ट म्हणून पाहण्याच्या सवयीची चित्रपटात पुरेपूर थट्टा केलेली त्यावेळी बघितली, आवडली सुद्धा. पण ज्या यशस्वी डॉक्टर लोकांना मी ओळखतो त्यांची रुग्णाला तपासताना त्याच्या मनाचा अॉब्जेक्ट म्हणून विचार करण्याची आणि प्रत्यक्ष उपचार देताना सब्जेक्ट म्हणून विचार करण्याची सर्वांगीण पद्धत मला अभियांत्रिकीतसुद्धा आचरावी वाटली आणि मी तसा प्रयत्न करून पहिला, ते अवघड आहे असा माझ्या लक्षात आलंय.
आपल्याला रोज हसरे, प्रफुल्लीत चेहरे दिसावेत असं कोणाला वाटत नाही? आपल्या सभोवती कायम हसरं, तणावमुक्त वातावरण असावं म्हणून आपण काय काय करतो. पण दुखरे, निराश झालेले चेहरे रोज पाहणं आणि त्यातून न रागावता, न चिडता, एक टवकाही न उडवता हसरा चेहरा घडवणं हे खरोखरच एक कौशल्याचं काम आहे. दुर्धर आजार झालेले, आयुष्याला कंटाळलेले रुग्ण तपासणं आणि त्यांना बरं करण्याचा विडा उचलणं किती कठीण आहे याचा प्रत्यय कॅन्सरच्या रुग्णालयात जाता येता येत असे. १२ नंतर शक्य असूनही मेडिकल ला प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतल्याचं मला राहून राहून बरं वाटत असे.
मी पाहिलेले “यशस्वी” म्हणून गणले गेलेले डॉक्टर त्यांच्या व्यवसायाबरोबरच कोणत्या न कोणत्या कलेशी जवळीक साधलेले आहेत. रुग्णाबरोबर निर्माण झालेलं नातं आणि त्याला सहानुभूती दाखवताना त्याच्याकडून उसनी घेतलेली त्याची पीडा यातून मनरंजन करण्यासाठी ते कलेचा आधार घेत असावेत असा मला वाटत. हे खरय का हे मात्र त्या एका डॉक्टर मित्रालाच विचारव लागेल!
रुग्णाकडे सब्जेक्ट म्हणून पाहण्याची व्यावसायिक मानसिकता तयार करूनही डॉक्टर “माणसांच्या” मनात प्रसंगी वेदनेचा कल्लोळ उठत नसेल का? आय. सी. यु. मध्ये रुग्णाच्या नातेवाईकाला निर्वाणीचा संदेश देणाऱ्या डॉक्टरांचा कातर झालेला स्वर मी ऐकलाय आणि ओलावलेल्या डोळ्याच्या कडा मी पहिल्या. त्यावेळेस मला खरच त्या डॉक्टरांना विचारावस वाटल होतं “ डॉक्टर तुम्हीसुद्धा? “
--सत्यजित चितळे