इंद्र धनु चे दिवस:
ज्येष्ठा चां शेवट यावा, सूर्याने
मृग नक्षत्रात प्रवेश करावा आणि आभाळात भरून येणाऱ्या काळया ढगांची घनघोर लढाई
पहावी, लखलखत्या विजांचा कल्लोळ आपल्याला
गिळेल अशी भीती वाटत असताना सुद्धा हात पसरून आभाळाकडे पाहत पहिल्या पडणाऱ्या
टपोऱ्या थेंबाचा आनंद घ्यावा. आषाढातल्या संतत
धारेत वाहणाऱ्या गढूळ पाण्यातून भटकंती करावी, नुकत्याच
रुजू पाहणाऱ्या बीजांतील अंकुर डोकावताना पाहून मन सुखवावे, थोड्या
दिवसांपूर्वी वैराण दिसणारी काळी – भरड तपकिरी जमीन
हिरवी चादर पांघरताना दिसावी, संतत धरेचा
कंटाळा येण्या अगोदरच आभाळातून उन्हाचा एखादा कवडसा पडलेला पहावा आणि श्रावणाच्या
चाहुलीने मन आनंदून जावे. मग हा ऊन
पावसाचा खेळ काही दिवस पहावा, भुरभुर पडणाऱ्या पावसाकडे उगवत्या
किंवा मावळत्या सूर्याने तिरप्या नजरेने पहावे आणि आभाळात एक अद्भुत सप्तरंगी
दृश्य दिसावे 'अहहा इंद्रधनु’ हे
शब्द सहजच ओठी यावे, काही क्षणांपुरतेच दिसणारे इंद्र धनु इतके
का मोहवून टाकते हा प्रश्न मात्र पडू नये हे एक विस्मयच.....
शुभ्र वाटणाऱ्या रंगाच्या किरणातला पाहिला भाग ताम्र वर्णाचा, स्वभावतः उष्ण, अधिक फ्रिकवेंसी
आणि लहान तरंग लांबीचा, एखाद्या ठिकाणी
पडेल तर वरवर जाळून टाकेल अशी क्षमता
बाळगणारा, तापट स्वभावाचा आणि हात घालीन तिथे पाणी काढीन असा आवेश असलेला.
तांबड्या पासून उतरता ( कि चढता?)
प्रवास सुरु होत नारिंगी- पिवळा- हिरवा- निळा – पारवा- जांभळा हा प्रवास दृश्य
मानतेत शीतलतेकडे जाणारा. शेवटचा जांभळा रंग कमी फ्रिकवेन्सी आणि जास्त तरंग
लांबीचा परंतु खोलवर परिणाम साधणारा. मधोमध येणारा रंग
हिरवा, दोन्ही रंगांकडे समानतेने बघणारा, सृजनाचा आणि नव निर्मितीची क्षमता असलेला, संतुलन
हा मूळ स्वभाव असलेला!
शुभ्र रंग किरणे प्रसवणाऱ्या सूर्याला पाण्याच्या एका छोट्याश्या
थेंबाचा रूपाने असा लोलक हाती मिळावा ज्याने त्याच्याच किरणांचे हे स्वभाव आणि
क्षमता वर्णपटावर मांडून दाखवाव्यात.
अश्या एखाद्या तूषाराकडे लोलक म्हणून पाहण्याची संधी आपल्याला मिळावी
आणि त्यानं आपल्या स्वभाव क्षमता चे पृथक्करण करावे.
त्यातून आजवरचा प्रवास असा वर्णपट मांडून पाहता यावा असे भाग्य नाही. हा लोलक कोणत्या
स्वरूपात हाती येईल आणि क्षणात नाहीसा होईल हे सांगता येत नाही.
प्रकाशाचा प्रत्येक किरण हा पांढरा असला तरी त्याचेही सात प्रमुख घटक
इंद्रधनू मध्ये दिसतात. इथे प्रत्येक माणूस स्वभावत: वेगळाच! कल्पांत म्हणावा त्या
क्षणी कोणी प्रश्न विचारावा ‘ कि तुझी नेमकी ओळख काय?-
एका वाक्यात सांग” तर यातील कोणत्या एका रंग किंवा रंग छटेकडे बोट दाखवावे?
आपल्याच इंद्र धनु च्या पटाकडे नजर टाकता असे वाटावे कि यातला प्रत्येक रंग हि
माझी फक्त भूमिका होती ती माझी ओळख नव्हे! मग त्यातला समान रंग किंवा एखादी रंग
छटा शोधीत जावे.... भौतिक शास्त्राच्या दृष्टीने असे काही मिळणारच नाही पण मानवी
स्वभाव वैशिष्ट्य म्हणून असे काही हाती लागेलच.....तीच आपली खरी ओळख जी हे
इंद्रधनू व्यापून उरलेली असते.
तांबड्या रंगाकडून जांभळ्या रंगाकडे प्रवास करताना मध्यावर असा एक
लोलक हाती मिळाला, कदाचित हाच प्रकृतीचा नियम असेल.....परंतु त्याने मनात भरेल असे इंद्रधनु दाखवले हे मात्र खरे!
सत्यजित चितळे
4 नोव्हेंबर 2022
No comments:
Post a Comment