Saturday, November 5, 2022

मार्दी हिमाल बेस कॅम्प ट्रेक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२


 








 मार्दी हिमाल  ट्रेक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हे २०२२

मार्दी हीमाल- अन्नपूर्णा शिखर रांगे जवळच्या वैशिष्टय पूर्ण मच्छपुच्छरे शिखराच्या उतरणाऱ्या सोंडे वरचे एक छोटेसे टेंगुळ! मूळ मच्छपुच्छरे शिखरपासून मार्डी शिखर एका छोट्याश्या घळी मुळे तुटलेले आहे, अर्थात हिमालयाच्या विशालतेच्या दृष्टीने छोटीशी असलेली ही घळ फक्त” 300 मी खोल आहे! स्थानिक दृष्टीने अर्थात या शिखराचे मोठे महत्व आहे. नेपाली भाषेत मार्दी हिमाल म्हणजे पूर्ण चंद्र असे इथल्या एकाने सांगितले. या शिखरापासून एक नदी उगम पावते जीचे नाव मार्दी असे आहे. ही नदी पोखरा च्या आधी ‘सेती गंडकी’ नदीला मिळते.

5587 मीटर्स ची उंची गाठलेल्या या शिखरावर बेसिल गूडफेलो नावाच्या गिर्यारोहकाने पहिले पाउल 1961 साली ठेवले. 'ट्रेकिंग पीक अर्थात सहज चढून जाता येईल असे शिखर अशी ओळख असलेल्या मार्दी शिखराच्या बेस कॅम्प चा ट्रेक मात्र 2012 पासून अधिकृतरित्या सुरू झाला. नेपाळ मधील पोखरा शहरापासून देवराली इथपर्यंत गाडीरस्ता आता झालाय मार्डी शिखरावरून उतरणारी डोंगर सोंडेवरच देवराली आहे. त्यामुळे तिथूनच या डोंगर सोंडेवरचा प्रवास पायी सुरू होतो. गाडी रस्त्याने पोखरपसून बसने धम्पुस गाव गाठून बरेच ट्रेकर्स ही वारी सुरू करतात. 2 ते 3 दिवस चढाई आणि 2 दिवस उतरणे असा हा छोटासा पण सुंदर ट्रेक आहे.

आम्ही या ट्रेकसाठी पोखरा येथील सिस्ने रोव्हर ट्रेकिंग या कंपनीची मदत घेतली होती आणि 1 गाईड आणि दोन पोर्टर बरोबर घेतले होते. 20-22 वर्षाची ही नेपाळी मुले याच परिसरातील होती. पूर्णा हा आमचा गाईड, अनिल आणि कृष्णा हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आमचे पोर्टर. पण आमचे त्यांच्या बरोबर चांगले सूत जमले होते.

29 ऑक्टोबर ला पुणे दिल्ली काठमांडू असा प्रवास करून काठमांडू येथे डेरेदाखल झालो. काठमांडू शहरात खूप सुधारणा झालेल्या बघून छान वाटले. 30 तारखेला सकाळी काठमांडू पोखरा विमान प्रवास करून लगेच देवराली कडे प्रस्थान केले.  पोखरा ते जोमसोम चांगला चार पदरी रस्ता झालाय, घट्टे खोला गावाजवळ त्याला धांपुस गावाकडे फाटा फुटतो. त्या रस्त्याने पोखरा पासून सुमारे 1 तासाने धाम्पुस गावाजवळ पोचलो. इथून अन्नपूर्णा रांग, मच्छपुच्छरे आणि लामजुंग रांग सुंदर दिसते. इथून पुढे देवराली पर्यंत रस्ता अत्यंत खराब आहे, पण 4 व्हील ड्राईव्ह जीप मुळे सामानासहित देवराली पर्यंत पोचणे शक्य झाले. देवराली ची उंची 2160मी च्या आसपास आहे. पहिल्या दिवशी चा पडाव फॉरेस्ट कॅम्प 2500 मीटर आणि अंतर 9किमी.

देवराली ते फॉरेस्ट कॅम्प ची वाट गुरास, मॅपल आणि इतर अनेक वृक्षांच्या घनदाट जंगलातून जाणारी, खूप चढ आणि उतार असलेली. मधूनच झाडांच्या दाटी तून मच्छपुच्छरे, अन्नपूर्णा रांगेच सुखद दर्शन होत होत. झाडी कुठे कुठे इतकी दाट की दिवसा सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नव्हता. धुवाधार पडणारा आणि आताशा लांबलेल्या पावसाची खूण म्हणून झाडांवर भरपूर वाढलेले मॉस, जमिनीतला ओलावा आणि पाऊल न पडलेल्या जागी वाढलेलं शेवाळ हे जागोजागी दिसत होत. मातीत मिसळून गेलेली कुजलेली पाने आणि त्यामुळे भुसभुशीत झालेली वालुकामय माती अजून ओलावा धरून होती. अभ्रक मिश्रित दगडांच्या रुपेरी आणि क्वचित चक्क सोनेरी रंगाच्या खापर्या, गारगोटी सारखे दिसणारे स्फटिकाचे दगड यांची रेलचेल वाटेत होती. उंच वाढलेल्या वृक्षांची आडव्या पसरलेल्या भर भक्कम मुळ्यांनी उतारावर आपोआप पायऱ्या तयार केल्या होत्या. तीव्र उतारावर छानश्या दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. नेपाळ च्या पहाडी जिल्ह्यात स्थानिक कमिटी द्वारे सर्वेक्षण करून ट्रेक रूट वर पायऱ्यांचे बांधकाम, आवश्यक असेल तिथे संरक्षक कठडे अशी बांधकामे सरकारी खर्चातून केली जातात अशी माहिती अनिल ने दिली. पर्यटन, आणि गिर्यारोहण हे इथे उत्पन्नाचे मुख्य साधन असल्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी हे चांगले प्रयत्न इथे होताना दिसले. त्यातून नवे ट्रेक रूट आणि त्यावर बांधली जाणारी गेस्ट हाऊस याची साखळी निर्माण होताना दिसली. गेस्ट हाऊस चे नियम, सोयी सुविधा आणि दरही एक सारखे आहेत असे लक्षात येते. या नवीन ट्रेक रूटस वर गेस्ट हाऊस बांधण्यासाठी सरकार जमीन भाड्याने देते आणि गेस्ट हाऊस बांधणे आणि चालवणे हे स्थानिक लोक करतात असे श्री. दंबार यांचेकडून समजले. गेस्ट हाऊस च्या उत्पन्नातून सरकारी जमिनीचे भाडे सरकारला मिळते, येणाऱ्या ग्रियारोहकांना परवाना काढावा लागतो त्याची फी मिळते. गेस्ट हाऊस च्या चालकांनी उत्पन्नातून आयकर भरणे अपेक्षित आहे, त्यावर काही बोलणे नको! अर्थात गिर्यारोहण आणि पर्यटन जितके वाढेल तितके परकीय चलन नेपाळ च्या खात्यात आपोआप जमा होते आणि रोजगार वाढतो हेही महत्वाचे आहे.

देवराली हून निघाल्यापासून दीड तासाने दोडा खरक नावाचा कॅम्प आला, तिथून पुढे रस्ता चत जाऊन एका वळणावर झाडीतून मुशलबारी चा कॅम्प डोकावला. तिथून समोर अन्नपूर्णा साऊथ आणि मच्छपुच्छरे चे सुंदर दर्शन होत होते. इथून पुढे उतार लागला आणि पुढच्या खळग्यात फॉरेस्ट कॅम्प ची गेस्ट हाऊसेस लागली. इथे पोचेस्तोवर संध्याकाळ झाली आणि आम्ही इथेच एका गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.

31 ऑक्टोबर ची पहाट जंगलातील पक्षांच्या आवाजात उगवली. फॉरेस्ट कॅम्प बेचक्यात असल्यामुळे इथून क्षितिज आणि पर्वत रांग काहीच दिसत नव्हते, परंतु  जंगलातील ती सकाळ फारच प्रसन्न होती. सकाळी आवरून 8.30 ला पुढे निघालो. आता तीव्र चढ सुरू झाला. उंची वाढत होती तशी झाडांचे प्रकार बदललेले लक्षात येऊ लागले. गुरास च्या वृक्षांची उंचीं कमी होऊ लागली. बऱ्याच ठिकाणी उतारावर फर्न च्या झुडुपांची  दाटी दिसू लागली. डोंगर रांग डावीकडे ठेवत तिच्या घड्या उलगडत जाताना एक चढ चढून आलो आणि समोर मच्छपुच्छरे शिखर माथ्याची माशाची शेपूट असलेली रचना विशेष उठून दिसून आली. तोच रेस्ट कॅम्प होता. इथून समोर मछपुच्छरे शिखर पायापासून माथ्या पर्यंत संपूर्ण दिसत होते. डावीकडे मार्डी हीमाल कडे जाणारी आमची डोंगर रांगेची वाट पूर्ण दिसत होती. रेस्ट कॅम्प वर पहाडी नाश्ता पोटात ढकलून पुढे निघालो. रस्ता जंगलातून होता पण सलग चढाचा होता. आम्ही 2600 मी ची उंची ओलांडून पुढे निघालो होतो आणि आता श्वास घेताना ऑक्सिजन ची कमतरता आहे याची पुसटशी कल्पना येऊ लागली होती. कालपासून या मार्गावर नेपाली युवा वर्गाचे ट्रेकिंग करणारे ग्रुप बरेच भेटले होते. त्यातील काही आमच्या आगे मागे बरोबरच चालत होते. ग्रुप मधील किमान एकाकडे ब्लू टूथ स्पीकर आणि त्यावर लावलेली नेपाली गाणी हे अनिवार्यच होते. मुलींची संख्या लक्षणीय होती आणि ट्रेक रूट वर असूनही त्यांची नटण्याची आवड लपून राहिलेली नव्हती. कुठेही असावे तसेच हे मुला मुलींचे ग्रुप आपल्याच घोळक्यात रममाण झालेले होते. ट्रेक रूट वर आणखी बरेच नेपाली ग्रुप्स भेटले. स्थानिक लोक ट्रेकिंग ला पसंती देऊ लागले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात झालेला हा स्तुत्य बदल आहे असे आमची व्यवस्था करणारे सिसने रोव्हर चे मालक श्री. दम्बर यांनी सांगितले.

रेस्ट कॅम्प सोडल्यावर तासाभराच्या चढाई नंतर एक छोटासा कॅम्प लागला. इथे बकऱ्यांचा कळप विसावला होता आणि गुराखी त्यांची लोकर भादरत होते. थंडीच्या सुरुवातीस सुरू असलेली स्थानिक कामे! अनवट वाटांवरील ही निसर्ग संपत्ती पुढे जाऊन प्रक्रिया होऊन शहरातील चकचकणाऱ्या दुकानातून आकर्षक उबदार कपड्यांच्या रूपात मिरवणाऱ!

रेस्ट कॅम्प सोडल्यापासून दोन तासांनी 2900 मी वरच्या लो कॅम्पपाशी पोचलो. उंची जशी वाढत होती तसे आम्ही मछपुच्छरे च्या अधिक अधिक जवळ जात होतो आणि त्याच्या टोकदार शिखर आणि धारदार उतरंडी चे बारकावे अधिक स्पष्ट होत होते. आता पलीकडे गंगापूर्णा शिखर डोकावूं लागले होते आणि मार्डी शिखर अधिक स्पष्ट दिसू लागले होते.

लो कॅम्प सोडून अजून एक तास चढाई केल्यावर उंच झाडांचे छत्र संपले आणि आम्ही बादल दंडा कॅम्प वर पोचलो. थोडे उंचावरचे टेकाड असल्यामुळे इथून दृश्य अधिक स्पष्ट होते. बादल दंडाची उंची 3200 मी आहे, इथून पुढे 300 मी चढून 3500मी वरील हाय कॅम्पवर जाऊन राहावे असे आमच्या गाईड पूर्णा चे म्हणणे होते. परंतु एकदम इतकी उंची गाठणे ठीक होणार नाही म्हणून आम्ही बादल दंडा इथेच राहण्याचा निर्णय घेतला. दुपारी जेवण घेई पर्यंत थंड वारे सुटले आणि समोरची डोंगर शिखरे ढगांच्या आड लपली.  कॅम्प वर ही ढगांचे आक्रमण झाले आणि सगळीकडे धुके भरले. बादल दंडा हे नाव या वातावरणाने सार्थ ठरवले. दाटणाऱ्या धुक्याबरोबरच हुडहुडी भरवणारी थंडी वाढली आणि आम्ही अंगावर अधिक गरम कपडे चढवून जाड पांघरुणात शिरणे पसंत केले. संध्याकाळी आकाश निवळले आणि संधी प्रकाश पसरू लागल्यावर तारकांनी दर्शन द्यायला सुरुवात केली. अष्टमी चा चंद्र आभाळात मध्यावर आला होता आणि बरोबर विरुद्ध दिशेत मच्छपुच्छरे शिखर चंद्र प्रकशात चमकू लागले. आभाळात आता तारकांची दाटी झाली. मंद प्रकाश असलेल्या आणि पुण्यातून कधीच न दिसणाऱ्या अनेक तारका आणि त्यांनी मांडलेली नव्हे तर माणसाने कल्पिलेली नक्षत्रे दिसू लागली. मकर राशीत ला शनी आणि मीन राशी जवळचा गुरू दोन्ही दिसलेच पण त्या दोन्ही राशी सह कुंभ रास सुद्धा ओळखू येईल इतकी स्पष्ट दिसू लागली. अद्भुत असे हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवले, कॅमेरा मात्र त्यासाठी तितका समर्थ ठरला नाही.

अच्युत वैद्य आमचे ट्रेकिंग मधले गुरू, त्यांनी 72व्या वर्षी हा ट्रेक केला. अत्यंत नेटाने 3200 मी पर्यंत चढाई केली. त्यांनी पुढे न येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हीं तिघांनी पहाटे  लवकर 3.30 का मार्डी बेस च्या दिशेने निघायचे असे  ठरवले. आमचा गाईड आणि पोर्टर आमच्या सोबत येणार होतेच.

1 नोव्हेंबर- पहाटे 2.45 चा गजर झाला आणि उठून तयारी केली. 3.30 ला मार्डी बेस ला जाण्यासाठी निघालो. अपेक्षित असलेली थंडी मीम्हणत होती. डोक्यावरच्या हेड लाईट ची बॅटरी थंडीमुळे किती वेळ तग धरेल हे सांगता येत नव्हते. हाय कॅम्प च्या दिशेला एल ई डी ची रांग हलताना दिसली. तिथे मुक्काम केलेले काही लोक लवकर उठून मार्डी बेस च्या दिशेने निघाले आहेत हे लक्षात आले. बादल दंडा ते हाय कॅम्प चढाई 300मी आणि अंतर सुमारे 2 किमी. वाट डोंगर रांगेवरून, सुरक्षित पण चढ आणि उताराची. अधून मधून दोन्ही हाताला उतार असलेली. सुदैवाने वारा सुटलेला नव्हता त्यामुळे थंडीची मात्रा वाढली नाही. हाय कॅम्प ला पोचायला आम्हाला 1 तास लागला. तिथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. हाय कॅम्प ते व्ह्यू पॉइंट अंगावर येणारा चढ होता. चांगल्या दगडी पायऱ्या आणि धोक्याच्या ठिकाणी चांगले रेलिंग लावल्यामुळे धोका तसा काहीच नसला तरी श्वास आणि पावले मोजत आम्ही चढाई करत होतो. वाटेत असलेल्या गवत आणि झुदुपंवरचे दव बिंदू गोठून गेलेले दिसले, अर्थात रात्री तापमान शून्याच्या खाली गेले असणार. फोटो घेण्यासाठी ग्लोवज मधून हात बाहेर काढला तरी थंडीने गारठा जाणवत होता. पहाटे 5.30 च्या सुमारास उजाडले आणि आमच्या उजव्या हाताच्या डोंगर रांगेमागुन सूर्याचे बिनीचे किरण डोकावूं लागले. आम्ही डोंगर रांगेच्या मागे होतो आणि तिथून अन्नपूर्णा रांग अजून दिसत नव्हती त्यामुळे फुफुसे अधिक फुलवण्याची धडपड करत थोडा वेग वाढवून अर्ध्या तासात लोअर व्ह्यू पॉइंट गाठला. तिथे पोचता पोचताच समोर अन्नपूर्णा साऊथ च्या माथ्यावर सुवर्ण किरणे पडली आणि त्यांनी माथ्याकडून पायथ्या कडे झरझर झेप घेत काही मिनिटात त्यांनी संपूर्ण शिखर उजळवून टाकले. अगदी काही क्षणात समोरची सर्व शिखरे सोनेरी रंगात उजळली. समोर व्ह्यू पॉइंट वर गर्दी झाली होती, सोनेरी सूर्योदय होताच तिथून लांबूनच जल्लोष ऐकू आला. चमचमणाऱ्या हिम शिखराचे जवळून दर्शन हे सर्वानाच आणि नेहमीच उत्साह आणि आनंद देणारे असते हा अनुभव पुन्हा एकदा घेतला.

पुढे निघालो. आमच्या जवळ उपलब्ध वेळेचे गणित पाहता 9 वाजता आम्हाला परत फिरावे लागणार होते.b8.15 च्या सुमारास व्ह्यू पॉइंट पाशी पोचलो. अन्नपूर्णे च्या संनिध्यात मस्तपैकी गरम आले घातलेला चहा घेतला. इथे चहा ची 3 ते 4 दुकाने आहेत. बाकी काही मिळत नाही, पण येणाऱ्या गिर्यारोहकांची सोय आणि त्यातून उत्पन्न. इतकी धडपड करून हा व्यवसाय करणाऱ्यांची कमाल वाटली. एक हेलिकॉप्टर आसपास सारखे घिरट्या घालत होते. कोणाचा तरी शोध सुरू होता. अधिक चौकशी करता असे समजले की मागच्या आठवड्यात एक पोलिश गिर्यारोहक इथे हरवला होता. त्याचा साथीदार खाली पोचला तेंव्हा त्याला माउंटन सिकनेस झाला होता. बहुदा गेलेल्या गिर्यारोहकाची मती उंचीमुळे भ्रष्ट होऊन तो भरकटला असावा, त्याचाच शोध ते हेलिकॉप्टर घेत होते. 2018 क्या फेब्रुवारी मध्ये एक डच गिर्यारोहक महिला इथून हरवली असल्याचा बोर्ड खाली पाहिला होता तो आठवला. उंचीमुळे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे असे अपघात होतात, त्यामुळे त्याची माहिती असणे आणि आपल्या तब्येती कडे लक्ष ठेवणे हे महत्वाचे. व्ह्यू पॉइंट पासून पुढे मार्डी शिखराकडे जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. शिखर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते, पण हिमालयात दिसणारी अंतरे चांगलीच फसवतात हा अनुभव आहे. व्ह्यू पॉइंट वरून पाहता अन्नपूर्णा साऊथ आणि हिंचुली शिखरे अन्नपूर्णा 1 (8091 मी) या मुख्य शिखराला झाकून टाकतात. पण अन्नपूर्णा साऊथ(7200मी), हींचुली, अन्नपूर्णा 4, गंगपूर्णा (7400मी) आणि मच्छपुच्छरे(6993मी) ही शिखरे फारच सुंदर दिसतात. पायथ्यापासून माथ्यापर्यंत 4500 ते 5000 मीटर्स उंच शिखराच्या या भव्यतेमुळे छाती दडपून जाते. अव्यक्ताचे भव्य रूप इथे व्यक्त झालेले दिसते.

नेपाली तरुणांचा एक ग्रुप इथे एकमेकांचे व्हिडिओ काढण्यात गुंतला होता. त्यांच्या दृष्टीने आम्ही म्हातारे अंकल इथे कामाचे नव्हतो! त्या खुणवणाऱ्या उंच शिखराच्या सांनिध्यात अर्धा तास राहून आम्ही परत फिरलो. सूर्य आता वर आला होता आणि त्याच्या बोचऱ्या उन्हामुळे थंडी कमी झाली होती. पाताळात नेतोय असे वाटायला लावणारा पायऱ्यांचा तीव्र उतार सावकाश उतरत हाय कॅम्प वर पोचायला एक तास लागला. हाय कॅम्प वरून सुरुवात करून पहाटेच व्ह्यू पॉइंट किंवा अजून पुढे गेलेले तरुणांचे घोळके एव्हाना उतरले होते आणि आपापले समान बांधून हाय कॅम्प सोडून खालच्या वाटेला लागले होते. आम्ही पहाटे 3.30 पासून बाहेर पडलो होतो आणि पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे हाय पॉइंट वर उदरभरण करून मग बादल दांडा चा रस्ता पकडला. एक तासाने बादल दांडा ला पोचलो तेव्हा वैद्य आवरून आमची वाट पाहत होते. पोचताच समान आवरून 1 वाजता अजून खाली जायला निघालो.

नेपाळ मध्ये बालपण गेलेला आणि पुण्यात अभियांत्रिकी चे शिक्षण घेऊन आता अमेरिकेत स्थायिक झालेला एक तरुण भेटला. त्याला आमचे मराठीत बोलणे जवळचे वाटले म्हणून त्याने ओळख काढली. नेपाली असूनही माझा हा पहिलाच ट्रेक आहे अशी डोळे मिचकावत त्याने कबुली दिली. आजच्या दिवशी हाय कॅम्प गाठण्याच्या बेताने येणारे गिर्यारोहक आता बादल दांडा पर्यंत पोचू लागले आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा तीच जंगलातील वाट, आता जास्त उतार आणि मधूनच चढ असलेली. झाडांमधून जिथे फट पडेल तिथून पुन्हा पुन्हा शिखरांकडे पाहण्याचा मोह आवरत नव्हता. संध्याकाळी 4 वाजता रेस्ट कॅम्प वर पोचलो. आज जवळपास 11 तास चालणे चढ उतार झाला होता आणि 18 किमी अंतर पार करून झाले होते. आज तिथे राहणारे ट्रेकर्स पोचून त्यांनी आधीच गेस्ट हाऊस भरले होते, मुश्किलीने एक खोली मिळाली. दिवाळी नंतर डिसेंबर च्या मध्यापर्यंत इथे ट्रेकिंग सिझन असतो. एकदा बर्फ पडायला सुरुवात झाली की हौशी ट्रेकर्स इकडे फिरकत नाहीत.आम्ही रेस्ट कॅम्प वर पोचलो तोवर समोरची शिखरे ढगात दडली. संध्याकाळी मात्र पुन्हा हवा उघडली आणि समोर मच्छपुच्छरे शिखर संध्याकाळच्या सोनेरी उन्हात न्हाऊन निघालेले दिसले. एक नेपाली 70 वर्षांचे आजोबा भेटले. ते भारतीय लष्करात कमांडो तुकडीत होते आणि पुण्याला आणि बेळगावला येऊन गेले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. नेपाळ मध्ये सगळीकडे चांगली प्रगती होताना दिसतेय आणि समृद्धी वाढताना दिसतेय हे माझे विधान त्यांना नुसतेच मान्य होते इतकेच नव्हे तर त्यांना समाधान देऊन गेलेले दिसले. देवराली हून आम्हाला पोखरा पर्यंत आणणारे जीपचालक भूपेंद्र कुमार सुद्धा भारतीय लष्करात 19 वर्षे सेवा बजावून परत नेपाळमध्ये स्थायिक झालेले. अनेक नेपाली तरुण भारतीय लष्कर, ब्रिटिश लष्कर आणि सिंगापूर चे पोलीस दल यात भरती होतात असे त्यांच्याकडून कळले. नुकत्याच जाहीर झालेल्या अग्निपथ योजनेबद्दल मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. 4 वर्षात भरती होऊन जरी पैसे मिळवले तरी भरती होणारा जवान ट्रेनिंग किती घेणार आणि सेवा किती बजावणार असा त्यांचा प्रश्न होता.

2 नोव्हेंबर ला सवयीने जाग पहाटे 5 लाच आली पण निवांतपणे आवरून 9 वाजता खाली उतरायला सुरुवात केली. शेवटचा टप्पा आम्ही जरा वेगळ्या रस्त्याने उतरलो, इथे फारशी गर्दी नव्हती. 1 च्या सुमारास देवराली ला पोचलो आणि पायपीट संपली.

नेपाळचा हा भाग ही गुरुंग जमातीची कर्मभूमी. त्यांचा वैशिष्टयपूर्ण पेहराव आहे. तिबेटी चिन्हे आणि पद्धतींचा प्रभाव इथे जवळ जवळ नाहीये. वाटेत गेस्ट हाऊसेस मध्ये स्थानिक गिधाडे यांचे संरक्षण संवर्धन करण्याविषयी काही माहिती लावलेली दिसली. इथला प्रत्येक माणूस इथल्या पर्यावरणावर संपूर्ण अवलंबून आहे याची जाणीव निर्माण करण्यासाठी होणारे हे प्रयत्न चांगले वाटले. ग्रेगोरियन आणि नेपाली कॅलेंडर एकत्र छापलेले बघायला मिळाले. नेपाली कालगणनेुसार महिन्यांची नावे आपल्या चंद्र महिन्यांची असतात. विक्रम संवत नुसार ते साल 2079 असे लिहितात तर वर्ष 14 एप्रिल ला सुरू होते आणि पहिला महिना वैशाख आणि शेवटचा चैत्र असे मानतात. नेपाली कॅलेंडर मध्ये दोन महिने 29 दिवसांचे तर 2 महिने 32 दिवसांचे आहेत असेही या कॅलेंडर चा अभ्यास करता लक्षात आले.

4 दिवसात सुमारे 50 किमी अंतर आणि 2500 मी च्या आसपास चढाई झाली. एकदाही पाऊस लागला नाही आणि अगदी स्वच्छ निरभ्र आकाश दिसले. रात्री अगणित ताऱ्यांशी दोस्ती करता आली. आतापर्यंतच्या अनुभवात पहिलाच असा ट्रेक जेव्हा सोबतीला खळ खळ नाद करत वाहणारी नदी सोबतीला नव्हती, मोठ्या संख्येने नेपाली तरुण तरुणी भेटले आणि तुलनेने कमी उंचिवरचा ट्रेक असूनही एका दिशेस दूरवर खोल नदीपात्र आणि शहरी दिवे दिसत राहिल्यामुळे आपण खूप उंचीवर आल्याचा भास होत राहिला. थोड्यात अवीट गोडी मिळवून देणारा हा फार छान ट्रेक रूट, पुन्हा एकदा यावे असे वाटायला लावणारा.

अच्युत वैद्य, राजेंद्र जोशी, निखील नानिवडेकर आणि मी अश्या चौघांनी हा ट्रेक पूर्ण केला.

विनायक आणि उज्जवलाताई देशपांडे, बाबा आणि मधुरीताई कुलकर्णी हे चौघे देवराली पर्यंत बरोबर होते, आमच्याबरोबर थोडे अंतर येऊन मग परत फिरले आणि देवरा ली, पोठाना, ऑस्ट्रेलियन कॅम्प असा कमी उंचीवरचा ट्रेक करून आम्हाला पुन्हा 3 तारखेला पोथानाला भेटले.

सत्यजित चितळे

पोखरा, 4 नोव्हेंबर 2022

 

 

 

 

No comments:

Post a Comment