सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात नाणे घाटाची सफर घडली. सुभाष कुचिक त्यावेळी आमच्या बरोबर होता. या
परिसराचा जाणकार, अभ्यासक आणि नेचरॅलिस्ट असे तो काम
करतो. नाणे घाट आणि तिथला परिसर याला अडीच
हजार वर्षांचा ईतिहास आहे. सातवाहन कुळातील
प्रबळ राणी नागणिका हिने हा घाट बांधला ज्यामधून प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण ते रोमन, रोमन व अरब देशांशी व्यापार होत असे असा उल्लेख आहे. एका चिनी प्रवाशाने लिहून ठेवलंय की एका दिवशी पन्नास हजाराच्या
आसपास लोक या घाटातून आणि अर्थातच या परिसरातून ये – जा
करत असत इतका हा मार्ग समृद्ध होता. काळाच्या ओघात त्याचे
महत्त्व संपले....इतके की 20व्या शतकात हा परिसर
मागासलेला म्हणून गणला गेला आणि इथे कुपोषणाने मृत्यू झाले.
सुभाष ने याच भटकंती दरम्यान एक जुने शिल्प दाखवले. तीन बाजूंनी दगडांची मांडी इतक्या उंचीची भिंत घातलेले आणि वर
अभाळकडे उघडे असलेले ते एक मंदिर होते. आत मध्ये
सोनकी, तेरडा च्या दाटीत एक मूर्ती होती. दोहो बाजूंनी सोंड उंच करून
सुवर्णाचा अभिषेक मध्ये बसलेल्या लक्ष्मी देवतेवर करणारी ती गजांत लक्ष्मी ची
मूर्ती आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थिती असलेली ती
मूर्ती पाहून मात्र मन विषण्ण झालं. सातवाहन काळात
या ठिकाणी कदाचित वेस किंवा प्रवेशद्वार असावे आणि त्यांच्या वैभवाची निशाणी
म्हणून ही मूर्ती इथे स्थापित केली असावी असा तर्क सुभाष ने मांडला. खरेही असेल.
तिथून एक विचार प्रवास सुरू झाला. समृद्धी, संपत्ती याची दर्शनीय खूण म्हणजे जो प्राणी सांभाळायला अती खर्चिक
असा गज दारी झुलवणे! इतिहासात महत्वाकांक्षी राजे
रजवाड्यांनी हे स्वप्न पाहिले, त्यासाठी रक्त
सांडले, सांडवले, साम्राज्ये स्थापिली.
आहे वैभव मिळावे म्हणून गजांत लक्ष्मी ची मूर्ती स्थापिली की वैभव
मिळाल्यावर ते टिकावे म्हणून स्थापिली हे मला न उलगडलेले एक कोडे. या विषयात थोडी शोधाशोध करता एक पौराणिक कथा वाचायला मिळाली. पांडवांना राज्य अभिलाषा होती, कोणा
देवतेने त्यांना सांगितले की तुम्ही गजांत लक्ष्मी ची अर्चना करा म्हणजे समृद्धी
येईल. मग त्यांना समजले की इंद्राचा ऐरावत हे
गजांत लक्ष्मी चे प्रतीक आहे. तेव्हा
पांडवांनी इंद्राला विनंती करून काही काळासाठी ऐरावत मिळवला आणि त्यामुळे
इंद्रप्रस्थ ची भरभराट झाली ....कथेत असेही
शेवटी म्हणल होत की केवळ ऐरावत आणून भागले नाही तर ही समृद्धी टिकवण्यासाठी
पांडवांना महाभारत युद्ध करावेच लागले.
असा हा सकाम कर्मयोग सगळीकडे ऐकायला मिळतो आणि तोच खरा. नाणे घाटातील ती मूर्ती सकाम कर्मयोग विसरला की होणारी दैना पाहत दोन
सहस्त्रे ऊन पाऊस झेलत हा कठोर सकाम कर्मयोग शिकवीत उभी आहे असे मला वाटून गेले.
सत्यजित चितळे
5 नोव्हेंबर 2022
No comments:
Post a Comment