बा कांचना!
मला आठवत तीन वर्षापूर्वी तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझं वेगळेपण
उठून दिसल होत. डोंगराच्या मध्यावरच्या खापरासारख्या फुटणार्या मुरमाड जमीन
उतारावर एका अगदी छोट्याश्या सपाटीवर कोणी अनामिकान तुझं इवलस रोप चांगला खड्डा
घेऊन माती भरून लावल होत. तो अनामिक असला तरी मोठ्या मनाचा आहे नक्कीच कारण त्यान
तिथे स्वत:च नाव लावल नाही ‘ झाडांना पाणी द्या’ इतकाच लाल-हिरव्या रंगाचा फलक लावला. तुझ्या ईवल्याश्या जीवाच्या दोन काड्या,
सुमारे फुटभर उंचीच्या आणि त्यावर फुटलेली सात आठ द्विद्लासारखी पाने तुझे कांचन
हे नाव ओळखू यायला पुरेशी होती.
वास्तविक अश्या मुरमाड उतारावर काहीच उगवू नये, उगवली तर करवंद, घाणेरीची रोप,
पावसाळ्यात उगवणारी मिकी माउस, सोनकी ची रोपटी किंवा जिथे तिथे पसरत जाणारे कोसमोस
चे गवत. अश्या या परिसरात तुझे दिसणे हे अर्थातच वेगळे होते.
त्या दिवसानंतर अगदी आठवड्यातच या रुक्ष आणि कोरड्या वातावरणात तुझ्या
अंगावरची हिरवी पान वाळून गळून गेली. आज तीन वर्षांनी तर ती पाणी द्या म्हणणारी
खुणेची पाटीसुद्धा उडून गेलीय, उरलाय तो दोरा
जयान तुझ्या शरीराच्या दोन काड्या अजूनही एकत्र बांधून ठेवल्या आहेत. कोणत्या तरी
चांगल्याश्या नर्सरीतून अचानक इथे अश्या उतारावर, मुरमाड जमिनीत तू आलास, तुला खूप एकट वाटलं असेल नाही? आसपासच्या करवंदाच्या जून
झालेल्या पीळवटलेल्या फांदीवरल्या टवटवीत हिरव्या पानांना तुझे असे आकारण वाळणे हा
गमतीचा भाग वाटला असेल नाही? वसंतात
येणाऱ्या करवंदाच्या पांढऱ्या चांदणी सारख्या फुलांनी मंद सुवास पसरवत तुझ्या
निष्पर्ण देहाची चेष्टाच केली असेल नाही? त्यांना तू सांगूही शकला नसशील कि तुझी गुलाबी फुले किती सुंदर दिसतात ते!
अर्थात तू सांगितले असतेस तरी तुझ्या एवढ्याश्या देहावरून आणि सुकून गेलेल्या
फांदीवरून कोणी त्यावर विश्वास कसा ठेवावा ? हफ्त्या दर हफ्त्यात आठवणीने थांबून
तुला पाणी देणाऱ्या सहृदय माणसांकडे पाहून हि करवंदी, घाणेरी ची झुडपं कडाकडा बोट मोडत असतील नाही!
पावसाच्या आगमनापूर्वी येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला मात्र तू काही अटकाव
केला नसशील. त्याच्या वाटे आडवे घालायला तुझा पर्णसंभार मुळात होता तरी कुठे
?मुसळधार पावसात उतरंडीवरून वाहणारे गढूळ ओहोळ तुझ्या भोवतीच्या मातीत भोवरा करून
थोडी माती घेऊन पळाले असतील तेही तू पाहिले असशील, अर्थात तुझ्या असण्याची त्यांनी दखल घ्यावी इतके तुझे असणे नजरेत भरणारे
उरलेच नव्हते म्हणूनही असेल. पण त्यातून निर्मिलेल्या खड्यांतून पाणी खोलवर दगडात
झिरपायला मदत होतेय हे पाहून आणि समजून तू नक्कीच आनंदला असशील ना? खरच सांग रे या
दिवसात तू पुढच्या कोरड्या हिवाळ्यासाठी आणि तप्त कोरड्या उन्हाळ्यासाठी भरभरून
पाणी भरून ठेवलेस का रे?
आसपास वाढणाऱ्या गवतातून तुझे असणे लपून गेले त्या दिवसात, तुला म्हणून
घातलेल्या सुपीक काळ्या मातीतले जीवनसत्व थोडे थोडे त्या उपटसुंभ गवतानेच वाटून
खाल्ले तुझी खिल्ली उडवत खरंय ना?
फाल्गुनाच्या सरत्या दिवसात कुठून तरी उडत आलेल्या एका ठिणगीने डोंगर उतारावर
वाळलेल्या गवताच्या पात्याच्या घास घेतला आणि उतारावर वणवा लागला. वणव्याच्या
आगीची रेष अगदी तुझ्यापर्यंत येऊन पोचली तेव्हा तू होरपळलास का रे? त्याच्या असह्य
धगीमुळे सैरावैरा पळणारे कृमी कीटक आणि प्राणी यांची घालमेल तू बघितलीस का रे?
त्या धगीतून तू वाचलास का नाही हे पाहायला आलेल्या तुझ्या चाहत्यांनी तुझे खुरटलेले
काटकुळे अंग मोडून पहायचा प्रयत्न केला तेव्हा ‘ मी आहे जिवंत अजून’ हे तू ओरडून सांगितलेस का रे?
गेल्या वर्षी माणसाच्या जगात थोडा गोंधळ झाला, बराच काळ तुला भेटायला, घोट दोन घोट
पाणी द्यायला कोणी आले नसेल तेव्हा आपण एकटेच पडलो असे तुला वाटले नसेल का रे?
दोन वर्षे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केवळ दोन काटक्यासारख्या शरीराने तू
टिकून राहिलास, तुझे इथे असणे बहुतेकांनी नाकारलेच. पावसाळ्यात झाड-झाडोरा उगवतो आणि वाळून जाऊन पुन्हा येतो त्याची गणती कशाला? याच न्यायान कोणी तुझ्याकडे लक्षही दिले नाही.अनेक फुले
फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे.....हेच खरे! हप्त्या
हप्त्यान तुला थोड थोडं पाणी देणारे गडकरी जीव मात्र कणव करत तुला भेटत राहिले, तुझ्या पुनरागमनाची इच्छा उराशी बाळगत.
बा कांचना या वर्षी मात्र एप्रिलच्या सरत्या आठवड्यात तेव्हा तुझ्या मुळाशी
जर्द हिरव्या रंगाचा कोंब मोठ्या उत्साहाने आभाळाकडे डोकावताना दिसला हे पाहून जो
आनंद झाला तो केवळ अवर्णनीय ठरला. जगण्याची, फुलण्याची आणि बहरण्याची असामान्य
असलेली इतकी उर्मी आणि ऊर्जा तू तुझ्या इतक्या छोट्या देहात साठवून ठेवलीस तरी
कुठे? हळू हळू तापणारि उन्हे, तरीही पहाटे
गार असणारा शीतल वारा, रात्रीच्या
गडद अंधारात आपल्याशीच कुजबूज करणाऱ्या असंख्य तारका, मधूनच येणारी वार्याची झुळूक आणि उंचावरून तरंगत जाणारे
थोडेसे ढग, त्यातून पडणारा थोडासा शिडकावा यांनी तुला वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी
दिली असेल. पण नवनिर्मिती करण्याची उमेद तुला देणारा कोणी दुसराच होता नक्कीच! तुला
आठवणीने पाण्याचे दोन घोट आठवड्यात देऊन जाणाऱ्या आमच्या सारख्या गडकर्यांमधला
‘माझ्यामुळे’ हा अभिनिवेश मात्र तू या
एकाच उर्मीने पुसून टाकलास.
गिर्यारोहण म्हणजे आपला व्यायाम आणि आनंद या एकाच स्वार्थी आयामाच्या पलीकडे
जाऊन त्याला एक वेगळा आयाम देणाऱ्या बा कांचना आता इच्छा आहे तुला छान बहरलेला
पाहण्याची. तो पर्यंत आणि त्यानंतरही भेटत राहूच.
सत्यजित चितळे
२ मे २०२२
No comments:
Post a Comment