Wednesday, September 29, 2021

SRT सिंहगड राजगड तोरणा ट्रेक

 

SRT- सिंहगड राजगड तोरणा ट्रेक ( २० फेब्रुवारी २०२१):

सिंहगड, राजगड, तोरणा हे किल्ले म्हणजे सोनेरी इतिहासाचा अविभाज्य अंग असलेले ऐतिहासिक पुरुष. एक एक करून त्यांना भेट देण आणि त्यांची ओळख करून घेण हे पुणेकरांना सहज जमण्यासारख आहे. किती लोक ते जमवतात हा भाग वेगळा! पण एकाच दिवसात त्यांना स्पर्श करण आणि तेसुद्धा डोंगर वाटेनी पायी हा देखील एक धाडसी प्रकार आहे. कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा असा मानवी क्षमतेची परीक्षा पाहणारा एक ट्रेक पुण्याच्या गिरीप्रेमी ने एव्हरेस्ट मोहिमेची तयारी म्हणून केला. SRT अशी अल्ट्रा मॅरेथॉन गेली काही वर्षे आयोजित केली जाते. त्यामुळे का होईना आपल्यालाही हे परीक्षा घेणारे धाडस जमेल का असा प्रश्न नेहमी गड भेटी देणार्यांच्या मनात सहजच पडतो, आम्हालाही पडला आणि मग बघूया प्रयत्न करून असा विचार धरून चौघांचा ग्रुप जमवून आम्ही २० फेब्रुवारी चा दिवस नक्की केला.

पहाटे ४.१५ ला सिंहगडच्या दिशेने निघालो तेव्हा हवेत गारवा होता. गेले दोन दिवस पावसाचे वातावरण होते आणि पुण्याच्या आसपास काही सरी बरसून गेल्या होत्या त्यामुळे हवा गार झाली होती. पावणे पाचला आतकरवाडी ला पोचलो तो महेंद्र जेधे जागा होता आणि त्याचे हॉटेल उघडलेले होते. शनिवार-रविवार सिंहगडावर गर्दीचा दिवस. लोकांच्या सुट्टीचे दिवस म्हणजे ‘हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री’ मधल्या लोकांचे धंद्याचे दिवस. गडाखाली हॉटेल थाटून बसलेलेच नव्हे तर वाटेवर आणि गडावर सरबत, बोरं विकून उपजीविका करणारे लोक या इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहेत. सुट्टीची मजा अनुभवायची असेल तर ती या लोकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

महेंद्र च्या हॉटेल पाशी पार्किंग मध्ये गाडी लावून आणि सकाळचा चहा त्याचाकडे घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. सिंहगडावर पहाटे छान वारे सुटले होते. पार्किंग जवळ असलेल्या सिल्व्हर ओक च्या पानांची सळसळ गड माथ्याजवळ पोचताना ऐकू येऊ लागली. SRT करताना सुरुवात म्हणजे सिंहगड सावकाश चढायचा हा एका मित्राचा सल्ला प्रमाण मानून एक तास घेत सिंहगड माथा गाठला. आकाश निरभ्र होतं आणि दक्षिणेला वृश्चिकाची वळलेली शेपूट आभाळात उंचावर आली होता. नेहमी निरभ्र आकाश बघायला फार छान वाटते पण आज मला दिवसभर उन्हाचा त्रास टाळायला अभ्र असेल तर हवेच होते. अमृतासमान असलेले लिंबाचे सरबत घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. देव टाके डावीकडे ठेऊन झुंजार बुरुज गाठला आणि तिथे बुरुजाच्या शेजारच्या फटीतून खाली उतरायला सुरुवात केली. अनेक वेळा सिंहगड वारी करूनही मी या बाजूला कधी आलो नव्हतो याचे मलाच वैषम्य वाटले. सिंहगडावरून दक्षिणेला विंझर कडे जाणाऱ्या डोंगररांगेकडे आपल्याला हि वाट घेऊन जाते. सिंहगडचा वार्याचा किंवा कलावंतीणीचा बुरुज, डोणागिरीचा कडा उजव्या अंगाला दिसतो आणि खाली सोंडेवरच्या माळावर भगतवाडी च्या बाजूचा धनगरवाडा दिसतो.

झुंजूमुंजू होतानाच आम्ही या डोंगर रांगेवर दाखल झालो. पूर्वेकडून सोसाट्याचा वारा सुटला होता आणि कमालीची थंडी वाजत होती. थंडी पळवून लावण्यासाठी आम्ही वेगात चालायला सुरुवात केली. हि इथली रुळलेली डोंगर वाट आणि ढोर वाट. तासाभरातच क्षितिजावर पूर्वेच्या राजाचे आगमन झाले, डावीकडे खाली कल्याण गाव, मोरदरी आणि भिलारेवाडी आणि पूर्ण खोरे सोनेरी उन्हात न्हाहून निघाले. उजवीकडे दूरवर पानशेतचा जलाशय दिसत होता. सूर्य जसा वर सरकत होता तशी खोर्यातून डोंगररांगेची सावली झपाट्याने माथ्याकडे सरकत होती. उजवीकडच्या पायथ्याच्या गावात मात्र डोंगर सावलीमुळे अजूनही आळस भरल्यासारखा दिसत होता. वाटेवर काही ठिकाणी दोन्ही बाजूला वाढलेलं आणि आता पिवळ पडलेलं कंबरेइतक्या उंचीचे गवत वाऱ्यामुळे सळसळत होत, कारवीच्या सुकलेल्या दंडकारण्यातून सोसाट्याचा वारा आवाज घुमवत जात होता आणि कुठे कुठे कारवीच्या झुडुपांच्या शेंड्यावर तग धरून उरलेले वाळक्या पानांचे गुच्छ खूळखुळ्यासारखा आवाज करत होते. मागच्या बाजूला सिंहगड आता पावलागणिक दूर पडत होता.

उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेला देशावर पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक डोंगररांगा आहेत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर कोसळणाऱ्या जलधारा या रांगांमधून मुळशी, मुठा, गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, हिर्डाई अश्या नद्यांची नावं घेत पूर्वेकडचा प्रदेश सुजलाम सुफलाम करत जीवन फुलवत जातात. सिंहगड हा अश्याच एका पूर्वेला जाणाऱ्या रांगेवर असलेला बलाढ्य किल्ला. या रांगेला समांतर असणारी जी रांग आहे ती ओलांडून गेलं कि पलीकडच्या रांगेत बसलाय राजगड आणि त्याच रांगेच्या पश्चिमेला असलेला तोरणा उर्फ प्रचंडगड.

सुमारे साडे सातच्या सुमारास आम्ही विंझरच्या बाजूच्या डोंगर भिंतीमागे पोचलो आणि वाट उजवीकडे वळली. डोंगरभिंतीच्या सर्वोच्च शिखराला डावीकडे ठेवत एक चिंचोळा ट्रॅव्हर्स घेऊन आम्ही या शिखराच्या खांद्यावर आलो आणि समोर सलग विंझरकडे उतरणारी डोंगर सोंड दिसली. समोर राजगड आणि उजवीकडे तोरणा दोन्ही समाधिस्थ पुरुषांसारखे उभे होते. इथून विंझर सुमारे दीड पावणे दोन तास, आम्ही आधी ठरवलेल्या वेळेच्या गणिताप्रमाणे आमच्याजवळ इथे फार वेळ नव्हता त्यामुळे समोरच्या राजगड-तोरणा जोडीकडे बघून उत्साहाने आम्ही उतरायला सुरुवात केली. सुरुवातीचा थोडा भाग हा तीव्र उताराचा आणि घसरणीचा होता तिथे जपून उतरत आम्ही खाली निघालो. वाटेवरच जरा सपाट जागा लागली तिथे बसून पाठीवरच्या पिशव्या सोडल्या आणि नाश्ता उरकला. SRT करणारा तिघांचा एक समूह आमच्याशी सम:दुखे- सम-सुखे असा राम राम करून पुढे गेला आणि जरा खाली झुडूपात तोही थोड्या वेळासाठी विसावला. विंझर च्या डोंगराकडच्या शेतीवाडीत पोचताना जरा मोठी झाडं दिसू लागली. पळस आणि काटे-सावरीचा फुलोरा आताशा सुरु झालेला दिसला. पळसाचा पेटत्या ज्वालेसारखा फुलोरा, ज्यामुळे त्याला फोरेस्ट फायर म्हणतात आणि काटे-सावरीची मोठ्ठी लाल-गुलाबी फुले याभोवती रुंजी घालणारे अनेक पक्षी दिसू लागले आणि त्यांच्या सुश्राव्य किलबिलाटात आमची सकाळ आनंदी होऊन गेली. विंझर ला पोचेपर्यंत आम्ही १५ किमी अंतर कापले होते. आम्ही ठरविलेली गाडी तिथे येऊन उभीच होती. दहाच्या सुमारास आम्ही आसनस्थ झालो आणि गाडी गुंजवणे गावाकडे निघाली. विंझर ते गुंजवणे हा दहा किमी चा प्रवास, डांबरी रस्त्याच्या अंगाने चालत करण्यापेक्षा आम्ही गाडीने जायचा पर्याय निवडला होता. मार्गासनी गावाच्या अलीकडे आम्हाला सहा ट्रेकर्स चा चमू राजगड कडे चालत जाताना दिसला. ते आमच्या आधी तासभर या वाटेन आले होते आणि आज राजगड- तोरणा असा प्रवास करणार होते. अर्ध्या तासाने आम्ही गुंजवणे गावात पोचलो. जोडून सुट्ट्या असल्यामुळे आणि वीकेंड असल्यामुळे राजगड पायथ्याला वाहनांची गर्दी झालेली होती. आमची गाडी आम्ही तिथे सोडली आणि चालकाला वेल्हे ला येण्याविषयी सूचना दिल्या. पायथ्याशी थांबून पाणी भरून घेऊन आम्ही अकराच्या सुमारास राजगड चढायला सुरुवात केली.

राजगडच्या वाटेवर तरुण-तरुणींचे दोन तीन घोळके भेटले. रमत-गमत ‘ट्रॅकिंग’ करायला आलेले! त्यातल्या एका ग्रुपमध्ये अगदी मराठी वळणाची मुलं होती आणि तरीही अर्धवट हिंदीत त्यांचे संभाषण चालू होते. आपण कुठे आलोय, कसे वागतोय याचे काही भान नसल्यासारखे वागणारी हि मंडळी आजकाल ठिकठीकाणी दिसतात आणि धड ना मराठी-धड ना हिंदी असल्या भाषेत बोलताना दिसतात. राजगड सारख्या जागी येऊन सुद्धा डीपी बनविण्यासाठी चाललेले यांचे फोटोचे उद्योग पाहून वाईट वाटते.

घड्याळात सव्वा बारा वाजत असताना आम्ही राजगडाच्या पद्मावती माचीवर चोर दरवाज्यातून प्रविष्ट झालो. गडावर चांगलीच गर्दी होती. पद्मावतीच्या मंदिरात ट्रेकर्स चा मोठ्ठा ग्रुप आदल्यादिवशी म्हणजे १९ फेब्रुवारीलाच आला होता. त्यांच्याशी बोलताना कळले कि गेली काही वर्षे १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी करण्यासाठी ते सर्व राजगडावर येतात. इथला इतिहास आणि भूगोल याविषयी आपलं नात वाटणारा असा हा तरुणांचा दुसरा गट आम्हाला मघाशी भेटलेल्या टवाळ मुलांपेक्षा आवडला. मंदिरापाशी भाकरी –पिठ्ल्याचा आस्वाद घेण्यासाठी थांबलो. वाढणारा मुलगा वैभव नववीत शिकणारा, वाजेघर गावातला होता. पोटभर जेवण करून पद्मावती देवीला नमस्कार केला आणि सदरेवरून पुढे संजीवनी माची कडे निघालो.

संजीवनी माची च्या दरवाज्यांच्या मालिकेतून अळू दरवाजा गाठेपर्यंत पाउणतास गेला. अळू दरवाज्यातून बाहेर पडून आम्ही राजगड सोडला तेव्हा घड्याळात पावणे दोन झाले होते आणि आम्ही २७ किमी ( १० किमी गाडीचे धरून) अंतर पार केले होते. संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखाली आलो कि पश्चिमेकडे तोरण्याच्या बुधला माचीला जोडणारी रांग दिसते आणि त्या रांगेपर्यंत उतरणारा तीव्र आणि धोकादायक उतार धडकी भरवतो. राजगडाचा पाली दरवाजा, गुंजवणेकडून येणारा गुंजवणे दरवाजा किंवा आम्ही ज्या वाटेन चढलो तो चोर दरवाजा या नेहमीच्या वाटांवर उत्तम अशी रेलिंग बसवलेली आहेत तशी अळू दरवाज्या कडच्या वाटेवर नाहीत. त्यामुळे हा धोकादायक, घसरडा उतार अतिशय सावधानतेन आणि मनाचा आणि शरीराचा तोल अजिबात ढळू न देता उतरावा लागतो. घायपात वाढलेल्या बेचक्यात एकदाचा हा उतार संपला कि हायसं वाटत. मग सुरु होते डोंगर रांगेवरची चाल. सुमारे तासभर चालल्यावर या रांगेतून भुतोंडे गावाकडे जाणारा डांबरी रस्ता आडवा जातो. ‘अति झालं’ अस एखाद्याला वाटत असेल तर ट्रेक सोडून जायचा हा शेवटचा बिंदू. इथून पुढे पाउल टाकल कि तोरणा चढून जाण्याशिवाय पर्याय नाही. नाही म्हणाल तर अगदी शेवटी खोपडे वाडी पासून तोरणा टाळून वेल्ह्याला जाता येत पण तिथेपर्यंत पाय चालायला हवेत.

भुतोंडे खिंडीपाशी घनदाट झाडी आहे. आम्ही तिथे उतरलो तेव्हा दहा- बारा दुचाकींवरून आलेला एक गावाकडच्या उनाड अरुण-तरुणांचा घोळका गप्पा मारीत बसला होता. या ट्रेक मध्ये भेटलेला हा तरुणांचा तिसरा घोळका निरर्थक वेळ घालवत होता. अवघ्या काही तासात तरुणाई ची हि तीन वेगळी रूपं आम्हाला दिसली.

भुतोंडे खिंडीत पाण्यासाठी थोडं थांबून आम्ही पुढे निघालो. वाटेत पालीकडून आलेल्या एकाकडून ताक आणि सरबत घेऊन पुढे वाट पकडली. स्थानिक पुरुषांना इथे ताक आणि सरबत वगैरे विकायला विरोध आहे इथल्या स्त्रियांनी हा व्यवसाय करावा असे काहीसे त्याने सांगितले.’तुम्ही उशीर केलात आता आठ शिवाय तोरण्याला वर पोचणार नाही. तोरण्यावर राहायचे असल्यास आता वर लोक आहेत’ हा त्याचा सल्ला मनावर न घेता आम्ही पुढे निघालो. पूर्वी तोरण्यावर वस्ती नसे, तिथे भुते आहेत अश्या समजुतीमुळे.  छपराचे पत्रे उडालेली दोन धनगरी झापं उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर दाट झाडीतून रस्ता पुढे गेला. आता वारा पडला होता आणि मोकळ्या जागेवर ऊन चांगलंच जाणवू लागलेलं होत. त्यामुळे झाडीत शिरल्यावर अंग सुखावलं. झाडीतून जाणारा हि वाट बराच काळ हे सुख देते. मध्येच एक छान सारवलेला औरस-चौरस माळ लागला. शेजारी एका मोठ्या झाडाच्या पायथ्याला शेंदूर फासलेले देवाचे अनेक तांदळे दिसले. अनवट वाटेवरचा डोंगरी देव. झाडांचे छप्पर असलेल्या त्या मंदिराचे नाव काय? उपासना कोणती? हे सांगायला तिथे कोणीच नव्हते.

बत्तीस- साडे-बत्तीस किमी अंतर कापेपर्यंत वाट अधून मधून दाट झाडीतून जात होती. मग आली खोपडेवाडी. डोंगररांगेच्या डाव्या अंगाला जाणाऱ्या वाटेला लागून असलेलं एक शेत आणि मागे उतरत्या छपराच एक घर. तोरण्याच्या वाटेवरचा शेवटचा पण अत्यावश्यक थांबा. इथून जाणारा प्रत्येक जण बहुदा इथे थांबतोच! तिथल्या माउलीन हसर्या आणि आनंदी चेहऱ्यान स्वागत केलं. स्वच्छ सारवलेल्या ओट्यावर बसायला गावातल्या कुणा राजकीय पुढाऱ्याच्या अभिनंदनाचा फ्लेक्स अंथरून दिला. आधुनिकीकरणाचा प्रवास पहा...पूर्वी अश्या अनवट ठिकाणी बसायला कांबळ मिळायचं तिथेही आता फ्लेक्स पोचले! कोरडवाहू शेती, समोर फिरणाऱ्या काही कोंबड्या, थोडं पशुधन या सगळ्याच्या जीवावर समाधानानं जगणारी हि कुटुंब. जवळच गाव आणि बाजार वेल्हे, तिथे जायचं असेल तर पायी, गाडी रस्ता नाही. शहरातून पाचशे रुपयाची नोटसुद्धा सुट्टे पैसे म्हणून खपेल पण इथे दोनशेची नोटसुद्धा बंदा रुपया ठरते! तीन वर्षांपूर्वी याच वाटेवर इथेच बसून त्या माउली आणि तिच्या दादल्याशी आम्ही नोट-बंदी विषयी चर्चा केली होती त्याची आठवण झाली. थंडगार पाणी, गरम चहा घेऊन आणि पाणी भरून आम्ही त्यांना राम-राम केला नि तोरण्याच्या दिशेने चढत जाणारी वाट पकडली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते.

इथून पुढचा चढ बोडका, डोंगर रांगेच्या माथ्यावरून चढत जाणारा. सह्याद्रीच्या या डोंगररांगा पावसाळा संपला कि बोडक्या दिसतात खऱ्या पण पावसाचे थेंब इथे पडू लागले कि इथे लुसलुशीत गवताचा बिछाना तयार होतो. पावसाळ्यातले आणि नंतरचे काही दिवस विविध कृमी, कीटक आणि गोगलगाई यांच्यासाठी हे नंदनवन ठरते. गवत वाळून गेलं कि हे सर्व कृमी कीटक त्यांच्या पुढच्या पिढीच्या जन्माची सोय खोलवरचा मातीत/ मुरुमात करून लुप्त होतात. वाळक्या माळरानावर आणि डोंगर उतारांवर मग वणवे लागतात. पावसाळ्यातल्या गवताळ नंदनवनाच्या आणि नंतर लागलेल्या वणव्यातून झालेल्या हानीच्या खुणा वाटेवर ठिकठीकाणी विखुरलेल्या गोगलगायींच्या शंखातून आणि कृमींच्या मातीच्या ढेकूळवजा घरट्यातून दिसून येत होती.

खोपडेवाडीतून पुन्हा वाटेला लागल्यावर एका ठिकाणाहून समोर नावाप्रमाणे प्रचंड असलेला तोरणा समोर आडवा ठाकतो आणि रांगेच्या माथ्यावरून  नागमोडी जाणारी वाट एक सलग चढ चढून बुधल्याच्या पायथ्याला जाताना दिसते. बुधला माची हा वास्तविक दोन टेंगळाचा वेगळा भाग. त्यातला ठळक सुळका हा तेलाच्या बुधल्यासारखा दिसतो म्हणून त्याचे हे नाव. तोरण्याच्या मुख्य किल्याला हा भाग एका प्रस्तर रांगेनी जोडला गेलाय आणि प्राचीन दुर्ग अभियंत्यांनी त्याचे सामरिक महत्व ओळखून त्याला तोरण्याचा एक भाग बनवले आहे. तोरण्याचा बालेकिल्ला ते बुधला माची हे अंतर सुमारे दोन किमी इतके नक्कीच असेल आणि या सर्व परिसराला पूर्वी पासूनच या दुर्ग स्थापत्यकारांनी  भक्कम तटबंदी बांधून काढली आहे.

बुधला माचीकडे जाणारा तो उभा, चिंचोळ्या धारेवरचा पन्नास एक फुटांचा चढ गाठेपर्यंत सव्वा तास गेला आणि सूर्य मावळतीकडे झुकू लागला. चढाच्या या अंतिम टप्प्यावर असताना मावळतीच्या उन्हामुळे सावल्या लाम्बायला सुरुवात झाली. तोरण्याच्या उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीला वरपासून खालपर्यंत अनेक घड्या आहेत. त्यांच्या सावल्या फार मजेशीर दिसत होत्या. चढाईच्या सोंडेची सावली त्यावर पडलेली होती. तीन-साडेतीन फूट रुंदीच्या त्या चिंचोळ्या सोंडेवर माझ्या पायांची सावली मला दिसत होती, त्यावरच्या माझ्या शरीराची सावली या रांगेच्या सावलीच्या वर दिसेल या आशेन मी हात हलवून माझीच सावली शोधण्याचा प्रयत्न केला. प्रकाशाच्या नियमानुसार माझ्या ‘इतक्याश्या’ शरीराची ठळक सावली या अफाट डोंगररांगेवर पडली नव्हती. या विस्तीर्ण डोंगरावर माझ्या पायाची सावली दाखवून माझं तात्पुरते अस्तित्व त्याने स्वीकारले होते पण माझी संपूर्ण सावलीसुद्धा त्याने नाकारली होती.

बुधला माचीची तटबंदी भक्कम बसवलेल्या शिडीने चढून आम्ही तोरण्यात प्रवेश केला. इथून तोरण्याचा कोकण दरवाजा गाठायला एक तास लागला. अतिशय कंटाळवाणा सलग चढ असला तरी एका प्रस्तर भिंतीने जोडलेला हा भाग बघत जाणं हि एक पर्वणी आहे. कोकण दरवाजा जवळ आला तेव्हा सूर्यदेव दिवसाचा कार्यक्रम संपवून घरी निघाले होते. पश्चिमेला खाली रायगड दिसू लागला होता आणि लिंगाण्याचे टोक ठळक नजरेस पडत होते. सूर्य रायगडाच्या मागे जाणार हे दिसल्यावर एक अद्भुत फोटो मिळेल म्हणून मी आनंदलो. शक्य तितक्या वेगाने पावलं टाकत कोकण दरवाजा गाठला आणि नुकत्याच डागडुजी करून भक्कम बांधलेल्या बुरुजावर पोचलो. दुर्दैवाने रायगडावर पोचण्याआधीच वातावरणातील प्रदूषण आणि क्षितिजाजवळच्या धुक्याने सूर्याला पूर्णपणे निस्तेज करत त्याचा घास घेतला आणि टकमकटोक सूर्यबिम्बात घुसलेले बघण्याची संधी हुकली. आता अंधाराने परिसर गिळायला सुरुवात केली. त्यामुळे तोरण्याची स्वामिनी मेंगाई देवीला नमस्कार करून न थांबता आम्ही उतरायला सुरुवात केली. रेलिंग लावलेला प्रस्तर भाग आम्ही बर्यापैकी संधीप्रकाशात उतरलो. डोंगरसोंडेवर चांगल्या सखल भागात मेटावर पोचलो तेंव्हा अंधार झाला होता. घड्याळात साडेसात वाजले होते, आतापर्यंत ४० किमी अंतर पार झाले होते आणि वेल्हा अजून अर्धा तास म्हणजेच दोन किमी पुढे होते. आतापर्यंत आम्ही २२२८ मीटर्स इतकी एकूण चढाई पूर्ण केली होती आणि आता मात्र पाय बोलू लागले होते.

वेल्हा जवळ येऊ लागले तसे ‘आपली सावली आपल्याला दिसली नाही’ या विचाराने माझ्या मनात पुन्हा डोके वर काढले. उजवीकडे वर तोरण्याच्या झुंजार माचीच्या तटबंदीची रेषा स्पष्ट दिसत होती. बलाढ्य सह्याद्रीच्या अंगावर रेखा उमटवण्यासाठी शिवरायांसारखे कर्तुत्व हवे....इतरांची सावलीसुद्धा तो आपल्यावर पडू देणार नाही असे मला वाटून गेले. झुंजार माचीच्या अंगावर तोपर्यंत अगस्ती तारा उगवला होता. पृथ्वीपासून ३१० प्रकाश वर्षे दूर असलेला तेजस्वी अगस्ती माझ्या मनातले विचार ओळखून त्या वेळेस माझ्याकडे हसत पाहत होता!

-सत्यजित चितळे

No comments:

Post a Comment