Wednesday, September 29, 2021

माझा कोव्हीड अनुभव

 

1 मे 2021 ची पहाट झाली, संचेती हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कला निकेतन च्या चौकात वाहनांच्या सोंगट्या हलताना दिसू लागल्या. रात्री चे बॅरिकेड्स हलवल्यामुळे आणि अजून पोलीस ड्युटीवर यायचे असल्यामुळे या सोंगट्या बिनधोक आपल्या मार्गाने जात येत होत्या. थोड्याच वेळात पोलीस येतील, बॅरिकेड्स उभे होतील मग ही मूक वाटणारी वाहन त्यातून नागमोडी वाट काढत पुढे सरकतील. सीओईपी च्या मैदानावर उभे असलेल्या जम्बो कोव्हिडं सेन्टरकडे सायरन वाजवत वळणाऱ्या अम्ब्युलन्स तासाला चार पाच च्या संख्येनं येतच राहत आहेत. त्यांच्या मागून पेशंटच्या नातेवाईकांचे एखादे वाहन, त्यांची धावपळ इथून स्पष्ट दिसतेय. रात्र झाली की वळणाऱ्या वाहनांचे लाल ब्रेक लॅम्प आणि त्यातून सायरन वाजवत निळे लाल दिवे चमकवत जाणाऱ्या अम्ब्युलन्स ची गडबड. संचेती रुग्णालयातल्या कोव्हिडं वॉर्ड मध्ये नखशिखांत पीपीई किट घातलेले डॉकटर्स, परिचारिका मामा मावश्यांची लगबग चालूच, सहा तासांची शिफ्ट, आठवड्यात दोन दिवस सुट्टी, आयसोलेशन शक्य नाही कारण कामाचा ताण, गेले काही महिने अव्याहतपणे हा धोका पत्करून त्यांची सेवा देणे चालूच आहे. पीपीई किट मुळे सगळेच पांढरे अवकाशात फिरणारे दिसतात, चेहरे दिसत नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांच्या किटवर मागे नावे लिहिली आहेत त्या वरून हाक मारायची. नाहीतर सिस्टर, ब्रदर मामा आणि मावशी ही संबोधने! बाहेर बांधकामावरचे मजूर नवीन हॉस्पिटलच्या कामात गुंतलेले, उंचच उंच बांधलेल्या टॉवर क्रेनच्या ऑपरेटर मला रोज सकाळी शिडीवरून वर जाताना दिसायचा. खिडकीतून माझ्याकडे एकवार बघून वर निघून जायचा. त्याच्या कामात व्यस्त. समोरची सीओईपी ची हॉस्टेलची नवीन इमारत, विद्यार्थी नसल्यामुळे वर्दळ नसलेली रात्रीच्या वेळेस संचेती रुग्णालयाच्या निऑन साईनचे रंग झेलणारी.
इतक्या गोंधळात काचेच्या बाहेरच्या परापेट च्या वळचणीला परव्याचं एक युगुल. अधून मधून इथं वळचणीला येऊन वाकड्या नजरेनं काचेतून आत डोकावणारे.
आज इथे दाखल होऊन नऊ दिवस होतील, तसं करोनान चकवून इथे यायला भाग पाडले त्याला दोन आठवडे होतील. या विलक्षण आणि आता विचार करायला लावणाऱ्या विचक्षण चकव्याची ही छोटीशी गोष्ट. या गोष्टीतील बरीचशी माणसे एकमेकांना माहीत नसतील पण त्यांचा कृतज्ञातापूर्वक नामोल्लेख मी टाळू शकत नाही हे खरे.

चुकामूक:
करोना भारतात दाखल झाला तेव्हापासूनच आपल्याला यापासून काही धोका नाही असा पक्का समज मी करून घेतला होता. संसर्ग वाढणार, अनेकांना त्रास होणार काही जण सोडून जाणार हे नक्कीच होतं पण आपण त्यात नसणार ही खूण गाठ मनात कुठे तरी पक्की होती. त्यामुळे निर्बंधांच्या काळातही शक्य होईल तेव्हा आपले सर्व कार्यक्रम चालू ठेवणे, कायद्याने किंवा सविनय कायदेभंग करून हा आपला मार्ग चालू होता. पहिल्या लाटेच्या ऐन भरात कामासाठी भरपूर प्रवास घडला, गोव्याची सायकल सफर झाली, दोनदा टेस्ट निगेटिव्ह आली आणि या रोगापासून आपण अलिप्त राहणार याची खात्री पटली. काही जवळचे, माहितीचे लोक दुर्दैवाने कायमचे सोडून गेले आणि त्याचे मनापासून वाईटही वाटले पण आपल्या दैनंदिन कार्यक्रमात काय बदल घडणार हे न कळलेले माझ्या सारखेच सगळे येईल तो दिवस चालत राहिले.
दुसऱ्या लाटेच्या बातम्या येऊ लागल्या तसे का कुणास ठाऊक एक अनामिक भीती एकदा स्पर्शून गेली. रुग्ण वाढीचा वेग या लाटेत जास्त दिसत होता. येणाऱ्या अकड्यांवरून हे प्रकरण सिरीयस होणार आहे हे सांगायला फार मोठ्या गणितज्ञांची गरज नव्हती. तरी पण आपण नाही त्यातले हा भाव कायमच होता. व्यायाम करतो तर आपल्याला धोका नाही आणि व्यायाम करूनही होणारच असेल तर मग होऊन जाऊदे, फार काही बिघडणार नाही, कदाचित आतापर्यंत होऊनही गेला असेल अश्या समजुतीत मी जगत होतो. गर्दीत न जाणे आणि शक्यतो संपर्क कमी ठेवणे हे मात्र पाळायचा प्रयत्न करत होतो.
20 फेब्रुवारी ला सिंहगड-राजगड-तोरणा हा 42 किमी चा ट्रेक 15 तासात पूर्ण केला तेव्हा पुढच्या दोन महिन्यात 20 पावलांना पण आपण महाग होणार आहोत हे माझ्या गावीही नव्हते. मार्च महिन्यात अगदी जवळचे, ओळखीचे काही सुहृद करोना ला बळी पडले आणि काळजी वाढली. संघाच्या ग्रुपवर हॉस्पिटल प्रवेशासाठी रोज 60 ते 80 पर्यंत निरोप सरकत होते आणि कार्यकर्ते त्यांची सोय पाहण्यात व्यस्त होते ते मी मूकपणे वाचत असे. आपण इथे सक्रिय नाही तर बाहेर तरी पडुया असाही विचार येऊन गेला. न जाणो आपल्यालाच गरज लागली तर.... म्हणून असेल ते जमले नाही.
लहानपणी आईचा हात सोडून ज्यांचा हात धरून मी शाखेत गेलो त्या गिरीधारी शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागण्याचा निरोप 9-10 एप्रिलला मिळाला आणि धाबे दणाणले. त्याचपाठोपाठ पहिल्या लॉक डाऊन पासून अव्याहत जीवाचे रान करणारे योगेश, यशवंतराव, दीपक यासारखे कार्यकर्ते घरी विलगिकरणात असल्याचे समजले आणि धक्का बसला. 13 एप्रिल ला वर्ष प्रतिपदेचा उत्सव ऑनलाइन झाला. गणवेश उतरून ठेवतो तो आदित्य चा फोन वाजला आणि गिरीधारी शिक्षक गेल्याची तीव्र वेदनादायक बातमी. घरचे सगळे बाधित. डोकं सुन्न झालं. एकट्या आदित्य ने सर्व जबाबदारी पार पाडली, या अवघड प्रसंगी काहीच मदत करता आली नाही हा सल मनाला फारच लागला.
दिवस सरकत होते, पण करोना ची चुकामूक इतक्यात केव्हा तरी संपली होती.
याच दिवसात कधीतरी त्यानं माझ्या शरीरात प्रवेश मिळवला, अगदी सफाईदारपणे.

लढाई सुरू:
शनिवारी 17 एप्रिलला ऋचा ला ताप आला आणि शनिवारी रात्री मला, रविवारी चंदनाचे अंग गरम झाले. आमचे दादा डॉ धनंजय यांना फोन केला, त्यांनी लगोलग औषधे सुरू केली आणि सोमवारी टेस्ट करायला सांगितले. सोमवारी सकाळी घरी येऊन परिचारक सॅम्पल घेऊन गेले. करोना नसणारच या माझ्या मतावर मी ठाम होतो, ताप मात्र 102 ची मात्रा सोडत नव्हता. सोमवारी रात्री रिपोर्ट आला, पहिला धक्का....तिघांची टेस्ट पोजिटिव्ह......दुसरा धक्का माझी CT व्हॅल्यू 12 म्हणजे मॉडरेट इन्फेक्शन. चंदना आणि ऋचा ची व्हॅल्यू जास्त होती पण काळजी घ्यावीच लागणार होती.
रात्री झोप लागेना. ऍडमिट व्हावे लागले तर कसे करायचे? घरची व्यवस्था काय लागणार? बाबा आणि ईशान कसे मॅनेज करणार, बाबांच्या तब्येतीची काळजी, कंपनीतील कामे, दिलेल्या कमिटमेंट्स असे असंख्य प्रश्न.
उद्या सकाळी आधुनिक वैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा असे ठरवले. ईशान च्या पालकवृंदापैकी डॉ हृषीकेश जोशी आणि डॉ विदुला जोशी हेच नाव नक्की केले आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे सकाळीच माई मंगेशकर रुग्णालयात त्यांची भेट घेतली. ताप होताच. कोविशील्ड चा माझा पहिला डोस 1 एप्रिल ला झालेला असल्यामुळे फारसा धोका नाही असे त्यांनी निसंदिग्धपणे सांगितले. औषधे लिहून दिली आणि काय काय काळजी घ्यायची ते सविस्तर सांगितले.
घरी आलो, जेवण झाल्यावर सडकून ताप भरला, पारा 103 वर गेला, दुपारी लघवी साठी उठलो तर चंदना जागी झाली, माझा तोल जातोय हे तिच्या लक्षात आलं. कसाबसा कॉट वर परतलो आणि भोवळ आली, थोडा वेळ काय झालं आठवत नाही, जागा झालो तेव्हा चंदना माझ्या डोक्यावर गार पाणी मारत होती आणि ईशान मला साखर भरवत होता. त्या दोघांच्या सतर्कतेमुळे 20 एप्रिल हा दिवस शेवटचा ठरला नाही.  बुधवार ही 103 ते 101 तापाचा ठरला, ब्लड टेस्ट केल्या, माझे रिपोर्ट चांगले नव्हते म्हणून डॉ जोशींच्या सल्ल्याने गुरुवारी CT स्कॅन झाला. चंदना चा ताप आता उतरला होता पण ऋचा चे ऑक्सिजन लेव्हल उतरू लागले होते. गुरुवारी CT स्कॅन चा रिपोर्ट मिळाला, तिसरा धक्का.....माझा HRCT स्कोअर 10/25 आणि ऋचाचा 9/25. डॉ जोशींचा फोन आला, पॅनिक होऊ नका पण सध्याची हॉस्पिटल ची परिस्थिती पाहता 24 तासात ऍडमिट व्हा. चक्र फिरली, मित्र, संघाचे कार्यकर्ते सगळ्यांना निरोप धाडले. तासा दोन तासात उलटे निरोप येऊ लागले, ऋचा एकटी राहू शकणार नाही त्यामुळे दोन बेडची एक रूम मिळायला हवी ही अडचण होती.
संघाच्या माध्यमातून मिनर्व्हा शिवणे इथे सोय होईल असे कळले आणि इतक्यात क्षिप्रा देवल च्या ओळखीने संचेती मध्ये नक्की सोय होईल असे कळले. तास दीड तासात ऍडमिट व्हायचे ठरले. इन्शुरन्स चे कागद, रिपोर्ट याची जुळवाजुळव केली आणि गुरुवारी संध्याकाळी देवाला नमस्कार करून घराबाहेर पडलो. रो प्रशांत सिद्ध याने दिलेला सल्ला प्रमाण मानून फोन घरीच ठेवला आणि फक्त अत्यावश्यक संपर्कासाठी म्हणून दुसरा फोन घेऊन निघालो.
हॉस्पिटलमध्ये पोचवायला चंदना आली होती, तिच्या धैर्याची परीक्षा होती. सुरुवातीच्या टेस्ट करून आम्हाला एस वॉर्ड मध्ये 409 नंबरच्या खोलीत दाखल करून घेण्यात आलं. ऋचानही धीराने घेतलं. रूम ची व्यवस्था लावून, इंट्रा कथेटर वगैरे सोपस्कार पूर्ण झाले आणि सुरुवातीची औषधे वगैरे कार्यक्रम रात्री 12.30 -1 ला संपला. स्थान बदलामुळे ऋचा आज नीट झोपणे शक्य नव्हते. अंगातला ताप, तिचे कुरकुरणे, समजावणे करता करता पहाटे 3.15 ला झोप लागली, पहाटे 6.30ला सकाळचे चक्र सुरू झाले. हॉस्पिटलच्या वेळा, औषधांचे वेळापत्रक, डॉक्टरांच्या वेळा याची सवय व्हायला दोन दिवस गेले. डॉ मालपाणी इथल्या चीफ फिजिशियन, चांगल्या अनुभवी डॉकटर. त्यांनी पहिल्याच दिवशी मला ऑक्सिजन सपोर्ट सुरू केला. दुसऱ्या दिवशी आमची खोली बदलली आणि जरा ऐस पैस खोलीत आलो. इथून दूरवर सिंहगड दिसला आणि अंगात बळ संचारले. सिंहगडकडे पाहताना ' मी पुन्हा येईन' हे वाक्य मनात येऊन गेले आणि सध्याच्या राजकीय संदर्भ आणि कोंडीची आठवण येता 'तसं नुसतच नाही रे बाबा' असे वाटून हसूही येऊन गेले.
ऋचा पहिल्या तीन दिवसातच ठीक झाली. तिची ऑक्सिजन लेव्हल सुधारली आणि तिला घरी जायचे वेध लागले. घरच्या आठवणीने तिचे डोळे पाणावू लागले. तिची समजूत काढत काढत वेळ घालवणे विश्रांती घेणे चालू ठेवले. पहिले तीन दिवस माझी तब्येत ठीक होती, ऋचाचे केस विंचरून चक्क तीन पेडांची वेणी देखील मी जमेल तशी तिला घालून दिली. चौथ्या दिवसापासून माझी तब्येत घसरणीला होती. ऑक्सिजन खाली खाली येत होता, खोकला आला की थोडी धाप लागायची. उठून बाथरूम ला जाऊन आले तरी प्रथम ऑक्सिजन ची नळी शोधावीशी वाटू लागली. कोणतीही हालचाल करायची तर आधी त्याच्या स्टेप्स ठरवून घ्याव्या लागू लागल्या. कमीतकमी वेळ ऑक्सिजनशिवाय कसे रहावे लागेल हे पाहण्यासाठी.
हॉस्पिटलमध्ये रोज काही पेशंट डिस्चार्ज होत होते आणि तेव्हढेच भरती होत होते.
ऋचा ची समजूत काढत काढत 6 दिवसापर्यंत तिचा मुक्काम पूर्ण झाला आणि बुधवारी तिला डिस्चार्ज मिळाला. आता पुढचे काही दिवस आपल्याला एकट्याला काढायचे हे थोडे दडपण वाटून गेले. त्यातच सेंट्रल ऑक्सिजन लाईन वर पेशंट घेणे बंधनकारक झाल्याने माझी रवानगी खालच्या मजल्यावर करण्यात आली. इथून व्ह्यू तोच होता पण खालच्या मजल्यावरून.
रोज रात्रीचे औषधांचे शेड्युल संपून झोपायला उशीर व्हायचा मग सकाळ आळसात जायची, रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी राहायचे आणि आपण कधी बरे होणार याची काळजी वाटत रहायची. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या करायचे श्वासाचे व्यायाम, हातापायाची हालचाल फिजियोथेरपिस्ट करून घेत, 5वा ते 8वा दिवस चालत 20 पावले टाकणेही कठीण झाले होते. हालचाल केली की ऑक्सिजन लेव्हल 84 पर्यंत खाली येत असे आणि अस्वस्थ वाटू लागे. 7व्या दिवसापर्यंत अधून मधून ताप येतच होता. औषध दिले की दरदरून घाम यायचा आणि ताप उतरायचा पण उठून कपडे बदलण्याचे त्राण नव्हते.
उंचीवरच्या विरळ हवामानात राहिल्याचा अनुभव कामी येत होता. तिथं आपल्या जवळ दोन गोष्टी कमी असतात, ऑक्सिजन आणि त्यामुळे बुद्धीची ताकत, त्यामुळे दोन्ही जपून वापरायच्या हा माझे ट्रेकिंग चे गुरू वैद्यांचा हाय अल्टीट्यूड वरचा सल्ला प्रमाण मानत सर्व हालचाली अतिशय धीम्या गतीने चालू होत्या. विचारांची गती मर्यादित ठेवणे आणि चांगले विचार आठवत राहणे हे एक कामच होतं. मधूनच तापामुळे किंवा ऑक्सिजन घसरल्यामुळे ग्लानी यायची, काहीतरी असंबद्ध स्वप्ने पडायची, अश्या वेळी मनाचे वेग ओढुन पुन्हा पुन्हा त्याला वर्तमानात आणण्याचे कसबी काम त्याच मनाच्या एका सजग भागाला करावे लागत असे.
राजेश्वर ने रामरक्षेचा मंत्र ऐकण्यास/ म्हणण्यास सुचवले. अगदी लहानपणच्या चाळीसगावच्या आठवणी जाग्या झाल्या. कै आजी आप्पांच्या शेजारी बसून केलेला रामरक्षेचा पाठ आठवला पण मधल्या बऱ्याच दिवसात हा सहस्रक्षर जप न केल्याने संपूर्ण आठवत नव्हता, बुद्धीला मग ताण न देता विज्ञानाचा आधार घेतला आणि यू ट्यूब वरून पाठ ऐकायला सुरुवात केली, मन एकाग्र करायला त्याचा फायदा झाला. एकटेपणा जाणवू नये म्हणून स्टोरीटेल ऍप वर छावा ऐकायला सुरुवात केली आणि दिवसाचे तास दोन तास मन आवडत्या इतिहासात 350 वर्षे मागे जाऊ लागले. त्यातले किल्ल्यांचे संदर्भ आणि उल्लेख डोळ्यासमोरून भेटी देऊ लागले. मनाचा वारू बारा मावळात दौडून येऊ लागला, मनातल्या आताच्या प्रतिमा आणि इतिहासातल्या पाउलखुणांचा मेळ घालायचा प्रयत्न करू लागला. इतिहासाच्या पानातून चमकून गेलेल्या अजरामर व्यक्तींच्या यादखुणांचा धांडोळा घेऊन येऊ लागला. मध्ययुगीन नृशंस कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आताच काळ किती सुखावह आहे असे वाटू लागले.
रुग्णशय्येवर पडल्या पडल्या मनातून असे अनेक विचार फिरू लागले. औषधांसाठी इंट्रा कँथेटर लावलेला, त्याचा हात अडीच तीन दिवसातून बदलावा लागत होता. रक्त तपासणीसाठी हातात सिरिन्ज परजित परिचारिका येत , सुरुवातीला दररोज आणि नंतर दिवसाआड रक्ताचे नमुने घेण्यासाठी सुईची टोचाटोची, त्याच्या होणाऱ्या वेदना, काही विशिष्ट औषधे देताना रक्तनलिकेचा होणारा असह्य दाह, एका पाठोपाठ एक अशी तीन तीन सलाईन देताना शय्येवर जखडल्या मुळे लागणारी असह्य रग हे सर्व नको नकोसे व्हायचे. मोठमोठ्याने किमान कन्हावे असे कधी वाटायचे. मग मन पुन्हा इतिहासात डोकवायचे. माझी जन्मठेप ची पाने आठवायची. दंडा बेडी, खोडा बेडी अश्या अमानुष शिक्षा क्रांती कारकांनी कश्या आणि कशाला भोगल्या असतील? इथे तर मी चांगल्या शय्येवर आहे, आसपास मला बरे करण्यासाठी माझी काळजी घेण्यासाठीच माणसे वावरत आहेत. अन तिथे, त्या वेळी तशा हाल अपेष्टा कोणी का सहन केल्या असतील?
माणसाला नेमकी भीती कशाची वाटते या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. आपल्या हातातून काही निसटते आहे आणि आपण ते पकडू शकत नाही असे असते का? आपली जवळची माणसे, आपली संपत्ती किंवा अजून काही मान मरातब यांच्या पासून दूर कुठेतरी एकांतात इतिश्री होते का काय ही भीती आहे का? 'या परिते करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष...' या म्हणण्याच्या पासंगलाही पुरणारे आपण नाही तर त्याची इतकी फिकीर कशाला?
   'एव्हढं मीठ खाशील- वाघाला भिशील?' हा लहानपणीचा खेळ आठवून गेला. डॉकटर्स सारखे म्हणायचे की तुम्हाला विशेष काही झालेले नाहीये, पण खेळातील वाघ दिसतो कसा हे जोवर माहीत नाही तोवर ते कल्पनाचित्रच पुरेसे असते तसेच काहीसे. कोणत्याही आजारात तुम्हाला काहीच नाही असे बरोबरचे म्हणतात तेव्हा 'आजून काय काय होणार ते एकदा दाखवा तरी' असे म्हणण्याची छाती पेशंटची होऊच शकत नाही. मला जे होतंय ते सर्वतोपरी आहे मला यातून बाहेर काढा हीच एक आंतरिक तळमळ प्रत्येक रुग्ण मांडत राहतो. शरीराला होणारे क्लेश हे या भीतीचे कारण असते काआजार व्हायचा तर व्हावा पण आपण मात्र अलगद त्यातून उठून यावे असे कायम वाटत राहते.
आजवर राहून गेलेल्या गोष्टी, मी करायचे ठरवले होते पण केलं नाही, माझे नाव पुसले तर मागे राहणाऱ्यांचे कसे होणार या सर्व चिंता एका क्षणी गौण ठरतात कारण त्याची काळजी करणं हे त्या क्षणी अनावश्यक असतं, माणसाच्या हातात त्या क्षणी काहीच नसतं. मला यातून बाहेर काढ मी न झालेल्या सर्व गोष्टी मार्गी लावेंन असा धावा करायचा कोणाकडे? जणू काही त्यानंच शिक्षा म्हणून डोळे उघडण्यासाठी तुम्हाला इथे ढकलले आहे!
आपण संपलोच तर मागे उरतील ते त्यांचं पाहून घेतील काळजी केली म्हणून तुमचा हिशोब वाढत नाही असे कायम वाटत राहिले.
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलताना असे नतद्रष्ट विचार येत राहतात. हिंदोळा हा किती लडिवाळ नाजूक शब्द! त्याची दोरी भक्कम असेल आणि भक्कम आधाराला बांधली असेल तर तो कधी ना कधी समेवर येतो. आपल्याला अनभिज्ञ असलेल्या आजारातले चढ-उतार हे इतके नाजूक लडिवाळ वाटत नाहीत, समुद्रातल्या उंच उसळणाऱ्या लाटांमधून वर खाली होत जाणाऱ्या नौकेसारखी कल्पना येत राहते, न जाणो एखाद्या लाटेच्या तळाशी तो पोटात घेतो का काय असे वाटून जाते.

प्रगती की ओर:
30 एप्रिल ला माझ्या शेजारच्या बेडवर श्री हरीश राव नावाचे पेशंट आय सी यू मधून दाखल झाले. त्यांनी आधीचे 12 दिवस आयसीयू मध्ये काढले होते, ऑक्सिजन लेव्हल 70 पर्यंत खाली जाऊनही त्यांना डॉकटर्स ने यातून बाहेर काढले होते. माझ्या पेक्षा त्यांना वाघोबा जास्त जवळून दिसला होता. त्यांना भेटून मलाच फार बरे वाटले. तुलनेनं माझी तब्येत फारच खणखणीत होती.
आता पर्यंतच्या उपचारांना शरीराने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि तब्येत सुधारू लागली. दोनच दिवसात ऑक्सिजन लेव्हल सुधारली, सपोर्ट ची मात्रा कमी झाली आणि ताजे तवाने वाटू लागले. रक्ताचे विविध स्थळदर्शक ताळ्यावर आले आणि आपण लवकरच घरी जाणार असे वाटायला लागले. करोना चा प्रकृतीला असलेला धोका अजून टळला नव्हता. तसा जन्मानंतर पहिला टाहो फोडला तेव्हापासून प्रकृतीला असलेला धोका कोणाचाच टळत नसतो. अतिशय गुंतागुंतीच्या रासायनिक जैविक प्रक्रियेतून आपण सर्वजण जात असतो. सर्व काही व्यवस्थित, समतोल चालू आहे तेव्हा काही विशेष वाटत नाही. अगदी रोज रात्री आणि सकाळी मोठ्यांदा जांभई येणं यातही काही विशेष वाटत नाही. पण कुठेतरी तोल ढासळला की यातली गुंतागुंत लक्षात येते. प्रत्येकाची ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहते, त्यातली गुंतागुंत सुटत नाही गुंतवणूक मात्र वाढत राहते!

जमेच्या बाजू:
'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी म्हण आहे. मी या बाबतीत खरोखरच नशीबवान ठरलोय. मला अनेक ठिकाणी हरी दिसला. अवघड प्रसंगी धिटाईन माझी सोबत करणारी सुविद्य पत्नी हा केव्हढा मोठा आधार. अंगात ताप असून आणि स्वतः बाधित असून तिनं मला सावरलं, समजूतदार मुलं आणि भावंडं असणं हे खरोखरच नशीब. 'माझी तब्येत उत्तम असते अगदी डॉकटर कडे एकदाही जावं लागतं नाही' हे चांगलंच पण अडचणीच्या परिस्थितीत आपल्या तब्येतीची खोड माहीत असणारा, ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास टाकू शकतो असा हक्काचा घरचा किंवा मित्र डॉकटर असायलाच हवा. आपल्या एका हाकेसरशी सर्व कामे सोडून धावतील असे जवळचे मित्र असणं याहून दुसरे समाधान तर नाहीच. फार फार उदास वाटलं तर यातल्या कोणाही हरीचा धावा करावा तीच आपली जमेची बाजू. आपल्यालाही कोणासाठी हरीचा दूत बनता यावं ही प्रेरणा सुद्धा यातूनच मिळते!

गेले दोन आठवडे मी वैद्यकीय व्यवस्थेवरचा आलेला ताण पाहतोय. आधुनिक वैद्यकाला पैसेभरू समजण्याचा आणि उठसूट त्यावर भाष्य करण्याचा नादानपणा मी कधी केला नाही, ते पाप आपल्या पदरात घेतलं नाही. आपला सोडून इतर सर्व व्यवसाय हे कसे नेकीनेच चालायला हवेत असे समाजणाऱ्यांपैकी मी नाही. असह्य होत जाणाऱ्या कामाच्या ताणा तून सध्या डॉकटर्स, परिचारिका, इतर स्टाफ लोकांना बरे करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. शास्त्रीय प्रगती, आधुनिक तपासणी पद्धती मधून मिळणारी माहिती, नवीन औषधे यामुळेच साथी चे असे रोग आटोक्यात राहत आहेत. त्यांच्या नावे बोटे मोडण्यासारखे करंटेपण नाही. साथीचे रोग मानवनिर्मित का नैसर्गिक या वादात पडायचे कारण नाही. निसर्गाची एक साखळी आहे त्याचे काही गणित आहेच. त्यातली गुंतागुंत मानवाला अजून समजली नाहीये. जवळ आलेल्या जगात अश्या प्रकारच्या साथीच्या रोगांना थोपवणे हे केवळ सरकारचे काम नाही, आजच्या घडीला प्रगत समजल्या जाणाऱ्या कोणत्याही देशातल्या वैद्यकीय व्यवस्थेला एकट्याने असा आवर घालणे शक्यच नाही. काही दिवसांपूर्वीच कॉम्प्लेकसिटी थेअरी वर आधारित नसीम तलेब आणि संजीव सन्याल यांचा एक परिसंवाद ऐकला होता. एकमेकांशी जोडल्या गेलेल्या मानवी व्यवहारात अशी उलथापालथ घडवू शकणाऱ्या घटना पूर्ण थांबवणे अशक्य आहे असा त्यांचा सूर होता.
कोव्हिडं इतकाच सहज संक्रमण होऊ शकेल, पण जो होण्यास आणि बरा होण्यास फक्त 4 ते 5 दिवसाचा अधिक काळ लागेल असा रोग जरी पसरला तरी सर्व व्यवस्थेवरचा ताण किती पटीने वाढेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. समाज म्हणून याची समज वाढायला हवी. 1918 च्या फ्लू च्या साथी पेक्षा आज परिस्थिती खूप चांगली आहे, वैज्ञानिक प्रगती, उपलब्ध माहितीचा अचूक वापर यातून हे साध्य झालंय. जैव तंत्रज्ञानातील संशोधन, औषध विकास, इन्शुरन्स ची व्यवस्था याचं काही अर्थकारण आहे, आजवरची प्रगती ही या व्यवस्थेतून झाली आहे.
कर्मफळाच्या सिद्धांतानुसार ज्याचे भोग आहेत त्याला ते भोगावे लागणार, पण म्हणून सोडून देता येत नाही आणि केवळ सध्याच्या व्यवस्थेवर भिस्त ठेवून चालणार नाही. गेले वर्षभर 'न्यू नॉर्मल' ची चर्चा ऐकतोय. म्हणजे काय हे मात्र आज पर्यंत समजले नव्हते. आज या सर्व भोगातून जात असताना आणि आसपास पाहत असताना जाणवलं की न्यू नॉर्मल असं वेगळं काही नाही. बदल होतच राहतात, काही धक्क्यांमुळे काही घटनांमुळे. दैनंदिन व्यवहारातल्या काही गोष्टी काही काळासाठी बदलतील पण संभाव्य धोक्यांपासून बचवायचे तर मात्र जिथे तिथे 'तेनं त्यक्तेन भुञीथाः' या वृत्तीने काम करणारे, प्रगतीची कास धरणारे संशोधक हवेत.

अनेकांचे 'मी बरा कसा झालो' चे अनुभव मी गेले काही दिवस वाचले. आपल्याला काही झालं आणि आपण बरे झालो तर ज्यांच्यामुळे आपण बरे झालो त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून चार ओळी फक्त लिहाव्यात इतकाच काय तो हेतू होता. पण आपल्या भोवती जग केंद्रित असल्याची जाणीव अजूनही जात नाही म्हणून हा लेखन प्रपंच इतका लांबला! म्हणतात ना जित्याची खोड.....तसही तब्येत बरी असल्यावर वेळ घालवायला काही तरी साधन हवंच!
3 मे 2021, ए वॉर्ड, 405 संचेती हॉस्पिटल, पुणे

 

No comments:

Post a Comment