गंगोत्रीची मंदिर
शुभ्र अश्या सांगमरावरी दगडाने बांधलेले आहे. मंदिराच्या चारही बाजूच्या सज्जयांवर
पितळेच्या चकाकता पत्र लावला आहे. भगिरथीच्या पात्रात वाहून आलेल्या शुभ्र धवल दगड
गोट्यातून आणि मागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित सुदर्शन शिखरातून हे मंदिर खरे तर उठून
दिसत नाही. राजा रणजितसिंहाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला
असे इतिहासाला ज्ञात आहे. गंगेची मूर्ती पूर्वाभिमुख असून तिच्या डाव्या हातात सुवर्ण कलश आहे आणि उजवा हात आश्वस्त वचनात आहे. मूर्तीच्या बरोबर समोर विस्तीर्ण म्हणता येईल अशा पटांगणाच्या शेवटी एक दिव्याचा खांब आहे आणि
त्याच्या पायथ्याशी एन टी पी सी तर्फे गंगावतारणाचा देखावा
उभारण्यात आलाय. भागीरथी च्या खोऱ्यात लोहारीनाग
पाला येथे जलविद्युत प्रकल्प उभा करण्यात आलाय त्या प्रकल्पाअंतर्गत रस्ते सुधारणा
, विविध माहिती फलक इन टी पी सी तर्फे उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग हा
आहे. या देखाव्याच्या बाजूला अग्निहोत्रासाठी एक बंद खोली आहे. सहज लक्ष गेलं
तेंव्हा त्या खोलीच्या भिंतीवर एक नवीनच घोषणा वाचायला मिळाली ज्याने माझं कुतूहल
चाळवलं गेलं "हमे गर्व है हम बुढेरे
है। गर्व से कहो हम बुढेरे है।"
यामधील बुढेरे या शब्दाचा अर्थ काही
ध्यानात येईना. या घोषणेने माझ्या मनात घर केले. सम्पूर्ण ट्रेक च्या मार्गावर मनात मागे याचा विचार चालूच राहिला. परतीच्या मार्गावर मात्र ठरवून सौरभ म्हणजे आमच्या गाईडला गाठले आणि त्याला हा प्रश्न केला. त्याच्याकडून
मिळालेला खुलासा मात्र अधिकच अस्वस्थ करून गेला. भागीरथी च्या खोऱ्यात उगमाजवळ हर्षिल हे एक टुमदार गाव आहे. त्याच्या जवळील सात गावांच्या टापुला 'उपली टोप' असे स्थानिक संबोधन आहे. इथे राहणारे जे लोक आहेत त्यांना बुढेरे असे म्हणतात. हर्षिल च्या खालच्या बाजूस आणि भगिरथीच्या
खोऱ्यात राहणाऱ्यांना गंगाणी म्हणतात असे त्याने सांगितले. बुढेरे या शब्दाचा अभिनिवेश का असा प्रश्न मी पुढे केला, सौरभ हा बुढेरा असल्याने त्याची छाती अभिमानाने फुलून आली. बुढेरा म्हणजे बुद्धीने मोठा आणि त्यांची बोली सुद्धा अधिकार वाणी असलेली खडी असते आणि ते इतर गढवाली लोकांच्यात उठून दिसतात, राहतात हे त्यामागचे करण आहे असे त्याने सांगितले. गूगल ने बुढेरे या शब्दाचा खुलासा अगदी सहज केला, त्यावरून समजले की बुढेरे हा बुद्धेरे या शब्दाचा अपभ्रंश असावा आणि मग ही शब्द- अर्थाची साखळी उलगडली.
भागीरथी अर्थात गंगा नदीचे भारतीय संस्कृती मधील स्थान अनन्यसाधारण आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार धाम यात्रा करण्यासाठी संपूर्ण भारत वर्षातून भाविक, यात्रेकरू येतात. गंगोत्री धाम मध्ये राहताना जवळ जवळ सर्व भारतीय भाषा बोलणारे लोक आम्हला बघायला मिळाले. भाविकांना परमेश्वर आपला वाटतो आणि तो फक्त आपलाच असावा असा मानुष्यसुलभ अधिकार स्वभाव इथेही बघायला मिळाला. वास्तविक हिमालयाची भव्यता पाहून मी पणा गळून जायला हवा , पण अनेकांच्या आयुष्यात हा पुण्यप्रभाव पडताना दिसत नाही. त्यातून जिथे संस्था उभी राहते तिथे अधिकारवाद हा स्वाभाविकपणे येतोच आणि त्या मागचा कार्यकारण भाव ना समजता पुढे त्याचे अवडंबर माजते हे अश्या तीर्थक्षेत्री सुद्धा बघायला मिळते ही गम्मत आहे.
गंगोत्री हुन पुढे निघालो की 2.5 किमी अंतर चालून गेल्यावर कनखू या ठिकाणी चेक पोस्ट लागते. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क मध्ये इथून प्रवेश होतो. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी इथून पुढे जाणाऱ्या पर्यटक, भाविक आणि गिर्यारोहकांच्या संख्येवर बंधन घालण्यात आले आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसते. इथे एक आश्रम आणि श्रीराम मंदिर आहे, नुकतेच बांधलेले असावे. चेक पोस्ट वर आपल्या जवळील सामान, तंबू प्लास्टिक च्या पिशव्या इत्यादी सर्वांची माहिती द्यावी लागते. ट्रेकिंग चे परमिट आणि माहिती ही अगोदरच द्यायची असते. आपण ट्रेकिंग करताना जमा होणारा कचरा परत आणून चेक पोस्ट वर दाखवावा लागतो. तसे गोमुख पर्यंत मार्गावर ठीक ठिकाणी कचरा पेट्या ठेवल्या आहेत आणि त्या साफ होताना दिसतात. पर्यावरणाच्या दृष्टीने इथून पूढे आग पेटवण्यास बंदी आहे त्यामुळे स्वयंपाक फक्त रॉकेल च्या स्टोव्ह वरच करावा लागतो आणि थंडी वाजली तर शेकोटी चा सहारा घेता येत नाही, ती सहनच करावी लागते.
एक खटकणारी गोष्ट इतकीच की या राष्ट्रीय उद्यानात कोणत्याही प्रकारच्या आपत्ती मध्ये कोणतीही सरकारी मदत उपलब्ध नाही आणि माहिती म्हणून ही गोष्ट या चेक पोस्ट वर आवर्जून सांगितली गेली. दुर्गमता आणि त्यातील धोका हा जोवर माहीत नसतो तो वर अश्या प्रकारच्या सूचना खऱ्या अर्थाने 'कळत' नाहीत. निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यावर आणि त्याचा लहरीपणा अनुभवल्यावर मात्र या सूचनांचा अर्थ कळतो. गिर्यारोहण आणि पदभ्रमण हे छंद स्वतःच्या जाणिवा अधिक समृद्ध करण्यासाठी अश्याप्रकारे उपयुक्त ठरतात.
या नॅशनल पार्क मध्ये आधी आलो होतो तेंव्हा थोड्या थोड्या अंतरावर चहा, कॉफी चे स्टॉल्स आणि राहण्यासाठी तंबूवजा आडोसे दिसले होते. आता संख्येवर असलेल्या आणि कचरा करण्यावर असलेल्या बंधनामुळे हे स्टॉल्स बंद झाले आहेत. गंगोत्री पासून 9 की मी पायपीट केल्यावर आणि सुमारे 1000 फूट चढून गेल्यावर चिडवास नावाचा कॅम्प लागतो. इथे एक असा स्टॉल लागतो. आणि मग पुढे आणखी 5 किमी गेल्यावर भोजवास इथे गढवाल निगमचे हॉटेल. भोजवास ला निर्मल बाबांचा आश्रमही आहे. त्या व्यतिरिक्त गंगोत्रीच्या पुढे राहण्याची कोणतीही सोय नाही.
गंगोत्रीतून पुढे निघाल्यावर नदीच्या काठाकाठाने रस्ता जातो. डावीकडच्या डोंगर रांगेचा उतार जिथे तीव्र आहे तिथे हा रस्ता खोदून आणि बांधून काढलेला आहे तर जिथे हा उतार सखल आहे तिथे ती सहज पायवाट बनली आहे. चीड, देवदार, पाईन चे वृक्ष वाटेवर सावली देत आणि त्यांच्या झरोक्यातून दिसणाऱ्या हिमशिखरांची गम्मत वाढवत उभे आहेत. जंगल म्हणावे इतकी दाट झाडी नसली तरी वन म्हणता येईल इतका प्रसन्न झाडोरा इथे आहे. कनखू जवळ येत येता गंगोत्री चे दर्शन दुर्लभ होत जाते आणि चिडवास च्या जवळ येता येता कनखू च्या राम मंदिराचा कळस दिसेनासा होतो. गंगोत्री ते चिडवास या अंतरात भागीरथी उजवीकडे, अर्थात दक्षिणेकडे वळण घेते आणि मग चिडवास येता येता उजव्या बाजूस वर मंदा शिखर दर्शन देऊ लागते. चिडवास ही एक कॅम्प साईट आहे आणि इथे चीड च्या झाडांचे अक्षरशः जंगल आहे. चिडवास ला पोहोचता पोहोचता मागे नजर टाकली की दूरवर भागीरथी शिखराचे दर्शन होते आणि या पुढचा सर्व प्रवास हा त्यांच्याच बॅक ड्रॉप वर होत राहतो.
चिडवास ते भोजवास हा टप्पा 5 किमी चा.इथे चढ जाणवायला लागतो.आधीच 9 किमी पायपीट झालेलीच असते आणि घड्याळात मध्यान्ह होत असते. हिमालयातील हवामान दुपारी बदलायला सुरुवात होते आणि आपले नशीब जर खराब असेल तर या मार्गावर ती वेळ इथेच येऊन ठेपते. मग इथून पुढे थोडे लक्ष पायवाटेकडे, थोडे आभाळाकडे, वाऱ्याने उडणारा पोंचो किंवा फडफडणारे जॅकेट सांभाळत आणि सतत दूरवरचा दिसणारे भागीरथी शिखर बघत चालत राहायचे. भोजवासच्या आधी साधारण एक किमी अंतराचा रॉक फॉल एरिया आहे. काही वर्षांपूर्वी इथला रस्ताच ढासळून गेला होता. इथला परिसर म्हणजे दगडा मातीचे उंचच उंच ढिगारे रचल्यासारखा. कधीही वरून छोटे मोठे दगड सुटतात आणि नदीच्या ओढीने पात्राकडे झेपावतात. त्यांच्या मध्ये यायचे नाही कारण तुमचा कपाळमोक्ष त्या दगडावर लिहिलेला असू शकतो. पाऊस पडताना हा धोका अधिक त्यामुळे वर बघत बघत दबकत हा टप्पा ओलांडावा लागतो. या परिसरात डोंगरी बिळातून राहणारे उंदीर आणि अगदी तळहातावर मावतील इतके छोटे गोंडस ससे दिसतात. ते माणसाला घाबरून पळाले तरी त्यांच्या हालचालीमुळे दगड सुटतात आणि त्यानेसुद्धा कपाळ मोक्ष होऊ शकतो. गोमुख हुन पुढे नंदनवन ला जाताना असाच एक भाग लागतो. आम्ही तिथून जात असताना असाच एक दगड वरून आमच्या दिशेने आला होता. पण त्याचा मार्ग अमच्याहून वेगळा होता आणि मग आमची भेट टळली. अर्थात आम्ही परतून भोजवासला आलो तेंव्हा असा एक अपघात झालेला पेशंट आम्हाला भोजवासला बघायला मिळाला. होत असं केम्व्हा केम्व्हा अशी आमच्या गाईडची त्यावर प्रतिक्रिया होती. आज तिथून सुखरूप परत आल्यावर ही प्रतिक्रिया मीही देऊ शकतो!
हा टप्पा ओलांडून मग पुढच्या वळणावर मात्र डोळ्याचे पारणे फिटते. इतका वेळ अरुंद असलेले भगिरथीचे पात्र आता बऱ्यापैकी रुंद झालेले दिसते आणि नजरेच्या एकाच टप्प्यात समोर भागीरथी शिखरे आणि त्यांच्या पायथ्याशी असलेली भागीरथी हिमनदी, त्यापुढून येणारी भागीरथी नदी दिसू लागते. खालच्या बाजूला भोजवास ची कॅम्प ची सखल सपाट जागा आणि उजव्या बाजूने खळखळाट करत वाहणारी भागीरथी नदी, डावीकडच्या डोंगररांगेवरून गोमुख कडे जाणारी पायवाटेची रेघ आणि उजवीकडच्या डोंगर रंगेमागून डोकावणारे भृगुपंथ शिखर असा हा सुंदर देखावा बघताना किती वेळ जाईल सांगता येत नाही. जाणकार माणूस बरोबर असेल तर इथून समोर गोमुख दिसू शकते. पहिल्या दिवसाची पायपीट आता संपत आली असते आणि मग पाय आपसूक भोजवास कॅम्प कडे वळतात. इथे भोजखर ची झाडे जास्त प्रमाणात आहेत म्हणून त्याचे नाव भोजवास. भोजवासची उंची समुद्रसपाटीपासून 12400 फूट आहे आणि या उंचीवर मोठी झाडे तग धरू शकत नाहीत. इथे पोचता पोचता हे लक्षात येते की चीड, देवदारचे वृक्ष आता मागे राहिले आहेत आणि झाडांची उंची आणि घेर कमी कमी होऊ लागले आहेत. भोजवासच्या पुढे उंच झाडे नाहीतच, छोटी झुडुपे तेव्हढी दिसतात.
भोजवास ला त्या दिवशी (16 मे 2017) पोचलो तेंव्हा आभाळ भरून आलेले होते.वाटेवर थोडा पाऊसही पडला. गार आणि जोराचा वारा सुरू झाला होता. आमचे पोर्टर यायला वेळ लागणार होता म्हणून थोडा वेळासाठी निर्मल बाबांच्या आश्रमात आसरा घेतला. तासा दोन तासाने आमचे पोर्टर पोचले आणि त्यांनी तंबू उभे केले. संध्याकाळी आभाळ भरलेलेच होते आणि थोडासा पाऊसही पडला. रात्री ढग पांगले आणि चांदण्यांनी भरलेले आकाश आमच्या भेटीला आले. नेहमी ओळखीची नक्षत्रेसुद्धा अश्या वेळेस लपून राहतात आणि पटकन दिसत नाहीत. आभाळ मोकळ झालं की रात्री कमालीची थंडी पडतेच! पहाटे उठलो तेंव्हा तंबूवर रात्री पडलेल्या पावसाचे थेंब गोठून गेले होते. अश्या थंडीत तंबूत राहण्याचा, स्लीपिंग बॅगच्या पोतडीत कोंबून झोपण्याचा अनुभव मजेशीर असतो. नुसत्या आठवणीने अंगावर शहारा येईल इतकी गम्मत त्यात साठवली असते.
अर्थात अश्या मोकळ्या आणि हूडहुडणार्या रात्रीनंतर रम्य पहाट आपली वाट पाहत असते. आसपासच्या हिम शिखरांवर उगवत्या सूर्याचे पाहिले तांबूस सोनेरी किरण विलोभनीय दिसतात. साक्षात कनकस्पर्श च तो, काही क्षणांपुरताच. थंडीत हवं हवस वाटणार ऊन मग झपाट्याने शिखर उतरून कॅम्पवर येतं आणि मग ऊर्जेचा एक वेगळाच संचार नखशिखातून होतो. बहुतेक वेळा असा उन्हाचा तडका मिळाल्याशिवाय त्या दिवशीचा कार्यक्रम सुरू होत नाही.
भोजवास हुन गोमुख चा टप्पा 4 किमी चा. चढ जवळ जवळ नाहीच पण तरी 600 फुटांचा. दगड धोंड्यांमधून जाणारी वाट, मधूनच गायब झालेली, सहज ना सापडणारी. मग इथे एकावर एक रचून ठेवलेल्या दगडांच्या लागोरीसारख्या राशींवरून मार्ग ओळखायचा. पुढे जाणार्याने खून म्हणून अशी लगोरी राचायची ही पद्धत सगळीकडेच वापरली जाते.
गोमुख जवळ येऊ लागते तशी ते पाहण्याची उत्सुकताही वाढायला लागते. शिलाखंडातून उतरणारे एक दोन उतार उतरले की आपण गंगेच्या पात्रातील वाळवंटात येतो. तिथून पुढे गोमुख ची बर्फाची भिंत दिसू लागते पण प्रत्यक्ष मुख बघण्यासाठी आणखी पूढे जावे लागते आणि हा मार्ग हिमनदीने मागे सोडून दिलेल्या दगडांच्या राशींवरून जातो. इथे एक " प्राचीन" शिव मंदिर आहे आणि एक साधुबाबा दिवसभर तिथे येऊन राहतात. मंदीर कसले, चार अर्ध्या भिंती, एकावर एक दगड रचून केलेल्या, एक बाजूला शिव पिंड आणि काही मूर्ती आणि त्यावर झाकायला टीनच्या डब्याचे पत्रे वापरून केलेले छप्पर. इतकेच! ते साधुबाबा गेली 29 वर्षे या परिसरातच राहतात असे त्यांच्याचकडून कळले.
गोमुख: इथे भागीरथी हिमनदीचे स्वरूप त्यागून जल स्वरूपात आपल्यासमोर येते. बर्फातून उगम पावणाऱ्या नदीच्या उगमाशी बांधीव गोमुख किंवा कुंड असण्याची शक्यता नाही कारण अशी सर्व ठिकाणे ही दुर्गम असतात. इथेही अशी काही रचना नाही. भागीरथी हिमनदी इथे 'अचानक' संपते. त्यामुळे बर्फ़ाची एक भिंत आपल्यासमोर उभी असते. त्याचे एक एक पदर वितळत वितळत नाहीसे होत असतात आणी त्यातून चमत्कारिक आकार काही काळापूरतेच का होईना तयार झालेले दिसतात. पाण्याचा प्रवाह, हिमनदीच्या उतार आणि त्यामुळे होणारी बर्फाची हालचाल आणि बर्फाचे वितळणे या मुळे प्रवाह जिथे असतो तिथे बर्फाची गुहा काही काळ तयार होते आणि त्यातून बर्फाळ थंड पाण्याचा प्रवाह येताना दिसतो. 2004 साली गोंमुख अश्याच स्वरूपात बघायला मिळाले. अर्थात बर्फ वितळत जाईल तसे त्याची भिंतीची जाडी कमी कमी होत जाऊन मग ती गुहा आख्खीच कोसळून जाते. गोमुखची जागा मागे मागे सरकत आहे त्याच प्रक्रियेचा हा भाग आहे.
भगिरथीच्या गोमुखातून येणारा प्रवाह हा नितळ असा नाही. कल्पना येणार नाही इतके हे पाणी गढूळ आहे. मुळात हिमनदी जेम्व्हा बनली त्याच वेळेस जी काही प्रक्रिया झाली असेल त्यामुळे हे बर्फ हे माती मिश्रित पाण्याचे बनले आहे. त्याचबरोबर या हिमनदीच्या अनेक हिम-उपनद्या आहेत आणि त्या सर्वांचे पाणी एकत्रित होऊन गंगेचा प्रवाह तयार होतो. हिमनदीच्या वितळत असणाऱ्या मुखपाशी वरून वाहून आलेले दगड गोटे पडत राहतात आणि त्यामुळे गोमुख पासून 50मी अंतरापर्यंत जाणे धोक्याचे आहे आणि तसे फलक तिथे लावले आहेत. अर्थात काही उत्साही भक्त मंडळी गोमुख च्या अगदी जवळ जायचे धाडस करतात. आम्ही थोडया उंचावर बसून गोमुखची दर्शन घेत होतो, सोबतीला गार वारा होताच आणि त्याच वेळेस काही उत्साही साधू गोमुख पासून अगदी जवळ जाऊन बर्फाच्या पाण्यात अंघोळ करत होते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे, पण धोका ओळखायला हवा!
गोमुख कडे तोंड करून उभे राहिले की उजवीकडे शिवलिंग शिखर दिसते. नाव शिवलिंग असले तरी त्याचे शिखर अगदी डाव्या सोंडेच्या गणेश मुखासरखे दिसते. तपोवन चे पठार शिवलिंग शिखराच्या थेट पायथ्याला आहे. तिथे जाण्याचा मार्ग गोमुख वरून जातो. इथे भागीरथी हिमनदी चक्क क्रॉस करावी लागते. हिमनदीच्या बर्फ़ावरून वाहून आलेल्या दगड धोंड्यांमधून आणि बर्फाच्याच उंच सखल टेकड्यांमधून ही वाट जाते. हिमनदीचे स्वरूप सतत बदलत असते आणि म्हणून हा मार्ग माहितगार गाईड शिवाय ना जाण्यासारखा आहे. बर्फवर पहुडलेला दगड कधी पाय ठेवल्यावर अचानक हलतो, त्यातून तोल जाऊ शकतो किंवा पाय मुरगळुही शकतो. बर्फ़ावरून ही कसरत करून झाली की समोर येतो सरळ चढचा निसरडा रस्ता. हे एक खरोखरच दिव्य आहे. पण एकदा का हा चढ पार केला की मग तपोवन च्या रम्य पठारावर आपला प्रवेश होतो. इथून मागे मेरू शिखर आणि त्याचे शार्क फिन दिसू लागते. शिवलिंग शिखराचा उतार आपल्याला खुणावत राहतो आणि त्या माळरानावर बागडणारे भरल अर्थात हरणांचे कळप दृष्टीस पडतात. तपोवन समुद्रसपाटीपासून 14200 फूट उंचीवर आहे आणि बहुतेक लोक तिथे जाऊन लगेच परत ना फिरता तिथे एक रात्र मुक्काम करतात, अर्थात तंबू मध्येच. एका दिवसात भोजवासहून तपोवन पर्यंत जाऊन परत यायला चांगलीच शारीरिक तयारी हवी. आमच्या बरोबरच्या तिघांनी हे दिव्य करून दाखवले आणि सुदैवाने हवामानाने त्यांना चांगली साथ दिली.
नंदनवन हे सुद्धा एक असेच पठार, भागीरथी हिमशिखरांच्या पायथ्याशी असलेले. नावाप्रमाणेच सुंदर. गोमुख पासून डावीकडच्या किनाऱ्याच्या निघाले की नंदनवन गाठता येते. वाटेत रक्तवर्णी नाला आणि पूढे चतुरंगी नाला भागीरथी हिमनदीला मिळतो तिथे मात्र हिमनदी वर चढाई करून वेढा मारावा लागतो. हिमनदी जशी वितळत जात आहे तसा हा मार्ग अधिकाधिक अवघड होतो आहे. पूर्वी हिमनादिवरून सहज चालत नंदनवन च्या बाजूचा चढ गाठता येत असे. या वेळेला लक्षात आले की रक्तवर्णी नि चतुरंगी या दोन्ही नाल्यांनी मुख्य भागीरथी हिमनदीच्या प्रवाहात खोलवर मुसंडी मारलेली असल्याने बराच लांबचा फेरा पडू लागलाय. त्यातून एका ठिकाणी चक्क दोर लावून बर्फाचा कडा चढावा लागण्यापर्यंत हा मार्ग अवघड झालाय. हिमनदी च्या कचाट्यातून सुटल्यावर नंदनवन च्या चढाईला सुरुवात होते. जवळपास 1000 फुटांचा हा चढ अंगावर असला तरी घासारडा नाही त्यामुळे सावकाश चढता येतो.
आम्ही या ठिकाणी पोचलो तेंव्हा दुपारचे 3.30 झाले होते आणि बर्फवृष्टी ला सुरुवात झाली होती. चढ चढून कॅम्प वर पोहोचेपर्यंत 5.15 वाजले. नंदनवन चे दोन भाग आहेत. काठवरचा भाग हा कमी उंचीचा (समुद्र सपाटी पासून 14500 फूट) आणि या खोऱ्यात आणखी पुढे गेल्यावरचा भाग 15000 फूट उंचीवरचा. अप्पर नंदनवन भागात भागीरथी शिखराच्या मोहिमेचा बेस कॅम्प लागतो.
नंदनवन कॅम्प वर संध्याकाळपासूनच जोरात बर्फ पडत होता. आसपासचा सर्व परिसर बर्फाने पांढरा शुभ्र होऊन गेला. बर्फ पडत असताना फारशी थंडी मात्र वाजत नाही. रात्री बर्फ वृष्टी थांबली आणि मध्यरात्री ढग पूर्ण पांगले. नवमीचा चंद्र उगवून वर आला होता. त्याच्या प्रकाशात समोर केदार डोम, केदार, खर्च कुंड, शिवलिंग ही शिखरे रुपेरी चमकत होती. कोणत्याही कॅमेऱ्याने टिपता येणार नाही असे ते दृश्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो.
रात्री कॅम्पवर पोचल्यापासून काही तासातच आमच्या एक सह-गिर्यारोहकाला खोकला सुरू झाला. थोड्याच वेळात दुखणे वाढले. सुदैवाने आमच्या चमूतील तिसरी गिर्यारोहक डॉक्टर असल्याने हा खोकला हा 'माऊंटन सिकनेस' चा प्रकार असून हा ' पल्मनरी एडिमा' आहे असे त्याचे निदान झाले. पहाट होताच लगेच खाली उतरायचे असे ठरले. आम्ही एकाच तंबूत आळीपाळीने जागून रात्र काढली आणि पहाट होताच सामान आवरून प्रस्थान ठेवले. पहाटे दिसणारे सुवर्ण क्षण त्या धावपळीत कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवले मात्र. अवघड अश्या त्या उतारावरून आणि हिमनदीच्या पट्ट्यातून आजारी आणि झोप न झालेल्या मित्राला घेऊन येणं फारच जिकिरीचे होते पण काहीही उपाय नव्हता. शेवटी 9 तास हळू हळू चालत आम्ही एकदाचे गोमुख पाशी पोचलो. कमी उंचीवर आल्यामुळे त्याचा आजार हळू हळू बरा होऊ लागला आणि तिथे बसल्या बसल्याच त्याला झोप लागली. या भागात भोजवासच्या पुढे घोडे घेऊन जाता येत नाही, पण आणीबाणीची परिस्थिती ओळखून आमच्या गाईडने धावत जाऊन भोजवासला एका घोडेवाल्याला गाठले आणि तो घोडा घेऊन आला. त्यामुळे पुढचा प्रवास जरा सुखकर झाला.
गिर्यारोहण बोलून चालून साहसी खेळ, त्यात काही धोके हे असतातच आणि त्यासाठी तयारीही केलेली असते. पण आम्ही अनुभवलेली परिस्थिती अपेक्षित धोक्याच्या यादी मधली नव्हती आणि त्यामुळे आमच्या जवळ काही उपाय योजना नव्हती. सुदैव इतकेच की आमच्या चमूतील एक डॉक्टर असल्यामुळे रोगाचे निदान लगेच झाले. तो दिवस अतिशय तणावाखाली गेला पण परमेश्वराची कृपा म्हणून काही अघटित झाले नाही.
हिमालय, एक उंचच उंच डोंगर रांगांचा, दगडासारख्या कठीण हिमनद्यांचा, फेसळत वाहणाऱ्या नद्यांचा, बर्फ वितळून ठीक ठिकाणी तयार झालेल्या तळी आणि सरोवराचा प्रदेश. इथे जागोजाग पडलेले प्रस्तर, गोटे आणि शिलाखंड आहेत, वर्षानुवर्षे कदाचित काही शतकांपूर्वी ते डोंगराच्या माथ्यापासून झेपावत खाली आले असावेत. त्यातले काहीच्या आपटी खाऊन ठिकऱ्याही उडालेल्या दिसतात. सगळे दगड वेगवेगळे, काही गुळगुळीत तर काही खरखरीत, काही गोटे तर काही कपच्या, काही सांगमरावरी पांढरे शुभ्र तर काही काळे ठिककर, विविध रूपे. पण त्यांच्याशी मैत्र जुळले की असे वाटते की हे त्यांचे रूप नाही तर स्वभाव आहे. आणि एकदा का तो कळला की मग त्यांच्याशी हितगुज करायला काही अडचण येत नाही. माणसाचा स्वभाव कधी परस्थिती नुसार बदलेल, पण या दगडांचा नाही, बोलून चालून दगडच ते!
सत्यजित चितळे २५ मे २०१७
No comments:
Post a Comment