एक ‘निवार’लेली आठवण
23 नोव्हेम्बर चेन्नई प्रवास ठरला होता. या वेळेस कामाची इतकी गडबड होती की जायच्या आधी वेदर रिपोर्ट बघायचा राहून गेला. निघायच्या आदल्या रात्री अविनाश चा मेसेज आला की चेन्नई मध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे त्यामुळे छत्री घेऊन जा. अविनाश चे घर तामिळनाडू मध्ये असल्याने मी त्याचा सल्ला मानला आणि अगदी निघताना एक छत्री सामानात टाकली. पहिल्या दिवशी चेन्नई चे आकाश अगदी स्वच्छ होते. संध्याकाळी टीव्ही वर निवार चक्रीवादळाची बातमी पहिल्यांदा पहिली आणि आता कामात विघ्न येणार या विचाराने आम्ही बेचैन झालो. 24 नोव्हेम्बर ची सकाळ मळभ घेऊनच उजाडली आणि पाऊस सुरू झाला. आम्ही कामासाठी निघालो. पाऊस पडत होता त्या व्यतिरिक्त इथे व्यवहारात काही वेगळेपण नव्हते. निवार चक्रीवादळ आकाराने आणि ताकदीने मोठे होत असून चेन्नई च्या दक्षिणेस पुदूचेरी जवळ 24-25 च्या मध्यरात्री धडकेल असा अंदाज वर्तवला जात होता. वादळाच्या ताकदीचा अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने 25 ला सुट्टी जाहीर केली. रात्री वारे काही वेगाने वाहत नव्हते पण पाऊस सतत पडत होता.
25 ला सकाळी आम्ही धाडस करून पावसातच गाडी काढून आवडी ला कामासाठी गेलो. पण सार्वत्रिक सुट्टीत केंद्र सरकारी कार्यालयेही असल्यामुळे तिथपर्यंत जाऊन हात हलवत परत फिरावे लागले. वाटेत पाऊस धुवाधार कोसळत होता. जागोजागी पाणी साचून तळी झाली होती. सुटीमुळे ट्रॅफिक नव्हता त्यामुळे आम्ही तुलनेनं लवकरच हॉटेलवर परतलो.
25 च्या संध्याकाळी प्रशासनाने 26 तारखेला सुद्धा सुट्टी राहील असे जाहीर केले. आता उद्याही हॉटेलवर बसूनच काढावे लागणार म्हणून आम्ही अस्वस्थ झालो पण पर्याय नव्हता.
26 ला सकाळी उठून आम्ही जवळच असलेल्या अष्टलक्ष्मी मंदिरात जायचं ठरवलं. हे मंदिर इलियट बीच वर असून अडयार नदीच्या मुखाजवळ आहे.
सकाळी 8.45 ला मंदिरापाशी पोचलो. पार्किंग समोर कोळीवाडा, सुधारित चांगला बांधलेला. उजवीकडे वर खेचून ठेवलेल्या होड्या आणि त्या पलीकडे उधानलेला समुद्र.
आम्ही मंदिरात पोचलो. लक्ष्मी ची मूर्ती पश्चिमेभिमुख आहे. मुख्य द्वार थेट समुद्राकडे आहे,पण सध्या निर्बंधांमुळे उत्तरेकडे असलेलं छोटं दार उघडतात. कोणाच्याही दक्षिणी मंदिरात असते तशी नजरेत भरणारी स्वच्छता. मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही आणि पुजारी या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. दर्शन बारी कडून लक्ष्मी देवीकडे जातानाच डावीकडे उसळलेल्या समुद्राकडे माझं लक्ष गेलं. काळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ क्षितीजाच्या अलीकडेच समुद्रात घुसले होते. समुद्रावर अफाट वारं होत आणि वाऱ्याच्या त्या लोटांनी समुद्रात मिटर दोन मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. उसळत्या लाटांना थोडीही उसंत मिळत नव्हती.उसळत्या उदधिच हे रूप मी पहिल्यांदा पाहत होतो. निसर्गाच्या या अफाट ताकदी चा तो अनुभव माझे पाय खिळवून ठेवणारा ठरला.
ते दृश्य पाहताना आणि अनुभवताना माझी अर्थातच लक्ष्मीच्या मूर्तीकडे पाठ झाली. मी तसाच काही वेळ उभा होतो इतक्यात पुजाऱ्याने मला दर्शन घेण्यासाठी जवळ येऊन हाक मारली.त्यानं तामिळ मध्ये मला विचारायचा प्रयत्न केला की मूर्ती तर मागे आहे तू तिच्याकडे पाठ करून का उभा आहेस? अर्थातच मला हे समजण्यासाठी त्याला हा प्रश्न पुन्हा तोडक्या मोडक्या इंग्रजीत विचारावा लागला. मी कोणाला नमस्कार करू? समोरच्या उसळलेल्या समुद्राला, या अफाट अथांग समुद्राला उसळवणार्या वाऱ्याला का पाषाणात कोरलेल्या त्याच्या मानवी रूपाला? मला हा प्रश्न त्या पुरोहिताला विचारायचा होता पण उत्तरियाच्या मागून डोकावलेलं त्याचं गरगरीत पोट आणि दक्षिणे साठी पुढे आलेला हात हे त्याचं उत्तर मला दिसलं.
सुंदर घडवलेल्या लक्ष्मी देवतेला मनापासून नमस्कार करून मी देवळा बाहेर पडलो आणि तडक समुद्राकडे मोर्चा वळवला. इतर वेळी समुद्र किनाऱ्यावर शांत पालवणार्या लाटांत शिरण्याची ओढ वाटते पण आज तो रागावलेला वाटत होता. वाळूच्या किनाऱ्यावर थिजल्यासारखा उभा होतो. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर वाळूचे बारीक कण वेगाने येऊन शरीरावर आदळत होते. सॅन्ड ब्लास्टिंग ही प्रोसेस अभियांत्रिकी मध्ये सरफेस ट्रीटमेंट साठी आम्ही नेहमीच वापरतो. खूप वेगाने वाळूचे कण धातूंवर अपटवून धातूचा सरफेस स्वच्छ करणे असे त्याचे ठोबळ स्वरूप असते. तसे होताना त्या धातूला सुद्धा कश्या वेदना होत असतील अशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. समोर वाळूच्या उतारावर उसळत्या लाटांबरोबर काही समुद्री जीव पाण्याबाहेर लोटले जात होते, पाठीमागून येणाऱ्या लाटेबरोबर पुन्हा स्वगृही पाण्यात जाण्याची धडपड करणारे ते जीव पकडण्यासाठी काही कोळी बांधव त्या रौद्र समुद्रात गुढगाभर पाण्यात उतरले होते. त्यांना या रुद्र रूपाचं अप्रूप आणि भय वाटत नसेल?
देवस्थानातला पुरोहित आणि ते कोळी बांधव या दोघांनाही मी हे प्रश्न विचारले नाहीत. माणसाला दिलेलं पोट हेच त्याचं उत्तर आहे असं मला वाटलं. ते चालावं म्हणून जे करावं लागत तेच ती माणसं करत होती. वरचे दोन्ही प्रश्न मला भरल्या पोटी पडले होते हेही माझ्या लक्षात आलं. रिकाम्या पोटी असे वायफळ प्रश्न पडणार तरी कसे?
सत्यजित चितळे
No comments:
Post a Comment