Thursday, March 12, 2020

कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेम्बर २०१९


कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेम्बर २०१९

“बाबा.....रात्री सूर्यग्रहण होत का रे?” ईशान चा प्रश्न....” अरे वेड्या रात्री सूर्यच नसतो आकाशात तर ग्रहण कसे होईल?” त्याला वेड्यात काढत माझे उत्तर ........”पृथ्वीच्या प्रकाशित भागात नाही का ग्रहण होऊ शकत? मी ग्रहण रात्री दिसत का?’ हे नाही विचारलं...’होत का?’ असं विचारलं!!”....शब्द खाली पडू न देण्याची पुणेरी परंपरा जोपासत आलेल्या या उत्तराने मी मात्र इथे क्लीन बोल्ड झालो. ईशान-इरा चे शास्त्रीय/ अशास्त्रीय प्रश्न आणि त्यावर मी दिलेले (माझ्या समजुतीप्रमाणे) शास्त्रीय उत्तर अशी करमणूक होता होता मंगलोर पर्यंत चा प्रवास सुखकर पार पडला आणि आम्ही एकदाचे २५ डिसेम्बर ला रात्री मंगलोर मुक्कामी पोचलो. मंगलोर शहर सह्याद्रीच्या पश्चिम घाटावरचे समुद्रालगत वसलेले शहर. उंच-सखल टेकड्यांवरची वस्ती अगदी गोव्याची आठवण करून देणारी. एयरपोर्ट गावाच्या उत्तरेला एका उंच टेकडीवर बांधलेलं, तिथून हॉटेल पर्यंत पोचताना शुकशुकाट झालेल्या रस्त्यांवर दुकानांतून, शेजारच्या घरांतून ख्रिस्तमस चे डेकोरेशन मधूनच दिसत होते आणि शहराचा विस्तार बराच असणार हेही लक्षात येत होते.

गेल्याच आठवड्यात इथे झालेल्या दंगलीच्या खुणा कुठे दिसल्या नाहीत. वाहनचालक प्रवीण हा विशीतला तरुण, त्याला विचारले तर म्हणाला कि थोडी गडबड होती आणि संचारबंदीही होती दोन दिवस, पण लगेचच सगळे सुरळीत झाले. सोमवारी हॉटेलला फोन केला तेव्हा तिथल्या रिसेप्शन मध्येही हीच बातमी समजली होती. ग्रहणा सारख्या काही मिनिटे दिसणाऱ्या घटनेसाठी इतका प्रवास करून येणारे पुण्या-मुंबईचे लोक ठार वेडे आहेत हा समज तिथे पोचला असणार, किमान रिसेप्शन च्या माणसाशी बोलताना त्याच्या स्वरातच ती झाक मला ऐकू आली. २६ तारखेसाठी वाहन हवय असे विचारल्यावर “तुम्हाला नेमक कुठे जायचय? “ असा प्रती प्रश्न त्याने केला. इथे ग्रहण दिसणारच आहे तर आता अजून कुठे जाताय? असा त्याचा रोख होता.

सूर्यग्रहण आणि तेही कंकणाकृती म्हणजे जरा दुर्मिळ योग. तुम्ही खूप अपेक्षा ठेवून क्रिकेटची मॅच पहायला जाव आणि तुमच्या लाडक्या खेळाडून शतक झळकवावं इतकाही बे-भरवशाचा नसला तरी तसाच दुर्मिळ योग. सुदैवाने पृथ्वी- चंद्र- सूर्य या आकाशस्थ गोलांच्या भ्रमणाचा खूप अभ्यास झालेला असल्याने ग्रहण नेमक केव्हा होणार, कुठून दिसणार याची खात्रीशीर माहिती आताच्या जमान्यात इंटरनेटवर सहज उपलब्ध होते. हवामानाचा खूप अभ्यास होऊनही मात्र त्याचे अंदाज चुकतात आणि शतकी खेळी खेळण्यासाठी मैदानात उतरलेला तुमचा लाडका सचिन/ विराट किंवा रोहित अर्ध्या शतकाच्याच आधी तंबूत जाताना मनाला जसा क्लेश होतो तसा क्लेश ढगांच्या किंवा धुक्याच्या आवरणामुळे तुमच्या पदरी येऊ शकतो. म्हणून ग्रहण पाहायला जायचे कुठे? यावर तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांची शेपूट पकडून जाणे सयुक्तिक! नोव्हेंबर महिन्यात संडे सायन्स स्कूल ने आयोजित केलेल्या मार्गदर्शन सत्रात खगोलविद डॉ. प्रकाश तुपे यांचे मार्गदर्शन झाले. आणि जोतीर्विद्या परिसंस्था चे बरेच लोक केरळमध्ये कन्नूर ला जाणार आहेत असे कळाले. त्यामुळे कोईमतूर ला जावे असा मनातला बेत रद्द करून मंगलोर ला जायची निवड केली.

२६ तारखेला सकाळी ७.३० वाजता टॅक्सी करून मंगलोरच्या दक्षिणेला ५०-६० किलोमीटर चा पल्ला गाठण्यासाठी निघालो. हॉटेलमधून बाहेर पडताना समोरच्या टीव्ही वर ग्रहणकाळात होणार्या पूजा अर्चांचे तपशील दाखवत होते. आपल्याला वैज्ञानिक प्रगती मध्ये किती पल्ला गाठायचा आहे याचे हे एक उदाहरण पाहून हसत हसत निघालो. टॅक्सी चालक पंचविशीतला सोहेब नावाचा उत्साही तरुण. आम्ही ग्रहण पाहायला निघालोय असे म्हणल्यावर त्याने “ आले वेडे लोक” असा कटाक्ष आमच्याकडे टाकला! आदल्या दिवशी मिलिंद हळबे कन्नूर ला पोचले होते आणि त्यांनी वाटेतून सांगितले होते कि कासारगोड नंतर एक पूल आहे तिथपर्यंत नक्की पोच आणि ग्रहण बघ. मी सोहेब ला तसे सांगितले. तिथून पुढे लगेचच बेकल किल्ला आहे, तिथे ग्रहण पाहण्यासाठी बरेच लोक आले आहेत, आपण तिथेच जाऊ अशी माहिती सोहेब ने पुरवली. ८ वाजून ४ मिनिटांनी ग्रहण स्पर्श झाला तेव्हा आम्ही केरळमध्ये प्रवेश केलेला होता. माडांच्या दाट झाडीतून जाणारा रस्ता, मधूनच दिसणारा समुद्र किंवा खाडीवरचे पूल आणि छोटी गावे हे साधारण कोकणासारखे सुंदर दृश्य. इस्लाम च्या अनुयायांची संख्या लक्षणीय आहे हे मात्र जाणवत होते. वाटेत गाडीत इंधन भरण्यासाठी थांबलो तेव्हा खाली उतरून चंद्राने सूर्याचा ३०% घास घेतला आहे हे पाहून घेतले. पेट्रोल पम्पावरच्या कर्मचाऱ्यांना ग्रहणाचे फारसे सोयर सुतक नव्हते, जणू काही हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात रोज असावा! “ तुमचा नाश्ता झालाय का?” सोहेब ने मला विचारले. “होय आम्ही केला आहे, तुला हवे तर वाटेत थांबूया” या माझ्या उत्तरावर “ ग्रहण झाल्यावर खाऊया, आत्ता नको” हे त्याचे उत्तर ऐकून मला दुसरा धक्का बसला. सोहेब हा मुस्लीम पण नव्या जमान्यातला आणि शिकलेला तरुण, पण तो हे मनापासून म्हणला होता. मंगलोर मध्ये झालेल्या दंगलीबद्दल आणि संचारबंदी बद्दल त्याला विचारले. केरळचे लोक इथे येऊन आमचा धंदा खराब करतात अश्या आशयाचे उत्तर त्याने दिले. एकूण काय, सध्या पर्यटनाचा काळ आहे, आत्ता धंद्यात खोटी नको अशी त्याची भूमिका दिसली. “ दोन दिवस इंटरनेट बंद होते तेव्हा दिवस खायला उठला होता, नाही तर दिवसभर मोबाईलवर कसा वेळ जातो ते कळत नाही! “ हि त्याची प्रतिक्रिया “कळतय पण वळत नाही” या सदरात मोडणारी होती!

सोहेब शी होणार्या या गप्पात वेळ हळू हळू पुढे सरकत होता आणि कासारगोड जवळ येत होते. बाहेर हळू हळू सूर्य प्रकाश कमी होताना जाणवत होता आणि झाकल्या जाणार्या सूर्यबिम्बाचे आम्ही मधून मधून दर्शन घेत होतो. कंकणाकृती अवस्था ९ वाजून २३ मिनिटांनी होणार होती. आम्ही बेकल किल्ल्यावर ९:१२ ला पोचलो. गडबडीने उतरलो, कॅमेरा व ट्रायपॉड घेतला आणि किल्याच्या बुरुजाकडे निघालो. “ माझ्या जवळ एक जादाचा ग्रहणचष्मा आहे, तू घे आणि ग्रहण बघ” मी सोहेब ला चष्मा देत म्हणालो. “ मला नको, मला नाही पहायचे ग्रहण” त्याने मिश्कील हसत चष्मा नाकारला; मला बसलेला तिसरा धक्का होता हा. पण त्याचे उद्बोधन करण्याइतका वेळ नव्हता. किल्ल्यात शिरलो आणि समोरच्याच एका भिंतीवर ट्रायपॉड लावून कॅमेरा सेट केला. एव्हाना चंद्रबिम्बाने सूर्याला ८५-९० % पेक्षा जास्त गिळले होते. चंद्र बिंब सूर्य बिम्बावरून खाली सरकत होते आणि त्याचा सरकण्याचा वेग जाणवत होता. वातावरणात आता उष्मा उरला नव्हता आणि सूर्याचा प्रकाश कमी झालेला जाणवत होता. चंद्राची सावली इथे जवळपास ९५% सूर्य बिंब झाकणार होती. चंद्राची दाट सावली, जशी खग्रास ग्रहणात पडते तशी असण्याची शक्यता कमी होती कारण उर्वरित ५% सूर्यबिंब आसमंत प्रकाशित करण्यास समर्थ होते आणि हा एक खरोखरच वेगळा अनुभव होता.

बेकल किल्यावर चंद्रपूर, औरंगाबाद आणि परभणी इथून मराठी विज्ञान परिषद तर्फे ग्रहण पाहण्यासाठी एक मोठा चमू आला होता. त्यांनी तिथे एक टेलिस्कोपहि लावला होता. आता चंद्र बिंब अजून खाली सरकले. आम्हाला घड्याळात वेळ बघण्याचीसुद्धा शुद्ध नव्हती. आणि काही क्षणातच चंद्र बिंब सूर्याच्या गोल चकाकत्या चकतीमध्ये पूर्ण प्रवेशले. ते दृश्य बघताना तिथे जमलेल्या सर्वांनी एकाच हर्षोल्हास केला. वातावरण आता लक्षणीय गार वाटत होते. “ आहाहा! काय सुंदर!” असे उद्गार ज्याच्या त्याच्या मुखातून बाहेर पडत होते. सूर्याची ती चमकणारी बांगडी विलक्षण तेजस्वी आणि मनमोहक दिसत होती. इकडे चंद्राचा प्रवास सूर्यासामोरून सुरु होता. घसरत घसरत आता चंद्र बिंब सूर्य बिंबाच्या खालच्या कडेजवळ सरकले. “ आता सुटणार” कोणी तरी ओरडले. अगदी या क्षणीच ‘बेलीज बीड्स’ दिसण्याची शक्यता होती, अवघ्या काही क्षणांचा खेळ आणि लगेचच चंद्राने सूर्यासामोरून काढता पाय घेतला. सूर्य बिंबाच्या वरच्या बाजूने प्रवेश करून, सूर्याच्या चकती वरून प्रवास करून मग खालच्या बाजूने चंद्राने एक्झिट घेतली. एक अविस्मरणीय अनुभव आमच्या आठवणींच्या खात्यामध्ये जमा झाला. तिथे ग्रहण बघायला आलेल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात उतरवणे कठीण. अनोळखी माणसेसुद्धा अश्या अविस्मरणीय अनुभवानंतर अगदी जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखी बोलू लागतात! ‘समान शीले व्यसनेषु सख्यम’ हि म्हण अगदी खरी आहे!

परभणी हुन आलेल्या त्या ग्रुप मधल्या एका शास्त्र शिक्षकांनी इरा ला प्रश्न केला “चंद्र कुठून आला? वरून का खालून?” ‘ चंद्र वरून म्हणजे पश्चिमेकडून आला आणि पूर्वेकडे गेला’ या तिच्या उत्तराने त्यांना समाधान झालेले दिसले. ग्रहण बघायला जायचे असे ठरल्यापासूनच आमचा या विषयीचा पक्का अभ्यास करून घेण्यात आला होता. माणूस पृथ्वीवर उभा राहतो त्यामुळे अधर म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वर या दोन दिशा निर्माण होतात. पण अवकाशाच्या पोकळीत वर आणि खाली या दिशा कश्या असणार? अर्थातच कोणतीही दिशा हि सापेक्ष आहे हे कळण्यासाठी खागोलाचा थोडासा अभ्यास गरजेचा आहे.

सूर्यग्रहण पाहण्याचा माझा ४था अनुभव. कंकणाकृती पाहण्याचा पहिलाच. आतापर्यंत ३ वेळा खग्रास ग्रहण पाहण्यासाठी गेलो, पैकी २ वेळा ग्रहण दिसलं आणि एकदा नुसतच अनुभवल. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा असतोच. एखाद क्लिष्ट प्रमेय मांडून, ग्रहण काळात निरीक्षणे करून त्याचे प्रमाण सिद्ध करण्यासाठी मी काही शास्त्रज्ञ नव्हे, त्यामुळे ‘ स्वप्नी जे जे पहिले रात्री, ते तैसेची होत असे’ असा आनंद माझ्या नशिबात नाही. पण ग्रहणाकाळातील निरीक्षणांचे शास्त्रीय महत्व किती आहे ते माहित असल्यामुळे आपण त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्यात एक वेगळाच आनंद होतो. चंद्राची सावली अंगावर घेतलेला आणि ‘(झाकलेला) सूर्य पाहिलेला माणूस’ अशी बिरुदावलीही मिरवता येते हे आणखी एक विशेष!

ग्रहण पाहून आणि मग बेकल किल्यावर फिरून आम्ही बाहेर पडलो. गाडीत बसल्यावर सोहेब ने दुबईहून त्याच्या कोण्या मित्राने पाठवलेला ग्रहणाचा व्हिडियो दाखवला. ‘ आपको भी ऐसेच दिखा क्या?’ असा त्याने प्रश्न केला. “ अरे म्हणूनच तर तुला चष्मा देत होतो.” या माझ्या उत्तराने तो बिचारा हिरमुसला. गंगा वाहून गेली आपण कोरडेच राहिलो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरलेला दिसला. मग पुढे बराच वेळ ग्रहणाविषयी त्याचे शास्त्रीय समाधान करण्यात गेली. त्या निमित्ताने एकाचे थोडे उद्बोधन करण्याचे भाग्य मला लाभले!

पृथ्वीवरल्या सजीव सृष्टीचा एकमेव तारणहार असणारा सूर्य. पुराणातला एकमेव भरवशाचा देव. बाकी सर्व देवांना मानवाने मानवाचे षडरिपू बहाल केले आहेत, पण सूर्याच्या नखरेलपणाविषयी एकही पौराणिक गोष्ट मला आठवत नाही. कारण तो दडी मारत नाही, रोज येतोच आणि दिवसभर उर्जा देऊनच जातो! मग ग्रहण होत तेव्हा त्याचा दोष नाही, कोणी राहू-केतू त्याला ग्रासतो, आणि गंमत पहा कि माणसाने केलेल्या पूजा अर्चेने देव प्रसन्न होऊन त्याची सुटका करतात! या पौराणिक कल्पनांच्या मागचे शास्त्र कमी लोक जाणतात आणि सांगतात. प्राचीन काळापासून ग्रहणे आणि त्याची निरीक्षणे होत असणार असे म्हणतात. सूर्य ग्रहण काळात उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पहिल्याने अनेकांचे डोळे गेले असणार आणि म्हणून कोणी हा उपदव्याप करू नये म्हणून त्या काळात बाहेर न पडणे, पूजा अर्चा करत घरात बसणे अशी बंधने घातली असणार.

मंगलोरच्या विमान तळाकडे संध्याकाळी जाताना, माडांच्या गच्च झाडी पलीकडे पश्चिमेला तांबूस सूर्यबिंब दिसत होते. प्रचंड वस्तुमानाचा आणि आकाराचा धगधगता सूर्य. त्याच्या प्रकाश संभारातल्या एका बारीक किरणशलाकेच्या वाटेचा एक सजीव ग्रह पृथ्वी, आणि त्या पृथ्वीचा एक चंद्र नावाचा उपग्रह. त्या चंद्राने काही काळच झाकल्यामुळे या पृथ्वीवरच्या मूठभर लोकांना होणार्या आनंदाचे, कुतुहलाचे आणि बहुतेकांना वाटलेल्या वैषम्याचे त्या हिरण्यगर्भाला काय सोयर सुतक! पण तरीही आपल्याला झाकून आपल्यालाच जाणण्याचे कुतूहल बाळगणाऱ्या मनुष्यप्राण्यांना कौतुकाने न्याहाळत आणि त्यासाठी आपल्या आणि पृथ्वीच्या मधे येणाऱ्या चंद्राला क्षमा करीत तो भानू पश्चिमेकडे नव्या क्षितिजाकडे जाताना मला दिसला.

सत्यजित चितळे

२९ डिसेम्बर २०१९, पुणे




No comments:

Post a Comment