Thursday, March 12, 2020

सिंहगड वाऱ्याची वाट


साद सिंहगडाची, तिथी पुनवेची, दिशा मावळतीची, साथ वीरांची, वाट वाऱ्याची!

सूर्याची वसंत संपात बिंदूशी जवळीक होते त्याच सुमारास चंद्र त्याच्या पूर्णत्वाने प्रकाशमान होतो ती पौर्णिमा म्हणजे हुताशनी किंवा होळी पौर्णिमा. आर्यावर्ताच्या भूभागात बोचरी थंडी आता नाहीशी झालेली असते आणि पेटलेल्या होळीच्या धगीमुळे आता पहाटेची गुलाबी थंडीसुद्धा काढता पाय घेऊ लागते. गड कोटांच्या मध्यम, तीव्र उतारावर गुढगाभर उंच वाढलेली गवतं आता तुर्याला येऊन वाळायला लागलेली असतात.पावसाळा संपताना वाऱ्याच्या तालावर डोलणारी गवताची पाती आता मरगळ येऊन आडवी पडलेली दिसतात. त्यांच्या अंगातलं त्राण इतक नाहीस होत कि वार्याची एखादी झुळूक कुठून आली आणि कुठे निघून गेली हे त्या आडव्या पडलेल्या गवतावरून सांगता यावं. त्या अडवारलेल्या गवताची पिवळसर चकचकीत कांती उगवत्या आणि मावळत्या सूर्यप्रकाशातले उग्र रंग पटल परावर्तीत करते आणि उगवतीला किंवा मावळतीला डोंगर उतरणीला सोन्याचा साज चढवून जाते. मावळातल्या भात खाचरातून इंद्रायणी चे पीक घेऊन आता ती शेतं गव्हाच्या ओम्ब्यांनी भरून गेलेली दिसतात. शेताच्या बांधावरचं किंवा दरीतल्या दाट झाडीतल पळसाचं झाड टवटवीत भगव्या फुलांचा साज चढवून लक्ष वेधून घेतं तर जागो जागची काटेसावर पाने झडून फुलांचे कोंब पेटवताना दिसते. अकाशिया, पांगारा पिवळा आणि नीळा बहावा आता बहरू लागलेला असतो. रात्रीच्या वेळेस डोंगर उतारांकडे नजर टाकली तर दूरवरून पेटलेल्या वणव्याची रांग दिसते. वाऱ्याच्या वेगान धावता आल नाही तरी तो वन्ही वार्याच्या अदेशाबरहुकुम दिशा बदलत फोफावत जाताना दिसतो. वाटेत येणाऱ्या डोंगर उतारावरचच नव्हे तर चढावरच गवतसुद्धा त्याच्या भुकेला बळी पडत असत. एक खर कि कोणताही वणवा आटोक्यात आणता आला नाही तर त्याची संहारक भूक भागवण हि अवघड गोष्ट होऊन बसते. माणसाच्या आणि त्यातून समूहाच्या डोक्यातही कधी वणवा पेटतोच ना!

होळी पौर्णिमेला सिंहगडाच्या सहाय्याने राहणारे डोंगरवासी सर्व मेटांवर होलिका पूजन करतात. त्याचे औचित्य साधून गेली अनेक वर्षे पुण्यातले गडप्रेमी खानापूर कडच्या वाऱ्याच्या वाटेन चंद्रप्रकाशात सिंहगड चढण्याचा उपक्रम करतात. या दुर्गवेड्या समूहाला अमुक एक नाव असं नाही. पण गेली काही दशके दर गुरुवार- रविवार सिंहगडावर भेटणारी हि मंडळी. या समूहात सामील झालो कि अंगावरच मूठभर मास उतरणार आणि खंडीभर उर्जा शरीरात प्रवेशणार हे नक्की.

तर दर वर्षीचा होळी पौर्णिमेचा बेत असा, त्यात बदल फक्त सहभागी सदस्यांचा. या मोहिमेचे सदस्य वय वर्ष १० ते ७०, वीरांगना आणि वीर कोणीही होऊ शकतात. संध्याकाळी ४ च्या सुमारास पुण्यातून निघायचे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने पवित्र झालेल्या सिंहगड रस्त्याने गर्दीतून आणि सध्याच्या खाचखळग्यातून वाट काढत तासाभरात गडाच्या पायथ्याशी आतकरवाडी ला पोचायचे. तिथे चहापाणी करून चढाईला सुरुवात करायची. सावकाश चढत मेट गाठायचे. तिथे पहिला पडाव. थोड पाणी पिऊन, आणि पाठीवरच्या पिशवीतलं पोटात ढकलून पश्चिमेच्या दिशेन गडाला वेढा मारायला निघायचं. गडाचा हा वेढा हा जवळपास एकाच उंचीवरून जाणारा पायरस्ता. पावसाळ्यात सिंहगडाच्या दरीची शोभा वाढवणाऱ्या धबधब्याच्या वरून हि वाट जाते. वाटेवरच्या करवंदाच्या जाळीवर शुभ्र टपोरी फुले पुंजक्यातून फुललेली दिसतात. सांजवात होताना त्याचा मंद मधुर सुगंध मोहून टाकतो. दूरवर दिसणाऱ्या पुण्यात संध्याकाळचा ट्राफिक गजबजलेला असतो पण इथे शांतपणे पक्षांच्या आवाजात चालत जायला वेगळीच मजा येते. पावसाळ्यात वाढलेला कोरांटी, कारवी आणि तद्दन रान झाडांच्या काटेरी फांद्या आपली वाट अडवायचा निष्फळ प्रयत्न करत राहतात. त्यांना झुगारून जाताना कुठे थोडसं खरचटलं तर तो आपला बहुमानच समजावा.

गडाला जवळपास निम्मा वेढा मारल्यावर एक विस्तीर्ण माळ लागतो. आता पुणे दिसेनासे झालेले असते आणि पश्चिमेला सूर्य बिंब डोंगररांगेला टेकलेले असते. उत्तरेच्या खडकवासल्याच्या जलाशयात मावळतीची तांबूस किरणे पसरलेली दिसतात. थोड्या डाव्या बाजूला दूरवर तोरणा डोकं वर काढताना दिसतो आणि डाव्या बाजूला उंचावर सिंहगडचा वाऱ्याचा बुरुज आभाळात घुसलेला दिसतो. यालाच कलावंतीणीचा बुरुज म्हणतात. पलीकडच्या धारेवर मेट दिसत आणि तिथे उंचावरच्या सपाटीवर बांधलेल्या होळीचा त्रिकोणी टोप दिसून येतो. इकडे पूर्वेला दाटून आलेलं असत आणि चंद्राच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. या वर्षी दिसला तसा त्याच्या गती नियमानुसार कधी कधी तेजस्वी शुक्र सूर्याच्या बर्याच वर किंवा कधी चंद्राच्या डोक्यावर आपलं अस्तित्व दाखवून जातो.

थोड थांबून पुढे मेट गाठता गाठता सूर्यास्त झालेला असतो. मेटावरच्या वस्तीतले श्वान आपलं भुंकून स्वागत करतात. आता इथं वीज आली आहे. प्रामुख्याने धनगर वस्ती, चार घरं, म्हशीचे गोठे आणि शेतीचे सामान. मनुष्य वस्ती आहे पण गर्दी अजिबात नाही अशी जागा. थोडं वरच्या सपाटीवर वाळलेल्या झाडांचे बुंधे रचून होळी बांधलेली दिसते. अंधार पडता पडता इथले स्थानिक बांधव तिचे पूजन करून होळी पेटवतात. वाऱ्याचा जोर असेल तर फर-फर आवाज करीत होळी पेटते. तिला नमस्कार करून सरळ वर जाणाऱ्या डोंगर धारेनं चढायला सुरवात करायची. एक पायवाट उजव्या बाजूला खाली जाते आणि तिथं चकायला होत. थोड खालच्या बाजूला वीरगळ आहेत आणि काही पूजेतले शेंदूर शिंपण केलेलं देव. पण गडाची वाट तिकडे नाही. डोंगर रांगेनं सुरुवात केल्यावर वरून खाली येणारा पाण्याचा पाईप लागतो. हि रस्त्याची खूण. संपूर्ण वाट या पाईपलाईन च्या आजू बाजूने नागमोडी वळण घेत जाते. गडाचा बुरुज जवळ आला कि डोणागिरी कड्याच्या दिशेन आपण जातो. अगदी अरुंद पायवाट, डावीकडे सिंहगड आणि उजवीकडे खोल दरी अशी थोडीशी पायपीट केल्यावर शेवटचा अंगावरचा चढ लागतो. इथे वाट डावीकडे वळते. पुढे डोणागिरी चा कडा आहे आणि त्याच्या पायातून जाणारी आणि गडाला वेढामारून झुंजार बुरुजाखालून कल्याण दरवाज्याकडे जाणारी वाट आहे. त्याआधी क्षणभर विश्रांती घ्यावी. या बाजूच्या दरीत अजून वस्ती नाही. काळ्या रंगाच्या कान्व्हास वर मध्येच मेटावर पेटलेली होळीची पिवळी/सोनेरी प्रकाशशलाका फार सुंदर दिसते. सोबतीला पश्चिमेकडून येणारा सुखद गार वारा असतो आणि खाली दूरवर खानापूर- पानशेतच्या बाजूने वस्ती वस्तीत पेटलेल्या होळीच्या ज्योती दिसतात. वार्याच्या हेलकाव्याबरोबर दुरूनच तिथे मारलेली बोंब पण अस्पष्ट ऐकू येते. त्या आवाजामुळे बोंब का मारायची या विषयी माझे कुतुहूल जागृत झाले. माझ्या माहितीत दोनच विधी बोंब मारायला मान्यता पावलेले आहेत. एक होलिका पूजन आणि एक अंत्यविधी. माझे कुतूहल शमवायला गुगल गुरुवारची माहिती पुढे आली. पालथी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारणे हा एक ‘योग प्रकार’ आहे असे वाचायला मिळाले. अशी बोंब मारण्याने वाईट प्रवृत्तीचा नाश होतो असे म्हणतात. होलिका पूजन आणि होळी पेटवणे याची भक्त प्रल्हादाशी संबंधित गोष्टसुद्धा याच विषयाकडे घेऊन जाते. आजच्या काळात एखाद्या वाईट प्रथेबद्दल, रीतीबद्दल जो पहिल्यांदा आवाज उठवतो त्याला व्हिसल-ब्लोअर असे म्हणतात आणि शुद्ध मराठीत ‘त्यान त्याविरुद्ध बोंब मारली’ असंच म्हणतात ते किती सार्थ आहे नाही का! या आणि अश्या विचारांच्या तंद्रीत त्या वातावरणात हरवून जायला होते.

उत्साही लोकं आधीच वर पोचलेली असतात, त्यांच्या हाकाट्यांनी तंद्री भंग पावली कि मग पाषाण कडा चढायला सुरुवात करावी. सुमारे ३० ते ५० फुटाची चढाई. ‘पावठा’ हा समर्पक शब्द असलेल्या दगडी पायऱ्या आणि खोबणी इथे स्थानिकांनी केल्या आहेत. त्यातून चढाई करत काही मिनिटात आपण वर पोचतो. डोणागिरी च्या कड्यापासून लावलेले रेलिंग ओलांडून आपण मग गडावर सुरक्षित पोचतो तो समोर चंद्र चांगला कासराभर उंच चढलेला दिसतो. देवटाक्याच्या अमृतमयी पाण्यात नानानं बनवलेलं मधाळ सरबत, चंद्राच दुधाळ चांदण यानं चढाईचे श्रम कुठल्या कुठे दूर पळून जातात. गेल्या काही वर्षात गडावरच्या पायवाटा चांगल्या फरसबंदी केल्या आहेत, त्यामुळे परतीचा मार्ग चुकून भटकण्याचा संभव आता नाही. चंद्र प्रकाशात गप्पा मारत छत्रपती राजाराम महाराजांची समाधी साक्षीला ठेवत आणि टिळकांच्या निवासाला वळसा घालत पुणे दरवाजा गाठावा आणि गड उतरायला सुरुवात करावी. साधारणपणे ९- ९.३० ला आतकरवाडी गाठावी आणि मगच पुण्यातल्या घराची आठवण यावी!

सत्यजित चितळे, १२ मार्च २०२०


No comments:

Post a Comment