21 सप्टेंबर ला सकाळी 3.30 ला उठलो. दिल्लीत साऊथ एक्स 2 पासून निघून एयर पोर्ट वर पोचायला 40 मिनिटे लागली. पहाटेसुद्धा एयर पोर्ट वर पोचायला चांगलीच गर्दी होती. चेक इन करताना एक शीख माणूस त्याचे kwalalampur चे बोर्डिंग करा म्हणून एयर लाइन्स च्या स्टाफ ला विनंती करत मध्ये घुसायचा प्रयत्न करत होता आणि स्टाफचे लोक त्यांला नाकारत होते. त्याचा त्याच्या कुटुंबीयांचा टुरिझम व्हिसा होता पण त्याच्या जवळ टुरिझमसाठी आवश्यक ते सर्व कागदपत्र नव्हते. अश्या वेळेस दुसऱ्या देशात पोचल्यावर जर प्रवेश नाकारला तर नेणाऱ्या एयरलाईनची त्यांना परत आणण्याची जबाबदारी असते त्यामुळे एयरलाईनचे कर्मचारी त्यांना विमानात घेऊन जाण्यास तयार नव्हते. कौंन्टर वरचा शब्बीर हा तरुण मुलगा आम्हाला सहज बोलून गेला, हे लोक कोणत्यातरी आमिषाला भुलून पैसे कमावण्यासाठी जातात आणि मग सगळ्यांना डोकेदुखी होऊन बसते. ही एक प्रकारची फसवणूक आहे आणि माहितीच्या क्रांतीच्या युगात पण चालूच आहे हे बघून वाईट वाटले.
विमान 15 मिनिटे उशिरा निघून 9.30ला काठमांडुला पोचले. स्थानिक नेपाळी प्रवासी बरेच होते पण गोऱ्या कातडीचे प्रवासी मात्र फारसे नव्हते याचे आश्चर्य वाटले. नाही म्हणायला आमच्या शेजारी एक बुजुर्ग गोरा बसला होता आणि संभाषण करण्यात त्याने फार रस दाखवला नाही. त्याची खिडकी जवळची सीट असल्याने काठमांडूच्या जवळ आल्यावर फोन वरून बाहेरचे फोटो काढण्याची त्याची धडपड चालू होती. बाहेर खालच्या उंचीवर ढगांचे साम्राज्य पसरले होते त्यातून तो हिमाच्छादित शिखरे शोधत होता याची मला गम्मत वाटली.
काठमांडूचा राजा त्रिभुवनदास आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी लहानसा. त्यात एकाच वेळेस एकदम चार विमाने येऊन पोचलेली त्यामुळे तिथे चांगलीच गर्दी होती. इमिग्रेशन च्या अधिकाऱ्याला आम्हाला काहीच विचारायची इच्छा नव्हती. पुढे मेटल डिटेकटर मधून जाणे हा एक केवळ सोपस्कार पूर्ण केला आणि arrival हॉल मध्ये आलो. तिथे एकच गर्दी. आमच्या विमानासाठी सामानाचा बेल्ट उपलब्धच नव्हता त्यामुळे अर्धातास वाट पहावी लागली. ज्या बेल्ट वर आमचे सामान आले त्यावर मस्कत हुन आलेल्या ओमान एयर चे पण सामान आले होते. तिथे नोकरी करणारे नेपाळी नागरिक सामानाचे मोठं मोठे बॉक्स, टीव्ही सेट इत्यादी घेऊन आलेले होते. ज्या ठिकाणी ज्या वस्तू सहसा मिळत नाहीत तिथे त्यांचे किती अप्रूप असते ते पुन्हा एकदा पाहून मजा वाटली. काही चैनीच्या वस्तू ही गरज वाटू लागते त्याला प्रगती म्हणावे असा इतिहासच असावा.
बाहेर पडून श्री दंबार, सिसने रोव्हर ट्रेकिंग कंपनीचे मालक आणि आमचे टूर ऑपरेटर यांची भेट घेतली. पन्नाशी ओलांडलेले श्री दंबार हे इंग्लिश चांगलं बोलता येणारे प्रोफेशनल टूर ऑपरेटर वाटले. त्यांच्या बरोबर श्री दिलीप भंडारी, आमचे टूर गाईड सुद्धा आले होते. पुढचे 15 दिवस दिलीप आमच्या बरोबर असणार आहेत. उंचपुरे, 50शी ओलांडलेले दिलीप हे हिंदी आणि इंग्लिश जपून तोडत मोडत बोलत होते. पुढे पार्किंग मध्ये विनोंदजी आमच्यासाठी गाडी घेईन तयार होते. महिंद्र स्कॉर्पिओ मध्ये सामान लादून आम्ही सगळे थमेल कडे निघालो. भारतीय रुप्यातून नेपाळी रुपये कन्व्हर्ट करणे, आमच्या तिथेच ठेवायच्या बॅग ठेवणे आणि चहा घेऊन पुढे निघणे असा बेत होता. ट्रेक संपवून काठमांडू ला येऊन न राहता पोखरा ला राहू एक दिवस आणि 6 तारखेला सकाळी विमानाने काठमांडू ला येऊ असा प्रस्ताव वैद्यांनी मांडला होता आणि निखिल आणि मी त्याला आनंदाने संमती दिली. तसे श्री दंबार यांना सांगितले तेव्हा त्यांनाही हा प्रस्ताव आवडला. ते मूळचे पोखर्याचे रहिवासी असल्याने त्यांनी पोखर्याचे गुण वर्णन करून आम्हाला सर्व सोया करण्याचे आश्वासन दिले.
दिलीप पैसे कन्व्हर्ट करून घेऊन येईपर्यंत आम्ही जवळच्या एका रेस्टरन्ट मध्ये थांबलो. चहा घेत असताना श्री दंबार यांच्याशी गप्पा मारणे चालू होते. त्यांची एक मुलगी अमेरिकेत शिकागो मध्ये तर दुसरी इंग्लंड मध्ये असते. मुलगा 21 वर्षाचा आहे आणि कॉम्प्युटर चे शिक्षण घेतोय. नेपाळमध्ये मध्य- उछभ्रू समाजातली मुले शिक्षणासाठी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होत आहेत असे त्यांच्या सांगण्यात आले, त्यांच्या बोलण्यात त्या विषयी थोडीशी खंतही जाणवली.
थोड्याच वेळात दिलीप त्याच्या बरोबर जनक आणि विकास या दोन तरुण पोर्टर ना घेऊन आले. दोघेही स्मार्ट तरुण बघून हे पोर्टर आहेत? असा प्रश्नच पडला. त्यांना हिंदीचा गंध फारच कमी होत त्यामुळे फारसा संवाद होऊ शकला नाही.
12.15 वाजता आम्ही प्रवास सुरु केला. काठमांडू च्या गर्दीतून आणि धुळीने भरलेल्या वातावरणातून पोखरा हाय वे गाठायला एक तास गेला. काठमांडू मध्ये हवा चांगलीच गरम होती. हायवे असूनही रस्त्याला मोठं मोठे खड्डे असल्याने वेग अतिशय मंद होता. डोंगरातून वळत वळत जाणारा रस्ता आणि ट्रक चा बराच ट्राफिक यामुळे काळ-काम-वेगाचे गणित आमच्या सवयीप्रमाणे सुटत नव्हते. अडीच वाजता धाडिंग जिल्ह्यातल्या धुनी बेसी इथे एका रेस्टरन्ट मध्ये जेवायला थांबलो. जॅकी चॅन सारखा दिसणारा एक तरुण आणि त्याची नट्टा पट्टा केलेली ,बहुधा बहीण असावी, हे दोघे ते हॉटेल चालवत होते. खास नेपाळी मेन्यू खाऊन आणि अजबको ब्रँड चे आईसस्क्रीम खाऊन आम्ही तृप्त झालो आणि पुढे निघालो. पावणे सहा च्या सुमारास उजवीकडे त्रिशुली नदीवरचा पूल ओलांडून आम्ही धाडिंग बेसी गावाकडे जाणारा रस्ता पकडला. आता ट्रकचा ट्राफिक कमी किंबहुना नसल्यातच होता पण रस्त्याची वळणे मात्र जास्त तीव्र होती. मघाशी हायवे वरून वेड्यासारखे वाहन चालवत बायकिंग करणारे बायकर्स सुद्धा इकडे कमी झाले. आता सूर्य कलला होता आणि डोंगर उत्तरावरच्या पायऱ्या पायऱ्यांवर केलेल्या भात खाचरांवर पिवळा सोनेरी सूर्यप्रकाश पसरला होता. अतिशय मोहक अशी ती दृश्ये मनात साठवत आम्ही मार्गक्रमण करत होतो. साधारणपणे एक तासाने आम्ही धाडिंग बेसी जवळ पोचलो, तिथून डावीकडे आरुघाट कडे जाणारा रस्ता आम्ही पकडला. इथून तास डीड तासात सोटी खोला येणार अशी दिलीप ने माहिती पुरवली. खोला म्हणजे नदीला मिळणारा नाला असे ज्ञानार्जन मगाशीच दिलीपकडून झाले होते. हा गोरखा प्रांतातील शब्द असावा कारण आधी कधी हे माहीत झाले नव्हते.थोड्याच वेळात पक्का बांधलेला रस्ता संपला आणि पूर्णपणे कच्चा रस्ता लागला. विनोदभाऊंच्या वेगावर आणि मन:शांतीवर त्यामुळे काहीच परिणाम झाला नाही. हिंदकळत आम्ही वळणा वळणाच्या रस्त्यावरून निघालो होतो. अंधार दाटून येत होता पण अनोळखी प्रदेशात अश्या कच्या रस्त्यावरून जाताना वाटणारी अस्वस्थता मला जाणवत नव्हती. वाटेत जवळ आणि क्वचित पलीकडच्या तीरावर उंचावर दिसणाऱ्या एखाद्या घरातल्या दिव्यामुळे, छोट्या छोट्या घरांच्या वस्तीपाशी खेळणाऱ्या गुबऱ्या गालांच्या मुलांमुळे, मधूनच उलट जाणाऱ्या ट्रॅकटर किंवा एखाद्या मोटरसायकलच्या वर्दळी मुळे इतक्त्या आतवर असलेल्या वस्तीबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यामुळे अशी अस्वस्थता नसावी किंवा नेपाळ मध्ये पोचल्यावर आपला फोन लागणारच नाहीये हे मनात पक्के माहीत असल्यामुळे उगाचच गूगल करून आपला पत्ता शोधायचा नसल्याचेही कदाचित आमच्या गाईड वर मी अधिक आश्वस्त होतो म्हणूनही असेल.
आरुघाट एक छोटी बाजारपेठ. गोरखा जिल्यातून इथे यायला एक चांगला रास्ता आहे असे दिलीप म्हणाला. आरुघाट हुन डावीकडच्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो. अरशेत च्या पाशी हा कच्चा रस्ता एका छोट्या पुलापाशी संपला. त्या पुलावरून फक्त चालत किंवा मोटर सायकल ने जाता येईल इतकाच तो पूल लहान होता. आता पुढे चालत जावे लागणार असे वाटत असतानाच एक बस आली. ती पुढे सोती खोला ला जाणार होती. आमच्या समोर जो छोटा पूल होता त्याच्या बाजूने त्या बसच्या द्रायव्हरने सफाईदार पणे बस पाण्यात घातली आणि तो नाला पार करून बाहेर पलीकडच्या तीरावर काढलीसुद्धा. हा स्टंट आम्ही अवाक होऊन बघत राहिलो.
इथून सोटी खोला चालत एक तासांवर होत म्हणून आम्ही याच बसने जायचा पर्याय स्वीकारला. सामान घेऊन आम्ही पूल ओलांडला आणि अरशेत गावात जाऊन बस पकडली. कच्या, खडकाळ रस्त्यावरून बसचा चालक अगदी सहज गाडी दामटत होता. आम्ही मागे हिंदकळत, आदळत होतो. ही बस फोर व्हील द्राईव्ह आहे का काय अशी शंका यावी इतक्या सहजतेने ती बस या खड्या खुड्यातून जात होती. या बसेसचा खुळखुळा किती दिवसात होतो असा एक कुतुहलवजा प्रश्न विचारावासा वाटलं मला. बहुतेक ही बस डिस्पोसेंबल असेल असे निखिल गमतीत म्हणाला. पण आमचा सारथी अगदी सहज सहप्रवाश्यांशी गप्पा मारत वाहन चालवत होता. गावाकडच्या बसेसच्या खिडक्यांवर कुटुंबियांची, आवडत्या लोकांची नावे लिहिलेली असतात तसे या बसच्या काचे वर चक्क युनिक युनिका असे नाव लिहिले होते ते वाचून गम्मत वाटली. रात्री 8.30 ला एकदाचे सोटी खोला गावी पोचलो. अंधार असल्याने व्हॅली चा अंदाज येत नव्हता. बुधी गंडकी नदीच्या काठी वसलेलं गाव. नदीचा अखंड नाद जोरात ऐकू येत होता त्या अर्थी आम्ही अगदी काठाजवळच होतो. न्यू चुम व्हॅली गेष्ट हाऊस या इथे आमची सोय झाली. पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्यात समान टाकून आणि फ्रेश होऊन जेवायला आम्ही खाली आलो. जेवण साधेच, नेपाळी थाली- भात, काली दाल, बटाट्याची भाजी, एक , चटणी. मस्त ताव मारला आणि झोपायची तयारी केली. गावात दिव्याचा झगझगाट नसल्याने तसा काही अंदाज येत नव्हता. हवा गरम होती आणि आकाशात चांदण्या दिसत होत्या. दिवसभराचा प्रवास आणि त्यातून आरुघाट ते सोटी खोला अंतर हिंदकळत, ठेचकाळत पार केल्यामुळे झोप लवकर लागली.
22 सप्टेंबर
सोटी खोलाच्या आकाशात रात्री 10 नन्तर खळबळ झाली असावी. मध्यरात्री 1 च्या सुमारास वीज कडाडल्याने अक्खी व्हॅली हादरली. वीज कडाडण्याचा इतका भयावह आवाज मी पहिल्यांदाच ऐकला आणि जाग आली. भानावर येऊन घड्याळ बघेपर्यंत 5-10 मिनिटात दोन तीनदा वीज कडाडून सगळीकडे जोराच्या पावसाची वर्दी पोचवण्यात आली. आता पाऊस पडणार, वरून छप्पर गळणार तर नाही? अश्या विचाराने छपराची पाहणी केली. तेवढ्यात पावसाच्या थेंबांनी छपराच्या पत्र्यांवर ताशाची झोड उठवायला सुरुवात केली. दोन खोल्यांच्या मधल्या भिंतीवर पागोळ्याची रचना होती त्यातून तुषार उडू लागले. असाच पाऊस कोसळला तर तासाभरात गादी ओली होईल या विचाराने मी अस्वस्थ झालो. काय करावे या विचाराने खोली बाहेर आलो. समोर सहस्त्र धारांनी पाऊस कोसळत होता.
नुकताच गणेशोत्सव पार पडला. त्यामध्ये मिरवणुकीत ताशाची झोड उठवतात त्या आवाजाची मला आठवण होत होती. विविध पूजा विधींमध्ये प्रत्येक गोष्ट अर्पण केली की ‘अनेन परमेश्वर: प्रियताम’ अशी ओळ म्हणाली जाते. ताशाचे वादन हा असाच एक विधी. जोराच्या पावसाने पत्र्यावर ताशा वाजवत इंद्रदेव असेच ‘अनेन परमेश्वर प्रियताम’ असे म्हणत असावा असे मला वाटले. इंद्र हा देवच पण पुराणातल्या कथांतून इंद्राच्या काही कृतीचा परमेशवरालाही राग आला असे उल्लेख आहेत, देवत्व हे कर्माने मिळते पण परमेश्वर हा त्याहून श्रेष्ठ आहे असे हे पुराणातले सांगणे या निमित्ताने माझ्या समोर येऊन गेले.
‘गर्जेल तो पडेल काय’ या म्हणीनुसार पावसाचा जोर लगेच कमी झाला. पुन्हा खोलीत आलो आणि अपेक्षेप्रमाणे दिवे गेले. इतक्या दुर्गम भागात वीज पोचवणे आणि पुरवठा सुरू ठेवणे हे एक आव्हानच असणार. त्यामुळे जोराचा पाऊस, एखादी लँड स्लाईड, जोराची बर्फवृष्टी अश्या घटनांनी तो खंडित झाला तर लवकर सुरू होणे अवघड असणार. वीज गेल्यावर सगळीकडे दाट अंधाराचे साम्राज्य पसरले. अगदी डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा तो काळा कुट्ट अंधार. पुन्हा झोप लागते न लागते तोच चमत्कार व्हावा तशी वीज पूर्ववत झाली.
पहाटे 5.45 ला आपसूकच जाग आली. उजाडले होते आणि सोटी खोला गावाचा पसारा आता लक्षात येत होता. आम्ही गावाच्या सुरुवातीच्या गेस्ट हाऊस मध्ये होतो. गावची वस्ती आमच्यापासून पुढे होती. एका बाजूला उंच डोंगर, घरांची एक रांग मग रस्ता मग घरांची दुसरी रांग मग नदी आणि पलीकडे पुन्हा उंच डोंगर असा हा परीसर. आमचे गेस्ट हाऊस श्री. हिमबहादूर गुरुंग याच्या मालकीचं होत. इथल्या लोकांची चेहरेपट्टी उठावदार, दोन्ही भिव्यांकडे निमुळते होणारे डोळे, वर तेली गालफडे आणि बसके नसलेले नाक, वर्ण गुलाबी गोरा. निखिलने म्हणल्या प्रमाणे आपल्याकडील देवींच्या प्रतिमेत इथल्या स्त्रियांच्या चेहऱ्याचा भास होत होता.
आवरून, नाश्ता करून 7.45 ला गणरायाचा जयजयकार आणि खंडोबाचा जयघोष करून निघालो. नदी काठाने जाणारा प्रशस्त रस्ता, अर्थात कच्चा. गावातल्या दुकानांमधून फळे, भाजी पाला मुबलक प्रमाणात विक्रीसाठी ठेवलेला दिसला. कपडे आणि खेळण्याचं एक दुकानही दिसलं. इथे इतकं सामानाची बाजारहाट करायला येत कोण असा प्रश्न आम्ही दिलीपला विचारला. नदी काठावर पुढे असलेल्या गावातून होणाऱ्या व्यवहारांसाठी इथूनच पुरवठा होतो असे त्याने उत्तर दिले.वाहन इथपर्यंत येत असल्याने इथपर्यंत माल आणणे तुलनेने सोपे आहे म्हणून या बाजाराला महत्व असणार. रस्त्याचे पुढचे काम पूर्ण झाल्यावर या गावचे महत्त्व कमी होईल का अजून वाढेल? सांगता येत नाही.मुळात या गावांमधून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला जोड म्हणून पर्यटन व्यवसाय बहरलाय हे इथे जाणवत होतं.
सोटी खोला या नाल्याआधी गावाची वस्ती आहे. गाव सोडल्यावर खोला लागला. तो दगडांवरून ओलांडून मध्यम चढवरून आमची मार्गक्रमणा सुरू झाली. आम्ही नदीच्या डाव्या किनाऱ्यावर होतो. थोड्याच वेळात उजव्या किनाऱ्यावर एक सुंदर जलप्रपात दिसला. घनदाट जंगलातून मध्ये दिसणारा त्याचा शुभ्र प्रपात बघत रहावा आणि त्याच्या पाण्याचा धबा धबा कोसळण्याचा गंभीर आवाज ऐकत रहावा असे वाटले. अनेक फोटो आणि व्हिडीओ काढून आम्ही प्रस्थान ठेवले. पुढे डाव्या-उजव्या बाजूला असे अनेक धबधबे लागले.प्रत्येकाची उंची वेगळी, पाण्याचा जोर आणि प्रवाहाची रुंदी वेगळी, आकार आणि नाद ही वेगळा. बुधी गंडकीच्या खळाळणाऱ्या गढूळ करड्या पाण्यात कोणी हिरवट पाण्याची, कोणी फेसणार्या शुभ्र पाण्याची तर कोणी स्वच्छ नितळ पाण्याची ओंजळ भरत होता. पुढे उजव्या तटावर एक सुंदर गाव लागले. डोंगर उतारावर गच्च भरलेली भाताची खाचरे, मधून मधून घरे, मागे उंचावरून कोसळणारे शुभ्र जल प्रपात आणि नदी उगमाच्या दिशेला असलेल्या मोठ्या धबधब्याखाली असलेले एक वीजनिर्मिती केंद्र असे दोन तीन हजार फूट उंच आणि पाचशे फुटाच्या रुंदीच्या उभ्या कॅनव्हासवरचे एक सुंदर चित्रवत गाव.
चालायला सुरुवात केल्यावर थोड्या अंतरावर नेपाळ आर्मी चा कॅम्प लागला. समोरून त्यांची एक कंपनी चालत येत होती. बहुधा सकाळच्या रापेटीला बाहेर पडले असावेत. सडपातळ शरीरयष्टीचे 20- 22 तरुण शिस्तीत चालत येत होते. त्यांनी या रूटवर बरेच ट्रेकर्स पाहिले असणार त्यामुळे त्यांना आमचे काहीच कौतुक नव्हते. तिथे उजव्या अंगाला चुल्हाणावर एकावर एक ठेवलेली तीन भांडी रटरटत होती. दिलीप ने सांगितल्यावर कळाले की तिथे रक्षी चे दिस्तीलेशन ची तयारी होती.
आमच्या चालायच्या रस्त्याच्या बाजूचे जंगल उंच वाढलेल्या वृक्षांचे आणि घनदाट असे. पक्ष्यांचे आवाज आणि मधूनच रातकिड्यांचा आवाज ऐकत आम्ही पावलं पुढे टाकत होतो. डिझेल इंजिनाच्या शिट्टी चा आवाज यावा तश्या आवाजाची आणि वेगळ्याच फ्रिक्वेन्सी ने परत वाजणारी शिटी वाजविणार्या एका टोळाची वस्ती एखाद्याच झाडावर ऐकू येत होती. त्याचा आवाज इतका एकसारखा येई की एखादे मशीन चालू आहे का काय याची शंका यावी.
सोटी खोला हुन पुढच्या गावासाठी सामान घेऊन निघालेले घोड्यांचे तांडे मागून आम्हाला गाठून पुढे गेले. त्यांच्या सरदाराच्या ठराविक शिट्टीची नक्कल करण्यात मजा आली. घोड्यांच्या प्रातर्विधी ने भरलेला रस्ता असल्याने पाऊल शक्यतो जपून टाकावे लागत होते. आमच्या पुढे एक विदेशातून आलेला ग्रुप गेला होता , त्या व्यतिरिक्त इतर कोणी ट्रेकर चढणारे किंवा उतरणारे आम्हाला भेटले नाहीत.
वाटेत एका ठिकाणी वरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे वाट वाहून गेलेली.त्यामुळे नदी पात्राकडे उतरून जाऊन पुन्हा चढून वाटेवर यावे लागले. थोडक्यासाठी झालेली ही दमछाक आवश्यक होतीच. हिमालयात फिरताना I वेळ नेहमीच येते.
दोन तासांनी एका निर्झरापाशी क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो. थंड पाण्याने चेहरा धुवून ताजेतवाने झालो. बरोबरचे त.ला./भू.ला. खाऊन उठलो आणि निघालो. भोपळ्याच्या घार्ग्याचा एक छोटासा तुकडा तिथे दगडावर पडला होता. तो काही मुंग्यांनी लगेचच हेरला होता आणि त्या कामालाही लागल्या होत्या. आम्हाला मुंग्यांच्या कार्य कर्तृत्वाचे कौतुक वाटत होते इतक्यातच पलीकडच्या दगडावरून एक सरड्याने तिथे झडप घातली, पहिल्याच झटक्यात त्याने तो तुकडा हलवणार्या बचकभर मुंग्या गिळंकृत केल्या आणि मग तो सरडा तो तुकडा उचलून पसार झाला. जिवो जीवस्य जीवनम चे काही क्षणातल हे नाट्य पाहून आम्ही स्तिमित झालो.
11.30च्या सुमारास नवली खोला या नाल्यापाशी जेवायला थांबलो. इथे एक लांब झुलता पूल आहे. जेवण करून एक तासाने पुढे निघालो. पुलाच्या मधोमध येऊन नवली खोला च्या प्रचंड प्रपाताचे फोटो काढले. अफाट उंचीचा हा जल प्रपात पाहताना गोकाकच्या धबधब्याची आठवण झाली.
आता आभाळ ढगांनी भरून गेले होते पण पाऊस लगेच पडेल असे वाटत नव्हते. आम्ही चालत होतो तो रस्ता नुकताच बनवला होता. बऱ्याच ठिकाणी ब्लास्टिंग करून डोंगर फोडून तो बनवलेला आहे हे दिसत होते. अगदी गेल्या वर्षी सुद्धा हा रस्ता नव्हता त्यामुळे इथे यायचे तर बरीच चढ उतार करावी लागायची असे दिलीपणे सांगितले, काही ठिकाणी त्याने पूर्वीचा रस्ताही दाखवला.
दुपारी दोनच्या सुमारास माच्छा खोला या ठिकाणी पोचलो. इथे बरीच गेस्ट हाऊसेस आहेत. त्यातल्याच दिलीपच्या माहितीच्या एका गेष्ट हाऊस मध्ये आमची व्यवस्था झाली. वाटेत लागलेल्या गावातून तरुण लोकांच्या हातात मोबाईल चे खेळणे दिसून
आले. शेतीची कामे करणारे कष्टकरी हातही दिसले. आईच्या पाठीवर टोपल्यात बसून कुतूहलाने आमच्या कडे। पाहत जाणारया गुबऱ्या गालांची मुले हे ध्यान आकर्षित करणारे दृश्य होते. पण एकूण कार्यक्रम अगदी निवांतपणाचे दिसले. माछा खोला मध्ये लहान मुलांबरोबर लंगडी, उंचीवरच्या उड्या खेंळणारी त्यांची ताई बघून आमचे बालपणातले खेळ आठवले. दुर्गम ग्रामीण जीवनाला शहरी धावपळीच्या कटकटी अजून शिवल्या नाहीत याचा मला आनंद झाला.
23 सप्टेंबर
माच्छा खोला मधल्या गेस्ट हाऊस मध्ये तिघांना एकच खोली होती. रात्री पाऊस पडला पण ढग आणि विजांचा कडकडाट नव्हता. गेस्ट हाऊस मध्ये गर्दी होती. त्यामुळे सकाळी 5 वाजताच उठून आवरले. नाश्ता करून 7.45 ला माच्छा खोला सोडले.
माच्छा खोला वर झुलता पूल आहे. गाव नदीच्या किनाऱ्याला मुख्य पायवाटेपासून जरा खाली असल्याने पुला पर्यंत पोचायला पुन्हा थोडे चढून जावे लागले. कालच्या पावसाने अगदी चिकचिक झाले होते. त्यातून घोडे आणि खेचरांच्या लिद मुळे सावधानतेने पावले टाकत आम्ही त्या पुला पर्यंत पोचलो आणि मग पूल ओलांडून पुढे निघालो. वाटेत बऱ्याच ठिकाणी डोंगर खचून रस्त्यावर आल्यामुळे त्या त्या भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते आणि त्यामुळे आमचे बूट इंच डीड इंच त्या शेण सड्यात बुचकळून बाहेर पडले. असे स्लाईड झोन आज बऱ्याच ठिकाणी लागले आणि त्यातून मार्ग काढावा लागला. वाटेत आसपास अनेक जातीची फुलपाखरे मजेत उडत होती. इथून आम्हाला समोर पहिल्यांदा हिमशिखरांचे दर्शन झाले. पूर्वेकडच्या गणेश हिमाल शिखराच्या आजू बाजूचे कोणते तरी तरी हे शिखर असावे.
माच्छा खोला सोडल्यावर तास दीड तासाने खोरला बेसी गाव लागले. बेसी म्हणजे शेती होते ती जागा ही माहिती आम्ही काल दिलीप कडून मिळवली होती. खोरला बेसी पाशी लहान मुले शाळेच्या गणवेशात शाळेत जाताना दिसली. 5-6वर्षाच्या लहानग्या मुलाच्या चड्डीत मागच्या बाजूला एक 60 पानी फुलस्केप वही दुमडून ठेवली होती, बस इतकेच दप्तर! त्याचा तो अवतार पाहून ‘आपल्या कडे शिक्षण तज्ज्ञांना सांगायला हवे, दर वर्षी दप्तराचे ओझे या विषयावर चर्चा करत असतात’ असे निखिलने सार्थ टिपण्णी केली. वाटेत येणाऱ्या व जाणाऱ्या घोड्यांच्या तांड्याना रस्ता सोडण्याची कसरत करावी लागत होती.
आजून एक तासाने आम्ही तातों पानी पाशी पोचलो. डोंगराच्या पोटातून येणारा गरम पाण्याचा झरा चांगली अर्धा इंच व्यासाची दगडी पन्हळ तयार करून एक उघड्या न्हाणी घरासारख्या उघड्या चौकात सोडली आहे. त्याच्या शेजारीच दीडदोन फुटावर अश्याच एका दगडी पन्हाळीतून एकदम थंड झरा वाहतो आहे! निसर्गातले असे चमत्कार अनुभवायला मजा आली.तातों पानी हे गाव कसले?इनमिन दोन घरे आणि एक गेस्ट हाऊस. तसे या मार्गावरचा हा काही राहण्याच्या वेळेत येणारा थांबा नाही मग या गेस्ट हाऊस मध्ये कोण राहत असेल असा प्रश्न पडला.
तातों पानी नंतर आम्ही बुधी गंडकी नदी ओलांडली आणि मग चढ लागला. थोड्या वेळाने श्याली भट्टी नावाचे एक लहानगे गाव लागले. ते ओलांडून पुढे रस्ता पुन्हा नदीच्या पात्रापर्यंत खाली उतरला. नदीच्या पाण्याचा वेग अफाट आणि त्याचा घुमणारा आवाज इतका होता की जवळच्या माणसाबरोबर संभाषण शक्य नव्हते. थोडा वेळ नदी काठाने पायपीट केल्यावर मग पुन्हा चढ लागला. बारा वाजता वाजता दोवन गाव आले. आम्ही तिथे जेवायला थांबलो. समोरच शाळा होती, म्हणजे शाळेची इमारत होती. आम्ही ज्या रेस्टरन्ट मध्ये बसलो होतो त्याच्या समोरच्या घरात टीव्ही लागला होता आणि त्यासमोर शाळेतले सगळे विद्यार्थी , म्हणजे 6 ते 7 च असतील, आणि तिथले अबालवृद्ध कोणतातरी नेपाळी सिनेमा बघण्यात गुंगले होते. काहीं स्त्रिया घोळका करून गप्पा मारत होत्या. त्या घरच्या कर्त्या स्त्रीची मात्र आमच्या जेवणाच्या ऑर्डर ची तयारी लगबगीने सुरू होती. एक नुकतंच पाय फुटलेला छोकरा आमचं लक्ष वेधून घेत होता. त्याला त्या घराच्या पायऱ्या उतरून खाली येऊन बागडण्याची इच्छा असावी. घोळक्यातले सगळे आपापल्या मनोरंजनात गुंतले होते त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे फारसे लक्ष नव्हते. टीव्ही वरचा सिनेमा संपला तशी गणवेशतली मुले सैरभैर झाली पण शाळेच्या इमार्टिकडे मात्र गेली नाहीत. आमचे जेवण आले आणि आम्ही बाह्या सरसावून त्यावर तुटून पडलो. थोड्याच वेळात एक तरुण आणि एक मध्यमवयीन स्त्री तिथे पोचले. त्या तरुणाच्या पाठीवर वेताची विणलेली टोपली होती आणि त्यात त्याचा 8-9महिन्याचा बाळ निवांत पहुडला होता. त्या गेस्ट हाऊस च्या पायऱ्यांवर ते विसावले. बहुदा आसपासच्या गावतलेच असावेत. तो बाळ त्या मध्यमवयीन स्त्री, कदाचित ती त्याची आजी असावी, च्या मांडीवर बसून दिसेल ते तोंडात घालायचा प्रयत्न करू लागला. गेस्ट हाऊस मधल्या एका स्त्रीने शीत पेयाच्या दोन बाटल्या त्या तरुणाच्या टोपलीत ठेवल्या. त्या तरुणाने पैसे देऊ केले ते तिने नाकारले. बहुदा ते सर्व गोतावळ्या तले असावेत. इथे नाते संबंध करताना माहितीत, शक्यतो आसपासच्या गावतलेच होत असावेत कारण सर्वच गावात आणि सर्वच गेस्ट हाऊसेस मध्ये स्थानिकांचा वावर, आणि घरात आतपर्यंत सहज शिरकाव होताना दिसला. भाषा अर्थातच समजत नसल्याने त्यांचे संभाषण कळत नव्हते.
त्या मध्यमवयीन स्त्रीच्या मांडीवर बसलेल्या त्या चिमुरड्याने नैसर्गिक विधी उरकला पण त्या बाईने आणि तिच्याशी गप्पा मारणाऱ्या इतर बायकांनी त्या चिमुरड्याची चड्डी लगेच बदलण्याची तसदी वगैरे घेतली नाही. आजीबाईनी आपल्या नातवाला मांडीवर घेऊनच एक बिडी सुद्धा शिलगावली! मग त्यांची निघायची वेळ झाली तेव्हा त्या बापाने आपल्या मुलाला पाठीवर घातले आणि आजीने एका उबदार चादरी चा खोळ करून आपल्या नातवाला त्यावर बसवून त्याची त्रिकोणाची दोन टोके मुलाच्या हाती दिली. ओनव्या झालेल्या त्याने त्याची गाठ गळ्याशी बांधली आणि त्या चिमुरड्याची छान सीट तयार झाली. आजीबाईंनी बरोबरचे समान त्या टोपलीत भरले आणि राम करून ते दोघे पुढच्या प्रवासाला निघून गेले.
आमचे जेवण संपता संपता बाहेर पावसाने झोड उठवली. आमच्या गाईड व पोर्टर्स चे जेवण झाल्यावर आम्ही निघण्याची तयारी केली. तिथे जमलेले सगळे लोक इतक्यात बाजूच्या व्हरांड्यात स्थानापन्न झाले. एका म्होरक्याकडे कसले पत्र होते ते त्याने सर्वांना वाचून दाखवले आणि मग त्यांची त्यावर चर्चा सुरू झाली, चर्चेत एका टोकाला बसलेल्या महिला भाग घेत होत्या हे पाहून चांगले वाटले. छोट्याश्या ग्रामसभेचे ते स्वरूप असावे.
अंगावर रेनकोट चढवून आम्ही पुढे निघालो. आमचा रस्ता पुढे दूरवर उतरत नदी पात्राकडे उतरताना दिसत होता. बुधी गंडकी आता आमच्या डावीकडे होती आणि आम्ही तिच्या अत्यंत अरुंद अश्या घळीकडे निघालो होतो. वाटेत एक सुंदर प्रपात लागला. तो इतक्या उंचीवरून कोसळत होता की खाली पोचताना पाण्याचे फक्त तुषार पोचत होते. त्याच्य जवळ पओचताना एक तपकिरी रंगाचा सर्प आम्हाला आडवा गेला. इथे कमी उंचीवरच्या जंगलात साप असणारच, पण हिमालयात सापाचे दर्शन पहिल्यांदाच झाले.
आता पर्यंत आणि आज या पुढेही डोंगराच्या बाजूने बराचसा प्रवास हा लँड स्लाईड वरून होत होता.चढून मिळवलेली जवळपास सगळीच उंची रस्त्याच्या उताराने पूर्ण घालवून आम्ही पुन्हा पदी पात्रापाशी घनदाट जंगलात शिरलो. नदी शेजारून अरुंद वाटेने आमची पायपीट सुरू होती. पाण्याचा आवाज वाढत चालला होता. नदीच्या उगमाकडे नजर टाकल्यावर ती कुठे वळणार आहे त्याचा अंदाज येतो, तसे त्या अरुंद घळीतून पाहिले तर समोर उंचावरून जोरात फेसाळत येणारी नदी दिसली. तिचा तो उतार बघून क्षणभर छाती दडपली, हा वेगळाच अनुभव होता. आमची पायवाट नदीला डावीकडे ठेवत जंगलातल्या चढाला लागली. झाडी इतकी घनदाट होती की नदी च्या प्रवाहाचे दर्शन मधूनच होई. पण प्रवाहाच्या आवाजावरून त्याच्या आवर्त होण्याचा आणि दगडांना आदळत पूढे जाण्याचा अंदाज येत होता. अर्धा पाऊण तासाच्या चढणीनंतर आम्ही जंगलातून बाहेर पडून जरा सपाटीवर आलो. डावीकडे नदीचे विस्तीर्ण वाळवंट पसरलेले दिसत होते. पाण्याची गती तुलनेने अतिशय संथ होती, जणू काही पुढे पूर्ण वेगाने कोसळण्याची ते तयारी करत असावे. एक अतिशय अद्भुत असे ते दृश्य आणि अनुभव होता. इथे यारू नावाचे गाव लागले. सायंकाळचे 4.30वाजले होते आणि जगत अजून दीड तासांवर होते त्यामुळे आम्ही चहासाठी थांबलो. हॉटेलमधून नदीचे विस्तीर्ण वाळवंट दिसत होते. दोहो बाजूला उंच कातळकड्याचे डोंगर, उजव्या बाजूने येणारा यारू खोला आणि त्यावरचा पूल आणि दूरवर समोर पुन्हा अरुंद होत जाणारे नदी पात्र, डोंगराच्या ठराविक उंचीवर ढगांचे छप्पर असे ते दृश्य आम्ही डोळ्यात साठवत होतो. या खोऱ्यात 2015 च्या प्रलयंकारी भूकंपात खूप हानी झाली. बऱ्याच वाटा वाहून गेल्या. तशीच इथून पुढे जाणारी वाटही वाहून गेली. नदीच्या या विस्तीर्ण पात्राच्या दोन्ही बाजूला उंच कडे असल्याने मग एका ठिकाणी स्वीस सरकारच्या मदतीतून कड्यावरचा पूल बांधला गेला. अभियांत्रिकी मधील एक उपलब्धी असे त्याचे वर्णन करता येईल. आमची वाट त्या पुलावरूनच जाणार होती हे समजल्यावर आम्ही अधिकच उत्साहात पुढे मार्गक्रमणा सुरू केली.
शेजारच्या एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती चक्क जात्या वर बार्ली चे धान्य दळत होता. दगडी जाते हे आधुनिक शहरी जीवनातून हद्दपार झालेल उपकरण मी पहिल्यांदाच चालू स्थितीत पाहिलं आणि त्याचा व्हिडियो घेतला. बरोबरच्या स्थानिकांना त्याचे विशेष वाटले! जात्याला नेपाळी भाषेत सुद्या जाते असेच म्हणतात ही माहिती तिथे मिळाली.
अर्धा तास चालल्यावर आम्ही यारू खोला वरच्या झुळत्या पुलावर पोचलो. आणि मग पाच दहा मिनिटात क्लिफ ब्रीज वर पाय ठेवला. डोंगराच्या कड्यावर भक्कम खिळे ठोकून हा 190 मिटर लांबीचा पूल बनवला आहे. खाली साधारणपणे 100 फुटावर नदीचे पात्र आहे. पुला वरून जाताना समोरून घोड्याची रांग आली तर वाट मोकळी करून देण्यासाठी ठिकठिकाणी साज्जे काढले आहेत. चांगला विचार करून केलेलं हे काम आहे.
या पुलावरून पुढं आल्यावर मग थोडयाच वेळात आम्ही झुलत्या पुलावरून नदी ओलांडली आणि एक सरळसोट पायऱ्यांचा चढ पार करून जगत कडे निघालो. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जगत गावात पोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. जगत ला पहिले चेक पोस्ट आहे जिथे सर्व परमिट चेक करून नोंद केली जाते. आमचे गेस्ट हाऊस मनासलू कोनसर्वेशन एरिया च्या या चेकपोस्ट शेजारीच होते. आज जवळपास 27-28 किमी चालणे झाले. जगत गाव 1410 मीटर्स उंचीवर आहे आणि माच्छा खोला पासून आम्ही 500 मीटर्स चढून आलो अर्थात मधले चढ उतार धरले तर एकूण चढ नक्कीच किती तरी जास्त झाला असणार.
24 सप्टेंबर
सकाळी 7.45 वाजता जगत सोडले. जगत चा पसारा मोठा आहे. भात, गहू आणि मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर दिसली. जगत गाव सोडल्यावर जगत खोला झुलत्या पुलावरून ओलांडला. डोंगरातून वेगाने येणारे जगत खोल्याचे नितळ स्वच्छ पाणी मधल्या एका मोठया शिळेच्या दोहो बाजूने उपरणे घालावे तसे शुभ्र धबधब्याच्या रूपाने खाली कोसळत होते. पुढे जाऊन पुन्हा एक होऊन गढूळ बुधी गंडकीच्या पाण्यात मिसळून जात होते. पानी रे पानी तेरा रंग कैसा? जीसमे मिलाये जाय उसके जैसा। ही ओळ किती सार्थ आहे नाही का? हीच आठवण गेल्या वर्षीच काँगमारु ला उतरताना बघितलेले पाण्याचे रंग बघून झाली होती.
जगत खोला ओलांडून पुढे डोंगर उतारावर आलो ते एक दिव्य करण्यासाठी. इथली वाट वाहून गेल्यामुळे बाजूच्या कातळकड्याच्या भिंतीत खणून वाट केली आहे आणि त्याच्या नदीकडे लोटून दिलेल्या दगडांवरून आमचा मार्ग उतरत होता. अश्या प्रकारे मार्ग बनवण्याचे काम जागोजागी होताना दिसलले आणि त्यासाठी अनेक ठिकाणी कॉम्प्रेसर्स आणून ठेवलेले दिसले. कड्यावरच्या खणलेल्या पाचरित ते कसे नेले असतील हे समजले नाहीच, ज्यांनी कोणी ते दिव्य केले असेल त्यांच्या प्रयत्नांना अक्षरश: दंडवत घालावेसे वाटले. असल्या अशक्यप्राय गोष्टी करण्यासाठीच परमेश्वराने माणसाची निर्मिती केली असावी आणि म्हणूनच हे पाहून अधिकाधिक आव्हाने त्याच्यासमोर वाढून ठेवत असावा. ग्लोबल वोर्मिंग वगैरे मूळे होणारे बदल, भूकंप, प्रलय, त्सुनामी इत्यादी ही आव्हाने समजणारा माणूस हा त्याचा अवतार म्हणूनच त्याला प्रिय असावा…
आम्ही थोडीशी उतरण उतरलो आणि अचानक समोरून घोड्यांची रांग आली. खणून काढलेल्या डोंगर कड्यात एक छोटीशी पोकळी झाली होती त्यामध्ये निखिल आणि मी पाय मुडपून बसलो आणि घोड्यांना वाट करून दिली. आमच्या त्या कृत्यामुळे घोडे वाल्याच्या आणि त्या बरोबरच्या दोघा स्थानिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. इतर कोणी स्थानिक माणूस असता तर इतका घाबरला नसता असा स्पष्ट भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसला.
कड्यावरचा हा उतार उतरून पुन्हा आम्ही नदी पात्रा जवळ आलो. पुढे एक तासाने साल्लेरी गाव लागले. हेही गाव मोठे होते. भात, गहू, मिलेटची शेती दिसली. सल्लेरीच्या पुढे साल वृक्षांचे कृत्रिम जंगल लावलेले दिसले. त्यावरूनच या गावाला हे नाव मिळाले असावे. समोरच्या डोंगरांमध्ये ढग अडकून पडले होते आणि वर निळ्या आकाशाचा एक चतकोर तुकडा दिसत होता. उजवीकडच्या डोंगर माथ्यावरून ढगांचा पापुद्रा बाजूला करत सूर्य हलकेच डोकावला तेव्हा पाठीवरच्या सॅक वर टांगलेला टॉवेल आज वाळेल अशी आशा वाटली. पण हे सुख फार काळ टिकले नाही. ढगांच्या दाटीपुढे सूर्याने सुद्धा माघार घेतली.
पुढे एका डोंगररांगेवरचा खडा चढ चढलो आणि त्या रांगेच्या कडेने पुढे निघालो. वाटेतील एक भाग चक्क मातीचा भराव घालून तयार केला होता आणि तसा भराव टाकण्याचे काम चालू हकते. हा भराव खचता तर सरळ दोन तीनशे फूट खाली नदीपर्यंत घसरून पडायला कोणतीच आडकाठी नव्हती!
पुढे सीर्दी बास नावाच्या गावच्या आधी उतार लागला. डाव्या वाजुच्या पाषाणाच्या उतारावर मध्येच कारंजे उडताना दिसले. अंतर्गत झऱ्याला तिथे बाहेर पडायला वाट मिळाली होती, त्याचे थंड पाणी पिऊन आम्ही आमची ठाण भागवली आणि लवकरच सीर्दी बास गावात प्रवेश केला. गावाला सुंदर प्रवेशद्वार होते आणि तिबेटी पद्धती प्रमाणे त्या प्रवेश द्वाराच्या छतावर सुंदर चित्रे रंगवलेली होती. प्रवेशद्वारात पळत आलेल्या लहान मुलांनी आमचे स्वागत केले.
जगत गावापासून आम्हाला तिबेटी बौद्ध प्रतीके दिसू लागली. त्या खालच्या गावात प्रामुख्याने हिंदू लोक राहतात आणि इथून पुढे प्रामुख्याने तिबेटी बौद्ध लोक राहतात असे दिलीपणे सांगितले. रस्त्यानं जाताना मध्ये असलेले तोरचें मधोमध ठेवलेले दगडाच्या पाटीवर सुबक आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेले मंत्र, ज्याच्या डाव्या बाजूनेच जावे असा एक अलिखित नियम असतो, ही प्रतीके आधी दिसली नव्हती. घरांवर, गावाजवळ बौद्ध पद्धतीचे ब्रह्मध्वज ज्या मध्ये वर पासून खालपर्यंत निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा हे रंग आणि ध्वजस्तंभावर कळस हे लावलेले दिसत होते. गावांमधील रस्ते हे दगडी पण अत्यंत चिखळाललेले, त्यातच खेचरांच्या शेणा मूतीचे मिश्रण होऊन एक उग्र दर्प येत असलेले. पावसाच्या सरी येत असल्याने सर्वत्र ओल पण वातावरणात एक प्रकारचा आल्हाददायक उत्साह होता. सीर्दी ही इथली एक जमात आहे अशी माहिती आम्हाला दिलीप ने दिली.
सीर्दी बास सोडून अर्धा एक तास चालल्यावर घट्टे खोला गाव लागलं. त्याच्यानंतर लगेचच झुलता पूल होता. त्या वरून झुलत झुलत आम्ही बुधी गंडकी ओलांडली. आजचे हे पहिले नदी उल्लंघन. आज डेंग गाव येण्याआधी अजून दोनदा ऐल तीर-पैलतीर हा खेळ करायचा होता. नदी ओलांडल्यावर डोंगर धारेवरचा सरळ चढ लागला. एक वयस्क स्त्री पाठीवर विणलेली टोपली घेऊन तो चढ चढत होती. त्या टोपलीत एक माठाच्या आकाराचे पात्र आणि त्यावर चांगले घट्ट लावलेले झाकण होते. तरीही त्या पात्रात असलेल्या रक्षीच्या वासाचा घमघमाट पसरला होता. इथे हवामान थंड ते अति थंड असे बदलते म्हणून का काय रक्षी हे स्थानिक लोकांसाठी निषिद्ध पेय नाही.
सलग चार पाचशे फूट चढून आल्यावर 1560 मीटर्स उंचीवरच्या फिलीम गावी पोचलो. डोंगराच्या उतारावरचे हे गाव. मोबाईलच्या ऍक्सेसरीज, पॉवर टूल्स बिकण्याचे दुकान इथे दिसले. रस्त्यावर डावीकडचे वळण घेतले तर लुकला ची आठवण करून देणारे एक रेस्टरन्ट दिसले. अगदी तसेच फुलांचे ताटवे, गोल टेबल आणि त्याभोवती मांडलेल्या खुर्च्या. तिथे थांबून आम्ही जुन्या आठवणी ना उजाळा देत चहा घेतला. मालकीण बाईना तोडकें मोडके हिंदी येत होते. त्यांचे वडील आर्मीत असताना सिक्कीम मध्ये होते आणि तिथेच त्यांचा जन्म झाला, त्यामुळे जन्माने त्या भारतीय होत्या असे त्यांनी आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर सांगितले. फिलीम च्या चेक पोस्टवर आमची नोंदणी करून आम्ही पुढे निघालो.
एकले भट्टी गावी आम्ही जेवायला थांबणार होतो. एकले भट्टी ला जाण्यासाठी दोन तास पायपीट केली, दोन नाले ओलांडले आणि त्यासाठी उतार व चढ करावा लागला. एकले भट्टी दिसायला लागले आणि समोरून घोड्याची फौज आली. त्यांना वाट करून द्यायला मी उजवीकडे एका दगडावर चढलो. खाली उतरताना माझा डावा हात एका कोरंटीसारख्या झाडाला लागला मात्र असंख्य सुया टोचाव्यात आणि दंश व्हावा असे वाटले. जिथे त्या झाडाचा स्पर्श झाला तिथे भयानक आग होऊ लागली. तसेच चालत एकले भट्टी गाव गाठले. वेदना हळू हळू कमी झाली होती पण दंश झालेल्या ठिकाणी सहा सात जागी चांगलेच पुरळ उठले होते. या झाडाला नेपाळी भाषेत शिषणा असे म्हणतात, अर्थातच ते विषारी असते. डेंग ला पोचून मलम लावे पर्यंत हाताचा तो भाग झोंबत होता.
एकले भट्टी या गावात बर्फाळ पाण्याचा झरा आहे म्हणून त्याला चिसो पानी असेही नाव आहे. आम्ही तिथे जेवायला थांबलो. उत्तम असे नेपाळी थाळी चे जेवण आणि त्या बरोबर थंड पाणी पिऊन तृप्त होऊन पुढे निघालो. आता पुढे दोन तासांवर पेवा गाठायचे होते. समोरची वाट डोंगररांग उतरत नदीच्या अरुंद घळीकडे जाताना दिसत होती. नदी पात्रजवळ आल्यावर उजवीकडे चुम कडे जाणारा एक रस्ता लागला. आमची वाट डावीकडे खाली उतरून एका लोखंडी पुलावरून नदी ओलांडणार होती. इथे नदीची घळ अगदीच अरुंद म्हणजे जेमतेम चाळीस फुटाची होती आणि त्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड वाढला होता. पूल ओलांडून पुन्हा दोन तीनशे फुटाचा चढ लागला. सूची पर्णी वर्गातले चीड चे वृक्ष दिसायला लागले. हा चढ संपतो तर आम्ही न्याके फेदि नावाच्या वस्ती पाशी पोचलो. डावीकडे जाणारा रस्ता अफाट उंच चढत न्याके गाव ओलांडून पेवा ला उतरत होता तर सरळ जाणारा रस्ता खाली जंगलात उतरून नदी दोनदा ओलांडून पेवा गावात जाणार होता. आम्ही सरळ जाणारा रस्ता निवडला आणि उताराला लागत जंगलात शिरलो. नदीने डावीकडे वळण घेतले आणि त्या अरुंद घळीतल्या पुलावरून नदी ओलांडली. बांबू आणिनीतर तरहतर्हेचे वृक्ष असलेल्या त्या जंगलातून तासभर चालत गेल्यावर पुन्हा एक पूल लागला ज्यावरून आम्ही ऐलतीरावर आलो. वाटेतले जंगल एकट्या दुकट्याने जायला भीतीदायक वाटले त्यात आम्ही गेलो तेव्हा एकही वाटसरू तिथून जाताना भेटला नाही! दुसरा पूल ओलांडून पुढे आल्यावर पेवा नावाची दोन घरांची वस्ती लागली. सायंकाळचे पावणे पाच वाजले होते आणि हळू हळू अंधार होऊ लागला होता. पेवा ला थांबून आम्ही चहा घेतला आणि पूढे निघालो. पुन्हा चढ सुरू झाला. सुमारे तासभर चालल्यावर डोंगराच्या सोंडेवर माचीसरख्या जावेत वसलेले डेंग गाव दिसले. तिथे पोचलो तेव्हा साडे सहा वाजले होते. वैद्य आणि दिलीप आणखी अर्ध्या तासाने पोचले. आज मी रन टेस्टीक चा वापर केला. त्याच्या नुसार आज 19 किमी अंतर पार केले होते आणि 1362 मीटर्स ची एकूण चढाई करून 1810 मीटर्स वर पोचलो होतो.
25 सप्टेंबर
सकाळी पावणे आठ ला डेंग चे गेस्ट हाऊस सोडले. लगेचच नदी ओलांडून चढायला सुरुवात केली. दोन तीनशे फूट चढून गेल्यावर राणा गाव लागले. डोंगर उतारावरचे राणा गाव ओलांडून पुढे चढत गेलो आणि पुढे बीही फेदि गाव लागले. बीही फेदि गावात आम्ही चहा घेतला आणि गॅप गावाकडे निघालो. आता आम्ही डोंगराच्या शिखर आणि नदीपात्र याच्या मधल्या माचीवरच्या उंचीवरुन चालत होतो. बुधी गंडकीच्या विस्तारात भर घालणारे एक एक नाले आम्ही मागे टाकत गेलो होतो त्यामुळे तिचा प्रवाहही कमी झाला होता आणि आम्ही उंचावर असल्याने प्रवाहाचा आवाजही कमी झाला होता. पण आता नदीचा उतार मात्र वाढला होता. चढ उतार करत जाताना एक विस्तीर्ण पठार लागले. तिथे मक्याची शेती होती, पीक येऊन गेले होते आणि मक्याचे वाळके सोट उभे होते. गेल्या चार दिवसाच्या प्रवासात गाय हा प्राणी आम्ही पहिल्यांदाच तिथे पहिला. मग वाट पुन्हा उतरायला लागली. दोन तासाने गॅप ची पाटी लागली. तिथे लागलेले पाहिले गेस्ट हाऊस बंद होते. आमचे पोर्टर गाडी विकास आणि जनकही दिसेनात.आमच्या पुढे आमच्या बरोबर ट्रेक करणारा एक अमेरिकन महिलांचा ग्रुप चालला होता. त्यांचा गाईड लाकपा शेर्पा मागे होता. त्याला विचारले की गॅप गाव संपले का काय? आम्ही जिथे होतो तिथून पुढे दहा मिनिटांवर बुधी गंडकीवर पूल होता आणि त्यानंतर खरे गॅप गाव लागणार होते. आधीची पाटी ही जणू वेशिवरची होती. गॅप च्या आधीचा पूल फारतर 25 फूट लांबीचा होता आणि नदीचा प्रवाह तितक्यात मावत होता इतका कमी झाला होता. पूल ओलांडून पुढे गेल्यावर जनक भेटला. आम्ही जेवायला थांबणार होतो ते रेस्टरन्ट पुढे होते. गावातल्या दगडांच्या रस्त्याने शेतीवाडी कडेने जाताना गावाचा विस्तार लक्षात आला. एका मक्याच्या शेतात बुजगावणे म्हणून चक्क एक मेलेला कावळा लटकवला होता हे बघून मजा वाटली. स्केअर क्रो चे शब्दश: भाषांतर केलेले वाटले मला ते! तिथेच मागे शाळेची मोठी इमारत होती. गॅप्फ ही इथली एक जमात, त्यांच्यासाठी बांधलेली ही शाळा 2018 पासून सुरू झालेली होती. सध्या या परिसरात शाळांच्या परीक्षांचा काळ आहे असे कळले.
गॅप गावी जेवून पुढे निघालो. आता तीन तासांवर नामरुंग गाव लागणार होते आणि तिथे आमचा मुक्काम असणार होता. पण त्याआधी आम्हाला जवळपास चारशे मीटर्स चा चढ पार करायचा होता. लवकरच आम्ही सुचिपर्णी च्या जंगलात शिरलो. चढ सलग आणि अंगावरचा होता. रास्त्याने वर्दळ अगदीच नगण्य होती. तास भर चालल्यावर पूर्ण जंगलात के.एम.एस.पी.हॉटेल नावाचे एकमेव हॉटेल लागले. बुधी गंडकी ला मिळणारा एक नाला इथून पलीकडेच वाहत होती. तिच्या पलीकडल्या तीरावर लावलेली सोलर पॅनल अगदी उडीच्या टप्प्यात होती. या हॉटेलच्या नावात स्टोन ब्रीज पीस हॉटेल असे होते. क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पूढे निघालो, लगेचच एक झुलता पूल लागला. उजव्या बाजूला खाली एक नैसर्गिक दगडी कमानीचा पूल दिसला. त्या कमानी खालून तो नाला रोरावत वाहत होता. एक वेगळाच अनुभव होता तो.
मग पूढे जंगलातून चढ सुरू झाला. सलग एक तास चढाई केल्यावर जंगलातच एक तिठा लागला. डावीकडची पायवाट निमल गोम्पाकडे जाणारी होती. सरळ जाणाऱ्या वाटेवर दगडी पायऱ्या दिसत होत्या आणि उजवीकडची कच्ची पाऊलवाट समतल जंगलातून निघाली होती. सरळ चढणाऱ्या आणि उजवीकडे जाणाऱ्या वाटेला पाटी नव्हती. घनदाट जंगल आणि विचारायला कोणीच नाही. आम्ही थोडा वेळ थांबलो. समोरच्या मोठ्या शिलाखंडावर शेवाळे साचले होते. तिथे आणि आसपासच्या झाडांवर चिमणीच्या आकाराचे पक्षी कलकलाट करत बागडत होते. वाटेत अनेक रंगाचे पक्षी इकडून तिकडे उडतांना आणि किलबिलाट करताना दिसले होते पण सगळेच एकजात लाजाळू. कॅमेरा काढे पर्यंत लगेच पसार होत. नाही म्हणायला काही फुलपाखरे आणि एक दोन पक्ष्यांचे फोटो घेता आले होते.
थोडा वेळ थांबून मग आम्ही सरळ चढत जाणारी वाट निवडली आणि दोघेच चालत 3580 मीटर्स पर्यंत चढून गेलो. नामरुंग च्या खुणा एव्हाना दिसायला हव्या होत्या पण काही दिसेना. सुमारे 45 मिनिटे चालल्यावर नदीच्या पालिकडपर्यंत बांधलेली पताकांची एक माळ दिसली आणि मग रस्ता नामरुंग कडे उताराला लागला. नामरुंग मोठे आणि श्रीमंत गाव वाटले. सुरुवातीलाच नुब्रि हॉटेल्स प्रा.ली. चे प्रशस्त रिसॉर्ट लागले. पुढे जाता नामरुंग गेस्ट हाऊस मध्ये आमची व्यवस्था होती. सुमारे 20 मिनिटात वैद्य आणि दिलीप पोचले. आम्ही सोडून दिलेली पायवाट ही अजिबात चढ नसलेली नामरुंग ची वाट होती! फक्त नामरुंग जवळ एक लँड स्लाईड झोन मधून ती येत होती इतकेच. आजही एकूण 1000 मीटर्स ची चढाई झाली आणि आम्ही 2635 मीटर्स उंचीवर पोचलो. आजचे चालणे 15 किमी झाले. आता सगळीकडे चीड आणि देवदार ची झाडे दिसू लागली आणि हवेतला गारठाही वाढला होता.
26 सप्टेंबर
सकाळी 5.30 ला नामरुंग ला जाग आली तेव्हा समोरच्या डोंगर माथ्यावर कालच्या पावसाच्या वेळेस ताजे बर्फ पडलेले दिसत होते. हवा गार पण प्रसन्न होती. नाश्ता करुन पावणे आठला नामरुंग सोडलं. आज समागाव ला पोचायचं होत आणि निम्या वाटेत कुठून तरी मानसलू शिखर दिसायला सुरुवात होणार होती.
थोड्याच वेळात डोंगराचा उतार बऱ्यापैकी कमी झाला आणि एकर अन एकर पसरलेले गव्हाचे शेत लागले. तिथं एक दोन पडकी घरे होती. बहुदा नामरुंग ला राहून इथे येऊन शेती करत असावेत. त्या शेतीच्या कडेनेच चिखळाललेली वाट तुडवत पुढे गेल्यावर बारझाम नदी नावाचे गाव लागले. इथेही विस्तीर्ण पसरलेली गव्हाची व भाताची शेती होती.
बारझाम नदी सोडल्यावर चढ सुरू झाला. तबबल 2 तास आणि 270 मिटर्सच्या खड्या चढाईनंतर आम्ही 2900 मीटर्स उंची गाठली. आम्ही निघालो तेव्हा खाली व्हॅलीत अडकून पडलेले ढग दिसत होते. ते आता आमच्या मागोमाग येत होते. ढगांनी आमच्याशी पाठशिवणीचा खेळ मांडायचा आणि त्यांनी आम्हाला अर्ध्याच वाटेत बाद करण्याचा आजचा पाचवा दिवस होता. आम्ही आता लिही या गावी पोचलो होतो. चढ संपता संपता लिही ची प्रवेश कमान लागली. डाव्या बाजूला शेती होती आणि चांगले तारेचे कुंपण घालून ती राखली होती. आता आम्ही माचीच्या पठारावर पोचत होतो. ढगांनी मागून आक्रमण केले आणि लवकरच माचीचा तो खळगा ढगांनी व्यापून टाकला. आपल्या कडे महाबळेश्वर ला वेण्णा लेक जवळ ढगांचे असे आक्रमण मी पूर्वीही अनुभवले होते त्याची इथे आठवण झाली. पहिल्याच लागलेल्या “चिया पसल” म्हणजे टी स्टॉल पाशी आम्ही थांबलो. गावात पूर्ण सामसूम होती कुठेही हालचाल दिसेना. हाकाटी केली. राजकुमार या हिरो सारखा दिसणारा आणि बारीक मिशी असलेला एक नेपाळी कृषक कमरेला लावलेला विळा सांभाळत आला. भाषेची अडचण असली तरी चहा हवाय हे सांगण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानं हॉटेल मालकाला हाक मारून बोलावलं आणि तो हसत हसत त्याच्या कामाला निघून गेला. पाठोपाठ वैद्य आणि दिलीप आले. काळा चहा चे कप समोर आले आणि साखर ढवळण्यासाठी चमच्याचे ऐवजी चक्क बॅटरीवर चालणारी छोटी हँड मिकसी त्यानं दिली!विशेष कौतुक वाटलं. चहा पिऊन पुढे निघालो, पुढचं गाव होतं श्यो आणि तिथे एक तासात पोचणे अपेक्षित होत.
लिही सोडल्यावर डोंगर रंगांच्या पदरात लपलेला एक पूल ओलांडला. विवीध रंगी छोटी फुले आणि लाल छान्या मन्या बोरांसरख्या बेरीज दिसायला लागल्या. मग डोंगर रांगेच्या काठाने जात श्यो गाव लागलं. या गावात विशेष असं काही नव्हतं. श्यो गाव ओलांडल्यावर उजव्या हाताच्या नदी पलीकडच्या डोंगर माचीवर गोम्पा सारखे काही बांधकाम दिसले. त्याच्या पासून थोड्या अंतरावर उंच डोंगर माथ्यावरून येणारा झरा वाहत होता. त्या झऱ्याने तो डोंगर जणू कापून काढला होता इतकी त्याची घळ चिंचोळी दिसत होती. कालपावेतो च्या रस्त्यात जेव्हा जेव्हा पलीकडच्या नदी काठाचे निरीक्षण करण्याचा योग येई तेव्हा एक गोष्ट लक्षात आली होती. डोंगराच्या या कातळ भिंतीवर घुमटाकार पाणी वाहिल्याच्या खुणा बऱ्याच वर उंचावर पर्यंत होत्या. स्वाभाविकपणे बुधी गंडकी नदी कधी तरी पुराणकाळी या उंचीवरून अशीच फेसाळत वाहत असणार. हळू हळू पात्र खणत खणत ती आजच्या उंचीवर आली आणि आणखीन हजारो वर्षात ती आणखीन पताळाकडे जाईल. नदीच्या पात्रात बऱ्याच ठिकाणी मोठं मोठे शीला खंड पडलेलेही दिसले. डोंगराच्या माथ्यावरून बऱ्याच वेळेस होणाऱ्या लँड स्लाईड चा हा परिणाम असणार. काही इतके मोठे असत की नदीचा मार्ग अवरुद्ध करण्याचे साहस दाखवणारे. पण पाण्याची गती रोखायला आणि वळवायला भगिरथच हवा! पाण्याचा प्रवाह त्या पाषाणाच्या बाजूने मार्ग काढत निघून गेला होता आणि वर्षानु वर्षाच्या कलखंडानंतर त्याचे सर्व कंगोरे तासून गुळगुळीत करत त्याचे गोटे होणार होते!
श्यो नंतर आता वेध लागले होते ल्हो गावचे. इथे आम्ही जेवण करायला थांबणार होतो. दूरवर ल्हो गावाची वस्ती दिसू लागली. अर्ध्या तासात तिथे पोचू असा अंदाज बांधता आम्ही मार्गक्रमणा चालू ठेवली. पण ल्हो चे दर्शन अतिशय फसवे ठरले. जितके पूढे जातोय तितके ते मागे जातंय का काय अशी शंका आली! अखेरीस एक तासाने आम्ही ल्हो गाठले. सुरुवातीसच एका मोठ्या पलेशियल गेस्ट हाऊस चे बांधकाम होताना दिसले. या गुंतवणुकीचा परतावा काय वेगाने होत असेल असे मनात आले. ल्हो ला आम्ही जेवण व विश्रांतीसाठी थांबलो. जोरात पावसाची सर आली.
विश्रांती घेऊन पावणे दोन ला पूढे निघालो. ल्हो जवळच्या पर्वती च्या उंचीच्या टेकडीवर इथली गोम्पा आहे. त्याला वेढा मारून आम्ही चढाची वाट पकडली. पुढे साधारण 100 मीटर्स उंच चढ चढून गेल्यावर मग पुन्हा उतार लागला. चढलेली उंची घालवत आम्ही पुन्हा जंगलात उतरलो आणि एक वव्हाळ ओलांडून जंगलाच्या वाटेनं चढत श्याला गावाकडे निघालो. पाऊण तासाच्या चढाईनंतर आम्ही 3513 मीटर्स उंचीवरच्या श्याला गावी पोचलो. मोठे पण गचाळ गाव. तगून मानसलू शिखर फार सुंदर दिसते असे आम्हाला दिलीपने सांगितले. आमच्यावर ढगांची अवकृपा केली आणि आम्हाला काहीच दिसू शकले नाही. इथून एक तासांवर समागाव होत आणि आता फार चढ नव्हता. श्याला सोडल्यावर थोडेसे जंगल लागले आणि मग दूर मानसलू च्या पायथ्याशी समागाव दिसू लागले. प्रथमदर्शनीच हे गाव खूपच मोठे वाटले. वाटेत सपाट गवताळ कुरणातून रास्ता गेला इथे बरेच याक चरत होते. त्यांनी शहण्यासारखी आम्हाला वाट दिली. समागावच्या सुरुवातीलाच एका घराच्या बंद दारावर ‘चे गव्हेरा’ चे चित्र पाहून मला आश्चर्य वाटले. नेपाळ मध्ये कम्युनिस्ट लोकांचे प्राबल्य असलेले शासन आहे. इथे चीनच्या प्रभावाने माओ चे किंवा लेनिन चे चित्र दिसले असते तर फारसे विशेष वाटले नसते पण व्हेनेझुएला च्या क्रांतिकारकाचा प्रभाव इथे दिसावा हे विशेष वाटले. तशी इथली प्रजा फारशी शिक्षित नसताना आणि अतिशय दुर्गम अश्या ठिकाणी हे गाव असताना हा विचार इथे रुजला आहे का? याची तपासणी करावी का काय असे वाटून गेलं.
समागावचे प्रथम दर्शन गावविषयी तिटकारा निर्माण करणारे ठरले. मानसलू चा बेस कॅम्प इथून जवळ आहे त्यामुळं शिखर चढाई साठी आलेल्या टीम्स इथे मुक्काम करतात हे या गावाचा आकार वाढण्याचे कारण आहे. लारक्या पास च्या जवळ पर्यंत गाडी रस्ता आला असल्याने तिथपर्यंत गाडीने समान आणून लारक्या पासमधून घोडे-खेचरांच्या मदतीने इथे समान आणता येते हे दुसरे कारण. पण गाव अत्यंत गचाळ वाटले. गावाच्या अगदी शेवटी असलेल्या गेस्ट हाऊस मध्ये आमची व्यवस्था झाली, दिलीपच्या ओळखीची नेहमीची गेस्ट हाऊस गर्दीने पूर्ण भरलेली होती.
आज आम्ही 15 किमी चालून आलो आणि एकूण 1000 मीटर्स चा चढ चालून 3530 मीटर्स वर पोचलो.
27 सप्टेंबर
सकाळी 5 वाजताच उठून हवामानाचा अंदाज घेतला. मानसलू अजूनही ढगांची दुलई ओढून शांत पहुडले होते. खालून येणारी ढगांची फौज आजून दिसत नव्हती. आज आम्हाला तीन ते साडे तीन तास चालून आणि तीनशे मीटर्स चढून सामडो ला पोचयचे होते. त्यामुळे थोडे निवांतपणे आवरून साडे आठला निघालो. पाठीमागून ढगांची हालचाल सुरू झाली. वाटेतल्या माळरानावर याकची कुटुंबे निवांत चरत होती. बुधी गंडाकीची व्हॅली आता चांगलीच विस्तारली होती आणि आम्ही तिच्या पश्चिम तिरावरून चालत होतो. चढ अतिशय कमी उंचीचा होता. उजव्या बाजूला नकाशानुसार सामडो हे बर्फाच्छादित शिखर आणि त्यामागे पांगपोचे शिखर असणार होते. मधूनच त्याचे ओझरते दर्शन झाले. मागे ढगांच्या अगदी छोट्याश्या खिडकीतून मानसलुच्या एका धारेच्या भागाचे दर्शनही झाले पण पूर्ण शिखर किंवा शिखर माथा काही दिसू शकला नाही.
एका छोट्याश्या टेकडीवर चालून आल्यावर दूरवर सामडो चे दर्शन झाले. अंतर आणि वेळाचा हिशोब मांडता हेच सामडो असावे असे आम्ही मनाशी नक्की केले आणि चाल चालू ठेवली. डोंगरात समोरून इतक्यात एक महाकाय गिधाड अगदी आमच्याच उंचीवरून उडत आले. त्याचा व्हिडीयो घेण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला. हळू हळू ढगांनी आकाश व्यापून टाकले आणि वारे सुटले. टेकडीचा उतार लागला आणि समोर बुधी गंडकी नदीवरचा लाकडी पूल दिसायला लागला. पूल ओलांडला की पुढे एक छोटी खडी चढण आणि मग सामडो मध्ये पदार्पण असे गणित मनात ठेवून आम्ही टेकडी उतरलो.
सामडो गावाकडे नजर टाकली की उजव्या हाताला दिसते ते सामडो शिखर. शिखरापासून गावाच्या अंगाला सामडो हिमनदी खाली येते ज्याला सामडो खोला म्हणतात. या बाजूने डोंगरावरून एक वाट तिबेटकडे जाते, मात्र सध्या ती वापरात नाहीये असे कळले.
पूल ओलांडून समोरचा चढ चढून आलो आणि प्रवेशद्वारातून आत आलो तर लक्षात आले की सामडो ची वस्ती अजून पुढच्या टेकडीवर होती! ल्हो नंतर आम्ही पुन्हा एकदा चकलो होतो. एक गोष्ट बरी होती की आता उतरायचे नव्हते. तसेच चालत सामडो चे याक हॉटेल गाठले. आमच्या खोलीच्या खिडकीतून समागाव ची बाजू दिसत होती आणि जर ढगांनी मुक्काम हलवला असता तर समोर मानसलू दिसले असते. आम्ही पोचलो तेव्हा 12 वाजले होते आणि ऊन पडले होते. आज 5 किमी चालणे झाले होते. आणि आम्ही आता 3860 मीटर्स उंचीवर आलो होतो.
लवकर हवा निवळावी आणि मानसलू चे दर्शन व्हावे अशी मनीषा बाळगत आम्ही जेवून दुपारच्या विश्रांतीसाठी खोलीत शिरलो.
28 सप्टेंबर
रात्रभर संपूर्ण परिसरात ढग दाटून आले होते. सकाळीसुद्धा ढग हलले नाहीत. आज निवांतपणे उठून तिबेट पास कडे चढून जायचे आणि परत यायचे असा आमचा बेत होता. पण पाऊस आणि ढगांनी वेढल्या मुळे आम्ही तो रहित केला. आणि दिवसभर निवांतपणे पडून राहिलो.
आता उद्या लारक्या फेदि या लारक्या पासच्या पायथ्याला जायचे नक्की होतो. हवा निवळे पर्यंत तिथेच बसून राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता.
29 सप्टेंबर
काल रात्रभर रिपरिप पाऊस पडत होता. पहाट झाली ती आशेचा किरण घेऊन. खोलीच्या खिडकीतून समोर पाहिले तर दक्षिणेला दूरपर्यंत ढग दिसत नव्हते. आवरून बाहेर पडलो तर दक्षिणेकडे हिमाल चुली चा छाती खाली असलेला सर्व भाग पूर्ण दिसत होता. पूर्वेकडे सामडो शिखर थोडेसे दिसत होते, पश्चिमेला लारक्या पास च्या दिशेने पाहता डोंगर रांगेच्या वर एक शिखर डोकावत होते आणि उत्तरेस तिबेट पास च्या दिशेला आकाशाचा निळा रंग दिसत होता. आज बहुदा पूर्ण उघडणार आणि छान दर्शन घडणार असं वाटलं. भराभर फोटो काढले. उन्हाचा सुवर्ण स्पर्श पश्चिमेकडच्या शिखराला झाला त्याचे मोहक फोटो घेतले. मग निघायच्या दिशेने तयारी सुरू झाली.
नाश्ता करून 7.30वाजता निघालो. सामडो गाव हे डोंगराच्या माचीवर उंचावर वसलेले. नेपाळ-चीन सीमेवर फारतर 2 किमी नेपाळच्या बाजूला वसलेले. पूर्वेकडे असलेल्या सामडो शिखरावरून खाली झेपावणाऱ्या हिमनदीच्या काठ तर पश्चिमेला बुधी गंडकी च्या काठ आणि उत्तरेला उंच डोंगराची साथ असे छान ठिकाण. उत्तरेकडून तिबेट पास कडून येणारी वाट जिथे बुधी गंडकीच्या पात्रालगत येते तिथे लारक्या बाजार हे ठिकाण आहे. काही वर्षे पूर्वी पर्यंत तिबेट मधून येणारा माल इथे विक्रीस येत असे आणि त्यावर कस्टम्स चे बंधन नसे त्यामुळे तिबेटन फ्री मार्केट असे लारक्या बाजार चे स्वरूप होते. सध्या ती पद्धत बंद झालीय. पण या ट्रेंड रूट साठी मोठा रस्ता बांधण्याची योजना असून मग इथे नेपाळ -चीन सीमेवर नेपाळ कस्टम्स ची चौकी येईल अशी माहिती दिलीप ने दिली.
सामडो गाव संपल्यावर डावीकडे विस्तिर्ण शेती आहे. तिथे इंजिन वर चालणाऱ्या कटर्स च्या साहाय्याने गवत व तण कापणे चालू होते. उंचीवरच्या आणि थंड प्रदेशात तंत्रज्ञानाची घेतलेली मदत मला भावली. आमचा मार्ग उत्तरेकडे उतरत जाऊन मग पश्चिमेकडे वळला. बुधी गंडकी चा तिबेट कडून येणारा प्रवाह आम्ही पुलावरून ओलांडला आणि मग सलग चढायला सुरुवात झाली. तासाभरातच आम्ही लारक्या बाजार ची जागा ओलांडली आणि 3950 मीटर्स ची उंची पार केली. खालून ढगांचे आक्रमण चालू झालेच होते आणि त्यामुळे आज स्वच्छ निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मानसलू चे दर्शन होईल ही शक्यता मावळू लागली. सामडो मध्ये भेटलेले काही भटकंती वीर आणि वीरांगना आम्हाला ओलांडून पुढे गेले. आम्ही नेटाने चढाई सुरूच ठेवली. सुमारे दोन तास सलग चढत राहिल्यावर एक गवताळ पठार लागले. याक आणि त्यांचे अनेक कुटुंबीय तिथे मजेत चरत होते. तिथेच आम्हाला मरमोट ने दर्शन दिले. सश्या पेक्षा मोठा, उंदरासारखे तोंड असलेला आणि प्लॅटिपस सारखी शेपटी असलेला हा लाजाळू प्राणी. आमची चाहूल लागताच दगडामागे लपून पळाला. थोडे चढून गेल्यावर दुरून तो माळरानावर दिसला आणि त्याचे फोटो घेता आले. पुढे एक पत्र्याची शेड लागली.या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना विश्रांती साठी बांधलेली. तिथे क्षणभर थांबून आम्ही पुढे निघालो. आम्ही एव्हाना 4200 मीटर्स पर्यंत चढून आलो होतो. समोर लारक्या शिखर आणि मागे घळीतून बहुधा मानसलू चा काही भाग दिसत होता. समोर मनासलू आणि लारक्या च्या मधून हिमनदीच्या दर्शन होत होते आणि बुधी गंडकीचा उगम दिसत होता. हिमनदीच्या पृष्ठभागावर पाचू सारखी भासणारी पाण्याची छोटी तळी लक्ष वेधून घेत होती. पण लवकरच ढगांनी तो भाग व्यापून टाकला.
तीन तासांच्या सलग चढाईनंतर समोर लारक्या फेदि किंवा धरमशाला दिसले. साधारणपणे तीन चार गेस्ट हौस आणि थोडी घरे असलेले ठिकाण. आम्ही 4413 मीटर्स वर आलो होतो आणि आता तीव्र चढ नव्हता. डोंगराच्या काठा काठाने पायवाट चोखाळत 40 मिनिटात लारक्या फेदि ला पोचलो. पहिल्याच गेस्ट हाऊस मध्ये आमची व्यवस्था होती. प्री फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल्स चा वापर करून चाळी सारख्या बांधलेल्या खोल्या. एका खोलीत चार गाद्या घातलेल्या अशी व्यवस्था होती. स्वच्छता गृह ही यथा तथा च, पण इतक्या दुर्गम ठिकाणी हेही नसे थोडके!
वैद्य अर्ध्या तासातच पोचले. ते खोलीत शिरले आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. समोरची सगळी व्हॅली ढगांनी व्यापून टाकली. जेवण करून दुपारी शेजारच्या डोंगरावर चढाई करायचा बेत त्यामुळे रहित झाला. बरोबरचे विदेशी प्रवासी उद्याच लारक्या पास ओलांडून पुढे जाणार आहेत पण आम्ही हवा 30 तरखेनंतर निवळेल या अंदाजावर आणि हवामानाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने 1 ओक्टॉबर ला पास ओलांडण्याचे ठरवले आहे. पाहूया निसर्ग आम्हाला साथ देईल का ते!
संध्याकाळी दिलीप सांगत आला की एक साऊथ इंडियन गिर्यारोहक एकटाच लारक्या पास चढून इकडे आला आहे. तो म्हणे अन्नपूर्णा सर्किट करणार होता आणि त्याच्याजवळ पैसे कमी होते म्हणून त्याने चौकशी केली की जवळ बँक कुठे मिळेल तर कोणीतरी त्याला सांगितले की लारक्या पास ओलांडून खाली जाताना फिलीम गाव, जे आम्हाला वाटेत लागले होते, तिथे बँक आहे. या गेस्ट हाऊस मध्ये पुण्याचे तिघे आहेत असे कळल्यावर त्याने चौकशी करून दिलीपच्या गाठले.
जेवायच्या वेळेस आम्ही त्याला बघितले पण मुळीच संवाद साधला नाही. एक तर या भागात यायला परमिट लागते ज्याची त्याने काहीच चौकशी केली नव्हती. अंतरे किती आहेत याची त्याने बहुदा काहीच माहिती काढली नव्हती. हिमालयात अश्या प्रकारचे धाडस करणे हे जीवावर बेतू शकते याची तरी त्याला कल्पना होती का नव्हती माहीत नाही. अशी कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास आल्या रस्त्याने परत जाणे हा एकच योग्य पर्याय आहे, पण तो त्याने स्वीकारला नव्हता.असो.
30 सप्टेंबर
गेस्ट हाऊसला पहाटे 3 पासूनच जाग आली. आज जे गिर्यारोहक लारक्या पास पार करणार होते त्यांची समान बांधणी आणि आवराआवर सुरू होती. पहाटे साडेतीन चार पासूनच एक एक चमू इथून बाहेर पडला. इथून लारक्या पास चार तासांवर, त्यामुळे ढग दाटून यायच्या आत तिथे पोचणे हे प्रत्येकाचे ध्येय असते आणि आपापल्या चालीनुसार एक एक चमू इथून बाहेर पडला.
सहाला जाग आली तेव्हा समोर अप्रतिम दृश्य होते. आकाश पूर्णपणे निरभ्र झाले होते आणि आमच्या अगदी समोर, हिमनदीच्या पलीकडच्या तीरावर सामडो शिखर ताज्या बर्फासाहित चमचमत होते. बाहेर येऊन आवरून सामडो ते लारक्या शिखर रांगेचे फोटो घेतले. हवा थंड होती. अर्ध्या तासात हात गारठले.
सात वाजता खालून ढगांची हालचाल दिसू लागली. निखिलने आणि मी तयार होऊन मागच्या डोंगरधारेवर प्रस्थान केले. विरळ हवामानाशी जुळवून घेणे आणि त्याच बरोबर उंचावरून मानसलू चे दर्शन घ्यायचा प्रयत्न करणे असे दोन्ही हेतू होते. पन्नास मिनिटातच आम्ही 300 मीटर्स चढून 4771 मिटर्सची उंची गाठली. इथून पश्चिमेला लारक्या पास दिसत होता. उत्तरेची काही शिखरेही दिसू लागली. मानसलू ने मात्र आम्हाला पाहून एका ढगांच्या पुंजक्याची चादर ओढून घेतली. या उंचीवर मी आणि निखिल अर्धा तास थांबलो पण तो ढग काही हलेना. इतर पर्वतांचे दृश्य मात्र अप्रतिम होते.
अखेरीस थोडेसे निराश होत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. छान ऊन पडले होते. कालच्यासारखीच व्हॅली आजही ढगांनी भरून जाणार हे दिसत होते पण त्याला अजून किमान दोन ते तीन तास लागणार हे कालचीच अनुभवातून सहज लक्षात येत होते. त्यामुळे आम्ही कपडे कडक वाळण्यासाठी समोरच्या दगडांचा धोबी घाट केला आणि उन्हं अंगावर घेत नाश्ता उरकला.
अकरा वाजण्याच्या सुमारास ढगांनी सूर्याला झाकोळले आणि गार वारा सुटला. त्याच बरोबर सामडो हुन येणारे समान वाहक आणि पाठोपाठ गिर्यारोहक या कॅम्पवर यायला सुरुवात झाली. आम्ही तीन सोडून बाकी सर्व जण हे अ-भारतीय होते. प्रामुख्याने अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन लोकांची संख्या जास्त होती.
सामान्यपणे लारक्या फेदि ला सर्वजण एकच रात्र मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी लारक्या ला ओलांडून पुढे जातात. पण उंची वरच्या हवामानाशी जुळवून घेण्याचे जे एक सर्वमान्य गणित आहे त्यानुसार लारक्या फेदि ला दोन रात्री राहणे आवश्यक आहे.
01 ऑक्टोबर
आज पहाटे 3.25 चा गजर लाऊन उठायचे आणि लगेच आवरून निघायचे असे ठरले होते. पण पहाटे 3 वाजताच जाग आली. खोलीच्या बाहेर आलो तेव्हा दाट धुके आणि हिमकणांनी स्वागत केले. अर्थात रात्री पाऊस पडून ढगांची दुलई हटली नव्हती. थोड्याश्या निराशेनेच आवरायला सुरुवात केली. कॅम्पवर सर्वांचीच निघण्याची हालचाल सुरू झाली. आवरून 4.15 वाजता वैद्य आणि दिलीपने प्रस्थान ठेवले. ठरल्याप्रमाणे 4.40 वाजता निखिल आणि मी आमच्या भारवाहकांबरोबर निघालो. हवा थंड होती आणि ढगांमुळे हेडलाईटचा प्रकाश विखुरला जात होता. माहितीच्या पायवाटेपर्यंत पोचायला दहा मिनिटे लागली. सुमारे अर्ध्या तासात आम्ही ग्लेशियर च्या जवळ पोचलो. वर्षानुववर्षे सुस्त पडलेल्या लारक्या ग्लेशियरचा ठिगारा एका बाजूला आणि डोंगराचा उतार एका बाजूला अश्या घळीतून आमची चढाची वाट निघाली. थोड्या वेळाने ख-मध्यातले ढग बाजूला होऊन मृग नक्षत्र दिसू लागले पण डोंगराच्या अंगाला ढग बिलगून राहिले होते. साडे पाच च्या सुमारास हळू हळू उजाडले. आता आम्ही ग्लेशियरचा बाजूने चालत 4600 मीटर्स पर्यंत चढून आलो होतो. चढ कमी तीव्रतेचा पण सलग होता. मग सूर्यदेवाचे अवकाशात पदार्पण झाले आणि ढगांनी माघार घ्यायला सुरुवात केली. आमची पावले पुढे पडत होती, प्रत्येक पावला गणिक उंचीचा काटा वर वर सरकत होता. साडे सातच्या सुमारास आम्हाला डाव्या बाजूला ग्लेशियरच्या काठावर निळ्या रंगाचे सुंदर तळे लागले. शांत निळ्याशार पाण्यात समोरच्या लारक्या शिखराचे प्रतिबिंब दिसत होते. अत्यंत मनोहारी अश्या त्या दृश्याने आमचा आतापर्यंत चा शीण पार पळून गेला. थोडे पुढे सरकेपर्यंत डाव्या बाजूच्या लारके पर्वत रांगेवरचे बरेच ढग दूर पळाले आणि सुंदर बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली. या भागात अजून वारे सुटले नव्हते त्यामुळे पाणी शांत होते आणी त्या मध्ये समोरच्या डोंगर शिखराचे सुंदर प्रतिबिंब दिसू लागले. त्या अरस्पानी सौंदर्याचे देखणे रूप डोळ्यात याNइ कॅमेऱ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. अजून अर्ध्या तासात आमची डोंगरकाठाची वाट संपली आणि आम्ही ग्लेशियर वर चढून चालायला सुरुवात केली. ग्लेशियर ने ओढून वाहून आणलेल्या काही फूट जाडीच्या दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या बर्फ़ाची जाणीव गार पडत जाणारे बुटाचे सोल करून देत होते. वाटेतल्या दगड गोट्यांवर काळ पडलेल्या हिमाचे पापुद्रे दिसत होते. बर्फाचे पाणी होऊन तयार झालेल्या छोट्या छोट्या डबक्याचा पृष्ठभाग पूर्ण गोठलेला होता. चालता चालता असे बर्फाचे पापुद्रे काठीने फोडून पुढे जात होतो. थोड्या वेळाने उजवीकडच्या परी हिमालचे शीर्ष दृष्टीस पडले. काळ्या ढगाचा एक पुंजका त्यावर विसावला होता. नऊच्या सुमारास आम्ही 4950 मिटर्सची उंची ओलांडली. आता अजून 150 मिटर्सची चढाई बाकी होती. उजवीकडचा डोंगर उतार आता संपला आणि आम्ही पूर्णतया ग्लेशियरच्या भागत आलो. उजव्या बाजूने येणारी परी हिमालची हिमनदी आणि डाव्या बाजूची लारके हिमनदी याच्या संगमावरून आम्ही पुढे सरकत होतो. वाट चुकू नये म्हणून ठिकठिकाणी लोखंडी खांब उभे केले होते. समोर आकाश स्वच्छ दिसत होते आणि थोड्याच वेळात परी हिमाल ते लारक्या शिखराचा पश्चिम तीर यांना जोडणारी विस्तीर्ण खिंड दिसू लागली. पावणे दहाच्या सुमारास आम्ही 5000 मीटर्स ची उंची ओलांडली. इथे एक छोटेसे मंदिर लागले. मग गलेशियरमधलीच एक टेकडी ओलांडली आणि समोर दिसलं एक सुंदर हिरवं तळ, पाठीमागे पाठीराखा परी हिमाल हे शिखर. आता आम्ही 5070 मीटर्स वर होतो, समोरून घोड्यांची रांग येत होती त्यानं आमचा मार्ग अधोरेखित केला होता. आता समोरून थंडगार वारे येऊ लागले. खिंडीच्या जवळ पोचल्याची ती खूण होती.
10.30 वाजता आम्ही लारक्या पास च्या पाटीपाशी पोचलो. ट्रेक मधला ‘द डे’ चा सर्वात अवघड टप्पा पार पडला. 69 वर्षाच्या वैद्यांचा हा 25 वा ट्रेक यशस्वी झाला. आता पश्चिमेकडे होती उतरायची धार, दक्षिणेला लारके शिखरांची रांग, त्या रांगेने पूर्वेकडे पाहत जाता मधल्या खिंडीतून डोकवणार लारको शिखर आणि मानसलू नॉर्थ चा शिखर माथा, सुदूर पूर्वेस सामडो शिखर थोडेफार ढगात गेलेले, तिथपर्यंत सुस्तपणे पसरलेली लारके हिमनदी, उत्तरेला चढत येणारी डोंगररांग जिचा माथा म्हणजे परी हिमाल आणि त्याच्यावरून खाली झेप घेऊ पाहणारी हिमनदी.
पश्चिमेकडे अन्नपूर्णा 2 आणि अन्नपूर्णा 4 ही शिखरे दिसणे अपेक्षित होते, पण ढगांनी इथेही आमची निराशा केली. त्या बाजूने वाऱ्यावर स्वार होऊन काळ्या कुट्ट ढगांची मोठी फौज व्हॅली चढून आली आणि त्याने आसमंत लवकरच भरून टाकला. आमच्या मागून येत असलेल्या अमेरिकन चमुला जागा देत आम्ही लारक्या पास पासून पुढे जाऊन थोडा वेळ थांबलो. हिमनदीच्या या रांगेवर जागोजाग बर्फ पडले होते. सुदैवाने पायवाटेच्या मार्गावर बर्फ नव्हते. आमच्या जवळ क्रंपोन्स असल्याने तशी बर्फ़ाची काळजी नव्हती. लारक्या पास ची पाटी आहे तिथे उंची लिहिली आहे 5106 मीटर्स. पण प्रत्यक्ष उतार सुरू होतो तिथे मोजलेली उंची होती 5158 मीटर्स.
आता उतार सुरू झाला. उजवीकडे परी हिमाल+पोंकर शिखरावरून येणारी हिमनदी आणि डावीकडे लारके शिखर यांचा बर्फ़ाल उतार या मधल्या रंगेवरून दगडा धोंड्याच्या आणि मुररुमाड रेतीच्या तगिगातून नागमोडी वळण घेत वेगानं खाली उतरणारा कंटाळवाणा उतार! प्रत्येक पाउल मोजून मापून टाकत आणि गुढघ्या-घोट्याची काळजी करत आम्ही उतरायला सुरुवात केली. एका तासाच्या अवधीत आम्ही फक्त 200-225 मीटर्स उतरू शकलो. ढगांनी आसमंत व्यापल्यामुळे दिशा समजणे अवघड झाले. पायाखालची उतार तुडवणे इतकेच आम्ही करत होतो. पायावर येणाऱ्या ताणामुळे इतक्या उंचीवर वेग कमी असूनही धाप लागत होती. बारा-साडे बाराच्या सुमारास पासकडे घोड्यावरून जाणाऱ्या एका स्थानिक कुटुंबाला राम राम करून आम्ही पुढे निघालो. त्या घोड्यांची मात्र खरोखरच कीव आली. ढगांच्या दुलाईच्या आम्ही आता खाली पोचलो आणि समोर उतार डोंगर धारेवरून सौम्य होताना दिसला. इतक्यात एक युरोपियन तरुण आम्हाला ओलांडून पळत खाली गेला. खाली दूरवर लारक्या फेदि दिसू लागले. दीड वाजता आम्ही लारक्या फेदि ला पोचलो. हा पळत जाणारा तरुण तिथे भेटला. अँथनी नावाचा हा ब्रिटिश तरुण दोनच दिवसांपूर्वी मानसलू शिखर चढून आला होता. त्याची बाकीची टीम हेलिकॉप्टर ने काठमांडू ला परत गेली. याने सकाळी 8 वाजता समागाव 3460 मीटर्स इथून पळायला सुरुवात केली, तिथून सामडो- 5 किमी 3860मी, धर्मशाळा 5किमी 4460 मी, लारक्या पास-5 किमी उंची 5158 मी आणि पुढे 5 किमी चा उतार इतका कार्यक्रम केवळ साडेपाच तासात त्याने उरकला होता आणि इथून पुढे जवळपास 15 किमी अंतर आणि 2000मी चा उतार 3 तासात पार करून जायचा त्याचा बेत होता. त्याला मनोमन साष्टांग दंडवत घालून आणि शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या जेवणाकडे वळलो. पहाटे पासूनची पायपीट, उंचीवरच्या विरळ हवामान आणि थंड वारे आणि सरळसोट उभा उतार यातून गेल्यामुळे फारसे जेवायची इच्छा नव्हती. थोडेसे नूडल्स सूप पोटात ढकलून आम्ही भीमटांग चा रास्ता धरला. आतापर्यंत 700 मीटर्स उतरलो होतो आणि अजून 700 मीटर्स उतरायचे होते. आमची दिशा हळू हळू नैऋत्येस वळत होती. डावीकडे उंच डोंगराचा पायथा आणि उजवीकडे पोंकर ग्लेशियरचा किनारा यामधून आमची वाट जात होती. हिमालयातल्या ग्लेशियर आपल्याबरोबर बाजूच्या दोन्ही किनाऱ्यावरील डोंगरांवरचे दगड मातीचे ढीग वाहून आणतात. हळू हळू हिमनदी वितळत खाली जाते आणि मग ते दगड, गोटे खाली बसतात दोन्ही काठाने उंच ढासळते किनारे सोडून. काठावर चढून हिमनदीकडे पाहिले की मग तिची मुळातली उंची दिसून येते.
उंची कमी होत गेली तशी डोंगर उतारावर खुरटी झुडुपे आणि मग त्यांचे दाट जंगल लागले. चार साडे चारच्या सुमारास उजवीकडे पोंकर लेक कडे जाणारा फाटा लागला. डोक्यावर ढगांचे छप्पर, सुमारे 12 तासांची झालेली पायपीट या नंतर कित्तीही सुंदर असले तरी तिथे जायची इच्छा नव्हती. पाच सव्वा पाचच्या सुमारास गवताळ कुरणावर वसलेले भीमटांग दिसू लागले. वाऱ्याच्या झोताबरोबर काळे ढग अजूनही व्हॅली व्यापत वर येतच होते. पावणे सहाला गेस्ट हाऊस मध्ये शिरलो आणि आजच्या चालीची इतिश्री झाली. आवरून डायनिंग हॉल मध्ये आलो. वैद्य आणि दिलीप अजून यायचे होते. त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे काळजीत होतो इतक्यात ते येतांना दिसले. सत्तराव्या वर्षात इतक्या उंचीवरच्या आणि इतके तासांचा ट्रेक त्यांनी अगदी यशस्वी केल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन केले. आज आम्ही 4460 मीटर्स वरून चालायला सुरुवात केली, 5158 मिटर्स पर्यंत मजल मारली आणि आता 3720 मीटर्स वर मुक्कामाला पोचलो. या 14 किमी च्या अंतरात चढाची वाट सुमारे 5 किमी आणि बाकीचे उतार होता.
2 ऑक्टोबर
रात्रभर जोरात पाऊस कोसळला. बाहेर वाळत घातलेले कपडे आणि बूट पावसाच्या शिंतोडयांनी आणि गळक्या व्हरांड्यातल्या छप्परने ओले केले. पहाटे केव्हा निखिलला जाग आली तशी त्याने ते सर्व साहित्य चिंब भिजण्यापासून वाचवले. पहाटे जाग आली ती ढगांच्या बाबतीत निराशा घेऊन. स्वच्छ उजाडल्यावर पूर्वेच्या बाजूस हिमलुंग शिखर आणि पोंकर शिखर जरा जरा दिसू लागले. थोड्याच वेळात त्या बाजूला ढगांचा पडदा बाजूला झाला. आम्ही ज्या चिंचोळ्या बेचक्यातून उतरलो ती वाट आणि मागे पोंकर शिखर दिसू लागले. पश्चिमेला ढगांच्या पडद्या अडून हळूच पीक29 किंवा नदी चुली हे शिखर काही सेकंदासाठी डोकावले. दक्षिण आणि उत्तर दिशेला तसेही फार काही दिसणे अपेक्षित नव्हतेच. लारक्या पास करून समागाव ला समान नेणाऱ्या घोड्यांचे तांडे भीमटांग च्या वेशिवरले चिखलाचे माळ तुडवून निघून गेले.
आम्ही आवरून नाश्ता करून 10 वाजता भीमटांग सोडले. योजनेनुसार आज धारापानी ला पोचायचे होते. 3720 मीटर्स ते 1850 मीटर्स इतका उतार आणि 20-21 किमी चे अंतर हा प्रवास करण्या ऐवजी वाटेत गोवा गावी पडावं टाकायचे ठरले.
भीमटांग च्या जवळून वाहतो तो दूध खोला. त्याच्या संगतीने प्रवास सुरु झाला आणि मग थोड्याच वेळात त्याची साथ सोडल्यावर भोज वृक्षांचे जंगल लागले. पोंकर शिखरावरून आलेल्या शुभ्र पाण्याच्या नाल्यावरचा लाकडी पूल ओलांडून आणि त्याच्या बाजूचे पांढऱ्या वाळूचे वाळवंट पार करून आम्ही भोज आणि नंतर पाइन च्या दाट झाडीतून उतरायला सुरुवात केली. सिनेमांमधून स्कॉटलंड वगैरे बाजूचे दाखवतात तसे थंड, थोडेसे गूढ वातावरण इथे होते. मधूनच तीव्र उतार, चिखलाने भरलेली वाट असे करत सावकाश उतरत जंगलात आम्ही हबू नावाच्या ठिकाणी पोचलो. डावीकडे जंगलात उतरणाऱ्या एका पायवाटेच्या बाजूने इथे पताका लावलेल्या दिसल्या. मिलारेपा गुंफा असे ठिकाण इथून जवळच खाली आज असे इथल्या नकाशात लिहिले होते. दात जंगलातल्या या वाटेने निखिल आणि मी तिकडे उतरून गेलो. नदीकाठी पोचल्यावर एका मोठया शीलखंडाखाली छोटीशी गुहा तयार झाली होती. त्यावर दगडांचा बांधीव कळस होता. कोणी संन्यासी, तपस्वी तिथे राहत असावा किंवा राहून गेला असावा. नदीकाठी नवीन बांधलेली एक घुमटीही होती. हिमालयाच्या गिरी कंदरात कोणा कोणाला सिद्ध पुरुष दिसल्याचे उल्लेख अनेकांनी लिहिले आहेत. मला आजपर्यंत असं कोणी भेटलं नाही. कदाचित कोणा सिद्ध पुरुषाला विचारावे इतक्या उंचीचे प्रश्न मला कधी पडले नसल्यामुळे असेल!
थोडा उतार उतरल्यावर जंगलातला सखल भाग आला तिथे इतका चिखल होता की जायची वाटच सापडेना! इथल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असणार त्यामुळे जागोजाग असे चिखलाचे साम्राज्य पसरले असावे. अर्ध्या तासाने आम्हाला चौरी खडक च्या गेस्ट हाऊसचे छप्पर दिसू लागले. तीन साडे तीन तासाच्या पायपीटीनंतर चौरी खडक च्या रेस्टॉरंट मध्ये पोचलो. पोटात कावळे कोकलत होतो. एक मोठा ग्रुप इथून आम्हाला ओलांडून चढाईच्या वाटेनं गेला , तेव्हढीच वर्दळ.विसच मिनिटात वैद्य आणि दिलीप मागून आले. तिथे जेवून तासाभराने पुढे निघालो. जंगलातला रस्ता उतरत नदी पात्रापर्यंत गेला आणि पात्रातून थोडे चालत गेल्यावर उजव्या किनाऱ्यावर ढासळलेला डोंगर उतार आणि त्यावरून गेलेली वाटेची रेघ दिसली. नदी इथे डावीकडे वळण घेत होती आणि प्रवाहाला चांगलीच गती होती. त्या वाटेनं जायचं हे दिसल्यावर जरा टेन्शनच आलं, पण आलिया भोगासी असावे सादर या न्यायाने चढ चढायला सुरुवात केली. मातीच्या ढिगाऱ्यावारून दोन पावले मावतील इतकीच पायवाट, खाली 50 फुटांवरून जोरात जाणारा नदीचा प्रवाह आणि इतक्यात समोरून घोड्यांची रांग आली. निखिल आणि मी मग शक्य तितके डोंगराला बिलागलो आणि घोड्यांना वाट करून दिली. चिखल गोट्यांची वाट पुन्हा तासभर तुडवल्यावर मग सुरखी खोला ची वस्ती लागली. विकी आणि जनक आमच्यासाठी इथे थांबले होते. त्यांचे जेवणही झाले नव्हते. त्यांना तिथे जेवणाची व्यवस्था लावून आम्ही पुढे निघालो. नदीचा प्रवाह थोड्यावेळाने दुभंगला आणि आम्ही उजव्या बाजुला वळलो. अंगावरचा चढ लागला आणि चांगलीच दमछाक झाली. डावीकडे नदीची खोल घळई दिसत होती. तासाभराने डावीकडे खाली गोवा गाव दिसू लागले. पण तिथे पोचेपर्यंत आजून एक तास लागला. साडे पाचला आम्ही निर्वाण रिसॉर्ट मध्ये पोचलो. हळू हळू अंधार दाटून आला. वैद्यांची सॅक तपासली तेव्हा लक्षात आले की त्यांचे दोन्हींटॉर्च इथे सॅक मध्येच आहेत. मग तइ टॉर्च घेऊन निखिलने विकी आणि जनकला वर पिटाळले. त्याचा वैद्य आणि दिलीप यांना बराच फायदा झाला. साडे सहाच्या सुमारास वैद्य कॅम्प वर पोचले.
1200 मिटर्सचा उतार आणि 16 किमी चे अंतर उतरून अम्हीबत 2500 मीटर्स उंचीवर पोचलो होतो. हवेतला गारवा आता सुखद या श्रेणीत मोडत होता.
3 ऑक्टोबर
सकाळी 7 साडे सातला गोवा सोडले. पोंकर वरून येणाऱ्या नाल्याचे आता मारसंदी नदीत रूपांतर झाले होते. नदी डाव्या हाताला ठेवत आम्ही उताराच्या रस्त्याला लागलो. आता कच्चा गाडी रस्ता लागला. चिखलाची वाट संपली याचा आनंद झाला. तासाभराने तिलचे गावाची प्रवेश कमान लागली. काँक्रीट चे स्वच्छ वळणा वळणाचे रस्ते, घरांच्या बाजूने फुललेली सुंदर फुले, व्यवस्थित बनवलेल्या खुराड्यात नंदणार्या कोंबड्या असे हे तिलचे गाव आम्हाला फारच आवडले. स्वच्छ नेपाळ स्पर्धेत आम्ही तिलचे गावाला आमच्याकडून पहिला नंबर देऊन टाकला!
तिलचे संपल्यावर नदीवरचा झुलता पूल लागला. आज बारा दिवसांनी मोटर सायकल हे चाकावर पाळणारे वाहन पाहिले! प्रशस्त मुरमाड कच्च्या गाडी रस्त्याने उतरत जाता मध्ये मध्ये दोन तीन लँड स्लाईड पार केल्या. मग समोर मारसंदी नदीवर झुलता पूल आणि खाली धारापानी गाव दिसले. साडे दहा ला थोनचे गावाची काँक्रीट मध्ये बांधलेली प्रवेश कमान लागली. तिथे कॅलिफोर्निया हॉटेल मध्ये चहा साठी थांबलो. हे हॉटेल चालवणाऱ्यांपैकी कोणी अमेरिकेत नोकरीला असावे, त्या ताईना इंग्लिश बऱ्यापैकी येत होते. समोरच्या पायवाटेवरून दोन पोर काठी घेऊन घोडा घोडा खेळत होती. पायामध्ये मोठी काठी घेऊन त्याचा घोडा खेळण्याची ही पद्धत ही मानव जात लहानपणापासून काशी एका पद्धतीने विचार करते याचे उदाहरण वाटले!
अन्नपूर्णा सर्किट च्या वाटेवर थोनचे गाव आहे. इथे उजवीकडे लारके पास -मनासलू चा रस्ता जातो तर डावीकडे मनांग-अन्नपूर्णा चा रस्ता लागतो. थोनचे ला लागूनच धारापानी गाव आहे.
वैद्यांना चालायला ब्लिस्टर मुळे खूप त्रास होत होता त्यामुळे त्यांना पोचायला जवळपास एक तास लागला. मग थोनचे मध्येच जेवलो. इथून स्यांगे गाव 25 किमी खाली होते. स्यांगे जवळ रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रास्ता बंद झाला होता त्यामुळे वरची वाहने वर आणि खालची खाली अशी अवस्था झाली होती. 25 किमी अश्या अवस्थेत चालणे शक्य नव्हते म्हणून चामे गावावरून जीप बोलावली आणि त्या कच्च्या रस्त्यावरून हिंदकाळत दीड तासांनी स्यांगे गावी पोचलो. अन्नपूर्णा सर्किट करणाऱ्यांची गर्दीच या रस्त्याने जाताना लागली. बहुतेक लोक गोऱ्या कातडीचे, भारतीय ओळखता येतील अशा एकच ग्रुप दिसला. स्यांगे इथे दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होते. खालून आलेला माल वर जाणाऱ्या गाड्यात भरण्याची हमालांची गडबड चालू होती. जिथे दरड कोसळली होती त्या पुढे आम्ही गेस्ट हाऊस मध्ये उतरली. इथे वाय फाय असल्याने आज पुन्हा माणसात आल्यासारखे वाटले!
4 ऑक्टोबर
स्यांगे गावी रात्री पाऊस पडला आणि चांगला जोरात पडला. पहाटे मात्र तारकांनी खच्चून भरलेले आकाश दिसू लागले. पहाटे साडे तीनला पोखरा हुन स्कॉर्पिओ घेऊन अमर नावाचा नेपाळी गडी आम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी निघाला. वाटेत डोंगरातल्या रस्त्यात ट्रक फसल्यामुळे त्याला स्यांगे ला पोचायला 10 वाजले. सामान लोड करून आम्ही साडे दहाला पोखरा ला जाण्यासाठी निघालो. डोंगर फोडून काढलेला, कधी मधी डोंगराचे ढिगारे लोटून देऊन तयार केलेला कच्चा रस्ता. अनेक ठिकाणी ‘इथून गाडी जाऊ शकेल?’ असा प्रश्नच पडावा. डोंगरावरून खाली झेपावणाऱ्या पाण्याच्या वाटेवर धबधबा आत येईल का काय इतक्या जवळून जायची वेळ तर जेमतेम गाडी जाईल इतक्याच रुंदीची वळणे आणि त्यात खचत जाणारा मुरमाड वालुकामय रास्ता. अनेक वेळेस अक्षरशः जीव मुठीत धरून गेलो. असल्या रस्त्यासाठी गाड्या बनवाव्यात महिंद्रनेच आणि चालवाव्यात त्या थंड डोक्याच्या नेपाळी माणसानेच!
साडे बाराच्या सुमारास बेसी शहर ला पोचलो. जिल्ह्याचे केंद्र असलेले पण डोंगरातले मोठे झालेले गाव. अन्नपूर्णा सर्किट चा ट्रेक पूर्वी इथून सुरू होत असे. काहीअति उत्साही जाडजूड ट्रेकर्स आताही इथून निघालेले दिसले. बेसीशहर ला आम्ही जेवण घेतले. बारा दिवसांनी गव्हातल्या पीठाचे पराठे, दही खाऊन जिभेला चव आली!
दोन-अडीच च्या सुमारास काठमांडू-पोखरा हायवे वर डुमरे गावी पोचलो. विकी आणि जनक इथून काठमांडू ला गेले. गेले 12 दिवस आम्ही बरोबर होतो, पुन्हा त्यांची भेट होण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. त्यांचा निरोप घेऊन पोखरा कडे निघालो. नवरात्रोत्सवामुळे रस्त्यावर प्रवासी वाहनांची गर्दी, आपल्या गावी दसऱ्याला जायची लोकांची गडबड दिसली.
पोखरा जवळ येता येता उत्तरेकडे ढगांच्या रांगेत शुभ्र धवल डोंगर दिसले. पोखरा हुन अन्नपूर्णा रांगेतील शिखरं दिसतात असे वैद्य यांनी सांगितलेच होते, किंबहुना म्हणूनच आम्ही ट्रेक संपवून एक दिवस काठमांडू ला न जाता इथे यायचा बेत ठरवला. पोखरा ला पोचल्यावर दिलीपचा निरोप घेतला. गेले 12 दिवस त्याने आमची एक प्रकारे काळजीच घेतली होती. त्याचा आत्मविश्वास पाहून आम्ही निर्धास्तपणे हा ट्रेक पूर्ण केला. आल्यावर व जरा स्थिरावल्यावर श्री.दंबार यांची भेट झाली. उद्या सकाळी सारंगकोट इथून सूर्योदयाच्या वेळेस अन्नपूर्णा रांग बघण्यास जाण्यासाठी व्यवस्था करण्यास त्यांना सांगितले आणि त्यांनी त्या प्रमाणे रात्रीच व्यवस्था केली देखील.आता आम्ही खरेखुरे तराई मध्ये शहरी वातावरणात आलो.
5 ऑक्टोबर
पहाटे 4 वाजता हॉटेलचा मॅनेजर प्रकाश याने फोन करून उठवले. संगीतल्याबर हुकूम पहाटे 4.50ला चंद्र राव हा सारथी आमच्यासाठी इथे दाखल झाला. रस्त्याने जाणाऱ्या गाड्या एक तर सारंगकोट कडे जात होत्या किंवा भाजी मंडईकडे. व्यायाम म्हणून फिरायला जाणारेही अनेक जण दिसले. नवरात्री उत्सव, जवळ आलेली विजयादशमी आणि जोडून आलेला शनिवार रविवार यामुळे पहाटेच आपल्या गावाकडे जाणाऱ्यांचीही बस स्टॅन्ड वर गर्दी दिसली.
सारंगकोट हे पोखरा जवळच टेकडीवरच गाव, उपनगरच म्हणा. इथून उत्तरेला धौलागिरी, अन्नपूर्णा रांग आणि मच्छपुच्छरे ही शिखरे दिसतात. हवा स्वच्छ असेल तर पोखरा च्या रस्त्यांवरूनही ही शिखरे दिसतात. चंद्रा म्हणजेच चंद्रराव तेरा वर्षे मुंबईत वाहनचालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला मराठीही थोडे थोडे येत होते. त्याच्याशी चांगले संभाषण झाले. सारंगकोट चा रस्ता पुढे जोमसोम, मुक्तीनाथ च्या मुख्य रस्त्याला मिळतो अशी माहिती त्याने दिली. पाऊण तासात आम्ही तिथे पोचलो. एका घराच्या गच्चीवर गॅलरी केली होती तिथे प्रत्येकी 100 रु देऊन जाऊन बसलो.
उत्तरेकडे हवा स्वच्छ होती. खाली पोखरा शहराचा काही भाग ढगांनी झाकला होता. सूर्योदयाची वेळ 5.50होती. आमच्या शेजारी काही दाक्षिणात्य लोक बसले होते. हळू हळू गर्दी वाढत होती. समोरची शिखर भिंत आताही सुंदर दिसत होती. पूर्वेला लालिमा पसरला, तसा तो शिखरावरच्या शुभ्र हिमाने परावर्तित केला. सर्वात डावीकडे दरीच्या मागे दिसणारे धौलागिरी शिखर अगदी समोरचे मच्छपुच्छरे आणि त्या मागे पसरलेली अन्नपूर्णा रांगेतली अन्नपूर्णा 1, 3 व 2 ही शिखरे सोनेरी सूर्यप्रकाश प्रथम अंगावर घेण्याच्या स्पर्धेत उतरल्यासारखी भासत होती.
सूर्याच्या सोनेरी प्रकाशाचा प्रथम कनक स्पर्श धौलगिरीला झाला आणि ते उजळून निघाले. पाठोपाठ अन्नपूर्णा 1, मग अन्नपूर्णा 3 , अन्नपूर्णा 2 आणि मग मच्छपुच्छरे ही शिखरे सोनेरी उन्हात न्हाऊन निघाली. अधून मधून ढगांची लुडबुड चालूच होती पण त्याने या दृश्याच्या सौंदर्यात थोडी भरच घातली. अत्यंत सुंदर असे ते दृश्य आम्ही डोळ्यात साठवून आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करून तृप्त झालो.
बरोबरच्या दाक्षिणात्य लोकांना चमकत्या सोनेरी शिखरांपेक्षा उगवत्या सोनेरी सूर्याचेच जास्त अप्रूप होते. प्रत्येकाची रुची वेगळी हेच खरे! तृप्त अंत:करणाने आम्ही हॉटेलवर परत आलो. पोखरा ला येण्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आणि आमचा ट्रेक पूर्णांशाने समाप्त झाला!
शेवटचे पान:
अच्युत वैद्य माझे ट्रेकिंग मधले गुरू. गिरी भ्रमंती आणि त्यातले छायाचित्रण यातल्या बऱ्याच खाचा खोचा मी त्यांच्याकडून शिकलो. 70व्या वर्षी केलेला हा आजवरचा त्यांचा 25वा हाय अलटीट्युड ट्रेक. त्यांच्या उत्साहाला आणि क्षमतेला त्रिवार वंदन करावेसे वाटले. निखिल नानिवडेकर बरोबर केलेला माझा 8 वा ट्रेक. एखाद्याला लागण व्हावी असा त्याचा उत्साह, मिश्किलपणा, खाद्यपदार्थ्यांच्या चवीपासून ते माणसांच्या निवडीपर्यंत चोखंदळ असलेला निखिल मदिरेचाही तितकाच चाहता आहे. संवेदनशील मन जपणारा आणि कवितेतून व्यक्त होणारा निखिल त्याच्या बाह्य रुपापेक्षा अधिक आवडणारा आहे.
या प्रवासात अनेक माणसे भेटली. आमचा ट्रेक गाईड दिलीप भंडारी हा 51 वर्षाचा मूळचा तराई मधला गडी. शिक्षण आणि नोकरी निमित्त काठमांडू आणि मग पोखरा गाठून ट्रेकिंग गाईड झालेला हा मिश्किल गडी. खूप हाव भाव करत खूप काही सांगण्याची त्याची ढब मजेशीर वाटायची. त्याला अनुभवही चांगलाच होता. बरोबरचे पोर्टर्स त्यालाही नवीन होते पण त्याने त्यांच्याशी लगेच जुळवून घेतले आणि सहज मैत्री निर्माण केली. वाटेतल्या कोणत्याही गेस्ट हाऊस मध्ये अगदी स्वयंपाक घरात त्याचा सहज शिरकाव व्हायचा.
विकास आणि जनक आमचे भारवाहक. काठमांडुत राहणारे हे दोन फॅशनेबल तरुण दहावी नन्तर शिक्षण सोडून काही बाही काम धंदा करणारे. मोहिमेचे पोर्टर म्हणून किंवा सहायक गाईड म्हणून काम नसेल तेव्हा विकास काठमांडुत टॅक्सी चालवतो आणि जनक असेच काही बाही काम करतो. फारशी महत्वाकांक्षा नसलेले हे दोघे सामान्य नेपाळी युवा लोकांचे प्रतिनिधी स्वरूप होते.
ऑस्ट्रेलिया हुन पहिल्यांदाच ट्रेकसाठी हिमालयात आलेल्या टीमआणि त्याच्या पत्नीशी सामडो ला पहिली भेट झाली. साठी च्या आसपास असलेला टीम क्रिकेटचाही शौकीन होता. उंचपुर्या टीमची पत्नी स्थूल अंगाची असली तरी दोघांची चाल वेगवान होती. त्यांचा गाईड युवराज हा सुद्धा तराई मधला पंचवीशीतला तरुण. बऱ्यापैकी हिंदी येणाऱ्या युवराजला श्रीराम आणि हनुमानाच्या आरत्या आणि स्तोत्रे पाठ होती. निवृत्त झाल्यावर त्याच्या आजोबांनी भगवतभक्ती चा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यालाही हे सर्व पाठांतर झाले असे त्याने सांगितले. ‘मी रिटायर झालोय’ असे वैद्यांनी सांगितल्यावर त्याने हे सांगितल्यामुळे एक वेगळीच मजा आली!
दोन अमेरिकन मुलींबरोबर गाईड म्हणून आलेला धर्मराज हा कर्नाटकात खपेल अश्या अंग ढंगाचा किडकिडीत शरीरयष्टीचा तरुण. या ट्रेक रूटवर 2019 मधला त्याचा दुसरा ट्रेक होता आणि डिसेंम्बर पर्यंत तो पुन्हा तीन वेळा येणार होता. इथला दगड अन दगड त्याच्या ओळखीचा झालेला होता. अमेरिकन महिलांच्या टोळक्याबरोबर आलेला लाकपा शेर्पा हा अनुभवी शेर्पा फारसा बोलका नव्हता. बरोबर , मागे पुढे चालणारे बहुतेक नव्हे तर सगळेच विदेशी पाहुणे. त्यातले ऑस्ट्रेलिया हुन आलेले एक कुटुंबप्रमुख पाठीवर च्या सकवर चक्क फुटबॉल बांधून चालत होते. धरमशाला च्या कॅम्पवर गाईड व पोर्टर्स ना ‘उद्या मी सर्वांनी पायमोजे घातले आहेत ना ते चेक करणार आहे’ असं बजावून काळजी घेणारे ते अनुभवी ट्रेकर दिसले. पल्स ऑक्सिजन मीटर वैद्यांकडे असल्याने वरच्या कॅम्पवर असलेले सगळे लोक त्यांच्या भोवती गोळा होत. एका तगड्या जर्मन डॉकटर ने आवश्यक ऑक्सिजन कॉन्सट्रेशन बद्दल केलेलं चुकीचं विधान त्यामुळे निखिलने सप्रमाण खोडून काढले आणि त्याला सपशेल माघार घ्यायला लावली.
प्रत्येक कॅम्पवर अशी वैविध्यपूर्ण माणसे भेटली. सगळ्याचा मार्ग एकच असला तरी गंतव्य आपापल्या रुचिनुसार वेगळे!
श्वास मोजून पावले टाकणारे गिर्यारोहक, नेहमीचीच चाल झालेले गाईड आणि पोर्टर्स, कुतूहलाने सर्व पाहणारी गुबऱ्या गालाची लहान मुले, दोन्ही हाताने नमस्कार करणारी आणि नमस्ते म्हणून स्वागत करणारे ग्रामवासी, घोड्यांच्या रंगेमागून दुमडल्या ओठांची शीळ घालत आणि उकडलं म्हणून शर्ट कमरेकडून काखेपर्यंत गुंडाळून घेतलेले अनेक घोडेवाले, अतिथी देवो भव म्हणत खान पान सेवा पुरवणाऱ्या गेस्ट हाऊस च्या चालिका या सगळ्यांशी तोडक्या मोडक्या भाषेत तरी संवाद होई.
इथला माणूस सश्रद्ध आहे. वाटेतल्या तोरचेन आणि मंत्र कोरलेल्या दगडांच्या डावीकडूनच जायला हवे असे आग्रह धरणारा आहे, कोणतीही वस्तू देताना द्यावे दोहो करांनी म्हणून दोन हातांनी देणारा आहे, प्रेमळ आहे पण तरीही स्वतः:च्या कष्टावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणारा आहे. लहरी निसर्गाची देव म्हणून पूजा करणारा असला तरी त्याच्याशी दोन हात करणारा अत्यंत चिवट प्रवृत्तीचा लढवय्या आहे.
या वर्षी इथेही पाऊस लांबला. आम्ही मानसलू शिखर बघायला आलो पण त्याने आम्हाला शिकस्त दिली. रात्री कितीही पाऊस पडून ढग हटले तरी आम्ही बघायला गेलो की मानसलू तेव्हढे ढगांची दुलई ओढून बसलेले दिसे. The beuauty of the journey is not in reaching the destination but the journey itself. याचा अनुभव या ट्रेकमध्ये आला.
मार्गावर उडणारी असंख्य फुलपाखरे, चिवचिवाट करत उडणारे पण लगेच झाडा पानात लपणारे तरहतर्हेचे पक्षी, निवांत उन्ह खात बसलेले आणि चाहूल लागताच बिळातून पसार होणारे सरडे, मूकपणे सामान वाहणारी खेचरे, गुबगुबीत लव असलेली कुत्री,घरांजवळ पडलेले शिळे खरकटे चिवडणार्या कोंबड्या आणि बदके ही शब्द विहिन भूते. चार चार लोकांनी हाताचा फेर धरला तर गवसणी घालता येईल इतक्या घेराचे उंच सुचिपर्णी वृक्ष, तुकतुकीत पानांची गुरासची झाडे, बुंधा आणि फांद्यांवरची साल त्यागणारे भोजखर, पावसाळ्याच्या खुणा सांगणारी हरित पानांची फर्नकुळाची झुडुपे, वीज पडून जाळून गेलेले मोठे वृक्ष, वय झाल्यावर किंवा वाऱ्याचा जोर असह्य झाल्याने कोसळून पुढच्या पिढीला मार्ग दिलेले महाकाय तरु, ढासळलेल्या डोंगर भागातून पुन्हा वर डोकं काढणारी झाडं, छोट्या मोठ्या पाषाणावर उगवलेलं शेवाळ, बारीक पिवळ्या दगड फुलांची झाडं, तुकतुकीत टोकदार पानांतून डोकावणारी लाल चुटुक फळं, मधूनच दिसणाऱ्या मोहक रंगाच्या विषारी कावळ्याच्या छत्र्या, पाणी वाहत्या दगडावर वाढणारी दगडफुल आणि शिलाजीत सारख्या वनस्पती ही भाषाविहिन भुतं, वर्षानुवर्षे उघडे पडून ऊन, वारा, पाऊस बर्फ झेलणारे छोट्या गोट्यांपासून ते महाकाय शिलाखंड, आभाळात घुसलेले पर्वतशृंग त्यावर पडलेले शुभ्र हिमकण, पृथ्वीच्या ओढीनं खाली ओथंबणार्या हिमनद्या ……… या सर्वांशी मूक संवाद हा मार्गावर होत राहतो. प्रत्येकाची एक दिन चर्या आहे आणि जीवन कथा. तिला सुरुवात आणि आहे त्या स्वरूपाचा शेवट आहे. प्रत्येकाच्या यातनांची एक कहाणी आहे पण त्यातूनच या निसर्गाची सौंदर्य निर्मिती आहे. हे सर्व घेता यावं म्हणून मधून मधून इथं यावं…..
No comments:
Post a Comment