Friday, August 23, 2019

कळसूबाई दर्शन ऑगस्ट २०१९





२१ऑगस्ट २०१९, गेले महिनाभर दक्षिण-पश्चिम भारतात कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आणि आमचा सालाबादप्रमाणे कळसुबाई दर्शनाचा बेत ठरला. दोन आठवड्यांपूर्वी श्री. पुरंदरे यांचा निरोप आला आणि त्यांनी मित्रांची जमवाजमव केली. सकाळी ४.४५ वाजता परदेशी ट्र्ॅव्ह्ल्स च्या बसने आम्ही १७ जणांनी बारी गावाकडे प्रस्थान ठेवले. नाशिक रस्ता चांगला आणि मोकळा असल्याने ७.०० वाजताच घारगाव गाठून आम्ही नाश्त्यासाठी उतरलो.
रतनगडावरून उगम पावणारी पयोधरा अर्थात प्रवरा नदीचे हे खोरे. गोड, क्षारविरहीत अश्या अमृतमय पयाची धारा ती पयोधरा,  तिला अमृतवाहिनी हे सार्थ नाव आहे. प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि मुळा या नद्यांच्या संगमावर वसलेले संगमनेर गाव. गावाबाहेरून नवीन झालेल्या झालेल्या हायवेवरून घोटी गावाकडे रस्ता जातो. डाळींबाच्या बागा, मक्याची शेतं आणि क्वचित उसाच्या शेतांमधून जाणारा हा रस्ता पुढे प्रवरेचा काठ धरतो आणि अकोले गावात पोचतो. तिथून पुढे भात खाचरांच्या सलगीने  वळण घेत भंडारदरा-शेंडी गावात पोचताना समोरच रतनगड दिसू लागतो. मग इथून पुढे उजवीकडून हा रस्ता निघतो तो थेट घोटी पर्यंत. त्याच वाटेवर वसलेले बारी हे एक ३०००-३५०० लोकवस्तीच गाव. या वर्षीच्या महापूर पावसाच्या खुणा वाटेत दिसत होत्या. नाले, ओढ्याशेजारची झुडुपे पुरातून वाहून आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी फुलारलेली दिसली आणि पुराचे पाणी कुठवर वर चढले असेल याची कल्पना देऊन गेली. डाळिंबाच्या बागातून रसरसलेली डाळिंबे लगडलेली दिसत होती. बहुतेक खाचरातून भात लावणी झालेली. मधूनच सुटणाऱ्या वार्याच्या झुळूकीच्या लाटा त्या खाचरातून एकसमान वाढ होणाऱ्या पोपटी- हिरव्या लवलवत्या भात पिकातून प्रसरण पावत दूर दूर पळत जाताना दिसत होत्या. गर्द हिरव्या तुकतुकीत मक्याच्या पिकावर तुरे डोलू लागलेले दिसत होते आणि बांधावर लावलेल्या फरसबी च्या वेलांवर पांढऱ्या फुलांचा डौल सुंदर दिसत होता. गुढग्याएवढ्या झेंडूच्या पिकातून आता टपोरे भगवे गेंद डोकावू लागले होते.  भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या एखाद्या सुपुत्राच्या आठवणी निमित्त लावलेला एखादा फलक, किंवा गावाची कमान इथल्या लोकांच्या शौर्याची आठवण देत होते. इथे पोचेपर्यंत आकाशात निळ्या रंगाचेच प्राबल्य होते आणि त्यामुळेच आपल्याला आज उन्हात चढायला लागणार का काय? अशी चर्चा बसमध्ये सुरु झालेली होती. संगमनेर-बारी रस्ता छोटा आणि पावसाने त्याची दुरवस्था झालेली असल्याने बारी पर्यंत पोचायला मात्र १०.३० वाजले.
बारी मधल्या पहिल्याच हाटलाबाहेर बस पार्क करून आणि तिथेच परतल्यावर जेवायची ऑर्डर देऊन, संध्याकाळी चारची वेळ पाळायचा हुकुम घेऊन चढायची वाट धरली. बारीच्या वेशी वरचा ओढा गुढग्याएवढ्या पाण्याने फुगून संथ वाहत होता. नितळ पाण्यातून तळाचे गोटे आणि दगड स्वच्छ दिसत होते. अर्थातच ते बूट काढलेल्या तळपायांना गुदगुल्या करणार नव्हते. हातात बूट धरून तोल सांभाळत ढोपरभर पाण्यातून ओढा पार केला आणि पाय वाळत आहेत तोवर मस्तपैकी ओल्या मातीतून शेताच्या बांधावरून चालत जाण्याचा आनंद लुटला. पुढे चढ सुरु झाला, वाटेवरच्या मुरुमाड दगडांवरून ओल्या मातीचा थर बसला होता आणि त्यावर पायाचा ठाव लागत नव्हता, त्यामुळे चढतांना सुद्धा घसरण्याची भीती बाळगत जपून पावलं टाकत आम्ही चढ चढू लागलो.
चढाचा पहिला टप्पा पार केल्यावर थोडी सपाट जागा लागते, तिथे एक मंदिरही आहे आणि स्वागताची कमान. खरा ट्रेक इथूनच सुरु होतो, पहिली वाट तर फक्त एक झलक आहे. कळसूबाईचा पर्वत खूप उंच आणि सरळसोट चढाचा. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील कोणत्याही डोंगर माथ्यावर चढाई करायची तर एखाद्या सोंडेवरून सुरुवात करावी आणि मग समोर येतो तो सरळ उंचीचा कातळभाग. या कातळावरून चढून जाण्यासाठी कधी पाण्याच्या वाटेतून, तिथल्या घळीतून पायऱ्या खोदलेल्या सापडतील तर कुठे चक्क खोबणींचा आधार घ्यावा लागेल. कळसूबाई च्या या वाटेवर सुरक्षिततेसाठी भक्कम कठडे आणि शिड्या बसवल्या आहेत. सोंडेवरून येणाऱ्या पायवाटेचा चढ सुद्धा दमछाक करणारा आहे. शिड्यांवरून जाताना त्यातल्या चढामुळे आणि एकसुरीपणामुळे पायात गोळे येतात. पण थोड्याच अवधित आपण एकदम उंची गाठून वर जातो. पेंडशेत गावावरून येणारी वाट दक्षिणेकडूनच्या रांगेवर चढून येणारी आणि मग मुख्य शिखराच्या खाली बारीकडच्या मुख्य वाटेला मिळणारी. तिथे अश्या शिड्या नाहीत. ती वाट ज्या खिंडीला लागून वर चढते ती खिंड इथल्या शिडीच्या पायथ्यापासून डावीकडे वर दिसू लागली.
आज पहिल्या टप्प्यावर उन्हामुळे आम्ही घामाघूम झालो पण लवकरच आभाळाने किमया केली आणि वाटेवर ढगांनी सावली धरली. शिड्यांचा टप्पा पार करेपर्यंत भुरभूर पावसाची सर येऊन चढाईचा शीण हलका झाला.खाली दूरवर बारी आणि जहागीरदारवाडी गावे, मुख्य रस्ता आणि त्यापासून बारीपर्यंत येणारा रस्ता दिसत होता. लवकरच शिखर ओलांडून ढगांनी खालच्या दिशेने झेप घ्यायला सुरुवात केली आणि मग समोरचे दृश्य धुकट व्हायला लागले. इथपर्यंत दीड तास झाला होता आणि आता पुढच्या अर्ध्या पाउण तासात शिखर माथा गाठायची ओढ लागली. शेवटच्या टप्प्यात धुकं इतकं दाट होत कि अगदी दहा फुटांवरच दिसेना. पण वाट चांगली मळलेली असल्याने चुकायची भीती नव्हती. शेवटच्या शिडीवरून वर पोचलो तेंव्हा चढायला सुरुवात करून सव्वा दोन तास झाले होते. समोर कळसूबाईचे दगडी चिर्यात बांधलेले मंदिर किंवा घुमटी, त्यासमोर बांधलेली छोटीशी घंटा आणि उजवीकडे झेंड्याची काठी, घोंघो वाहणारे वारे आणि वेगाने वाहून जाणारे दाट ढग,मधूनच ढगातून निर्माण होणारी पोकळी आणि त्यातून अलगद उतरणारा उन्हाचा उबदार स्पर्श.....अगदी स्वर्गात असल्यासारखे स्वप्नवत!
या वर्षी पाऊस अगदी कॅलेंडर प्रमाणे वागलाय. आषाढात धुवाधार तर श्रावणात उन्हा पावसाची लपाछपी. श्रावणातले हे वातावरण म्हणजे कीटकांचे नंदनवनच. चढाच्या वाटेवर असंख्य किटकांनी आमच्यावर आक्रमण केलं. चेहरा, मान, हात आणि पायावर त्यांच्या नांग्यांचे असंख्य दंश सहन करताना आणि शक्य होईल तितक्या कीटकांना उडवून लावताना माणसाला शेपूट आणि हलणारे कान का नाहीत असा प्रश्न पडून गेला, गळून पडलेली शेपूट हे प्रगतीचे लक्षण नाही.....किमान अश्या वातावरणात तरी!
कळसुबाई शिखर महाराष्ट्रातले सर्वात उंच ठिकाण १६४६ मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवरचे. कळसूबाई हि या गावची सून, तिला बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती होती आणि ती गावच्या सर्वांची या ज्ञानाने सेवा करायची. तिची आठवण म्हणून गावकर्यांनी या शिखरावर तीच मंदिर बांधलं आणि या शिखराला तीच नाव दिल अशी एक आख्यायिका आहे. अश्या अनेक गोष्टी असतील, पण अश्या कोणत्याही अख्यायीकेतील कळसू हे नाव हा काही योगायोग असेल असे वाटत नाही.
आमच्या पाठून तरुणांचा एक घोळका चढून येत होता. वर पोचल्या पोचल्या त्यातल्या प्रत्येकाने आवर्जून कळसुबाईच्या मंदिरात जाऊन नमस्कार केला हे विशेष वाटल.
थोडीशी पोटपूजा, फोटो टिपले आणि मग उतरायला सुरुवात केली. डोंगर उतारावर निळी जांभळी फुले फुलली होती. वाऱ्याच्या तालावर डोलत होती, अगदी लहानपणच्या त्या फुलराणीसारखी. शिडीच्या पायथ्याशी एक विहीर आहे, तिथे पोचल्यावर थेट १९९३ मध्ये पहिल्यांदा इथे आलो त्या गमतीशीर ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. पुढच्या वाटेवर दोन्ही बाजूला तेरड्याची झाडे अगदी गच्च वाढलेली होती. लवकरच इथे सगळा परिसर तेरड्याच्या लाल फुलांनी गालिच्यासारखा लाल, गुलाबी होऊन जाईल!
उतरताना पावसाच्या एक दोन सारी चांगल्याच भिजवून गेल्या, त्यानेही आमची हौस चांगली पुरवली. कळसूबाईचा उतार कंटाळवाणा आहे, शेवटच्या टप्प्यात तर अगदी केव्हा एकदा गावात पोचतो असे होऊन जाते! वास्तविक हाच चढ चढताना असा कंटाळा येत नाही हे विशेष!!
उतरून खालपर्यंत यायला जवळपास दीड तास लागला. बारी च्या ओढ्यातल्या थंडगार पाण्याने पायाचा शीण पार कुठे तरी दूर पळवून लावला. पुढे येऊन बूट चढवण्यासाठी एका दगडावर बसलो. समोरच्या डोंगर उतारावर दोन बैल उधळताना दिसले. त्यांची राखण करणारा विशीतला तरुण गडी त्यांना पकडण्या साठी पाठोपाठ पळत होता. त्या दोन्ही बैलांच्या डोळ्यात एखाद्या द्वाड मुलासारखे भाव होते. कासर्या सकट उंडारलेल्या त्या बैलांच्या नाकात वेसण होती पण ते त्याच्या ताब्यातून निसटले होते. अंगात काळे जाकेट घातलेल्या त्या तरुणाने गळ्यात पाठीच्या बाजूला छत्री अडकवली होती. आणि तो त्या भुऱ्या बैलांना पकडण्याच्या मोहिमेवर होता. थकला होता त्यामुळे माझ्या शेजारच्या दगडावर येऊन बसला. खिशातल्या मोबाईल फोन वर संबळ तुणतुण्याच्या तालावर भारुडासारख्या भरड आवाजात कुठलं गाण त्यान लावल होत आणि तो ते गुणगुणत होता. आता त्याचं कडव आठवत नाही पण धृपद त्याचही पाठ होत आणि त्याच्या ओळीत “मी आदिवासी- मी इथला मूळ निवासी” असे शब्द ऐकून माझे कान टवकारले. मी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्यान मला फारसा प्रतिसाद दिला नाही. इतक्यात ते गाण संपलं आणि पुढच गाण एकदम वेगळच- “ ती मला दिसलीया अन माझ्या मनात भरलीया......” हेही त्याच पाठ झालेलं होत.
तरुण पिढीच्या तोंडी कोणती गाणी असतात हे पहा, त्या राष्ट्राच भविष्य काय असेल त्याचा अंदाज येईल असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, त्याची मला आठवण झाली.
परतून हाटलात फक्कड जेवणावर ताव मारला आणि मग घरचे वेध लागले. गप्पांच्या कल्लोळात परतीचा प्रवास सुरु झाला खर परंतु “मी आदिवासी- मी मूळ निवासी” या गाण्याच्या धृपदाचा तो ठेका मात्र माझ्या मनातून जात नव्हता. अकोले गावातून परतताना एका कमानीने माझे लक्ष वेधून घेतले. महर्षी अगस्ती ऋषी आश्रम स्वागत करीत आहे असे काहीसे त्यावर लिहिले होते. नाशिकचा हा परिसर प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले दंडकारण्य म्हणून आपल्या पुराण साहित्यात प्रसिद्ध आहे. त्या वेळच्या इतिहासाचा इथे नक्कीच संदर्भ असणार म्हणून आज गुगल गुरूंना माहिती विचारली. महर्षी अगस्ती हे मंत्रद्रष्टे ऋषी. त्यांचा जन्म इ.स. पूर्व ३००० वर्षात कधीतरी काशी क्षेत्री झाला असे मानतात. अगस्ती ऋषी उत्तरेकडून दक्षिणेत आले आणि इथेच स्थायिक झाले. रामायणात असा उल्लेख आहे कि त्यांनी भगवान श्रीरामांना दक्षिणेत राक्षसांचे निर्दालन करण्यास आणि रावणाचे पारिपत्य करण्यास सांगितले. श्रीरामांनी रावणाचा पाडाव करून ते जेव्हा अयोध्येत परतले त्यानंतर अगस्ती मुनी ऋषी गणांसह अयोध्येत त्यांचे अभिनंदन करायला गेले. रावणपुत्र मेघनाद याचा वध केल्याबद्ल त्यांनी श्रीरामांचे विशेष अभिनंदन केले. असे विशेष अभिनंदन करण्याचे कारण म्हणून राक्षसांचा कुल वृत्तांत सर्वांसमोर सांगितला असा उत्तर रामायणात उल्लेख आहे. आर्य-द्रविड थियरी ( आर्यन इन्वेजन थियरी) नुसार आर्यांच्या वसाहतवादाचे जनक हे महर्षी अगस्ती होते. त्यांच्या अनेक अश्रामांपैकी प्रमुख आश्रमात अकोले इथल्या आश्रमाचा उल्लेख आहे. स्वाभाविक आहे कि इतिहासाच्या कोणत्या तरी कालखंडात त्यांचे या परिसरात वास्तव्य राहिले असले पाहिजे. महर्षी अगस्तींचे पूजन अगदी इंडोनेशिया पर्यंत केले जाते असा उल्लेख सापडला. अर्थातच ते कोणी असामान्य पुरुष असले पाहिजेत.
या भूमीचा इतिहास काही हजारो वर्षांचा आहे. स्वाभाविक आहे कि इथला मूलनिवासी कोण? तो मूळ स्वरूपात शिल्लक तरी आहे का?असे प्रश्न उपस्थित होतात. आणि तो मूळ निवासी तर मग मी कोण? प्रजापती दक्ष, जो एक राक्षस राजा होता त्याचेही या भूमीवर उपकार आहेतच आणि त्याची उत्तुंग कारकीर्द हेही आमच्याच दैदिप्यमान इतिहासाचा एक खंड आहे. आम्ही जसे त्याचे वंशज आहोत तसेच श्रीरामांचे, श्रीकृष्णाचेही आहोत. बारी गावाच्या वेशीवर सहज गाणे गुणगुणणारा तो माझा तरुण बांधव हाही तितकाच याच परंपरेचा पाईक आहे, माझी आणि त्याची संस्कृती एकच आहे. फक्त “ मी(च) मूलनिवासी” ही मांडणी चुकते आहे. तो ग्रामनिवासी आहे आणि मी शहरनिवासी. तो ग्रामवासी आहे म्हणजे मागासलेला आहे आणि मी शहरवासी आहे म्हणजे मी पुढारलेला आहे हि चुकीची समजूत काढून टाकायला हवी. त्याची जगण्याची रोजची पद्धत निराळी आहे आणि माझी निराळी इतकच काय ते! ...... काम अवघड आहे, पण आवश्यक आहे असे वाटून गेले.
सत्यजित चितळे, २२ ऑगस्ट २०१९


No comments:

Post a Comment