सोमवारी मध्यान्हीला ऑफिसमध्ये
बसलेलो असताना पावसाची जोरात सर आली. खिडकीतून सहज बाहेर
पाहिलं तर त्या माऊलींची आठवण जागी झाली. शुक्रवारी दुपारी
साधारण याच वेळेस वारीतल्या दिंडीबरोबर दिवे घाट चढत असताना मला थोडस ढकलून च तो पुढे
गेला होता. दिवे घाटात पावसानं असच आम्हाला
गाठलं होत. तीन बटन उघडलेल्या त्याच्या
सदर्यातून त्याच्या बंडी वरची तुळशीची माळ दिसत होती. आडवार पसरलेल्या पांढऱ्या मिशांतून माऊली माऊली
चा घोष करत तो पुढे जात होता. चारच पावलांवर त्याची
कारभरीण डुईवर तुळशी वृंदावन तोलून पावलं टाकीत होती आणि शेजारी त्याची म्हातारी. वडकी नाल्याजवळ भ्रष्टाचार निर्मुलन समिती तर्फे
तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या वारकरी महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान केला जात होता. ती सन्मानाची साडी त्या माउलींनी खांद्यावरच्या
पिशवीत ठेवलेली दिसत होती. दिवे घाटात दुसऱ्या कुणा दिंडीतल्या वारकर्यांनी तळ टाकलेल्या
रिगणात रंगलेली फुगडी पाहण्याच्या
नादात हा मागेच राहिला होता आणि मग ओळखीची माणसं शोधण्यासाठी तो धावत पळत घाट चढत आला. ‘तुमी इथवर आला व्हय, म्या तुमाला मागचं बघत व्हतो।‘ तो कारभारणी ला म्हणाला
आणि त्याच्या दिंडीतल्या इतरांबरोबर रामनामाचा जप करत चालू पडला. माणसांनाच हा समुद्र खर तर चालला होता पंढरपुरास, त्यातून दिंडीचे पुढचे मुक्कामाचे ठिकाण नक्की असलेले
पण तरीही आपल्या माणसाची वाटणारी ओढ हे मायेचे लक्षण इथे पाहायला मिळाले.
वारीचा एक वेग असतो, वारकऱ्यांची एक शिस्त असते आणि दिंडीचा ठरलेला क्रम. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन गोळीबार
मैदानापाशी घेऊन आम्ही पुढे निघालो. पालखीचा रथ ताज्या
गेंडेदार फुलांच्या माळांनी सुंदर सजवलेला, निशिगंध लिलीच्या
फुलांचे सर त्यावरून खालपर्यंत सोडलेले आणि त्यात मधून मधून गुंफलेली गुलाबाची फुले. माऊलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी राथापाशी रेटा रेटी
होत होती.
रथ ओढणारे बैल गर्दीमुळे बावरलेले. त्यांचा नैसर्गिक वेग आणि पुढच्या दिंडीचा वेग यात
अंतर असल्याने पालखीचा रथ थोडा थांबत असतो. पुन्हा थोडे अंतर
पडले की पटकन पुढे होत असतो. रथ थांबला की दर्शनासाठी
एकदम गर्दी होते. रथ निघाला की मग पळापळ रेटारेटी
आणि चढाओढ. काही वेळेस इतकी वेगवान की
धडधाकट माणूस सुद्धा लांबूनच दर्शन घ्यावे म्हणेल. याच भाऊगर्दीत एक
कुटुंब आपल्या घरातल्या नव्या सभासदाला माऊलींच्या पायावर घालण्यासाठी आलेलं. आजीच्या हातात ते कोवळं तान्हुलं शांत झोपलं होत. इतक्या गर्दीत कशाला हा अट्टाहास अस माझ्या मनात
सहजच येऊन गेलं आणि पुढे काय म्हणून माझे पाय काही वेळ स्तब्ध झाले. दिंडीला गाठण्यासाठी वेगानं चालणारा रथ अचानक थांबवला
गेला, काही सेकंदासाठीच, माणुसकीचा हे दर्शन मला सुखावून गेलं. ‘पुंडलीका भेटी परब्रह्म आले गा।‘हे अभंगातील वर्णन
मला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसलं. इतक्या भाऊ गर्दीत
पालखीच्या रथात बसलेल्या मानकऱ्यांपैकी एक छोटा मुलगा मात्र त्या सोडलेल्या फुलाच्या
सराशी खेळण्यात गुंगला होता. वारी, माया, भागवत पंथ वगैरे त्याच्या
मन रामविण्याच्या कल्पनांच्या पलीकडील होत. त्याची निरागसता सहज
भावली. हडपसरच्या पुलाजवळ पहाटेच उठून रखुमाईच्या थाटात
नटूनथटून आलेली एक चिमुरडी हातातला राजगिर्याचा लाडू खात पालखीची वाट पहात होती. एरवी वाहनांनी भरलेल्या रस्त्यावरून आज हे एव्हढे
लोक कुठे चालत चाललेत हे तिला समजत नसावं, तीचं ते समजण्याचा
वयही नव्हतं पण हौस मात्र दांडगी! दिवेघाटाच्या खिंडीत उजव्या बाजूच्या मंदिरात असाच
एक गोरा गोमतेला चिंटू ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात आपल्या मामाबरोबर दर्शन ‘घेत’ उभा
होता. त्याच्याही डोळ्यात ते कुतूहल मला दिसलं.
सासवडकडून पुण्याच्या दिशेनं
पहिलवानी तब्येतीचे कडक लिनन चे शर्ट घातलेले तरुणांचे घोळके पालखीच्य दर्शनासाठी येत
होते. विशीतल्या त्याच्या देहबोलीत भक्तीचा भाव कमी आणि
मिरवायला आल्याचा भाव जरा जास्त होता. वारीत चालणाऱ्या ‘युवकांच’
वयोमान मात्र तिशी- चाळीशी तल असल्याचं जाणवलं. दिंडीतले बहुतेक तरुण पखवाज वादक, विणेकरी अथवा टाळ घेऊन भजन आणि कवनं म्हणत भक्तिरसात
न्हाले होते. दिवेघाटाच्या माथ्यावर जिथे
हे क्षण अनुभवत होतो तिथेच रॉबिनहूड आर्मी नावाच्या चक्क विदेशी नावाचे टीशर्ट घातलेली
शहरी वळणाच्या तरुण-तरुणींचा गट सर्वांना लिंबू
सरबताच वाटप करत सेवा करत होता. या पथकाचे वैशिष्ट्य
म्हणजे ते सर्व जण पेपरचा कप टाकू नका आमच्याकडे परत द्या अस अग्रहपूरर्वक आवाहन सर्वांना
करत होते.
दोन चार स्वयंसेवक पुढे उभे
राहून सरबत पिणाऱ्यांकडून रिकामे कप परत घेत होते. आधी रस्त्यावर ठिकठिकाणी
चहा वाटप होत होते आणि त्या सगळया परिसरात चहाच्या रिकाम्या कपांचा सडा पडलेला होता, फुरसुंगीजवळ अश्याच एक चहा वाटप केंद्राजवळ हताशपणे
बसलेले पुनावाला क्लीन सिटी चे कर्मचारी माझ्या डोळ्यासमोर अजून होते.त्या पार्श्वभूमीवर रॉबिनहूड आर्मी ने व्यापलेला परिसर मात्र
एकदम स्वच्छ असल्यानं त्याचे वेगळेपण नजरेत भरत होतं.
असच वेगळेपण सासवडजवळ एका
गणेश मंडळाच्या व्यवस्थेत दिसलं. अन्यथा वरीतल्या स्वच्छता
विषयाचा अनुभव अत्यंत उणा होता. वरीतल्या काळात मुक्कामाच्या
गावातील स्वच्छतेच्या प्रश्नावर काही
वर्षांपूर्वी सेवा सहयोग ने पुढाकार घेत निर्मल वारी चा उपक्रम यशस्वी केला
आणि संघ प्रणित संघटनांच्या प्रयत्नातून आता त्याचे एका चांगल्या चळवळीत रूपांतर झाले
आहे. परंतु सार्वजनिक स्वच्छता आणि समाजाच्या मालकीच्या
संसाधनांचा सुयोग्य वापर या विषयी आपल्या समाजाला किती मजल मारायची आहे याची जाणीव
अश्या अनुभवातून होते. मी अत्यंत खुजा परंतु आषाढी वारीसारख्या परंपरा
या समाज परिवर्तनाचे साधन ठरू शकतील का? असाच प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात डोकावला.
ट्रेकिंग करताना अवघड, अंगावरचे चढ चढताना श्वास व पावलातला रिदम साधण्यासाठी
आणि कवचित मनोधैर्य टिकवण्यासाठी मनातल्या मनात ‘when the going gets tough, the tough gets
going' असं घोळवत जायचा प्रघात मी गेली काही वर्षे पाळतोय, या वर्षी वारीत मला
आणखी एक असाच ताल सापडला तो ‘माऊली हळू हळू चाला मुखाने रामनाम बोला’ या बोलातून. या तालात भक्ती आहे पण अभिनिवेश नाही. व्यक्तिगत अभिनिवेश आवश्यक असला तरी अनेक वेळेस
उगा त्रागा करायला भाग पाडतो. कामाच्या गर्दीमूळे
मनात उसळणाऱ्या विचारांच्या लाटा शांत सहज होतात वारी केल्यावर. शांत पाण्यात वेगानं पोहणारं एखाद बदक अपल्यमागून
फेसळणाऱ्या पाण्याची एखादी रेष सोडून जात तस एखादा वारकरी, एखादा भाविक, एखादा याचक किंवा
सेवेकरी सुद्धा मनाच्या पटलावर विचारांची रेघ सोडून जातो पण तिथे एखाद्या अनुभवाची
ही रेघ महणजे ओरखडा उरत नाही, ती केव्हाच विरून
जाते मनाच्या गाभाऱ्यात आणि मग त्यातून उठणारे तरंग फक्त उरतात, मन गढूळ करणाऱ्या विचारांना शांत करत किनाऱ्याकडे
शांतपणे विरत जाणारे. वारीचा हा दुसरा अनुभव म्हणूनच
मला भावला.
सत्यजित चितळे, पुणे
6 जुलै 2019
No comments:
Post a Comment