Thursday, March 31, 2016

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे :
जोराच्या वाऱ्याबरोबर सावरीच्या बोन्डातल्या म्हातार्या उडाल्या. बीजाच्या संकल्पापासून पासून एकत्र वाढून आता आपणच बीजाचे रूप धारण केलेल्या त्या म्हातार्या. आजवर त्या बोंडात सुखरूप वाढलेल्या. आता नव-निर्मितीचा वसा घेऊन पुढे निघाल्या. वार्याच्या लाटेवर तरंगत तरंगत आपल्या पालक झाडापासून दुरावल्या. त्यांच आयुष्य कुठे स्थिरावणार होत? हि सुरवात होती का शेवट? त्यांना माहित नव्हतं. सृष्टीचा नियम त्या मोडू शकत नव्हत्या. जे आखून दिलय तसं घडवायला निघाल्या होत्या. वार्याच्या लाटेवर विहरत जाताना त्यांना स्वच्छंद जगणं म्हणजे काय याची थोडीशीच कल्पना आली होती . निसर्गाने निर्माण केलेली विविध रूपं त्या जवळून बघत होत्या. त्यांतल्या काहींना वाटलं असाच आस्वाद घेत फिरावं या निसर्गाच्या रूपाच आकंठ सेवन करावं, सोडून द्याव ते नव-निर्मितीच व्रत.
वारं पडलं तसं त्यातल्या काही योगायोगानं भुसभुशीत काळ्या मातीवर विसावल्या. सर्वच म्हातार्यांच्या बाबतीत असा शुभ योग येत नाही, काही अडकतात झाडा झुडपात तर काही चक्क नाठाळ कातळात. त्यांच्या जीवनाची इतिश्री तिथेच. पण काही ठरतात भाग्यवान, ज्यांना मिळते उपजाऊ, समृद्ध काळी जमीन. तिथ विसावताच त्यांचा पिसारलेला केशसंभार गळून पडला. त्यांच्या आगमनाच स्वागत झालं ते  खाद्याच्या शोधात सैरावैरा फिरणाऱ्या मुंग्या, वाळवीचे कीटक यांच्याकडून, ती बीजं त्याच भक्ष्य होत्या. पण निसर्गान त्यांना काही सुरक्षा कवचं दिलेली होती त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी. त्यांचा आता संघर्ष सुरु झाला होता. कशासाठी? काहींना त्यांच्यातली निर्मिती क्षमता खुणावत होती तर काहींना स्वछंद जीवन जगण्याची ओढ.   ग्रीष्माच्या  सुरुवातीच्या वळीवाची आता आर्जवं सुरु झाली. कधी वावटळ उठे आणि उडणारी धूळ त्यांच्यावर पांघरूण घालून जात असे. त्यांच्या दृष्टीने ते  चांगलच होतं. त्यांची आर्जवं वरूण देवानं ऐकली आणि मेघांच्या गडगाडासहित  वळीवाचा पाऊस  हजर झाला.  निर्मितीला आवश्यक असे जलतत्त्व त्यांना मिळालं, त्यानी ते आकंठ पिऊन घेतलं. वळीवाच्या पावसानं जमिनीचा वरवरचा थर ओलाचिंब केला. वातावरण गार झालं पण जमिनीतली ऊब पोषक होती, मग त्यातल्या एखाद्या बीजातून अंकुर फुटला. त्यान वाळलेल्या चिखलातून डोकं वर काढलं आणि मोकळा श्वास घेतला. त्या बीजाच कवच आता गळून पडलं होतं आणि त्याचं एक इवलस रोप झालं होत. काहींनी या प्रक्रियेत सहभागी होण्याच नाकारलं. त्यांनी त्यांची कवच कुंडल सांभाळून ठेवली, ऋतुचक्राचा अनुभव घेत राहण्यासाठी, एकलकोंडेपणाने जगण्यासाठी. त्यांच्या मते तेच तर त्यांच्या जीवनाचे सार होतं.
अंकुरलेल्या रोपाला वर्षा ऋतूतील पाण्यानं संजीवनी दिली, वालेल्या पानांनी बाल दिलं. त्याचं चांगलं रोपटं झालं. शिशिरात त्याची पानं गळाली आणि ते रोपट भकास खुरटं दिसू लागलं. त्याच्या शेजारीच जमिनीत पडलेल्या दुसर्या भाकड बीजानं ते पाहिलं आणि ‘हेच का ते नव-निर्मितीच स्वप्न?’ असा म्हणून त्याची कुचेष्टाही केली. पण रोपटं खट्टू झालं नाही. मग वसंत आला, नवी संजीवनी घेऊन, रोपट वाढत होतं. पुन्हा ग्रीष्म, मग पाऊस असं चक्र पुढे सरकत गेलं. जमिनीत त्याच्या बरोबरच पडलेल्या दुसर्या बीजाने निसर्गाचे हे चक्र आणि त्यातला चढ उतार अनुभवला खरा पण आता त्याला काही तरी राहून गेलं अशी बोच लागू लागली. जोमानं वाढलेलं आणि आता वृक्ष स्वरूप धारण केलेला त्याचा भाऊ बघितला कि त्याचा मत्सर जागृत होत असे. रुतुचाक्राच्या अशा आवर्तनात  एकदा अशीच वसंत ऋतूची चाहूल लागली आणि निष्पर्ण झालेल्या त्या सावरीचा नव-वृक्षाला धुमारे फुटले. एका सप्ताहातच त्याची फांदी अन फांदी नाजूक पण मोठ्या लाल फुलांनी बहरून गेली. त्यान पान्थस्थांचं लक्ष आकर्षित केल तसाच तांबट , बुलबुल अश्या विहन्गांचही. आता मात्र अजूनही बीज रुपात अस्तित्व टिकवलेल्या त्याच्या भावाच्या भावनांचा बंध फुटला. जीवनाचं सार त्याला कळून चुकलं. पण त्याच्या दृष्टिनं आता फार उशीर झाला होता. त्याची निर्मितिक्षमता आता लयाला गेली होती.

कार्ल्याच्या लेण्या बघून परत येतांना पवनेच्या काठावरल्या त्या सावरीच्या वृक्षानं मला एकदा मोहित केल होत, त्याच्या बहारदार फुललेल्या अवस्थेकडे अनिमिष नेत्रांनी बघत बसलेलो असताना त्यांनच सांगितलेली त्याची हि कहाणी. मला माणसांच्या जीवनासारखीच वाटली. कोण कुठे जातो, कुठे वसतो त्याला सुरुवातीला काहीच कल्पना नसते. अंकुरण्याच सामर्थ्य सर्वांनाच सारखच दिलाय देवानं, पण एखादा ते  स्वीकारतो, रुजतो आणि त्याचा कल्पवृक्ष होतो काही मात्र मिरवत राहतात स्वतःच वेगळ अस्तित्व, वांझोट्या बियाण्यासारखं !

Sunday, March 13, 2016

बालपण देगा देवा:

बालपण देगा देवा:
होळी पौर्णिमेला आमच्या सोसायटीत नारळाच्या झावळ्यांची होळी धडाकून पेटायची आणि उन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागायची. परिक्षेसाठी अभ्यास संपत आलेला असायचा. दहावी आणि बारावीच्या परिक्षा चालू असल्याने शाळा ही कधी एक तास, कधी दोन तास तर कधी जास्तीत जास्त तीन तास असायची. उरलेला वेळ घरी अभ्यास करता करता उन्हाळ्याच्या सुट्टीचे बेत करण्यात जायचे.
थंडीच्या दिवसात मला सूर्योदय बघायला मिळायचा,  तो सूर्यदेव हळू हळू मार्च महिन्यापासून मी उठायच्या आधीच हजेरी लावायला लागायचा. नेहमी उठायच्या वेळेस बाबा खोलीतील पडदा सरकवायचा,  आणि मग कोवळी उन्ह अंगावर पडल्यावर जाग यायची. आता उठून शाळेत जायचं या कल्पनेनं मला फार वाईट वाटायचं. माग आई सुट्टीचं आमिष दाखवायची आणि ते गाजर समोर असल्याने आमची स्वारी हलायची. ‘हा अगदी बाबावर गेलाय’ अशी कॉमेंट मग कानावर यायची. बाबासुद्धा लहानपणी उशीराच उठत असे बहुतेक, पण आता तो मान्य करायचा नाही!
एप्रिलच्या १०-१२ तारखेला परिक्षेचा शेवटचा पेपर असायचा. त्याआधी महिना दोन महिने मजेच्या सर्व साधनांवर आणि खाण्यावर बंदी असायची. केबल टीव्ही च्या सेट टॉप बॉक्स ला पासवर्ड घालून अटकाव केला जायचा. बाबा शाळेत असताना आबांनी टीव्ही घेतलाच नव्हता त्यामुळे अशी आणीबाणी जाहीर करावी लागत नसे. ती आणीबाणी त्यादिवशी उठायची. आई बाबांबरोबर जाऊन हॉटेलमध्ये तुडुंब जेवण आणि मनसोक्त आईस्क्रीम खाण्याचा तो दिवस. रात्री उशिरापर्यंत कार्टून बघण्यास त्या दिवशी मुभा असायची. बर्याच वेळेस कोणती कार्टून बघायची आहेत त्याच्या सीडी आम्ही आधीच गोळा करून ठेवलेल्या असत. बाबा सांगत असे कि तो लहान असताना तो अशी कॉमिक्स ची पुस्तके गोळा करून ठेवायचा आणि सुट्टीच्या पहिल्या रात्री उशिरापर्यंत वाचायचा. त्याच्या भावविश्वात मॅंड्रेक, लोथार सारखे फुसके आणि सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा बटमॅन सारखे सदाहरित हिरो आणि चाचा चौधरी सारख्या भाकड गोष्टी असत. आम्ही मात्र  छोटा भीम, माईटी राजू, कृष्णा यासारख्यांवर जास्त विश्वास ठेवायचो. हनुमानाच्या कथा अॅनिमेशन फिल्म्स बघून बघून पाठ झाल्या होत्या. बाबा म्हणायचा की अॅनिमेशन फिल्म्स मध्ये दाखवतात त्या कथा खर्या नसतात, मूळ कथेमध्ये थोडा जास्त मसाला भरून त्या प्रदर्शित केल्या जातात असा त्याचा दावा असे. त्यानं कधीतरी पुराणात वाचलेल्या हनुमानाच्या कथा याच खर्या आहेत असे तो ठामपणे आम्हाला सांगायचा. आम्ही बघायचो त्या अॅनिमेशन फिल्म्स मधलं खरं की बाबाने त्याच्या बालपणी वाचलेलं खरं याचा निवाडा आजीसुद्धा करू शकत नसे! पण आम्ही दोघही आमच्या आमच्या भावविश्वात रममाण होत असू.
दुसर्या दिवशी अभ्यास नसूनही सूर्योदयाच्या आधीच जाग यायची. मग मित्र गोळा व्हायचे आणि आम्ही आमच्या सोसायटीत खेळायला पळायचो. या दिवसात सगळीकडे ‘प्रो कबड्डी’ आणि मग नंतर ‘आय.पी.एल’ नावाची साथ पसरायची. सकाळी उठल्यापासून नाश्त्याची वेळ होईपर्यंत ज्याची साथ पसरलीय तो खेळ चालायचा. आम्ही कबड्डीसुद्द्धा बूट आणि ‘नि कॅप’ घालून खेळायचो त्यामुळे शक्यतो कुठे खरचटायचे नाही. मग आमच्या नाजूक पणाची बाबा चेष्टा करायचा. त्याचा कधीतरी कबड्डी खेळताना हात मोडला आणि त्याची सुट्टी बुडाली अशी आठवण सांगायचा. कोणतेही सुरक्षा साधन न घालता खेळून इजा झाल्यावर आपलीच सुट्टीची मजा कमी करण्यात काय अर्थ आहे? या प्रश्नाला मात्र त्याच्या जवळ उत्तर नसायचे.
घरी येऊन नाष्ट करून झाला की मग आम्ही क्लब हाउसमध्ये जमायचो. टेबल टेनिस, कॅरम सारखे खेळ रंगात यायचे. घरून येताना सगळेच जण पाण्याची बाटली घेऊन यायचे. घामाघूम झाल्यावर हळूच क्लब हाउसमधल्या फिल्टर आणि कुलरचे पाणी प्यायचो. ‘भलते सलते पाणी पिऊ नका’ अस आई रागवायची तरी सुद्धा! ती तिच्या लहानपणी कुणी तरी दिलेलं माठातलं गार पाणी पीत असे आणि त्याला येणाऱ्या मातीच्या क्वचित वाळ्याच्या वासाचं कौतुक सांगत असे, तसा वास या कूलरच्या पाण्याला येत नसे पण जीवापलीकडे दमछाक झाल्यावर लागणारी तहान मात्र भागत असे.
अक्षय्यतृतीयेला पहिला आंबा घरी येत असे. आणि मग तोंडं रंगवत आणि कोपरापर्यंत ओघळणारा त्याचा रस जिभेने चाटत आम्ही त्या अमृत फळाचा आस्वाद घेत असू. आबा आणि बाबा सांगात असे त्याप्रमाणे रायवळ आंब्याचा ढीग करून ते चोखून आम्ही कधी खाल्ला नाही. महाग असे म्हणून डझनात न येता एककात येणारा हापूस आंबा मात्र जिभेचे तेव्हढेच लाड पुरवत असे.
दुपारचा वेळ बहुतेक वेळा घरातच जाई. माग पुन्हा मित्र जमत, क्रिकेट अटक्स, टेबल क्रिकेट, रिमोटवर चालणार्या गाड्या, हेलीकॉप्टर सारखे खेळ रंगात येत. आईन बालपणी खेळलेले सागरगोटे, पत्ते किंवा तसेच इतर खेळ आम्हाला शिकवून पहिले पण आम्हाला ते काही विशेष आवडले नव्हते.
आबांच्या बालपणी वीज कधी तरी यायची, बाबाच्या बालपणी वीज ठराविक दिवशी जायची आणि आमच्या बालपणी वीज कधी तरीच थोडा वेळ जायची. असं असलं तरी आमच्या घरी इनव्हर्टर होता. वीज जायची तेंव्हा एसी बंद पडायचा पण घूं घूं आवाज करत पंखा हळू हळू फिरत राही. खेळताना आमचं त्याकडे लक्ष नसायचे, पण आजी जागी व्हायची. मग पूर्वी वाळ्याचे पडदे लावून घर कसं गार करीत असत ते ती आम्हाला सांगायची. तिच्या मते एसी चा गारवा कृत्रिम आणि म्हणूनच अपायकारक होता. मला मात्र तिचे हे म्हणणे अजिबात पटत नसे.
सुट्टीच्या दिवसात संध्याकाळ दुपारी ३ वाजताच सुरु होत असे. आपापल्या बालपणाच्या काळातील या मुद्यावर मात्र माझे आणि बाबाचे एकमत होते. उन्हे उतरली नसतानाच आम्ही सायकल घेऊन सोसायटीत घुमवू लागायचो. रस्त्यावर दुपार असूनही रहदारी असायची त्यामुळे बाहेर जायची बंदी होतीच आणि भीतीही वाटायची. सायकल यायला लागल्यावर आईचा डोळा चुकवून मी सोसायटीच्या एका दारातून बाहेर पडलो आणि दुसर्या दारातून आत आलो हा केव्हढा मोठ्ठा पराक्रम केला असे मला एकदा वाटले होते असे आठवते. तास दोन तास सायकल चालवून चांगलीच दमछाक व्हायची.माझी सायकल गीयरची होती, आई बाबांच्या बाल पणी असायची तशी साधी नव्हती म्हणून त्यात काही फरक पडत नसे. उन्हात खेळल्यामुळे कातडी काळवंडून जात असे. त्याचा रंग आम्ही घरच्या संगणकातील २५६ रंगाच्या पट्टीतून शोधून ठेवायचो. बाबा सांगायचा तसा त्याच्या लहानपणच्या १२ रंगाच्या खडूच्या बॉक्स पेक्षा आमच्या कडे संगणकावरचा अजून मोठ्ठा रंगाचा बॉक्स होता.
संध्याकाळी बाबा घरी आला कि त्याचा फोन पळवणे आणि त्यावरचे व्हिडियो किंवा यू-ट्यूब वर जाऊन व्हिडियो बघणे यासाठी माझी आणि बहिणीची स्पर्धा लागायची. उंचावरून सोडलेले पीस आणि जड चेंडू, कोणताही अवरोध नसेल तर जमिनीवर एकाच वेळी पोचतात हा गलिलिओ ने मांडलेला सिद्धांत त्या व्हीडियोतून आम्हाला बालपणीच समजला होता. मला स्पष्ट आठवतंय की बाबानं जेंव्हा त्याविषयी सांगितलं तेंव्हा तो म्हणाला होता की यावर विश्वास बसण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्याची ४० वर्ष वाट बघावी लागली होती!
उन्हाची काहिली, मधूनच उठणारी वावटळ, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दुपारनंतर एकदम वारं सुटून येणारा वळवाचा पाऊस आणि त्यामध्ये चिंब भिजणं, एखाद्या दुसर्या वर्षीच पडलेल्या आणि वेचून खालेल्या गारा या सर्व आठवणी माझ्या बालपणात आहेत. असं काही अनुभवताना मला माझ्या आईने किंवा बाबाने आडकाठी केली नाही कि त्यांच्या बालपणच्या गोष्टी सांगत बसले नाहीत.
आनंद मिळवण्याची वृत्ती असावी लागते आणि ती मला माझ्या सभोवताली सर्वांकडून मिळाली. त्याचा साधनांशी संबंध नाही. आबांना विटी दांडू खेळून जेव्हढा आनंद मिळत असे तेव्हढाच आम्ही क्रिकेटमध्ये मिळवला. चिंचा बोर खाउन आईचे दात आंबट झाले होते तसेच आमचे कँडी खाऊन झाले. पॉटच्या आईस्क्रीम इतकेच समाधान आम्हाला ट्रिपल संडे नं दिलं. या सर्वांतून समृद्ध अनुभव घेताना पिढी दर पिढीत साधनांमध्ये बदल झाला म्हणून काही राहून गेले असे वाटले नाही. निसर्गाची आल्हाददायक आणि रौद्र रूपं अनुभवण याचा तर साधनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. माणसाच्या सीमित स्मृती काळात ती रूप सारखीच.   
बाबान काढलेल्या फोटोत आणि व्हिडियो क्लिप्स मह्ये माझ्या आणि ताईच्या बालपणाच्या अनेक आठवणी साठवून ठेवल्यात. घरच्या त्रिमित होम सिस्टीमवर मी त्या अगदी चारही मितीत बघू शकतो आणि त्यात पुन्हा रममाण होऊ शकतो. माझ्या जवळ बाबाचे बालपणाचे फोटो आहेत, आबांनी त्यावेळी नुकताच घेलेल्या रंगीत कॅमेर्यातून घेतलेले. त्याचा रंग आता फिक्कट झालाय आणि ती केवळ चित्र आहेत त्यात कोणाचे आवाज नाहीत, संवाद नाहीत. आबांच्या आठवणींचे दुर्मिळ फोटो तर कृष्णधवल रंगात आहेत. तंत्रज्ञानाचा एवढा प्रवास पण तरीही आपापल्या आठवणीत आम्ही आजही रमून जातो, ते बालपण पुन्हा अनुभवतो.
या व्हीडीयोमधील एक क्लिप मी विशेष जपून ठेवलीय. मी मेकॅनोतून काही तरी विचित्र काल्पनिक वस्तू बनवून त्याच्याशी खेळताना बाबानं काढलेली. त्यामाध्यी बाबा मला विचारतो ‘ तू काय करतो आहेस?’ ‘ खेळतोय!’ माझे उत्तर ‘ कशासाठी?’ त्याचा पुढचा प्रश्न ‘ त्यात काय. मन रमवण्यासाठी......तू ऑफिसमध्ये जाऊन काय करतोस?’ माझा प्रश्न...’मी पण माझ मन रमवतो खेळ खेळून, फक्त त्याला काम म्हणतात’ बाबाच्या वाक्यानंतर ती क्लिप संपते. सर्वच अबालवृद्ध जागेपणी काही न काही तरी कृती करत असतात. सामाजिक व्यवहाराच्या साखळीत जेंव्हा माणसाच्या कृतीला महत्व प्राप्त होते, तेंव्हा त्याच्या काल्पनिक कृतीना वास्तविक अर्थ येतो. बालपणीच्या केवळ कल्पनांना मग अर्थ उरत नाही. प्रत्यक्षात येणाऱ्या कल्पना त्याला साकारायच्या असतात. त्याला मग पैसा, अधिकार, प्रतिष्ठा असे विविध आयाम येऊन चिकटतात. आणि मग आपण जे काही करतोय ते आपल्या आवडीने स्वीकारलंय का आपल्यावर लादलं गेलंय हे न पाहता तो त्याच्या मागे धावतो, त्याला त्याचा ताण जाणवू लागतो.
अवघड आहे, पण मी प्रयत्नपूर्वक थोडावेळ या षड्रिपूंचा पोलादी पडदा दूर करून आपल्या दैनंदिन व्यवहाराकडे बघितलं. माझ्या अस लक्षात आलं की माझं दैनंदिन आयुष्य आजही तितकंच सुंदर आहे जितकं बालपणी होतं. त्यामध्ये कल्पना करायचं तितकच सामर्थ्य आजही आहे जितक तेंव्हा होत आणि आनंद घेण्याचसुद्धा !

-          (ईशान) सत्यजित चितळे,  २ मे २०४६  

Thursday, March 3, 2016

धागा धागा अखंड विणूया:

धागा धागा अखंड विणूया:
हिरेन कपाडिया हा माझा इंजिनियरिंग कॉलेज मधला मित्र. मुळचा राजकोटचा, १२वी मुंबईतून करून मग इंजिनियरिंग साठी पुण्यात आला. ग्रॅज्युएशन झाल्यावर काही काळ मुंबई मध्ये व्यवसाय करून मग राजकोट मध्ये जाऊन स्थिरावला. इंजिनियरिंग करत असताना मनीषाच्या प्रेमात पडला. त्यांचा आमच्या दृष्टीने फेअर असलेलं अफेअर २ वर्ष चाललं आणि त्याचं विवाहात रुपांतर झाल. त्यानंतर म्हणजे आता २० वर्षे त्याची भेट झाली नाही. नुकतंच फेसबुक ने आमची पुन्हा भेट घडवून आणली आणि त्याची पुन्हा नव्याने ओळख झाली! योगायोगाने कामानिमित्त राजकोटला जायची संधी अगदी लगेच आली आणि मी त्याला त्याविषयी सांगितले. अनेक वर्षानी भेट होण्याचा योग असा अगदी जुळून आला. राजकोटला गेल्यावर संध्याकाळी जेवायचं निमंत्रणही मी मानिषभाभींकडून पदरात पडून घेतलं ( तसं कोणी ‘आग्रहानं’ बोलावलं तर उगाच नको नको म्हणणं वाईट दिसत ना, म्हणून) आणि राजकोटला पोचल्यावर एका संध्याकाळी त्याच्या घरी दाखल झालो.
प्रशस्त बंगला, दारी गजांतलक्ष्मीचं आधुनिक रूप असलेली इम्पोर्टेड गाडी, मोठा दिवाणखाना आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी नटलेली शोकेस यावरून त्याच बहरलेल कर्तुत्व दिसून येत होत. हिरेन आणि मनीषाभाभींनी माझं स्वागत केल. वयानुसार थोडे पांढरे झालेले केस आणि लागलेला चष्मा या व्यतिरिक्त हिरेनमध्ये काहीही बदल झालेला नव्हता. नाही म्हणायला काळ्या पडलेल्या दातांवरून मावा खाण्याची सवय त्याला जडलेली दिसत होती. अनेक वर्षानी भेटल्यावर आम्हाला स्वाभाविक आनंद झाला. हिरेन मुंबई- पुण्याकडे शिकल्यामुळे आणि भाभी पुण्याच्याच असल्यामुळे आमचे बरेचसे संभाषण पुण्याभोवती आणि मराठीतूनच सुरु झाले. त्याची दोन चुणचुणीत मुले ‘हेलो अंकल’ म्हणून नमस्कार करून जेवायला आमच्याबरोबर येऊन बसली. कॉलेजमधील आठवणींपासून ते राजकारणापर्यंत सर्व विषयावरील गप्पांमध्ये खास सौराष्ट्रातील पदार्थांनी नटलेल ताट केव्हाच संपून गेलं.
जेवणानंतर आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसलो. गप्पांच्या शेवटच्या चरणात थोडा वेळ जाणार म्हणून कॉफी आली. बहुतेक सर्व आठवणी उजळून झाल्याच होत्या त्यामुळे संभाषणाच्या मध्ये थोडी गॅप पडली होती. ‘रितेश भेटला होता कारे एव्हढ्यात?’ मी त्याला विचारलं. ‘कोण रितेश गांधी?’ हिरेनने प्रतिप्रश्न केला. पण हा प्रश्न विचारताना त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराची रेष स्पष्टपणे उठलेली मला दिसली. कॉफी ढवळताना भाभींचा हात थोडा वेळ थांबलाय हे मला जाणवलं. ‘काही तरी गडबड दिसते आहे, उगाच मिठाचा खडा पडावा तसा हा प्रश्न विचारला’ माझ्या मनात आल. ‘हो रितेश गांधी’ मी पडेल आवाजात उत्तर दिल, अजिबात भेटला नाहीये हे उत्तर ऐकण्याची मानसिक तयारी करून.
रितेश गांधी आमचा आणखीन एक मित्र. तो मुंबई चा होता आणि गुजराती असल्यामुळे त्याच आणि हिरेनच चांगल जमत असे. इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनी मुंबईत राहून काही व्यवसाय सुरु केल्याच आम्हाला माहित होत. पण पुढे काय झाल या विषयी काहीच माहित नव्हती. तस त्याची भेट सुद्धा फेसबुक माध्यमातून नुकतीच दोन वर्षापूर्वी पुन्हा झाली होती. सध्या मात्र आम्ही दोघ महिन्यातून एकदा भेटत होतो.
हिरेन ने एक दीर्घ श्वास घेतला. ‘ नाही भेटला बर्याच वर्षात....तुला आठवतंय, इन्जीनीयरिंग नंतर आम्ही एकत्र व्यवसाय सुरु केला होता.’ हिरेन सांगू लागला. त्यांचा व्यवसाय चांगला चालू झाला, एक दोन वर्षात त्यांनी चांगला जम बसवला. पण मग कुरबुरींना सुरुवात झाली. सुरु झाल्यापासून चार वर्षांनी अखेरीस त्यानी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. या चार वर्षातील बर्याचशा वाईट अनुभवांचा तपशीलवार इतिहास हिरेनने मला सांगितला. ‘तू आम्हाला दोघांना ओळखतोस म्हणून तुला सर्व सांगितल. नाही तर इतक खोलात मनीषा शिवाय कोणालाच माहित नाहीये.’ हिरेन ने खुलासा केला. ‘अर्थात जे घडल त्यात रितेशची फारशी चूक नव्हतीच असही मला वाटतंय, पण जाऊदे झाल ते झाल, आता वाटून काय उपयोग ?’ हिरेन खिन्नपणे म्हणाला. त्याच्या कथनात फार जास्त नकारात्मकता होती आणि मला त्यातल काहीच घ्यायचं नव्हत. त्यामुळे मी ‘ अस!, जाऊदे रे’ या पलीकडे काहीच बोललो नव्हतो. पण त्याच कथानक संपल्यावर मी ठरवून एक खबरदारी घेतली. त्यान आजवर बाळगलेल हे नकारात्मक गोष्टींच गाठोडं पुन्हा वळण्यापासून त्याला परावृत्त केल. डोक्यावरच मोठ्ठ ओझं उतरल्यामुळे हिरेन जरा मोकळा झाल्यासारखा वाटला.
‘तू भेटलास रितेश ला एव्हढ्यात? ‘ हिरेनन मला विचारलं. ‘ हो, रितेश आता पुण्यात असतो. ट्रेडिंग करतो. आम्ही भेटतो महिन्यातून एकदा. गेल्याच महिन्यात तो तुझी आठवण काढत होता’ शेवटच वाक्य धादांत खोट आहे हे माहित असूनही मी बोलून गेलो, मुद्दामहून. ‘त्याचा फोन नंबर देशील?’ हिरेन ने प्रश्न केला. मी त्याला फोन नंबर दिला. थोड्या वेळाने दोघांचा निरोप घेतला, पुण्याला घरी यायचं निमंत्रण दिल आणि त्याच्या घरातून बाहेर पडलो.
दुसर्या दिवशी पुण्यात पोचल्यावर ठरवून रितेश ला फोन केला. ‘ हिरेनच्या घरी जाऊन आलो. तो तुझी आठवण काढत होता.’ दुसरा धादांत खोट वाक्य. पण रितेशचा स्वर या वाक्यानंतर आनंदलेला वाटला.
बरोबर एका आठवड्याने संध्याकाळी हिरेनचा फोन आला. आपला खोटेपणा उघडकीस येणार का काय अशी शंकेची पाल चुकचुकली. फोन उचलला. पलीकडून हिरेनचा आनंदित आवाज आला. ‘ गेस, आज कोण माझ्या घरी आलंय?’ मी निशब्द झालो. ‘ रितेश......थॅंक यू, तुझ्यामुळे आम्ही आज परत भेटतोय’ माझा माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. माला जसा हव तस घडल. माझी दोन वाक्य या दोघांना परत जोडून आणण्यात यशस्वी ठरली होती. हिरेन आणि रितेश च्या मैत्रीतील काही धागे उसवले होते ते पुन्हा शिवण्यात मला यश आल होत. अशी अनेक नाती जोडणारे, मनाला झालेल्या भळभळणार्या जखमा हळुवार शिवणारे, टाके घालणारे काही लोक माझ्या आयुष्यात आले, मी त्यांना जवळून बघितलं हे माझ सौभाग्य, त्यातूनच मला नकळत ही प्रेरणा मिळाली आणि एक तरी तुटलेला दुवा पुन्हा जोडू शकलो म्हणून मला अतिशय आनंद झाला.

टी.व्ही. वर त्याच वेळेस जाट आंदोलनात होरपळून गेलेल्या हरियाणातल्या बातम्या दाखवत होते. त्या बघता बघता मला झालेला आनंद पार गळून पडला आणि त्याची जागा विषण्णतेनी घेतली. विविध समाजानी अरक्षणासाठी केलेली आंदोलने, नव्याने उफाळून आलेले सामाजिक वाद यांच्या बातम्यांनी मन व्यथित होतच. स्वार्थी राजकारण आणि संकुचित मानसिकतेतून व्यक्त होणारा अभिनिवेश आणि त्यातून होणारा असा निष्फळ वांशिक संघर्ष हा आपल्या एकसंध समाजाची लक्तरं करतोय. विविधतेन नटलेल्या समाजाला एकात्म बनवण्यासाठी संत महंत आणि देशभक्तांनी अथक प्रयत्न केले आणि प्रसंगी बलिदानही दिल. त्या सर्वांच्या प्रयत्ना विरुद्ध दुफळीची बीजे पेरून समाजाची घट्ट असलेली विण उसवू पाहणारी नतद्रष्ट लोकांची पलटणच कार्यरत झालेली दिसून येते. त्यांचे दुष्ट हेतू उधळून टाकायला हवेत. सौहार्दाचे उसवलेले टाके पुन्हा घालायला हवेत. प्रादेशिक अस्मिता असावी पण ती आपल्याच मुळावर येत नाही ना ही जाणीवही ठेवायला हवी. ज्यांना याची जाणीव आहे त्या प्रत्येक देशभक्त नागरिकाने यासाठी जागरूक राहायला हवे. एकसंध आणि एकात्म समाजाच्या निर्मितीसाठी धागा धागा विणत रहायला हवे.