Friday, December 25, 2015

समस्या- संयम आणि उपाय

डायनिंग हॉल मधील एक टेबल, चार माणसं बसू शकतील एव्हढ. त्या टेबलचे चार पाय आणि समतल जमीन यांचा एकत्रित संबंध कधी न आल्यामुळे डुगडुगणारं. दुपारची जेवणाची वेळ होती. एका टेबल वर एक व्यक्ती जेवत होता. त्याच्या समोर कोनात दुसरा येऊन बसला. दोघेही एकमेकाला अनोळखी. म्हणून अगदी समोरासमोर नाही. अशीच स्थिती दुसर्या टेबल वर होती. खळग्यांचे ताट, त्यात नेमक्या जागी नेमके पदार्थ वाढलेले. वाढप्यांची लगबग आणि त्यांच्यामागे त्यांच्या सुपरवायजरचा धोशा अस परिचित वातावरण. जो आधी जेवायला बसला होता त्याचा हविर्भाग संपला आणि तो पानावरून उठला. टेबल जरासं एका बाजूला कललं. समोर बसलेल्या व्यक्तीच्या ताटापुढील ताकाच्या ग्लासमधल टाक हिंदकळल.   टेबल साफ करणारा पोऱ्या तिथे आला. छोटासा पोर तो, गावाकडून आलेला, डायनिंग हॉलच्या युनिफॉर्म चा मळका शर्ट आणि अर्धी विजार घातलेला, खांद्यावर टेबल पुसण्यासाठी फडके. एका कानात डूल घातलेला. येथे बाल कामगार काम करत नाहीत हा बोर्ड कदाचित त्याला वाचता येत नसावा किंवा बहुतेक मजबुरी असावी.
त्यान ताट उचललं, आणि ते बाजूला ठेवून टेबल पुसू लागला. मागे दुसरं गिर्हाईक उभं त्याच दडपण होत त्याच्यावर. त्यान टेबल पुसू लागताच ते चांगलाच डुगडुगलं आणि समोर बसलेल्या व्यक्तीच्या पानासामोरील ताकाच्या ग्लासमधील ताक थोडसं सांडलं. ए गाढवा, कळत नाही का तुला? ती व्यक्ती रागात उठून म्हणाली. आता त्या सांडलेल्या ताकाचे पैसे कोण देणार, कसली लोकं भरतात या धंद्यात, लेकाच्याला एवढं कळत नाही तो जाम तडकला. ‘माझा शांतपणे जेवणाचा मूड गेला’ असे तावा तावाने म्हणत, तिथलं वातावरण गढूळ करत आणि त्या पोराला बोल लावत तडका फडकी हात धुवायला निघाला. तो पोऱ्या कावरा बावरा झाला. आता सुपरवायझर सर्वांच्या देखत ओरडणार म्हणून रडवेला झाला. आणि झालंही तसच. तो थोडावेळ बावचळला आणि मान खाली घालून टेबल पुसू लागला.
एवढ्यात एक गम्मत झाली. शेजारच्या टेबलवरची एक व्यक्ती ढेकर देत उठली. सुपारवायझरने त्या पोऱ्याला दुसरेही टेबल साफ करायला सांगितलं. आधीच्या अनुभवावरून तो पोऱ्या शहाणा झाला, त्यानं ताट उचललं पण टेबल तो पुसेना. समोरच्या जेवत बसलेल्याच्या ते लक्षात आलं, त्यान पटकन ताक भरलेला ग्लास डाव्या हातांनं उचलला आणि हसून त्या पोऱ्याकडे बघितल. तो पोरगाही गोड हसला आणि त्यान ते डुगडुगणारं टेबल स्वच्छ पुसून घेतल. त्या सहृदय माणसाच जेवण झालं, तो उठला, हात धुवून येताना तो मुलगा हातात बडीशेपची वाटी घेऊन हसत समोर उभा होता!
समस्या एकच, उपाय वेगवेगळा, आपल्याच हाती!


Sunday, December 13, 2015

घटना - गुन्हा आणि शिक्षा

शुक्रवारी सायंकाळी ४.३०-४.४५ च्या सुमारास प्रवीण ऑफिस मध्ये आला आणि पेटी कॅश चे व्हाउचर त्याने माझ्या समोर ठेवले. गाडीला फारच स्क्रॅचेस पडले होते सर. त्यामुळे मी ते घालवण्याचे लिक्वीड   घेऊन टाकले. ७५० चा आयटम ५०० मध्ये घेतला सर त्याने मला स्पष्टीकरण दिले. त्याने परस्पर खर्च केला त्यामुळे माझ्या कपाळावर आठी चढली. पण कामात व्यत्यय नको म्हणून मी त्याच्या व्हाऊचरवर सही करायला घेतली. सवयीप्रमाणे वरच्या लिस्टवर नजर टाकताना शेवटच्या ओळीत आर. टी. ओ. – १०० रू. असे दिसले आणि सही करता करता अर्ध्यातच थांबलो. हे काय? आर. टी. ओ. ला कुठली दक्षिणा ? मी प्रश्न केला. प्रवीण जरा गडबडला, चाचरत म्हणालासर, गाडीला थोडासा अपघात झाला, गाडीचे काही नुकसान झाले नाही पण मामाने पावती फाडली. माझी काहीच चूक नव्हती सर. मी सरळ येत होतो पण वडगावच्या सिग्नलला रस्त्यावरचं ते प्लॅस्टीकच बॅरीकेड मध्येच ठेवलं होत. त्याला डॅश बसला. मामानं उगाच डोक खाल्लं नंतर. प्रवीणन सफाई दिली. मी ताडकन उठलो, सरळ खाली गेलो, प्रवीण मागे मागे आला. गाडीला प्रदक्षिणा घातली. गाडीला धडक बसल्याचे कुठे काही चिन्ह दिसेना. गाडीच्या स्क्रचेस पुसण्याचा आयटम स्वत:हून कसा काय त्यान आणला याचा मात्र उलगडा झाला.
प्रवीण, आमच्या कंपनीतला वाहन चालक. तो वाहन चालवण्यात जितका ‘प्रवीण’ होता तितकाच बोलबच्चन करण्यातही. कंपनीतल्या उनाड कंपूचा तो त्यामुळे हिरो होता आणि साळसूद कंपू मात्र त्याच्या वागण्यावर लक्ष ठेउन असायचा. मगाशी झाला कार्यक्रम हा शिफ्ट संपताना झाल्यामुळे बरेचसे कर्मचारी बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यानी सर्व कार्यक्रम बघितला. माझ्या पाठोपाठ प्रवीण, त्याच्या पाठोपाठ त्याचे समर्थक आणि त्यांचाही पाठोपाठ त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याचे विरोधक माझ्या केबिनच्या बाहेर आले.
मी काही कारवाई करणार आहे का नाही हे न विचारताच,  “सर जाउद्या हो. विशेष काही घडलेले नाहीये प्रवीणच्या समर्थनार्थ एकाने मला विनंती केली. सर हा असाच जोरात गाडी चालवतो, उद्या काही मोठा अपघात झाला म्हणजे? काही नाही सर, त्याला सरळ कामावरून काढून टाका त्याच्या विरोधकातून  एक आवाज आला. मी शांतपणे दंडाची पावती काढली. त्यावर प्रवीणचे नाव होते, पण गाडीचा नंबर नव्हता. खाली ‘गुन्ह्याचे स्वरूप’ या समोर दोन कलमे होती आणि पुढे त्याचे विवरण दिले होते ‘ बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत होणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान. पुढे ‘दंडाची रक्कम छापलेली होते आणि हाताने घातलेला आकडा होता शंभर रुपये खाली हवालदाराची सही, हुद्दा, पोलीस स्टेशनचे नाव इत्यादी असलेला शिक्का.
मी प्रवीणच्या विरोधकातील एकाला म्हणले की जरा पुन्हा एकदा गाडी नीट बघ, कुठे काही धडकल्याची खूण दिसतेय का. तो आनंदाने गेला. बर्याच वेळाने परत आला तेंव्हा मला अपेक्षित असलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. सर पुढच्या बम्परवर उजव्या बाजूला ओरखडे आहेत पण ते आजच पडलेत असे वाटत नाहीत, पूर्वी कधीतरी पडलेले असू शकतील. बाकी कुठे काही नाहीये. त्याने पडेल आवाजात पाहणी अहवाल दिला. सर तेच तर म्हणतोय, गाडीला काही झालेले नाही. मुळात सर हा अपघात आपल्या कंपनीच्या गाडीला झालाच नाही, मी माझ्या मोटरसायकलच्या अपघाताबद्दल बोलत होतो इतक्या वेळ. नाही का तुम्ही मला बँकेत पाठवलं होतं सकाळी? तेंव्हा मी माझी मोटरसायकल घेऊन गेलो होतो. आता प्रवीणने सपशेल पलटी मारली. सगळेच लोक बुचकळ्यात पडले. त्याचा होरा माझ्या लक्षात आला.
सरकार दफ्तरी भरलेली दंडाची रक्कम खर्च म्हणून दाखवता येत नाही मी माझं कायद्याचं जुजबी ज्ञान पाजळत म्हणालो. मी हा खर्च अमान्य करत आहे. बाकी ठीक आहे. जा आता, वाहन जरा जपून चालवत जा रे!”,  मी त्याची सुटका केली.
प्रवीणचे समर्थक जोशात तर विरोधक नकारार्थी मान हलवून बाहेर पडले. थोड्या वेळाने मी गाडी घेऊन घरी निघालो. वडगावच्या चौकात सिग्नलला गाडी थांबली आणि माझे लक्ष दुभाजकाकडे गेलं. तुटलेला एक प्लास्टिकचा बॅरीकेड मला पडलेला दिसला. माझं कुतूहल चाळवलं. मी गाडी पुढे जाऊन पार्क केली आणि चालत येऊन वाहतूक हवालदाराला विचारलं इथे या बॅरीकेडला आज दुपारी एखादी पांढर्या रंगाची गाडी धडकली होती का हो ? मला आपादमस्तक न्याहाळत तो हवालदार उत्तरला होय, पण तुमचा काय संबंध? रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माझ्या गाडीकडे बोट दाखवत मी त्याला म्हणलं ती गाडी होती का? माझी आहे. माझ्या ड्रायव्हरन अपघात केला का? हवालदारानं गाडीकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं, साहेब ती सुमो होती, तुमची तर मारुती आहे. काळजी करू नका तुमच्या गाडीनं ती धडक दिलेली नाही.” ........तडजोड काय झाली असेल ते माझ्या लक्षात आल. बॅरीकेड तुटला होता, गाडीवर आणि प्रवीणच्या प्रतिमेवरही ओरखडे उठले होते.
घरी जाऊन पुन्हा ती पावती बाहेर काढली. इंटरनेट वर त्याची कलमं टाकून माहिती वाचू लागलो. गुन्ह्याची कलमं आणि त्याचे विवरण यात फरक होता. त्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम आणि आकारलेली रक्कम यात कमालीचं अंतर होतं. हवालदाराने कर्तव्यदक्ष भूमिकेतून कारवाई केली होती पण पावती वरचा मजकूर अपूर्ण होता.

प्रवीण दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्याच त्याला १० दिवसाच्या सक्तीच्या बिन-पगारी रजेवर पाठवण्यात आलं. कंपनीच्या गाडीचे नुकसान केले म्हणून नव्हे तर ‘कंपनीची दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याबद्दल आणि हो,...... ही शिक्षा सुनावण्यासाठी न कुठल्या फिर्यादीची गरज पडली न कुठल्या सुनावणीची, न कुणाच्या वकीलपत्राची!! ---- (वरील घटना व त्यातील पात्रे ही संपूर्णपणे काल्पनिक असून सुमारे १३ वर्षांपूर्वी घडलेल्या, वरचे वर चर्चेत आलेल्या आणि नुकत्याच चवीने चघळल्या गेलेल्या घटनेशी त्याचे साधर्म्य वाटल्यास.............................. ते तसे आहेच! ) – सत्यजित चितळे

Friday, December 4, 2015

निमित्तमात्र...

भाटघरच्या जलाशयातून उगवणारं सूर्यबिंब राजगडाच्या बालेकिल्यातून बघून झाल्यावर आम्ही संजीवनी माचीचा रस्ता पकडला. अळू दरवाज्यातून उतरून भूतोंडे गावाच्या दिशेने चालू लागलो. भूतोंडे- चांदवण करत कुंबळी गावाला पोचेपर्यंत रात्र झाली. वाडीवरच्या भटक्या कुत्र्यांनी आमचं स्वागत केलं. गावातील एकमेव मंदिर छोटंसं असल्यानं वस्तीला सोयीचं नव्हतं. त्यामुळे गावच्या पाटीलांनी आम्हाला त्यांच्या घराच्या पडवीतच मुक्काम करण्याविषयी सुचवलं. पडवीच्या पलीकडेच दावणीला गुर बांधलेली होती. तिथंच रात्र काढूयात, उद्या सकाळी गोप्या घाट उतरला की आलीच समोर शिवथर घळ, आमचा बेत ठरला. पाटलीणबाईनी स्टोव्ह देऊ केला. त्यावर मुगाच्या डाळीची खिचडी शिजवली आणि त्यावर ताव मारला. भांडे धुवून आवरा आवर करून पथारी पसरणार एवढ्यात पाटील जातीने चौकशीला आले. आम्ही तिघांनी आमची ओळख करून दिली. राजगडाहून शिवथरघळीपर्यंत पायी जायचा बेत आहे,  उद्या गोप्या घाटातून जाणार आहोत आमचा ट्रेकचा बेत सांगितला. पाटील पुण्याच्या तरूणाईशी परिचय असणारे होते त्यांनासुद्धा अश्या आडवाटा चोखाळणार्यांच कौतुक होतं.
त्या दिवशी त्यांच्याकडे सोयरिकीच बोलण करायला दोन पाहुणे आले होते, भूतोंडे गावाकडून. ते आतूनच आमचा बोलणं ऐकत होते. आम्ही शिवथरकडे जातोय असे ऐकल्यावर ते बाहेर आले अन म्हणाले हितून लई लोक जात्यात तुमच्यासारखे, आमची जिंदगी गेली पर आम्ही गेलो न्हाई. पाटील येकदा जाया होवं. न्हाईतर आपन राह्याचो कोरडेच”. “ चला आमच्या बरोबर, आम्हाला सोबत होईल संदीप म्हणाला. पाटील हसले. उद्याच्याला चा च्या टायमाला बोलू. निजा आता म्हणाले आणि पाहुण्यांसहित आत गेले.
दिवसभर चालून दमलेले आम्ही तिघे पडवीतच गाढ झोपी गेलो. पहाटे झुंजूमुंजू होताच कोंबडा आरवला त्यानं जाग आली. आवरून घेतल, सॅक भरून निघायची तयारी केली. पाटलीणबाईंनी चहा दिला. तो घेऊन आणि त्यांना धन्यवाद देऊन गोप्याच्या खिंडीकडे निघालो. थोडा चढ, घनदाट झाडी आणि मग गोप्या घाटाची अरुंद खिंड. खिंडीत जरा टेकलो तर मागून आवाज आला पाव्हणं दमलं व्हय? मागे बघतो तर पाटील आणि त्याचे दोन पाहुणे. म्हन्ल आजच उरकून घिऊ. किती दिस नुस्त जायाच, जायाच म्हून काडनार. पाटलांनी खुलासा केला. आम्हाला मागे टाकून ते घाट उतरून निघाले देखील. आमच्या चालीच्या मानानं त्यांची मावळी चाल खूपच वेगाची होती. घाटाखालच्या जंगलात ते दिसेनासे झाले.
आम्ही घाट उतरून सपाटीला लागलो तेंव्हा ते तिघे उलट येताना दिसले. जवळ येताच त्यांनी रामराम केला. संदीपकडे बघून म्हणाले तुमी म्हन्ला म्हनून जाल बघा.” . संदिपचं कालच पोकळ निमंत्रण निमित्तमात्र होत. पण ते एक कारण ठरल त्यांना समर्थांच्या दर्शनाचं समाधान मिळवून देण्यात. आम्ही हसलो, त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो.
अश्या अनेक गोष्टी घडतात जेव्हा आपण असतो केवळ निमित्तमात्र. किंबहुना सगळ्याच गोष्टी अश्या असतात जिथे आपण असतो केवळ निमित्तमात्रच!

मला पेपर मध्ये वाचलेली एक बोधकथा आठवते, स्वामी रामकृष्ण परमहंसांची. एकदा त्यांनी शिष्यांना उपदेश करताना अस सांगितल जाऊ का नको जाऊ असा प्रश्न पडेल तेंव्हा ‘जा’ आणि खाऊ का नको खाऊ असा प्रश्न पडेल तेव्हा ‘नको खाऊ’, या दोन उत्तरात सगळ आल.  आपल असण हेच निमित्तमात्र असणं हे याच्याशी थेट संबंधीत आहे, खरय ना?