Friday, August 23, 2019

कळसूबाई दर्शन ऑगस्ट २०१९





२१ऑगस्ट २०१९, गेले महिनाभर दक्षिण-पश्चिम भारतात कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आणि आमचा सालाबादप्रमाणे कळसुबाई दर्शनाचा बेत ठरला. दोन आठवड्यांपूर्वी श्री. पुरंदरे यांचा निरोप आला आणि त्यांनी मित्रांची जमवाजमव केली. सकाळी ४.४५ वाजता परदेशी ट्र्ॅव्ह्ल्स च्या बसने आम्ही १७ जणांनी बारी गावाकडे प्रस्थान ठेवले. नाशिक रस्ता चांगला आणि मोकळा असल्याने ७.०० वाजताच घारगाव गाठून आम्ही नाश्त्यासाठी उतरलो.
रतनगडावरून उगम पावणारी पयोधरा अर्थात प्रवरा नदीचे हे खोरे. गोड, क्षारविरहीत अश्या अमृतमय पयाची धारा ती पयोधरा,  तिला अमृतवाहिनी हे सार्थ नाव आहे. प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि मुळा या नद्यांच्या संगमावर वसलेले संगमनेर गाव. गावाबाहेरून नवीन झालेल्या झालेल्या हायवेवरून घोटी गावाकडे रस्ता जातो. डाळींबाच्या बागा, मक्याची शेतं आणि क्वचित उसाच्या शेतांमधून जाणारा हा रस्ता पुढे प्रवरेचा काठ धरतो आणि अकोले गावात पोचतो. तिथून पुढे भात खाचरांच्या सलगीने  वळण घेत भंडारदरा-शेंडी गावात पोचताना समोरच रतनगड दिसू लागतो. मग इथून पुढे उजवीकडून हा रस्ता निघतो तो थेट घोटी पर्यंत. त्याच वाटेवर वसलेले बारी हे एक ३०००-३५०० लोकवस्तीच गाव. या वर्षीच्या महापूर पावसाच्या खुणा वाटेत दिसत होत्या. नाले, ओढ्याशेजारची झुडुपे पुरातून वाहून आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी फुलारलेली दिसली आणि पुराचे पाणी कुठवर वर चढले असेल याची कल्पना देऊन गेली. डाळिंबाच्या बागातून रसरसलेली डाळिंबे लगडलेली दिसत होती. बहुतेक खाचरातून भात लावणी झालेली. मधूनच सुटणाऱ्या वार्याच्या झुळूकीच्या लाटा त्या खाचरातून एकसमान वाढ होणाऱ्या पोपटी- हिरव्या लवलवत्या भात पिकातून प्रसरण पावत दूर दूर पळत जाताना दिसत होत्या. गर्द हिरव्या तुकतुकीत मक्याच्या पिकावर तुरे डोलू लागलेले दिसत होते आणि बांधावर लावलेल्या फरसबी च्या वेलांवर पांढऱ्या फुलांचा डौल सुंदर दिसत होता. गुढग्याएवढ्या झेंडूच्या पिकातून आता टपोरे भगवे गेंद डोकावू लागले होते.  भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या एखाद्या सुपुत्राच्या आठवणी निमित्त लावलेला एखादा फलक, किंवा गावाची कमान इथल्या लोकांच्या शौर्याची आठवण देत होते. इथे पोचेपर्यंत आकाशात निळ्या रंगाचेच प्राबल्य होते आणि त्यामुळेच आपल्याला आज उन्हात चढायला लागणार का काय? अशी चर्चा बसमध्ये सुरु झालेली होती. संगमनेर-बारी रस्ता छोटा आणि पावसाने त्याची दुरवस्था झालेली असल्याने बारी पर्यंत पोचायला मात्र १०.३० वाजले.
बारी मधल्या पहिल्याच हाटलाबाहेर बस पार्क करून आणि तिथेच परतल्यावर जेवायची ऑर्डर देऊन, संध्याकाळी चारची वेळ पाळायचा हुकुम घेऊन चढायची वाट धरली. बारीच्या वेशी वरचा ओढा गुढग्याएवढ्या पाण्याने फुगून संथ वाहत होता. नितळ पाण्यातून तळाचे गोटे आणि दगड स्वच्छ दिसत होते. अर्थातच ते बूट काढलेल्या तळपायांना गुदगुल्या करणार नव्हते. हातात बूट धरून तोल सांभाळत ढोपरभर पाण्यातून ओढा पार केला आणि पाय वाळत आहेत तोवर मस्तपैकी ओल्या मातीतून शेताच्या बांधावरून चालत जाण्याचा आनंद लुटला. पुढे चढ सुरु झाला, वाटेवरच्या मुरुमाड दगडांवरून ओल्या मातीचा थर बसला होता आणि त्यावर पायाचा ठाव लागत नव्हता, त्यामुळे चढतांना सुद्धा घसरण्याची भीती बाळगत जपून पावलं टाकत आम्ही चढ चढू लागलो.
चढाचा पहिला टप्पा पार केल्यावर थोडी सपाट जागा लागते, तिथे एक मंदिरही आहे आणि स्वागताची कमान. खरा ट्रेक इथूनच सुरु होतो, पहिली वाट तर फक्त एक झलक आहे. कळसूबाईचा पर्वत खूप उंच आणि सरळसोट चढाचा. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील कोणत्याही डोंगर माथ्यावर चढाई करायची तर एखाद्या सोंडेवरून सुरुवात करावी आणि मग समोर येतो तो सरळ उंचीचा कातळभाग. या कातळावरून चढून जाण्यासाठी कधी पाण्याच्या वाटेतून, तिथल्या घळीतून पायऱ्या खोदलेल्या सापडतील तर कुठे चक्क खोबणींचा आधार घ्यावा लागेल. कळसूबाई च्या या वाटेवर सुरक्षिततेसाठी भक्कम कठडे आणि शिड्या बसवल्या आहेत. सोंडेवरून येणाऱ्या पायवाटेचा चढ सुद्धा दमछाक करणारा आहे. शिड्यांवरून जाताना त्यातल्या चढामुळे आणि एकसुरीपणामुळे पायात गोळे येतात. पण थोड्याच अवधित आपण एकदम उंची गाठून वर जातो. पेंडशेत गावावरून येणारी वाट दक्षिणेकडूनच्या रांगेवर चढून येणारी आणि मग मुख्य शिखराच्या खाली बारीकडच्या मुख्य वाटेला मिळणारी. तिथे अश्या शिड्या नाहीत. ती वाट ज्या खिंडीला लागून वर चढते ती खिंड इथल्या शिडीच्या पायथ्यापासून डावीकडे वर दिसू लागली.
आज पहिल्या टप्प्यावर उन्हामुळे आम्ही घामाघूम झालो पण लवकरच आभाळाने किमया केली आणि वाटेवर ढगांनी सावली धरली. शिड्यांचा टप्पा पार करेपर्यंत भुरभूर पावसाची सर येऊन चढाईचा शीण हलका झाला.खाली दूरवर बारी आणि जहागीरदारवाडी गावे, मुख्य रस्ता आणि त्यापासून बारीपर्यंत येणारा रस्ता दिसत होता. लवकरच शिखर ओलांडून ढगांनी खालच्या दिशेने झेप घ्यायला सुरुवात केली आणि मग समोरचे दृश्य धुकट व्हायला लागले. इथपर्यंत दीड तास झाला होता आणि आता पुढच्या अर्ध्या पाउण तासात शिखर माथा गाठायची ओढ लागली. शेवटच्या टप्प्यात धुकं इतकं दाट होत कि अगदी दहा फुटांवरच दिसेना. पण वाट चांगली मळलेली असल्याने चुकायची भीती नव्हती. शेवटच्या शिडीवरून वर पोचलो तेंव्हा चढायला सुरुवात करून सव्वा दोन तास झाले होते. समोर कळसूबाईचे दगडी चिर्यात बांधलेले मंदिर किंवा घुमटी, त्यासमोर बांधलेली छोटीशी घंटा आणि उजवीकडे झेंड्याची काठी, घोंघो वाहणारे वारे आणि वेगाने वाहून जाणारे दाट ढग,मधूनच ढगातून निर्माण होणारी पोकळी आणि त्यातून अलगद उतरणारा उन्हाचा उबदार स्पर्श.....अगदी स्वर्गात असल्यासारखे स्वप्नवत!
या वर्षी पाऊस अगदी कॅलेंडर प्रमाणे वागलाय. आषाढात धुवाधार तर श्रावणात उन्हा पावसाची लपाछपी. श्रावणातले हे वातावरण म्हणजे कीटकांचे नंदनवनच. चढाच्या वाटेवर असंख्य किटकांनी आमच्यावर आक्रमण केलं. चेहरा, मान, हात आणि पायावर त्यांच्या नांग्यांचे असंख्य दंश सहन करताना आणि शक्य होईल तितक्या कीटकांना उडवून लावताना माणसाला शेपूट आणि हलणारे कान का नाहीत असा प्रश्न पडून गेला, गळून पडलेली शेपूट हे प्रगतीचे लक्षण नाही.....किमान अश्या वातावरणात तरी!
कळसुबाई शिखर महाराष्ट्रातले सर्वात उंच ठिकाण १६४६ मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवरचे. कळसूबाई हि या गावची सून, तिला बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती होती आणि ती गावच्या सर्वांची या ज्ञानाने सेवा करायची. तिची आठवण म्हणून गावकर्यांनी या शिखरावर तीच मंदिर बांधलं आणि या शिखराला तीच नाव दिल अशी एक आख्यायिका आहे. अश्या अनेक गोष्टी असतील, पण अश्या कोणत्याही अख्यायीकेतील कळसू हे नाव हा काही योगायोग असेल असे वाटत नाही.
आमच्या पाठून तरुणांचा एक घोळका चढून येत होता. वर पोचल्या पोचल्या त्यातल्या प्रत्येकाने आवर्जून कळसुबाईच्या मंदिरात जाऊन नमस्कार केला हे विशेष वाटल.
थोडीशी पोटपूजा, फोटो टिपले आणि मग उतरायला सुरुवात केली. डोंगर उतारावर निळी जांभळी फुले फुलली होती. वाऱ्याच्या तालावर डोलत होती, अगदी लहानपणच्या त्या फुलराणीसारखी. शिडीच्या पायथ्याशी एक विहीर आहे, तिथे पोचल्यावर थेट १९९३ मध्ये पहिल्यांदा इथे आलो त्या गमतीशीर ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. पुढच्या वाटेवर दोन्ही बाजूला तेरड्याची झाडे अगदी गच्च वाढलेली होती. लवकरच इथे सगळा परिसर तेरड्याच्या लाल फुलांनी गालिच्यासारखा लाल, गुलाबी होऊन जाईल!
उतरताना पावसाच्या एक दोन सारी चांगल्याच भिजवून गेल्या, त्यानेही आमची हौस चांगली पुरवली. कळसूबाईचा उतार कंटाळवाणा आहे, शेवटच्या टप्प्यात तर अगदी केव्हा एकदा गावात पोचतो असे होऊन जाते! वास्तविक हाच चढ चढताना असा कंटाळा येत नाही हे विशेष!!
उतरून खालपर्यंत यायला जवळपास दीड तास लागला. बारी च्या ओढ्यातल्या थंडगार पाण्याने पायाचा शीण पार कुठे तरी दूर पळवून लावला. पुढे येऊन बूट चढवण्यासाठी एका दगडावर बसलो. समोरच्या डोंगर उतारावर दोन बैल उधळताना दिसले. त्यांची राखण करणारा विशीतला तरुण गडी त्यांना पकडण्या साठी पाठोपाठ पळत होता. त्या दोन्ही बैलांच्या डोळ्यात एखाद्या द्वाड मुलासारखे भाव होते. कासर्या सकट उंडारलेल्या त्या बैलांच्या नाकात वेसण होती पण ते त्याच्या ताब्यातून निसटले होते. अंगात काळे जाकेट घातलेल्या त्या तरुणाने गळ्यात पाठीच्या बाजूला छत्री अडकवली होती. आणि तो त्या भुऱ्या बैलांना पकडण्याच्या मोहिमेवर होता. थकला होता त्यामुळे माझ्या शेजारच्या दगडावर येऊन बसला. खिशातल्या मोबाईल फोन वर संबळ तुणतुण्याच्या तालावर भारुडासारख्या भरड आवाजात कुठलं गाण त्यान लावल होत आणि तो ते गुणगुणत होता. आता त्याचं कडव आठवत नाही पण धृपद त्याचही पाठ होत आणि त्याच्या ओळीत “मी आदिवासी- मी इथला मूळ निवासी” असे शब्द ऐकून माझे कान टवकारले. मी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्यान मला फारसा प्रतिसाद दिला नाही. इतक्यात ते गाण संपलं आणि पुढच गाण एकदम वेगळच- “ ती मला दिसलीया अन माझ्या मनात भरलीया......” हेही त्याच पाठ झालेलं होत.
तरुण पिढीच्या तोंडी कोणती गाणी असतात हे पहा, त्या राष्ट्राच भविष्य काय असेल त्याचा अंदाज येईल असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, त्याची मला आठवण झाली.
परतून हाटलात फक्कड जेवणावर ताव मारला आणि मग घरचे वेध लागले. गप्पांच्या कल्लोळात परतीचा प्रवास सुरु झाला खर परंतु “मी आदिवासी- मी मूळ निवासी” या गाण्याच्या धृपदाचा तो ठेका मात्र माझ्या मनातून जात नव्हता. अकोले गावातून परतताना एका कमानीने माझे लक्ष वेधून घेतले. महर्षी अगस्ती ऋषी आश्रम स्वागत करीत आहे असे काहीसे त्यावर लिहिले होते. नाशिकचा हा परिसर प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले दंडकारण्य म्हणून आपल्या पुराण साहित्यात प्रसिद्ध आहे. त्या वेळच्या इतिहासाचा इथे नक्कीच संदर्भ असणार म्हणून आज गुगल गुरूंना माहिती विचारली. महर्षी अगस्ती हे मंत्रद्रष्टे ऋषी. त्यांचा जन्म इ.स. पूर्व ३००० वर्षात कधीतरी काशी क्षेत्री झाला असे मानतात. अगस्ती ऋषी उत्तरेकडून दक्षिणेत आले आणि इथेच स्थायिक झाले. रामायणात असा उल्लेख आहे कि त्यांनी भगवान श्रीरामांना दक्षिणेत राक्षसांचे निर्दालन करण्यास आणि रावणाचे पारिपत्य करण्यास सांगितले. श्रीरामांनी रावणाचा पाडाव करून ते जेव्हा अयोध्येत परतले त्यानंतर अगस्ती मुनी ऋषी गणांसह अयोध्येत त्यांचे अभिनंदन करायला गेले. रावणपुत्र मेघनाद याचा वध केल्याबद्ल त्यांनी श्रीरामांचे विशेष अभिनंदन केले. असे विशेष अभिनंदन करण्याचे कारण म्हणून राक्षसांचा कुल वृत्तांत सर्वांसमोर सांगितला असा उत्तर रामायणात उल्लेख आहे. आर्य-द्रविड थियरी ( आर्यन इन्वेजन थियरी) नुसार आर्यांच्या वसाहतवादाचे जनक हे महर्षी अगस्ती होते. त्यांच्या अनेक अश्रामांपैकी प्रमुख आश्रमात अकोले इथल्या आश्रमाचा उल्लेख आहे. स्वाभाविक आहे कि इतिहासाच्या कोणत्या तरी कालखंडात त्यांचे या परिसरात वास्तव्य राहिले असले पाहिजे. महर्षी अगस्तींचे पूजन अगदी इंडोनेशिया पर्यंत केले जाते असा उल्लेख सापडला. अर्थातच ते कोणी असामान्य पुरुष असले पाहिजेत.
या भूमीचा इतिहास काही हजारो वर्षांचा आहे. स्वाभाविक आहे कि इथला मूलनिवासी कोण? तो मूळ स्वरूपात शिल्लक तरी आहे का?असे प्रश्न उपस्थित होतात. आणि तो मूळ निवासी तर मग मी कोण? प्रजापती दक्ष, जो एक राक्षस राजा होता त्याचेही या भूमीवर उपकार आहेतच आणि त्याची उत्तुंग कारकीर्द हेही आमच्याच दैदिप्यमान इतिहासाचा एक खंड आहे. आम्ही जसे त्याचे वंशज आहोत तसेच श्रीरामांचे, श्रीकृष्णाचेही आहोत. बारी गावाच्या वेशीवर सहज गाणे गुणगुणणारा तो माझा तरुण बांधव हाही तितकाच याच परंपरेचा पाईक आहे, माझी आणि त्याची संस्कृती एकच आहे. फक्त “ मी(च) मूलनिवासी” ही मांडणी चुकते आहे. तो ग्रामनिवासी आहे आणि मी शहरनिवासी. तो ग्रामवासी आहे म्हणजे मागासलेला आहे आणि मी शहरवासी आहे म्हणजे मी पुढारलेला आहे हि चुकीची समजूत काढून टाकायला हवी. त्याची जगण्याची रोजची पद्धत निराळी आहे आणि माझी निराळी इतकच काय ते! ...... काम अवघड आहे, पण आवश्यक आहे असे वाटून गेले.
सत्यजित चितळे, २२ ऑगस्ट २०१९


Sunday, July 7, 2019

पुणे सासवड वारी २०१९- टेक २


सोमवारी मध्यान्हीला ऑफिसमध्ये बसलेलो असताना पावसाची जोरात सर आली. खिडकीतून सहज बाहेर पाहिलं तर त्या माऊलींची आठवण जागी झाली. शुक्रवारी दुपारी साधारण याच वेळेस वारीतल्या दिंडीबरोबर दिवे घाट चढत असताना मला थोडस ढकलून च तो पुढे गेला होता. दिवे घाटात पावसानं असच आम्हाला गाठलं होत. तीन बटन उघडलेल्या त्याच्या सदर्यातून त्याच्या बंडी वरची तुळशीची माळ दिसत होती. आडवार पसरलेल्या पांढऱ्या मिशांतून माऊली माऊली चा घोष करत तो पुढे जात होता. चारच पावलांवर त्याची कारभरीण डुईवर तुळशी वृंदावन तोलून पावलं टाकीत होती आणि शेजारी त्याची म्हातारी. वडकी नाल्याजवळ भ्रष्टाचार निर्मुलन समिती तर्फे तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या वारकरी महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान केला जात होता. ती सन्मानाची साडी त्या माउलींनी खांद्यावरच्या पिशवीत ठेवलेली दिसत होती. दिवे घाटात दुसऱ्या कुणा दिंडीतल्या वारकर्यांनी तळ टाकलेल्या रिगणात रंगलेली फुगडी पाहण्याच्या नादात हा मागेच राहिला होता आणि मग ओळखीची माणसं शोधण्यासाठी तो धावत पळत घाट चढत आला. ‘तुमी इथवर आला व्हय, म्या तुमाला मागचं बघत व्हतो।‘ तो कारभारणी ला म्हणाला आणि त्याच्या दिंडीतल्या इतरांबरोबर रामनामाचा जप करत चालू पडला. माणसांनाच हा समुद्र खर तर चालला होता पंढरपुरास, त्यातून दिंडीचे पुढचे मुक्कामाचे ठिकाण नक्की असलेले पण तरीही आपल्या माणसाची वाटणारी ओढ हे मायेचे लक्षण इथे पाहायला मिळाले.
वारीचा एक वेग असतो, वारकऱ्यांची एक शिस्त असते आणि दिंडीचा ठरलेला क्रम. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन गोळीबार मैदानापाशी घेऊन आम्ही पुढे निघालो. पालखीचा रथ ताज्या गेंडेदार फुलांच्या माळांनी सुंदर सजवलेला, निशिगंध लिलीच्या फुलांचे सर त्यावरून खालपर्यंत सोडलेले आणि त्यात मधून मधून गुंफलेली गुलाबाची फुले. माऊलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी राथापाशी रेटा रेटी होत होती. रथ ओढणारे बैल गर्दीमुळे बावरलेले. त्यांचा नैसर्गिक वेग आणि पुढच्या दिंडीचा वेग यात अंतर असल्याने पालखीचा रथ थोडा थांबत असतो. पुन्हा थोडे अंतर पडले की पटकन पुढे होत असतो. रथ थांबला की दर्शनासाठी एकदम गर्दी होते. रथ निघाला की मग पळापळ रेटारेटी आणि चढाओढ. काही वेळेस इतकी वेगवान की धडधाकट माणूस सुद्धा लांबूनच दर्शन घ्यावे म्हणेल. याच भाऊगर्दीत एक कुटुंब आपल्या घरातल्या नव्या सभासदाला माऊलींच्या पायावर घालण्यासाठी आलेलं. आजीच्या हातात ते कोवळं तान्हुलं शांत झोपलं होत. इतक्या गर्दीत कशाला हा अट्टाहास अस माझ्या मनात सहजच येऊन गेलं आणि पुढे काय म्हणून माझे पाय काही वेळ स्तब्ध झाले. दिंडीला गाठण्यासाठी वेगानं चालणारा रथ अचानक थांबवला गेला, काही सेकंदासाठीच, माणुसकीचा हे दर्शन मला सुखावून गेलं. ‘पुंडलीका भेटी परब्रह्म आले गा।‘हे अभंगातील वर्णन मला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसलं. इतक्या भाऊ गर्दीत पालखीच्या रथात बसलेल्या मानकऱ्यांपैकी एक छोटा मुलगा मात्र त्या सोडलेल्या फुलाच्या सराशी खेळण्यात गुंगला होता. वारी, माया, भागवत पंथ वगैरे त्याच्या मन रामविण्याच्या कल्पनांच्या पलीकडील होत. त्याची निरागसता सहज भावली. हडपसरच्या पुलाजवळ पहाटेच उठून रखुमाईच्या थाटात नटूनथटून आलेली एक चिमुरडी हातातला राजगिर्याचा लाडू खात पालखीची वाट पहात होती. एरवी वाहनांनी भरलेल्या रस्त्यावरून आज हे एव्हढे लोक कुठे चालत चाललेत हे तिला समजत नसावं, तीचं ते समजण्याचा वयही नव्हतं पण हौस मात्र दांडगी! दिवेघाटाच्या खिंडीत उजव्या बाजूच्या मंदिरात असाच एक गोरा गोमतेला चिंटू ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात आपल्या मामाबरोबर दर्शन ‘घेत’ उभा होता. त्याच्याही डोळ्यात ते कुतूहल मला दिसलं.
सासवडकडून पुण्याच्या दिशेनं पहिलवानी तब्येतीचे कडक लिनन चे शर्ट घातलेले तरुणांचे घोळके पालखीच्य दर्शनासाठी येत होते. विशीतल्या त्याच्या देहबोलीत भक्तीचा भाव कमी आणि मिरवायला आल्याचा भाव जरा जास्त होता. वारीत चालणाऱ्या ‘युवकांच’ वयोमान मात्र तिशी- चाळीशी तल असल्याचं जाणवलं. दिंडीतले बहुतेक तरुण पखवाज वादक, विणेकरी अथवा टाळ घेऊन भजन आणि कवनं म्हणत भक्तिरसात न्हाले होते. दिवेघाटाच्या माथ्यावर जिथे हे क्षण अनुभवत होतो तिथेच रॉबिनहूड आर्मी नावाच्या चक्क विदेशी नावाचे टीशर्ट घातलेली शहरी वळणाच्या तरुण-तरुणींचा गट सर्वांना लिंबू सरबताच वाटप करत सेवा करत होता. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व जण पेपरचा कप टाकू नका आमच्याकडे परत द्या अस अग्रहपूरर्वक आवाहन सर्वांना करत होते. दोन चार स्वयंसेवक पुढे उभे राहून सरबत पिणाऱ्यांकडून रिकामे कप परत घेत होते. आधी रस्त्यावर ठिकठिकाणी चहा वाटप होत होते आणि त्या सगळया परिसरात चहाच्या रिकाम्या कपांचा सडा पडलेला होता, फुरसुंगीजवळ अश्याच एक चहा वाटप केंद्राजवळ हताशपणे बसलेले पुनावाला क्लीन सिटी चे कर्मचारी माझ्या डोळ्यासमोर अजून होते.त्या पार्श्वभूमीवर रॉबिनहूड आर्मी ने व्यापलेला परिसर मात्र एकदम स्वच्छ असल्यानं त्याचे वेगळेपण नजरेत भरत होतं.
असच वेगळेपण सासवडजवळ एका गणेश मंडळाच्या व्यवस्थेत दिसलं. अन्यथा वरीतल्या स्वच्छता विषयाचा अनुभव अत्यंत उणा होता. वरीतल्या काळात मुक्कामाच्या गावातील स्वच्छतेच्या प्रश्नावर काही वर्षांपूर्वी  सेवा सहयोग ने पुढाकार घेत निर्मल वारी चा उपक्रम यशस्वी केला आणि संघ प्रणित संघटनांच्या प्रयत्नातून आता त्याचे एका चांगल्या चळवळीत रूपांतर झाले आहे. परंतु सार्वजनिक स्वच्छता आणि समाजाच्या मालकीच्या संसाधनांचा सुयोग्य वापर या विषयी आपल्या समाजाला किती मजल मारायची आहे याची जाणीव अश्या अनुभवातून होते. मी अत्यंत खुजा परंतु आषाढी वारीसारख्या परंपरा या समाज परिवर्तनाचे साधन ठरू शकतील का? असाच प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात डोकावला.

ट्रेकिंग करताना अवघड, अंगावरचे चढ चढताना श्वास व पावलातला रिदम साधण्यासाठी आणि कवचित मनोधैर्य टिकवण्यासाठी मनातल्या मनात ‘when the going gets tough, the tough gets going'  असं घोळवत जायचा प्रघात मी गेली काही वर्षे पाळतोय,  या वर्षी वारीत मला आणखी एक असाच ताल सापडला तो ‘माऊली हळू हळू चाला मुखाने रामनाम बोला’ या बोलातून. या तालात भक्ती आहे पण अभिनिवेश नाही. व्यक्तिगत अभिनिवेश आवश्यक असला तरी अनेक वेळेस उगा त्रागा करायला भाग पाडतो. कामाच्या गर्दीमूळे मनात उसळणाऱ्या विचारांच्या लाटा शांत सहज होतात वारी केल्यावर. शांत पाण्यात वेगानं पोहणारं एखाद बदक अपल्यमागून फेसळणाऱ्या पाण्याची एखादी रेष सोडून जात तस एखादा वारकरी, एखादा भाविक, एखादा याचक किंवा सेवेकरी सुद्धा मनाच्या पटलावर विचारांची रेघ सोडून जातो पण तिथे एखाद्या अनुभवाची ही रेघ महणजे ओरखडा उरत नाही, ती केव्हाच विरून जाते मनाच्या गाभाऱ्यात आणि मग त्यातून उठणारे तरंग फक्त उरतात, मन गढूळ करणाऱ्या विचारांना शांत करत किनाऱ्याकडे शांतपणे विरत जाणारे. वारीचा हा दुसरा अनुभव म्हणूनच मला भावला.
सत्यजित चितळे, पुणे
6 जुलै 2019

Wednesday, June 12, 2019

वायल्डरनेस्ट रिसॉर्ट, चोर्ला घाट इथली एक रम्य सकाळ

30 मे  2019 गुरुवार च्या पहाटे जाग आली ती शेजारच्या कॉटेज मधून ऐकू येणाऱ्या ओंकाराने. पाठोपाठ शुद्ध स्वरात म्हणले जाणारे प्रात:स्मरणाचे श्लोक ऐकू आले. 'डॉक्टर चितळे उठलेले दिसतात' असे माझ्या मनात आले. खालच्या अंगानं गुरगुरण्याचाही आवाज आल्यासारखं वाटला, पण त्याला एक लय असल्यानं नारदमुनींच्या घोरण्याचा असावा असा मी कयास बांधला!
पहाडी मैना अर्थात मलबार व्हीसीलिंग थ्रूश ने पहाटेची सुरमयी सुरुवात इतक्यातच करून दिली.  रिसॉर्ट मधील कॉटेज या चौबाजूने उत्तम प्रकारे बंदिस्त असल्याने जंगलातील इतर हालचालींचा मागोवा इथे घेता येत नव्हता. त्यामुळे रातकिड्याच्या अनाहत किरकिरी मुळे जंगलातील रात्र कंटाळवाणी वाटत होती. कॉटेजच्या आतल्या उतरत्या छपरावर काल झोपताना दिसलेली काळीकुट्ट पालीची आकृती जागा बदलून वेगळ्या पोझ मध्ये थांबलेली दिसत होती. बाहेर वाळलेल्या पानांमधून बांधलेल्या जांभ्याच्या दगडातील नागमोडी पायवाटा आणि त्याच्या हबाजूने उपड्या घमेल्याखालून प्रकाश पखेरणारे पिवळे दिवे पहाटे शांत श्रमलेले वाटत होते. सह्याद्रीच्या धारेवर घाटमाथ्याच्या पश्चिमेच्या उतारावरच्या माचीवर सूर्य उगवायचा तर चांगले 9-9.30 वाजायला हवेत आणि त्यातून इथली झाडी इतकी दाट की सूर्यप्रकाश जमिनीवर पोचता पोचता त्याचा कवडसाच हाती यावा. पण ग्रीष्मातल्या सूर्याची तळपती आभा इथे दृश्य प्रकाश पसरवण्यासाठी समर्थ होती. कडक सूर्यप्रकाशाचा अभाव आणि विविध वृक्ष आणि झुडुपे असलेल्या या जागी मे महिन्याच्या अखेरीस रात्री चक्क ब्लॅंकेट घेऊन झोपावे लागले इतकी हवा थंड आणि आल्हाददायक होती. पहाटे पासूनच मैना, धनेश गरुड, तांबट व इतर पक्ष्यांनी किलबिलाट सुरू केला. कधी अगदी जवळून एखादयाने दिलेली हाळी अगदी दुरून कोणीतरी त्याचा जातभाई होकाराने भरत होता. ध्वनी प्रतिध्वनी चा खेळ वाटावा असा कार्यक्रम पहाटे तासभर चालू होता. घनदाट पानांच्या झाडातून पक्षी मात्र आमच्याशी लपंडाव खेळत होते. त्यांची चपळ हालचाल डोळ्यातही मावत नव्हती, कॅमेऱ्याची तर बातच सोडा.
कालचीच गोष्ट.....पक्षी बघायला बाहेर पडावे तर रिसॉर्ट कडे जाणाऱ्या लाल मातीच्या खडकाळ रस्त्याच्या बाजूला उंच झाडावरून शेकरूने साद दिली. तिचा फोटोसाठी केलेला पाठलाग व्यर्थच गेला, पण त्या धावपळीनंतर रस्त्यालगत एका शुष्क झुडुपाच्या दांडीवर पोपटी रंगाचा हरणटोळ लक्ष वेधून गेला. त्याचे फोटॊ मिळवण्यासाठी केलेली धावाधाव मात्र कामास आली. वर वर शांत आणि एखाद्या तपस्वी असावा इतक्या स्तब्ध असलेल्या या सर्पाचे डोळे झूम केल्यावर त्याचा विशेष स्वभाव दाखवून गेले.
मग वेळ झाली जंगल ट्रेकची. रिसॉर्ट मधली दगडी वाट सोडून जंगलातली पायवाट पकडली आणि आपण खरंच एका वेगळ्या जगात पाऊल ठेवल्याची जाणीव झाली.इथले विविध वृक्ष, झुडुपे बघताना जाणवलं की आपल्याला या जगाची काहीच म्हणजे अगदी काहीच माहिती नाहीये. सहज शिरता सुद्धा येणार नाही इतकी घनदाट झाडी, उंचच उंच वृक्ष, वाळवीची वारूळ, पाला पाचोळ्याने आच्छादलेला डोंगर उतार, वर बघून पानांतून दिसलेच तर पूर्वेकडे डोंगर आणि पश्चिमेकडे सगराकडचे क्षितिज, इतक्या घनदाट जंगलात हमखास असणाऱ्या बिबट्या, कोल्ह्याची काल्पनिक भीती असे आम्ही तासभर चालत पाण्याच्या वाटेकडे निघालो होतो. पाण्याच्या धारेजवळच जायचा उतार एकदम तीव्र आणि घसरडा , अगदी अपेक्षित असाच. सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर धोधो पडणाऱ्या पावसाचं पाणी इथं भुसभुशीत असेल ते सगळंच घेऊन जातं, फक्त कठीण काळा कातळच त्याला रोखून धरतो अशा या व्हवाळाच्या वाटेवर आम्ही उतरलो. प्रवाहाच पात्र चांगलं 30-40फूट रुंद होतं. पाण्याच्या ओढीनं मोठमोठे पाषाणसुद्धा वाहून आलेले आणि जमेल तसे बस्तान बसवून पात्रात ठिय्या देऊन बसल्यासारखे दिसत होते. इथून मग प्रवाहाच्या उगमाच्या दिशेने थोडी चाल करत गेलो, वाटेत काही ठिकाणी अजूनही दगडातून पाण्याचे झरे वाहताना दिसत होते. मग परतीचे वेध लागल्यावर नामदेवाने उजव्या हाताने सरळ वर चढाई केली. दमछाक होत अंगावरची चढण ढोर वाटेनं पूर्ण करून आम्ही चांगल्या मळलेल्या वाटेला लागलो तेव्हा पुन्हा आपल्या जगात आल्यासारखं वाटलं.
जंगलातल्या दगडांवर पांढरे वेडेवाकडे रंगावल्यासारखे छप्पे दिसले तर समजावे की इथली हवा 100% टक्के स्वच्छ आहे असे नामदेवाने सांगितले. जंगलात वाढणारी एक प्रकारची बुरशी असे छप्पे तयार करते आणि ती बुरशी फक्त शुद्ध हवेतच वाढते असे त्याने सांगितल्यामुळे आमच्या फुफुसातून एक स्वच्छ उच्छवास बाहेर पडला!. नामदेव आमचा  जंगल भ्रमंतीतला वाटाड्या. गोवा-महाराष्ट्र हद्दीवरच्या "सुरल" गावाचा तरुण रहिवासी.त्याचं बालपण इथल्या मातीत गेलेलं त्यामुळे या जंगलाची त्याची चांगली ओळख आहे. माकड लिंबाचं झाड, फात्र्याबोंडाची काळी फळे अश्या वृक्षजीवनाबरोबरच अस्वलाने उकरलेले वाळवीचे वारूळ, उदमांजराची विष्ठा आणि विजेच्या चपळाईने झुडुपात गायब झालेल्या माउस डियर ची त्याला उत्तम माहिती होती. रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या पाहुण्यांना जंगल ट्रेक घडवणे या बरोबरच तिथल्या हर कामात त्याची मदत होताना दिसली. त्याच्या गावच्या कोण्या केळकर नावाच्या भल्या व्यक्तीची ओळख अजिंक्य ने त्याला सांगितल्याने त्याची आमच्याशी जवळीक वाढली.मधाच्या पोळ्यांचे दर्शन जंगलात न झाल्यामुळे चंदना ने त्याला विचारले त्याचा आधार घेऊन त्याने परतल्यावर मधाच्या दोन बाटल्या आम्हाला दिल्या, आमच्या खिशात हात घालून आणि आपुलकीचे मधाचे बोट लावून सुद्धा!
या नामदेवाला भेटल्यावर मला 11 वर्षपूर्वी पावनखिंड रिसॉर्ट मध्ये भेटलेल्या शिरगावकरांच्या पदरच्या नामदेवाची आठवण झाली. पर्यटकांची सेवा करणाऱ्या आणि जंगलात रममाण झालेल्या त्या नामदेवाच्या वागण्यात मात्र कमालीचा साधेपणा होता. तोही अगदी असाच, गावाकडचा रहिवासी, पर्यटकांना सेवा पुरविण्याची हौस आणि जंगलात फिरण्याची सवय या गुणांवर उदरनिर्वाहाचं साधन मिळवलेला!
नेहमीचं जंगलातून ट्रेक करताना, निसर्गाच्या जवळ जाताना आपण तिथे काही ढवळा ढवळ तर करत नाही ना या शंकेने माझं मन खातं. भर जंगलात, अगदी समुद्राला लागून बीचवर, बर्फावरच्या सुंदर डोंगर उतारांवर पर्यटनाला मर्यादा असावी असं मला नेहमीच वाटतं. खासकरून निसर्गाशी काही देणं घेणं नसल्यासारखे वागणारे लोक भेटले की हे प्रकर्षानं जाणवतं. खरोखर कायद्यानं अशी मर्यादा घालावी तर मग नामदेवा सारख्या अनेकांचं काय?

सत्यजित चितळे
जून 2019

Sunday, August 13, 2017

श्रीमंताचा डबा




४५० उंबरयांच्या आमच्या गावात सकाळी ८.४५ वाजता हणमंतरावांची एन्ट्री होत असे. २४ इंची जुन्या सायकलीवर स्वार झालेले हणमंतराव पायातला लेंगा चेन मध्ये अडकू नये म्हणून गुढग्यापर्यंत वर खोचून घेत असत. विटलेला पण स्वच्छ धुतलेला आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि डोक्यावर स्वच्छ धुतलेलि गांधी टोपी घालून आलेली त्यांची स्वारी गेट वरील दरवानाच्या केबिन पाशी पायउतार होत असे.

हणमंतराव आमच्या सोसायटी मधील वयाने सर्वात मोठे असलेले सफाई कर्मचारी. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांची यायची वेळ आणि माझी ऑफिसला जायची वेळ जुळत असल्याने त्यांची हि एन्ट्री माझ्या हमखास लक्षात येत असे. हातात झाडू किंवा फारशी पुसण्याचे फडके घेऊन ते वेगाने झाडलोट, फारशी पुसण्याचे काम करताना मी बघत असे. वयाने सर्वात मोठे असल्याने सफाई कर्मचारी वर्गावर ते देखरेख ठेवण्याचेही काम करीत. सुरवातीला त्यांच्या असण्याची मी फक्त नोंद घेतली होती, एकमेकाची ओळख करून घ्यावी अशी काही गरज मला आणि त्यांनाही वाटली नाही. मात्र एकदा त्याची स्वारी सहकाऱ्यांना सूचना देत माझ्या गाडी मागे उभी होती, आणि मी सहज म्हणालो  “ मामा जरा जागा देता का? गाडी काढायचीय.” माझ्या या आर्जवयुक्त विनंतीने संकोचल्या पासून त्यांच्याशी जवळीक सुरु झाली. मग जाता येता नमस्कार, आणि सहज चौकश्या सुरु झाल्या. अर्थात त्यांना माझे आणि मला त्यांचे नाव माहित व्हावे असे संभाषण बरेच महिने घडले नाही.

आमच्या इमारतीखालील पार्किंग हि या सफाई कर्मचार्यांची दुपारच्या जेवणाची आणि विश्रांतीची जागा. इमारतीत राहणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्या सकाळी बाहेर पडतात त्या एकदम रात्री परत स्वस्थानी येतात. उरलेला वेळ त्या जागेत मुलांचे खेळ, तरुणांचे घोळक्याने गप्पा सत्र, भाज्यांचा स्टॉल असा त्याचा सदुपयोग केला जातो. मुद्दामहून खडबडीत फारश्या बसवलेल्या तिथल्या जमिनीवर हनमंतराव आणि त्यांची टीम एखाद्या गादीवर बसावे इतक्या सहजतेने डबा खायला बसत असतात. दुपारी ते सहजच त्या फरशीवर क्षणभर आडवेहि होतात आणि त्यांना अगदी घोरण्या इतकी झोप लागते हे मी बघत असतो.

त्या दिवशी दुपारी अचानकच एका कामानिमित्त मी कंपनीतून घरी आलो. दुपारचे २-२.१५ चा सुमार होता. हनमंतरावं त्यांच्या सहकार्यांबरोबर जेवायला बसत होते. पार्किंग मध्ये मोटर सायकल उभी केली तेंव्हा घराची किल्ली खिशात नसल्याचे लक्षात आले. घरी कोणी नव्हते म्हणून थोडा वेळ वाट पाहत मी मोटारसायकलवर बसणे पसंत केले.

“ या जेवायला” हनमंतरावांनी त्यांच्या खरखरीत पण प्रेमळ आवाजात हसून आमंत्रण दिले. ‘एक तीळ सात जणात वाटून खावा’ या उक्तीचा विसर पडू नये अशी हि पाहूणचाराची रीत. आजकालच्या चकचकीत शहरी वातावरणात हरवत चाललेली!

“येईनहि मी खरंच, तसा माझा गरीबाचा डबा आहेच माझ्या जवळ!” मोटरसायकल वर ऑक्टोपस ने अडकवलेल्या माझ्या जेवणाच्या डब्याकडे बोट दाखवत आणि डोळे मिचकावत मी उत्तरलो खरा, पण उगाच त्यांना ओशाळल्यासारखे होईल का काय असे वाटून पुढच्याच क्षणी मलाच माझ्या बोलण्याची लाज वाटली. ‘अच्छा, गरीबाचा डबा आहे होय, मग नका येऊ, आमचा डबा हा श्रीमंताचा आहे!” खो खो हसत हनमंतराव उत्तरले आणि हातानेच त्यांनी मला जवळ येऊन बसण्याची खूण केली. आता चकित व्हायची पाळी माझ्यावर होती. मी सहज त्यांच्या जवळ सरकलो. माझा डबा तसाही खाऊन झालेला होता आणि तसे खरे सांगून मी त्यांच्या बरोबर जेवायला बसायचे नाकारले. पण मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो.

त्यांचा डबा दोन खणी. खालच्या खणात भाकरी आणि वरच्या खणात रस्सा  भाजी, दुमडलेल्या भाकरीत चटणीचा गोळा. जेवणाचा डबा याच्या व्याख्येत एव्हढेच पदार्थ येतात आणि असा डबा नेणाऱ्या कोणालाही, अगदी कोणालाही याचे काही वैषम्य वाटत नाही. माझाही डबा प्रसंगी इतकाच असतो तरीही या डब्यात “गरीबाचा आणि श्रीमंताचा” असा भेद त्यांनी का करावा असा प्रश्न मला पडून गेला. ‘असेल, काहीतरी बोलायचे म्हणून बोलले असतील’, मी माझ्या मनाची समजूत काढली. हनमंतरावांनी भाकरीचा एक घास चटणीला लावून माझ्या हातावर ठेवलाच आणि मीही तो आनंदाने स्वीकारला. त्यांच्या इतर सहकार्यांना जरा संकोचल्यासारखे झाले होते आणि ते त्यांच्या आणि माझ्याही लक्षात आले होते. मग त्यांच्या एकमेकात कानडी- मराठी मध्ये हळू हळू बोलणे सुरु झाले आणि मी माझी नजर उगाचच मोबाईल मध्ये गुंतवली. मी जरी त्यांच्याकडे पाहत नसलो तरी माझे कान त्यांच्या बोलण्याकडे आणि नजर मधून मधून त्यांच्याकडे बघत होती. त्यांच्या बोलण्यातील विषय त्यांच्या सहकार्याच्या मुलाच्या नोकरी विषयी होता. तो उमेदवारीच्या वयात असणार आणि अपेक्षा खूप पण क्षमता कमी अश्या सर्वसाधारणपाने आढळणाऱ्या अडचणीत सापडलेला असणार. हनमंतरावं त्यांच्या स्वत: च्या उदाहरणावरून त्याला समजावून देत होते. आपली जेवढी झेप तेवढीच अपेक्षा असावी असा त्यांचा समजावणीचा सूर होता. त्यांचा सहकारी त्यांचे हे म्हणणे समजत होता, पण पोराने “शिकवलेले” प्रगतीचे मंत्र त्याच्या मनात घोळत असावेत. ‘मुलाने धडपड केली आणि अंगापेक्षा मोठा बोंगा केला तर तो कदाचित जास्त सुखी होईल’ असे त्याचे मत होते. ‘अरे पण जे झेपणार नाही तेच कशाला करायला जायचे आणि एवढे मिळवून मिळवून काय सुख तो मिळवणार आहे? आपण काय कमी सुखी आहोत काय? ‘ असा युक्तिवाद हनमंतराव करीत होते. मला हा युक्तिवाद पटत नव्हता. अर्थात ज्याचे विषयी बोलणे चालले होते तो मला अनोळखी असल्याने मी त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला नाही. ‘सुखी माणसाच्या सदरा’ सर्वांनाच हवा असतो, अगदी मनापासून, पण ती गोष्ट आळशीपणाचे उदात्तीकरण करणारी आहे असे माझे नेहमीच मत आहे.

हनमंतराव अश्याच काहीश्या सुखाच्या कल्पना त्यांच्या सहकाऱ्याच्या समोर मांडत होते, आणि म्हणूनच माझा त्यांना विरोध होता. आपल्याला कसे दोन वेळ साधे पण चांगले जेवायला मिळते, ठराविक नोकरी, ठराविक झेपेल असे आणि इतकेच काम, दुपारी आराम आणि या सर्वाला योग्य आणि आपल्या गरजा भागवण्याइतका पगार या त्यांच्या सुखाच्या कल्पना होत्या.आपल्या गरजा या कमी जास्त करता येतात आणि त्या आपणच ठरवाव्या असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. बोलण्याच्या या टप्प्यावर त्यांचा डबा संपत आला होता. भाकरीचा शेवटचा तुकडा उजव्या हातात घेऊन त्यांनी भाजीच्या डब्यात डोकावून पहिले, बहुतेक भाजीसुद्धा संपली असावी. दोन खाणी डब्यातल्या वरच्या डब्याला त्याची निट चळत राहावी म्हणून खालच्या बाजूला एक खळी बनवलेली असते. रस्सा भाजी असेल तर थोडासा रस्सा त्या खळीत जाऊन बसतो. डबा तिरपा करून त्यांनी भाकरीच्या टोकाने त्या खळीतला रस्सा खरवडून काढला आणि सहज त्याचा घास करून तो स्वाहा केला. तो घास खाताना त्यांचे डोळे असीम समाधानाने चकाकले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. ‘तुमची कंपनी आहे न साहेब?’ त्यांनी मला प्रश्न टाकला. ‘तुम्ही रोज जेवायचा डबा घेऊन जाता?’ पाठोपाठ दुसरा प्रश्न.” खूप कामाच्या व्यापात असता तेंव्हा असा समाधानान डबा खायला वेळ मिळतो तुम्हाला?” हा प्रश्न मात्र थेट गुगली होता, विचार करायला लावणारा. ‘मला रोजचा डबा खाताना असेच समाधान मिळते, आणि म्हणूनच माझा डबा साधा असला तरी श्रीमंताचा आहे असे मी म्हणतो!’ हनमंतरावांनी खुलासा केला. त्यांचे म्हणणे खरे आहे असे मला वाटले. या दृष्टीने पाहता, आपलाही डबा हा रोजच्या रोज श्रीमंताचा होऊ शकतो असे मला वाटून गेले.

“चला दुपारनंतर पोर्च झाडायचा आणि धुवायचा आहे आज”, उठता उठता आपल्या सहकार्यांना त्यांनी बजावले. खांद्यावर हात रुमाल टाकून आणि डबा हातात घेऊन बेसिनकडे जाताना त्यांच्या अंगावर मला ‘तो’ सुखी माणसाचा सदरा दिसला!



सत्यजित चितळे

१३ऑगस्ट, २०१७

Monday, January 2, 2017

रायरेश्वर


२९ डिसेंबर २०१६, वर्षाअखेरीच्या जवळच्या गुरुवारी रायरेश्वराला मुजरा करण्याच्या योग आला. कानद  खोर्यातील हे जागृत देवस्थान. सह्याद्रीच्या कुशीत, उंच अश्या पठारावर वसलेलं, थोडस दुर्लक्षित कारण सहजासहजी तिथे जाता येत नाही म्हणून. छत्रपती शिवराय यांनी त्यांच्या सवंगड्याबरोबर इथे स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली असे अवघा महाराष्ट्र जाणतो आणि मानतो सुद्धा. शिवरायांचा इतिहासच असा आहे कि त्याच्या श्रवणाने एक वेगळेच स्फुरण चढत.

अश्या या स्फूर्तीदायी ठिकाणी शाखेतल्या बाल आणि तरुणांना घेऊन जाण्याची कल्पना निघाली आणि बेत लगेच ठरला. पुण्याहून मिनी बसने सकाळी निघालो आणि निरनिराळी पद्य म्हणत भोर- अंबवडे-टीटेघर मार्गे कोरले गाव गाठलं. पूर्वी इथे वाहन लावून पुढे पायी चढून जावे लागत असे. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चांगला रस्ता झालाय जो आपल्याला रायरेश्वर-केंजळ च्या खिंडीपर्यंत घेऊन जातो. वळणा वळणाचा चढाचा रस्ता केंजळ गडाच्या उतारावरून वर सरपटत जातो. चुरगळलेल्या गांधी टोपीसारखा दिसणारा केंजळगड रायरेश्वर पठाराला एका सलग डोंगर रांगेने जोडला गेलाय. आमने सामने असलेल्या रायरेश्वर पठार आणि केंजळगडाला जोडणारी ही रंग घोड्याच्या नालीचा आकार घेतलेली आहे. त्याच्या मधोमध असलेल्या खिंडीतून रस्ता पलीकडल्या गावाला जातो. ही गावे अजूनही दुर्गम या श्रेणीतच मोडतात, रस्ता होण ही त्यांची श्रेणी सुगम होण्यामधली पहिली पायरी आहे.

खिंडीत गाडीतून पायउतार होऊन बाल चमूला घेऊन गडाकडे प्रस्थान केलं. दोन्ही बाजूला सरळ उतार असलेल्या डोंगर धारेवरून जाणारा रस्ता असल्याने सर्वांना सावध असण्याविषयी सूचना दिल्या होत्या. थोडे अंतर चालून –चढून गेल्यावर डोंगर कड्यावर जाणारी शिडी लागते तिथे थोडे थांबलो. कारवीचा फुलोरा या वर्षी येऊन गेला. त्याच्या बोन्डामधून आता उग्र आणि मादक सुगंध येत होता. पूर्वी कधी तिकोना किल्यावर अश्याच बहराच्या वर्षी कारवीच्या झाडीत अनवधानाने लोळण घेतली होती. सर्वांगावर त्या दिवशी जो त्या अत्तराचा लेप चढला होता त्याचा सुगंध घरी येऊन अंघोळ करेपर्यंत घमघमत होता त्याची आठवण झाली.

सरळ उभी अशी ती शिडी आणि पुढच्या पायऱ्या एका दमात चढण्यासाठी डोंगराची थोडी सवय असावी लागते. प्रचंड पाऊस आणि वार्याच्या प्रभावाने इथले कातळ करवतीने कापल्यासारखे झिजले आहेत. त्याचे ते रॉक फोर्मेशन नजरेत भरते. गेल्या काही वर्षात वरती पठाराच्या कडेने थोड्या अंतरापर्यंत संरक्षक कठडा बसवला आहे. चढून जाण्याची वाट जिथे पोचते तिथून मंदिरापर्यंत सिमेंट ब्लॉकने स्वच्छ पायवाट केली आहे. त्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्न नव्हता. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत पोचायला साधारणपणे अर्धा तास चालव लागत. खडकाळ अश्या या पठारावर मोठी झाडे अगदी तुरळक. बरीचशी छोटी झुडुपे आणि रानोमाळ वाढलेलं गवत. ठीक ठिकाणी अजूनही फुलेलेली रानफुले आणि त्याभोवती गुंजारव करणाऱ्या मधमाश्या आणि भुंग्यासारखे मखमली पाठीचे कीटक. मधूनच येणाऱ्या वार्याच्या झुळुकीने गवत नाचत होते. उरलेल्या वेळेस ते पठार अगदी सुस्तावल्यासारखे स्तब्ध. वाहनांच्या गोंगाटापासून अगदी दूर अश्या या शांत वातावरणात चालत जाताना आपल्या पायांचा, अगदी सौम्य स्वरात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचा आणि मधमाश्या आणि कीटकांच्या गुंजारावाचाच काय तो आवाज ऐकू येत होता.

रायरेश्वराचे दोन खणी पुरातन मंदिर हेमाडपंथी बांधणीचे. पावसापासून संरक्षणासाठी पूर्णपणे पत्र्याने झाकलेले आहे. त्याच्या शेजारीच पांथस्थांसाठी बांधलेली एक मोठी शेड आहे. तिथे टेकलो. मंदिरासमोर शिवरायांचा अर्ध पुतळा आहे. शेजारीच उंबराचे एक चांगले वाढलेले झाड. मुलांचा उत्साह आणि उर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भक्कम असे ते झाड बघितल्यावर त्यांना पूर्वाश्रमीची आठवण झाली आणि झाडावर चढून बागडायला ती सर्व मोकळी झाली. बाजूलाच चुन्याच्या घाणीचे अवजड दगडी चाक पडलेले. हे नेमके काय आहे या प्रश्नाला “उखळ, ध्वज लावण्याची जागा, रथाचे चाक” अशी कल्पनेतील उत्तरे मुलांनी दिली. स्वाभाविक आहे, पोत्यातून येणाऱ्या सिमेंटने बांधलेल्या घरात वाढलेली मुले, त्यांना चुन्याची घाणी काय माहित? पण त्यांना हे माहित असायला हवं. इथल्या वनस्पती, पक्षी यांची थोडी तोंडओळख असायला हवी. इतक्या उंचीवर झर्याचे ठिबकणारे निर्मळ पाणी असू शकते याचे त्यांना आश्चर्य वाटायलाच हवे. असे ठिबकणारे पाणी गोळा करून साठवण्यासाठी बांधलेल्या कुंडात पाणी येण्यासाठी बनवलेले गोमुख त्यांनी बघायला हवे. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे गोमुख झिजून जाते म्हणून त्याच्या नलीकेमध्ये सूरनळी सारखं सरकवलेल कर्दळीच किंवा हळदीच पान बघून त्याचं कुतूहल चाळवायलाच हवं. त्या कुंडातून बाहेर पडणाऱ्या ओव्हरफ्लो कुंडात फिरणाऱ्या पान-निवळ्या या उपयोगी किटकाची त्यांना योग्य माहिती कुणी तरी द्यायला हवी.

मंदिराच्या पलीकडे एक मोठा तलाव आहे, पावसाळ्यात पात्र विस्तारणारा. आता तिथे अजिबात पाणी नव्हते. त्याच्या पत्रात गुलाबी रंगाच्या तुर्याची चादर पसरलेली. अशी मनमोहक फुले पावसाळ्यानंतर सगळ्या रायरेश्वर पठारावर फुलतात, आणि हे पठार अगदी कास च्या पठारासारखे दिसू लागते असे अनेकांनी सांगितले.

प्रत्यक्ष शिवरायांनी ज्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला तो रायरेश्वर मात्र कडी कुलुपात बंद होता. श्री. जंगम यांचेकडे पूर्वापार पूजा व्यवस्था आहे, ते आल्यावर थोड्या वेळासाठी त्यांनी गाभार्याचे दार उघडले आणि रायरेश्वराचे दर्शन घेतले. अगदी छोट्या अश्या या गाभार्यात फार लोकांना उभे राहायला जागाच नाहीये मुळी. प्रत्यक्ष शिवरायांनी ज्या शिवलिंगाची पूजा केली त्याला हात जोडतांना एक वेगळीच अनुभूती मनाला स्पर्शून गेली. अर्थात या देवस्थानाला इतक्या सुरक्षेची गरज काय हा प्रश्नही मनात उमटून गेला.

श्री. गोपाळ जंगम यांचेकडे भोजनाची व्यवस्था सांगितली होती. दर्शन आणि नंतर ‘खजिना शोध’ खेळ झाल्यावर त्यांचेकडे प्रस्थान केले. नाचणीची भाकरी, टोमाटोची आणि वाटण्याची भाजी, वरण, भात असा खास बेत होता. तुडुंब जेवून पुन्हा जवळच्या टेकाडाकडे मोर्चा वळवला. थोडे उंचावर जाऊन परिसर पाहण्याच्या हेतूने. तुडुंब भरलेले पोट आणि उन्हामुळे आलेली सुस्ती यांनी पाय मागे ओढल्यामुळे मधूनच सगळे परत फिरले. आता परत निघण्याचा निर्णय झाला आणि उताराच्या दिशेने वाट पकडली.

दुपारच्या वेळेत सुस्तावलेल्या या पठारावरून परत येताना मन सहज ३७० वर्षे मागे गेले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड लोकांना एकत्र केले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या प्रसंगाचा इथला चिरा अन चिरा साक्षीदार आहे. त्या वेळी हे मावळे असेच एकत्र इथे आले असतील. कुठल्या मार्गाने चढले असतील? काय बोलले असतील? त्यांनी काय पेहराव केला असेल? या विषयी निश्चित काही लिहून ठेवलेले नाही. पण ते सर्व एकत्र, एकाच उद्देशाने इथे आले होते हे मात्र निश्चित. त्या वेळी समाज जाती-पतींनी दुभंगलेला होता का? अठरा-पगड या शब्दातच एक सूचक शब्द आहे- पगड अर्थात पगडी. मुळात गुण-कर्मा तून निर्माण होणारी श्रेणी आणि ती दर्शविणारी खूण म्हणजे डोक्यावरची पगडी. ती जगण्याच्या हक्काच्याही अडवी यावी इतका हा आपला समाज कसा दुभंगला?  केव्हा आणि का घडले असेल हे सर्व?  सुधारकांच्या काळात अश्या सहली निघाल्या असाव्यात का? ज्या सूत्राने समाज बांधला गेला ती ठिकाणे त्या काळात लोकांनी आवर्जून जाऊन बघितली का? त्याचा अर्थ समजून घेतला का?

आम्ही २१ जण इथे होतो. अश्या अनेक सहली मी आत्तापर्यंत केल्या. बरोबरचे लोक कोणत्या जातीचे आहेत हे कधी विचारावेसे सुद्धा वाटले नाही. एखाद्याच्या आडनावावरून त्याचा शोध घ्यावा असे माझ्या मनात कधीही आले नाही. हा पुरोगामित्वाचा संस्कार माझ्यावर संघात झाला. अन्यथा अगदी उच्चविद्याविभूषित लोक हळूच खासगीत या विषयी कुजबुजताना मी ऐकले आहेत. जो प्रश्न सोडवायचा आहे, त्याच्या खोलात शिरा असे म्हणतात. पण मुळातच बिनबुडाच्या प्रश्नावरचा हा उपाय असूच शकत नाही. जाती पातींचा आणि त्यावरून भांडणे होण्याचा प्रश्न हा असाच मुळात बिनबुडाचा पण खूप सजवलेला प्रश्न आहे असं मला वाटून गेलं. तो विषय विसरूनच जाणे हेच त्या वरचे खरे उत्तर आहे.

-सत्यजित चितळे














Tuesday, November 29, 2016

दहा रुपयांची गोष्ट


गुरुवारची गोष्ट. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानासामोरून जाऊन पुढे पेगासस क्लब समोरील तिठ्या जवळ घडलेली. सूर्य अस्ताला गेला होता बहुतेक. या भागात सूर्योदय आणि सूर्यास्त हा कॅलेंडर मधील वेळेनुसार होतो असे म्हणायचे कारण सिमेंटच्या जंगलातून तो प्रत्यक्ष होताना दिसतच नाही. तर अशीच संध्याकाळची वेळ, अगदी संधीप्रकाश पसरतो तेंव्हाची. ताथवडे उद्यानाकडून एक किरमिजी रंगाची ‘वॅगन आर’ आली आणि कोपऱ्यावरच्या मनीषा भेळेच्या दुकानं समोर रस्त्याच्या कडेला थांबली. तिच्या नंबर प्लेट वरील सिरीज बघून ही गाडी दसरा  किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रस्त्यावर अवतीर्ण झालीय हे जाणकार पुणेकराच्या लगेच लक्षात येऊ शकेल इतकी नवीन. त्याहीपेक्षा ती गाडी ज्या प्रकारे उभी राहिली त्यावरून चालक अगदी नवखा असणार हे कोणत्याही चिकित्सक आणि काहींच्या मते “खत्रूड” पुणेकराने सांगितले असते. गाडीत एक त्रिकोणी कुटुंब, वडील गाडीचे चालक, मोबाईल फोनवर बोलण्यात व्यग्र असलेले. आई घरगुती समान घेण्यासाठी अगोदरच या दुकानांमध्ये पोचलेली बहुतेक.मागच्या सीटवर ५-६ वर्षाचा एक गोंडस मुलगा.

समोरच्या पदपथाला लागून एक गॅस चे फुगे फुगवणारा विक्रेता आणि त्याच्या बरोबर त्याचा ७-८ वर्षाचा मुलगा, आपली लांडी विजार लपविण्याच्या उद्देशाने असेल कदाचित पण एक पाय दुसर्या पायावर दुमडून उभा राहिलेला.

 पेगासस क्लबच्या बाजूला असलेला रिक्षा थांबा आणि गिर्हाईकांची वाट बघणारे रिक्षाचालक. पलीकडे एका होर्डिंगवर मास्टर कार्डची जाहिरात त्यातील ठळक पंच लाईन सकट - “देअर आर समथिंग्स मनी कॅन बाय ........”.  सायंकाळ असली तरी गुरुवार असल्यामुळे कमी प्रमाणात चालू असलेली वर्दळ असा हा परिसर.

थांबलेल्या गाडीत बसलेला छोटा मुलगा त्या फुगेवाल्याच्या लगेच लक्षात आला. त्यानं आपल्या मुलाला फुग्यांचा गुच्छ घेऊन तिकडे पिटाळला. गाडीच्या मालकीणबाई तेव्हढ्यात हातात सामानाच्या पिशव्या आणि तिघांसाठी दाबेली घेऊन गाडीत परतल्या.  गाडीच्या मागच्या खिडकीतून तो छोटा मुलगाही त्या फुग्यांकडे बघत होता. दोघाची नजरा-नजर झाली. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी हेवा दाटलेला. कारण त्या क्षणी त्या दोन्ही मुलांना जे हवं होत ते समोरच्याच्या हातात होत. वया परत्वे दोघांनाही त्या मागचे अर्थकारण समाजात नव्हते. फुगे विकणार्याला मात्र थोडा हिशोब वडिलांनी शिकवला असावा. आपल्या हातातील विक्रीसाठी असलेला फुगा आणि समोर मिळणारी दाबेली एकाच किमतीची आहे हे त्याला अनुभवाने माहित होते पण त्याला “बाजारमूल्य” वगैरे जड शब्द असतात हे त्याला माहित असणे शक्य नव्हते. एक फुगा विकला तर कदाचित वडील आपल्यालाही  दाबेली घेऊन देतील आणि जास्त फुगे विकले गेले तर आज घरी जेवायला मिळेल, इतकेच काय ती त्याची आशा.

गॅसचा फुगा किंवा दाबेली दोन्ही वस्तूंनी भागणारी भूक काही तासांची, नव्हे क्षणभंगुरच कदाचित! पण त्या दोघांची त्याक्षणी  तीच भावनिक गरज होती. गाडीतल्या गोंडस बाळाने फुग्याची मागणी आईकडे केली. आईने नकार दिला. बाळ हिरमुसला. फुगे विक्रेत्याचा अपेक्षाभंग झाला खरा पण त्याला हा अनुभव नवीन नव्हता. त्याची दाबेली खाण्याची इच्छा त्याने पुढे ढकलली.

गाडी निघून गेली, एक प्रश्न माझ्या मनात सोडून .........खिशात ऊब देणाऱ्या दहा रुपयांच्या नोटेची नेमकी आणि खरी किंमत किती?  

-सत्यजित चितळे,

#नोटाबंदी

Friday, November 25, 2016

रेकॉर्ड- डेटा आणि अर्काईव्ह


रेकॉर्ड- डेटा आणि अर्काईव्ह

पहाटेचे चार वाजले तरी अनुजला  झोप लागली नव्हती. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून तो एका केसमधला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेच शोधून काढलेल्या काही रामबाण पद्धतींचा वापर करून सुद्धा त्याला अपेक्षित निष्कर्ष मिळत नव्हता. आणि या उलघालीत असतानाच आज एक विलक्षण आनंदाची घटनासुद्धा घडली होती.

आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास फोन वाजला तेंव्हा डॉक्टर अनुज मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसून एका क्लिष्ट स्लाईडच निरिक्षण करण्यात गुंतला होता. त्याने थोड वैतागूनच फोनचा रिसिव्हर उचलला. पलीकडून सरांची पी. ए.  अंजली बोलत होती. “ तुम्हाला डायरेक्टर सरांनी बोलावलंय लगेच” तिन तिच्या मंजुळ आवाजात निरोप दिला. “ एका कॉम्प्लीकेटेड केसची स्लाईड बघतोय, अर्ध्या तासाने आलो तर चालेल का विचार त्यांना”. एरव्ही कोणी दुसरा असता तर असे उलट उत्तर दिल्यावर त्याची काही खैर नव्हती. पण डॉक्टर अनुज ची गोष्ट  वेगळी होती. अतिशय मनस्वी संशोधक अशी त्याची हॉस्पिटल मध्ये ख्याती होती आणि म्हणूनच त्याला त्याच्या वेळेनुसार काम करण्याची मुभा रिसर्च डायरेक्टर सरांनी दिलेली होती. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे “ होय तुमच्या वेळेनुसार या” असे उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवून त्याने पुन्हा मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसले. पण त्याची तंद्री पुन्हा भंग पावली. पुढच्या वेळेस फोन वर थेट डायरेक्टर सर बोलत होते “ अनुज, लगेच माझ्या केबिन मध्ये ये. तुझ्यासाठी स्वीडनहून फोन होता. परत ५ मिनिटात फोन येणार आहे.” त्यांनी अतिशय हर्षोल्हासित स्वरात अनुजला निरोप दिला. हातातलं काम अनुज कधी अर्धवट सोडत नसे, पण या वेळेस तो लगेच उठला. डोळ्यावर चष्मा चढवून तो तडक त्याच्या लॅब च्या बाहेर पडला.मुंबईतल्या या प्रसिद्ध रुग्णालयाचा पसारा बराच मोठा होता. विविध प्रकारच्या उपचारांसाठी त्याचा पसारा चार वेगवेगळ्या इमारतींमध्ये विभागला होता. अनुज जिथे काम करत असे ती लॅब आणि सरांचे ऑफिस हे एकाच इमारतीत पण वेगवेगळ्या मजल्यावर होते. अनुज बाहेर  पडला आणि लिफ्टची वाट न पाहता त्याने थेट जवळचा जिना चढायला सुरुवात केली. दोन दोन पायऱ्या एका दमात चढत त्याने वरचा मजला गाठला.  तिथून पुढच्या लांबच लांब कॉरीडॉर मध्ये पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होती. हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर्स त्यांच्या कामासाठी त्या गर्दीतूनच वाट काढत इकडे तिकडे जात होते. नवीन पांढरा एप्रन घातलेले इंटर्नस उगाचच इकडे तिकडे लुडबुड करत होते.  अनुजला हा प्रकार नवीन नव्हता, पण आज त्याला घाई झाली होती. फोन कोणाचा असेल याची त्याला पुसटशी कल्पना आली होती पण कशाबद्दल असेल याची उत्सुकता त्याला अस्वस्थ करीत होती. ६-७   महिन्याभरापूर्वीच त्याने त्याच्या शोधनिबंधाचे बाड ‘द रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस’ ला पाठवले होते. जीवशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या यादीतील तो एक संभाव्य विजेता असणार होता आणि ही गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त फक्त त्याच्या सरांना माहित होती. कॉरीडॉर मधून झपझप चालत जाताना आपल्या हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि हाताच्या तळव्यान्ना नेहमीपेक्षा जास्त घाम आलाय हे त्याला जाणवले. त्याच्याकडे बघून त्याला “हॅलो” करणाऱ्या त्याच्या सहकारी आणि जुनिअर डॉक्टर लोकांकडे आज त्याचे लक्ष नव्हते. विचारांच्या तंद्रीत तो वेगाने सरांच्या केबिनपाशी पोचला. त्यांच्या सेक्रेटरीकडे न पाहताच त्याने दार ढकलून केबिनमध्ये प्रवेश केला. “ ये अनुज, अभिनंदन” अतिशय आनंदात असलेल्या सरांनी त्याचे स्वागत केलं. धापा टाकत आलेल्या अनुज समोर त्यांनी पाण्याचा ग्लास सरकवला “ शांत हो, तुला पुढे अर्धा तास अतिशय शांतपणे फोन वर बोलायचे आहे.” स्वत:ची उत्सुकता झाकण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले. अनुजने काही म्हणायच्या अगोदरच त्यांच्या टेबलवरील फोन वाजला. त्यांनी अनुजला रिसिव्हर उचलण्याची खूण केली. थरथरत्या हाताने अनुजने रिसिव्हर उचलला. “ इज धिस डॉक्टर अनुज जोशी?” पलीकडून एक परदेशी प्रौढ व्यक्तीचा आवाज आला. “ येस धिस इज डॉक्टर अनुज, मे आय नो हू इज ऑन द लाईन प्लीज? “ अनुज ने प्रतिप्रश्न केला. त्याच्या प्रश्नाचे सरळ उत्तर लगेच आले नाही. तो डॉक्टर अनुजच आहे याची खातरजमा करण्यासाठी एका मागून एक प्रश्न त्याला विचारले गेले. त्याच्या सरांनी त्याला याची अगोदरच कल्पना दिलेली होती त्यामुळे तो सलग न अडखळता उत्तरे देत गेला. त्याची ही मुलाखत अर्धा एक तास चालू होती. “ अभिनंदन डॉक्टर अनुज, या वर्षीच्या जीवशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी तुमची निवड करण्यात येत आहे.” हे शेवटी आलेले वाक्य मात्र अनुजच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे ठरले. बोलणारी व्यक्ती निवड समितीची अध्यक्ष असणारी ज्येष्ठ संशोधक होती. अनुजचा त्याच्या कानांवर विश्वास होता. त्याला खात्री होती की त्याने केलेले संशोधन हे त्याच तोडीचे आहे. त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून त्याच्या हॉस्पिटलच्या रिसर्च विभागाच्या डायरेक्टर सरांनी आनंदाने टाळी वाजवली. आणि ते डोअर बेल मारणार इतक्यात अनुजने त्यांना खुणेनेच थांबवले. शिष्टाचाराप्रमाणे पी.टी.आय. कडे याचा टेलेक्स आल्याशिवाय आणि त्यांच्याकडून कळल्याशिवाय याची प्रसिद्धी करू नये अशी सूचना त्याला फोन संपताना करण्यात आली होती. आणि त्याने हे लगेच सरांना सांगितले.

अर्थात हा सोपस्कार पूर्ण व्हायला केवळ १५ मिनिटांचाच कालावधी गेला आणि लगेचच ही बातमी पी.टी.आय.  कडून प्रसारित करण्यात आली. हॉस्पिटलचे संचालक मंडळ, अनुज चे सहकारी, कनिष्ठ सेवक व कर्मचारी सर्वांच्या शुभेच्छांच्या गर्दीत डॉक्टर अनुज हरवून गेला. तासाभरातच वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा त्याला गराडा पडला. त्यांचे तेच तेच प्रश्न आणि त्याला तीच उत्तरे देऊन तो वैतागून गेला. या घटनेची बातमी होताच अनुजचा फोन खणखणू लागला. शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करता करता संध्याकाळ केंव्हा झाली ते त्याला कळलेच नाही. हॉस्पिटल तर्फे दुसर्या दिवशी फॉर्मल  प्रेस कॉनफरन्स घेण्याचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले.

अनुजने लावलेला शोध हा जनुकीय रचना आणि त्यामुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आणि त्यावरील उपचार या विषयी असल्याने त्याचे बौद्धिक स्वामित्व हक्क मिळणार नाहीत याची माहिती त्याच्या सरांना होती पण या शोधाचे श्रेय हॉस्पिटलला मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती आणि अनुजची त्याला काहीच हरकत नव्हती. कौतुक सोहळा संपल्यावर सरांनी अनुजला बोलावलं आणि दुसर्या दिवशीच्या प्रेस कॉनफरन्स मध्ये देण्यासाठी निवेदन तयार करण्याविषयी सूचना केली. कॉनफरन्सच्या आधी अर्धा तास भेटून त्यावर शेवटचा हात फिरवू असे म्हणून त्याचा निरोप घेतला.

मुंबईत लहानाचा मोठा झालेला अनुज लहानपणापासूनच हुशार श्रेणीत गणला गेलेला विद्यार्थी. जीवशास्त्रातील आवड त्याला मेडिकलला घेऊन गेली. मेडिकलच्या सर्व वर्षात प्राविण्य मिळवीत त्याने पॅथोलोजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. परंतु वैद्यकीय शिक्षण घेतांनाच जनुकीय संशोधनात त्याला  गोडी निर्माण झाली. या विषयातील संशोधनातून दुर्धर आजारांची चिकित्सा आणि उपाय अधिक परिणामकारकपणे करता येईल असा विश्वास वाटून त्याने यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. आणि अधिक पैसे मिळवून देणाऱ्या संधी नाकारून मुंबईच्या या प्रख्यात रुग्णालयात रिसर्च विभागात काम करणे स्वीकारले. नेमके हेच रुग्णालय स्वीकारण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे इथे आजवर लाखो रुग्णांनी उपचार घेतले होते आणि त्यांच्या आजार, व उपचारांची संपूर्ण माहिती किंवा रेकॉर्ड या रुग्णालयाने व्यवस्थित जपून ठेवलेली होती. त्यामुळे इथे अधिक परिणामकारक पणे संशोधन करता येईल याची डॉक्टर अनुजला खात्री होती.

एकीकडे पॅथोलोजी मध्ये नेहमीचे काम करत डॉक्टर अनुजने त्याचे संशोधन चालू ठेवले. २-३ वर्षातच त्याने सदर केलेल्या शोध निबंधाने त्यांच्या रिसर्च डायरेक्टर सरांचे लक्ष वेधून घेतले. त्याने नोंदवलेली निरिक्षणे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष याचा अभ्यास केल्यावर, हा मुलगा काही तरी भव्य दिव्य संशोधन करेल यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी त्याला मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देऊन टाकली. अनुजचे संशोधन चालूच होते. पाहता पाहता दोन तपांचा काळ उलटला. मधून मधून होणार्या वैद्यकीय कॉनफरन्स  मधून त्याचे अतिशय अभ्यासपूर्ण शोध निबंध प्रकाशित होत त्यामुळे त्याच्या विषयात काम करणाऱ्या डॉक्टर्स मध्ये त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होती.  अनुजमध्ये एक प्रकारचा नेमस्तपणा होता. पेशंट आणि त्यांची रेकॉर्ड्स  केलेल्या निरिक्षणाची तो त्याच्या खिशातल्या छोट्याश्या डायरी मध्ये नोंद करून ठेवत असे. नंतर त्या नोंदी पुन: वाचून त्यांची वहीत नोंद करून ठेवत असे. कॉलेज पासून असलेल्या त्याच्या या नेमस्त पणाची कधी कधी दोस्त मंडळीत थट्टा सुद्धा होत असे. पण कधी काही मागचे संदर्भ मागायची पाळी आली कि लोक त्यांच्या मागे लागत असतं.

हॉस्पिटलमध्ये त्याच्या विषयात काम करताना त्याला अर्काईव्हज च्या विभागातून जुनी रेकॉर्डस शोधून काढावी लागत. अर्काईव्ह विभागाच्या अधिक्षकांनी ही सर्व रेकॉर्ड अगदी काळजीपूर्वक जपून ठेवली होती. केवळ तसे त्यांना वाटत असे म्हणून. त्यांची शिस्त बिघडेल म्हणून ते त्याला सहज कोणाला हात लावू देत नसत. डॉक्टर अनुज आणि त्यांचे त्यामुळे सुरुवातीला खटके उडाले होते. पण पुढे पुढे अनुजच्या नेमस्तपणाबद्दल त्यांची खात्री पटली आणि त्याला अर्काईव्हज च्या विभागातही मुक्त प्रवेश मिळाला. तिथे अनेक रुग्णांच्या आजाराविषयीचे रेकॉर्डस  होते. त्या त्या वेळेस उपलब्ध डॉक्टरने केलेल्या तपासण्यांचे निष्कर्ष लिहिलेले होते. अनुज ज्या दिशेने काम करत होता त्याला आवश्यक किंवा पोषक संदर्भ अधून मधून त्याला मिळत.  पण बर्याच वेळेस तपासणी करणाऱ्या डॉक्टरची दिशा आणि अनुज ची अभ्यासाची दिशा जुळत नसे. या रेकॉर्ड्स मधून अनुजला अनेक माणसे भेटली. त्यांच्या आजारांविषयी,  सवयींविषयी वाचायला मिळाले. त्याची त्यांच्या आजाराशी सांगड घालता आली. आज त्यातली किती माणसे ह्यात आहेत त्याचा अंदाज नव्हता पण त्यांचा इतिहास “रेकॉर्ड” म्हणून त्याच्या हॉस्पिटल मध्ये जपून ठेवला गेला होता.

तल्लख बुद्धीच्या अनुज ने ही रेकॉर्ड्स इतक्या वेळेस तपासली होती कि त्याला ती बरीचशी पाठ झाली होती. त्यामुळे रुग्णांच्या रेकॉर्ड्स चा चालता बोलता अर्काईव्ह अशी त्याची रुग्णालयात ख्याती होती, आणि खासगीत तोही हे नम्रपणे मान्य करत असे.  

अनुजचे स्वत: चे निरिक्षण आणि त्याने केलेल्या नोंदी, अर्काईव्हज मधून घेतलेले संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून त्याने त्याचा शोध निबंध सिद्ध केला होता. कॅन्सर सारख्या दुर्धर अजारांच्यामागे असलेले जनुकीय संरचनाचे कोडे त्याने पूर्ण सोडवले होते. त्याने सिद्ध केलेल्या पद्धतीमुळे दुर्धर आजारांचे पूर्व निदान तर होणार होतेच पण त्यावरची उपाय योजना करून त्यांचे निर्मुलन करता येणार होते. या शोधाप्रमाणे क्लिनिकल ट्रायल्स करण्याची रीतसर परवानगी त्याच्या हॉस्पिटल ने मिळवली होती आणि सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्याची उपयुक्तताही सिद्ध करण्यात आलेली होती. माणसाच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी शोध ठरलेला होता. विश्व निर्माण करणाऱ्या ब्रह्माच्या सूत्राचीच उकल केल्यासारखा.

अनुजच्या विनयशील स्वभावाच्या विरोधात असलं तरी त्याला थोडी “ग”ची बाधा यामुळे झाली होती आणि ते स्वाभाविक होत.  याच उन्मादात त्याने झोपण्याच्या अगोदर प्रेस कॉनफरन्स साठी द्यायचे निवेदन लिहून पूर्ण केले होते. या जगातून सर्व प्रकारचे दुर्धर आजार निर्मुलन करण्याचा दावा त्याने त्यात केला होता.

संध्याकाळी हॉस्पिटल मधून आनंदात बाहेर पडल्यावर तो प्रथम आई वडिलांना भेटायला गेला. आपल्या मुलाच्या कौतुकाने त्यांना भरून आले असेल तर त्यात काय विशेष. आशीर्वाद घेण्यासाठी तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला तेंव्हा त्याचे वडील वीर सावरकरांची कविता त्याला उद्देशून म्हणाले “ कितीक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे| परी जे गजेंद्र शून्डेने उचलिले, श्रीहरी साठी नेले, कमलफुल ते अमर जाहले ||” ही पंक्ती तेंव्हापासून त्याच्या कानात घुमत होती.

संध्याकाळी तो घरी पोचला तेंव्हा त्याच्या सोसायटीचा परिसर देखील गर्दीने फुलून गेला होता. त्यामध्ये त्याचे आप्त होते तसेच त्याचे शाळेतले, कॉलेजमधले मित्र आणि काही शिक्षकही आवर्जून उपस्थित होते. अनुज ने सवयीने प्रथामिकतेने त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याला ८वी टे १० वी गणित शिकवणारे किंकर सर त्याचे अतिशय लाडके होते आणि ते त्याला भेटायला मुद्दामहून आले होते. अनुज ला गणित हा विषय फारसा आवडत नसे पण किंकर सरांचे शिकवणे आणि विषय समजावून सांगणे त्याला अतिशय आवडत असे. “त्यांच्यामुळे मी दहावी पास झालो आणि म्हणून डॉक्टर होऊ शकलो नाही तर दहावी नापास असा शिक्का बसला असता” असा विनोद करून त्याने एकदा शाळेच्या री-युनियन मध्ये त्यांची अप्रत्यक्ष स्तुती केली होती. त्यांना नमस्कार करायला तो पुढे झाला तेंव्हा किंकर सरांनी देखील “तुझे गणितातले रेकॉर्ड अगदी न दाखवण्याच्या लायकीचे होते रे “ असा सहज शेरा मारल्यामुळे  उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली होती. अर्थात जनुकीय रचनांमध्ये जसं अनुज गुंतत गेला तसे त्याला सृष्टीच्या या मूळ कोड्यात काही गणितीय सूत्रे आहेत हे जाणवू लागले होते आणि किंकर सरांनी शिकवलेले आणि घोटून पक्के करून घेतलेले गणितातले मूळ सिद्धांत त्यामुळे त्याला वारंवार आठवत असत.

गेले दोन आठवडे अनुज एका क्लिष्ट केस्माध्ली गुंतागुंत सोडवण्याच्या प्रयत्नात होता. सहा महिन्यांपूर्वी हा रुग्ण तपासणीसाठी तिथे पहिल्यांदा दाखल झाला होता. अनुजने शोधून काढलेल्या पद्धती प्रमाणे त्याची तपासणी झाली होती अन् खुद्द डॉक्टर अनुजने त्याच्या स्लाईड बघून ‘या रुग्णाला कॅन्सर होणार नाही असा निर्वाळा दिला होता. परंतु दोनच आठवड्यापूर्वी तो रुग्ण परत दाखल झाला होता आणि त्याला अतिशय दुर्धर अश्या प्रकारचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ईश्वरदत्त आजाराबदाल त्या रुग्णाची जरी काही तक्रार नव्हती तरी त्याच्या केसने अनुजला मात्र पूर्णपणे हलवून टाकले होते. त्याचे जुने रिपोर्ट आणि रेकॉर्ड त्याने पुन:पुन्हा तपासली होती. पण त्याने शोधून काढलेल्या पद्धती मध्ये त्याला कुठलेच वैगुण्य सापडत नव्हते. आज त्याचा या केसचा अभ्यास अर्धवट राहिला होता आणि गेले ७-८ तास तो त्यापासून अतिशय अलिप्त वातावरणात डुंबून गेला होता.

गादीवर पडल्या पडल्या जसा त्या क्लिष्ट केसने त्याच्या अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तसाच त्याने केलेला दावा आणि वीर सावरकरांच्या काव्यपंक्तीनी. न सुटणारी केस त्याला समोर दिसत होती आणि तरी देखील केलेला हा सर्वद्न्यपणाचा दावा. काहीतरी चुकतंय असा त्याला सतत वाटत होत. मधूनच किंकर सरांनी मारलेला शेराही त्याला अस्वस्थ करत होता.

 मी, मी केलेल्या नोंदी, मी तपासलेली रेकॉर्ड्स, त्याच्यावर केली भाष्ये उद्या प्रसिद्ध होणार. लोक मला डोक्यावर घेणार, पण मीच का? इथे तर अनेक संशोधक आहेत या विषयावर प्रकाश टाकणारे? आणि ते रुग्ण... जे केवळ रेकॉर्ड बनून राहिले इतके वर्ष आमच्या अर्काईव्हज मध्ये? ते कोण ? इतक सगळ करूनही ही न सुटणारी केस. देवान अजून सगळी गुपितं खुली केली नाहीत माझ्यासाठी! मी कोण? कुठेतरी बनून राहिलो असे असे एक रेकॉर्ड, डेटा का मानवाच्या इतिहासाच्या अर्काईव्ह मधले एक पान? अनुज याचे उत्तर शोधत होता. सत्कार- शुभेच्छांमुळे अधांतरी झालेले त्याचे पाय त्याला चकवलेल्या केसमुळे पुन्हा जमिनीवर टेकले होते.

अनुज उठला, दिवाणखान्यात आला. तिथे त्याचं देवघर होत. देवासामोरच्या  मंद एल. ई. डी. च्या प्रकाशात देवांच्या मूर्ती अधिकच तेजस्वी दिसत होत्या. त्यान समोर आसन मांडल आणि डोळे मिटून घेतले. मी, माझा अभ्यास, आजवर रेकॉर्ड बनलेले असंख्य जीव, त्याच्यात जीव ओतून मी त्याचा डेटाबेस केला. त्यातून गवसलेली सत्य, उलगडलेली कोडी आणि आता मिळणारी प्रसिद्धी, पण हे सगळ अपूर्ण आहे. अनुजने डोळे उघडले.  कॉम्प्युटर सुरु केला त्याने लिहून पूर्ण केलेल्या निवेदनातील शेवटची ओळ त्याने बदलली “ या संधोधनामुळे जगातील सर्व दुर्धर आजर कायमचे नष्ट होतील” हे वाक्य खोडून “ या संशोधनामुळे दुर्धर आजारांवरील उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल होतील.” बस इतकेच लिहून तो थांबला. त्याला त्याचे उत्तर सापडले होते.

सत्यजित चितळे

२३ नोव्हेंबर २०१६, पुणे