Tuesday, June 16, 2026

विठ्ठला कॉलिंग २ - पुणे -पंढरपूर सायकल वारी


वर्ष २०२६, शके १९४८ अधिक मासाचे वर्ष आणि त्यात ज्येष्ठ महिना अधिकाचा.

गेल्या वर्षी सोलापूर रस्त्याने सायकल वारी केली, या वर्षी पालखी मार्गाने जायचे. मार्ग भिन्न परंतु पोहोचायचे ठिकाण एकच. कोणता मार्ग हे निवडायचा अधिकार माझा नव्हताच, मुक्काम मात्र निश्चित होता.

१३ जून २०२६, पहाटे २.४० चा गजर वाजला तो जाग आल्यापासून एक दीड तासाने. अर्थात झोप फक्त ३-३.१५ तास झालेली. आवरले, देवाच्या पाया पडून सायकल खाली उतरवली आणि मोबाइल वर स्ट्रावा अॅप सुरू करून सायकलवर टांग मारली.

नळ-स्टॉपच्या चौकात वैभव वाट पाहत होता. त्याच्या बरोबर ज्ञानेश देशमुख पाहून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. येणाऱ्या १८-२० जणांपैकी ओळखीच्या आठ लोकात एकाची वाढच झाली. अर्थात ही दुककल ‘पुण्यात भेटली की नंतर थेट पंढरपूरात भेटणार’ अशी चेष्टेखोर टिपण्णी सार्थ करणारी होती. सारसबाग गणपती पाशी आणखीन एक ग्रुप भेटला. ते सोलापूर रस्त्याने जाऊन इंदापूर अकलूज  मार्गे येणार आहे असे कळले.

ठीक ४ वाजता प्रस्थान ठेवले. वाघोलीहून येणारी मंडळी हडपसर पाशी भेटली आणि पुढे फुरसूंगी पाशी २० चा चमू पूर्ण झाला. वडकी नाला ते फुरसूंगी रस्त्याचे काम चालूच असल्यामुळे मधूनच कच्च्या रस्त्यावर आणि कधी चिंचोळया सर्विस रोडवरून कसरत करत सायकल चालवावी लागत होती. दिवे घाटाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा विसावा आहे तिथून निरभ्र आकाशात पूर्वेला त्रयोदशीची चंद्रकोर मनोहारी दिसली.

दुरूनच दिवे घाटातली वाहतूक दिसत होती आणि त्यात लुकलुकणारे लाल दिवेही दिसत होते. या मार्गावर आज अजूनही सायकल स्वार आहेत म्हणजे! मनात विचार आला. एका दृष्टीने बरेच झाले.

घाट माथ्यावरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे मुख आणि चंद्रकोर यांची काही जुळवाजुळव होणारी जागा गाठली तर फोटो सुंदर येईल असे वाटून दिवे घाट चढायची सुरुवात जरा वेगातच केली. लांबून दिसलेल्या सायकल स्वरांना गाठले आणि मागे टाकत वीसेक मिनिटांत घाट माथा गाठला. सायकल लावून पायवाटेने वर गेलो खरा, परंतु दिशेचे ज्ञान आणि अंदाज खूपच चुकला. विठ्ठलाची मूर्ती आणि तिच्या माथ्यावर चंद्रकोर अशी मांडणी होण्यासारखी जागा तिथे नव्हती. तसेही चंद्रकोर शंकराच्या माथ्यावर शोभून दिसते ना! ईश्वर एकच असला तरी मानवी शरीर रूपात त्याला दिलेला दागिना आणि त्याच्या कथा त्याच्यापाशीच सुंदर दिसतात/ वाटतात हे खरे!

मग उगा थांबल्या जागी चंद्रकोर कॅमेऱ्यात बंदिस्त केली. थोड्याच वेळात सगळेच घाट चढून वर पावते झाले. मंदार मात्र मागे पडला होता. सासवड मध्ये शिवरायांच्या पुतळ्या जवळ चहा घेण्याचा बेत ठरला. उन्हाचा तडाखा सुरू होण्यापूर्वीच जास्तीत जास्त अंतर कापण्याचा वैभव आणि इतर मंडळींचा अनुभवी विचार बरोबरही होता. थोडा वेळ जास्त थांबलो, सासवड मध्ये भेटायचे ठरवून सगळे पुढे निघाले. मग मंदार आला. घाट चढायचे श्रम निववून आम्ही पुढे निघालो. आता पंढरपूर पर्यंत चांगला रुंद पालखी मार्ग सोडायचा नव्हता.

सासवड चा बायपास न घेता गावाच्या दिशेने निघालो तो डावीकडे पूर्वेला नारिंगी रंगाचे सूर्य बिंब क्षितिजावर आलेले दिसले. मोहक तरी दाहक. आजच्या दिवसाच्या काहिलीची वर्दी घेऊनच अरूणाने सूर्य देवाच्या रथाचे सारथ्य करायचे ठरवले असावे असा भास व्हावा, इतके दाहक.


सासवड मध्ये पोचलो तेव्हा उजाडले असले तरी गांव जागा झालेला नव्हता. गाव ओलांडले आणि हायवे धरताना उजवीकडील बाभळीच्या झाडवरून “पेरते व्हा” ची हाक ऐकू आली. आभाळात कोणत्याही दिशेला ढगांचा एक पुंजकाही दृष्टीस पडत नसताना हा बिचारा कोणता आशावाद पेरतो आहे असा प्रश्न मनाला चाटून गेला.

सासवड मागे पडत होते आणि उजवीकडील पुरंदर आणि वज्रगड माथा सुद्धा.  रस्ता माहितीचा, जास्त प्रमाणात उतार असलेला, सकाळची तुलनेने थंड हवा आणि माफक असलेले वारे यातून सायकल वेगाने मार्ग कापत होती. मग दुरून नऊ लाख पायऱ्यांचा खंडेरायाचा मल्हार गड दिसला. जेजूरी गांव लागले तेव्हा ६.३० वाजले होते. नाश्ता कुठे हा प्रश्न विचारायची वेळ नव्हती पण इथेच कुठे तरी थांबण्याचे नियोजन चेतन ने आधी पाठवले होते. “अ” तुकडीतल्या सर्वांनी मात्र ‘जास्तीत जास्त अंतर’ एव्हढा एकच मंत्र जपत सायकल मारायची ठरवली असावी. कोणी थांबलेले दिसेना.

जेजूरी एम आय डी सी मधून जाताना काही नवीन कारखाने पाहून चांगले वाटले आणि बरेचसे जुने, बंद पडलेले कारखाने आणि त्याच्या आवारात आणि भिंतीलगात वाढलेली बोरी बाभळी पाहून वाईट वाटले.

७.१० वाजता दौंडज पाशी मागून मंदार चा फोन आला. तो एकटाच मागे होता, थांबलो. सन रायडर्स ग्रुप चे मेंबर्स हसून अभिवादन करीत पुढे जात होते. ५-१० मिनिटातच मंदार तिथे पोचला. आपण दोघे गार्डचे डबे म्हणून जाऊ, अधिक अश्व(?)शक्तीच्या माणसांना त्यांच्या गतीने जाऊ द्या असे नियोजन करून दोघे पुढे निघालो. पोटात हळूहळू भुके ची जाणीव होऊ लागली होती. वाल्हे ओलांडले तेव्हा सूर्य चांगला कासरा भर वर आला होता अन डाव्या गालाला त्याची उष्णता जाणवू लागली होती. मग नीरेचे पात्र ओलांडले. या पात्रात पाऊस न पडताही भरपूर नीर होते ही पाहून दृष्टी सुखावली.

नवीन रस्त्याच्या बांधणीत “गांव तिथे फ्लाय ओव्हर” अशी योजना असल्यामुळे सारखेच क्रमा क्रमाने येणाऱ्या चढ आणि उतार याचा आत्ताच कंटाळा येऊ लागला. पिंपरे गावचा फ्लाय ओव्हर दिसला आणि धीर खचला, सर्विस रोड ने जाऊ असा विचार करून सायकल रेटली. पुलाच्या खालच्या क्रॉस रोड पर्यन्त सर्व्हिस रोड आहे, पुढे नाहीच. आता परत उलटे जाऊन फ्लाय ओव्हर चढावा लागणार! परंतु एका दृष्टीने बरेच झाले की सकाळीच हे ज्ञान मिळाले. पुढे येणार प्रत्येक फ्लाय ओव्हर आपली हीच परीक्षा घेऊ शकेल त्याचे हे उत्तर पहिल्यांदाच ठेच लागून मिळून गेले.

हा पूल ओलांडला आणि लोणंद फाट्या जवळ एका छोट्याश्या हॉटेल मध्ये थांबलो. एका कुटुंबाने चालवलेले छोटेसे उपहारगृह. सकाळी सकाळी उपलब्ध मेन्यूमध्ये भजी, चहा, लिंबू सरबत आणि मिसळ, इतकंच. आणि अर्थातच बर्फाळ म्हणावे इतके थंड झालेले बाटलीबांद पाणी. जवळचे पाणी संपले होते. म्हणून बाटली घेतली आणि दोन घोट घशात घातले तर “चर्र” असा आवाज कानात आतल्या आत ऐकू आला. जून मधल्या सकाळच्या “ कोवळ्या ?” उन्हात तापलेला चेहरा आणि घसा थंड पाण्याने एकदम आकुंचन पावला असावा. उष्मा घात टाळण्यासाठी ही कृती टाळली पाहिजे हे ज्ञान अनुभवसिद्ध प्राप्त झाले. चहा आणि बिस्किटे हाणली. थोडा जीवात जीव आला. आमचा चमू तेव्हा ९ किमी पुढे नाश्ता करत होता. त्यांना जेवायच्या वेळेस गाठायचा बेत करून निघालो.

वाटेत तरसवाडी चा बोर्ड दिसला. सासवड- जेजूरी-कर्हे पठार हे  माळरानावरच्या प्राण्यांचे माहेर घर. पुण्यातले ग्रास लँड ट्रस्ट त्यांच्या संवर्धनासाठी जीव तोडून काम करते आहे. माणसाच्या जगात या प्राण्यांच्या नावे कुलनामे आहेत, गावांच्या आणि वाडयाची नवे आहेत परंतु त्या प्राण्यांच्या नावे कोणतेही सात-बारा नाहीत. जागोजाग प्लॉटिंग करून लावलेले खूणे चे दगड आणि कंपाऊंड, कुठे त्या जमिनीच्या स्वामींची नावे. वाढत्या शहरीकरण आणि त्यातील सुबत्तेची ही लक्षणे.

अर्ध्या तासाने तरडगाव गाठून नाश्ता घेण्यासाठी थांबलो तेव्हा पुढच्या फळीतील शेवटचे खेळाडू नाश्ता संपवून निघत होते. पश्चिमेकडून येणाऱ्या तुरळक ढगांच्या पुंजक्यानी आमच्यावर छत्र धरायला सुरुवात केली होती. पुढचा प्रवास चांगला होईल असे वाटून गेले. इथल्या हॉटेल मध्ये कर्मचारी हिन्दी भाषिक आणि मेन्यू मध्ये फक्त मिसळच! आपल्याच पोटाचा विचार करत फक्त चहा वर समाधान मानले. एखादा व्यवसाय चांगला चालण्यासाठी खरी आवश्यक असते ती ग्राहकाविषयी आपुलकी. ती इथे फारशी दिसली नाही. ढगांनी तरी अशीच कृपा ठेवावी अशी इच्छा करीत पुढे निघालो.

ढगांचा पुंजका सूर्य आणि आमच्यामध्ये येऊन सावली पाडत होता. अगदी गडद नव्हे परंतु पायाकडे सरकू लागलेल्या आपल्या सावलीच्या कडा अस्पष्ट होण्याइतका तरी दिलासा त्याने मिळत असे. वाऱ्याचीही काही काळ कमाल झाली. आमच्या वेगा बरहुकूम तो ढगाला बरोबर आमच्या माथ्यावर ठेवू लागला. परमेश्वराचीच कृपा असा विचार येऊन मन सुखावले. परंतु हे सुख फार काळ उपभोगायचे नव्हते. मग ढगाची सावली पुढे निघाली आणि आपली सावली अधिक गडद आणि स्पष्ट दिसू लागली. ढगाची छाया गाठायचा प्रयत्न करावा तर ती अधिक पुढे पळे. दूरवर लांबणाऱ्या रस्त्यावरच्या खळग्यात ढगाची सावली दिसे. तिथे पोहोचे तोवर कडक ऊन. आपल्याला दिसले ते मृगजळ की काय असा विचार यावा. काय गंमत आहे, तहानलेल्या मृगाला जळाच्या ओढीने दिसते तसेच आसुसलेल्या मनाला सावलीचेही मृगजळ दिसावे! जमिनीवरचे नसलेले जल आणि ढगातल्या खऱ्या बाष्पयुक्त जलाने साधलेला आभासी परिणाम!

फलटण ओलांडले तेव्हा साडे दहाचा सुमार झाला होता. ढगांनी सूर्याबरोबरच्या लपाछपी च्या खेळातून पूर्ण माघार घेतली होती आणि पश्चिमेच्या क्षितिजावर रेंगाळणारे ढग थिजल्यासारखे दिसत होते. बाकी आकाशाचे पूर्ण निरभ्र मैदान तळपत्या सूर्यास आंदण दिलेले आणि तो पूर्ण ताकदीने आग ओकत होता. पाठीवरच्या कप्प्यात ठेवलेल्या मोबाइल वर हरिपाठ चा ऑडियो सुरू केला. गेल्यावर्षीच तो ऐकून पाठ करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. बाजूने वेगाने आवाज करत जाणाऱ्या वाहनांच्या आवाजा पुढे मोबाइल च्या स्पीकरची ताकद कमी पडत असली, तरी काही ओळखीचे शब्द आणि टाळाचा नाद मात्र ऐकू येत होता. त्याची लय आणि पेडल मारताना होणाऱ्या पायांच्या हालचालीची लय जुळवली आणि मग प्रवास हलका होऊ लागला. कोणाच्याही साथीने का असेना अजच्यापुरती जीवनाची लय गवसली होती.

उन्हाने तप्त झालेल्या रस्त्यावर सलग अर्धा तास घरंगळत गेल्यावर टायरच्या घर्षणाचा आवाज होई. मग रस्त्याच्या कडेला मारलेल्या पांढऱ्या पट्ट्या वरुन सायकल चालवायचा प्रयत्न करायचा. वाहनांच्या टायरसाठी बनविलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाचा विरोध थोडा तरी कमी होई. परंतु सलग तसे चालवणे म्हणजे चांगलीच कसरत होती.  

आधी छत्र धरणारे ढग आणि नंतर माथ्यावर आग ओकणारा  सूर्य हे दोघे “हरी” च, त्यांना शरण गेलो की कशाचे काही वाटत नाही हा गेल्या वर्षीचा अनुभव पुन्हा घेतला. शरीर धर्माला आवश्यक तितके पाणी, ईलेक्ट्रॉल आणि जीवनसत्वे घेत राहिले म्हणजे तो धर्म टिकतो, बाकी काही करावे लागत नाही. तोंडावाटे घेतलेले पाणी काही कळायच्या आत थेट बाष्प रूपात जाताना जाणवावे असा उन्हाचा तडाखा शरीराला बसत होता परंतु मन मात्र त्याकडे आनंदानेच पाहत होते.

नातेपुते गावचा बाय पास हा दूर दृष्टीने गावाच्या खूप बाहेरून काढलेला रस्ता. दूर दृष्टी अश्यासाठी की कितीही दूर दृष्टी नेली तरी गाव काही दिसेना. मध्यानहीच्या उन्हात धापा टाकीत तिथून चढून जाताना सावलीसाठी जेमतेम एक पडकी टपरी मिळाली. तिथे थांबून पाण्याचे घोट घेताना दूरवर शेळ्या चरायला घेऊन जाणारी एक गावकरी महिला दिसली. तिला या ऊष्म्याचे काही सोयरसुतक नसावे. झाडाचे बीज मनस्वी जिथे रुजते ती माती आणि तिथले जलवायू त्या बीजाला अभय प्राप्त करून देत असावेत.

नातेपुते ओलांडताना वैभवशी संपर्क झाला आणि जेवण माळशिरस पाशी घेण्याचे ठरले असल्याचे कळले. बाकीची टीम आता आमच्या पुढे जवळ पास १६- १७ किमी वर होती, म्हणजे सुमारे पाऊण तासावर. पोटात कावळे कोकलत होतेच. मग रणरणत्या उन्हात सायकल दामटली. “दामटणे” या क्रियापदाची एक वेगळीच छटा आहे नाही का! पूर्वी जेव्हा वाहन म्हणून प्राणी वापरले जात असत तेव्हा माणूस कर्ता, आणि कर्म किंवा खरे तर ऑब्जेक्ट हा तो प्राणी असे आणि त्या प्राण्याची मन:स्थिती या क्रिया पदावरून समजून येत असे. सायकल दामटणे यातील सायकल ही मुळात निर्जीव घटक, म्हणजे ती दामटणारा मी आणि दामटून घेणाराही मीच असे होते नव्हे काय! हा विचार आला आणि मन आणि बुद्धी या एकदम वेगळ्या झाल्या. त्यांचे द्वैत समोर आले आणि भांडण जुंपले. शरीर, ज्याची स्वामिनी बुद्धी, ती या सगळ्या वेडेपणाच्या विरोधात उभी ठाकली. तशी ती दहा दिवस आधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेलो आणि तो न मिळाल्यावरही इथे येण्याच्या निर्णय घेतला तेव्हा पासूनच विरोधात होती. परंतु मनाने ठरविले आणि त्याने तिचे काही एक ऐकून घेतले नव्हते. मित्र मागे पडतोय तर काय करावे? सपोर्ट वाहनात बसून पुढे जावे की जमेल तसे जात राहावे? राईड सोडावी तर पहाटे दिसलेली भारद्वाज पक्ष्यांची जोडी काय सुचवित होती? तो “पेरते व्हा” कोणता आशावाद सांगत होता?  या आणि अश्या असंख्य प्रश्नांनी मनाच्या पटलावर एक गुंता तयार केला होता.

दीनानाथ रुग्णालयात रांगेत उभे असता, स्व. माई मंगेशकर यांच्या पुतळ्या खाली कोरलेली “मोगरा फुलला” या अभंगातील एक ओळ आठवली. “मनाचिये गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू अर्पियेला।”  ज्यांना आत्मतत्व उमगले आणि त्याचा साक्षात्कार झाला त्या माऊलींच्या मनात सुद्धा विचारांचा गुंता असावा तर आपली काय कथा. परंतु त्यांच्या मनातील दिव्य विचारांनी गुंफलेला तो भरजरी शेला किती तलम, किती पवित्र असेल! आणि तोही ते विठ्ठलाच्या चरणी अर्पित करतात. आपल्या मनातील गुंता..... नव्हे गुंतवळ आणि त्याचा गुंफलेला शेला मात्र सतत “मी, माझे....” या विचाराभोवती घुटमळून भरड झालेला, मळलेला. कसेही असले तरी तो त्याच्या चरणी अर्पावा हेच  खरे.

माळशिरस च्या हॉटेल आकाशपाशी पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. आमच्या चमुतले सगळेच भरपेट जेवून हास्यविनोद करीत आराम करत होते. सपाटून लागलेल्या क्षुधेस शांत करे पर्यन्त त्यांची विश्रांतीची वेळ संपली आणि पंढरपूरात भेटू असे म्हणून सगळे पुढे निघाले. मग आमची विश्रांतीची वेळ सुरू झाली. हॉटेल मधल्या कर्मचार्यांशी जुजबी संवाद साधत आराम केला आणि ३.१५ वाजता पुढील प्रवासास सुरुवात केली. अर्धा तास पेडल मारायचे आणि ५-१० मिनिटे ब्रेक घ्यायचा असे करत वेळापूर ४.१५ च्या सुमारास गाठले. इथले पुरातन मंदीर लांबूनच बघितले आणि तिथे एकदा यायचे ठरवीत पुढे निघालो. वेळापूर ते वाखरी रस्ता सौम्य चढाचा आहे. सूर्य झपाट्याने पश्चिम क्षितिजाकडे सरकू लागला होता आणि आमच्या आधीच आमच्या सावल्या पंढरपूरची वेस गाठणार असे वाटू लागले. ६ वाजता पंढरपूर फाट्यावर थांबलो. कोवळ्या वयातील दोन किशोर वयीन मुलांनी परग्रहावरील  माणूस पहावा तसे पाहत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे समाधान करतो तोवर मंदार येऊन पोहोचला. इथून पुढे गावातली रहदारी लागणार म्हणून बरोबर जायचे ठरवले. गावात शिरलो, रस्ते संध्याकाळी कोणत्याही गावात असावे तसे तुडुंब भरलेले. गुगल च्या तंत्रज्ञानाने उपकृत होत भक्त निवास गाठला तेव्हा संध्याकाळचे ६.४५ वाजले होते. मोबाइलवर घरापासून २१३.५० किमी झालेले दाखवत होते आणि एक छान समाधान वाटत होते.

भक्त निवासात स्थिर स्थावर होऊन मंदिरा जवळच्या रेणुका भोजनालयात साधेच परंतु चविष्ट जेवण घेतले आणि उकाडा भरलेल्या रात्री स्नान करून बिछान्यावर अंग टाकले. उकाड्यामुळे झोप काही नीट लागेना, आणि त्यातून आता स्नायू सुद्धा व्यथा मांडू लागलेले.

पहाटे २.३० चा गजर झाला. आवरून खाली गेलो. पुण्याकडे सायकल वरुन परतणारे चमूतील १५ जवान तयार झाले होते. त्यांच्या खोल्यांच्या किल्ल्या घेऊन परत खोलीत येऊन एक दीड तास झोप काढली. मग उठून आवरून आणि सर्व खोल्या चेक आऊट करून मंदिराची वाट धरली.

अधिक मासाचा शेवटचा दिवस आणि त्यात रविवार असल्यामुळे तिथे भाउगर्दी उसळली होती. संत नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेऊन बस स्टँड गाठला. ७ वाजताच्या शिवाई बस चे आरक्षण मंदार ने आदल्या दिवशीच करवून घेतले होते. बस चक्क वेळेत आली आणि वेळेत सुटली.

मागच्या सीटवर काही भाविक बसलेले होते. त्यातील महिला भजने आणि कवने म्हणत होत्या. हरिपाठ त्यांनी अर्धी अर्धी ओळ वाटून घेत पूर्ण म्हणला. तो वेगळ्या चालीत होता आणि कोणत्याही तालाविना तरीही कानाला गोड वाटला. आदल्या दिवशीचे श्रम आणि रात्री न झालेली झोप यामुळे हरिपाठ ऐकता ऐकताच झोप लागली.... हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी॥

पूर्वचरण:

गेल्या वर्षी आयएएस बरोबर आयुष्यातील पहीला पंढरपूर मुक्काम आणि तोही सायकलवर गाठून केल्यावर याही वर्षी पुन्हा सायकल वारी करण्याचे मनात ठरवून टाकले होते. आषाढी वारीचे वेळापत्रक येण्यापूर्वीच सह्याद्री सायकलिंग ग्रुप वर वारीचा निरोप फिरला आणि होकार देऊन टाकला.

वारीचे उत्कृष्ट नियोजन चेतन कोठवदे ने केले. त्याला अनेक राईड चा अनुभव असल्यामुळे तो म्हणेल ते प्रमाण मानायला काहीच हरकत नव्हती.  

सरावाला निज ज्येष्ठ पुरणार नव्हताच! कारण अधिक ज्येष्ठामुळे वारीची १३ जून ही तारीख लांबच आहे असा आभास निर्माण झालेला. ग्रुपवर सरावाच्या सफरींचे निरोपही फारसे येत नव्हते आणि आले तरी मी तिथे जात नव्हतो! पाठीच्या दुखण्यामुळे काही महीने धक्के बसण्याच्या व्यायामपासून फारकत घेतलेले शरीर चांगलेच लाडावलेले. डॉक्टरांच्या भेटीने त्याला पुन्हा धावण्याचा व्यायाम करण्याची ऊर्जा मिळाली परंतु पहिल्या महिन्यात धावताना काहीतरी बिनसले आणि उजव्या गुढग्याने मनाच्या या मनमानी विरुद्ध बंड पुकारले. एका आठवड्याने पोटाने दोन दिवसासाठी अचानक असहकार पुकारला. या वर्षी सायकल वारी चुकणार की काय अशी वेळ वारी दहा दिवसावर आली तेव्हा येऊन ठेपली.

सायकल चालवताना पायाला धक्के बसत नाहीत त्यामुळे असे आजार फारसे त्रास देत नाहीत असे “तज्ञ” मित्रांचे म्हणणे होते. तरीही एकदा डॉक्टरांना दाखवून यावे म्हणून दीनानाथ मंगेशकर मध्ये गुरुवारी सकाळी दाखल झालो. डॉक्टर मोने यांचा गुरुवारी फक्त ८० पेशंट तपासण्याचा दंडक माहीत असूनही उशीर झाला आणि माझा नंबर ९० वा लागला. या बाबतीत काठावरही पास न झाल्याने विचारून कृती करण्याचा काठ सोडला आणि सायकल सफरीच्या प्रवाहात झोकून द्यायचे ठरवले.

मित्र मंदार बरोबर तीन चार छोट्या सायकल सफरी केल्या तितकाच के तो सराव. या सर्व सराव फेऱ्याची एकूण बेरीज सुद्धा २२० किमी भरली नाही!

१३ जून शनिवारी निघायचे, पहाटे ४ वाजता सारसबाग स्टारटिंग पॉइंट, नेहमीप्रमाणे. १२ जून, शुक्रवार, कंपनीतील कामे संपविण्याच्या इर्षेने काम सुरू केले. दुपारचे जेवण पोटात गेले आणि पोटाने संपाची नोटिस जारी केली. संपले, उद्याची राईड आता फक्त स्वप्नातच असे वाटले, परंतु क्षणैकच.  थोडेसे आयुर्वेदिक औषध ढकलले आणि तयारी करून निद्रेच्या स्वाधीन झालो. प्रत्यक्ष वारीत मग काही अडचण आली नाही.

प्रत्येकाला ठरवलेला बेत तडीस नेण्याच्या आधी आणि प्रत्यक्ष तो बेत तडीस नेताना अडचणी येतातच. आपली आपल्या निर्णयावर श्रद्धा किती आहे त्यावर त्या त्या अडचणींवर मात कशी होते ते अवलंबून आहे, कदाचित तीच परमेश्वरावरची खरी श्रद्धा आहे!

सत्यजित चितळे

पंढरपूर सायकल वारी, १३ जून २०२६

Monday, July 28, 2025

पन्हाळा- पांढरेपाणी - पावनखिंड - १२जुलै २०२५ - Panhala to Pavankhind Trek

 

पन्हाळा ते पांढरेपाणी भ्रमंती – १२ जुलै २०२५

 


दगडावर दिसतील अजून तेथल्या टापा,ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा....हे कविवर्य कुसुमाग्रजांचे बोल नेसरीच्या खिंडीतल्या समरासाठी  लिहिलेले असले तरी इये सह्याद्रीच्या कुशीतील प्रत्येक चिरा आणि प्रत्येक ओहोळ या काव्यपंक्तींचा प्रत्यक्ष पुरावा आहे.

नाही चिरा नाही पणती...अशा अनेक संग्राम वाटा आणि युद्ध भूमी वरून पदयात्रा करण्याचे भाग्य मिळावे याहून वेगळे काय हवे. दुर्ग पन्हाळा ते विशाळ गड हा असाच एक पावन प्रवास. या झुंजीच्या मार्गावरून पायी प्रवास केला, १२ जुलै २०२५ रोजी. ३६४ वर्षे ३६४ दिवसांपूर्वी एका दिव्य पुरुषास घेऊन एक तेजस्वी लढाऊ जथ्था इथून झुंजीत गेला त्याची आठवण काढीत. आता याला ट्रेक म्हणतात....

 पन्हाळगडावर आमचा १३ जणांचा चमू ११ तारखेलाच संध्याकाळी दाखल झाला. पन्हाळगडावर हवा एखाद्या हिल स्टेशनवर असावी अशीच कुंद, माफक थंड आणि आल्हाददायक होती. 



दुसऱ्या दिवशी हा ट्रेक करणारे काही तुरळक ग्रुप भेटले. तेव्हा कल्पना नव्हती ही वाट तुडविण्यासाठी दोन ते अडीच हजार लोक आलेले आहेत याची.

 पहाटे ५.१५ वाजता गडावरून हर हर महादेव चा जयघोष करून निघालो तेव्हा आभाळात चंद्रमा ढगांच्या अडून लपाछपी खेळत होता आणि मधूनच पावसाची बारीक भुरभूर सुरु होती.




पुसाटीच्या बुरुजाच्या आडून राजदिंडीच्या वाटेने गड उतार होऊन रस्त्याला लागलो तेव्हा हळू हळू उजाडले होते. इथून पुढे लागते मासाई चे पठार. ९ ते ११ किमी लांबीचे विस्तीर्ण कातळ पठार, बरेचसे एकाच पातळीचे. कणखर सह्याद्रीच्या मुख्य उत्तर दक्षिण कण्यापासून पूर्वेस विस्तारलेल्या ज्या भुजा आहेत त्यातलीच एक भुजा. पाचगणी ची टेबल लँड, रायरेश्वराचे पठार किंवा मांढरदेवी चे पठार आहे तेही असेच. याची रक्षीणी  मासाई देवीचे मंदिर पठाराच्या सुमारे मध्यात आहे. पठारावर दाखल झालो तेव्हा पूर्वेला सूर्यदेव ढगांच्या आड उगवले होते आणि मोकाट वारा सुटला होता. पठारावर गवताची हिरवळ आणि त्यातून पांढरी टप्पोर “भुई आम्ही” वर येऊन डुलत होती, अगदी बालकवींच्या आईच्या मांडीवर बसून डोलणाऱ्या फुलराणीची आठवण यावी तशीच.

७.३० सुमारास मासाई देवीच्या मंदिरा जवळ पहिला थांबा घेतला. पाठीवरचे थोडे तहान लाडू- भूक लाडू पोटामध्ये गेले, हातावरच्या घड्याळातून वेळेचा आणि मोबाईलवर दाखवलेल्या अंतराचा हिशोब समाधानकारक आहे अशी समजूत करून घेऊन पुढे निघालो. अर्ध्या तासात मासाई चे पठार ओलांडून उतार लागला. एक तीव्र चिखल भरलेला उतार संपला आणि चिखलाने माखलेले बूट लेऊन कुंभारवाडीतल्या डांबरी रस्त्यावर दाखल झालो.

गावातले सकाळचे व्यवहार सुरु होते. दादले बैलं घेऊन शेताकडे आणि मातृशक्ती सकाळचे व्यवहार संपवून धुणे-भांडी करीत होत्या. कुंभार वाडी पासून पुढे सुमारे ५-६ किमी डांबरी रस्त्याने चाल आहे. १९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा इथून गेलो तेव्हा हि वाट बांधीव होती पण पक्का रस्ता नव्हता असे आठवले. थोड्याच वेळात डावीकडे बांदिवडे गावचे नैसर्गिक आश्चर्य असलेले अश्म स्तंभ दिसू लागले. प्रस्तरभंगातून निर्माण झालेल्या सह्यगिरीच्या जन्माचे हे साक्षीदार. एकावर एक ठेवलेल्या आयताकृती
जड शिळाचे स्तंभ भासावेत अशी रचना असलेले आणि त्यावर वाढून लुप्त झालेल्या वनस्पतींमुळे नक्षी तयार झालेले हे स्तंभ लांबूनही सुंदर दिसतात.


मधूनच पक्का डांबरी रस्ता, कधी कच्ची वाट, डोंगराच्या कडेला बिलगून वाढलेली आणि राखलेली  वनराईतली वाट असा प्रवास खोतवाडी, बांद्लाईवाडी अश्या वाड्यांमधून करीत २२-२३ किमी वरच्या करपे वाडीत पोचलो तेव्हा ११ वाजले होते. हा या ट्रेक मधील मध्यान्ताराचा टप्पा. इथे बरेचसे ग्रुप विश्रांतीसाठी राहतात आणि दुसर्या दिवशी मार्गस्थ होतात. इथे पक्की सडक येते, त्यामुळे ज्यांच्या पायांना इथवर चालून थकवा आलाय त्यांना इथून या ट्रेक मधून काढता पाय घेता येतो.

पूर्वी इथे मुक्काम केला ते मंदिर माझे नेत्र शोधत होते. पण गेल्या वीस वर्षात खूप बदल झालाय. घरोघरच्या उतरत्या छप्परांवरच्या खापरी कौलांची आणि बर्या परिस्थितीतल्या छतावरील मंगलोरी कौलांची जागा पक्क्या स्लॅब च्या धाब्यांनी आणि काही ठिकाणी रंगीत पत्र्यांनी घेतलेली दिसत होती.

सह्याद्रीतल्या बॉक्साईट खाणींचा काही प्रकल्प इथे सुरु होणार असल्याचे कळले. त्याला विरोध करणारे फ़्लेक्स गावातून लागलेले दिसले. त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला, पण नेमकी कोणती गावे त्यात समाविष्ट होऊन तिथला निसर्ग भरडला जाणार आहे ते मात्र नीट कळले नाही.

आमच्या चमू तले सगळेच करपेवाडी ला न थांबता पुढे निघाले आणि मग पुढच्या जंगलातून मार्गक्रमण करीत आंबेवाडी, कळकेवाडी, रीन्गेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी असा प्रवास करीत आम्ही सुकमाच्या धनगर वाड्यावर दाखल झालो. इथून पुढे जंगलातील वाट संपली आणि थोड्या अंतरावर पावन खिंडीकडे जाणारा पक्का रस्ता लागला. सुमारे दोन किमी मध्ये पांढरे पाणी गाव आले आणि आमचा ट्रेक आम्ही इथे संपवला. पावनखिंड इथून ५ किमी पुढे आहे आणि १३ तारखेला तिथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी तयारीने जाणारे अनेक जण इथे दिसले. कोणी मोठा सरकारी पाहुणा येण्याची पूर्व खूण असलेला पोलिसांचा बंदोबस्त या फाट्यावर दिसला यात काही विशेष नाही.

आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. पांढरेपाणी गावाच्या अलीकडे एक कमान लागली, “ शिवरायांनी घेतलेला मार्ग” असे शीर्षस्थानी बोर्ड असलेली. दस्तुरखुद्द पावन खिंडीच्या जागे विषयी काही मतभेद आहेत. खासे शिवराय नेमके कोणत्या मार्गाने गेले, कसे गेले या विषयी त्यांनी किंवा ज्यांच्यासाठी ही लढाई प्राणांतिक ठरली त्यांनी नेमके लिहून ठेवलेले नाही, असे असताना त्याविषयी उगाच विवाद करण्यापेक्षा या परिसराचे पावित्र्य अनुभवणे जास्त श्रेयस्कर!

पन्हाळ्यावरून निघून मासाईच्या पठारावरून उतरल्यापासून डोंगर रांग डाव्या हाताला ठेवीत जाणारी हि वाट मुळात त्यातील मधून मधून येणाऱ्या दुर्गम जागा हेरून राजांनी निवडली असावी हे निश्चित. पाठ्लागावरील शत्रू सैन्य आपल्याला सहज गाठू शकणार नाही अशी व्यूह रचना त्यामागे असणार. त्यामुळे एकूणच या परिसरात तो इतिहास रचला गेला आणि हा सर्वच परिसर पावन झाला. या वाटेने पायपीट करणाऱ्या आजकालच्या उत्साही शिलेदारांनी रस्ता चुकू नये म्हणून वाटेवर ठीक ठिकाणी पिवळ्या रंगाचे आणि भगवा झेंडा कोरलेले मैलाचे दगड लावलेले आहेत. घनदाट वाढलेल्या जंगलातून माणसं हरवू नयेत यासाठी.



१२-१३ जुलै हे आषाढातील पावसाचे दिवस, इथे कधी घोट्या इतका कधी गुढग्या इतका चिख्खल, वाट अडवायच्या बेताने मध्ये येणारा तुमुल झाडोरा, कुठे उतारावरच नव्हे तर सपाट पठारावर सुद्धा घसरगुंडी होईल असा निसटलेला पावठा, जंगलातील उघड्या माळावर कुठे दहा वीस फुट व्यासाचा पाण्याने भरलेला खळगा, नितळ, आभाळ भरलेल्या आकाशाचे प्रतिबिंब दाखवणारा,



 कुठे मोठा जलाशय, रस्त्याकडेने वाहणारे झरे, कुठे त्यात चारेक फुटाचा खड्डा, मोकळ्या मुरूमाच्या वाळू आणि मातीने भरलेला- चुकून इकडे पाऊल टाकणार्याला गिळंकृत करण्यासाठी आ वासून बसलेला, वाटेवर आडवे घातलेले असंख्य ओहोळ आणि ओढे. ओहोळ आणि ओढा या शब्दांमधील फरक जाणवण्या इतका  प्रवाहातील फरक असलेले. काही स्वच्छ पाण्याचे प्रवाह तर कधी वरच्या अंगाला पाऊस सुरु आहे याची ओळख म्हणून गढूळ पाण्याचे दर्शन घडविणारे. त्यातून खुश्शाल पाय घालावा. मोठ्या चालीने कातावलेले पाय त्या थंड पाण्याने एकदम शांत व्हावेत आणि पुढे पावले रेटायला धीर यावा. सुकमा च्या धनगर वाड्या आधी असलेला राजनकडा धबधब्याकडे जाणारा मोठ्ठा ओढा, नेहमीच मांडीइतका भाग सुस्नात करीत ओलांडावा लागणारा, थंडगार स्वच्छ नितळ पाणी वाहून नेणारा. हा ट्रेक नेहमी करणाऱ्या एका ग्रुप ने त्याला “ ह्योच त्यो” असेच समर्पक नाव ठेवले आहे.

वाटेवरच्या वाड्या, बहुतेक ठिकाणी आता पक्के रस्ते, विजेच्या तारा पोचलेले आहेत. गावाच्या मुख्य रस्त्याला लागून बांधलेली वीस ते तीस कधी पन्नास घरे, घरासमोर असलेले नळ-पाणी योजनेचे नळ. घरगुती व्यापाराच्या सप्लाय चेन मधील शेवटचे ठिकाण असलेली, घरातूनच चालवली जाणारी प्रोविजन स्टोअर्स. या मोसमात खूप ट्रेकर्स इथून जातात म्हणून केलेली चहा, कॉफी ची सोय, कुठे बिस्किटांचे पुडे आणि पूर्वी दिसणाऱ्या पाण्याच्या लखलखीत हंड्यांची जागा घेतलेल्या बिसलेरीच्या बाटल्याचे क्रेट. “नळाचे पाणी भरून घेऊ का?” असे विचारल्यावर थोडेसे आश्चर्य दाखवणारी तिथली माय. घरोघरी दारात किंवा परसात दिसणारे पॉवर टिलर आणि भात शेतीत चिखल करण्यासाठी त्याच्या चाकांना लावलेले गोलाकार फाळ.

दैनंदिन गरजा पूर्ण होतील इतकी उन्नती झालेली वस्ती, तरी अप्रूप म्हणून गावा गावातून जाताना गोळ्या- चोकलेट हसत हसत मागणारी छोटीशी मुले, गेल्या वर्षी आमच्या मित्राने वही पेन्सिली दिल्या तर नाखुशीने घेणारी! पाटेवाडीतल्या एका घराच्या भिंतीवर चितारलेले कोण्या एका सचिन च्या शुभ विवाहाचे निमंत्रण. हा सचिन एकोणीस वर्षापूर्वी हा ट्रेक केला तेव्हा असाच गोळी- चोकलेट मागायला आला असेल का? कसा असेल तो? आज काय करत असेल? दारात उभ्या मोटरसायकल वरून आजच्या परिस्थितीचा अंदाज करू शकतो, पण मग पूर्वी कसा असेल तो? कुठे आणि किती शिकला असेल?

इतक्या दुर्गम गावात पोचलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विजेची व्यवस्था यासाठी झालेली गुंतवणूक पाहता अंत्योदय योजना महत्वाची असली तरी तिला अधिक परिणामकारक आणि कमी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नसेल का असा विचार एका मित्राने व्यक्त केला. आर्थिक निकषावर पाहिले तर खरे आहे पण त्याचे सामाजिक परिणाम काय होतील याचाही विचार व्हायला हवा असा निष्कर्ष चर्चे अंती निघाला. दैनंदिन गरजा कमी आणि उत्पन्न त्या भागविण्यासाठी पुरेसे असेल तर इतक्या निसर्गरम्य वातावरणातले आयुष्य सुखाचे कि शहरातले मृगजळामागे धावणारे जीवन सुखाचे असाही प्रश्न बोला चालीत निघाला. अर्थातच याचे उत्तर अनिर्णित राहिले.  

एखाद्या शेताच्या बांधावरून कसरत करीत जाताना समोरून आलेल्या एखाद्या मावशीने “ डोके दुखण्यावर गोळी आहे का व्हो?” असा केलेला प्रश्न हा  दुर्गम भागात फिरताना येणारा नेहमीचा अनुभव. डोक्यावर इरले घालण्याआधी बांधलेले चुंबळे, ऊन, वारा, पाऊस झेलून करपलेली काया, बैलांचे कासरे आणि हिरी वरच्या रहाटाचे दोर ओढून घट्टे पडलेले हात, पायताणा वाचून शेतात उतरून केलेल्या कामाने भेगा पडलेले पाय अश्या वेशातले त्या गावच्या उतरण्डीतल्या अंतिम कडीतले  शेत मजूर आणि त्यांच्या बाया. आमच्याकडील काही खाद्य पदार्थ देण्यासाठी पिशवीतून बाहेर काढल्यावर त्या खरखरीत हातांची ओंजळ करून समोर येणारा. मी देणारा आणि तो घेणारा हा भाव सोडून त्याला बंधुत्वाने मिठी मारावी असा विचार क्षणात मनात आलेला, पण न जाणो कशामुळे तो आवेग रोखून केवळ शब्दांचा आधार घेत आणि देत पुढे पाय चालविणारा मी......

संपूर्ण ट्रेक मार्गावर कुठेही उगाच लोळण घेणारा प्लास्टिक चा कचरा नाही. तो फक्त गावकीत. कुठे उगाच स्वागताचे फलक नाहीत आणि कुठे डीजे किंवा गाडीत मोठ्याने गाणी लावून नाच गाणी नाहीत. उत्साहाने चालणारी तरुणाई. मुद्दामहून हा अनुभव तरुणांना देणारे आयोजक. पावित्र्याने भारलेले, छान छौकी सोडाच पण सामिष भोजन सुद्धा या वाटेवर नाकारणारे. एखाद्या ध्येयाने तरुणाई प्रेरित असेल तर किमान काय होऊ शकते याचा अनुभव देणारे हे निरीक्षण.

असा समृध्द अनुभव देणारी हि पायपीट. गढूळ पाण्याचे डबके, वाहणारा पाट किंवा ओढा, चिखलाने माखलेला आणि भरलेला रस्ता, वरून कोसळणारा पाऊस, ओलेत्या भागात असू शकणाऱ्या रक्त पिपासू जळवा याची काल्पनिक आणि वास्तविक भीती घालवून देणारी आणि  शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी; पुन्हा येण्याची साद घालणारी. म्हणूनच म्हणतो, मी पुन्हा जाईन, पुन्हा जाईन.....

 

सत्यजित चितळे

जुलै २०२५

#Panhala

#Pavankhind

#Vishalgad

 

Thursday, June 12, 2025

विठ्ठला कॉलिंग- Cycling Wari to Pandharpur with Indo-Athletic Society

 

विठ्ठला कॉलिंग - Cycling Wari to Pandharpur with Indo-Athletic Society

-   इंडो अॅथलेटिक्स सोसायटी ( आय.ए.एस.) ची पुणे- पंढरपूर सायकल वारी ७ जून २०२५  

कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू| येणे मज लावियेला वेधू || अशी त्या सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीची मोहिनी ज्ञात इतिहासात गेली हजार-बाराशे वर्षे समाजातल्या संवेदनशील मनांना घातलेली दिसते. त्याविषयीचे कुतूहल शमविण्याच्या प्रयत्नातील एका पावलाची ही कथा, माझी माझ्यासाठी....

वर्ष २०२५ चा उन्हाळा थोडा लवकरच सुरु झाला. मार्च च्या दुसर्‍या आठवड्यातल्या एका व्यस्त दिवशी घरी परतल्यावर सहाव्या प्रहरात जेवून फोन हातात घेतला तेव्हा दिवसभर त्याचा घडलेला विरह असह्य झालेला होता. सह्याद्री सायकलिंग च्या ग्रुपवर सुमारे अर्धशतकी मेसेजेस मधून इंडो अॅथलेटिक्स सोसायटी ने आयोजित केलेल्या पंढरपूर वारी ची चर्चा सुरु असलेली दिसली. नेहमीच्या सायकलिंग बडीजना न विचारता एकदमच थेट त्यांच्या या उपक्रमात नाव दाखल केले आणि खऱ्या अर्थाने आपली नाव त्या प्रवाहात ढकलून दिली. आणि मग आपलेच आपल्या या उत्स्फूर्त कृतीचे कुतूहल वाटून बरोबर कोणी येतंय का याचा शोध सुरु केला. कदाचित मागील वर्षी झालेल्या अपघातानंतर खंडित झालेले दीर्घ अंतराचे सायकलिंग सुरु करण्याची सुप्त इच्छा, कदाचित आपली क्षमता तपासण्याची किंवा सिद्ध करण्याची पुन:श्च प्रबळ झालेली आकांक्षा असेलही. परंतु त्याही पेक्षा ही ओढ काहीतरी वेगळी आहे असे मन मात्र सांगत होते.

उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले, सकाळी ९ नंतर तापणारे सूर्य देव, मार्चच्या महिन्यातला दक्षिण भारत दौरा आणि कामाची गडबड यामुळे लांबच्या अंतराचा सायकल सराव झाला नाही. एप्रिल मध्ये एक दोन १०० किमी च्या राईड झाल्यावर सायकल ला संजय सातपुतेंचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या हाती अगदी मक्खन झालेली सायकल भर पावसातच घरी घेऊन आलो. मग अवेळी आलेला पाउस पथ्यावर पडला आणि सराव लांबला. आय.ए.एस. चे प्रोत्साहनपर आणि माहितीपूर्ण मेसेज ग्रुपवर येऊ लागले होतेच. मे च्या पहिल्या आठवड्यात कामशेत ची परत फेरी करून येताना आय.ए.एस. च्या ऑफिस मध्ये आपल्या शरीराचे माप आणि आय.ए.एस. ने नियोजित केलेल्या शिंप्याचे माप जुळते आहे ना पाहायला गेलो. तिथे आय.ए.एस. च्या वारीचे नियोजन करणाऱ्यांची चेहरे ओळख झाली.

मग पुन्हा दोन आठवडे पावसाने झोड उठवली. आता पाउस असो वा नसो, वारीच्या आधीच्या रविवारी पुन्हा कामशेत पर्यंत जाऊन येताना आय.ए.एस. च्या ऑफिसमधून जर्सी, बिब आणि टी-शर्ट घेऊन यायचं ठरले. या राईड ला जाताना तळेगावलाच पावसाने गाठले आणि आपल्या सायकल ला बसवलेले मड-गार्ड बर्याच अंशी शोभेचे आहेत हे पक्के मनात ठसले. वडगावच्या “पातळ सांबार” हॉटेलमध्ये चविष्ठ मिसळ खाऊन परत निघालो आणि सायकल पंक्चर झाली. माझ्या सायकलिंगच्या १३ वर्षातील अनुभवातले तिसरे पंक्चर. टायर मध्ये रुतून लपलेली छोटीशी बर न दिसल्यामुळे, टाकलेली नवीन ट्यूब रावेत जवळ हायवे सोडून आत शिरताना पुन्हा पंक्चर झाली. सुनील आणि तेजस हे दोन तगडे मित्र बरोबर असल्यामुळे एकाच फेरीत दोनदा या आवश्यक शिकवणीचा सराव झाला.

आय.ए.एस.च्या ऑफिस मध्ये गेल्यावर सुमारे २००० ते २३०० लोकांनी या राईड साठी नोंदणी केली असल्याचे कळले आणि पंढरपूरहून परतीचा प्रवास पांडुरंगाच्या कृपेवर न सोडता आपणच काहीतरी नक्की ठरवावे असे ठरले.

रविवारच्या राईड मध्ये भिजल्यामुळेच कि काय मंगळवारी घसा धरला. पाठोपाठ सर्दीने नासिकेवर आपला कब्जा केला. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारची सिंहगड चढाई टाळली तरी पंढरपूर सायकल वारीसाठी तब्येत काही साथ देईल असे वाटेना. शुक्रवारी अश्या दोलायमान स्थितीत काम उरकले आणि संध्याकाळी राईड कप्तान श्रीकांत ला फोन केला. उद्या सकाळी झोप झाल्यावर कसे वाटते त्यावर निर्णय घ्या असे सांगून त्याने अंतिम निर्णय माझ्यावरच सोपवला. मनोमन पांडुरंगाचा धावा करून दिवस संपवला आणि लवकर निद्रिस्त झालो.

आय.ए.एस. च्या वेब साईट वर आधीच्या सायकल सफरींचा स्त्रावा वर नोंदलेला इतिहास पाहून २०० किमी पेक्षा जास्तीच्या राईड साठी तयारी “मध्यम” असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला होता. हा शेरा खोडून काढायची संधी विविध कारणांनी मिळाली नव्हती आणि आता प्रत्यक्ष निघण्याचा दिवस येऊन ठेपला होता.

२०० किमी पेक्षा जास्तीचा पहिलाच सायकल प्रवास, त्यात पूर्ण बरी नसलेली तब्येत, पावसाची शक्यता या विचारांमुळे कितीही प्रयत्न केला तरी मनाची चंचलता काही कमी होईना. उण्यापुऱ्या तीन-साडे तीन तासांनीच जाग आली. मग पुढचे दोन तास विविध उपायांनी निद्रा देवतेची आराधना करण्यात घालवला. आणि पहाटे ३ चा गजर झाला. उठल्यावर पंढरपूरच्या विचाराने मनावरचे मळभ दूर झाले आणि तजेलदार मन:स्थितीत आवरले. सायकल रथावर सर्व आयुधे आधीच लावून सज्ज केलेली होती. सफरीसाठी आवश्यक जामानिमा आणि शिरस्त्राण घालून तयार झाल्यावर चंदनाचा निरोप घेतला आणि प्रस्थान ठेवले.

वडगावच्या विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेऊन ४ वाजता पुढे निघायचे असे ठरले होते. तेजस, त्याची पत्नी सुजाता आणि मी असे तिघे पोचलो तेव्हा सुनिल तिथे वाट पाहत होता. योगेश, श्रीकांत आणि आशिष असे तिघे आल्यावर विठ्ठलाच्या पायी नमस्कार वाहून निघालो. सारसबागेपाशी महेंद्र, अश्विन आणि वैभवचा निरोप घेऊन पुढे निघालो तेव्हा पंढरपूर वारी साठी निघालेले आणखीन बरेच सायकल वीर भेटले.

सेव्हन लव्हज चौकात समोर उंचावर तेजस्वी शुक्राचे दर्शन झाले. इतर तारकांनी मात्र ढगांच्या झिरझिरीत पडद्याआड राहणेच पसंत केले. शुक्राची चांदणी हि रमणीय असली तरी आज उन्हाने काहिली होणार बहुतेक असा विचार माझ्या मनात त्या क्षणी येऊन गेला.

हडपसर चे नोबेल हॉस्पिटल हा वारीचा दुसरा फ्लॅग ऑफ पॉईंट होता. तिथे पोचेपर्यंत निगडीहून आलेले वीर पुढे गेले होते. त्यामुळे थांबण्याचा प्रश्न नव्हता. पहाटेच्या वर्दळीतून सायकल पुढे दामटली. सोलापूर रस्ता चांगला विस्ताराचा असल्यामुळे पहाटेच्या रहदारीचा डावीकडून शिस्तीत जाणार्या सायकल स्वारांना विशेष त्रास नव्हता. रस्ता बराचसा समतल असल्यामुळे चांगल्या वेगाने अंतर कापायला सुरुवात झालेली होती.

थेऊर फाट्याला फक्कड गुळाचा चहा वाट पाहत होता. महेंद्र आणि अश्विन आमचा निरोप घेऊन इथून पुण्याला परतणार होते. तिथे पोहोचेपर्यंत वाटेत बर्याच सायकल स्वारांना मागे टाकून पुढे जाताना आपल्याला मिळालेला “मध्यम” तयारीचा शिक्का आज नक्कीच पुसला जाईल असा विश्वास मनात डोकावून गेला.

जावजीबुवाच्या वाडी पाशी ६.०० वाजता पोहोचलो. तिथल्या रिलायंस च्या पेट्रोल पंपाजवळ पहिला थांबा होता. आय.ए.एस. च्या उत्साही स्वयंसेवकांनी आवर्जून थांबवले, उत्तम चवीचा नाश्ता, आणि उत्तम चहा कॉफी चा आस्वाद घेऊन पुढे निघालो. आता उजाडले होते. आणि रस्ता समोर सरळ दूरवर गेलेला दिसत होता. “पावसाच्या पाण्यात तत्काळ विरघळणारी गोष्ट म्हणजे महापालिकेचे डांबर” या विनोदाची आठवण व्हावी अशी खडीची चून रस्त्याच्या पृष्ठभागाशी असलेले नाते तोडून विखरून डावीकडे गोळा झालेली दिसत होती. तरीही रस्त्यावर खड्डे पडलेले नसल्यामुळे सायकलीचा वेग कमी करावा लागत नव्हता.

महामार्गा ला लागून असलेले उद्योग आणि उत्पन्नाची साधने यांच्यातला एक बदल लक्षात येणारा असतो. विशेषेकरून सायकल सारखे कमी गतीने जाणारे वाहन असताना त्याचे निरीक्षण करता येते. शहराच्या सीमेवर असलेली वाढत्या वस्तीच्या गरजा पुरविणारी फर्निचर, मार्बल सारख्या वस्तूंची दुकाने, त्यापुढे हौसेच्या जास्त जागा लागणाऱ्या वस्तूंची दुकाने व नर्सरी, त्यापुढे विकसकांनी घेऊन ठेवलेल्या आणि काम्पौंड चे पांढरे खांब उभारलेल्या पडीक जमिनी. रस्त्याकडेने टाकलेला कचरा, त्यातील प्लास्टिकच्या पिशव्या वाऱ्यामुळे उधळून पडीक जमिनीत वाढलेल्या काटेरी झुडूपांवर ओंगळवाण्या अडकलेल्या आणि मग त्यापुढे शेती. मे महिन्यात सुरु झालेल्या पावसाने शेतीचे बांध सुद्धा हिरवाईने नटले असल्यामुळे दोन शेतांमधील सीमारेषा पुसल्या सारख्या दिसत होत्या. 

केडगाव फाटाच्या अलीकडेच ढगांच्या पातळ पडद्याआड नारिंगी सूर्यबिम्बाचे दर्शन झाले. पूर्वेकडे क्षितिजाजवळ मात्र कुरकुंभ जवळच्या टेकड्या सावळ्या रंगात धूसर दिसत होत्या. माफक चढ-उताराचा नाकासमोर सरळ गेलेला सावळाच डांबरी रस्ता आम्हाला त्याच सावळ्या रंगाकडे घेऊन जाणार होता. तो सावळा रंग बरसणाऱ्या कृष्ण मेघांचा, तसाच विठ्ठलाच्या मूर्तीचा.

कुरकुंभच्या आधीच्या चढावर पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी स्वागत केले. त्यापासून बचावाची कोणतीही साधने जवळ बाळगलेली नव्हतीच त्यामुळे जलधारांमध्ये न्हाऊन निघणे हे क्रमप्राप्तच होते. पाउस पुढे असो अथवा नसो आता भिजलेल्या स्थितीतच पुढे नऊ – दहा तास सायकल चालवायची आहे या विचाराने मनाची तयारी केली. तो सावळा विठुराया घेईल काळजी असे कितीही बजावले तरी शंकित मन स्वस्थ बसत नव्हते.

कुरकुंभच्या मुख्य चौकातल्या उड्डाणपुलावर मागचे चाक बसले तेव्हा जवळपास ७५-७८ किमी सायकल मारून झालेली होती. दगडाची बारीक कपची, खडा किंवा फुटलेली काच, कधी लोखंडी तारेचा एखादा तुकडा त्यांच्या त्यांच्या करवती टोकदार गुण धर्माला जागतोच. “आलिया भोगासी असावे सादर”  म्हणत ट्यूब बदलण्याचा उपक्रम सुरु केला. मागून आलेल्या आशिष ची चांगली मदत झाली. रस्त्यावर साठलेल्या पावसाळी पाण्याच्या डबक्यातून मोठ्या वाहनांच्या चाकांनी उडणाऱ्या पाण्याने मधून मृत्तिका स्नान व्हावयाचे तर वरून पडणारा पाऊस ते धुवून काढायला तत्पर होत असे. पंक्चर काढून पुढे निघालो. १०-१५ मिनिटावर पुढचा थांबा होता. तिथे गरम पोहे आणि चहा अशी उत्तम व्यवस्था होती. तिथे पोहोचतो तर सुजाता च्या सायकल चे मागचे चाक पंक्चर झाले असल्याचे कळले. त्याची दुरुस्ती आणि भिजल्या स्थितीत गरम गरम नाश्ता, चहा घेताना पाऊण तास कसा गेला कळले नाही.

तुलनेने रखरखीत असलेल्या या प्रदेशात जाताना पाउस मिळणे म्हणजे तुम्ही नशीबवान आहात असे हि वारी पूर्वी केलेल्या मित्रांचे म्हणणे होते आणि आम्ही त्यांच्या म्हणण्यांनुसार भाग्यवान ठरलो होतो. पांडुरंगाची कृपाच म्हणायची. सुदैवाने आता पाउस थांबला आणि आभाळही चांगले निवळू लागले होते.

भिगवणची पांढरी चढून गेल्यावर जोगेश्वरी मिसळ पाशीचा थांबा गाठला तेव्हा १०.३० वाजून गेले होते. या प्रदेशातील पांढरीची टेकाडे म्हणजे कमी चढाची मुरुमाड ढेकळेच जणू. बेरड जमीन आणि कमी पावसाचा प्रदेश, त्यामुळे त्यावर बोरी-बाभळीचे साम्राज्य. पावसामुले भुईवर डोकावणारे हिरवे कोंब आणि मधूनच डोकावणारी करड्या रंगाची एखादी शिळा किंवा दगडाचा पट्टा.

उन्हाचा ताप थेट जाणवत नसला तरी उष्म्याला चांगली सुरुवात झालेली होती. भिगवण ते पळसदेव च्या टप्प्यात डावीकडे उजनी च्या जलाशयाचे बराच वेळ दर्शन होत होते. आभाळात पसरलेल्या ढगांच्या आता गुठळ्या होऊ लागल्या होत्या आणि त्यामधून सूर्य लपंडाव खेळू लागला होता. असह्य उकाडा जाणवू लागे आणि मग लगेच त्यातल्या त्यात ढगाचा जाडसा पदर सूर्याला झाकून टाकत असे, थोड्या वेळासाठी का असेना. तीही हरीची कृपा, तसेही तो कनवाळू आहे असाच अभिप्राय संत वान्ग्मायात वाचायला मिळतोच कि!

पळसदेव जवळ येता येता डावीकडे जलाशयात एक शिखर दिसू लागले. पुरातन पळसदेवाच्या मंदिराचे ते शिखर असावे असे वाटले, शंका विचारायला बरोबर कोणीच नव्हते. फक्त मी, माझी पुढे जाणारी सायकल, लयबद्ध खाली वर होणारे पाय, त्याच लयीत चालणारा श्वास आणि गतीशी गुणोत्तर साधून येणारा चाकांचा चक-चक-चक आवाज, उजवीकडून भुर्रकन जाणारी वाहने आणि मागे पुढे अंतर राखून येणारे इतर सायकलस्वार, मधूनच जलाशयावरून उडत येणारे किंवा जाणारे बगळे किंवा करकोचे इतकेच.

वारीला जायचे ठरविल्यावर मुद्दामहून वाचलेले, ऐकलेले अभंग, नित्यपाठ आणि हरीघोष कानात रुंजी घालू लागले. त्यांचा ताल आणि प्रवासाची लय अचानक जुळून आली. त्याचबरोबर त्यातील शब्द मनावर हळू हळू अर्थ उमटवू लागले. कुठे वाचलेल्या या शब्दार्थांचा बोध होऊ लागला तशी बोधाच्या पलीकडले जाणण्याची आपली क्षमता अजून नाही हेही जाणवू लागले.  

पळसदेव च्या थांब्यावर पोचलो तेव्हा १२ वाजत आले होते. थंडगार निम्बूझ आणि रसदार संत्री असा खुराक घेऊन थोडा दम श्वास हलका केला आणि पुढे निघालो. शून्य सावलीच्या दिवसापासून आजचा दिवस दूर असला तरी मान खाली घालून सायकल चालवताना थेट खाली पडलेली सावली दोन गोष्टींची निदर्शक होती. एक म्हणजे सूर्य थेट माथ्यावर आलेला होता आणि ढगांचे आच्छादन पूर्णपणे मागे सरले असल्याचे. इथून जेवायचे ठिकाण अजून एक तासाने येणार. म्हणजेच तोवर कडक उन्हात पेडल मारायचे. सकाळीच पावसाने कपडे भिजलेले. ते वाळले आहेत असे वाटावे तोवर पुन्हा घामाने भिजले असल्याची जाणीव होऊ लागली.

उन्हाची तमा कशाला बाळगायची. आपलीच पडलेली हलणारी छाया पाहताना विचार आला. जी छाया या प्रखर प्रकाशामुळे संभवते, ती ज्याची छाया, तो देह सुद्धा या प्रकाशाच्या स्त्रोतामुळेच संभवतो ना! दमल्या भागल्या जीवाला, बरसणारी शीतल पर्जन्य वृष्टी जर त्याचे रूप वाटते तर आता हा प्रखर सूर्य प्रकाश त्याचेच रूप नाही का? हा विचार चमकला मात्र, उन्हाचा आधी असह्य होणारा ताप एकदम सुसह्य झाला. कोणी म्हणावे हे मनाचे खेळ तर कोणी काही. पण अश्या अनुभवातून गेल्यावरच ते सुचतात आणि खरे सांगायचे तर भावतात हे मात्र खरे.

एका बाजूस पूर्वी वाचलेल्या आणि अत्यल्प स्मरण शक्तीने साठवलेल्या अभंगाच्या ओळी, बहुधा धृपदेच, चाली सहित ओठावर येत होत्या, तर दुसर्‍या बाजूस ते अभंग पूर्ण आठवत नसल्याची आणि ती साहित्यकृती कोणी कोणासाठी लिहीली ते आठवत नसल्याची खंत, कोणता अभंग किंवा कवन रामाचे, कोणते श्रीकृष्णाचे, कोणते गणपतीचे, काही शिवाचे . आपण तर पंढरीला निघालो आहोत जिचा स्वामी पांडुरंग. पण आठवत नाही म्हणून मनात येतील ती कवने गुणगुणतो आहोत असे वाटून मनाचा गोंधळ उडू लागला. इतक्यात गदिमांचे “ बाई मी विकत घेतला शाम” आठवले त्यातील “ हाच तुक्याचा विठ्ठल आणिक दासाचा श्रीराम” ही ओळ आठवली आणि मनीचा गोंधळ तत्काळ शमला.

इंदापूर जवळ येत होते. पाय लयीत आणि वेगाने हलत होते. इंदापूर बायपासच्या फाट्यावर पाणी भरून देण्यासाठी स्वयंसेवक सज्ज होते. ‘ इथून जेवायचे ठिकाण आता जवळच आहे, इंदापूर डावीकडे ठेवून जायचे आणि गाव संपले कि लगेच.... आशिष ने माहिती दिली. हुरूप आला. पोटात कावळे कोकलत होतेच. दोघांनी वेगाने प्रस्थान ठेवले. इंदापूरची वस्ती डावीकडे दूरवर दिसत होती. गावाचा विस्तार संपायला सुमारे अर्धा तास लागला आणि आम्ही एकदाचे अथर्व कार्यालयाच्या आवारात दाखल झालो.

मोठे कार्यालय, हात, तोंड धुवायला चांगली व्यवस्था. प्रशस्त डायनिंग हॉल मध्ये हारीने मांडलेल्या जेवणावळी च्या पंगती. आय. ए. एस चे उत्साही स्वयंसेवक नियोजन करणारे, स्वत: पदार्थ वाढणारे. भरगच्च जेवणाचा बेत अगदी तृप्तीचा ढेकर येईपर्यंत. जिलेबीचे जेवण जेवून बाहेरच्या हॉल मध्ये आलो. विश्रांतीसाठी चक्क गाद्या घातलेल्या होत्या. आधी पोचलेले काही सायकलस्वार तिथे आवश्यक ताणाचे व्यायाम घेत होते तर काही निवांत विश्रांती. स्टॅटिस्टक्स च्या भाषेत सांगायचे तर एकूण सायकल स्वारांच्या संख्येत आम्ही +/-१ सिग्मा मधले असल्यामुळे आम्ही पोहोचू तेव्हाच गर्दी असे. त्यामुळे गादीचे सुख नशिबात नव्हते. मग फरशीवरच लवंडलो. खायला कोंडा(त्या सुग्रास जेवणाला कोंडा म्हणू नये, पण म्हणी साठी) आणि निजायला धोंडा असे झाले. थोडा वेळ मस्त डोळा लागला. पावणे दोन वाजता जागृतावस्थेत येऊन पुढे निघायची तयारी केली आणि निघालो.

इथून टेम्भूर्णी एक तासावर, थोडा कललेला सूर्यदेव, तरीही प्रखर. डावीकडे दिसणारे उजनी धरण ओलांडले आणि पुढे शिवसेना शाखेतर्फे आयोजित थांब्यावर थंडगार ताकाचा आस्वाद घेतला. प्रेशर वॉशिंग चे मशीन लावून उडणार्‍या तुषारांनी अंघोळ घालण्याची त्यांनी केलेली सोय सुखावून गेली. बुडाखाली असलेल्या सीट वर ज्वालामुखी पेटला होता त्याचे मात्र काही करता येणे शक्य नव्हते.

टेम्भूर्णी सुमारे तीन वाजता आले आणि उजवीकडेचा पंढरपूर फाटा पकडला. आता राज्य रस्ता महामार्ग, दुपदरी, उंच सखल, खडबडीत पृष्ठभागाचा. हाच रस्ता खाली हैदराबाद कडे जातो त्यामुळे ट्रक्स ची वर्दळ असलेला. फाट्यावर उसाच्या रसवंती गृहाचा सिग्नेचर खुळ्ळ खुळ्ळ आवाज ऐकला मात्र सायकल चे ब्रेक आपोआप लागले. तेजस आणि सुजाता येई पर्यंत रसाचे पेले घेऊन खुर्चीवर विसावलो. आधुनिक बांधणीचे उसाचे चरक इथेसुद्धा पोचलेले दिसले. पूर्वी या आवाजासाठी चरक चालू ठेवायला लागत, मग काही काळ छोट्या मोटर वर फिरणार्या घुंगरटांनी सेवा बजावली. आता आवाज रेकोर्ड करून वाजवणारे स्पीकर दिसू लागलेत, प्रगतीच्या खुणा!  

पंढरपूर ४० किमी हा बोर्ड पहिला आणि अंगात ‘उसने अवसान संचारले. मागून येणारी वाहने सुद्धा बर्यापैकी शिस्तीत जात होती. रस्त्याकडील वस्तीतून लहान मुले हसर्या चेहऱ्याने हाका मारून हात हलवीत टाटा करीत होती. फाटा सोडल्यापासून ८-१० किमी च्या अंतरात एका टपरी बाहेरून आवाज देत एक गावकरी बाहेर आला. “माउली..सरबत घ्या सरबत”......ताक, त्यावर उसाचा रस मध्येच प्यायलेले इलेक्ट्रोल याचे विचित्र मिश्रण पोटात झालेले होते. त्यामुळे त्याची आग्रहाची विनंती टाळली. त्याच्या आवाजात निश्चितच व्यावसायिक बोलावणे नव्हते. पायी वारी बरोबर चालताना सुद्धा असाच अनुभव अनेक ठिकाणी घेतला आहे.

थकलेल्या शरीरानिशी पण ताज्या मनाने सायकल मारीत ५.३० वाजता पंढरपूर पासून ५ किमी अलीकडे असलेल्या तुकारामबुवा खेडलेकर यांच्या आश्रमाशी पोचलो. तिथे विठूरायाची उंच मूर्ती बनवलेली आहे. तिथे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकला कि राईड पूर्ण होते! १ सिग्मा चा नियम तिथेही होताच, त्यामुळे गर्दी झाली. पंक्ती प्रपंच नको म्हणून फोटो काढून “जमलं बुवा” चे निरोप चव्हाट्यावर टाकले. मागून मित्रांचा कारवा आल्यावर पुढे निघालो आणि पंढरपूरच्या गर्दीतून वाट काढीत भक्त निवास मध्ये पोचलो. एकादशी असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. त्यामुळे थकल्या शरीराने तिथे जाणे टाळले.

बाळू पुण्याहून गाडी घेऊन आला होता. सायकली पटापट सोडविल्या आणि गाडीत टाकून त्याला पुण्याला परत धाडले. आता आम्ही आमचा आमचा परतीचा निर्णय घ्यायला मोकळे झालो.

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास उत्तम, प्रशस्त व्यवस्था असलेले ठिकाण. ८ बेड आणि ५ बेड चे कक्ष, त्याला जोडलेली स्वच्छतागृहे, सर्वांसाठी स्वच्छ गाद्या, उश्या आणि पांघरुणे, खूपच आरामदायी. चार दिशांनी असलेले निवासी कॉम्प्लेक्स आणि मधोमध प्रशस्त हिरवळ, एक छानसे स्टेज, जणू एखाद्या तारांकित हॉटेलमध्ये आलो आहे असेच वाटावे.

सचैल स्नान करून आय.ए.एस. ने आयोजित केलेल्या उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊन झोपायला गेलो. आमच्या खोलीतील आशिष आणि योगेश पाहटे ४ वाजता पुण्याकडे सायकलवरूनच निघणार होते. त्यामुळे सगळेच लवकर झोपलो. दिवसभराच्या श्रमांनी क्षणार्धात गाढ झोप लागली. पहाटे हे दोघे निघाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा लगेच झोपी गेलो. ५,३० वाजताच गजर झाला. उठून आवरून एस-टी स्थानकाकडे निघालो. पंढरपूर मधील अंतर्गत रस्त्यावरून खड्डे चुकवत रिक्षाने आम्हाला स्थानकात सोडले. एस-टी स्थानकाची अवस्था दयनीय होती. लहानपणापासून पाहिलेली वेगवेगळ्या एस-टी स्थानकतली अस्वच्छता तिळमात्र बदलेली नाही याचा खेद वाटला. तिथली अव्यवस्था आणि वाटेतल्या वेळापूर- अकलूज आदि गावातली उघडी गटारे पाहताना कालच्या सायकल प्रवासातले एक दृश्य वारंवार डोळ्यासमोर येत राहिले. गावातली घरे, लागून पडवीतले गोठे. त्या बाहेर खुंटाळी ठोकून बांधलेली वासरे आणि रेडके. त्यांना बांधलेल्या दोरीच्या त्रिज्येचे वर्तुळ त्यांच्या शेणा मुतीने भरलेले. त्यातच लोळल्यामुळे त्यांच्या केसाळ कांतीवर चिकटलेली शेणा-मातीची पुटे. उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे घरातल्या धन्याच्या दिशेने हम्बरत ती उभी.” आत्ता मला या उन्हाच्या  त्रासातून सोडव” असे आर्जव करणारी. आपली एकूण व्यवस्था ठीक नाही इतकी समाज नसलेले हे जीव. मला गावातल्या एकूण अव्यवस्थेशी याचे साधर्म्य वाटून गेले. थोडे बोचरे विधान आहे हे मी जाणतो, पण माझ्या मते खरे आहे.

७.४५ वाजता पंढरपूर- अकलूज- पुणे- मुंबई सेन्ट्रल एस-टी सुटली. 2X2 आसन व्यवस्था असलेली लाल परी चांगली होती. अकलूज येताच कंडक्टर महाशयांनी जाहीर केले हि इथून पुढे ६ सीट रिजर्वेशन आहेत त्यांनी उठावे. संक्रांत नेमकी आमच्यावरच होती. मग उभे राहून प्रवास सुरु झाला. इंदापूर ला अजून चौघांना उभे राहण्याची शिक्षा झाली! “ आम्हाला आधीच सांगायचे, किमान मनाची तयारी तरी केली असती” असा वाद घालून कंडक्टर महाशयांशी शा‍ब्दिक चकमकी घडल्या आणि निवाल्या.

आपला समाज किती सोशिक आणि सौहार्दाने भरलेला आहे त्याचे दर्शन झाले. ज्यांचे रिजर्वेशन होते त्यांनी स्थानापन्न होताना दोघांच्या सीट वर चोरून बसत चक्क उभ्या असणाऱ्या एकेकाला टेकण्यासाठी जागा दिली. सुरुवातीच्या तापलेल्या वातावरणावर सहज संभाषणाचे विरजण लगेच पडले. कंडक्टर ने सुद्धा पुढे उतरणारे कोण आहेत ते पाहून उभे असलेल्या लोकांना ‘हे उतरले कि तुम्ही तिथे बसा’ असे सांगून आणि स्वत: ची जागा एकाला देऊन ब्राउनी पॉईंट्स मिळवले.  “ हक्क” या शब्दाभोवती असलेले वलयसुद्धा किती सापेक्ष असते तेही जाणवले.

पुण्याजवळ पोहोचता पोहोचता रहदारीत अडकून बसचा वेग कमी झाला आणि शेवटी एकदाची बस १ वाजता स्वारगेट स्थानकात पोचली आणि या वारीचा पुणे-ते-पुणे हा प्रवास संपला. विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर इतका समृद्ध अनुभव आपल्याला घेता येईल असे वारीला निघताना खरोखर मनास वाटले नव्हते. “ भावेविण भक्ती, भक्तीवीण मुक्ति|| बळेवीण शक्ती, बोलू नये||” ज्ञानदेवांनी लिहिलेल्या हरीपाठामधील हि ओवी. यातले बळ मनात, हृदयात आणि शक्ती शरीरात असते असा प्रत्यय आला.

 पांडुरंग म्हणजे कृष्णाचे रूप. परंतु कोणतेही शस्त्र हातात न घेतलेला, कोणत्याही कल्पित असुराशी लढाई न केलेला हा देव “युगे अठ्ठावीस विटेवरी उभा| कर कटावरी घेउनिया||” त्याने प्रत्यक्ष येऊन मोठे चमत्कार केलेले नाहीत, जे आहेत त्या त्याच्या इतर रूपातल्या कहाण्याच. तरी त्याने मनाला वेधू का लावावे त्याचे हे एक उत्तर या प्रवासात मिळाले. वारीचा संपूर्ण प्रवास घडताना आणि त्या आनंददायी अनुभवात आकंठ बुडताना साक्षीभाव जागृतीच्या वाटेवरची नामदेवाची पायरी आपल्याला किमान दिसू लागली आहे असे वाटू लागले.

सत्यजित चितळे

१२ जून २०२५

#cyclewari

#cycle ride