Saturday, November 5, 2022

मार्दी हिमाल बेस कॅम्प ट्रेक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२


 








 मार्दी हिमाल  ट्रेक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हे २०२२

मार्दी हीमाल- अन्नपूर्णा शिखर रांगे जवळच्या वैशिष्टय पूर्ण मच्छपुच्छरे शिखराच्या उतरणाऱ्या सोंडे वरचे एक छोटेसे टेंगुळ! मूळ मच्छपुच्छरे शिखरपासून मार्डी शिखर एका छोट्याश्या घळी मुळे तुटलेले आहे, अर्थात हिमालयाच्या विशालतेच्या दृष्टीने छोटीशी असलेली ही घळ फक्त” 300 मी खोल आहे! स्थानिक दृष्टीने अर्थात या शिखराचे मोठे महत्व आहे. नेपाली भाषेत मार्दी हिमाल म्हणजे पूर्ण चंद्र असे इथल्या एकाने सांगितले. या शिखरापासून एक नदी उगम पावते जीचे नाव मार्दी असे आहे. ही नदी पोखरा च्या आधी ‘सेती गंडकी’ नदीला मिळते.

5587 मीटर्स ची उंची गाठलेल्या या शिखरावर बेसिल गूडफेलो नावाच्या गिर्यारोहकाने पहिले पाउल 1961 साली ठेवले. 'ट्रेकिंग पीक अर्थात सहज चढून जाता येईल असे शिखर अशी ओळख असलेल्या मार्दी शिखराच्या बेस कॅम्प चा ट्रेक मात्र 2012 पासून अधिकृतरित्या सुरू झाला. नेपाळ मधील पोखरा शहरापासून देवराली इथपर्यंत गाडीरस्ता आता झालाय मार्डी शिखरावरून उतरणारी डोंगर सोंडेवरच देवराली आहे. त्यामुळे तिथूनच या डोंगर सोंडेवरचा प्रवास पायी सुरू होतो. गाडी रस्त्याने पोखरपसून बसने धम्पुस गाव गाठून बरेच ट्रेकर्स ही वारी सुरू करतात. 2 ते 3 दिवस चढाई आणि 2 दिवस उतरणे असा हा छोटासा पण सुंदर ट्रेक आहे.

आम्ही या ट्रेकसाठी पोखरा येथील सिस्ने रोव्हर ट्रेकिंग या कंपनीची मदत घेतली होती आणि 1 गाईड आणि दोन पोर्टर बरोबर घेतले होते. 20-22 वर्षाची ही नेपाळी मुले याच परिसरातील होती. पूर्णा हा आमचा गाईड, अनिल आणि कृष्णा हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आमचे पोर्टर. पण आमचे त्यांच्या बरोबर चांगले सूत जमले होते.

29 ऑक्टोबर ला पुणे दिल्ली काठमांडू असा प्रवास करून काठमांडू येथे डेरेदाखल झालो. काठमांडू शहरात खूप सुधारणा झालेल्या बघून छान वाटले. 30 तारखेला सकाळी काठमांडू पोखरा विमान प्रवास करून लगेच देवराली कडे प्रस्थान केले.  पोखरा ते जोमसोम चांगला चार पदरी रस्ता झालाय, घट्टे खोला गावाजवळ त्याला धांपुस गावाकडे फाटा फुटतो. त्या रस्त्याने पोखरा पासून सुमारे 1 तासाने धाम्पुस गावाजवळ पोचलो. इथून अन्नपूर्णा रांग, मच्छपुच्छरे आणि लामजुंग रांग सुंदर दिसते. इथून पुढे देवराली पर्यंत रस्ता अत्यंत खराब आहे, पण 4 व्हील ड्राईव्ह जीप मुळे सामानासहित देवराली पर्यंत पोचणे शक्य झाले. देवराली ची उंची 2160मी च्या आसपास आहे. पहिल्या दिवशी चा पडाव फॉरेस्ट कॅम्प 2500 मीटर आणि अंतर 9किमी.

देवराली ते फॉरेस्ट कॅम्प ची वाट गुरास, मॅपल आणि इतर अनेक वृक्षांच्या घनदाट जंगलातून जाणारी, खूप चढ आणि उतार असलेली. मधूनच झाडांच्या दाटी तून मच्छपुच्छरे, अन्नपूर्णा रांगेच सुखद दर्शन होत होत. झाडी कुठे कुठे इतकी दाट की दिवसा सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नव्हता. धुवाधार पडणारा आणि आताशा लांबलेल्या पावसाची खूण म्हणून झाडांवर भरपूर वाढलेले मॉस, जमिनीतला ओलावा आणि पाऊल न पडलेल्या जागी वाढलेलं शेवाळ हे जागोजागी दिसत होत. मातीत मिसळून गेलेली कुजलेली पाने आणि त्यामुळे भुसभुशीत झालेली वालुकामय माती अजून ओलावा धरून होती. अभ्रक मिश्रित दगडांच्या रुपेरी आणि क्वचित चक्क सोनेरी रंगाच्या खापर्या, गारगोटी सारखे दिसणारे स्फटिकाचे दगड यांची रेलचेल वाटेत होती. उंच वाढलेल्या वृक्षांची आडव्या पसरलेल्या भर भक्कम मुळ्यांनी उतारावर आपोआप पायऱ्या तयार केल्या होत्या. तीव्र उतारावर छानश्या दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. नेपाळ च्या पहाडी जिल्ह्यात स्थानिक कमिटी द्वारे सर्वेक्षण करून ट्रेक रूट वर पायऱ्यांचे बांधकाम, आवश्यक असेल तिथे संरक्षक कठडे अशी बांधकामे सरकारी खर्चातून केली जातात अशी माहिती अनिल ने दिली. पर्यटन, आणि गिर्यारोहण हे इथे उत्पन्नाचे मुख्य साधन असल्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी हे चांगले प्रयत्न इथे होताना दिसले. त्यातून नवे ट्रेक रूट आणि त्यावर बांधली जाणारी गेस्ट हाऊस याची साखळी निर्माण होताना दिसली. गेस्ट हाऊस चे नियम, सोयी सुविधा आणि दरही एक सारखे आहेत असे लक्षात येते. या नवीन ट्रेक रूटस वर गेस्ट हाऊस बांधण्यासाठी सरकार जमीन भाड्याने देते आणि गेस्ट हाऊस बांधणे आणि चालवणे हे स्थानिक लोक करतात असे श्री. दंबार यांचेकडून समजले. गेस्ट हाऊस च्या उत्पन्नातून सरकारी जमिनीचे भाडे सरकारला मिळते, येणाऱ्या ग्रियारोहकांना परवाना काढावा लागतो त्याची फी मिळते. गेस्ट हाऊस च्या चालकांनी उत्पन्नातून आयकर भरणे अपेक्षित आहे, त्यावर काही बोलणे नको! अर्थात गिर्यारोहण आणि पर्यटन जितके वाढेल तितके परकीय चलन नेपाळ च्या खात्यात आपोआप जमा होते आणि रोजगार वाढतो हेही महत्वाचे आहे.

देवराली हून निघाल्यापासून दीड तासाने दोडा खरक नावाचा कॅम्प आला, तिथून पुढे रस्ता चत जाऊन एका वळणावर झाडीतून मुशलबारी चा कॅम्प डोकावला. तिथून समोर अन्नपूर्णा साऊथ आणि मच्छपुच्छरे चे सुंदर दर्शन होत होते. इथून पुढे उतार लागला आणि पुढच्या खळग्यात फॉरेस्ट कॅम्प ची गेस्ट हाऊसेस लागली. इथे पोचेस्तोवर संध्याकाळ झाली आणि आम्ही इथेच एका गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.

31 ऑक्टोबर ची पहाट जंगलातील पक्षांच्या आवाजात उगवली. फॉरेस्ट कॅम्प बेचक्यात असल्यामुळे इथून क्षितिज आणि पर्वत रांग काहीच दिसत नव्हते, परंतु  जंगलातील ती सकाळ फारच प्रसन्न होती. सकाळी आवरून 8.30 ला पुढे निघालो. आता तीव्र चढ सुरू झाला. उंची वाढत होती तशी झाडांचे प्रकार बदललेले लक्षात येऊ लागले. गुरास च्या वृक्षांची उंचीं कमी होऊ लागली. बऱ्याच ठिकाणी उतारावर फर्न च्या झुडुपांची  दाटी दिसू लागली. डोंगर रांग डावीकडे ठेवत तिच्या घड्या उलगडत जाताना एक चढ चढून आलो आणि समोर मच्छपुच्छरे शिखर माथ्याची माशाची शेपूट असलेली रचना विशेष उठून दिसून आली. तोच रेस्ट कॅम्प होता. इथून समोर मछपुच्छरे शिखर पायापासून माथ्या पर्यंत संपूर्ण दिसत होते. डावीकडे मार्डी हीमाल कडे जाणारी आमची डोंगर रांगेची वाट पूर्ण दिसत होती. रेस्ट कॅम्प वर पहाडी नाश्ता पोटात ढकलून पुढे निघालो. रस्ता जंगलातून होता पण सलग चढाचा होता. आम्ही 2600 मी ची उंची ओलांडून पुढे निघालो होतो आणि आता श्वास घेताना ऑक्सिजन ची कमतरता आहे याची पुसटशी कल्पना येऊ लागली होती. कालपासून या मार्गावर नेपाली युवा वर्गाचे ट्रेकिंग करणारे ग्रुप बरेच भेटले होते. त्यातील काही आमच्या आगे मागे बरोबरच चालत होते. ग्रुप मधील किमान एकाकडे ब्लू टूथ स्पीकर आणि त्यावर लावलेली नेपाली गाणी हे अनिवार्यच होते. मुलींची संख्या लक्षणीय होती आणि ट्रेक रूट वर असूनही त्यांची नटण्याची आवड लपून राहिलेली नव्हती. कुठेही असावे तसेच हे मुला मुलींचे ग्रुप आपल्याच घोळक्यात रममाण झालेले होते. ट्रेक रूट वर आणखी बरेच नेपाली ग्रुप्स भेटले. स्थानिक लोक ट्रेकिंग ला पसंती देऊ लागले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात झालेला हा स्तुत्य बदल आहे असे आमची व्यवस्था करणारे सिसने रोव्हर चे मालक श्री. दम्बर यांनी सांगितले.

रेस्ट कॅम्प सोडल्यावर तासाभराच्या चढाई नंतर एक छोटासा कॅम्प लागला. इथे बकऱ्यांचा कळप विसावला होता आणि गुराखी त्यांची लोकर भादरत होते. थंडीच्या सुरुवातीस सुरू असलेली स्थानिक कामे! अनवट वाटांवरील ही निसर्ग संपत्ती पुढे जाऊन प्रक्रिया होऊन शहरातील चकचकणाऱ्या दुकानातून आकर्षक उबदार कपड्यांच्या रूपात मिरवणाऱ!

रेस्ट कॅम्प सोडल्यापासून दोन तासांनी 2900 मी वरच्या लो कॅम्पपाशी पोचलो. उंची जशी वाढत होती तसे आम्ही मछपुच्छरे च्या अधिक अधिक जवळ जात होतो आणि त्याच्या टोकदार शिखर आणि धारदार उतरंडी चे बारकावे अधिक स्पष्ट होत होते. आता पलीकडे गंगापूर्णा शिखर डोकावूं लागले होते आणि मार्डी शिखर अधिक स्पष्ट दिसू लागले होते.

लो कॅम्प सोडून अजून एक तास चढाई केल्यावर उंच झाडांचे छत्र संपले आणि आम्ही बादल दंडा कॅम्प वर पोचलो. थोडे उंचावरचे टेकाड असल्यामुळे इथून दृश्य अधिक स्पष्ट होते. बादल दंडाची उंची 3200 मी आहे, इथून पुढे 300 मी चढून 3500मी वरील हाय कॅम्पवर जाऊन राहावे असे आमच्या गाईड पूर्णा चे म्हणणे होते. परंतु एकदम इतकी उंची गाठणे ठीक होणार नाही म्हणून आम्ही बादल दंडा इथेच राहण्याचा निर्णय घेतला. दुपारी जेवण घेई पर्यंत थंड वारे सुटले आणि समोरची डोंगर शिखरे ढगांच्या आड लपली.  कॅम्प वर ही ढगांचे आक्रमण झाले आणि सगळीकडे धुके भरले. बादल दंडा हे नाव या वातावरणाने सार्थ ठरवले. दाटणाऱ्या धुक्याबरोबरच हुडहुडी भरवणारी थंडी वाढली आणि आम्ही अंगावर अधिक गरम कपडे चढवून जाड पांघरुणात शिरणे पसंत केले. संध्याकाळी आकाश निवळले आणि संधी प्रकाश पसरू लागल्यावर तारकांनी दर्शन द्यायला सुरुवात केली. अष्टमी चा चंद्र आभाळात मध्यावर आला होता आणि बरोबर विरुद्ध दिशेत मच्छपुच्छरे शिखर चंद्र प्रकशात चमकू लागले. आभाळात आता तारकांची दाटी झाली. मंद प्रकाश असलेल्या आणि पुण्यातून कधीच न दिसणाऱ्या अनेक तारका आणि त्यांनी मांडलेली नव्हे तर माणसाने कल्पिलेली नक्षत्रे दिसू लागली. मकर राशीत ला शनी आणि मीन राशी जवळचा गुरू दोन्ही दिसलेच पण त्या दोन्ही राशी सह कुंभ रास सुद्धा ओळखू येईल इतकी स्पष्ट दिसू लागली. अद्भुत असे हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवले, कॅमेरा मात्र त्यासाठी तितका समर्थ ठरला नाही.

अच्युत वैद्य आमचे ट्रेकिंग मधले गुरू, त्यांनी 72व्या वर्षी हा ट्रेक केला. अत्यंत नेटाने 3200 मी पर्यंत चढाई केली. त्यांनी पुढे न येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हीं तिघांनी पहाटे  लवकर 3.30 का मार्डी बेस च्या दिशेने निघायचे असे  ठरवले. आमचा गाईड आणि पोर्टर आमच्या सोबत येणार होतेच.

1 नोव्हेंबर- पहाटे 2.45 चा गजर झाला आणि उठून तयारी केली. 3.30 ला मार्डी बेस ला जाण्यासाठी निघालो. अपेक्षित असलेली थंडी मीम्हणत होती. डोक्यावरच्या हेड लाईट ची बॅटरी थंडीमुळे किती वेळ तग धरेल हे सांगता येत नव्हते. हाय कॅम्प च्या दिशेला एल ई डी ची रांग हलताना दिसली. तिथे मुक्काम केलेले काही लोक लवकर उठून मार्डी बेस च्या दिशेने निघाले आहेत हे लक्षात आले. बादल दंडा ते हाय कॅम्प चढाई 300मी आणि अंतर सुमारे 2 किमी. वाट डोंगर रांगेवरून, सुरक्षित पण चढ आणि उताराची. अधून मधून दोन्ही हाताला उतार असलेली. सुदैवाने वारा सुटलेला नव्हता त्यामुळे थंडीची मात्रा वाढली नाही. हाय कॅम्प ला पोचायला आम्हाला 1 तास लागला. तिथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. हाय कॅम्प ते व्ह्यू पॉइंट अंगावर येणारा चढ होता. चांगल्या दगडी पायऱ्या आणि धोक्याच्या ठिकाणी चांगले रेलिंग लावल्यामुळे धोका तसा काहीच नसला तरी श्वास आणि पावले मोजत आम्ही चढाई करत होतो. वाटेत असलेल्या गवत आणि झुदुपंवरचे दव बिंदू गोठून गेलेले दिसले, अर्थात रात्री तापमान शून्याच्या खाली गेले असणार. फोटो घेण्यासाठी ग्लोवज मधून हात बाहेर काढला तरी थंडीने गारठा जाणवत होता. पहाटे 5.30 च्या सुमारास उजाडले आणि आमच्या उजव्या हाताच्या डोंगर रांगेमागुन सूर्याचे बिनीचे किरण डोकावूं लागले. आम्ही डोंगर रांगेच्या मागे होतो आणि तिथून अन्नपूर्णा रांग अजून दिसत नव्हती त्यामुळे फुफुसे अधिक फुलवण्याची धडपड करत थोडा वेग वाढवून अर्ध्या तासात लोअर व्ह्यू पॉइंट गाठला. तिथे पोचता पोचताच समोर अन्नपूर्णा साऊथ च्या माथ्यावर सुवर्ण किरणे पडली आणि त्यांनी माथ्याकडून पायथ्या कडे झरझर झेप घेत काही मिनिटात त्यांनी संपूर्ण शिखर उजळवून टाकले. अगदी काही क्षणात समोरची सर्व शिखरे सोनेरी रंगात उजळली. समोर व्ह्यू पॉइंट वर गर्दी झाली होती, सोनेरी सूर्योदय होताच तिथून लांबूनच जल्लोष ऐकू आला. चमचमणाऱ्या हिम शिखराचे जवळून दर्शन हे सर्वानाच आणि नेहमीच उत्साह आणि आनंद देणारे असते हा अनुभव पुन्हा एकदा घेतला.

पुढे निघालो. आमच्या जवळ उपलब्ध वेळेचे गणित पाहता 9 वाजता आम्हाला परत फिरावे लागणार होते.b8.15 च्या सुमारास व्ह्यू पॉइंट पाशी पोचलो. अन्नपूर्णे च्या संनिध्यात मस्तपैकी गरम आले घातलेला चहा घेतला. इथे चहा ची 3 ते 4 दुकाने आहेत. बाकी काही मिळत नाही, पण येणाऱ्या गिर्यारोहकांची सोय आणि त्यातून उत्पन्न. इतकी धडपड करून हा व्यवसाय करणाऱ्यांची कमाल वाटली. एक हेलिकॉप्टर आसपास सारखे घिरट्या घालत होते. कोणाचा तरी शोध सुरू होता. अधिक चौकशी करता असे समजले की मागच्या आठवड्यात एक पोलिश गिर्यारोहक इथे हरवला होता. त्याचा साथीदार खाली पोचला तेंव्हा त्याला माउंटन सिकनेस झाला होता. बहुदा गेलेल्या गिर्यारोहकाची मती उंचीमुळे भ्रष्ट होऊन तो भरकटला असावा, त्याचाच शोध ते हेलिकॉप्टर घेत होते. 2018 क्या फेब्रुवारी मध्ये एक डच गिर्यारोहक महिला इथून हरवली असल्याचा बोर्ड खाली पाहिला होता तो आठवला. उंचीमुळे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे असे अपघात होतात, त्यामुळे त्याची माहिती असणे आणि आपल्या तब्येती कडे लक्ष ठेवणे हे महत्वाचे. व्ह्यू पॉइंट पासून पुढे मार्डी शिखराकडे जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. शिखर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते, पण हिमालयात दिसणारी अंतरे चांगलीच फसवतात हा अनुभव आहे. व्ह्यू पॉइंट वरून पाहता अन्नपूर्णा साऊथ आणि हिंचुली शिखरे अन्नपूर्णा 1 (8091 मी) या मुख्य शिखराला झाकून टाकतात. पण अन्नपूर्णा साऊथ(7200मी), हींचुली, अन्नपूर्णा 4, गंगपूर्णा (7400मी) आणि मच्छपुच्छरे(6993मी) ही शिखरे फारच सुंदर दिसतात. पायथ्यापासून माथ्यापर्यंत 4500 ते 5000 मीटर्स उंच शिखराच्या या भव्यतेमुळे छाती दडपून जाते. अव्यक्ताचे भव्य रूप इथे व्यक्त झालेले दिसते.

नेपाली तरुणांचा एक ग्रुप इथे एकमेकांचे व्हिडिओ काढण्यात गुंतला होता. त्यांच्या दृष्टीने आम्ही म्हातारे अंकल इथे कामाचे नव्हतो! त्या खुणवणाऱ्या उंच शिखराच्या सांनिध्यात अर्धा तास राहून आम्ही परत फिरलो. सूर्य आता वर आला होता आणि त्याच्या बोचऱ्या उन्हामुळे थंडी कमी झाली होती. पाताळात नेतोय असे वाटायला लावणारा पायऱ्यांचा तीव्र उतार सावकाश उतरत हाय कॅम्प वर पोचायला एक तास लागला. हाय कॅम्प वरून सुरुवात करून पहाटेच व्ह्यू पॉइंट किंवा अजून पुढे गेलेले तरुणांचे घोळके एव्हाना उतरले होते आणि आपापले समान बांधून हाय कॅम्प सोडून खालच्या वाटेला लागले होते. आम्ही पहाटे 3.30 पासून बाहेर पडलो होतो आणि पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे हाय पॉइंट वर उदरभरण करून मग बादल दांडा चा रस्ता पकडला. एक तासाने बादल दांडा ला पोचलो तेव्हा वैद्य आवरून आमची वाट पाहत होते. पोचताच समान आवरून 1 वाजता अजून खाली जायला निघालो.

नेपाळ मध्ये बालपण गेलेला आणि पुण्यात अभियांत्रिकी चे शिक्षण घेऊन आता अमेरिकेत स्थायिक झालेला एक तरुण भेटला. त्याला आमचे मराठीत बोलणे जवळचे वाटले म्हणून त्याने ओळख काढली. नेपाली असूनही माझा हा पहिलाच ट्रेक आहे अशी डोळे मिचकावत त्याने कबुली दिली. आजच्या दिवशी हाय कॅम्प गाठण्याच्या बेताने येणारे गिर्यारोहक आता बादल दांडा पर्यंत पोचू लागले आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा तीच जंगलातील वाट, आता जास्त उतार आणि मधूनच चढ असलेली. झाडांमधून जिथे फट पडेल तिथून पुन्हा पुन्हा शिखरांकडे पाहण्याचा मोह आवरत नव्हता. संध्याकाळी 4 वाजता रेस्ट कॅम्प वर पोचलो. आज जवळपास 11 तास चालणे चढ उतार झाला होता आणि 18 किमी अंतर पार करून झाले होते. आज तिथे राहणारे ट्रेकर्स पोचून त्यांनी आधीच गेस्ट हाऊस भरले होते, मुश्किलीने एक खोली मिळाली. दिवाळी नंतर डिसेंबर च्या मध्यापर्यंत इथे ट्रेकिंग सिझन असतो. एकदा बर्फ पडायला सुरुवात झाली की हौशी ट्रेकर्स इकडे फिरकत नाहीत.आम्ही रेस्ट कॅम्प वर पोचलो तोवर समोरची शिखरे ढगात दडली. संध्याकाळी मात्र पुन्हा हवा उघडली आणि समोर मच्छपुच्छरे शिखर संध्याकाळच्या सोनेरी उन्हात न्हाऊन निघालेले दिसले. एक नेपाली 70 वर्षांचे आजोबा भेटले. ते भारतीय लष्करात कमांडो तुकडीत होते आणि पुण्याला आणि बेळगावला येऊन गेले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. नेपाळ मध्ये सगळीकडे चांगली प्रगती होताना दिसतेय आणि समृद्धी वाढताना दिसतेय हे माझे विधान त्यांना नुसतेच मान्य होते इतकेच नव्हे तर त्यांना समाधान देऊन गेलेले दिसले. देवराली हून आम्हाला पोखरा पर्यंत आणणारे जीपचालक भूपेंद्र कुमार सुद्धा भारतीय लष्करात 19 वर्षे सेवा बजावून परत नेपाळमध्ये स्थायिक झालेले. अनेक नेपाली तरुण भारतीय लष्कर, ब्रिटिश लष्कर आणि सिंगापूर चे पोलीस दल यात भरती होतात असे त्यांच्याकडून कळले. नुकत्याच जाहीर झालेल्या अग्निपथ योजनेबद्दल मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. 4 वर्षात भरती होऊन जरी पैसे मिळवले तरी भरती होणारा जवान ट्रेनिंग किती घेणार आणि सेवा किती बजावणार असा त्यांचा प्रश्न होता.

2 नोव्हेंबर ला सवयीने जाग पहाटे 5 लाच आली पण निवांतपणे आवरून 9 वाजता खाली उतरायला सुरुवात केली. शेवटचा टप्पा आम्ही जरा वेगळ्या रस्त्याने उतरलो, इथे फारशी गर्दी नव्हती. 1 च्या सुमारास देवराली ला पोचलो आणि पायपीट संपली.

नेपाळचा हा भाग ही गुरुंग जमातीची कर्मभूमी. त्यांचा वैशिष्टयपूर्ण पेहराव आहे. तिबेटी चिन्हे आणि पद्धतींचा प्रभाव इथे जवळ जवळ नाहीये. वाटेत गेस्ट हाऊसेस मध्ये स्थानिक गिधाडे यांचे संरक्षण संवर्धन करण्याविषयी काही माहिती लावलेली दिसली. इथला प्रत्येक माणूस इथल्या पर्यावरणावर संपूर्ण अवलंबून आहे याची जाणीव निर्माण करण्यासाठी होणारे हे प्रयत्न चांगले वाटले. ग्रेगोरियन आणि नेपाली कॅलेंडर एकत्र छापलेले बघायला मिळाले. नेपाली कालगणनेुसार महिन्यांची नावे आपल्या चंद्र महिन्यांची असतात. विक्रम संवत नुसार ते साल 2079 असे लिहितात तर वर्ष 14 एप्रिल ला सुरू होते आणि पहिला महिना वैशाख आणि शेवटचा चैत्र असे मानतात. नेपाली कॅलेंडर मध्ये दोन महिने 29 दिवसांचे तर 2 महिने 32 दिवसांचे आहेत असेही या कॅलेंडर चा अभ्यास करता लक्षात आले.

4 दिवसात सुमारे 50 किमी अंतर आणि 2500 मी च्या आसपास चढाई झाली. एकदाही पाऊस लागला नाही आणि अगदी स्वच्छ निरभ्र आकाश दिसले. रात्री अगणित ताऱ्यांशी दोस्ती करता आली. आतापर्यंतच्या अनुभवात पहिलाच असा ट्रेक जेव्हा सोबतीला खळ खळ नाद करत वाहणारी नदी सोबतीला नव्हती, मोठ्या संख्येने नेपाली तरुण तरुणी भेटले आणि तुलनेने कमी उंचिवरचा ट्रेक असूनही एका दिशेस दूरवर खोल नदीपात्र आणि शहरी दिवे दिसत राहिल्यामुळे आपण खूप उंचीवर आल्याचा भास होत राहिला. थोड्यात अवीट गोडी मिळवून देणारा हा फार छान ट्रेक रूट, पुन्हा एकदा यावे असे वाटायला लावणारा.

अच्युत वैद्य, राजेंद्र जोशी, निखील नानिवडेकर आणि मी अश्या चौघांनी हा ट्रेक पूर्ण केला.

विनायक आणि उज्जवलाताई देशपांडे, बाबा आणि मधुरीताई कुलकर्णी हे चौघे देवराली पर्यंत बरोबर होते, आमच्याबरोबर थोडे अंतर येऊन मग परत फिरले आणि देवरा ली, पोठाना, ऑस्ट्रेलियन कॅम्प असा कमी उंचीवरचा ट्रेक करून आम्हाला पुन्हा 3 तारखेला पोथानाला भेटले.

सत्यजित चितळे

पोखरा, 4 नोव्हेंबर 2022

 

 

 

 

गजान्त लक्ष्मी



 

सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात नाणे घाटाची सफर घडली. सुभाष कुचिक त्यावेळी आमच्या बरोबर होता. या परिसराचा जाणकार, अभ्यासक आणि नेचरॅलिस्ट असे तो काम करतो. नाणे घाट आणि तिथला परिसर याला अडीच हजार वर्षांचा ईतिहास आहे. सातवाहन कुळातील प्रबळ राणी नागणिका हिने हा घाट बांधला ज्यामधून प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण ते रोमन, रोमन व अरब देशांशी व्यापार होत असे असा उल्लेख आहे. एका चिनी प्रवाशाने लिहून ठेवलंय की एका दिवशी पन्नास हजाराच्या आसपास लोक या घाटातून आणि अर्थातच या परिसरातून ये जा करत असत इतका हा मार्ग समृद्ध होता. काळाच्या ओघात त्याचे महत्त्व संपले....इतके की 20व्या शतकात हा परिसर मागासलेला म्हणून गणला गेला आणि इथे कुपोषणाने मृत्यू झाले.

सुभाष ने याच भटकंती दरम्यान एक जुने शिल्प दाखवले. तीन बाजूंनी दगडांची मांडी इतक्या उंचीची भिंत घातलेले आणि वर अभाळकडे उघडे असलेले ते एक मंदिर होते. आत मध्ये सोनकी, तेरडा च्या दाटीत एक मूर्ती होती. दोहो बाजूंनी सोंड उंच करून सुवर्णाचा अभिषेक मध्ये बसलेल्या लक्ष्मी देवतेवर करणारी ती गजांत लक्ष्मी ची मूर्ती आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थिती असलेली ती मूर्ती पाहून मात्र मन विषण्ण झालं. सातवाहन काळात या ठिकाणी कदाचित वेस किंवा प्रवेशद्वार असावे आणि त्यांच्या वैभवाची निशाणी म्हणून ही मूर्ती इथे स्थापित केली असावी असा तर्क सुभाष ने मांडला. खरेही असेल.

तिथून एक विचार प्रवास सुरू झाला. समृद्धी, संपत्ती याची दर्शनीय खूण म्हणजे जो प्राणी सांभाळायला अती खर्चिक असा गज दारी झुलवणे! इतिहासात महत्वाकांक्षी राजे रजवाड्यांनी हे स्वप्न पाहिले, त्यासाठी रक्त सांडले, सांडवले, साम्राज्ये स्थापिली.

आहे वैभव मिळावे म्हणून गजांत लक्ष्मी ची मूर्ती स्थापिली की वैभव मिळाल्यावर ते टिकावे म्हणून स्थापिली हे मला न उलगडलेले एक कोडे. या विषयात थोडी शोधाशोध करता एक पौराणिक कथा वाचायला मिळाली. पांडवांना राज्य अभिलाषा होती, कोणा देवतेने त्यांना सांगितले की तुम्ही गजांत लक्ष्मी ची अर्चना करा म्हणजे समृद्धी येईल. मग त्यांना समजले की इंद्राचा ऐरावत हे गजांत लक्ष्मी चे प्रतीक आहे. तेव्हा पांडवांनी इंद्राला विनंती करून काही काळासाठी ऐरावत मिळवला आणि त्यामुळे इंद्रप्रस्थ ची भरभराट झाली ....कथेत असेही शेवटी म्हणल होत की केवळ ऐरावत आणून भागले नाही तर ही समृद्धी टिकवण्यासाठी पांडवांना महाभारत युद्ध करावेच लागले.

असा हा सकाम कर्मयोग सगळीकडे ऐकायला मिळतो आणि तोच खरा. नाणे घाटातील ती मूर्ती सकाम कर्मयोग विसरला की होणारी दैना पाहत दोन सहस्त्रे ऊन पाऊस झेलत हा कठोर सकाम कर्मयोग शिकवीत उभी आहे असे मला वाटून गेले.

सत्यजित चितळे

5 नोव्हेंबर 2022

इंद्र धनु चे दिवस

 

इंद्र धनु चे दिवस:

ज्येष्ठा चां शेवट यावा, सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश करावा आणि आभाळात भरून येणाऱ्या काळया ढगांची घनघोर लढाई पहावी, लखलखत्या विजांचा कल्लोळ आपल्याला गिळेल अशी भीती वाटत असताना सुद्धा हात पसरून आभाळाकडे पाहत पहिल्या पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाचा आनंद घ्यावा. आषाढातल्या संतत धारेत वाहणाऱ्या गढूळ पाण्यातून भटकंती करावी, नुकत्याच रुजू पाहणाऱ्या बीजांतील अंकुर डोकावताना पाहून मन सुखवावे, थोड्या दिवसांपूर्वी वैराण दिसणारी काळी भरड तपकिरी जमीन हिरवी चादर पांघरताना दिसावी, संतत धरेचा कंटाळा येण्या अगोदरच आभाळातून उन्हाचा एखादा कवडसा पडलेला पहावा आणि श्रावणाच्या चाहुलीने मन आनंदून जावे. मग हा ऊन पावसाचा खेळ काही दिवस पहावा,  भुरभुर पडणाऱ्या पावसाकडे उगवत्या किंवा मावळत्या सूर्याने तिरप्या नजरेने पहावे आणि आभाळात एक अद्भुत सप्तरंगी दृश्य दिसावे 'अहहा इंद्रधनु हे शब्द सहजच ओठी यावे, काही क्षणांपुरतेच दिसणारे इंद्र धनु इतके का मोहवून टाकते हा प्रश्न मात्र पडू नये हे एक विस्मयच.....

शुभ्र वाटणाऱ्या रंगाच्या किरणातला पाहिला भाग ताम्र वर्णाचा, स्वभावतः उष्ण, अधिक फ्रिकवेंसी आणि लहान तरंग लांबीचा, एखाद्या ठिकाणी पडेल तर वरवर जाळून टाकेल अशी क्षमता बाळगणारा, तापट स्वभावाचा आणि हात घालीन तिथे पाणी काढीन असा आवेश असलेला.

तांबड्या पासून उतरता ( कि चढता?) प्रवास सुरु होत नारिंगी- पिवळा- हिरवा- निळा – पारवा- जांभळा हा प्रवास दृश्य मानतेत शीतलतेकडे जाणारा. शेवटचा जांभळा रंग कमी फ्रिकवेन्सी आणि जास्त तरंग लांबीचा परंतु खोलवर परिणाम साधणारा. मधोमध येणारा रंग हिरवा, दोन्ही रंगांकडे समानतेने बघणारा, सृजनाचा आणि नव निर्मितीची क्षमता असलेला, संतुलन हा मूळ स्वभाव असलेला!

शुभ्र रंग किरणे प्रसवणाऱ्या सूर्याला पाण्याच्या एका छोट्याश्या थेंबाचा रूपाने असा लोलक हाती मिळावा ज्याने त्याच्याच किरणांचे हे स्वभाव आणि क्षमता वर्णपटावर मांडून दाखवाव्यात.

अश्या एखाद्या तूषाराकडे लोलक म्हणून पाहण्याची संधी आपल्याला मिळावी आणि त्यानं आपल्या स्वभाव क्षमता चे पृथक्करण करावे. त्यातून आजवरचा प्रवास असा वर्णपट मांडून पाहता यावा असे भाग्य नाही.  हा लोलक कोणत्या स्वरूपात हाती येईल आणि क्षणात नाहीसा होईल हे सांगता येत नाही.

प्रकाशाचा प्रत्येक किरण हा पांढरा असला तरी त्याचेही सात प्रमुख घटक इंद्रधनू मध्ये दिसतात. इथे प्रत्येक माणूस स्वभावत: वेगळाच! कल्पांत म्हणावा त्या क्षणी कोणी प्रश्न विचारावा ‘ कि तुझी नेमकी ओळख काय?- एका वाक्यात सांग” तर यातील कोणत्या एका रंग किंवा रंग छटेकडे बोट दाखवावे? आपल्याच इंद्र धनु च्या पटाकडे नजर टाकता असे वाटावे कि यातला प्रत्येक रंग हि माझी फक्त भूमिका होती ती माझी ओळख नव्हे! मग त्यातला समान रंग किंवा एखादी रंग छटा शोधीत जावे.... भौतिक शास्त्राच्या दृष्टीने असे काही मिळणारच नाही पण मानवी स्वभाव वैशिष्ट्य म्हणून असे काही हाती लागेलच.....तीच आपली खरी ओळख जी हे इंद्रधनू व्यापून उरलेली असते.

तांबड्या रंगाकडून जांभळ्या रंगाकडे प्रवास करताना मध्यावर असा एक लोलक हाती मिळाला, कदाचित हाच प्रकृतीचा नियम असेल.....परंतु त्याने मनात भरेल असे इंद्रधनु दाखवले हे मात्र खरे!

सत्यजित चितळे

4 नोव्हेंबर 2022


Tuesday, May 3, 2022

बा कांचना!

 


बा कांचना!

मला आठवत तीन वर्षापूर्वी तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझं वेगळेपण उठून दिसल होत. डोंगराच्या मध्यावरच्या खापरासारख्या फुटणार्या मुरमाड जमीन उतारावर एका अगदी छोट्याश्या सपाटीवर कोणी अनामिकान तुझं इवलस रोप चांगला खड्डा घेऊन माती भरून लावल होत. तो अनामिक असला तरी मोठ्या मनाचा आहे नक्कीच कारण त्यान तिथे स्वत:च नाव लावल नाही ‘ झाडांना पाणी द्या इतकाच लाल-हिरव्या रंगाचा फलक लावला. तुझ्या ईवल्याश्या जीवाच्या दोन काड्या, सुमारे फुटभर उंचीच्या आणि त्यावर फुटलेली सात आठ द्विद्लासारखी पाने तुझे कांचन हे नाव ओळखू यायला पुरेशी होती.

वास्तविक अश्या मुरमाड उतारावर काहीच उगवू नये, उगवली तर करवंद, घाणेरीची रोप, पावसाळ्यात उगवणारी मिकी माउस, सोनकी ची रोपटी किंवा जिथे तिथे पसरत जाणारे कोसमोस चे गवत. अश्या या परिसरात तुझे दिसणे हे अर्थातच वेगळे होते.

त्या दिवसानंतर अगदी आठवड्यातच या रुक्ष आणि कोरड्या वातावरणात तुझ्या अंगावरची हिरवी पान वाळून गळून गेली. आज तीन वर्षांनी तर ती पाणी द्या म्हणणारी खुणेची पाटीसुद्धा उडून गेलीय, उरलाय तो दोरा जयान तुझ्या शरीराच्या दोन काड्या अजूनही एकत्र बांधून ठेवल्या आहेत. कोणत्या तरी चांगल्याश्या नर्सरीतून अचानक इथे अश्या उतारावर, मुरमाड जमिनीत तू आलास, तुला खूप एकट वाटलं असेल नाही? आसपासच्या करवंदाच्या जून झालेल्या पीळवटलेल्या फांदीवरल्या टवटवीत हिरव्या पानांना तुझे असे आकारण वाळणे हा गमतीचा भाग वाटला असेल नाही? वसंतात येणाऱ्या करवंदाच्या पांढऱ्या चांदणी सारख्या फुलांनी मंद सुवास पसरवत तुझ्या निष्पर्ण देहाची चेष्टाच केली असेल नाही? त्यांना तू सांगूही शकला नसशील कि तुझी गुलाबी फुले किती सुंदर दिसतात ते! अर्थात तू सांगितले असतेस तरी तुझ्या एवढ्याश्या देहावरून आणि सुकून गेलेल्या फांदीवरून कोणी त्यावर विश्वास कसा ठेवावा ? हफ्त्या दर हफ्त्यात आठवणीने थांबून तुला पाणी देणाऱ्या सहृदय माणसांकडे पाहून हि करवंदी, घाणेरी ची झुडपं कडाकडा बोट मोडत असतील नाही!

पावसाच्या आगमनापूर्वी येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला मात्र तू काही अटकाव केला नसशील. त्याच्या वाटे आडवे घालायला तुझा पर्णसंभार मुळात होता तरी कुठे ?मुसळधार पावसात उतरंडीवरून वाहणारे गढूळ ओहोळ तुझ्या भोवतीच्या मातीत भोवरा करून थोडी माती घेऊन पळाले असतील तेही तू पाहिले असशील, अर्थात तुझ्या असण्याची त्यांनी दखल घ्यावी इतके तुझे असणे नजरेत भरणारे उरलेच नव्हते म्हणूनही असेल. पण त्यातून निर्मिलेल्या खड्यांतून पाणी खोलवर दगडात झिरपायला मदत होतेय हे पाहून आणि समजून तू नक्कीच आनंदला असशील ना?  खरच सांग रे या दिवसात तू पुढच्या कोरड्या हिवाळ्यासाठी आणि तप्त कोरड्या उन्हाळ्यासाठी भरभरून पाणी भरून ठेवलेस का रे?

आसपास वाढणाऱ्या गवतातून तुझे असणे लपून गेले त्या दिवसात, तुला म्हणून घातलेल्या सुपीक काळ्या मातीतले जीवनसत्व थोडे थोडे त्या उपटसुंभ गवतानेच वाटून खाल्ले तुझी खिल्ली उडवत खरंय ना?

फाल्गुनाच्या सरत्या दिवसात कुठून तरी उडत आलेल्या एका ठिणगीने डोंगर उतारावर वाळलेल्या गवताच्या पात्याच्या घास घेतला आणि उतारावर वणवा लागला. वणव्याच्या आगीची रेष अगदी तुझ्यापर्यंत येऊन पोचली तेव्हा तू होरपळलास का रे? त्याच्या असह्य धगीमुळे सैरावैरा पळणारे कृमी कीटक आणि प्राणी यांची घालमेल तू बघितलीस का रे? त्या धगीतून तू वाचलास का नाही हे पाहायला आलेल्या तुझ्या चाहत्यांनी तुझे खुरटलेले काटकुळे अंग मोडून पहायचा प्रयत्न केला तेव्हा ‘ मी आहे जिवंत अजून हे तू ओरडून सांगितलेस का रे?

गेल्या वर्षी माणसाच्या जगात थोडा गोंधळ झाला, बराच काळ तुला भेटायला, घोट दोन घोट पाणी द्यायला कोणी आले नसेल तेव्हा आपण एकटेच पडलो असे तुला वाटले नसेल का रे?

दोन वर्षे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केवळ दोन काटक्यासारख्या शरीराने तू टिकून राहिलास, तुझे इथे असणे बहुतेकांनी नाकारलेच. पावसाळ्यात झाड-झाडोरा उगवतो  आणि वाळून जाऊन पुन्हा येतो त्याची गणती कशाला? याच न्यायान कोणी तुझ्याकडे लक्षही दिले नाही.अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे.....हेच खरे! हप्त्या हप्त्यान तुला थोड थोडं पाणी देणारे गडकरी जीव मात्र कणव करत तुला भेटत राहिले, तुझ्या पुनरागमनाची इच्छा उराशी बाळगत.

बा कांचना या वर्षी मात्र एप्रिलच्या सरत्या आठवड्यात तेव्हा तुझ्या मुळाशी जर्द हिरव्या रंगाचा कोंब मोठ्या उत्साहाने आभाळाकडे डोकावताना दिसला हे पाहून जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय ठरला. जगण्याची, फुलण्याची आणि बहरण्याची असामान्य असलेली इतकी उर्मी आणि ऊर्जा तू तुझ्या इतक्या छोट्या देहात साठवून ठेवलीस तरी कुठे? हळू हळू तापणारि उन्हे, तरीही पहाटे गार असणारा शीतल वारा, रात्रीच्या गडद अंधारात आपल्याशीच कुजबूज करणाऱ्या असंख्य तारका, मधूनच येणारी वार्याची झुळूक आणि उंचावरून तरंगत जाणारे थोडेसे ढग, त्यातून पडणारा थोडासा शिडकावा यांनी तुला वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी दिली असेल. पण नवनिर्मिती करण्याची उमेद तुला देणारा कोणी दुसराच होता नक्कीच! तुला आठवणीने पाण्याचे दोन घोट आठवड्यात देऊन जाणाऱ्या आमच्या सारख्या गडकर्‍यांमधला ‘माझ्यामुळे हा अभिनिवेश मात्र तू या एकाच उर्मीने पुसून टाकलास.

गिर्यारोहण म्हणजे आपला व्यायाम आणि आनंद या एकाच स्वार्थी आयामाच्या पलीकडे जाऊन त्याला एक वेगळा आयाम देणाऱ्या बा कांचना आता इच्छा आहे तुला छान बहरलेला पाहण्याची. तो पर्यंत आणि त्यानंतरही भेटत राहूच.

सत्यजित चितळे

२ मे २०२२

 

तोरणा - राजगड ट्रेक- डिसेम्बर २०२१

 

तोरण्याच्या तीव्र उतार संपून आपण रिज वर येतो आणि मागे अवाढव्य पसरलेला तोरण्याच्या विस्तार परत परत वळून बघत राजगडाकडे मार्गस्थ होतो. गांडुळे आणि कृमींच्या घरट्याच्या  रूपाने भुसभुशीत झालेली माती उघड्या डोंगरावर दिसत असते. मग जंगलाचा भाग सुरु होतो. बुधला माची सोडल्यावर सुमारे एक सव्वा तासाने जंगलातून वाट कचरे यांच्या घरासमोर प्रकटते. स्वप्नात असावे असे उतरत्या छपरांचे घर. समोर सरावलेले अंगण, पाच पंचवीस कोंबड्या, गाई-गुरे. इथे क्षणभर विश्रांती, चहा, सरबत, टाक घ्यावे. कचरे दादा मग अभिप्रायांची एक वही समोर टाकतात. या वाटेन पाय पीट केलेल्या भटक्यांनी त्यांच्या अनुभवांची कथा त्यात थोडक्या शब्दात लिहिलेली असते. लॉईड्स रजिस्टर ऑफ शिपिंग ची सुरुवात लंडन मध्ये अश्याच एका रजिस्टर पासून सुरु झाली असे म्हणतात. न जाणो, ट्रेकिंग च्या विश्वात असे कचरे दादांचे रजिस्टर पुढे नावारूपाला येईल म्हणून आपला अभिप्राय नावासहित तिथे नोंदवण्याचा कार्यक्रम होईपर्यंत समोर ताक/चहा आलेला असतो. शनिवार-रविवार या मार्गाने भटके लोक जास्त, त्यातला एखादा ग्रुप इथे भेटतो. कोणाला अभिनिवेश असतो आपल्या फिटनेस चा तर कोणी निसर्गाचा आस्वाद घेत निवांतपणे जाणारा.

कचरे काकांचे घर मागे सोडून निघालो कि तासाभरात जंगलात स्वच्छ सरावलेली एक मोकळी जागा येते. सुमारे २० बाय २० या जागेवर उंच झाडांनी सावली धरलेली आहे. दक्षिणेच्या बाजूला मांडलेले पाच-सहा शेंदूर फसलेले दगड इथल्या स्थानिकांची श्रद्धास्थानं, तिथे शिरतानाच वाटेत एक चिमुरडी हातातल्या पेल्यात लिंबू सरबत घेऊन उभी असते, तिच्या मागून तिची आजी असते. ‘ दादा भवानी करा, आज इथून लोक गेले पण कुणीच काही घेतले नाही असे आर्जव आजी करते. यातले काहीच त्या चिमुरडीला कळत नसते. नवखा भटका माणूस या आवाहनाला भुलून जायचा. पण हे इथले एक स्टॅनडर्ड सेलिंग स्टेटमेंट आहे हे एक दोन वेळेला गेल्यावर समजते. कमाई च प्रमुख साधन शेती, आणि पर्यटन हा जोड धंदा. पोटापुरते मिळते इतकेच काय ते. सरबत घ्यायची आपली इच्छा नसते, मग थोड थांबून पाठीवरच्या पिशवीतून गुळाच्या पोळ्यांचे एक पाकीट काढून मी त्या चिमुरडीच्या हातात ठेवतो. ती ते घेते आणि हातातल्या सरबताच्या ग्लासचे आता काय करायचे म्हणून सूचने साठी आजीकडे पाहते. जगण्यासाठी खाणे आवश्यक आहेच पण व्यवहारात पैसा लागतोच, त्यामुळे काही तरी विकले पाहिजे आणि पैसे आले पाहिजेत हे त्या आजीला अनुभवाने माहित असते त्यामुळे ती सरबत विकत घ्याच असा आग्रह करतेच. तो टाळून पुढे निघतो.

उशिरापर्यंत पडत राहिलेल्या पावसाने या वर्षी जमिनीत ओल धरून ठेवलेली दिसते. दोन्ही बाजूंनी वाढलेल्या कारवीच्या जंगलातून चालताना दोन्ही खांद्यांना झुडूपं घासत जातात. हातातल्या काठीचा फटका दिला तरी हि झुडूप आडवी होत नाहीत इतकी ओल या लांबलेल्या पावसानं त्यांच्यात टिकवून ठेवलेली आहे.  फुललेल्या रानफुलांच्या झुपक्यातून शांतपणे मध गोळा करणाऱ्या मधमाश्या आपल्या हालचालीमुळे त्रासून उडतात आणि कानाजवळून गुंजारव करत दूर पळतात. या जंगलात एखादा वन्यप्राणी आपल्याकडे रोखून बघतो आहे, शांत, निश्चल, स्तब्ध असा भास होतो, नव्हे ते वास्तवही असू शकते. पायाखाली एखादे सरपटणारे जनावर येत नाही हे पाहत पावल पडत राहतात.

भुतोंडे गावाचा रस्ता यायच्या आधी धनगराचे एक घरटे लागते. चौकोनी जोते, त्यावर चार-पाच फूट उंचीच्या चुना दगडात बांधलेल्या भिंती, बरोबर मधून उंच वर गेलेला खांब आणि त्यावरून भिंतींच्या कोपर्‍याकडे आलेल्या तूळया. त्याला बांधलेले वासे आणि वर घातलेले पत्रे. बरेच जुने झालेले पत्रे गंजून चंद्रमौळी झालेले. अर्ध्या भागातले तर उडूनच गेलेले. या मार्गाने आधी दोनदा गेलो तेव्हा इथे वस्ती दिसली नाही. आजही नव्हती. भिंतींचा काही भाग ढासळलेला दिसला. समोरच्या दाराच्या जीर्ण चौकटीतून आत डोकावलो तर एक चूल आणि त्यात एका ओंडक्याची झालेली राख दिसली, घराचे जोतेही झडलेले दिसले, म्हणजे वावर आहे पण वस्ती नाही. या वस्तूला घर म्हणावे का घरटे? पक्षी घरटे बांधतात, तात्पुरते.... माणसाला त्याच्या आयुष्यात आधीच असलेल्या आणि नंतर त्याने बनवलेल्या स्थावर वस्तूंना काळ जोडता येतो तसा त्यांना जोडता येत नाही. भूत काळात किंवा भविष्यकाळात जाण्याचे टाईम मशीन अस्तित्वात नाही हे खोटे आहे, माणसाचे मन हेच असे टाईम मशीन आहे, त्यामुळेच त्यान बांधलेल्या घरट्याला तो पक्के आणि कायमचे ‘घर’ म्हणतो बहुतेक.

पुढे भुतोंडे खिंड आणि मग एक टेकडी ओलांडून येणारा तीव्र घसार्याचा चढ चढून संजीवनी माचीवर प्रवेश होतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे बांधकाम. इथला चिरा अन चिरा त्या काळातल्या वैभवाचा  साक्षीदार आहे. इथल्या जोत्या जोत्यावर त्या वर्तमानात पराक्रम गाजवलेल्या लोकांची पावले पडलेली आहेत. पद्मावती माचीवर प्रवेशताना समोर सदर आणि वाड्याचे अवशेष दिसतात. शिवराय आणि जिजाऊ यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली हि जागा पाहताना अंगावर रोमांच उभे राहते. शिवरायांची त्यावेळी राहण्याची नेमकी जागा, अर्थात, त्यांचे ‘ घर कुठे होते, कसे होते हे आज कोणालाच माहित नाही. काळाच्या विस्तीर्ण पट्ट्यावर घर का घरटे हा विचार मनात पुन्हा डोकावतो. पद्मावरतीच्या मावळतीच्या अंगाला चुन्याचा डोंगर दिसतो, आणि डीझेल इंजिनवर चालणाऱ्या लिफ्टने बांधकाम साहित्य वर आलेले आणि दुर्ग संवर्धनाचे काम सुरु असलेले दिसते. नवीन बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेवर एक ग्रुप भेटतो. त्यातली एक धीट चिमुरडी शिवरायांनि  सुरतच्या सुभेदाराच्या सुनेचा केलेल्या सन्मानाची कथा ठसक्यात म्हणून दाखवते आणि आमच्यासहित सर्व उपस्थितांच्या टाळ्या घेते. गेल्या पंचवीस वर्षात इथे खूप बदल झालाय. पद्मावरतीच्या तळयात आता उगाच उतरायला बंदी आहे. एके काळी डबके झालेल्या या टाक्याला आता चांगल्या तलावाचे रूप त्यामुळे आलेले आहे. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या कि इकडे तिकडे टाकू नका परत द्या असे इथला विक्री करणारा तरुण मुलगा सांगतो हि जाण पोचलीय. अर्थात प्लास्टिकचा हा कचरा खालपर्यंत नेण्याची, किंवा इथेच नष्ट करण्याची प्रक्रिया इथे नाही त्यामुळे तो फक्त तटावरून खाली लोटला जातोय हे दुर्दैव. पण चला एक पाउल पुढे पडलेय.  दुर्ग संवर्धन चांगल्या प्रकारे होतय. आता अनेक लोक पर्यटनासाठी येतात, इथे घडलेला इतिहास ऐकून, पाहून प्रेरणा घेतात. काही ट्रेकिंग ग्रुप तंबू टाकून राहिलेले असतात. उत्साही तरुण शिवरायांसाठी दाढी राखून, खांद्यावर भगवे झेंडे घेऊन फिरताना दिसतात.

इतिहास जसा सांगावा तसा पोचतो. राजगड उतरताना महाविद्यालयीन तरूण-तरुणींचा एक ग्रुप भेटतो. नट्टा पट्टा केलेल्या तरुणी आणि डोळ्यावर काळे गोगल घातलेले हिंदी-मराठी-इंग्लिश बोलणारा तो ग्रुप इथे कुठे आलाय असा प्रश्न पडून जातो. त्यांच्यातल्या म्होरक्या ‘ बस अब दस मिनिट असे म्हणून इतरांना रेटत असतो. ‘ तू लवकर वर पोचलास तर संभाजी ( महाराज) त्यांची तलवार देणार नाहीत तुला असे त्याचा मित्र त्याला म्हणतो त्यावरून यांच्या पर्यंत काय इतिहास पोचलाय ते कळते.  स्थानिकांना मात्र या इतिहास  पर्यटनातून रोजगार/ उत्पन्न मिळते आणि त्यांचे ‘घर चालते हा मात्र आजचा वर्तमान आहे!

सत्यजित चितळे,

तोरणा-राजगड ट्रेक १८ डिसेम्बर २०२१