Wednesday, September 29, 2021

बुढेरा - गंगोत्री परिसरातील आठवण मे २०१७

 

गंगोत्रीची मंदिर शुभ्र अश्या सांगमरावरी दगडाने बांधलेले आहे. मंदिराच्या चारही बाजूच्या सज्जयांवर पितळेच्या चकाकता पत्र लावला आहे. भगिरथीच्या पात्रात वाहून आलेल्या शुभ्र धवल दगड गोट्यातून आणि मागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित सुदर्शन शिखरातून हे मंदिर खरे तर उठून दिसत नाही. राजा रणजितसिंहाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे इतिहासाला ज्ञात आहे. गंगेची मूर्ती पूर्वाभिमुख असून तिच्या डाव्या हातात सुवर्ण कलश आहे आणि उजवा हात आश्वस्त वचनात आहे. मूर्तीच्या बरोबर समोर विस्तीर्ण म्हणता येईल अशा पटांगणाच्या शेवटी एक दिव्याचा खांब आहे आणि त्याच्या पायथ्याशी न टी पी सी तर्फे गंगावतारणाचा देखावा उभारण्यात आलाय. भागीरथी च्या खोऱ्यात लोहारीनाग पाला येथे जलविद्युत प्रकल्प उभा करण्यात आलाय त्या प्रकल्पाअंतर्गत रस्ते सुधारणा , विविध माहिती फलक इन टी पी सी तर्फे उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग हा आहे. या देखाव्याच्या बाजूला अग्निहोत्रासाठी एक बंद खोली आहे. सहज लक्ष गेलं तेंव्हा त्या खोलीच्या भिंतीवर एक नवीनच घोषणा वाचायला मिळाली ज्याने माझं कुतूहल चाळवलं गेलं "हमे गर्व है  हम बुढेरे है।  गर्व से कहो हम बुढेरे है।" यामधील बुढेरे या शब्दाचा  अर्थ काही ध्यानात येईना. या घोषणेने माझ्या मनात घर केले. सम्पूर्ण ट्रेक च्या मार्गावर मनात मागे याचा विचार चालूच राहिला. परतीच्या मार्गावर मात्र ठरवून सौरभ म्हणजे आमच्या गाईडला गाठले आणि त्याला हा प्रश्न केला. त्याच्याकडून मिळालेला खुलासा मात्र अधिकच अस्वस्थ करून गेला. भागीरथी च्या खोऱ्यात उगमाजवळ हर्षिल हे एक टुमदार गाव आहे. त्याच्या जवळील सात गावांच्या टापुला 'उपली टोप' असे स्थानिक संबोधन आहे. इथे राहणारे जे लोक आहेत त्यांना बुढेरे असे म्हणतात. हर्षिल च्या खालच्या बाजूस आणि भगिरथीच्या खोऱ्यात राहणाऱ्यांना गंगाणी म्हणतात असे त्याने सांगितले. बुढेरे या शब्दाचा अभिनिवेश का असा प्रश्न मी पुढे केला, सौरभ हा बुढेरा असल्याने त्याची छाती अभिमानाने फुलून आली. बुढेरा म्हणजे बुद्धीने मोठा आणि त्यांची बोली सुद्धा अधिकार वाणी असलेली खडी असते आणि ते इतर गढवाली लोकांच्यात उठून दिसतात, राहतात हे त्यामागचे करण आहे असे त्याने सांगितले. गूगल ने बुढेरे या शब्दाचा खुलासा अगदी सहज केला, त्यावरून समजले की बुढेरे हा बुद्धेरे या शब्दाचा अपभ्रंश असावा आणि मग ही शब्द- अर्थाची साखळी उलगडली.

भागीरथी अर्थात गंगा नदीचे भारतीय संस्कृती मधील स्थान अनन्यसाधारण आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार धाम यात्रा करण्यासाठी संपूर्ण भारत वर्षातून भाविक, यात्रेकरू येतात. गंगोत्री धाम मध्ये राहताना जवळ जवळ सर्व भारतीय भाषा बोलणारे लोक आम्हला बघायला मिळाले. भाविकांना परमेश्वर आपला वाटतो आणि तो फक्त आपलाच असावा असा मानुष्यसुलभ अधिकार स्वभाव इथेही बघायला मिळाला. वास्तविक हिमालयाची भव्यता पाहून मी पणा गळून जायला हवा , पण अनेकांच्या आयुष्यात हा पुण्यप्रभाव पडताना दिसत नाही. त्यातून जिथे संस्था उभी राहते तिथे अधिकारवाद हा स्वाभाविकपणे येतोच आणि त्या मागचा कार्यकारण भाव ना समजता पुढे त्याचे अवडंबर माजते हे अश्या तीर्थक्षेत्री सुद्धा बघायला मिळते ही गम्मत आहे.

गंगोत्री हुन पुढे निघालो की 2.5 किमी अंतर चालून गेल्यावर कनखू या ठिकाणी चेक पोस्ट लागते. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क मध्ये इथून प्रवेश होतो. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी इथून पुढे जाणाऱ्या पर्यटक, भाविक आणि गिर्यारोहकांच्या संख्येवर बंधन घालण्यात आले आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसते. इथे एक आश्रम आणि श्रीराम मंदिर आहे, नुकतेच बांधलेले असावे. चेक पोस्ट वर आपल्या जवळील सामान, तंबू प्लास्टिक च्या पिशव्या इत्यादी सर्वांची माहिती द्यावी लागते. ट्रेकिंग चे परमिट आणि माहिती ही अगोदरच द्यायची असते. आपण ट्रेकिंग करताना जमा होणारा कचरा परत आणून चेक पोस्ट वर दाखवावा लागतो. तसे गोमुख पर्यंत मार्गावर ठीक ठिकाणी कचरा पेट्या ठेवल्या आहेत आणि त्या साफ होताना दिसतात. पर्यावरणाच्या दृष्टीने इथून पूढे आग पेटवण्यास बंदी आहे त्यामुळे स्वयंपाक फक्त रॉकेल च्या स्टोव्ह वरच करावा लागतो आणि थंडी वाजली तर शेकोटी चा सहारा घेता येत नाही, ती सहनच करावी लागते.

एक खटकणारी गोष्ट इतकीच की या राष्ट्रीय उद्यानात कोणत्याही प्रकारच्या आपत्ती मध्ये कोणतीही सरकारी मदत उपलब्ध नाही आणि माहिती म्हणून ही गोष्ट या चेक पोस्ट वर आवर्जून सांगितली गेली. दुर्गमता आणि त्यातील धोका हा जोवर माहीत नसतो तो वर अश्या प्रकारच्या सूचना खऱ्या अर्थाने 'कळत' नाहीत. निसर्गाच्या अगदी जवळ गेल्यावर आणि त्याचा लहरीपणा अनुभवल्यावर मात्र या सूचनांचा अर्थ कळतो. गिर्यारोहण आणि पदभ्रमण हे छंद स्वतःच्या जाणिवा अधिक समृद्ध करण्यासाठी अश्याप्रकारे उपयुक्त ठरतात.

या नॅशनल पार्क मध्ये आधी आलो होतो तेंव्हा थोड्या थोड्या अंतरावर चहा, कॉफी चे स्टॉल्स आणि राहण्यासाठी तंबूवजा आडोसे दिसले होते. आता संख्येवर असलेल्या आणि कचरा करण्यावर असलेल्या बंधनामुळे हे स्टॉल्स बंद झाले आहेत. गंगोत्री पासून 9 की मी पायपीट केल्यावर आणि सुमारे 1000 फूट चढून गेल्यावर चिडवास नावाचा कॅम्प लागतो. इथे एक असा स्टॉल लागतो. आणि मग पुढे आणखी 5 किमी गेल्यावर भोजवास इथे गढवाल निगमचे हॉटेल. भोजवास ला निर्मल बाबांचा आश्रमही आहे. त्या व्यतिरिक्त गंगोत्रीच्या पुढे राहण्याची कोणतीही सोय नाही.

गंगोत्रीतून पुढे निघाल्यावर नदीच्या काठाकाठाने रस्ता जातो. डावीकडच्या डोंगर रांगेचा उतार जिथे तीव्र आहे तिथे हा रस्ता खोदून आणि बांधून काढलेला आहे तर जिथे हा उतार सखल आहे तिथे ती सहज पायवाट बनली आहे. चीड, देवदार, पाईन चे वृक्ष वाटेवर सावली देत आणि त्यांच्या झरोक्यातून दिसणाऱ्या हिमशिखरांची गम्मत वाढवत उभे आहेत. जंगल म्हणावे इतकी दाट झाडी नसली तरी वन म्हणता येईल इतका प्रसन्न झाडोरा इथे आहे. कनखू जवळ येत येता गंगोत्री चे दर्शन दुर्लभ होत जाते आणि चिडवास च्या जवळ येता येता कनखू च्या राम मंदिराचा कळस दिसेनासा होतो. गंगोत्री ते चिडवास या अंतरात भागीरथी उजवीकडे, अर्थात दक्षिणेकडे वळण घेते आणि मग चिडवास येता येता उजव्या बाजूस वर मंदा शिखर दर्शन देऊ लागते. चिडवास ही एक कॅम्प साईट आहे आणि इथे चीड च्या झाडांचे अक्षरशः जंगल आहे. चिडवास ला पोहोचता पोहोचता मागे नजर टाकली की दूरवर भागीरथी शिखराचे दर्शन होते आणि या पुढचा सर्व प्रवास हा त्यांच्याच बॅक ड्रॉप वर होत राहतो.

चिडवास ते भोजवास हा टप्पा 5 किमी चा.इथे चढ जाणवायला लागतो.आधीच 9 किमी पायपीट झालेलीच असते आणि घड्याळात मध्यान्ह होत असते. हिमालयातील हवामान दुपारी बदलायला सुरुवात होते आणि आपले नशीब जर खराब असेल तर या मार्गावर ती वेळ इथेच येऊन ठेपते. मग इथून पुढे थोडे लक्ष पायवाटेकडे, थोडे आभाळाकडे, वाऱ्याने उडणारा पोंचो किंवा फडफडणारे जॅकेट सांभाळत आणि सतत दूरवरचा दिसणारे भागीरथी शिखर बघत चालत राहायचे. भोजवासच्या आधी साधारण एक किमी अंतराचा रॉक फॉल एरिया आहे. काही वर्षांपूर्वी इथला रस्ताच ढासळून गेला होता. इथला परिसर म्हणजे दगडा मातीचे उंचच उंच ढिगारे रचल्यासारखा. कधीही वरून छोटे मोठे दगड सुटतात आणि नदीच्या ओढीने पात्राकडे झेपावतात. त्यांच्या मध्ये यायचे नाही कारण तुमचा कपाळमोक्ष त्या दगडावर लिहिलेला असू शकतो. पाऊस पडताना हा धोका अधिक त्यामुळे वर बघत बघत दबकत हा टप्पा ओलांडावा लागतो. या परिसरात डोंगरी बिळातून राहणारे उंदीर आणि अगदी तळहातावर मावतील इतके छोटे गोंडस ससे दिसतात. ते माणसाला घाबरून पळाले तरी त्यांच्या हालचालीमुळे दगड सुटतात आणि त्यानेसुद्धा कपाळ मोक्ष होऊ शकतो. गोमुख हुन पुढे नंदनवन ला जाताना असाच एक भाग लागतो. आम्ही तिथून जात असताना असाच एक दगड वरून आमच्या दिशेने आला होता. पण त्याचा मार्ग अमच्याहून वेगळा होता आणि मग आमची भेट टळली. अर्थात आम्ही परतून भोजवासला आलो तेंव्हा असा एक अपघात झालेला पेशंट आम्हाला भोजवासला बघायला मिळाला. होत असं केम्व्हा केम्व्हा अशी आमच्या गाईडची त्यावर प्रतिक्रिया होती. आज तिथून सुखरूप परत आल्यावर ही प्रतिक्रिया मीही देऊ शकतो!

हा टप्पा ओलांडून मग पुढच्या वळणावर मात्र डोळ्याचे पारणे फिटते. इतका वेळ अरुंद असलेले भगिरथीचे पात्र आता बऱ्यापैकी रुंद झालेले दिसते आणि नजरेच्या एकाच टप्प्यात समोर भागीरथी शिखरे आणि त्यांच्या पायथ्याशी असलेली भागीरथी हिमनदी, त्यापुढून येणारी भागीरथी नदी दिसू लागते. खालच्या बाजूला भोजवास ची कॅम्प ची सखल सपाट जागा आणि उजव्या बाजूने खळखळाट करत वाहणारी भागीरथी नदी, डावीकडच्या डोंगररांगेवरून गोमुख कडे जाणारी पायवाटेची रेघ आणि उजवीकडच्या डोंगर रंगेमागून डोकावणारे भृगुपंथ शिखर असा हा सुंदर देखावा बघताना किती वेळ जाईल सांगता येत नाही. जाणकार माणूस बरोबर असेल तर इथून समोर गोमुख दिसू शकते. पहिल्या दिवसाची पायपीट आता संपत आली असते आणि मग पाय आपसूक भोजवास कॅम्प कडे वळतात. इथे भोजखर ची झाडे जास्त प्रमाणात आहेत म्हणून त्याचे नाव भोजवास. भोजवासची उंची समुद्रसपाटीपासून 12400 फूट आहे आणि या उंचीवर मोठी झाडे तग धरू शकत नाहीत. इथे पोचता पोचता हे लक्षात येते की चीड, देवदारचे वृक्ष आता मागे राहिले आहेत आणि झाडांची उंची आणि घेर कमी कमी होऊ लागले आहेत. भोजवासच्या पुढे उंच झाडे नाहीतच, छोटी झुडुपे तेव्हढी दिसतात.

भोजवास ला त्या दिवशी (16 मे 2017) पोचलो तेंव्हा आभाळ भरून आलेले होते.वाटेवर थोडा पाऊसही पडला. गार आणि जोराचा वारा सुरू झाला होता. आमचे पोर्टर यायला वेळ लागणार होता म्हणून थोडा वेळासाठी निर्मल बाबांच्या आश्रमात आसरा घेतला. तासा दोन तासाने आमचे पोर्टर पोचले आणि त्यांनी तंबू उभे केले. संध्याकाळी आभाळ भरलेलेच होते आणि थोडासा पाऊसही पडला. रात्री ढग पांगले आणि चांदण्यांनी भरलेले आकाश आमच्या भेटीला आले. नेहमी ओळखीची नक्षत्रेसुद्धा अश्या वेळेस लपून राहतात आणि पटकन दिसत नाहीत. आभाळ मोकळ झालं की रात्री कमालीची थंडी पडतेच! पहाटे उठलो तेंव्हा तंबूवर रात्री पडलेल्या पावसाचे थेंब गोठून गेले होते. अश्या थंडीत तंबूत राहण्याचा, स्लीपिंग बॅगच्या पोतडीत कोंबून झोपण्याचा अनुभव मजेशीर असतो. नुसत्या आठवणीने अंगावर शहारा येईल इतकी गम्मत त्यात साठवली असते.

अर्थात अश्या मोकळ्या आणि हूडहुडणार्या रात्रीनंतर रम्य पहाट आपली वाट पाहत असते. आसपासच्या हिम शिखरांवर उगवत्या सूर्याचे पाहिले तांबूस सोनेरी किरण विलोभनीय दिसतात. साक्षात कनकस्पर्श तो, काही क्षणांपुरताच. थंडीत हवं हवस वाटणार ऊन मग झपाट्याने शिखर उतरून कॅम्पवर येतं आणि मग ऊर्जेचा  एक वेगळाच संचार नखशिखातून होतो. बहुतेक वेळा असा उन्हाचा तडका मिळाल्याशिवाय त्या दिवशीचा कार्यक्रम सुरू होत नाही.

भोजवास हुन गोमुख चा टप्पा 4 किमी चा. चढ जवळ जवळ नाहीच पण तरी 600 फुटांचा. दगड धोंड्यांमधून जाणारी वाट, मधूनच गायब झालेली, सहज ना सापडणारी. मग इथे एकावर एक रचून ठेवलेल्या दगडांच्या लागोरीसारख्या राशींवरून मार्ग ओळखायचा. पुढे जाणार्याने खून म्हणून अशी लगोरी राचायची ही पद्धत सगळीकडेच वापरली जाते.

गोमुख जवळ येऊ लागते तशी ते पाहण्याची उत्सुकताही वाढायला लागते. शिलाखंडातून उतरणारे एक दोन उतार उतरले की आपण गंगेच्या पात्रातील वाळवंटात येतो. तिथून पुढे गोमुख ची बर्फाची भिंत दिसू लागते पण प्रत्यक्ष मुख बघण्यासाठी आणखी पूढे जावे लागते आणि हा मार्ग हिमनदीने मागे सोडून दिलेल्या दगडांच्या राशींवरून जातो. इथे एक " प्राचीन" शिव मंदिर आहे आणि एक साधुबाबा दिवसभर तिथे येऊन राहतात. मंदीर कसले, चार अर्ध्या भिंती, एकावर एक दगड रचून केलेल्या, एक बाजूला शिव पिंड आणि काही मूर्ती आणि त्यावर झाकायला टीनच्या डब्याचे पत्रे वापरून केलेले छप्पर. इतकेच! ते साधुबाबा गेली 29 वर्षे या परिसरातच राहतात असे त्यांच्याचकडून कळले.

गोमुख: इथे भागीरथी हिमनदीचे स्वरूप त्यागून जल स्वरूपात आपल्यासमोर येते. बर्फातून उगम पावणाऱ्या नदीच्या उगमाशी बांधीव गोमुख किंवा कुंड असण्याची शक्यता नाही कारण अशी सर्व ठिकाणे ही दुर्गम असतात. इथेही अशी काही रचना नाही. भागीरथी हिमनदी इथे 'अचानक' संपते. त्यामुळे बर्फ़ाची एक भिंत आपल्यासमोर उभी असते. त्याचे एक एक पदर वितळत वितळत नाहीसे होत असतात आणी त्यातून चमत्कारिक आकार काही काळापूरतेच का होईना तयार झालेले दिसतात. पाण्याचा प्रवाह, हिमनदीच्या उतार आणि त्यामुळे होणारी बर्फाची हालचाल आणि बर्फाचे वितळणे या मुळे प्रवाह जिथे असतो तिथे बर्फाची गुहा काही काळ तयार होते आणि त्यातून बर्फाळ थंड पाण्याचा प्रवाह येताना दिसतो. 2004 साली गोंमुख अश्याच स्वरूपात बघायला मिळाले. अर्थात बर्फ वितळत जाईल तसे त्याची भिंतीची जाडी कमी कमी होत जाऊन मग ती गुहा आख्खीच कोसळून जाते. गोमुखची जागा मागे मागे सरकत आहे त्याच प्रक्रियेचा हा भाग आहे.

भगिरथीच्या गोमुखातून येणारा प्रवाह हा नितळ असा नाही. कल्पना येणार नाही इतके हे पाणी गढूळ आहे. मुळात हिमनदी जेम्व्हा बनली त्याच वेळेस जी काही प्रक्रिया झाली असेल त्यामुळे हे बर्फ हे माती मिश्रित पाण्याचे बनले आहे. त्याचबरोबर या हिमनदीच्या अनेक हिम-उपनद्या आहेत आणि त्या सर्वांचे पाणी एकत्रित होऊन गंगेचा प्रवाह तयार होतो. हिमनदीच्या वितळत असणाऱ्या मुखपाशी वरून वाहून आलेले दगड गोटे पडत राहतात आणि त्यामुळे गोमुख पासून 50मी अंतरापर्यंत जाणे धोक्याचे आहे आणि तसे फलक तिथे लावले आहेत. अर्थात काही उत्साही भक्त मंडळी गोमुख च्या अगदी जवळ जायचे धाडस करतात. आम्ही थोडया उंचावर बसून गोमुखची दर्शन घेत होतो, सोबतीला गार वारा होताच आणि त्याच वेळेस काही उत्साही साधू गोमुख पासून अगदी जवळ जाऊन बर्फाच्या पाण्यात अंघोळ करत होते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे, पण धोका ओळखायला हवा!

गोमुख कडे तोंड करून उभे राहिले की उजवीकडे शिवलिंग शिखर दिसते. नाव शिवलिंग असले तरी त्याचे शिखर अगदी डाव्या सोंडेच्या गणेश मुखासरखे दिसते. तपोवन चे पठार शिवलिंग शिखराच्या थेट पायथ्याला आहे. तिथे जाण्याचा मार्ग गोमुख वरून जातो. इथे भागीरथी हिमनदी चक्क क्रॉस करावी लागते. हिमनदीच्या बर्फ़ावरून वाहून आलेल्या दगड धोंड्यांमधून आणि बर्फाच्याच उंच सखल टेकड्यांमधून ही वाट जाते. हिमनदीचे स्वरूप सतत बदलत असते आणि म्हणून हा मार्ग माहितगार गाईड शिवाय ना जाण्यासारखा आहे. बर्फवर पहुडलेला दगड कधी पाय ठेवल्यावर अचानक हलतो, त्यातून तोल जाऊ शकतो किंवा पाय मुरगळुही शकतो. बर्फ़ावरून ही कसरत करून झाली की समोर येतो सरळ चढचा निसरडा रस्ता. हे एक खरोखरच दिव्य आहे. पण एकदा का हा चढ पार केला की मग तपोवन च्या रम्य पठारावर आपला प्रवेश होतो. इथून मागे मेरू शिखर आणि त्याचे शार्क फिन दिसू लागते. शिवलिंग शिखराचा उतार आपल्याला खुणावत राहतो आणि त्या माळरानावर बागडणारे भरल अर्थात हरणांचे कळप दृष्टीस पडतात. तपोवन समुद्रसपाटीपासून 14200 फूट उंचीवर आहे आणि बहुतेक लोक तिथे जाऊन लगेच परत ना फिरता तिथे एक रात्र मुक्काम करतात, अर्थात तंबू मध्येच. एका दिवसात भोजवासहून तपोवन पर्यंत जाऊन परत यायला चांगलीच शारीरिक तयारी हवी. आमच्या बरोबरच्या तिघांनी हे दिव्य करून दाखवले आणि सुदैवाने हवामानाने त्यांना चांगली साथ दिली.

नंदनवन हे सुद्धा एक असेच पठार, भागीरथी हिमशिखरांच्या पायथ्याशी असलेले. नावाप्रमाणेच सुंदर. गोमुख पासून डावीकडच्या किनाऱ्याच्या निघाले की नंदनवन गाठता येते. वाटेत रक्तवर्णी नाला आणि पूढे चतुरंगी नाला भागीरथी हिमनदीला मिळतो तिथे मात्र हिमनदी वर चढाई करून वेढा मारावा लागतो. हिमनदी जशी वितळत जात आहे तसा हा मार्ग अधिकाधिक अवघड होतो आहे. पूर्वी हिमनादिवरून सहज चालत नंदनवन च्या बाजूचा चढ गाठता येत असे. या वेळेला लक्षात आले की रक्तवर्णी नि चतुरंगी या दोन्ही नाल्यांनी मुख्य भागीरथी हिमनदीच्या प्रवाहात खोलवर मुसंडी मारलेली असल्याने बराच लांबचा फेरा पडू लागलाय. त्यातून एका ठिकाणी चक्क दोर लावून बर्फाचा कडा चढावा लागण्यापर्यंत हा मार्ग अवघड झालाय. हिमनदी च्या कचाट्यातून सुटल्यावर नंदनवन च्या चढाईला सुरुवात होते. जवळपास 1000 फुटांचा हा चढ अंगावर असला तरी घासारडा नाही त्यामुळे सावकाश चढता येतो.

आम्ही या ठिकाणी पोचलो तेंव्हा दुपारचे 3.30 झाले होते आणि बर्फवृष्टी ला सुरुवात झाली होती. चढ चढून कॅम्प वर पोहोचेपर्यंत 5.15 वाजले. नंदनवन चे दोन भाग आहेत. काठवरचा भाग हा कमी उंचीचा (समुद्र सपाटी पासून 14500 फूट) आणि या खोऱ्यात आणखी पुढे गेल्यावरचा भाग 15000 फूट उंचीवरचा. अप्पर नंदनवन भागात भागीरथी शिखराच्या मोहिमेचा बेस कॅम्प लागतो.

नंदनवन कॅम्प वर संध्याकाळपासूनच जोरात बर्फ पडत होता. आसपासचा सर्व परिसर बर्फाने पांढरा शुभ्र होऊन गेला. बर्फ पडत असताना फारशी थंडी मात्र वाजत नाही. रात्री बर्फ वृष्टी थांबली आणि मध्यरात्री ढग पूर्ण पांगले. नवमीचा चंद्र उगवून वर आला होता. त्याच्या प्रकाशात समोर केदार डोम, केदार, खर्च कुंड, शिवलिंग ही शिखरे रुपेरी चमकत होती. कोणत्याही कॅमेऱ्याने टिपता येणार नाही असे ते दृश्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो.

रात्री कॅम्पवर पोचल्यापासून काही तासातच आमच्या एक सह-गिर्यारोहकाला खोकला सुरू झाला. थोड्याच वेळात दुखणे वाढले. सुदैवाने आमच्या चमूतील तिसरी गिर्यारोहक डॉक्टर असल्याने हा खोकला हा 'माऊंटन सिकनेस' चा प्रकार असून हा ' पल्मनरी एडिमा' आहे असे त्याचे निदान झाले. पहाट होताच लगेच खाली उतरायचे असे ठरले. आम्ही एकाच तंबूत आळीपाळीने जागून रात्र काढली आणि पहाट होताच सामान आवरून प्रस्थान ठेवले. पहाटे दिसणारे सुवर्ण क्षण त्या धावपळीत कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवले मात्र. अवघड अश्या त्या उतारावरून आणि हिमनदीच्या पट्ट्यातून आजारी आणि झोप झालेल्या मित्राला घेऊन येणं फारच जिकिरीचे होते पण काहीही उपाय नव्हता. शेवटी 9 तास हळू हळू चालत आम्ही एकदाचे गोमुख पाशी पोचलो. कमी उंचीवर आल्यामुळे त्याचा आजार हळू हळू बरा होऊ लागला आणि तिथे बसल्या बसल्याच त्याला झोप लागली. या भागात भोजवासच्या पुढे घोडे घेऊन जाता येत नाही, पण आणीबाणीची परिस्थिती ओळखून आमच्या गाईडने धावत जाऊन भोजवासला एका घोडेवाल्याला गाठले आणि तो घोडा घेऊन आला. त्यामुळे पुढचा प्रवास जरा सुखकर झाला.

गिर्यारोहण बोलून चालून साहसी खेळ, त्यात काही धोके हे असतातच आणि त्यासाठी तयारीही केलेली असते. पण आम्ही अनुभवलेली परिस्थिती अपेक्षित धोक्याच्या यादी मधली नव्हती आणि त्यामुळे आमच्या जवळ काही उपाय योजना नव्हती. सुदैव इतकेच की आमच्या चमूतील एक डॉक्टर असल्यामुळे रोगाचे निदान लगेच झाले. तो दिवस अतिशय तणावाखाली गेला पण परमेश्वराची कृपा म्हणून काही अघटित झाले नाही.

हिमालय, एक उंचच उंच डोंगर रांगांचा, दगडासारख्या कठीण हिमनद्यांचा, फेसळत वाहणाऱ्या नद्यांचा, बर्फ वितळून ठीक ठिकाणी तयार झालेल्या तळी आणि सरोवराचा प्रदेश. इथे जागोजाग पडलेले प्रस्तर, गोटे आणि शिलाखंड आहेत, वर्षानुवर्षे कदाचित काही शतकांपूर्वी ते डोंगराच्या माथ्यापासून झेपावत खाली आले असावेत. त्यातले काहीच्या आपटी खाऊन ठिकऱ्याही उडालेल्या दिसतात. सगळे दगड वेगवेगळे, काही गुळगुळीत तर काही खरखरीत, काही गोटे तर काही कपच्या, काही सांगमरावरी पांढरे शुभ्र तर काही काळे ठिककर, विविध रूपे. पण त्यांच्याशी मैत्र जुळले की असे वाटते की हे त्यांचे रूप नाही तर स्वभाव आहे. आणि एकदा का तो कळला की मग त्यांच्याशी हितगुज करायला काही अडचण येत नाही. माणसाचा स्वभाव कधी परस्थिती नुसार बदलेल, पण या दगडांचा नाही, बोलून चालून दगडच ते!

सत्यजित चितळे २५ मे २०१७ 

SRT सिंहगड राजगड तोरणा ट्रेक

 

SRT- सिंहगड राजगड तोरणा ट्रेक ( २० फेब्रुवारी २०२१):

सिंहगड, राजगड, तोरणा हे किल्ले म्हणजे सोनेरी इतिहासाचा अविभाज्य अंग असलेले ऐतिहासिक पुरुष. एक एक करून त्यांना भेट देण आणि त्यांची ओळख करून घेण हे पुणेकरांना सहज जमण्यासारख आहे. किती लोक ते जमवतात हा भाग वेगळा! पण एकाच दिवसात त्यांना स्पर्श करण आणि तेसुद्धा डोंगर वाटेनी पायी हा देखील एक धाडसी प्रकार आहे. कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा असा मानवी क्षमतेची परीक्षा पाहणारा एक ट्रेक पुण्याच्या गिरीप्रेमी ने एव्हरेस्ट मोहिमेची तयारी म्हणून केला. SRT अशी अल्ट्रा मॅरेथॉन गेली काही वर्षे आयोजित केली जाते. त्यामुळे का होईना आपल्यालाही हे परीक्षा घेणारे धाडस जमेल का असा प्रश्न नेहमी गड भेटी देणार्यांच्या मनात सहजच पडतो, आम्हालाही पडला आणि मग बघूया प्रयत्न करून असा विचार धरून चौघांचा ग्रुप जमवून आम्ही २० फेब्रुवारी चा दिवस नक्की केला.

पहाटे ४.१५ ला सिंहगडच्या दिशेने निघालो तेव्हा हवेत गारवा होता. गेले दोन दिवस पावसाचे वातावरण होते आणि पुण्याच्या आसपास काही सरी बरसून गेल्या होत्या त्यामुळे हवा गार झाली होती. पावणे पाचला आतकरवाडी ला पोचलो तो महेंद्र जेधे जागा होता आणि त्याचे हॉटेल उघडलेले होते. शनिवार-रविवार सिंहगडावर गर्दीचा दिवस. लोकांच्या सुट्टीचे दिवस म्हणजे ‘हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री’ मधल्या लोकांचे धंद्याचे दिवस. गडाखाली हॉटेल थाटून बसलेलेच नव्हे तर वाटेवर आणि गडावर सरबत, बोरं विकून उपजीविका करणारे लोक या इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहेत. सुट्टीची मजा अनुभवायची असेल तर ती या लोकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

महेंद्र च्या हॉटेल पाशी पार्किंग मध्ये गाडी लावून आणि सकाळचा चहा त्याचाकडे घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. सिंहगडावर पहाटे छान वारे सुटले होते. पार्किंग जवळ असलेल्या सिल्व्हर ओक च्या पानांची सळसळ गड माथ्याजवळ पोचताना ऐकू येऊ लागली. SRT करताना सुरुवात म्हणजे सिंहगड सावकाश चढायचा हा एका मित्राचा सल्ला प्रमाण मानून एक तास घेत सिंहगड माथा गाठला. आकाश निरभ्र होतं आणि दक्षिणेला वृश्चिकाची वळलेली शेपूट आभाळात उंचावर आली होता. नेहमी निरभ्र आकाश बघायला फार छान वाटते पण आज मला दिवसभर उन्हाचा त्रास टाळायला अभ्र असेल तर हवेच होते. अमृतासमान असलेले लिंबाचे सरबत घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. देव टाके डावीकडे ठेऊन झुंजार बुरुज गाठला आणि तिथे बुरुजाच्या शेजारच्या फटीतून खाली उतरायला सुरुवात केली. अनेक वेळा सिंहगड वारी करूनही मी या बाजूला कधी आलो नव्हतो याचे मलाच वैषम्य वाटले. सिंहगडावरून दक्षिणेला विंझर कडे जाणाऱ्या डोंगररांगेकडे आपल्याला हि वाट घेऊन जाते. सिंहगडचा वार्याचा किंवा कलावंतीणीचा बुरुज, डोणागिरीचा कडा उजव्या अंगाला दिसतो आणि खाली सोंडेवरच्या माळावर भगतवाडी च्या बाजूचा धनगरवाडा दिसतो.

झुंजूमुंजू होतानाच आम्ही या डोंगर रांगेवर दाखल झालो. पूर्वेकडून सोसाट्याचा वारा सुटला होता आणि कमालीची थंडी वाजत होती. थंडी पळवून लावण्यासाठी आम्ही वेगात चालायला सुरुवात केली. हि इथली रुळलेली डोंगर वाट आणि ढोर वाट. तासाभरातच क्षितिजावर पूर्वेच्या राजाचे आगमन झाले, डावीकडे खाली कल्याण गाव, मोरदरी आणि भिलारेवाडी आणि पूर्ण खोरे सोनेरी उन्हात न्हाहून निघाले. उजवीकडे दूरवर पानशेतचा जलाशय दिसत होता. सूर्य जसा वर सरकत होता तशी खोर्यातून डोंगररांगेची सावली झपाट्याने माथ्याकडे सरकत होती. उजवीकडच्या पायथ्याच्या गावात मात्र डोंगर सावलीमुळे अजूनही आळस भरल्यासारखा दिसत होता. वाटेवर काही ठिकाणी दोन्ही बाजूला वाढलेलं आणि आता पिवळ पडलेलं कंबरेइतक्या उंचीचे गवत वाऱ्यामुळे सळसळत होत, कारवीच्या सुकलेल्या दंडकारण्यातून सोसाट्याचा वारा आवाज घुमवत जात होता आणि कुठे कुठे कारवीच्या झुडुपांच्या शेंड्यावर तग धरून उरलेले वाळक्या पानांचे गुच्छ खूळखुळ्यासारखा आवाज करत होते. मागच्या बाजूला सिंहगड आता पावलागणिक दूर पडत होता.

उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेला देशावर पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक डोंगररांगा आहेत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर कोसळणाऱ्या जलधारा या रांगांमधून मुळशी, मुठा, गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, हिर्डाई अश्या नद्यांची नावं घेत पूर्वेकडचा प्रदेश सुजलाम सुफलाम करत जीवन फुलवत जातात. सिंहगड हा अश्याच एका पूर्वेला जाणाऱ्या रांगेवर असलेला बलाढ्य किल्ला. या रांगेला समांतर असणारी जी रांग आहे ती ओलांडून गेलं कि पलीकडच्या रांगेत बसलाय राजगड आणि त्याच रांगेच्या पश्चिमेला असलेला तोरणा उर्फ प्रचंडगड.

सुमारे साडे सातच्या सुमारास आम्ही विंझरच्या बाजूच्या डोंगर भिंतीमागे पोचलो आणि वाट उजवीकडे वळली. डोंगरभिंतीच्या सर्वोच्च शिखराला डावीकडे ठेवत एक चिंचोळा ट्रॅव्हर्स घेऊन आम्ही या शिखराच्या खांद्यावर आलो आणि समोर सलग विंझरकडे उतरणारी डोंगर सोंड दिसली. समोर राजगड आणि उजवीकडे तोरणा दोन्ही समाधिस्थ पुरुषांसारखे उभे होते. इथून विंझर सुमारे दीड पावणे दोन तास, आम्ही आधी ठरवलेल्या वेळेच्या गणिताप्रमाणे आमच्याजवळ इथे फार वेळ नव्हता त्यामुळे समोरच्या राजगड-तोरणा जोडीकडे बघून उत्साहाने आम्ही उतरायला सुरुवात केली. सुरुवातीचा थोडा भाग हा तीव्र उताराचा आणि घसरणीचा होता तिथे जपून उतरत आम्ही खाली निघालो. वाटेवरच जरा सपाट जागा लागली तिथे बसून पाठीवरच्या पिशव्या सोडल्या आणि नाश्ता उरकला. SRT करणारा तिघांचा एक समूह आमच्याशी सम:दुखे- सम-सुखे असा राम राम करून पुढे गेला आणि जरा खाली झुडूपात तोही थोड्या वेळासाठी विसावला. विंझर च्या डोंगराकडच्या शेतीवाडीत पोचताना जरा मोठी झाडं दिसू लागली. पळस आणि काटे-सावरीचा फुलोरा आताशा सुरु झालेला दिसला. पळसाचा पेटत्या ज्वालेसारखा फुलोरा, ज्यामुळे त्याला फोरेस्ट फायर म्हणतात आणि काटे-सावरीची मोठ्ठी लाल-गुलाबी फुले याभोवती रुंजी घालणारे अनेक पक्षी दिसू लागले आणि त्यांच्या सुश्राव्य किलबिलाटात आमची सकाळ आनंदी होऊन गेली. विंझर ला पोचेपर्यंत आम्ही १५ किमी अंतर कापले होते. आम्ही ठरविलेली गाडी तिथे येऊन उभीच होती. दहाच्या सुमारास आम्ही आसनस्थ झालो आणि गाडी गुंजवणे गावाकडे निघाली. विंझर ते गुंजवणे हा दहा किमी चा प्रवास, डांबरी रस्त्याच्या अंगाने चालत करण्यापेक्षा आम्ही गाडीने जायचा पर्याय निवडला होता. मार्गासनी गावाच्या अलीकडे आम्हाला सहा ट्रेकर्स चा चमू राजगड कडे चालत जाताना दिसला. ते आमच्या आधी तासभर या वाटेन आले होते आणि आज राजगड- तोरणा असा प्रवास करणार होते. अर्ध्या तासाने आम्ही गुंजवणे गावात पोचलो. जोडून सुट्ट्या असल्यामुळे आणि वीकेंड असल्यामुळे राजगड पायथ्याला वाहनांची गर्दी झालेली होती. आमची गाडी आम्ही तिथे सोडली आणि चालकाला वेल्हे ला येण्याविषयी सूचना दिल्या. पायथ्याशी थांबून पाणी भरून घेऊन आम्ही अकराच्या सुमारास राजगड चढायला सुरुवात केली.

राजगडच्या वाटेवर तरुण-तरुणींचे दोन तीन घोळके भेटले. रमत-गमत ‘ट्रॅकिंग’ करायला आलेले! त्यातल्या एका ग्रुपमध्ये अगदी मराठी वळणाची मुलं होती आणि तरीही अर्धवट हिंदीत त्यांचे संभाषण चालू होते. आपण कुठे आलोय, कसे वागतोय याचे काही भान नसल्यासारखे वागणारी हि मंडळी आजकाल ठिकठीकाणी दिसतात आणि धड ना मराठी-धड ना हिंदी असल्या भाषेत बोलताना दिसतात. राजगड सारख्या जागी येऊन सुद्धा डीपी बनविण्यासाठी चाललेले यांचे फोटोचे उद्योग पाहून वाईट वाटते.

घड्याळात सव्वा बारा वाजत असताना आम्ही राजगडाच्या पद्मावती माचीवर चोर दरवाज्यातून प्रविष्ट झालो. गडावर चांगलीच गर्दी होती. पद्मावतीच्या मंदिरात ट्रेकर्स चा मोठ्ठा ग्रुप आदल्यादिवशी म्हणजे १९ फेब्रुवारीलाच आला होता. त्यांच्याशी बोलताना कळले कि गेली काही वर्षे १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी करण्यासाठी ते सर्व राजगडावर येतात. इथला इतिहास आणि भूगोल याविषयी आपलं नात वाटणारा असा हा तरुणांचा दुसरा गट आम्हाला मघाशी भेटलेल्या टवाळ मुलांपेक्षा आवडला. मंदिरापाशी भाकरी –पिठ्ल्याचा आस्वाद घेण्यासाठी थांबलो. वाढणारा मुलगा वैभव नववीत शिकणारा, वाजेघर गावातला होता. पोटभर जेवण करून पद्मावती देवीला नमस्कार केला आणि सदरेवरून पुढे संजीवनी माची कडे निघालो.

संजीवनी माची च्या दरवाज्यांच्या मालिकेतून अळू दरवाजा गाठेपर्यंत पाउणतास गेला. अळू दरवाज्यातून बाहेर पडून आम्ही राजगड सोडला तेव्हा घड्याळात पावणे दोन झाले होते आणि आम्ही २७ किमी ( १० किमी गाडीचे धरून) अंतर पार केले होते. संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखाली आलो कि पश्चिमेकडे तोरण्याच्या बुधला माचीला जोडणारी रांग दिसते आणि त्या रांगेपर्यंत उतरणारा तीव्र आणि धोकादायक उतार धडकी भरवतो. राजगडाचा पाली दरवाजा, गुंजवणेकडून येणारा गुंजवणे दरवाजा किंवा आम्ही ज्या वाटेन चढलो तो चोर दरवाजा या नेहमीच्या वाटांवर उत्तम अशी रेलिंग बसवलेली आहेत तशी अळू दरवाज्या कडच्या वाटेवर नाहीत. त्यामुळे हा धोकादायक, घसरडा उतार अतिशय सावधानतेन आणि मनाचा आणि शरीराचा तोल अजिबात ढळू न देता उतरावा लागतो. घायपात वाढलेल्या बेचक्यात एकदाचा हा उतार संपला कि हायसं वाटत. मग सुरु होते डोंगर रांगेवरची चाल. सुमारे तासभर चालल्यावर या रांगेतून भुतोंडे गावाकडे जाणारा डांबरी रस्ता आडवा जातो. ‘अति झालं’ अस एखाद्याला वाटत असेल तर ट्रेक सोडून जायचा हा शेवटचा बिंदू. इथून पुढे पाउल टाकल कि तोरणा चढून जाण्याशिवाय पर्याय नाही. नाही म्हणाल तर अगदी शेवटी खोपडे वाडी पासून तोरणा टाळून वेल्ह्याला जाता येत पण तिथेपर्यंत पाय चालायला हवेत.

भुतोंडे खिंडीपाशी घनदाट झाडी आहे. आम्ही तिथे उतरलो तेव्हा दहा- बारा दुचाकींवरून आलेला एक गावाकडच्या उनाड अरुण-तरुणांचा घोळका गप्पा मारीत बसला होता. या ट्रेक मध्ये भेटलेला हा तरुणांचा तिसरा घोळका निरर्थक वेळ घालवत होता. अवघ्या काही तासात तरुणाई ची हि तीन वेगळी रूपं आम्हाला दिसली.

भुतोंडे खिंडीत पाण्यासाठी थोडं थांबून आम्ही पुढे निघालो. वाटेत पालीकडून आलेल्या एकाकडून ताक आणि सरबत घेऊन पुढे वाट पकडली. स्थानिक पुरुषांना इथे ताक आणि सरबत वगैरे विकायला विरोध आहे इथल्या स्त्रियांनी हा व्यवसाय करावा असे काहीसे त्याने सांगितले.’तुम्ही उशीर केलात आता आठ शिवाय तोरण्याला वर पोचणार नाही. तोरण्यावर राहायचे असल्यास आता वर लोक आहेत’ हा त्याचा सल्ला मनावर न घेता आम्ही पुढे निघालो. पूर्वी तोरण्यावर वस्ती नसे, तिथे भुते आहेत अश्या समजुतीमुळे.  छपराचे पत्रे उडालेली दोन धनगरी झापं उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर दाट झाडीतून रस्ता पुढे गेला. आता वारा पडला होता आणि मोकळ्या जागेवर ऊन चांगलंच जाणवू लागलेलं होत. त्यामुळे झाडीत शिरल्यावर अंग सुखावलं. झाडीतून जाणारा हि वाट बराच काळ हे सुख देते. मध्येच एक छान सारवलेला औरस-चौरस माळ लागला. शेजारी एका मोठ्या झाडाच्या पायथ्याला शेंदूर फासलेले देवाचे अनेक तांदळे दिसले. अनवट वाटेवरचा डोंगरी देव. झाडांचे छप्पर असलेल्या त्या मंदिराचे नाव काय? उपासना कोणती? हे सांगायला तिथे कोणीच नव्हते.

बत्तीस- साडे-बत्तीस किमी अंतर कापेपर्यंत वाट अधून मधून दाट झाडीतून जात होती. मग आली खोपडेवाडी. डोंगररांगेच्या डाव्या अंगाला जाणाऱ्या वाटेला लागून असलेलं एक शेत आणि मागे उतरत्या छपराच एक घर. तोरण्याच्या वाटेवरचा शेवटचा पण अत्यावश्यक थांबा. इथून जाणारा प्रत्येक जण बहुदा इथे थांबतोच! तिथल्या माउलीन हसर्या आणि आनंदी चेहऱ्यान स्वागत केलं. स्वच्छ सारवलेल्या ओट्यावर बसायला गावातल्या कुणा राजकीय पुढाऱ्याच्या अभिनंदनाचा फ्लेक्स अंथरून दिला. आधुनिकीकरणाचा प्रवास पहा...पूर्वी अश्या अनवट ठिकाणी बसायला कांबळ मिळायचं तिथेही आता फ्लेक्स पोचले! कोरडवाहू शेती, समोर फिरणाऱ्या काही कोंबड्या, थोडं पशुधन या सगळ्याच्या जीवावर समाधानानं जगणारी हि कुटुंब. जवळच गाव आणि बाजार वेल्हे, तिथे जायचं असेल तर पायी, गाडी रस्ता नाही. शहरातून पाचशे रुपयाची नोटसुद्धा सुट्टे पैसे म्हणून खपेल पण इथे दोनशेची नोटसुद्धा बंदा रुपया ठरते! तीन वर्षांपूर्वी याच वाटेवर इथेच बसून त्या माउली आणि तिच्या दादल्याशी आम्ही नोट-बंदी विषयी चर्चा केली होती त्याची आठवण झाली. थंडगार पाणी, गरम चहा घेऊन आणि पाणी भरून आम्ही त्यांना राम-राम केला नि तोरण्याच्या दिशेने चढत जाणारी वाट पकडली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते.

इथून पुढचा चढ बोडका, डोंगर रांगेच्या माथ्यावरून चढत जाणारा. सह्याद्रीच्या या डोंगररांगा पावसाळा संपला कि बोडक्या दिसतात खऱ्या पण पावसाचे थेंब इथे पडू लागले कि इथे लुसलुशीत गवताचा बिछाना तयार होतो. पावसाळ्यातले आणि नंतरचे काही दिवस विविध कृमी, कीटक आणि गोगलगाई यांच्यासाठी हे नंदनवन ठरते. गवत वाळून गेलं कि हे सर्व कृमी कीटक त्यांच्या पुढच्या पिढीच्या जन्माची सोय खोलवरचा मातीत/ मुरुमात करून लुप्त होतात. वाळक्या माळरानावर आणि डोंगर उतारांवर मग वणवे लागतात. पावसाळ्यातल्या गवताळ नंदनवनाच्या आणि नंतर लागलेल्या वणव्यातून झालेल्या हानीच्या खुणा वाटेवर ठिकठीकाणी विखुरलेल्या गोगलगायींच्या शंखातून आणि कृमींच्या मातीच्या ढेकूळवजा घरट्यातून दिसून येत होती.

खोपडेवाडीतून पुन्हा वाटेला लागल्यावर एका ठिकाणाहून समोर नावाप्रमाणे प्रचंड असलेला तोरणा समोर आडवा ठाकतो आणि रांगेच्या माथ्यावरून  नागमोडी जाणारी वाट एक सलग चढ चढून बुधल्याच्या पायथ्याला जाताना दिसते. बुधला माची हा वास्तविक दोन टेंगळाचा वेगळा भाग. त्यातला ठळक सुळका हा तेलाच्या बुधल्यासारखा दिसतो म्हणून त्याचे हे नाव. तोरण्याच्या मुख्य किल्याला हा भाग एका प्रस्तर रांगेनी जोडला गेलाय आणि प्राचीन दुर्ग अभियंत्यांनी त्याचे सामरिक महत्व ओळखून त्याला तोरण्याचा एक भाग बनवले आहे. तोरण्याचा बालेकिल्ला ते बुधला माची हे अंतर सुमारे दोन किमी इतके नक्कीच असेल आणि या सर्व परिसराला पूर्वी पासूनच या दुर्ग स्थापत्यकारांनी  भक्कम तटबंदी बांधून काढली आहे.

बुधला माचीकडे जाणारा तो उभा, चिंचोळ्या धारेवरचा पन्नास एक फुटांचा चढ गाठेपर्यंत सव्वा तास गेला आणि सूर्य मावळतीकडे झुकू लागला. चढाच्या या अंतिम टप्प्यावर असताना मावळतीच्या उन्हामुळे सावल्या लाम्बायला सुरुवात झाली. तोरण्याच्या उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीला वरपासून खालपर्यंत अनेक घड्या आहेत. त्यांच्या सावल्या फार मजेशीर दिसत होत्या. चढाईच्या सोंडेची सावली त्यावर पडलेली होती. तीन-साडेतीन फूट रुंदीच्या त्या चिंचोळ्या सोंडेवर माझ्या पायांची सावली मला दिसत होती, त्यावरच्या माझ्या शरीराची सावली या रांगेच्या सावलीच्या वर दिसेल या आशेन मी हात हलवून माझीच सावली शोधण्याचा प्रयत्न केला. प्रकाशाच्या नियमानुसार माझ्या ‘इतक्याश्या’ शरीराची ठळक सावली या अफाट डोंगररांगेवर पडली नव्हती. या विस्तीर्ण डोंगरावर माझ्या पायाची सावली दाखवून माझं तात्पुरते अस्तित्व त्याने स्वीकारले होते पण माझी संपूर्ण सावलीसुद्धा त्याने नाकारली होती.

बुधला माचीची तटबंदी भक्कम बसवलेल्या शिडीने चढून आम्ही तोरण्यात प्रवेश केला. इथून तोरण्याचा कोकण दरवाजा गाठायला एक तास लागला. अतिशय कंटाळवाणा सलग चढ असला तरी एका प्रस्तर भिंतीने जोडलेला हा भाग बघत जाणं हि एक पर्वणी आहे. कोकण दरवाजा जवळ आला तेव्हा सूर्यदेव दिवसाचा कार्यक्रम संपवून घरी निघाले होते. पश्चिमेला खाली रायगड दिसू लागला होता आणि लिंगाण्याचे टोक ठळक नजरेस पडत होते. सूर्य रायगडाच्या मागे जाणार हे दिसल्यावर एक अद्भुत फोटो मिळेल म्हणून मी आनंदलो. शक्य तितक्या वेगाने पावलं टाकत कोकण दरवाजा गाठला आणि नुकत्याच डागडुजी करून भक्कम बांधलेल्या बुरुजावर पोचलो. दुर्दैवाने रायगडावर पोचण्याआधीच वातावरणातील प्रदूषण आणि क्षितिजाजवळच्या धुक्याने सूर्याला पूर्णपणे निस्तेज करत त्याचा घास घेतला आणि टकमकटोक सूर्यबिम्बात घुसलेले बघण्याची संधी हुकली. आता अंधाराने परिसर गिळायला सुरुवात केली. त्यामुळे तोरण्याची स्वामिनी मेंगाई देवीला नमस्कार करून न थांबता आम्ही उतरायला सुरुवात केली. रेलिंग लावलेला प्रस्तर भाग आम्ही बर्यापैकी संधीप्रकाशात उतरलो. डोंगरसोंडेवर चांगल्या सखल भागात मेटावर पोचलो तेंव्हा अंधार झाला होता. घड्याळात साडेसात वाजले होते, आतापर्यंत ४० किमी अंतर पार झाले होते आणि वेल्हा अजून अर्धा तास म्हणजेच दोन किमी पुढे होते. आतापर्यंत आम्ही २२२८ मीटर्स इतकी एकूण चढाई पूर्ण केली होती आणि आता मात्र पाय बोलू लागले होते.

वेल्हा जवळ येऊ लागले तसे ‘आपली सावली आपल्याला दिसली नाही’ या विचाराने माझ्या मनात पुन्हा डोके वर काढले. उजवीकडे वर तोरण्याच्या झुंजार माचीच्या तटबंदीची रेषा स्पष्ट दिसत होती. बलाढ्य सह्याद्रीच्या अंगावर रेखा उमटवण्यासाठी शिवरायांसारखे कर्तुत्व हवे....इतरांची सावलीसुद्धा तो आपल्यावर पडू देणार नाही असे मला वाटून गेले. झुंजार माचीच्या अंगावर तोपर्यंत अगस्ती तारा उगवला होता. पृथ्वीपासून ३१० प्रकाश वर्षे दूर असलेला तेजस्वी अगस्ती माझ्या मनातले विचार ओळखून त्या वेळेस माझ्याकडे हसत पाहत होता!

-सत्यजित चितळे