किल्ले चावंड- कुकडेश्वर - किल्ले जीवधन- आणि नाणेघाट सफर
वर्षाखेर एखादे एक दिवसीय गिरीभ्रमण करावे या उक्तीला जागून काही बेत
शिजविण्याचा प्रयत्न थोडा फसला होता. परंतु २०२५ ची सुरुवात चांगली व्हावी म्हणून
पहिल्याच आठवड्यात जीवधन करायचा का? या भरत च्या पृच्छेला
आवडत्या प्रदेशात सैर करण्याची तल्लफ दाद देऊन गेली आणि जीवधन ला जाण्याचा बेत
पक्का झाला. सिंहगड च्या ग्रुप वर ३ विरुद्ध १९ इतक्या फरकाच्या विजयाने उल्हासित
होत वैभव, भरत आणि मी असे तिघे ४ जानेवारीच्या शनिवारी पहाटे ठरल्याप्रमाणे ५
वाजता प्रस्थान ठेवले. सकाळी ७ ते रात्री १०- ११ पर्यंत गर्दीने गुदमरणारा नाशिक
रस्ता पहाटे मोकळा श्वास घेत असतानाच वेगाने अंतर कापत आम्ही ६.३० वाजताच
नारायणगाव गाठले. गाडीतून उतरताना बाहेरचे तापमान १० अंश सेल्सियस दाखवत होते आणि
गाडीचे दार उघडताच त्याची प्रचीती अंगावर शिरशिरी येऊन झाली. एस. टी. स्थानकासमोर
बजरंग दूध केंद्रात आटीव दूध आणि पोहे असा नाश्ता झोडून आम्ही जुन्नर रस्त्याला
लागलो. सकाळच्या वेळेस नारायणगाव आजच्या न कर्त्याच्या ( अर्थात शनिवारच्या)
दिवसाची तयारी करत असतांना आम्ही गाव ओलांडले आणि जीर्णनगर अर्थात जुन्नर च्या
दिशेने मार्गस्थ झालो.
रवी वर्तक यांनी सुचविल्याप्रमाणे आधी वाटेत चावंड करावा, कुकडेश्वर चे दर्शन घ्यावे आणि मग जीवधन करावा आणि नाणेघाट
पाहून नानाच्या अंगठ्यावरून आजच्या मावळत्या सूर्याला सायोनारा करून परतीची
पुण्याची वाट धरावी असा बेत - सांगणारा एक आणि ऐकणारे दोघेच असल्यामुळे तत्काळ
पक्का झाला. वाटेत गहन सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत आणि शिवनेरी डाव्या बाजूला आणि जुन्नर उजव्या बाजूला ठेवत आपटाळे
मार्गाने पुढे निघालो. शनिवार असला तरी शाळेत/ कॉलेजात जाणारी मुले-मुली वस्तीच्या बाहेर रस्त्यावर
वाहनाची वाट पाहत सकाळची उन्हे अंगावर घेत उभी होती. स्वच्छ गणवेश आणि गळ्यात
अडकवलेले आय.डी. कार्ड असे आधुनिक दृश्य प्रामुख्याने कृषी व्यवसाय असलेल्या या
भागात एक वेगळे समाधान देऊन गेले.
आपटाळे गावाशी रस्ता चुकून उजवीकडे दार्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो.
चांगले दोन अडीच किलोमीटर अंतर पुढे जाताना वाटेत वस्तीच्या ठिकाणी उभे असलेले
गावकरी आमच्याकडे “वाट चुकलेले” अश्या नजरेने पाहत असल्याचा भास वाणेवाडी ची पाटी
लागल्यावर खरा असल्याचे लक्षात आले. तत्काळ सुकाणू फिरवीत उलटा रस्ता पकडला आणि
गाडीचे तोंड पूर्वेकडे केले. सूर्य देव क्षितिजावर वीतभर वर आले असावेत पण
समोरच्या एका डोंगर सोंडे मागे होते. निरभ्र आकाशात पसरून राहिलेल्या माफक धुक्यात
सूर्याची केशरी भगवी आभा अत्यंत पवित्र दिसत होती. आज पूर्ण दिवस अशी स्वच्छ हवा चांगली साथ देणार असा
आशीर्वच घेत आम्ही आपटाळे गाठले आणि डावीकडे वळून योग्य दिशेने प्रवास सुरु केला.
७.३० वाजता चा
वंड च्या पायथ्याची दिशा दाखवणाऱ्या कमानीतून प्रवेश केला आणि
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावाच्या अलीकडे, उजव्या बाजूस किल्ल्याकडे
जाणाऱ्या वाटेच्या बाजूलाच वाहन उभे केले. सकाळी सकाळी गावातल्या शाळेत निघालेल्या
ताई आणि दादा ला गडाच्या रस्ता हाच का ? असे विचारून खात्री केली आणि गडाकडे
मोर्चा वळवला.
पायर्यांची वाट सुरु होते
तिथे फायबर मधील बायो स्वच्छतागृहे दिसली. तिथे जाऊ नये अश्या स्थतीत असलेली स्वच्छतागृहे
पाहून “गाढवापुढे वाचली गीता ......” असे वाटून गेले. गडाची वाट चांगली फरसबंदी, नुकतीच बर्यापैकी पैसा ओतून बांधून
काढलेली. वाटेच्या सुरुवातीला लावलेले माहिती फलक आणि कोणत्याही उणीवेवर बोट न
ठेवता येणारी चांगली बांधीव वाट पाहता इथे संवर्धना वर बरीच मेहनत आणि निधी खर्च
झाला आहे हे जाणवले. नैसर्गिक क्षयाच्या प्रक्रियेतून हे असेच टिकावे म्हणून मधून
मधून कराव्या लागणाऱ्या डागडुजी साठी काही योजना आणि त्यासाठी निधीची काही तरी
व्यवस्था असायला हवी असे मनात येऊन गेले.
गडाची वाट थेट अंगावर चढ असलेली, थेट वर पर्यंत नजर पोचेल अशी, एका पाण्याच्या
नाळेतून बांधलेली. अगदी पहिल्या पायरी पासूनच दमश्वासाची परीक्षा पाहणारी. वाट
पश्चिमेकडून सुरु होणारी असल्यामुळे सूर्य देव वाटेची पाहणी करण्यास अजून तरी थेट
आले नव्हते, अर्थात वाटेवर गडाचीच
सावली असल्यामुळे उन्हाचा काही त्रास न होता आम्ही रेलिंग पर्यंत ची मजल १०-१५
मिनिटात मारली.
खालच्या बाजूस माणिक डोह धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाच्या एका उपधारेपाशी
वसलेल्या चावंड गावात व्यवहार सुरु होत होते. चावंड किल्ल्याची ठळक सावली समोरच्या
खोर्यात पसरली होती आणि जलाशयाच्या पाण्या पलीकडे हडसर चे द्विशिखर स्पष्ट दिसत
होते.
या चौकापासून उजव्या अंगाला कातळभिंत ठेवून त्यातच खोदलेल्या खोबणी पुढे कोरीव पायर्यांपर्यंत घेऊन जातात. सुरक्षितते साठी भक्कम रेलिंग लावले आहे तरी दोन खोबणीतील अंतर आणि उंची हि दमछाक करण्यास पुरेशी आहे. गडाची एकेक पायरी सुमारे दीड ते पावणे-दोन फूट उंचीची असल्यामुळे दरवाजाची चौकट गाठेपर्यंत चांगली दमछाक झाली. एका बाजूला भक्कम कातळाचा आधार घेतलेला गडाचा दरवाजा शाबूत आहे. उंबरठ्या मध्ये दरवाज्याच्या चौकात वाहून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थित ड्रेनेज कोरलेले आहे. दाराच्या दगडी तुळईवरील कोरीव गणेश मूर्ती ला नमस्कार करीत गडामध्ये प्रवेश केला.
गडावर पुरुषभर वाढलेल्या हत्ती
गवतातून फरसबंदी पावठे केले आहेत आणि दिशादर्शक पाट्याही आहेत. त्याकडे लक्ष ठेवत
चावंडादेवीच्या मंदिराच्या दिशेने निघालो. गडावर मनुष्य प्राण्याची कोणतीच चाहूल
लागत नव्हती. त्यामुळे इतर कोणी चतुष्पाद आणि त्यातून मार्जार कुळातील असला तर आपली
काय धावपळ होईल याची मिश्कील चर्चा करीत गडावरच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या
चावंडादेवीच्या मंदिरापाशी पोचलो.
छोटेसे मंदिर, एकच गाभारा
असलेले, उंच गोलाकार कळस आणि त्यावर फडकणारी ध्वजा, नुकतेच आकर्षक
रंगात रंगवलेले दिसत होते. देवळाच्या उत्तरेकडे दीपमाळेसारखा भासणारा खांब आणि घंटेसाठी
पुरलेला लोखंडी पाईप, तो मात्र नवीन काळातला. देवळाच्या द्वारावर चावंडाडेवी
प्रसन्न अशी ठळक पाटी. गाभाऱ्यात समोर चावंडाडेवी ची आसनस्थ मूर्ती. आश्चर्य
म्हणजे ही देवी अष्टभुजा, हातात आयुधे घेतलेली आणि असुराचा वध करणारी
अश्या रूपात नाही तर चक्क विद्येच्या देवतेच्या स्वरूपात आहे.
हा गडावरचा सर्वोच्च
बिंदू. उत्तर पूर्वेकडे पायथ्याशी असलेला माणिकडोह चा जलाशय, समोर स्पष्ट दिसणारा
हडसर चा किल्ला आणि त्यामागे दिसणारी आणि दुर्ग अज्ञानामुळे ओळखू न शकलेली निमगिरी, सिंदोळा किल्ले असलेली डोंगर रांग. त्यामागे दिसणारी
हरीश्चंद्र गडाची रांग हे सर्व अतिशय स्पष्ट आणि लोभस दिसत होते. परंतु उंच
वाढलेल्या गवताची टोके या दृश्यात अडथळा निर्माण करीत होती.
देवीला नमस्कार करून
टेकाड उतरलो आणि पुष्करणी च्या दिशेने मोर्चा वळविला. थोडे अंतर गेल्यावर उजवीकडे
एक कुंड लागले आणि त्यापुढे पुष्करणी चे आयताकृती कुंड दिसले. पुष्करणी मधील
बहुतेक मूर्ती मंडप रिकामे होते, एके ठिकाणी एक भग्न शिवपिंडी तेव्हढी तो मंडप
व्यापून उरलेली. उजव्या हाताला लक्ष गेले. गर्भगृहा वरील दगडी तुळई शाबूत असलेले
पण भिंती आणि शिखर पूर्ण ढासळलेले ते एक भग्न शिवमंदिर होते. समोर थोडासा बेढब
नंदी शिवाकडे नजर लावून बसलेला आणि आत एक शिवपिंड, शाळिग्राम नसलेली. या पिंडीमध्ये
सुद्धा शिवलिंगाच्या शालीग्रमाची जागा ही चौरस कोरलेली होती. अनेक पुरातन शिवपिंडी
मध्ये मूलतः गोलाकार असलेल्या शिवलिंगाची जागा चौकोनी किंवा अष्टकोनी का कोरतात हा
अनेकदा पडलेला प्रश्न पुन्हा वर डोकावला. बरोबरच्या दोघांनाही याची कल्पना नव्हती
त्यामुळे ते कुतूहल मनात तसेच ठेवून मागे पाहिले. पुष्करणीच्या नितळ पाण्यात
आकाशाच्या खोल निळ्या रंगाचे सुंदर प्रतिबिंब पडले होते आणि समोरच्या बाजूने
पाण्यापर्यंत उतरणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. हे सर्व दिसेपर्यंत त्या दृश्यात
वैभव ने एन्ट्री घेतली होती आणि तिथून त्याने एक सुंदर फोटो घेतला.
निर्मितीपासून काही शतके दुधा तुपाची आणि शुद्ध जलाची
संततधार शिरी झेललेल्या त्या शिवालायाच्या मूळ सौंदर्याचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर
येऊन गेले. गेली काही शतके असेल कदाचित, दिवसा आभाळाचे आणि रात्री
शेकडो चमचमत्या दीपांचे प्रतिबिंब पाहत या सुंदर दृश्याचा एकाकी साक्षीदार बनून
राहिलेल्या त्या भग्न शिवमंदिराला नमस्कार करून आम्ही सप्त मातृका च्या दिशेने
निघालो. वाटेत जमिनीवर एक गोलाकार द्वार आणि त्याखाली पाणी दिसले. अधिक तपास करता
पृष्ठभागा खाली मोठ्या माठाच्या आकाराचे घुमटाकार टाके कोरलेले असल्याचे आढळले.
असे अजून टाके आहेत का याचा शोध न घेता पुढे जाता समोर आखीव रेखीव सात कुंडे कोरून
काढलेली दिसली. एकमेकाला जोडलेल्या या कुंडातील पाणी समतल राहावे म्हणून ती
एकमेकांशी जोडलेली आहेत. संपूर्ण क्षेत्राचा एकच मोठा तलाव का कोरला नसावा हे
मात्र कळले नाही. पाण्याशिवाय जीवन संभवत नाही त्यामुळे या कुंडांना मातेची ची
उपमा देणे एकदम योग्य वाटले. या पाण्याच्या स्त्रोतापर्यंत जायला चांगल्या
पायऱ्यांची वाट आहे आणि एक बांधीव द्वार. या द्वारावर असलेली गणेशमूर्ती रेखीव आणि वातावरणाच्या दुष्ट प्रभावापासून बचावलेली
असल्यामुळे बऱ्याच अंशी सौंदर्य टिकवून असलेली दिसली.
कोरीव कुंडांचे चे असे
साम्य असलेली रचना राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे, पण इथला विस्तार चांगलाच
मोठा वाटला.
मग तिथून परत फिरलो आणि
सदरेच्या पडलेल्या बांधकामाचा थोडा धांडोळा घेतला. जनावरांना पिण्यासाठी असेल
बहुतेक पण कातळातून कोरून काढलेले दोन बेसिन सारखे पात्र तिथे होते. त्याला अगदी
खालच्या बाजूस भोक पाडून नको तेव्हा त्यातील पाणी काढून टाकायची सोय होती. त्या दोन्ही
बेसिन चां व्यास आणि खोली एकच रेशो मध्ये असलेली पाहून विशेष वाटले.
एकंदर गडावरचे वातावरण
फारच आल्हाददायक होते. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला घेतल्यावर त्याचे नामकरण “
प्रसन्न गड” असे केले ते किती सार्थ आहे याची प्रचीती आली.
गडावरच्या माजलेल्या
गवतामुळे संपूर्ण गड फिरून पाहण्याची इच्छा आवरती घेत उतरायला सुरुवात केली. शेवटच्या
टप्प्यावर पोचलो तेव्हा समोर चावंड गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी बांधलेली नवीन
काँक्रिट ची पाण्याची टाकी दिसली. सुमारे 40 फूट उंचावर बांधलेल्या या टाकीचा
फाऊंडेशन पासून वर पर्यंत एकच सेक्शन पाहून या बांधकामाच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलटी
बद्दल मनात सहज प्रश्नचिन्ह उभे राहिले. कदाचित गणिताने ते सिद्ध करता येईलही
पण डिझाईन मध्ये गोल्डन रेशो पाळून
केलेल्या प्राचीन बांधकामांच्या पार्श्वभूमीवर हे बांधकाम डोळ्यात खुपले हे मात्र
निश्चित.
आजच्या दिवसाची सुरुवात
चांगली झाली होती, खूप वेगात पहिला किल्ला पाहून झाल्यामुळे
उत्साह वाढला, मग आम्ही कुकडेश्र्वर मंदिराकडे गाडी वळवली. इथून जुन्नर
तालुक्याची जीवनदायिनी कुकडी नदी उगम पावते.
आंतर जालावर उपलब्ध
माहितीनुसार हे मंदिर 12 व्या शतकाच्या सुमारास शिलाहार राजांनी बांधले. मूर्तिभंजकांच्या
घणाच्या घावातून सुटलेल्या या मंदिरातील मूर्ती वातावरणा मुळे होणारी झीज सोसत आज
आठशे - हजार वर्षे उभ्या आहेत. मूळ मंदिराचा सभामंडप धोकादायक झाल्यामुळे पुरातत्व
खात्याने त्याचा जीर्णोध्दार केला आहे . मुख्य गाभार्यावरचे शिखर आधीच ढासळले आहे.
तरीही शिल्पकला म्हणून सभामंडप आणि अंतराळ बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
डावीकडे वामांकारुढ
पार्वती असलेली शिव मूर्ती आणि त्यासमोर कालिकेची मूर्ती आहे. वातावरणामुळे झीज
होऊन या मूर्तींचे पाय आणि हात इतके झिजले आहेत की कुपोषित व्यक्तीची मूर्ती आहे
असे वाटावे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यातून पाषाण सुद्धा सुटत नाहीत. माणसापेक्षा
पाषाणाची या क्रमाची कालगणना वेगळी इतकेच. एकेकाळी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या या
मूर्ती त्या त्या देवतेच्या रूपाचे आणि कर्तुत्वाचे वर्णन यथार्थ ठरवीत असाव्यात.
आज त्यांची झीज होऊनही त्या त्या देवतांचे वर्णन आज अस्तित्वात असलेल्या समाजाच्या
मनात तसेच घर करून आहे, मूर्तीचे सौंदर्य
गेले तरी त्याचे मनातील प्रतिमा लयाला गेलेली नाही हा खरे तर आपल्या चिरंतन संस्कारांचा
महिमाच नव्हे काय?
छप्पराला आधार देणारे
चतूर्हस्त यक्ष आहेत आणि ते सशस्त्र आहेत. कुणाच्या हातात धनुष्यबाण, कोणाच्या हातात
खड्ग तर कोणाकडे गोफण आहे. मंदिर निर्मिती सारख्या कामाला गृहस्थाश्रमी धनिकांच्या
पाठिंबा लागतो त्यांचे प्रतीक म्हणून या यक्ष प्रतिमा कोरलेल्या असतात असे मी कुठे
वाचले होते. सामाजिक अर्थाने ते खरेही आहे. अश्या मूर्तींमुळे बांधकामाचे सौंदर्य वाढते
आणि आडव्या तुळई ला आधारही मिळतो. परंतु इथले यक्ष सशस्त्र आहेत हे पाहून अधिक
चांगले वाटले.
मंदिराच्या बाहेरून दशावतारांच्या मूर्ती आहेत ज्यातील वराह मूर्ती सहज ओळखता येईल अशी ठळक आणि शाबूत आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक शक्तीची मूर्ती आणि त्याची छोटीशी देवडी आहे. तिथे शेंदूर लावलेल्या मुख्य मूर्ती च्या डाव्या आणि उजव्या बाजूस मानवी सापळा वाटावा अश्या दोन मूर्ती आहेत, बहुतेक पिशाच्च मूर्ती असाव्यात. मागे इथे आलो असता सुभाष कुचिक नावाच्या या परिसराच्या अभ्यासकाने सांगितले होते की तांत्रिक विद्येचा अभ्यास करणाऱ्यांच्या या देवता आहेत. या प्रकारच्या मूर्ती वेरूळ मध्ये पाहिल्याचे आठवते. कुकडेश्र्वराचे हे स्थान शिलाहार राजांनी हे मंदिर बांधण्यापूर्वी पासून असावे असे त्यावरून वाटून गेले.
दर्शन घेऊन बाहेर पडलो
आणि बरोबरचा नाश्ता फस्त करून जीवधनकडे मोर्चा वळवला. वाटेतल्या शेतीवाडीत
प्रामुख्याने झेंडू आणि त्याच्या रेड हेड च्या जातीची झाडे फुलांनी डवरलेली दिसत
होती. बऱ्याच शेतातून रब्बी पिकांचे हातभर उंचीचे पीक वर डोकावताना दिसत होते.
गावातले व्यवहार निवांतपणे सुरू होते.
10.15 च्या आसपास घाटघर
गाठले. गावात शिरताच उजवीकडे असलेल्या पानसरे यांच्या रीव्हाज होम स्टे च्या पाटीशी
गाडी उभी केली, तिथेच मस्त चहा घेतला, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करायची
ऑर्डर दिली आणि पाठीवर सॅक टाकून जुन्नर
दरवाजाकडे चालू लागलो. गावाच्या खालच्या अंगाला लागून असलेल्या वाटेने सुरुवात केल्यावर
वेशीवर एक शिवमंदिर लागले, तिथून पायवाट शेतीचा बांध चढून जाऊन एक टप्पा
वर चढली आणि पुन्हा गडाला समांतर जाऊ लागली. या वाटेने पूर्वी एकदा रस्ता चुकून
जीवावर बेतण्याचा प्रसंग झाल्यामुळे गडाकडे एकदम वळण्याची चूक नेमकी कुठे होते
त्याची नक्की माहिती होती. जुन्नर दरवाज्याची वाट डोंगराच्या एका घडीतून वाहणाऱ्या
पाण्याच्या नाळेतून आहे. गडाच्या या बाजूस तशी भौगोलिक रचना दोन ठिकाणी आहे आणि
चढून जायची वाट दुसऱ्या नाळेतून आहे. पहिली नाळ हि खालून बघताना फसवते आणि या
अनुभवातून गेल्यामुळे दुसरी नाळ पूर्ण दिसे पर्यंत पायवाट सोडायची नाही असे ठरवून
आम्ही चालत राहिलो. हळू हळू उंची वाढवत वाट आता पायथ्याच्या जंगलात शिरली. बांबू आणि
तर्हतर्हेच्या वूक्षांची दाटी असलेल्या जंगलातून जाणाऱ्या वाटेवर सूर्य प्रकाशाचे
कवडसे अंगावर घेत आमची चढाई सुरु होती. संपूर्ण जंगलात या वर्षी फुलून गेलेल्या
कारवीच्या आणि तत्सम फुलांच्या बोन्डांचा हवा हवासा सुगंध दरवळत होता. त्या वासाने
भुंग्यांना वेड लागावे तसेच भटक्या गिरी मित्रानाही!
झाडीच्या आच्छादनाचा एक टप्पा संपला आणि एकदम तीव्र चढाई सुरु झाली. थेट डोक्याकडे गडाच्या वाटेवरच्या शिड्या दिसू लागल्या. पाऊस काळात वरून खाली झेपावणाऱ्या पाण्याच्या ओहोळातूनच हि वाट आहे. पायाला आधार मिळावा म्हणून लोखंडी जाळीत दगड गोटे एकत्र बांधून पायऱ्या केल्या आहेत. पाण्याचा जोर काही ठिकाणी इतका असणार की त्याही फुटल्या आणि मोकळ्या झाल्या आहेत. इथूनच माणूस आला-गेला आहे हे कळावे म्हणून काही भटक्यांनी प्लास्टिक च्या बाटल्या झाडांच्या बुडख्यामध्ये खोचून ठेवलेल्या आहेत. थोडी चढाई पुन्हा झाडांच्या आडोश्याने केल्यावर मात्र उघड्या प्रस्तर मार्गावर पदार्पण झाले. आता वीसेक फुटावर पहिली लोखंडी शिडी दिसत होती. तिच्या पुढे दुसरी शिडी आणि पुढे खोबणींचा मार्ग- दोर लावून सुरक्षित केलेला. पाण्याच्या नाळेच्या कातळी पदरामागे ही मूळची कोरीव वाट झाकली गेली आहे त्यामुळेच खोबणीतून चढाई करावी लागत असली तरी हा मार्ग त्या मानाने सुरक्षित
वाटतो.लोखंडी शिड्या पार झाल्या आणि दोराचा आधार धरीत प्रस्ताराचा
छोटासा टप्पा ओलांडला कि कोरीव आणि बांधीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. तिथून गडाच्या
मुख्य द्वाराची पडलेली कमान दृष्टीस पडली. त्यातून प्रवेश होताच समोर चाट शाबूत
असलेली एक मोठी धान्य कोठी लागते. डोंगरात कोरलेल्या मूळ गुहेला पुढे तीन बांधीव
घुमट असलेली हि कोठी दारातून पाहता आतवर खूप खोल गेलेली दिसते. कोठीच्या दारावर
गजांत लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या पडक्या द्वारकमानीतून आमचे महाकाय देह
आत येताना या ठिकाणी प्रत्यक्ष भीमकाय हत्ती कधी येऊ शकणार नाहीत असे नक्की वाटले
होते. परंतु वैभवाची खूण असलेला गजराज, वैभवाची कामना
करणाऱ्या कोठीच्या द्वारावर किमान शिल्पाच्या रूपात स्थापित झालेला आहे.
तिथून उत्तरेकडे मोर्चा न
वळविता सरळ वरच्या अंगाला चढाई सुरु ठेवली आणि पाच मिनिटात गडाच्या सर्वोच्च डोंगर
कण्यावर प्रविष्ट झालो. मागे स्वच्छ निळ्या आभाळाच्या घुमटाखाली थेट तळात कोकणची
भूमी दिसत होती. क्षितिज नेमके कुठे असावे असा प्रश्न पडावा इतकी हि कोकण भूमी
आभाळात मिसळून गेली होती. उजव्या बाजूस
खाली नाना चा अंगठा त्या निळ्या दृश्यात एक काटेरी टोक खुपसल्यासारखा दिसत होता.
थोडे खाली गडाचा कोकणच्या बाजूचा उतार व त्याखाली पायथा व तिथली वस्ती दिसत होती.
डावीकडच्या जिवाई
देवीच्या मंदिराकडे निघालो. जिवाई देवीचे मंदिर म्हणजे देवीची मूर्ती आणि त्यावर
पत्र्याचे एक छप्पर इतकेच काय ते. देवीच्या मूर्तीला साडी चोळीने झाकल्यामुळे तिचे
मूळचे सौंदर्य दृष्टीस पडत नव्हते. पश्चिमेला ढाकोबा चा किल्ला दिसत होता आणि त्या
पलीकडे घोडापाण्याची नाळ थेट सूर मारून कोकणात उतरलेली दिसत होती. मागच्या डोंगर
पदरांमधील बाष्प, हवेची बदलणारी घनता आणि
डोक्यावर आलेल्या सूर्याचे त्यातून उतरणारे सूर्य किरण यांचा मिलाफ होऊन
सह्याद्रीच्या काळ्या कातळ भिंतींच्या पार्श्वभूमीवर निळ्या रंगाच्या छटांचे अनेक
पदर मनमोहक दिसत होते.
जिवाई देवीला नमस्कार करून पलिकडे वांदरलिंगी सुळक्याच्या बाजूला उतरायला सुरुवात केली. तिथे कोणा संस्थेचे धाडसी गिर्यारोहक जीवधन ते वांदरलिंगी चे शीर असे दोरखंड लावून सदस्यांना एक एक करून झिप लाईन ने पलीकडे सोडत होते. वांदर लिंगी च्या माथ्यावर जेमतेम ५ -६ माणसे उभे राहतील इतकीच जागा आहे. त्यामुळे इकडून तिकडे जीव मुठीत धरून गेलेला गिर्यारोहक नंतर रॅप्लिंग करीत पायथ्याला उतरत होता. आताशा या ठिकाणी या साहसी खेळाने चांगलेच मूळ धरले आहे इतके कि त्याची फॅशन झाली आहे असे म्हणावे! त्यातून आपल्या या पराक्रमाची सोशल मिडीयावर वाच्यता व्हावी म्हणून ड्रोन द्वारे याचे शूटिंग करण्याची सुद्धा सोय या ग्रुप ने केली होती.
आम्हा तिघांपैकी वैभव हे
साहस करण्यास उत्सुक होता, परंतु हा खेळ मांडून बसलेला आजचा कंपू ओळखीचा
नसल्यामुळे “ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” म्हणत त्यानेही आमच्या बरोबर (सरळ)
धोपट मार्गाने उतरायचा निर्णय घेतला. जुन्नर दरवाज्याची वाट खूप उभ्या उतरणी ची
असल्यामुळे तुलनेने सोपी अशी कोकण दरवाज्याची वाट आम्ही धरली.
शनिवार असूनही गडावर
फारशी गर्दी नव्हती. काही कुटुंबे सह कुटुंब गडाची सैर करायला आलेली होती. शाळकरी
मुलांसहित संपूर्ण कुटुंबीय गडाची खडी आणि बिकट वाट चढून आलेली पाहून आम्हाला
त्यांचे कौतुक वाटले. आता उतराच्या वाटेवर आम्ही पुढे होऊन त्यांच्या गोंधळातून
आपली सुटका लवकर करून घेण्याचे ठरविले.
कोकण दरवाजा संपूर्णपणे एकाच कातळातून कोरून काढलेला अतिशय
प्रमाणबद्ध रचना असलेला दरवाजा. दरवाज्याच्या कमानी वर मधल्या ठिकाणी कलश आणि एका
बाजूस चंद्र व दुसऱ्या बाजूस सूर्य असे शिल्प कोरलेले आहे. वीसेक वर्षांपूर्वी इथे
आलो होतो तेव्हा हा दरवाजा चिणून बुजवलेल्या स्थितीत मी पाहिल्याचे आठवले. नुकताच
काही वर्षांपूर्वी गाव करी आणि गडकरी लोकांनी हा मार्ग साफ करून मोकळा केल्याची
बातमी वर्तमान पत्रात येऊन गेली होती.
दरवाज्याच्या गोमुखी रचने
नंतर थोड्या कोरीव पायऱ्या आहेत आणि त्या नंतर ब्रिटिशांनी सुरुंग लावून तोडून
टाकलेली वाट. गावकर्यांनी इथे खोबणी खोदून आणि दोर लावून इथून चढा-उतरायची सोय
केली आहे. तो दहा वीस फुटांचा टप्पा ओलांडला कि मग पायर्यांची वाट, नवीन रेलिंग व
कठडे लावलेली.
गडाच्या छाती पाशी उतरलो कि मावळती कडे दिसणारा वांदरलिंगी
उर्फ खडा पारशी चा सुमारे २००० फूट उंचीचा सुळका लक्ष वेधून घेतो. गडाच्या वाटेला
इथून फुटणारा एक फाटा थेट त्या सुळक्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जीवधनच्या मुख्य
अंगापासून विभक्त होऊन स्वत: च्या भक्कम चौकोनी पायावर हा खडा सुळका न जाणो असाच
किती सहस्त्रके निश्चल उभा आहे. तो कधी विरून जाईल पाषाण संभारात परंतु त्याचे
पुन्हा या डोंगराच्या मूळ अंगाशी मिलन मात्र शक्य नाही, किमान इतकी मोठी दरी त्या
दोघांमध्ये तयार झाली आहे.
गडाच्या मार्गावरील या
उंची पासून खालची वाट डोंगर उताराला बिलगून फोफावलेल्या घाट माथ्यावरच्या जंगलातून
जाते. इथे वन्यजीव दिसले नाहीत परंतु मधूनच काळ तोंड्या वानराची “ हुप्प” अशी हाळी
कानी पडते आणि तर्हतर्हेचे पक्षी पोटापाण्यासाठी भुरकन उडून जाताना दिसतात. ऋतूंच्या
बदलत्या क्रमात हे सौंदर्यही बदलत राहते.
गडाची उताराची आणि जरा
जास्तच लांबीची हि वाट उतरून सपाटीवर आलो आणि मग गप्पा मारत गडाला प्रदक्षिणा
घालून घाटघर गाठले. गावातल्या एकपदरी सिमेंटच्या रस्त्याने विश्रांती स्थानाकडे
जात असताना उचीवरून छोटेसे दिसलेल्या गावाची लांबी रुंदी लक्षात येत होती. वाटेत
एका घराची शेण सडासारवण मोहीम सुरु होती. तिथून सफाई केलेली ढेकळे डोक्यावरच्या
पाटीत भरून शेजारच्या बांधावर टाकायला निघालेला एक शाळकरी पोरगा भेटला. अंगावरच्या
अर्ध्या विजारीवरून पाहता सकाळी तोही चांगला गणवेश घालून शाळेत गेला असावा, आता
दुपारी घरची कामे. आम्हाला पाहून तो बुजला आणि तुरु तुरु निघून गेला.
रीव्हाज होम स्टे मध्ये फर्मास
शाकाहारी जेवण करता करता पानसरे काका आणि मावशींशी संवाद झाला. पानसरे काका
साठीकडे झुकणारे, एकदम रांगडा भक्कम माणूस. मुंबई, पुण्याकडे
कंपनीत काम करून आता वडिलांच्या माघारी इथे गावात स्थायिक झालेले. बदलत्या सामाजिक
परिस्थितीत वाढलेल्या गिरीभ्रमणाच्या आवडीमुळे त्यांचे इथे चांगले चालले आहे.
दोन्ही मुळे उच्च शिक्षित, एक पुण्यात तर
एक मुंबईत. पैकी पुण्यात महाविद्यालयात भौतिक शास्त्र शिकविणारे डॉ. सचीन पानसरे
यांची गेल्या खेपेस नाणे घाटात भेट झाली होती. पानसरे काका जसे निवृत्तीनंतर इथे
आले तसे त्यांची पुढची पिढी आणि त्या पुढची पिढी इथे येऊन स्थिरावेल का? पर्यटन उद्योग जसा फोफावेल आणि जे रूप धारण करेल त्याप्रमाणे
ते बदलतील का? असे प्रश्न मनात येऊन
गेले.
जेवण करून नाणे घाटाच्या दिशेने निघालो. घाटाची खिंड आणि
डावीकडे असलेले नानाच्या अंगठ्याचे टोक समोर ठेवून पार्किंग मध्ये गाडी लावली आणि खिंडीतल्या
जुन्या पायर्यांवरून गुहांकडे उतरायला सुरुवात केली. इथे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल
च्या रामदंडींची सहल आलेली होती. त्यांच्या शिक्षकांना “ मी १९८९ चा रामदंडी”
असल्याचे सांगितल्यावर मुलांना हाकारून वैतागलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचे
हास्य फुलले. मुले निघून गेल्यावर गुहेमध्ये प्रवेशलो. प्राच्य विद्येच्या
अभ्यासकांच्या दृष्टीने विशेष महत्व असलेल्या या गुहेत सातवाहन कुळाचा संस्थापक राजा
सिमुक सातकर्णी आणि त्याची कर्तुत्ववान पत्नी नागनिका यांनी कोरविलेले प्रदीर्घ शीलालेख
आहेत. ब्राह्मी लिपीत कोरलेले हे लेख प्राकृत भाषेत आहेत. ब्राह्मी लिपी या
आपल्यासाठी अगम्य असलेल्या लिपीतील शीलालेखांकडे पाहता साक्षरता हा शब्द सुद्धा सापेक्ष आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
भाषा शास्त्र आणि
व्युत्पत्ती शास्त्र शिकण्याची इच्छा झाली आणि आधीच ओसंडून वाहणाऱ्या बकेट लिस्ट
मध्ये ती ढकलून दिली. आता या बकेट मध्ये ती तळात स्थिरावली कि तिचा पुन्हा धांडोळा
घेता येईल. घरी परतून अंतर जालावर शोधाशोध केल्यावर या लेखातील मजकूर अक्षरश: आणि
आजच्या मराठीत शब्दश: विषद केलेले अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळाले. भाषा आणि लिपी
दोन्ही समजत नसले तरी कातळावर कोरलेले ते लेख, तिथे भग्न होऊन
नाहीश्या झालेल्या त्या मूर्ती या सर्वांशी आपल्या आजच्या अस्तित्वाची नाळ कुठे
तरी जोडली गेली आहे असे प्रकाशाने जाणवते. परप्रदेशातील अशी स्थाने पाहताना इतकी
आत्मीयता न वाटण्यामागे लहानपणापासून कानावर पडलेले इतिहासाचे तास आहेत कि अजून
काही याचा विचार करीत माघारी वळलो.
भरतभूमी ते पश्चिमेला
ग्रीस पर्यंत होणाऱ्या व्यापाराला सहाय्यभूत होण्यासाठी विशेष प्रयत्नातून
राजाश्रयाने बांधून काढलेला हा पायी जाण्याचा रस्ता. सुमारे दोन हजार वर्षे वापरात
असलेला आणि अजूनही बर्यापैकी सुस्थितीत असलेला. इतक्या दीर्घकाळ टिकलेल्या या
वास्तू हि त्या त्या काळातील सर्वोत्कृष्टतेच्या प्रमाणभूत मानाव्या अश्याच
कलाकृती. काळाच्या पटलावर केवळ एक बिंदू ठरणाऱ्या पण मानवी काळाच्या दृष्टीने “दीर्घकाळ”
टिकणाऱ्या या खुणांना “चिरंतन” असा शिक्का मारला तर त्यांचा नैसर्गिक प्रक्रियेतून
होणारा ऱ्हास थोडा रोखला जाईल असे वाटले. वास्तविक या कलाकृती घडविणार्यांना
सुद्धा “चिरंतन” असे काही असत नाही हे माहित असावे, तरीही तसा
शिक्का मारायला हवा असे वाटले.
दुपारच्या उन्हाचा तडाखा
जाणवत होता. त्यामुळे नानाच्या अंगठ्यावर चढून जाऊन सह्याद्रीच्या भिंतीचे दर्शन घेण्याचे
सहचारी मित्रांनी निक्षून नाकारले. जाता जाता शिवनेरी सुद्धा बघून जाता येईल या
प्रस्तावाला केलेला मूक विरोध हेहि याचे कारण असावे! दुपारी ४ च्या सुमारास इथल्या
भटकंती ला पूर्ण विराम देऊन आणि आभाळात अजून ३० अंशावर तळपणार्या अग्निगोलाला
अलविदा करून पुण्याची वाट धरली. पुरातन वैभवाच्या मार्गाकडून अर्वाचीन वैभवाच्या
मार्गावर, अर्थात नाशिक रस्त्याला पोचल्यावर आजच्या संदर्भातील क्लिष्ट समस्येवर,
अर्थात रहदारीत वाहून गेलेल्या स्वास्थ्यावर, चर्चा करत
पुण्यात पोचायला सकाळच्या तुलनेत दुप्पट वेळ लागला. तरीही आजची भटकंती खूप समाधान
देऊन गेली हे मात्र खरे.
सत्यजित चितळे
दिनांक ४ जानेवारी, २०२५
पुणे





No comments:
Post a Comment