४५० उंबरयांच्या आमच्या गावात सकाळी ८.४५ वाजता
हणमंतरावांची एन्ट्री होत असे. २४ इंची जुन्या सायकलीवर स्वार झालेले हणमंतराव
पायातला लेंगा चेन मध्ये अडकू नये म्हणून गुढग्यापर्यंत वर खोचून घेत असत. विटलेला
पण स्वच्छ धुतलेला आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि डोक्यावर स्वच्छ धुतलेलि
गांधी टोपी घालून आलेली त्यांची स्वारी गेट वरील दरवानाच्या केबिन पाशी पायउतार
होत असे.
हणमंतराव आमच्या सोसायटी मधील वयाने सर्वात
मोठे असलेले सफाई कर्मचारी. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांची यायची वेळ आणि माझी
ऑफिसला जायची वेळ जुळत असल्याने त्यांची हि एन्ट्री माझ्या हमखास लक्षात येत असे.
हातात झाडू किंवा फारशी पुसण्याचे फडके घेऊन ते वेगाने झाडलोट, फारशी पुसण्याचे
काम करताना मी बघत असे. वयाने सर्वात मोठे असल्याने सफाई कर्मचारी वर्गावर ते
देखरेख ठेवण्याचेही काम करीत. सुरवातीला त्यांच्या असण्याची मी फक्त नोंद घेतली होती,
एकमेकाची ओळख करून घ्यावी अशी काही गरज मला आणि त्यांनाही वाटली नाही. मात्र एकदा
त्याची स्वारी सहकाऱ्यांना सूचना देत माझ्या गाडी मागे उभी होती, आणि मी सहज म्हणालो
“ मामा जरा जागा देता का? गाडी काढायचीय.”
माझ्या या आर्जवयुक्त विनंतीने संकोचल्या पासून त्यांच्याशी जवळीक सुरु झाली. मग
जाता येता नमस्कार, आणि सहज चौकश्या सुरु झाल्या. अर्थात त्यांना माझे आणि मला
त्यांचे नाव माहित व्हावे असे संभाषण बरेच महिने घडले नाही.
आमच्या इमारतीखालील पार्किंग हि या सफाई
कर्मचार्यांची दुपारच्या जेवणाची आणि विश्रांतीची जागा. इमारतीत राहणाऱ्या
चाकरमान्यांच्या गाड्या सकाळी बाहेर पडतात त्या एकदम रात्री परत स्वस्थानी येतात.
उरलेला वेळ त्या जागेत मुलांचे खेळ, तरुणांचे घोळक्याने गप्पा सत्र, भाज्यांचा स्टॉल
असा त्याचा सदुपयोग केला जातो. मुद्दामहून खडबडीत फारश्या बसवलेल्या तिथल्या
जमिनीवर हनमंतराव आणि त्यांची टीम एखाद्या गादीवर बसावे इतक्या सहजतेने डबा खायला
बसत असतात. दुपारी ते सहजच त्या फरशीवर क्षणभर आडवेहि होतात आणि त्यांना अगदी
घोरण्या इतकी झोप लागते हे मी बघत असतो.
त्या दिवशी दुपारी अचानकच एका कामानिमित्त मी
कंपनीतून घरी आलो. दुपारचे २-२.१५ चा सुमार होता. हनमंतरावं त्यांच्या
सहकार्यांबरोबर जेवायला बसत होते. पार्किंग मध्ये मोटर सायकल उभी केली तेंव्हा
घराची किल्ली खिशात नसल्याचे लक्षात आले. घरी कोणी नव्हते म्हणून थोडा वेळ वाट
पाहत मी मोटारसायकलवर बसणे पसंत केले.
“ या जेवायला” हनमंतरावांनी त्यांच्या खरखरीत
पण प्रेमळ आवाजात हसून आमंत्रण दिले. ‘एक तीळ सात जणात वाटून खावा’ या उक्तीचा विसर
पडू नये अशी हि पाहूणचाराची रीत. आजकालच्या चकचकीत शहरी वातावरणात हरवत चाललेली!
“येईनहि मी खरंच, तसा माझा गरीबाचा डबा आहेच
माझ्या जवळ!” मोटरसायकल वर ऑक्टोपस ने अडकवलेल्या माझ्या जेवणाच्या डब्याकडे बोट
दाखवत आणि डोळे मिचकावत मी उत्तरलो खरा, पण उगाच त्यांना ओशाळल्यासारखे होईल का
काय असे वाटून पुढच्याच क्षणी मलाच माझ्या बोलण्याची लाज वाटली. ‘अच्छा, गरीबाचा
डबा आहे होय, मग नका येऊ, आमचा डबा हा श्रीमंताचा आहे!” खो खो हसत हनमंतराव
उत्तरले आणि हातानेच त्यांनी मला जवळ येऊन बसण्याची खूण केली. आता चकित व्हायची पाळी
माझ्यावर होती. मी सहज त्यांच्या जवळ सरकलो. माझा डबा तसाही खाऊन झालेला होता आणि तसे
खरे सांगून मी त्यांच्या बरोबर जेवायला बसायचे नाकारले. पण मी त्यांच्या शेजारी
जाऊन बसलो.
त्यांचा डबा दोन खणी. खालच्या खणात भाकरी आणि
वरच्या खणात रस्सा भाजी, दुमडलेल्या
भाकरीत चटणीचा गोळा. जेवणाचा डबा याच्या व्याख्येत एव्हढेच पदार्थ येतात आणि असा
डबा नेणाऱ्या कोणालाही, अगदी कोणालाही याचे काही वैषम्य वाटत नाही. माझाही डबा
प्रसंगी इतकाच असतो तरीही या डब्यात “गरीबाचा आणि श्रीमंताचा” असा भेद त्यांनी का करावा
असा प्रश्न मला पडून गेला. ‘असेल, काहीतरी बोलायचे म्हणून बोलले असतील’, मी माझ्या
मनाची समजूत काढली. हनमंतरावांनी भाकरीचा एक घास चटणीला लावून माझ्या हातावर
ठेवलाच आणि मीही तो आनंदाने स्वीकारला. त्यांच्या इतर सहकार्यांना जरा
संकोचल्यासारखे झाले होते आणि ते त्यांच्या आणि माझ्याही लक्षात आले होते. मग
त्यांच्या एकमेकात कानडी- मराठी मध्ये हळू हळू बोलणे सुरु झाले आणि मी माझी नजर
उगाचच मोबाईल मध्ये गुंतवली. मी जरी त्यांच्याकडे पाहत नसलो तरी माझे कान
त्यांच्या बोलण्याकडे आणि नजर मधून मधून त्यांच्याकडे बघत होती. त्यांच्या
बोलण्यातील विषय त्यांच्या सहकार्याच्या मुलाच्या नोकरी विषयी होता. तो
उमेदवारीच्या वयात असणार आणि अपेक्षा खूप पण क्षमता कमी अश्या सर्वसाधारणपाने
आढळणाऱ्या अडचणीत सापडलेला असणार. हनमंतरावं त्यांच्या स्वत: च्या उदाहरणावरून
त्याला समजावून देत होते. आपली जेवढी झेप तेवढीच अपेक्षा असावी असा त्यांचा
समजावणीचा सूर होता. त्यांचा सहकारी त्यांचे हे म्हणणे समजत होता, पण पोराने “शिकवलेले”
प्रगतीचे मंत्र त्याच्या मनात घोळत असावेत. ‘मुलाने धडपड केली आणि अंगापेक्षा मोठा
बोंगा केला तर तो कदाचित जास्त सुखी होईल’ असे त्याचे मत होते. ‘अरे पण जे झेपणार
नाही तेच कशाला करायला जायचे आणि एवढे मिळवून मिळवून काय सुख तो मिळवणार आहे? आपण
काय कमी सुखी आहोत काय? ‘ असा युक्तिवाद हनमंतराव करीत होते. मला हा युक्तिवाद पटत
नव्हता. अर्थात ज्याचे विषयी बोलणे चालले होते तो मला अनोळखी असल्याने मी
त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला नाही. ‘सुखी माणसाच्या सदरा’ सर्वांनाच हवा असतो,
अगदी मनापासून, पण ती गोष्ट आळशीपणाचे उदात्तीकरण करणारी आहे असे माझे नेहमीच मत
आहे.
हनमंतराव अश्याच काहीश्या सुखाच्या कल्पना
त्यांच्या सहकाऱ्याच्या समोर मांडत होते, आणि म्हणूनच माझा त्यांना विरोध होता. आपल्याला
कसे दोन वेळ साधे पण चांगले जेवायला मिळते, ठराविक नोकरी, ठराविक झेपेल असे आणि
इतकेच काम, दुपारी आराम आणि या सर्वाला योग्य आणि आपल्या गरजा भागवण्याइतका पगार
या त्यांच्या सुखाच्या कल्पना होत्या.आपल्या गरजा या कमी जास्त करता येतात आणि
त्या आपणच ठरवाव्या असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. बोलण्याच्या या टप्प्यावर
त्यांचा डबा संपत आला होता. भाकरीचा शेवटचा तुकडा उजव्या हातात घेऊन त्यांनी
भाजीच्या डब्यात डोकावून पहिले, बहुतेक भाजीसुद्धा संपली असावी. दोन खाणी डब्यातल्या
वरच्या डब्याला त्याची निट चळत राहावी म्हणून खालच्या बाजूला एक खळी बनवलेली असते.
रस्सा भाजी असेल तर थोडासा रस्सा त्या खळीत जाऊन बसतो. डबा तिरपा करून त्यांनी भाकरीच्या
टोकाने त्या खळीतला रस्सा खरवडून काढला आणि सहज त्याचा घास करून तो स्वाहा केला.
तो घास खाताना त्यांचे डोळे असीम समाधानाने चकाकले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत
होतो. ‘तुमची कंपनी आहे न साहेब?’ त्यांनी मला प्रश्न टाकला. ‘तुम्ही रोज जेवायचा डबा
घेऊन जाता?’ पाठोपाठ दुसरा प्रश्न.” खूप कामाच्या व्यापात असता तेंव्हा असा
समाधानान डबा खायला वेळ मिळतो तुम्हाला?” हा प्रश्न मात्र थेट गुगली होता, विचार
करायला लावणारा. ‘मला रोजचा डबा खाताना असेच समाधान मिळते, आणि म्हणूनच माझा डबा
साधा असला तरी श्रीमंताचा आहे असे मी म्हणतो!’ हनमंतरावांनी खुलासा केला. त्यांचे
म्हणणे खरे आहे असे मला वाटले. या दृष्टीने पाहता, आपलाही डबा हा रोजच्या रोज
श्रीमंताचा होऊ शकतो असे मला वाटून गेले.
“चला दुपारनंतर पोर्च झाडायचा आणि धुवायचा आहे
आज”, उठता उठता आपल्या सहकार्यांना त्यांनी बजावले. खांद्यावर हात रुमाल टाकून आणि
डबा हातात घेऊन बेसिनकडे जाताना त्यांच्या अंगावर मला ‘तो’ सुखी माणसाचा सदरा
दिसला!
सत्यजित चितळे
१३ऑगस्ट, २०१७
व्वा , झकास ! नेहमीप्रमाणे उत्तम
ReplyDeleteखूप आवडलं तुमचं लिखाण.
ReplyDeleteसाधे पणा आणि निर्मळ मन ह्या गोष्टी मनाला आनंद देऊन जातातच.
त्यात आणि दिलखुलासपणा असला की दिल खुश होऊन जातं.👍
सत्यजीत खूप छान लिहिले आहेस
ReplyDelete