Sunday, August 13, 2017

श्रीमंताचा डबा




४५० उंबरयांच्या आमच्या गावात सकाळी ८.४५ वाजता हणमंतरावांची एन्ट्री होत असे. २४ इंची जुन्या सायकलीवर स्वार झालेले हणमंतराव पायातला लेंगा चेन मध्ये अडकू नये म्हणून गुढग्यापर्यंत वर खोचून घेत असत. विटलेला पण स्वच्छ धुतलेला आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि डोक्यावर स्वच्छ धुतलेलि गांधी टोपी घालून आलेली त्यांची स्वारी गेट वरील दरवानाच्या केबिन पाशी पायउतार होत असे.

हणमंतराव आमच्या सोसायटी मधील वयाने सर्वात मोठे असलेले सफाई कर्मचारी. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांची यायची वेळ आणि माझी ऑफिसला जायची वेळ जुळत असल्याने त्यांची हि एन्ट्री माझ्या हमखास लक्षात येत असे. हातात झाडू किंवा फारशी पुसण्याचे फडके घेऊन ते वेगाने झाडलोट, फारशी पुसण्याचे काम करताना मी बघत असे. वयाने सर्वात मोठे असल्याने सफाई कर्मचारी वर्गावर ते देखरेख ठेवण्याचेही काम करीत. सुरवातीला त्यांच्या असण्याची मी फक्त नोंद घेतली होती, एकमेकाची ओळख करून घ्यावी अशी काही गरज मला आणि त्यांनाही वाटली नाही. मात्र एकदा त्याची स्वारी सहकाऱ्यांना सूचना देत माझ्या गाडी मागे उभी होती, आणि मी सहज म्हणालो  “ मामा जरा जागा देता का? गाडी काढायचीय.” माझ्या या आर्जवयुक्त विनंतीने संकोचल्या पासून त्यांच्याशी जवळीक सुरु झाली. मग जाता येता नमस्कार, आणि सहज चौकश्या सुरु झाल्या. अर्थात त्यांना माझे आणि मला त्यांचे नाव माहित व्हावे असे संभाषण बरेच महिने घडले नाही.

आमच्या इमारतीखालील पार्किंग हि या सफाई कर्मचार्यांची दुपारच्या जेवणाची आणि विश्रांतीची जागा. इमारतीत राहणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्या सकाळी बाहेर पडतात त्या एकदम रात्री परत स्वस्थानी येतात. उरलेला वेळ त्या जागेत मुलांचे खेळ, तरुणांचे घोळक्याने गप्पा सत्र, भाज्यांचा स्टॉल असा त्याचा सदुपयोग केला जातो. मुद्दामहून खडबडीत फारश्या बसवलेल्या तिथल्या जमिनीवर हनमंतराव आणि त्यांची टीम एखाद्या गादीवर बसावे इतक्या सहजतेने डबा खायला बसत असतात. दुपारी ते सहजच त्या फरशीवर क्षणभर आडवेहि होतात आणि त्यांना अगदी घोरण्या इतकी झोप लागते हे मी बघत असतो.

त्या दिवशी दुपारी अचानकच एका कामानिमित्त मी कंपनीतून घरी आलो. दुपारचे २-२.१५ चा सुमार होता. हनमंतरावं त्यांच्या सहकार्यांबरोबर जेवायला बसत होते. पार्किंग मध्ये मोटर सायकल उभी केली तेंव्हा घराची किल्ली खिशात नसल्याचे लक्षात आले. घरी कोणी नव्हते म्हणून थोडा वेळ वाट पाहत मी मोटारसायकलवर बसणे पसंत केले.

“ या जेवायला” हनमंतरावांनी त्यांच्या खरखरीत पण प्रेमळ आवाजात हसून आमंत्रण दिले. ‘एक तीळ सात जणात वाटून खावा’ या उक्तीचा विसर पडू नये अशी हि पाहूणचाराची रीत. आजकालच्या चकचकीत शहरी वातावरणात हरवत चाललेली!

“येईनहि मी खरंच, तसा माझा गरीबाचा डबा आहेच माझ्या जवळ!” मोटरसायकल वर ऑक्टोपस ने अडकवलेल्या माझ्या जेवणाच्या डब्याकडे बोट दाखवत आणि डोळे मिचकावत मी उत्तरलो खरा, पण उगाच त्यांना ओशाळल्यासारखे होईल का काय असे वाटून पुढच्याच क्षणी मलाच माझ्या बोलण्याची लाज वाटली. ‘अच्छा, गरीबाचा डबा आहे होय, मग नका येऊ, आमचा डबा हा श्रीमंताचा आहे!” खो खो हसत हनमंतराव उत्तरले आणि हातानेच त्यांनी मला जवळ येऊन बसण्याची खूण केली. आता चकित व्हायची पाळी माझ्यावर होती. मी सहज त्यांच्या जवळ सरकलो. माझा डबा तसाही खाऊन झालेला होता आणि तसे खरे सांगून मी त्यांच्या बरोबर जेवायला बसायचे नाकारले. पण मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो.

त्यांचा डबा दोन खणी. खालच्या खणात भाकरी आणि वरच्या खणात रस्सा  भाजी, दुमडलेल्या भाकरीत चटणीचा गोळा. जेवणाचा डबा याच्या व्याख्येत एव्हढेच पदार्थ येतात आणि असा डबा नेणाऱ्या कोणालाही, अगदी कोणालाही याचे काही वैषम्य वाटत नाही. माझाही डबा प्रसंगी इतकाच असतो तरीही या डब्यात “गरीबाचा आणि श्रीमंताचा” असा भेद त्यांनी का करावा असा प्रश्न मला पडून गेला. ‘असेल, काहीतरी बोलायचे म्हणून बोलले असतील’, मी माझ्या मनाची समजूत काढली. हनमंतरावांनी भाकरीचा एक घास चटणीला लावून माझ्या हातावर ठेवलाच आणि मीही तो आनंदाने स्वीकारला. त्यांच्या इतर सहकार्यांना जरा संकोचल्यासारखे झाले होते आणि ते त्यांच्या आणि माझ्याही लक्षात आले होते. मग त्यांच्या एकमेकात कानडी- मराठी मध्ये हळू हळू बोलणे सुरु झाले आणि मी माझी नजर उगाचच मोबाईल मध्ये गुंतवली. मी जरी त्यांच्याकडे पाहत नसलो तरी माझे कान त्यांच्या बोलण्याकडे आणि नजर मधून मधून त्यांच्याकडे बघत होती. त्यांच्या बोलण्यातील विषय त्यांच्या सहकार्याच्या मुलाच्या नोकरी विषयी होता. तो उमेदवारीच्या वयात असणार आणि अपेक्षा खूप पण क्षमता कमी अश्या सर्वसाधारणपाने आढळणाऱ्या अडचणीत सापडलेला असणार. हनमंतरावं त्यांच्या स्वत: च्या उदाहरणावरून त्याला समजावून देत होते. आपली जेवढी झेप तेवढीच अपेक्षा असावी असा त्यांचा समजावणीचा सूर होता. त्यांचा सहकारी त्यांचे हे म्हणणे समजत होता, पण पोराने “शिकवलेले” प्रगतीचे मंत्र त्याच्या मनात घोळत असावेत. ‘मुलाने धडपड केली आणि अंगापेक्षा मोठा बोंगा केला तर तो कदाचित जास्त सुखी होईल’ असे त्याचे मत होते. ‘अरे पण जे झेपणार नाही तेच कशाला करायला जायचे आणि एवढे मिळवून मिळवून काय सुख तो मिळवणार आहे? आपण काय कमी सुखी आहोत काय? ‘ असा युक्तिवाद हनमंतराव करीत होते. मला हा युक्तिवाद पटत नव्हता. अर्थात ज्याचे विषयी बोलणे चालले होते तो मला अनोळखी असल्याने मी त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला नाही. ‘सुखी माणसाच्या सदरा’ सर्वांनाच हवा असतो, अगदी मनापासून, पण ती गोष्ट आळशीपणाचे उदात्तीकरण करणारी आहे असे माझे नेहमीच मत आहे.

हनमंतराव अश्याच काहीश्या सुखाच्या कल्पना त्यांच्या सहकाऱ्याच्या समोर मांडत होते, आणि म्हणूनच माझा त्यांना विरोध होता. आपल्याला कसे दोन वेळ साधे पण चांगले जेवायला मिळते, ठराविक नोकरी, ठराविक झेपेल असे आणि इतकेच काम, दुपारी आराम आणि या सर्वाला योग्य आणि आपल्या गरजा भागवण्याइतका पगार या त्यांच्या सुखाच्या कल्पना होत्या.आपल्या गरजा या कमी जास्त करता येतात आणि त्या आपणच ठरवाव्या असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. बोलण्याच्या या टप्प्यावर त्यांचा डबा संपत आला होता. भाकरीचा शेवटचा तुकडा उजव्या हातात घेऊन त्यांनी भाजीच्या डब्यात डोकावून पहिले, बहुतेक भाजीसुद्धा संपली असावी. दोन खाणी डब्यातल्या वरच्या डब्याला त्याची निट चळत राहावी म्हणून खालच्या बाजूला एक खळी बनवलेली असते. रस्सा भाजी असेल तर थोडासा रस्सा त्या खळीत जाऊन बसतो. डबा तिरपा करून त्यांनी भाकरीच्या टोकाने त्या खळीतला रस्सा खरवडून काढला आणि सहज त्याचा घास करून तो स्वाहा केला. तो घास खाताना त्यांचे डोळे असीम समाधानाने चकाकले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. ‘तुमची कंपनी आहे न साहेब?’ त्यांनी मला प्रश्न टाकला. ‘तुम्ही रोज जेवायचा डबा घेऊन जाता?’ पाठोपाठ दुसरा प्रश्न.” खूप कामाच्या व्यापात असता तेंव्हा असा समाधानान डबा खायला वेळ मिळतो तुम्हाला?” हा प्रश्न मात्र थेट गुगली होता, विचार करायला लावणारा. ‘मला रोजचा डबा खाताना असेच समाधान मिळते, आणि म्हणूनच माझा डबा साधा असला तरी श्रीमंताचा आहे असे मी म्हणतो!’ हनमंतरावांनी खुलासा केला. त्यांचे म्हणणे खरे आहे असे मला वाटले. या दृष्टीने पाहता, आपलाही डबा हा रोजच्या रोज श्रीमंताचा होऊ शकतो असे मला वाटून गेले.

“चला दुपारनंतर पोर्च झाडायचा आणि धुवायचा आहे आज”, उठता उठता आपल्या सहकार्यांना त्यांनी बजावले. खांद्यावर हात रुमाल टाकून आणि डबा हातात घेऊन बेसिनकडे जाताना त्यांच्या अंगावर मला ‘तो’ सुखी माणसाचा सदरा दिसला!



सत्यजित चितळे

१३ऑगस्ट, २०१७

Monday, January 2, 2017

रायरेश्वर


२९ डिसेंबर २०१६, वर्षाअखेरीच्या जवळच्या गुरुवारी रायरेश्वराला मुजरा करण्याच्या योग आला. कानद  खोर्यातील हे जागृत देवस्थान. सह्याद्रीच्या कुशीत, उंच अश्या पठारावर वसलेलं, थोडस दुर्लक्षित कारण सहजासहजी तिथे जाता येत नाही म्हणून. छत्रपती शिवराय यांनी त्यांच्या सवंगड्याबरोबर इथे स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली असे अवघा महाराष्ट्र जाणतो आणि मानतो सुद्धा. शिवरायांचा इतिहासच असा आहे कि त्याच्या श्रवणाने एक वेगळेच स्फुरण चढत.

अश्या या स्फूर्तीदायी ठिकाणी शाखेतल्या बाल आणि तरुणांना घेऊन जाण्याची कल्पना निघाली आणि बेत लगेच ठरला. पुण्याहून मिनी बसने सकाळी निघालो आणि निरनिराळी पद्य म्हणत भोर- अंबवडे-टीटेघर मार्गे कोरले गाव गाठलं. पूर्वी इथे वाहन लावून पुढे पायी चढून जावे लागत असे. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चांगला रस्ता झालाय जो आपल्याला रायरेश्वर-केंजळ च्या खिंडीपर्यंत घेऊन जातो. वळणा वळणाचा चढाचा रस्ता केंजळ गडाच्या उतारावरून वर सरपटत जातो. चुरगळलेल्या गांधी टोपीसारखा दिसणारा केंजळगड रायरेश्वर पठाराला एका सलग डोंगर रांगेने जोडला गेलाय. आमने सामने असलेल्या रायरेश्वर पठार आणि केंजळगडाला जोडणारी ही रंग घोड्याच्या नालीचा आकार घेतलेली आहे. त्याच्या मधोमध असलेल्या खिंडीतून रस्ता पलीकडल्या गावाला जातो. ही गावे अजूनही दुर्गम या श्रेणीतच मोडतात, रस्ता होण ही त्यांची श्रेणी सुगम होण्यामधली पहिली पायरी आहे.

खिंडीत गाडीतून पायउतार होऊन बाल चमूला घेऊन गडाकडे प्रस्थान केलं. दोन्ही बाजूला सरळ उतार असलेल्या डोंगर धारेवरून जाणारा रस्ता असल्याने सर्वांना सावध असण्याविषयी सूचना दिल्या होत्या. थोडे अंतर चालून –चढून गेल्यावर डोंगर कड्यावर जाणारी शिडी लागते तिथे थोडे थांबलो. कारवीचा फुलोरा या वर्षी येऊन गेला. त्याच्या बोन्डामधून आता उग्र आणि मादक सुगंध येत होता. पूर्वी कधी तिकोना किल्यावर अश्याच बहराच्या वर्षी कारवीच्या झाडीत अनवधानाने लोळण घेतली होती. सर्वांगावर त्या दिवशी जो त्या अत्तराचा लेप चढला होता त्याचा सुगंध घरी येऊन अंघोळ करेपर्यंत घमघमत होता त्याची आठवण झाली.

सरळ उभी अशी ती शिडी आणि पुढच्या पायऱ्या एका दमात चढण्यासाठी डोंगराची थोडी सवय असावी लागते. प्रचंड पाऊस आणि वार्याच्या प्रभावाने इथले कातळ करवतीने कापल्यासारखे झिजले आहेत. त्याचे ते रॉक फोर्मेशन नजरेत भरते. गेल्या काही वर्षात वरती पठाराच्या कडेने थोड्या अंतरापर्यंत संरक्षक कठडा बसवला आहे. चढून जाण्याची वाट जिथे पोचते तिथून मंदिरापर्यंत सिमेंट ब्लॉकने स्वच्छ पायवाट केली आहे. त्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्न नव्हता. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत पोचायला साधारणपणे अर्धा तास चालव लागत. खडकाळ अश्या या पठारावर मोठी झाडे अगदी तुरळक. बरीचशी छोटी झुडुपे आणि रानोमाळ वाढलेलं गवत. ठीक ठिकाणी अजूनही फुलेलेली रानफुले आणि त्याभोवती गुंजारव करणाऱ्या मधमाश्या आणि भुंग्यासारखे मखमली पाठीचे कीटक. मधूनच येणाऱ्या वार्याच्या झुळुकीने गवत नाचत होते. उरलेल्या वेळेस ते पठार अगदी सुस्तावल्यासारखे स्तब्ध. वाहनांच्या गोंगाटापासून अगदी दूर अश्या या शांत वातावरणात चालत जाताना आपल्या पायांचा, अगदी सौम्य स्वरात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचा आणि मधमाश्या आणि कीटकांच्या गुंजारावाचाच काय तो आवाज ऐकू येत होता.

रायरेश्वराचे दोन खणी पुरातन मंदिर हेमाडपंथी बांधणीचे. पावसापासून संरक्षणासाठी पूर्णपणे पत्र्याने झाकलेले आहे. त्याच्या शेजारीच पांथस्थांसाठी बांधलेली एक मोठी शेड आहे. तिथे टेकलो. मंदिरासमोर शिवरायांचा अर्ध पुतळा आहे. शेजारीच उंबराचे एक चांगले वाढलेले झाड. मुलांचा उत्साह आणि उर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भक्कम असे ते झाड बघितल्यावर त्यांना पूर्वाश्रमीची आठवण झाली आणि झाडावर चढून बागडायला ती सर्व मोकळी झाली. बाजूलाच चुन्याच्या घाणीचे अवजड दगडी चाक पडलेले. हे नेमके काय आहे या प्रश्नाला “उखळ, ध्वज लावण्याची जागा, रथाचे चाक” अशी कल्पनेतील उत्तरे मुलांनी दिली. स्वाभाविक आहे, पोत्यातून येणाऱ्या सिमेंटने बांधलेल्या घरात वाढलेली मुले, त्यांना चुन्याची घाणी काय माहित? पण त्यांना हे माहित असायला हवं. इथल्या वनस्पती, पक्षी यांची थोडी तोंडओळख असायला हवी. इतक्या उंचीवर झर्याचे ठिबकणारे निर्मळ पाणी असू शकते याचे त्यांना आश्चर्य वाटायलाच हवे. असे ठिबकणारे पाणी गोळा करून साठवण्यासाठी बांधलेल्या कुंडात पाणी येण्यासाठी बनवलेले गोमुख त्यांनी बघायला हवे. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे गोमुख झिजून जाते म्हणून त्याच्या नलीकेमध्ये सूरनळी सारखं सरकवलेल कर्दळीच किंवा हळदीच पान बघून त्याचं कुतूहल चाळवायलाच हवं. त्या कुंडातून बाहेर पडणाऱ्या ओव्हरफ्लो कुंडात फिरणाऱ्या पान-निवळ्या या उपयोगी किटकाची त्यांना योग्य माहिती कुणी तरी द्यायला हवी.

मंदिराच्या पलीकडे एक मोठा तलाव आहे, पावसाळ्यात पात्र विस्तारणारा. आता तिथे अजिबात पाणी नव्हते. त्याच्या पत्रात गुलाबी रंगाच्या तुर्याची चादर पसरलेली. अशी मनमोहक फुले पावसाळ्यानंतर सगळ्या रायरेश्वर पठारावर फुलतात, आणि हे पठार अगदी कास च्या पठारासारखे दिसू लागते असे अनेकांनी सांगितले.

प्रत्यक्ष शिवरायांनी ज्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला तो रायरेश्वर मात्र कडी कुलुपात बंद होता. श्री. जंगम यांचेकडे पूर्वापार पूजा व्यवस्था आहे, ते आल्यावर थोड्या वेळासाठी त्यांनी गाभार्याचे दार उघडले आणि रायरेश्वराचे दर्शन घेतले. अगदी छोट्या अश्या या गाभार्यात फार लोकांना उभे राहायला जागाच नाहीये मुळी. प्रत्यक्ष शिवरायांनी ज्या शिवलिंगाची पूजा केली त्याला हात जोडतांना एक वेगळीच अनुभूती मनाला स्पर्शून गेली. अर्थात या देवस्थानाला इतक्या सुरक्षेची गरज काय हा प्रश्नही मनात उमटून गेला.

श्री. गोपाळ जंगम यांचेकडे भोजनाची व्यवस्था सांगितली होती. दर्शन आणि नंतर ‘खजिना शोध’ खेळ झाल्यावर त्यांचेकडे प्रस्थान केले. नाचणीची भाकरी, टोमाटोची आणि वाटण्याची भाजी, वरण, भात असा खास बेत होता. तुडुंब जेवून पुन्हा जवळच्या टेकाडाकडे मोर्चा वळवला. थोडे उंचावर जाऊन परिसर पाहण्याच्या हेतूने. तुडुंब भरलेले पोट आणि उन्हामुळे आलेली सुस्ती यांनी पाय मागे ओढल्यामुळे मधूनच सगळे परत फिरले. आता परत निघण्याचा निर्णय झाला आणि उताराच्या दिशेने वाट पकडली.

दुपारच्या वेळेत सुस्तावलेल्या या पठारावरून परत येताना मन सहज ३७० वर्षे मागे गेले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड लोकांना एकत्र केले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या प्रसंगाचा इथला चिरा अन चिरा साक्षीदार आहे. त्या वेळी हे मावळे असेच एकत्र इथे आले असतील. कुठल्या मार्गाने चढले असतील? काय बोलले असतील? त्यांनी काय पेहराव केला असेल? या विषयी निश्चित काही लिहून ठेवलेले नाही. पण ते सर्व एकत्र, एकाच उद्देशाने इथे आले होते हे मात्र निश्चित. त्या वेळी समाज जाती-पतींनी दुभंगलेला होता का? अठरा-पगड या शब्दातच एक सूचक शब्द आहे- पगड अर्थात पगडी. मुळात गुण-कर्मा तून निर्माण होणारी श्रेणी आणि ती दर्शविणारी खूण म्हणजे डोक्यावरची पगडी. ती जगण्याच्या हक्काच्याही अडवी यावी इतका हा आपला समाज कसा दुभंगला?  केव्हा आणि का घडले असेल हे सर्व?  सुधारकांच्या काळात अश्या सहली निघाल्या असाव्यात का? ज्या सूत्राने समाज बांधला गेला ती ठिकाणे त्या काळात लोकांनी आवर्जून जाऊन बघितली का? त्याचा अर्थ समजून घेतला का?

आम्ही २१ जण इथे होतो. अश्या अनेक सहली मी आत्तापर्यंत केल्या. बरोबरचे लोक कोणत्या जातीचे आहेत हे कधी विचारावेसे सुद्धा वाटले नाही. एखाद्याच्या आडनावावरून त्याचा शोध घ्यावा असे माझ्या मनात कधीही आले नाही. हा पुरोगामित्वाचा संस्कार माझ्यावर संघात झाला. अन्यथा अगदी उच्चविद्याविभूषित लोक हळूच खासगीत या विषयी कुजबुजताना मी ऐकले आहेत. जो प्रश्न सोडवायचा आहे, त्याच्या खोलात शिरा असे म्हणतात. पण मुळातच बिनबुडाच्या प्रश्नावरचा हा उपाय असूच शकत नाही. जाती पातींचा आणि त्यावरून भांडणे होण्याचा प्रश्न हा असाच मुळात बिनबुडाचा पण खूप सजवलेला प्रश्न आहे असं मला वाटून गेलं. तो विषय विसरूनच जाणे हेच त्या वरचे खरे उत्तर आहे.

-सत्यजित चितळे