रेकॉर्ड- डेटा आणि अर्काईव्ह
पहाटेचे चार वाजले तरी अनुजला झोप लागली नव्हती. त्याच्या मनात विचारांचे
काहूर माजले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून तो एका केसमधला गुंता सोडवण्याचा
प्रयत्न करत होता. त्यानेच शोधून काढलेल्या काही रामबाण पद्धतींचा वापर करून
सुद्धा त्याला अपेक्षित निष्कर्ष मिळत नव्हता. आणि या उलघालीत असतानाच आज एक
विलक्षण आनंदाची घटनासुद्धा घडली होती.
आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास फोन वाजला तेंव्हा डॉक्टर
अनुज मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसून एका क्लिष्ट स्लाईडच निरिक्षण करण्यात गुंतला
होता. त्याने थोड वैतागूनच फोनचा रिसिव्हर उचलला. पलीकडून सरांची पी. ए. अंजली बोलत होती. “ तुम्हाला डायरेक्टर सरांनी
बोलावलंय लगेच” तिन तिच्या मंजुळ आवाजात निरोप दिला. “ एका कॉम्प्लीकेटेड केसची स्लाईड
बघतोय, अर्ध्या तासाने आलो तर चालेल का विचार त्यांना”. एरव्ही कोणी दुसरा असता तर
असे उलट उत्तर दिल्यावर त्याची काही खैर नव्हती. पण डॉक्टर अनुज ची गोष्ट वेगळी होती. अतिशय मनस्वी संशोधक अशी त्याची
हॉस्पिटल मध्ये ख्याती होती आणि म्हणूनच त्याला त्याच्या वेळेनुसार काम करण्याची
मुभा रिसर्च डायरेक्टर सरांनी दिलेली होती. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे “ होय
तुमच्या वेळेनुसार या” असे उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवून त्याने पुन्हा
मायक्रोस्कोप मध्ये डोळे खुपसले. पण त्याची तंद्री पुन्हा भंग पावली. पुढच्या
वेळेस फोन वर थेट डायरेक्टर सर बोलत होते “ अनुज, लगेच माझ्या केबिन मध्ये ये.
तुझ्यासाठी स्वीडनहून फोन होता. परत ५ मिनिटात फोन येणार आहे.” त्यांनी अतिशय हर्षोल्हासित
स्वरात अनुजला निरोप दिला. हातातलं काम अनुज कधी अर्धवट सोडत नसे, पण या वेळेस तो
लगेच उठला. डोळ्यावर चष्मा चढवून तो तडक त्याच्या लॅब च्या बाहेर पडला.मुंबईतल्या
या प्रसिद्ध रुग्णालयाचा पसारा बराच मोठा होता. विविध प्रकारच्या उपचारांसाठी
त्याचा पसारा चार वेगवेगळ्या इमारतींमध्ये विभागला होता. अनुज जिथे काम करत असे ती
लॅब आणि सरांचे ऑफिस हे एकाच इमारतीत पण वेगवेगळ्या मजल्यावर होते. अनुज बाहेर पडला आणि लिफ्टची वाट न पाहता त्याने थेट जवळचा
जिना चढायला सुरुवात केली. दोन दोन पायऱ्या एका दमात चढत त्याने वरचा मजला गाठला. तिथून पुढच्या लांबच लांब कॉरीडॉर मध्ये पेशंट
आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होती. हॉस्पिटलचे कर्मचारी, डॉक्टर्स त्यांच्या
कामासाठी त्या गर्दीतूनच वाट काढत इकडे तिकडे जात होते. नवीन पांढरा एप्रन घातलेले
इंटर्नस उगाचच इकडे तिकडे लुडबुड करत होते. अनुजला हा प्रकार नवीन नव्हता, पण आज त्याला घाई
झाली होती. फोन कोणाचा असेल याची त्याला पुसटशी कल्पना आली होती पण कशाबद्दल असेल
याची उत्सुकता त्याला अस्वस्थ करीत होती. ६-७ महिन्याभरापूर्वीच
त्याने त्याच्या शोधनिबंधाचे बाड ‘द रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस’ ला पाठवले
होते. जीवशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या यादीतील तो एक संभाव्य विजेता
असणार होता आणि ही गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त फक्त त्याच्या सरांना माहित होती. कॉरीडॉर
मधून झपझप चालत जाताना आपल्या हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि हाताच्या तळव्यान्ना
नेहमीपेक्षा जास्त घाम आलाय हे त्याला जाणवले. त्याच्याकडे बघून त्याला “हॅलो”
करणाऱ्या त्याच्या सहकारी आणि जुनिअर डॉक्टर लोकांकडे आज त्याचे लक्ष नव्हते.
विचारांच्या तंद्रीत तो वेगाने सरांच्या केबिनपाशी पोचला. त्यांच्या सेक्रेटरीकडे
न पाहताच त्याने दार ढकलून केबिनमध्ये प्रवेश केला. “ ये अनुज, अभिनंदन” अतिशय
आनंदात असलेल्या सरांनी त्याचे स्वागत केलं. धापा टाकत आलेल्या अनुज समोर त्यांनी
पाण्याचा ग्लास सरकवला “ शांत हो, तुला पुढे अर्धा तास अतिशय शांतपणे फोन वर बोलायचे
आहे.” स्वत:ची उत्सुकता झाकण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले. अनुजने काही म्हणायच्या
अगोदरच त्यांच्या टेबलवरील फोन वाजला. त्यांनी अनुजला रिसिव्हर उचलण्याची खूण
केली. थरथरत्या हाताने अनुजने रिसिव्हर उचलला. “ इज धिस डॉक्टर अनुज जोशी?”
पलीकडून एक परदेशी प्रौढ व्यक्तीचा आवाज आला. “ येस धिस इज डॉक्टर अनुज, मे आय नो
हू इज ऑन द लाईन प्लीज? “ अनुज ने प्रतिप्रश्न केला. त्याच्या प्रश्नाचे सरळ उत्तर
लगेच आले नाही. तो डॉक्टर अनुजच आहे याची खातरजमा करण्यासाठी एका मागून एक प्रश्न
त्याला विचारले गेले. त्याच्या सरांनी त्याला याची अगोदरच कल्पना दिलेली होती
त्यामुळे तो सलग न अडखळता उत्तरे देत गेला. त्याची ही मुलाखत अर्धा एक तास चालू
होती. “ अभिनंदन डॉक्टर अनुज, या वर्षीच्या जीवशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी
तुमची निवड करण्यात येत आहे.” हे शेवटी आलेले वाक्य मात्र अनुजच्या डोळ्यात
आनंदाश्रू आणणारे ठरले. बोलणारी व्यक्ती निवड समितीची अध्यक्ष असणारी ज्येष्ठ
संशोधक होती. अनुजचा त्याच्या कानांवर विश्वास होता. त्याला खात्री होती की त्याने
केलेले संशोधन हे त्याच तोडीचे आहे. त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून त्याच्या हॉस्पिटलच्या
रिसर्च विभागाच्या डायरेक्टर सरांनी आनंदाने टाळी वाजवली. आणि ते डोअर बेल मारणार
इतक्यात अनुजने त्यांना खुणेनेच थांबवले. शिष्टाचाराप्रमाणे पी.टी.आय. कडे याचा
टेलेक्स आल्याशिवाय आणि त्यांच्याकडून कळल्याशिवाय याची प्रसिद्धी करू नये अशी
सूचना त्याला फोन संपताना करण्यात आली होती. आणि त्याने हे लगेच सरांना सांगितले.
अर्थात हा सोपस्कार पूर्ण व्हायला केवळ १५ मिनिटांचाच
कालावधी गेला आणि लगेचच ही बातमी पी.टी.आय. कडून प्रसारित करण्यात आली. हॉस्पिटलचे संचालक
मंडळ, अनुज चे सहकारी, कनिष्ठ सेवक व कर्मचारी सर्वांच्या शुभेच्छांच्या गर्दीत
डॉक्टर अनुज हरवून गेला. तासाभरातच वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा त्याला गराडा पडला.
त्यांचे तेच तेच प्रश्न आणि त्याला तीच उत्तरे देऊन तो वैतागून गेला. या घटनेची
बातमी होताच अनुजचा फोन खणखणू लागला. शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करता करता
संध्याकाळ केंव्हा झाली ते त्याला कळलेच नाही. हॉस्पिटल तर्फे दुसर्या दिवशी फॉर्मल
प्रेस कॉनफरन्स घेण्याचे निवेदन
प्रसिद्धीस देण्यात आले.
अनुजने लावलेला शोध हा जनुकीय रचना आणि त्यामुळे होणारे कॅन्सरसारखे
आजार आणि त्यावरील उपचार या विषयी असल्याने त्याचे बौद्धिक स्वामित्व हक्क मिळणार
नाहीत याची माहिती त्याच्या सरांना होती पण या शोधाचे श्रेय हॉस्पिटलला मिळावे अशी
त्यांची अपेक्षा होती आणि अनुजची त्याला काहीच हरकत नव्हती. कौतुक सोहळा संपल्यावर
सरांनी अनुजला बोलावलं आणि दुसर्या दिवशीच्या प्रेस कॉनफरन्स मध्ये देण्यासाठी
निवेदन तयार करण्याविषयी सूचना केली. कॉनफरन्सच्या आधी अर्धा तास भेटून त्यावर शेवटचा
हात फिरवू असे म्हणून त्याचा निरोप घेतला.
मुंबईत लहानाचा मोठा झालेला अनुज लहानपणापासूनच हुशार
श्रेणीत गणला गेलेला विद्यार्थी. जीवशास्त्रातील आवड त्याला मेडिकलला घेऊन गेली.
मेडिकलच्या सर्व वर्षात प्राविण्य मिळवीत त्याने पॅथोलोजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण
पूर्ण केलं. परंतु वैद्यकीय शिक्षण घेतांनाच जनुकीय संशोधनात त्याला गोडी निर्माण झाली. या विषयातील संशोधनातून
दुर्धर आजारांची चिकित्सा आणि उपाय अधिक परिणामकारकपणे करता येईल असा विश्वास
वाटून त्याने यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. आणि अधिक पैसे मिळवून
देणाऱ्या संधी नाकारून मुंबईच्या या प्रख्यात रुग्णालयात रिसर्च विभागात काम करणे
स्वीकारले. नेमके हेच रुग्णालय स्वीकारण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे इथे आजवर
लाखो रुग्णांनी उपचार घेतले होते आणि त्यांच्या आजार, व उपचारांची संपूर्ण माहिती
किंवा रेकॉर्ड या रुग्णालयाने व्यवस्थित जपून ठेवलेली होती. त्यामुळे इथे अधिक
परिणामकारक पणे संशोधन करता येईल याची डॉक्टर अनुजला खात्री होती.
एकीकडे पॅथोलोजी मध्ये नेहमीचे काम करत डॉक्टर अनुजने
त्याचे संशोधन चालू ठेवले. २-३ वर्षातच त्याने सदर केलेल्या शोध निबंधाने
त्यांच्या रिसर्च डायरेक्टर सरांचे लक्ष वेधून घेतले. त्याने नोंदवलेली निरिक्षणे आणि
त्यावरून काढलेले निष्कर्ष याचा अभ्यास केल्यावर, हा मुलगा काही तरी भव्य दिव्य
संशोधन करेल यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी त्याला मनाप्रमाणे काम
करण्याची मुभा देऊन टाकली. अनुजचे संशोधन चालूच होते. पाहता पाहता दोन तपांचा काळ
उलटला. मधून मधून होणार्या वैद्यकीय कॉनफरन्स मधून त्याचे अतिशय अभ्यासपूर्ण शोध निबंध
प्रकाशित होत त्यामुळे त्याच्या विषयात काम करणाऱ्या डॉक्टर्स मध्ये त्याच्या नावाची
चर्चा होऊ लागली होती. अनुजमध्ये एक
प्रकारचा नेमस्तपणा होता. पेशंट आणि त्यांची रेकॉर्ड्स केलेल्या निरिक्षणाची तो त्याच्या खिशातल्या
छोट्याश्या डायरी मध्ये नोंद करून ठेवत असे. नंतर त्या नोंदी पुन: वाचून त्यांची
वहीत नोंद करून ठेवत असे. कॉलेज पासून असलेल्या त्याच्या या नेमस्त पणाची कधी कधी
दोस्त मंडळीत थट्टा सुद्धा होत असे. पण कधी काही मागचे संदर्भ मागायची पाळी आली कि
लोक त्यांच्या मागे लागत असतं.
हॉस्पिटलमध्ये त्याच्या विषयात काम करताना त्याला अर्काईव्हज
च्या विभागातून जुनी रेकॉर्डस शोधून काढावी लागत. अर्काईव्ह विभागाच्या
अधिक्षकांनी ही सर्व रेकॉर्ड अगदी काळजीपूर्वक जपून ठेवली होती. केवळ तसे त्यांना
वाटत असे म्हणून. त्यांची शिस्त बिघडेल म्हणून ते त्याला सहज कोणाला हात लावू देत
नसत. डॉक्टर अनुज आणि त्यांचे त्यामुळे सुरुवातीला खटके उडाले होते. पण पुढे पुढे
अनुजच्या नेमस्तपणाबद्दल त्यांची खात्री पटली आणि त्याला अर्काईव्हज च्या
विभागातही मुक्त प्रवेश मिळाला. तिथे अनेक रुग्णांच्या आजाराविषयीचे रेकॉर्डस होते. त्या त्या वेळेस उपलब्ध डॉक्टरने
केलेल्या तपासण्यांचे निष्कर्ष लिहिलेले होते. अनुज ज्या दिशेने काम करत होता
त्याला आवश्यक किंवा पोषक संदर्भ अधून मधून त्याला मिळत. पण बर्याच वेळेस तपासणी करणाऱ्या डॉक्टरची दिशा
आणि अनुज ची अभ्यासाची दिशा जुळत नसे. या रेकॉर्ड्स मधून अनुजला अनेक माणसे भेटली.
त्यांच्या आजारांविषयी, सवयींविषयी
वाचायला मिळाले. त्याची त्यांच्या आजाराशी सांगड घालता आली. आज त्यातली किती माणसे
ह्यात आहेत त्याचा अंदाज नव्हता पण त्यांचा इतिहास “रेकॉर्ड” म्हणून त्याच्या
हॉस्पिटल मध्ये जपून ठेवला गेला होता.
तल्लख बुद्धीच्या अनुज ने ही रेकॉर्ड्स इतक्या वेळेस तपासली
होती कि त्याला ती बरीचशी पाठ झाली होती. त्यामुळे रुग्णांच्या रेकॉर्ड्स चा चालता
बोलता अर्काईव्ह अशी त्याची रुग्णालयात ख्याती होती, आणि खासगीत तोही हे नम्रपणे
मान्य करत असे.
अनुजचे स्वत: चे निरिक्षण आणि त्याने केलेल्या नोंदी, अर्काईव्हज
मधून घेतलेले संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून त्याने त्याचा शोध निबंध सिद्ध केला
होता. कॅन्सर सारख्या दुर्धर अजारांच्यामागे असलेले जनुकीय संरचनाचे कोडे त्याने
पूर्ण सोडवले होते. त्याने सिद्ध केलेल्या पद्धतीमुळे दुर्धर आजारांचे पूर्व निदान
तर होणार होतेच पण त्यावरची उपाय योजना करून त्यांचे निर्मुलन करता येणार होते. या
शोधाप्रमाणे क्लिनिकल ट्रायल्स करण्याची रीतसर परवानगी त्याच्या हॉस्पिटल ने मिळवली
होती आणि सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्याची उपयुक्तताही सिद्ध करण्यात
आलेली होती. माणसाच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी शोध ठरलेला होता. विश्व निर्माण
करणाऱ्या ब्रह्माच्या सूत्राचीच उकल केल्यासारखा.
अनुजच्या विनयशील स्वभावाच्या विरोधात असलं तरी त्याला थोडी
“ग”ची बाधा यामुळे झाली होती आणि ते स्वाभाविक होत. याच उन्मादात त्याने झोपण्याच्या अगोदर प्रेस कॉनफरन्स
साठी द्यायचे निवेदन लिहून पूर्ण केले होते. या जगातून सर्व प्रकारचे दुर्धर आजार
निर्मुलन करण्याचा दावा त्याने त्यात केला होता.
संध्याकाळी हॉस्पिटल मधून आनंदात बाहेर पडल्यावर तो प्रथम
आई वडिलांना भेटायला गेला. आपल्या मुलाच्या कौतुकाने त्यांना भरून आले असेल तर
त्यात काय विशेष. आशीर्वाद घेण्यासाठी तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला तेंव्हा
त्याचे वडील वीर सावरकरांची कविता त्याला उद्देशून म्हणाले “ कितीक फुले फुलती, फुलोनिया
सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे| परी जे गजेंद्र शून्डेने उचलिले, श्रीहरी
साठी नेले, कमलफुल ते अमर जाहले ||” ही पंक्ती तेंव्हापासून त्याच्या कानात घुमत
होती.
संध्याकाळी तो घरी पोचला तेंव्हा त्याच्या सोसायटीचा परिसर
देखील गर्दीने फुलून गेला होता. त्यामध्ये त्याचे आप्त होते तसेच त्याचे शाळेतले,
कॉलेजमधले मित्र आणि काही शिक्षकही आवर्जून उपस्थित होते. अनुज ने सवयीने प्रथामिकतेने
त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याला ८वी टे १० वी गणित शिकवणारे किंकर सर
त्याचे अतिशय लाडके होते आणि ते त्याला भेटायला मुद्दामहून आले होते. अनुज ला गणित
हा विषय फारसा आवडत नसे पण किंकर सरांचे शिकवणे आणि विषय समजावून सांगणे त्याला
अतिशय आवडत असे. “त्यांच्यामुळे मी दहावी पास झालो आणि म्हणून डॉक्टर होऊ शकलो
नाही तर दहावी नापास असा शिक्का बसला असता” असा विनोद करून त्याने एकदा शाळेच्या
री-युनियन मध्ये त्यांची अप्रत्यक्ष स्तुती केली होती. त्यांना नमस्कार करायला तो
पुढे झाला तेंव्हा किंकर सरांनी देखील “तुझे गणितातले रेकॉर्ड अगदी न दाखवण्याच्या
लायकीचे होते रे “ असा सहज शेरा मारल्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली होती. अर्थात
जनुकीय रचनांमध्ये जसं अनुज गुंतत गेला तसे त्याला सृष्टीच्या या मूळ कोड्यात काही
गणितीय सूत्रे आहेत हे जाणवू लागले होते आणि किंकर सरांनी शिकवलेले आणि घोटून
पक्के करून घेतलेले गणितातले मूळ सिद्धांत त्यामुळे त्याला वारंवार आठवत असत.
गेले दोन आठवडे अनुज एका क्लिष्ट केस्माध्ली गुंतागुंत
सोडवण्याच्या प्रयत्नात होता. सहा महिन्यांपूर्वी हा रुग्ण तपासणीसाठी तिथे
पहिल्यांदा दाखल झाला होता. अनुजने शोधून काढलेल्या पद्धती प्रमाणे त्याची तपासणी झाली
होती अन् खुद्द डॉक्टर अनुजने त्याच्या स्लाईड बघून ‘या रुग्णाला कॅन्सर होणार
नाही असा निर्वाळा दिला होता. परंतु दोनच आठवड्यापूर्वी तो रुग्ण परत दाखल झाला
होता आणि त्याला अतिशय दुर्धर अश्या प्रकारचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.
ईश्वरदत्त आजाराबदाल त्या रुग्णाची जरी काही तक्रार नव्हती तरी त्याच्या केसने
अनुजला मात्र पूर्णपणे हलवून टाकले होते. त्याचे जुने रिपोर्ट आणि रेकॉर्ड त्याने
पुन:पुन्हा तपासली होती. पण त्याने शोधून काढलेल्या पद्धती मध्ये त्याला कुठलेच
वैगुण्य सापडत नव्हते. आज त्याचा या केसचा अभ्यास अर्धवट राहिला होता आणि गेले ७-८
तास तो त्यापासून अतिशय अलिप्त वातावरणात डुंबून गेला होता.
गादीवर पडल्या पडल्या जसा त्या क्लिष्ट केसने त्याच्या
अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तसाच त्याने केलेला दावा आणि वीर सावरकरांच्या
काव्यपंक्तीनी. न सुटणारी केस त्याला समोर दिसत होती आणि तरी देखील केलेला हा
सर्वद्न्यपणाचा दावा. काहीतरी चुकतंय असा त्याला सतत वाटत होत. मधूनच किंकर सरांनी
मारलेला शेराही त्याला अस्वस्थ करत होता.
मी, मी केलेल्या
नोंदी, मी तपासलेली रेकॉर्ड्स, त्याच्यावर केली भाष्ये उद्या प्रसिद्ध होणार. लोक
मला डोक्यावर घेणार, पण मीच का? इथे तर अनेक संशोधक आहेत या विषयावर प्रकाश
टाकणारे? आणि ते रुग्ण... जे केवळ रेकॉर्ड बनून राहिले इतके वर्ष आमच्या अर्काईव्हज
मध्ये? ते कोण ? इतक सगळ करूनही ही न सुटणारी केस. देवान अजून सगळी गुपितं खुली
केली नाहीत माझ्यासाठी! मी कोण? कुठेतरी बनून राहिलो असे असे एक रेकॉर्ड, डेटा का
मानवाच्या इतिहासाच्या अर्काईव्ह मधले एक पान? अनुज याचे उत्तर शोधत होता. सत्कार-
शुभेच्छांमुळे अधांतरी झालेले त्याचे पाय त्याला चकवलेल्या केसमुळे पुन्हा जमिनीवर
टेकले होते.
अनुज उठला, दिवाणखान्यात आला. तिथे त्याचं देवघर होत.
देवासामोरच्या मंद एल. ई. डी. च्या
प्रकाशात देवांच्या मूर्ती अधिकच तेजस्वी दिसत होत्या. त्यान समोर आसन मांडल आणि
डोळे मिटून घेतले. मी, माझा अभ्यास, आजवर रेकॉर्ड बनलेले असंख्य जीव, त्याच्यात
जीव ओतून मी त्याचा डेटाबेस केला. त्यातून गवसलेली सत्य, उलगडलेली कोडी आणि आता
मिळणारी प्रसिद्धी, पण हे सगळ अपूर्ण आहे. अनुजने डोळे उघडले. कॉम्प्युटर सुरु केला त्याने लिहून पूर्ण
केलेल्या निवेदनातील शेवटची ओळ त्याने बदलली “ या संधोधनामुळे जगातील सर्व दुर्धर
आजर कायमचे नष्ट होतील” हे वाक्य खोडून “ या संशोधनामुळे दुर्धर आजारांवरील
उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल होतील.” बस इतकेच लिहून तो थांबला. त्याला त्याचे
उत्तर सापडले होते.
सत्यजित चितळे
२३ नोव्हेंबर २०१६, पुणे