उन्हानं तापलेल्या डांबरी रस्त्यावरून एक छकडा
चालत जायचा. त्याच्या दोन्ही चाकांना जरूरीपेक्षा जास्त वंगण घातलेलं असल तरी ती त्यांचे
बेअरिंग घळघळीत झाल्यामुळे एकाच पातळीत फिरत नसत. स्वाभाविकपणे “खड् खड्” असा आवाज
करत तो छकडा डोलत पुढे जात असे. छकडा ओढणाऱ्या बैलाची मान जणू त्या तालावरच डावी
उजवीकडे झुलत असे. छकडा चालवणारा त्या बैलाशी अखंड बोलत असे आणि आपले बोलणे ऐकूनच
हा बैल त्याला मान डोलवतोय असे त्याचा गोड गैरसमज झालेला असे. एकूण सांगाडा जुना झालेला, वेळो वेळी रंग दिल्यामुळे
त्याचे एकावर एक थर बसलेले आणि त्याचे पोपडे उडालेले असे त्याचे रूप होते. या डोलण्या
बरोबरच त्या सांगाड्यातून “कच कच” आवाज होई आणि त्या सांगाड्याचे कठडे कधी तुटून
पडतील असे वाटे. सिंहगड रस्त्यावर पंचवीस- तीस वर्षापूर्वी हा रघूचा छकडा अनेकांनी
पहिलेला असेल. सिंहगड रस्त्यावर इंडियन ह्यूम पाईप च्या समोर कॅनाल वरच्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्याला
एक सुरेख वळण होत आणि तो रस्ता चढाचा होता. सुरेख अश्यासाठी कि त्या आधीच्या
टप्प्यात रस्त्यावर सावली धरणारी अनेक डेरेदार झाडे होती आणि त्यातील एका झाडाखाली
नीरा विक्रीची एक छोटीशी टपरी होती. ७ वी ते १० वी च्या काळात एप्रिलच्या महिन्यात
शाळा संपली कि सकाळी थोडं उशिराने उठून आम्ही सायकलवरून धायरीला जायचो त्या वेळी कधी
कधी रघूचा हा छकडा रस्त्यावर या भागात जाताना दिसे. धायरी परिसरतील उद्योग हे त्या
वेळेस पुण्याच्या 'खूप' दूर वर असल्यासारखे होते. पुण्याच्या मध्य वस्तीत, रविवार
पेठेतून मटेरीअलची खरेदी करून त्यावर प्रक्रिया अनेक उद्योग करत असतं. माल विकणारा
आणि घेणारा असे दोन्ही उद्योजक तुलनेन लहान होते त्या वेळची ही गोष्ट.
रघु रविवार पेठेतून त्याच्या छकड्यातून माल
लादून आमच्या आणि इतर जवळपासच्या कंपन्यांना पोचवत असे. डोक्यावर मळलेल्या गांधी
टोपीखाली झाकलेले बारीक कापलेले केस, मूळचा गव्हाळ वर्ण पण कष्ट केल्याने रापलेला
चेहरा, कपाळावर चंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ, अंगात मळलेली दणकट बंडी आणि त्यावर जाड कापडाचे
अनेक खिसे असलेले आणि पुढची बटणे तुटलेले, ग्रीस आणि ओईल चे हात लागून ओशट झालेले अर्धे
जॅकेट. उजव्या खांद्यावर चाबूक, त्याचा दांडा कंबरेपर्यंत आलेला. कंबरेला मळलेली गुढग्यापर्यंत
आलेली अर्धी विजार आणि पायात करकरणारे अनेक खिळे ठोकलेल्या पुणेरी वहाणा अशी
त्याची स्वारी छकड्यात एका बाजूला बसलेली असे. छकड्याच्या एका अंगाला रंगी बेरंगी कापडान
शिवलेली बर्यापैकी स्वच्छ असलेली पण जिचे बंद हाताळून काळे कुळकुळीत झालेत अशी त्याची
डब्याची पिशवी लटकवलेली असे. त्या पिशवीत त्याचा जेवणाचा डबा तर असेच पण वेळ
मिळाला कि वाचण्यासाठी भागवताची प्रत किंवा तुकारामाची गाथा असे. छकड्याच्या एका किंवा
दोन्ही बाजूला गोणपाटात लपेटलेले आणि काथ्याने बांधलेले मटेरीअल चे बार, पट्टे आणि
त्यावरच बैलासाठी थोडं वैरण पेंढी असे आणि छकड्याच्या खालच्या बाजूला एक घमेलं,
लटकवलेल, बैलाला पाणी पाजण्यासाठी.
रघूचा बैल उमदा खिल्लारी होता. शुभ्र पांढऱ्या
रंगामुळेच बहुतेक त्यान त्याला “भुर्या” हे नाव दिलेलं होत. उंच, पुष्ट वशिंड
असलेलं हे उमदं जनावर प्रेमळ स्वभावाचं होत. बैलपोळ्या च्या दिवशी रंगवलेली शिंग
आणि पाठीवर काढलेली नक्षी अनेक दिवस त्याच्या अंगावर मिरवायची. रघु चाबूक घेऊन
यायचा पण त्याचा व्रण कधी भुर्याच्या पाठीवर दिसला नाही. “माझी भाषा त्याला समजते”
असाच त्याचा दावा होता आणि तो खोटा ठरवायला कोणी जात नसे.
सकाळी १०-११ वाजता रविवार पेठेतून निघाला कि १ ते
१.३० च्या दरम्यान मजल दर मजल करीत ही रघु
आणि भुर्याची जोडी आमच्या वर्कशॉप मध्ये पोचत असे. पहाडी आवाजात “ सामान आणलाय हो”
अशी हाळी घालत उडी मारून तो छकड्यातून पायउतार होत असे. भुर्या सवयीप्रमाणे छकडा
वळवून उलट घेत वर्कशॉपच्या दारात लावे पर्यंत रघूची स्वारी टेबलपर्यंत पोचत असे.
त्या वेळी छोट्या कंपनीत एखादेच टेबल असे तेच मॅनेजरचे, सुपरवायझरचे, तेच जेवायला वापरायचे.
रघु हमाल होता पण त्याचा स्वत:चा छकडा होता.त्यामुळे
तो जरा “वरचा” समजला जाई, अर्थात ते इतरांच्या मनात. त्याने आणलेल्या मटेरीअलच्या
चलनावर दोन प्रकारे त्याची बिदागी लिहिलेली असायची- वाहतूक आणि हमाली. चलन टेबलवर
ठेवून तो स्वत:च मटेरीअल उतरवायला घ्यायचा. सगळे सामान उतरले की दाखवायचा, मोजून
द्यायचा. आमच्या वर्कशॉप समोर त्या वेळेस एक लिंबाचे झाड होत आणि मोकळी जागा होती.
तिथे छकडा लावून आणि भूर्याच्या मानेवरच जू काढून त्याला मोकळा करायचा. मागचं
घमेलं काढून त्यातून पाणी आणून भुर्यासमोर ठेवायचा आणि मायेन त्याच्या मानेवरून
हात फिरवत त्याला गोंजारून वैरणीची पेंढी त्याच्या समोर टाकायचा. मगच स्वत: हात
धुवून त्याची बिदागी घ्यायला यायचा. पैसे कमी करण्यावरून मग शब्द व्हायचा तेंव्हा
तो स्वत:ची हमाली कमी करायचा पण वाहतुकीची रक्कम कधी कमी करत नसे.” मुकं जनावर आहे
त्याच्या पोटावर पाय नका देऊ” असे म्हणून
तुकोबाचे, ज्ञानदेवाचे कोणतेतरी अभंगाचे दृष्टांत देऊन ते पटवायचा प्रयत्न करायचा.
रघुला अक्षर ओळख होती, तो पुस्तके नव्हे तर ग्रंथ आणि पोथ्या वाचायचा, पण फार
लहानपणीच शाळा सुटल्याने हाताला लिखाणाचे वळण नव्हते, त्यामुळे पैसे घेतले की मग
घट्टे पडलेल्या हाताचा अंगठा उठवणे पसंत करायचा. अंगठा उठवून उठवून त्याच्या
डाव्या हाताचा अंगठा कायमचा निळा झालेला होता. पण तो कोणाला अंगठा दाखवणारा नव्हता
आणि त्यामुळे रविवार पेठेतील शेठ लोकांचा आणि त्यांच्या गिऱ्हाईकांचा आवडता होता. हा
सर्व कार्यक्रम चालू असताना त्याची अखंड बडबड, ओव्या म्हणणं आणि त्याचा अर्थ सांगत
फिरणं हे चालूच असायचं. काही लोक त्याला वेडासुद्धा समजत असतं कारण तो बर्याच
वेळेस त्याच्याच घमशनात असे. दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला आणि वर्कशॉपमधील सर्वांना
पेढे द्यायला गेलो तेंव्हा नेमकाच तो तिथे आला होता. पेढा घेऊन त्यान मोकळेपणान
दिलेला आशीर्वाद मला आजही आठवतो.
पुढे एक दोन वर्षानं देवानं रघु आणि भुर्याची
जोडी फोडली. पोटाच्या आजाराच निमित्त होऊन भुर्या गेला. रघु आमच्याकडे येण बंद
झालं. तोपर्यंत रिक्षा टेम्पो वाढले आणि वाहतूक करणारे हमाली करणार्यांच्या एक नव्हे
तर दहा पायऱ्या वर गेले.
इंजिनियरिंगला गेल्यावर आमच्या बुडाखाली वाहन
आलं. सुट्टीच्या दिवशी ते फिरवायला मिळावं या उद्देशान रविवार पेठेतील काम ओढवून
अंगावर घेणं सुरु झालं. असा एकदा दुकानात गेलो असताना रघु भेटला. एकदम अबोल,
कामापुरतंच बोलला, तेही कष्टावल्या सुरात. मला वाईट वाटलं हेही मला आठवतंय.
दुकानाच्या पुढच्या एका भेटीत तो दिसला नाही तेंव्हा चौकशी केली. त्याचा एक सहकारी
होता दशरथ, तो सांगता झाला- ‘ भुर्यावर त्याचा फार जीव. तो गेला तेंव्हा ढसा ढसा
रडला. आणि नंतर त्याची वाणी एकदम बंद झाली. छकडा चालवण्यासाठी दुसरा बैल घे असे
आम्ही सुचवले पण त्याची तयारी नव्हती. त्याने तो छाकडाही विकला. हमाल चौकात जाणं
बंद केलं आणि नुकताच गावी निघून गेला असं कळाल. घरचं कोणी नव्हतं त्याला.
भुर्याच्या मायेन त्याला बांधून ठेवला होता. ते पाश गेले, आता त्याचं काय होत
सांगता येत नाही.’ दशरथन फारच विदारक चित्र समोर मांडल. हळहळ व्यक्त करण्यापलीकडे
त्यावर कोणी प्रतिक्रिया दिली नाही.
रघूची आठवण परत निघण्याचं कारण गेल्या महिन्यात
घडलं. नेहमीप्रमाणेच परत शेठच्या दुकानात गेलो असताना त्यांनी एक पत्रक हातात दिल.
सांगरुण गावातल्या कीर्तन महोत्सवाचं. हे मला कशाला असे भाव माझ्या चेहऱ्यावर बघून
शेठन खुलासा केला ‘तुम्ही रघुची चौकशी करायचात ना? तो कीर्तनकार झाला, त्याच
कीर्तन आहे, तुम्हाला मुद्दामहून सांगितलं’. मी पत्रक पुन्हा वाचलं, कीर्तनकार
रघुनाथ महाराज भिंताडे हे नाव मला अपरिचित होत पण व्यक्ती? मला माहित नव्हतं.
त्या दिवशी ठरवून मी सांगरुणला पोचलो. मंदिरात
जाऊन बसलो. शहरी पेहरावातला आणि तशाच धाटणीचा मी एकटाच होतो तिथे त्यामुळे सगळे जण
माझ्याकडे रोखून बघत होते. हरीचा जयघोष झाला, पायघोळ अंगरखा, जरीकाठी धोतर आणि
डोईवर फेटा घातलेले प्रसन्नचित्त रघुनाथ महाराज आले. गळ्यात तुळशीची माळ आणि
फुलांचा हार घालून त्यांनी आख्यान मांडल. सार्या सृष्टीत एकच परमेश्वर व्यापून
राहिला आहे हा विषय मांडताना त्यांनी ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदविला त्याच
आख्यान रंगवून सांगितल. मी पाणी भरल्या डोळ्यांनी संपूर्ण आख्यान ऐकलं. रघु-रघुनाथराव....मी
अजूनपर्यंत ‘त्या’ची ओळख पटवू शकत नव्हतो. मग आरती झाली. भक्त लोक महाराजांच्या
पायावर डोक ठेवून जायला निघाले, महाराज शांतपणे तुकोबाच्या गाथेतील एक एक श्लोक
म्हणत होते. तोच खडा पण आता गंभीर वाटणारा आवाज, तीच लय आज मी पुन्हा २५-२८
वर्षानी ऐकत होतो. “तुका म्हणे काही न मागे आणिक | तुझे पायी सर्व सुख आहे ||” मी
महाराजांजवळ पोचलो तेंव्हा ही ओळ म्हणताना त्यांचा चेहरा विठ्ठलासंमुख होता. मी
त्यांच्या नजरेत पाहिलं आणि एकदम भूर्याला पाणी देतानाचे रघु चे डोळे आठवले. तेच
पाणीदार डोळे, तीच समर्पित वृत्ती, तीच सेवेची आस! मला रघु- रघुनाथरावांची एकदम
खरी ओळख पटली.
माया तेचि ब्रह्म, ब्रह्म तेचि माया | अंग आणि छाया तया परी
||
तोडिता न तुटे सारिता निराळी | लोटांगणातळी हारपते ||
हे तत्वज्ञान कोळून प्यायलेल्या रघुनाथरावाला, आम्ही
भुर्याच्या मायेत अडकवू पाहत होतो. तो त्याच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाची निस्सीम
भक्ती करत होता, त्याची माया त्याचे ठायी लीन झालेली होती.