Tuesday, September 8, 2015

सिंहगडावर बिबट्या आला रे आला!

२८ ऑगस्ट च्या शुक्रवारी महाराष्ट्र टाईम्स मध्ये सिंहगडावर बिबट्या दिसल्याची बातमी आली आणि मित्राने ती व्हाटस अप ग्रुप वर फिरवली. माझा फोन नेमका बायकोच्या हातात होता, “आता सिंहगड बास बर का” वाघिणीच्या तोर्यात ती गुरगुरली. “काय झालं?” माझ्या प्रतिप्रश्नाला उत्तर म्हणून माझाच फोन तीन माझ्या हातात दिला “ घे वाच!”...“ बिबट्या होय, अग तो आम्हाला नेहमीच दिसतो आणि बिबट्या आमच्या सारख्या हत्तींच्या वाट्याला सहसा जात नाही” मी पोकळ प्रतिवादाचा प्रयत्न केला. 
मला आठवतोय अवसरी घाटातल्या वन उद्यानातला बिबट्या. सुमारे १५-१७ वर्षांपूर्वी जुन्नर भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वन विभागाने पिंजर्यात बंदिस्त केला. पुन्हा जंगलात सोडण्यापूर्वी त्याला अवसारीच्या वन उद्यानात काही दिवस ठेवल होता. राजगुरुनगरला काही कामानिमित्त गेलो असताना मुद्दाम बिबट्या पाहायला तिथ गेलो. पूर्ण वाढ झालेला तो नर बिबट्या होता. रानावनात स्वच्छद विहार करणारा तो प्राणी, पिंजर्यात बंदिस्त झाल्यामुळे संतापलेला होता. अतिशय लोभस अशा अद्भुत सोनेरी रंगाची आणि त्यावर खोल काळे ठिपके असलेली तजेलदार कांतीच ते जनावर अस्वस्थ होऊन पिंजर्यात येरझार्या घालत होत. आम्ही पिंजर्यासमोर उभे राहिलो. आम्हाला पाहताच त्यान फिस्कारत सावध पवित्रा घेतला. सावजाच्या नजरेचा ठाव घेणारे त्याचे निळे हिरवे भेदक डोळे, ताणलेल्या मिशा आणि वळवळणारी शेपूट हे त्याच भीतीदायक रूप आजही काधी कधी वाईट स्वप्न बनून रात्री डोळ्यासमोर येत. क्षणार्धात त्यान आमच्या दिशेनं झेप घेतली. पिंजर्याच्या लोखंडी जाळीला धडकून तो खाली पडला पण आम्ही मात्र चार पाच पावलं मागे पळालो, भक्कम पिंजरा आहे हे माहित असूनसुद्धा! सर्वांगाचा थरकाप होण म्हणजे काय हे मला त्या क्षणी उमगल. त्यामुळे “ बिबट्या मला काय करणार?” हा धाडसी युक्तिवाद किती लंगडा होता हे मनोमन कळत होत. 
या बिबट्यान चर्चेला आणि चेष्टा मस्करीला चांगलाच खाद्य पुरवल. “ का चाललाय काय... खडकवासल्यात मगर आणि सिंहगडावर बिबट्या.... या प्राण्यांनी आम्हाला कुठ “ स्पेसच” ठेवली नाहीये...” अशा कॉमेंट सुद्धा वाचायला मिळाल्या. 
बिबट्यान काही कुत्र्यांचा आणि वस्ती वरच्या काही कोंबड्यांचा फडशा पाडलाय असही बातमीत म्हणलं होत. आसपासच्या मनुष्य वस्ती व पाळीव दुभत्या जनावारांकडे त्यांना वक्रदृष्टी केली नव्हती अजून!
बहुतांश पुणेकरांना मात्र याची फिकीर नव्हती. बिबट्या दिसणं ही त्यांच्या दृष्टीने “ आजून एक” बातमी होती. साहजिक आहे, पाईप लाईन मधून गस आणि बंद नळातून अनिर्बंध पाणी येणाऱ्या, रेनकोट विकत घेतलाय तर तो भिजवायला ‘एक दोनदाच’ पाउस आला तर बर असा विचार करणाऱ्या शहरी माणसाला आसपासच्या निसर्गावरच्या संकटाशी काय देण-घेण? सिंहगड हा पुण्यातला एक आद्य ऐतिहासिक पुरूष आहे हे सुद्धा बहुतेक पुणेकरांना माहीत नसाव! अनेकांच्या लेखी ते एक पर्यटनस्थळ आहे इतकच!
पण त्याच्या येण्यान गडाशी नात जूळलेल्यांच्या गोटात चलबिचल झाली. पुढच्या वारी जरा गटा-गटान चढूयात अस ठरलं पण संख्या काही कमी झाली नाही. मार्जार कुळातल्या या जुन्या सवंगड्याच्या आगमनान गडावरच गवताच प्रत्येक पात मात्र सुखावलेल दिसलं.
कितीही प्रयत्न केला तरी कोणताच हिंस्त्र पशू माणसाएवढा क्रूर होऊच शकत नाही. अति संहारक अशी शस्त्रनिर्मिती आणि त्याच्या वापरान माणसान जी हिंसा घडवून आणलीय ती “पाशवी” या शब्दापलीकडे जाते. त्याची निर्भत्सना करण्यासाठी पुन्हा माणसाच्याच “माणुसकी” या गुणाचा आधार घ्यावा लागतो. नव नवोन्मेशशालिनी अशी बुद्धी परमेश्वरान माणसाला देताना त्यातील संहारक आणि सृजन या दोन्ही बाजूंचा योग्य वापर करण्याचा विवेकही दिलाय. आणि त्याचबरोबर त्यानच निर्माण केलेया वैविध्यपूर्ण सृष्टीचा सांभाळ करण्याची जबाबदारीही दिलीय. 
जगायच असेल तर बिबट्यासारख्या प्राण्यान त्याचा हिंस्त्रपणा सोडून द्यावा आणि पाळीव प्राण्यात गणना करून घ्यावी. अन्यथा माणूस त्याची जात गाळीव प्राण्यात वर्ग करेल ही उत्क्रांतीच्या सिद्धांताची काळी बाजू आहे. पण हे त्याला कस समजणार? मग आपणच एक पाऊल पुढे टाकूया का? 
बिबट्या नेमका कधी आला, कुठून आला हे माहित नसल तरी त्यान प्रकट होण्याचा दिवस या दृष्टिन योग्य निवडला, तो रक्षाबंधनाचा आदला दिवस होता!
-सत्यजित चितळे

No comments:

Post a Comment